रिले कथा- लॉकडाऊन… अनलॉक नव्या आयुष्याचा- भाग ६

भाग – ६ 

आपण जिथे राहतो तेथील नियम पाळलेच पाहिजेत असा समीरचा शिरास्ता होता. मनू आणि सौम्या मुंबईहून गावी पोहचले त्याच्या आधीच समीरने गावात सरपंच आणि पोलीस पाटील यांना ते गावात येणार आहेत ते सांगितले होते. आपल्या कुटुंबातील सदस्यांमुळे गावात कोणाला त्रास नको आणि कोणी तक्रार करायला नको म्हणून त्यांना १४ दिवस एकाच ठिकाणी ठेवायचे असे त्याने ठरवले होते म्हणून ते आल्यानंतर त्यांना डायरेक्ट वाडीतल्या घरी आणले. आज सकाळपासून सखाराम मामा, रखमा मामींनी झपाटल्यासारखे काम करुन वाडीतले घर, पुढचे अंगण, मागचे अंगण साफ करुन ठेवले होते. किरकोळ स्वयंपाक करता यावा म्हणुन काहि साहित्य एक्स्ट्राचा गॅस सिलेंडर वगैरे आणून ठेवले होते. 

सौम्या आणि मनू डायरेक्ट वाडीत पोहचले तेव्हा समीर, त्याचे आई बाब, मामा मामी मामी सगळे हजर होते. मनूला आणि सौम्याला पाहताच समीरच्या आईला आणि रखमामामींना त्यांना कुशीत घ्यायची खुप इच्छा होती पण समीरने तसे करायचे नाही अशी सक्त ताकीद दिली होती. बर्‍याचदा मन आणि बुद्धी यांच्या लढाईत मन जिंकते. पण आता तसे भावनिक होऊन चालणार नव्हते. समीरने सौम्या आणि मनूला आधीच तशी कल्पना दिली होती. त्यामुळे ते दोघे निवांत होते. 

रखमा “जल्ला मेला करोना, माझं लेकरु इतक्या दिवसांनी आलं अन साधा कुशीत घ्यायची पण चोरी.” 

 “मामी १४ दिवसांनी काय कुशीत घ्यायचे ते घ्या” समीर.

सौम्या आणि समीरने नजरेनेच सगळे कुशल मंगल असल्याचे एकमेकांना सांगितले. त्या दोघांना आत पाठवून मग बाकीचे घरी गेले. समीर त्यांना सोबत म्हणून बाहेरच्या खोलीत राहणार होता. अन शिवाय तो स्वतःची पूर्ण काळजी घेणार होता. मामा घरुन डबा घेऊन येणार होते. त्यामुळे सौम्या आणि समीर बर्‍याच दिवसांनी एकमेकांशी बोलत बसले. मनू अजूनही उजेड असल्याने फोटो आणि सेल्फी काढत बसला. त्याने लगेचच ते फोटो आपल्या फेसबुक वॉलवर आणि इंस्टाग्राम अकाऊंट वर अपलोड केले. आता पुढचे काही दिवस इथेच असणार आहे हे तो सगळ्या मित्र मैत्रिणींना सांगत होता. 

एव्हाना सौम्या आणि मनूला गावी येवून आठ दिवस होऊन गेले होते. समीरसुद्धा त्याचे अॉफिसचे काम वाडीत बसून करत होता. त्याचा लॅपटॉप सौम्या घेऊन आली होती त्यामुळे त्याने शौर्यच्या मित्राचा लॅपटॉप परत केला होता. वाडीत मोबाइल रेंज भरपूर असल्याने मोबाईल डेटावर त्याचे काम होत होते. मनू दररोज व्हिडीओ कॉलमधे आपल्या वाडीचे, झाडांचे दर्शन आपल्या मित्रांना आणि निकिताला घडवत होता. 

निकिता “किती लकी आहेस यार तू. आमचं ना गावाकडे घर ना शेत” 

मनू “एकदा लॉकडाऊन संपू दे मग आपली सगळी गॅंग घेऊन आपण येऊ इकडे” 

निकिता “प्रत्येक ठिकाणी गॅंगच कशाला हवी? मी एकटी नाही का चालणार?” 

मनू “न चालून कसे चालेल”? 

निकिता “जा तिकडे. माझे काही कंपल्शन नाही मला बोलाव म्हणून”

तीने फुरंगटून नाक उडवले आणि मनू एकदम खल्लास झाला आणि हसु लागला त्यावर ती आणखीनच चिडली. निकिता जेव्हा अशी रागावत असे तेव्हा तिच्या चेहर्‍यावरची लाली पाहून मनू तिला चिडवत असे. निकिता म्हणजे दुधी रंगाची, घारे डोळे, राखीव भुवया, चाफेकळी नाक, फिकट गुलाबी ओठ, गालावरती खळी, त्यात तीच्या उजव्या बाजूच्या एका सुळ्यावर एक छोटा सुळा आला होता. ती हसली की तीच्या गालावरची खळी आणि हे दात तिचे सौंदर्य आणखीच खुलवत असत. 

मनू “अगं काय चिडतेस सारखी. मी तुलाच घेऊन येणार आहे”

निकिता “आता काय उपयोग मी म्हटल्यावर” 

मनू “अगं मी या आंब्याच्या झाडांची आयुष्यभर काळजी घ्यायचा विचार करतोय. माझ्यासारखीच या बागेची, इथल्या झाडांची, इथल्या हिरव्यागार निसर्गाची, फुलांची काळजी घ्यायला तुझी साथ देशील?” 

निकिता “म्हणजे?” 

मनू “म्हणजे काय वेडू? आय एम प्रपोझींग यू. वील यू बी माईन”

निकिता “तू… तू… म्हणजे ना. असे विचारतात का?” 

मनू “म्हणजे तूझा नकार आहे?”

निकिता “मी असं कुठे म्हटलं”

त्यानंतर ते दोघे, रोमांच, हसू, अश्रू अशा अनेकाविध भावनांनी न्हाऊन निघाले. 

लांबून ऐकणारे समीर आणि सौम्या हे ऐकून चाट पडले. आपण बोलू सविस्तर असे समीरने नजरेतूनच सांगितले. 

रोज नवनवीन पदार्थ आयते घरुन येत आहेत म्हणून सौम्या आणि मनू खुश होते. 

सौम्या “तिकडे मुंबईमधे माझे काम करुन करुन वाट लागली होती. पण आता मस्तच वाटते आहे. खरंच आपलं गाव ते आपलं गाव.” 

समीर “हो ना. मला तर आता इथेच बरे वाटते आहे.” 

सौम्या “म्हणजे? तुझे करिअर? माझे करिअर? आपले मुंबईतील घर. तीथली लाईफस्टाईल” 

समीर “आपण कसं जगतो गं मुंबईमधे? कित्येक वेळ ट्राफिक, दगदग, धावपळ. वीकेंडच्या नावाखाली सिनेमा नाटक किंवा आऊटींगच्या नावाखाली लोणावळा खंडाळा किंवा अलिबाग जवळ बीचवर. हेच जगणे का? मागे तू जेव्हा जर्मनीला गेली होतीस तेव्हा तूच सांगितले होते आठवते का? की तुमच्या तिथल्या अॉफिसचे लोक त्यांच्या शहराजवळील घरी जाऊन राहतात. शुक्रवार दुपारनंतर कसलेही काम अर्जंट नसते त्यांच्यासाठी. आपण मात्र शनिवार, रविवार, इतर दिवशी रात्री उशिरा पर्यंत बसून काम करतो. 

मी कितीतरी वेळा विचार करतो हल्ली एवढं सगळं करून आपण खरंच खुश आहोत? ज्या लोकांसाठी काम करतो ते लोक त्यांचे त्यांचे काम त्यांचे पर्सनल लाईफ सांभाळून करतात. आपण जर अशा ठिकाणी राहून जर ते काम करु शकलो तर जास्त खुश राहू. शिवाय आपली माणसं आपल्या आसपास असतील. राहता राहिला लाईफस्टाईलचा प्रश्न तर आता कोकणात भरपूर रिसॉर्ट आहेत. इथेही आता हळूहळू मॉल्स मल्टिप्लेक्स होत आहेत. आणि मे बी आपण सुद्धा त्यात इन्व्हेस्टमेंट करु शकतो. आणि कधी वाटलेच तर ट्रॅफिक, गोंगाट, गर्दीची आठवण झालीच तर कधीही पुण्या मुंबईला जाता येईलच ना. 

माझी तर आताचा जॉब सांभाळून या बागेवर काम करायचे आहे. माझा एक मित्र इस्रायलला जावून आला आहे त्याच्या शेतीतंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठी. तो मदत करायला तयार आहे. तंत्रज्ञान आणि पारंपारिक शेतीची सांगड घालून भरपुर पैसा पण कमावता येईल अन या भागाची डेव्हलपमेंट देखील करता येईल. अन आपला मनू तर आपल्या होणार्‍या सुनबाईंना इकडे यायला सांगतोय”

सौम्या “अरे होणार्‍या सुनबाई काय? ती कोण? कुठची आपल्याला काहीच माहिती नाही. मनूने अजूनही काही सांगितले नाहीये आपल्याला. आणि लहान आहे अजून मनू. त्याला आत्ता बरं वाटतंय पण काही दिवसातच बोअर होणार नाही याची काही खात्री नाही. “

समीर “तसं नाही ग मी गम्मत केली. त्याचं त्याला विचारुच. तो ठरवेल त्याचं काय ते. तेवढा समजूतदार आहे तो. पण तुझे काय मत आहे?”

सौम्या “काही गोष्टी पटतायत. काही नाही.”

समीर “बघ शांतपणे विचार कर. मग ठरवू आपण. पण जर तुझे अॉफिस जर तुला अलाऊ करत असेल तर विचार करायला काहीच हरकत नाही”. 

काही दिवस गेले. तब्बल १५ दिवस सौम्याने विचार केला. तिने तिच्या अॉफिसमधील बॉसशी बोलली, तिच्या मित्र मैत्रिणी, तिचे आई बाबा सगळेच गावात रहायला जाण्याच्या निर्णयाला फॉर होते. त्यामुळे आता सौम्याने सुद्धा खुप विचार केला. दोन वर्षे इथे कसे रुटीन बसते पाहू नाही तर पुन्हा मुंबईला शिफ्ट होऊ असे तीने समीरला सांगितले. समीरला देखील हा पर्याय आवडला. सौम्याला शेती आणि फळबागांबद्दल विलक्षण ओढ आहे हे त्याला माहीत होतं. त्यामुळे त्याला स्वतःला खात्री होतीच की एकदा का हे शेतीच्या कामाचे प्रोजेक्ट सुरु झाले की सौम्याला ते प्रचंड आवडणार आहे. अन ती त्यात झोकून देऊन काम करणार आहे. त्यामुळे तो निश्चिंत होता. 

सौम्या आणि मनू येवून आता महिना झाला होता आणि त्यांना कोरोनाची काही लक्षणं नव्हती त्यामुळे सगळे आता मुळ गावातील घरी होते. 

एक दिवस समीरने घरच्यांना आपण इथेच रहाण्याचा विचार करत आहोत हे सांगितले. आई बाबा आले मामा मामी आनंदी झाले. शौर्य सुद्धा हे ऐकून आनंदी झाला होता. चेहरे पडले ते मिहीर आणि मधुराचे. 

समीरच्या बाबांनी मिहीर आणि मधुराचे पडलेले चेहरे ताडले आणि म्हणाले 

बाबा “अरे पण इथे करणार काय? तुमच्या सारख्या नोकर्‍या इथे नाही. शिवाय आपल्या बागांचं इतकंही उत्पन्न नाही” 

आई “अहो त्यांनी काहीतरी विचार केला असेलच ना?” 

समीर “हो सांगतो. माझ्या आणि सौम्या च्या अॉफिसनी आम्हाला इथून काम करायला परमीशन दिली आहे. त्यातच मी माझ्या एका शेतीतज्ञ मित्राच्या मदतीने आपल्या बागांचं रुप बदलणार आहे. त्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरायचा विचार करत आहे”

मधुरा चिडून “आणि आमचं काय? आम्ही कुठे जायचं?”

समीर “तुझे विचार कळत आहेत मला. पण आधी माझं म्हणणं पूर्ण ऐकून घे तू आणि मिहीर तू ही. मी जे काही प्लॅन करतोय ते माझ्या एकट्यासाठी नाही तर आपल्या दोघांसाठी करणार आहे. जे उत्पन्न येईल ते आपण वाटुन घेऊ. सुरुवातीला जो खर्च होईल तो मी करेन. तुझ्या उत्पन्नातून ती रक्कम तू हळू हळू परत कर. हवंतर आपण सगळे पेपरवर्क करु म्हणजे पुढे जाऊन काहीच अडचण येणार नाही. त्यातून जर तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही तुमच्या हिश्श्याच्या जमीनीवर काय पिकवायचे ते तुम्ही ठरवा. पण मला विचाराल तर आपण हे एकत्र केले तर नक्कीच काहीतरी चांगले होईल अशी माझी खात्री आहे”

मधुरा “अन शौर्यच्या शिक्षणाचे काय?”

समीर “माझे प्रॉमीस माझ्या लक्षात आहे. शौर्यच्या शिक्षणाला लागेल ती मदत मी करणार आहेच. मला वाटते मनू आणि शौर्य मुंबईच्या घरी राहतील कॉलेज पुर्ण होईपर्यंत. शेजारचे देशपांडे त्यांच्या जेवणाखाण्याची काळजी घेतील. घरगुती जेवणाच्या डब्यांचाच व्यवसाय आहे त्यांचा. माणसं अतिशय सज्जन आहेत शिवाय जेवणही उत्कृष्ट असते. घरातील इतर कामांना शांताकाकी आहेतच. शिक्षण पूर्ण करुन पुढे काय करायचे ते त्यांनाच ठरवू दे. कदाचित आपल्या शेतातील उत्पन्नाचे पुढे काय करायचे ते तिथूनही करतील. एक्स्पोर्ट करतील. फुड प्रोसेसिंग करु शकतील. बरेच अॉप्शन्स आहेत. त्यांचे त्यांना ठरवू दे. शिवाय मी आणि सौम्या वाडीतच राहू. त्यामुळे तुमचे रुटीन डिस्टर्ब होणार नाही. तुमचे फ्रीडम तुम्हाला राहिल आणि आमचे आम्हाला. आणखी अजून काही शंका असेल तर सांगा”

मीहीर “दादा एवढा विचार केलास सगळ्यांचा? आणि आम्ही मात्र फक्त स्वतःचाच विचार करत राहिलो. 

समीर “अरे आम्ही इतकी वर्षे इतरांसाठी काम करत राहिलो. आपल्या माणसांसाठी का करणार नाही” 

सगळ्याचे डोळे पाणावले. मीहीरने समीरला घट्ट मिठी मारली. मधुराही खुश झाली. आई, बाबा, सखामामा रखमा, शौर्य आणि मनू सगळेच आनंदी झाले. 

आई “रखमा आज गोड काही तरी करु गं बाई. आज मी खुप खुश आहे”

“माझ्या दोन्ही लेकरांच्या आवडीचे पदार्थ करु” रखमा.

मधुरा आणि सौम्या एकदमच म्हणाल्या “म्हणजे उकडीचे मोदक आणि शेवयाची खीर दोन्ही करु. चला आम्ही पण मदत करतो” आणि त्या चौघी स्वयंपाकघरात गेल्या. 

कधी कधी वेळ माणसांची परिक्षा घेत असते. आपलीच रक्ताची नाती वेळ आली की आपल्या विचारांच्या विपरीत का वागतात असा प्रश्न पडतो. बर्‍याचदा या प्रश्नावर हवे तसे उत्तर सापडत नाही. घरचे असले तरी प्रत्येकजण आपल्या मनाप्रमाणेच वागेल असे काही नसते. अशावेळी थोडे सामंजस्य दाखवून वागावे लागते. अडलेल्या प्रश्नांची उकल करावी लागते. आपल्याच माणसांच्या मनात उठलेल्या वादळाला शांत करण्याची तयारी करावी लागते. ती जो यशस्वीपणे करतो तो या अशा वादळांमधून तरून जातो. 

या लॉकडाऊनी सगळ्या जगाची परिक्षा घेतली होती अजूनही ही परिक्षा सुरूच आहे. काही जणांच्या घरात वादळ आलं होतं, काही नाते संबंध दुरावले होते. इनामदारांच्या वाड्यावर सुद्धा काही दिवस असंच एक भावनिक वादळ घोंघावत होतं. सामंजस्य दाखवलं तर काहीच अवघड नसतं हे समीरनं दाखवून दिलं होतं. वाड्यावर जाणवणारं मळभ आता दूर झालं होतं. लॉकडाऊनच्या काळात इनामदारांनी मात्र त्यांच्यातली लॉकडाऊन झालेली नाती अनलॉक केली होती. 

– अभिजीत इनामदार 

Image by mohamed Hassan from Pixabay

Abhijit Inamdar

Abhijit Inamdar

लेखक परिचय : नाव- अभिजित अशोक इनामदार. सातारा जिल्ह्यातील म्हासुर्णे माझे बालपण हे (वयाची पहिली १४ - १५ वर्षे) हे खेडेगावामध्ये गेले. मी इंजिनिअरिंग केले असून एमबीए इंटरनॅशनल मार्केटिंग मध्ये केले आहे. नोकरीनिमित्त बऱ्याच ठिकाणी फिरून झाल्यानंतर सध्या पुणे येथे वास्तव्यास आहे. लहानपणापासूनच मला कला क्षेत्राबद्दल जिव्हाळा आहे. काही नाट्यप्रयोग तर काही म्युझिकल शोज चे अँकरिंग केले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आपणही काहीतरी लिहू शकतो याची मनाला आस लागून राहिली होती अन म्हणूनच मग फेसबुक वर २०१२ पासून लिखाण सुरु केले. माझे क्षेत्र जरी यांत्रिकी असले तरी लिखाणामुळे नवी उर्जा मिळते.

4 thoughts on “रिले कथा- लॉकडाऊन… अनलॉक नव्या आयुष्याचा- भाग ६

  • June 30, 2020 at 4:20 pm
    Permalink

    फारच सुखद शेवट

    Reply
  • June 30, 2020 at 6:21 pm
    Permalink

    Wow…
    Good end

    Hychyi next series pn kara wachyla awdel…. 👍

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!