रिले कथा- भेट- भाग ५
“असो कित्यांक बसलंय, तोंड पाडून ? ”
दामू अण्णा च्या एका प्रश्नात नंदू जागा झाला नाही.
“ऐक की रे …..” अशी कोकणी हेलात हाक आली न नंदूनं वर पाहिलं.
आरंबोल गावाच्या उत्तरेला, टेकावर, ….. लाकडी गणेश मंदिर, ….छोटसं.
खूप बरं वाटायचं त्याला इथं, ……..
खाली, वाळूची सीमा ओलांडून, टेकडीच्या खडकांवर आपटून फेसाळणारा समुद्र, मनाचा ठाव घ्यायचा त्याच्या.
फेसाळणाऱ्या समुद्राकडे पाहता पाहता, फेसाळणारी कॉफी विसरायला व्हायची.
दामू अण्णा रोज चालत यायचे इतकं अंतर, ……
गणेश दर्शनाचं निमित्त, ….. बाकी जागा महात्म्य.
काही तरी विसरायला, एकदा नीट आठवून उजळणी करावी लागते म्हणतात. ती ही जागा असावी बहुधा. काकू जाऊन दहा वर्षे झाली होती.
“असं कांय गप गप, भरती जाऊन गप झालेल्या किनाऱ्यासारखो, …… बोल की रे कांय तरी …..”
दामू अण्णांचा हा अनुनासिक जिव्हाळा, नंदूला बोलकं केल्याखेरीज राहणार नव्हता.
“काही नाही ओ अण्णा, इथं कविता लिहायला येतो हल्ली, ……..
मग आठवत रहातं सगळंच …….. मागच्या आठवणी.”
“कोणाची यात येता ?”
कोकणी हाय पिच असा हळवा झाला की, मॉन्सून पण रेकॉर्ड तोड कोसळतो हो ……
नंदू तर साधा सुधा माणूस, …… त्यातून कवी. कोसळलाच, …..
आठवत राहिला, ….. सांगत राहिला,
……. ती आली नव्हती तो दिवस, ……तिच्या आठवणीत काढलेली वर्षे, ….. पुन्हा आयुष्यात आली तो दिवस, ……. आई गेली अन ती पुन्हा जवळ आली, आता कधीच सोडून न जाण्यासाठी, तो दिवस,………….
अन आठवत राहिला तो ही दिवस,
ती कायमची निघून गेली, ….. न भेटताच,
त्या दिवशी, ठरल्या वेळी तो वाट पहात बसला होता कॅफे गुडलक मध्ये. व्हाट्सअप्प वर एक मेसेज आला तिचा, …….
“वाट पाहू नको नंदू, …… मी नाही भेटू शकणार आज.
कदाचित कधीच नाही, माहीत नाही……. चार दिवसात निघतोय आम्ही, स्टेट्स ला.
मिलिंद हॅज सेटल एव्हरीथिंग ……. अगदी मुलाची तिथली ऍडमिशन देखील…….. खूप आनंदात आहे तो, इतकी मोठी पोस्ट मिळतेय, ……. अन माझा जीव अडकलाय त्यांच्यात, अन ….. इथंही …. तुझ्यात.”
पुन्हा थोड्या वेळानं मेसेज टोन वाजला,
“उद्या मार्केटिंग साठी एकदा बाहेर पडीनच. भेटू या एकदा. ….. खूप भेटावं वाटतंय रे….. पाच वर्षे म्हणतोय पण माहीत नाही पुन्हा कधी येणं होईल.”
त्यानं मेसेज पाहिला अन मोबाईल स्विच ऑफ……
नव्हतं भेटायचं त्याला आता. …. नको होता, तोच तोच खेळ पुन्हा, जीवघेणा खेळ. त्याचं मन पेटलं होतं. पुन्हा अर्धीच राहिली त्याची कॉफी. कॅफे गुडलक च्या पोटात असे किती इंतजार अतृप्त आत्म्यासारखे फिरत असतील, देव जाणे.
सकाळपर्यंत त्यानं फोन बंदच ठेवला होता. सकाळी डोकं शांत झालं होतं. त्यानं फोन ऑन केला. फक्त एक मेसेज, ……
“आज दहा वाजता…… कॅफे गुडलक.”
नव्हतं जायचं त्याला. त्यानं पुन्हा फोन बंद केला. ती जाताना, शेवटचं भेटणं खरंच खूप अवघड होतं. …. त्याच्यासाठी अन तिच्यासाठीही.
श्यामल मात्र तयारीला लागली. ती स्टेट्सला जायला अजूनही मनाने तयार नव्हतीच. काहीही करून आज मार्केटिंग साठी, डेक्कन कडे जायचंच. फक्त त्याला भेटण्यासाठी ती आज सजणार होती. शॉवरचा प्रत्येक थेंब तिला नंदूची आठवण करून देत होता. त्याचे कळत नकळत झालेले स्पर्श, तिच्या देहावर कोरत होता. अंगावरचा प्रत्येक शहारा, तिला लाजवत, फुलवत होता…… अन डोळे बंद ठेवण्यास भाग पाडत होता.
ती तयार होत होती. मिलिंद लॅपटॉप वर कामात व्यग्र होता. तरीही तिच्या परफ्युमने त्याचं लक्ष वेधलंच…… व्हाइट मस्क …… गंधित होऊन त्यानं मिठीत घेणं सहाजिक होतं.
पण नाही, ….. ती आज थांबणं शक्य नव्हतंच.
आज कार न घेता, ऑटो, ……. सरळ डेक्कन …..
कॅफे गुडलक मध्ये घुसली अन सर्वांच्या नजरा वळल्या, इतकी स्पेशल दिसत होती. भर्रकन नजर फिरवीत ती बाहेर आली, ….. तो नव्हताच.
ती बाहेर येऊन थांबली, …..त्याला कॉल केला, …. फोन एंगेज.
तो झोपेतून नुकताच उठला होता. बहुधा, ….. कसलंस एअर क्रॅशचं भयाण स्वप्न पाहून दचकून उठला अन तिला फोन लावत होता. त्याला काळजी वाटत होती. स्वप्न तिला सांगितलं पाहिजे. तो आटपु लागला. दोघेही एकमेकांना फोन लावत होते, मेसेज टाकायला , पहायला वेळ नव्हता. ….. दहा मिनिटे ….. पंधरा मिनिटे, ….. तो ऑटोत बसला, …… कॉन्टॅक्ट होत नव्हता.
तोवर मिलिंदच्या नाकातला व्हाइट मस्क डोक्यात शिरला होता. आजचा तिचा घायाळ करणारा अवतार, त्याला स्वस्थ बसू देईना.
त्यानं कार काढली.
आता अर्धा तास झाला, इतकी छान तयार होऊन ती कॅफेच्या बाहेर फार वेळ थांबू शकत नव्हती, ….. बहुतेक भेट होणार नव्हतीच, ….. डोळ्यात आलेलं पाणी अलगद रूमालाच्या कडांवर घेत, ती निघाली , …… ऑटो स्टँड कडे चालू लागली.
नंदू ऑटोचे उरलेले पैसे न घेताच, स्लो झालेल्या ऑटोतून उतरत, कॅफे गुडलक मध्ये घुसला, इकडेतिकडे पाहू लागला.
“मॅडम, अभि अभि निकल गयी ।”
त्यांना कॉलेजपासून पाहणाऱ्या, काउंटरवरच्या चाचुचा आवाज…….
तो तिच्या मागे धावला.
ती दिसली, …… पाठमोरी ……
तो तिला आवाज देणार, इतक्यात, मिलिंदची कार, तिच्या शेजारी येऊन उभी राहिली.
तिला क्षणभर धक्काच बसला. पण काही न बोलता, ती बसली. कार तिच्या नेहमीच्या डिजायनर शॉपकडे निघाली. मिलिंदला बॅक मिरर मध्ये, फुटपाथवर थबकलेला, ….. हताश उभा, ……. नंदू अन त्याच्या डबडबलेल्या डोळ्यांसह चेहरा स्पष्ट दिसत होता. नंदूच्या हे लक्षात आलं, तो झर्रकन मागे वळला. …… उलट दिशेला चालू लागला.
…………………………………………………….
ते चालणं आता गोव्यात येऊन थांबलं होतं. नंदू मागे आला होता, हे शेवटपर्यंत तिला कळलंच नाही. पुण्यातल्या सर्व गोष्टी, विकून फुकून तो गोव्यात आरंबोल गावात येऊन स्थिर झाला होता. आठवणी नाही सोडू शकला. याआधीही पेंटिंग्ज साठी गोव्यात यायचा तो. त्यामुळंच दामुअण्णांशी ओळख …….. अन जिव्हाळाही.
गप्पांच्या ओघात, दोघेही, अण्णांच्या दारात पोचले.
“बस रे जरा, उलीक ….” करत अण्णांनी ओसरीत ठेवलेली खुर्ची पुढं केली. अन “देवाक नमस्कार झालो ……. आता आपलो सोपस्कार” करत मस्त स्कॉच काढली.
नंदू नको नको म्हणत राहिला, ……. तोवर अण्णांनी, दोन ग्लास भरले सुद्धा. अण्णांनी चांगभलं केलान, त्यांची बडबड सुरू झाली,
“खराच तुझ्यार खूप पिरेम करू व्हता रे, …….. मिया असतंय तर हत्ताक धरून घरात आणून ठेयलं असतंय बग …….. असो कित्याक बसतय ? …… याक पेग मार बरा वाटतला, “
नंदूला हसूच फुटलं, अण्णांची स्टाईल बघून. त्यानंही ग्लास उचललाच शेवटी, तरीही अण्णांचं सुरूच होतं,
” उगा कित्यांक यात काडतंय, तेका तिरास देव नको, …….
मिया खय यात काढतय, माझी बाईल ढगात गेला, ……….
मिया खय तिची यात काढतय
तेका उचकी लागात रे,………”
…………………………………………………………. ………………
“श्यामल….. निघतो मी ऑफिसला, ….. काळजी घे. …. आणि हो, विसरलोच, आज मी राजीव ला बोलावलंय ग जेवायला, …… संध्याकाळी.”
” कोण राजीव ?”
” अगं तो माझा ज्युनिअर, विसरलीस ? ……. बॅचलर, ……. मिशिगन लेक बीचवर भेटला होता ……”
” ओके ओके आठवला, ….. तो मराठी कविता सतत बडबडत असतो तोच ना ?”
” तोच तोच ……. लवकरच येईल , माझ्यासोबतच, …….. नाहीतर, शिकागोच्या ट्रॅफिकमध्ये अडकून उद्या पहाटे पोचायचा ……”
आपल्याच जोकवर गडगडाटी हसत, मिलिंद बाहेर पडला. मुलगाही स्कूलमध्ये, …… ही घरी एकटीच.
दरवाज्याचा लॅच लागला, ….. ती जरा निवांत झाली. कॉफीचा मग घेऊन रो हाऊसच्या वरच्या बेडरूमला लागून असलेल्या छोट्याशा टेरेसमध्ये ऊन घेऊ लागली. पुण्यात ऊन टाळावं लागायचं, इथे ते हवंहवंसं वाटत होतं. अख्खा हिवाळा, तिची कॉलनी एक मीटर बर्फात होती. जीवनावश्यक सगळं घरात मिळत होतं. आताशा कुठं ऊन निघालं होतं, तरीही हवा थंडच होती.
शिकागोला आता ती हळूहळू सरावत होती. तिथल्या ट्रॅफिकमध्ये कितीही महागड्या गाड्या असल्या तरी, पुण्याइतकंच कंटाळवाणं होतं. अजून तिला लायसन्स नव्हतंच. तिला ते नकोही होतं. छान सेटल झाली होती. लोक हेल्पफुल होते. कुठेही काही विचारलं तर फार आनंदानं गाईड करायचे. पब्लिक ट्रान्सपोर्ट सरावाचं अन आवडीचं झालं होतं.
चुकून कधी तरी……
एखादया रिकाम्या क्षणी ……… नाही, नाही …..
नव्हती आठवण येत तिला …… नंदूची,
अन आली, तरी आता झटकून टाकायला शिकली होती ती.
तो न आल्यामुळं, नाराज होती …….
कधी तिचं मन स्वतःच समजूत घालायचं स्वतःचीच, ……. भेटून तरी काय उपयोग होता त्या दिवशी, ……विरहच होता नशिबात.
कदाचित, नंदूनंही असाच विचार तर नसेल केला ?. ……..
हं, …… काही गोष्टी विसरु पाहताना, पुन्हा एकदा उजळणी होते, हेच खरं …………..
आता संध्याकाळ होतं आली, राजीव आला होता. मिलिंद अन तो निवांत गप्पा मारत बसले होते. मुलगा आधीच जेवायला बसला होता. त्याला भूक सहन व्हायची नाही. त्याचं झालं की तिघे बसणार होते. इथे बाहेर प्रॉपर भारतीय जेवण मिळणं कठीण, आणि मिळालं तरी, ती आपली घरची चव शक्यच नाही. त्यामुळं बॅचलर राजीव साठी मराठी जेवण, म्हणजे पार्टीच.
अजून वेळ होता, तोवर, दोघे गप्पा मारत बसले होते. नेहमीप्रमाणं प्रोजेक्ट वर्क अन प्रोग्रेस याच विषयावर चर्चा सुरू होती. त्या दोघांचं कडवट सेशन सुरू होतं, जेप्सन मॉलेट सोबत ……..
अर्थात, राजीवची गाडी, सर्व गप्पांचे विषय छाटत कवितांवर आली,
सोबत कुठलंस पुस्तकही आणलं होतं,
एकेका सीप सोबत, एकेक कवितांचे शिंपले तो उघडत होता, …….. मोती शोधून दाखवत होता.
” काय भन्नाट लिहितो हा कवी, …… किती तरल, किती सहज ……”
कवीची स्तुती करताना, त्याला शब्द अपुरे पडत होते, अगदी भान हरपून वाचत होता,
“………………
………………
कोण होती रे ती,
भासातली भानामती,
श्वासातली प्राणवाती,
की नुसतीच शब्दांची उक्ती,
कोण होती कशी होती,
चंद्रमुखी की शामल होती,
बागेश्रीच्या गंधारा इतकी,
खरंच का कोमल होती,
………………………..
………………………. “
मिलिंद अर्थातच बोअर झाला होता. पण राजीवला मात्र ग्लासापेक्षा कवितांची धुंदी अधिक होती.
तिला कवितांची धाटणी, परिचयाची वाटू लागली,
तिने सहज त्याच्या हातातलं पुस्तक घेतलं,
“बघू मी वाचते , …… तुमचं चालू द्या, तुम्ही फक्त ऐका”
“मॅडम, मला खूप आवडतो हा कवी, ……. I love this poet, …….सरळ हृदयाला हात घालतो.”
पुस्तक हातात घेत, तिने कव्हर पेज पाहिलं,
तर, ………………..
“तू चंद्र पाण्यातला ” ………
कवी ……… नंदन .
क्रमशः …………..
©बीआरपवार
Image by mohamed Hassan from Pixabay
- Poked you …… - July 31, 2023
- एमएटी - June 10, 2022
- पत्रास कारण की… - April 21, 2022
👌👌
मस्तच …!!
aata curiosity bhag 6 chi. Khup chhan twist zalay…ata next…………
मस्त झालाय हा भाग👍
छान 👌
हसू आले… समाधानाचे… कसल्याशा आनंदाचे … “तू चंद्र पाण्यातला” नाव घेतल्याचे… 😍😍💞💞💞🍫🍫🌺🌺🌺👌👌👌😘😘😘
होणारच , कथेत नायकाचं नावही तुझंच वापरलंय, म्हणून तुझ्याच कविता संग्रहाचं नाव वापरलं 😄
Chan