रिले कथा- भेट- भाग ७
” सांगा ना, …… तुम्ही ओळखता का नंदन सरांना ?”
” ओळखलं तरच भावना कळतात का, राजीव ? “
” खरंय ….. पण तुमचं विश्लेषण मनाला स्पर्शून गेलं….. म्हणून वाटलं.”
काही निशब्द मिनिटांनंतर ती बोलू लागली ……….
“नंदन, आमच्याच कॉलेजचा विद्यार्थी , …… आणि कवितामुळं पूर्ण कॉलेजचा लाडका, ….. सहाजिक आहे ना, सर्वांना माहीत असणं.”
नंदन वर अमर्याद प्रेम करणाऱ्या श्यामलनं, नंदनच्या कवितांवर जीव ओवाळून टाकणाऱ्या राजीवपासून तिचं प्रेम लपवलं होतं.
विषयाला बगल देत पुन्हा कवितांचं वाचन सुरू झालं, ….. ती बोलत राहिली, ….. पाण्यासोबत हेलावणाऱ्या चंद्राविषयी, अन आठवत राहिली तिच्या स्वप्नातलं, विरून गेलेलं चांदणं.
तिचं मनापासून बोलत जाणं राजीवची खात्री पक्की करत गेलं, …….. हाच तो नंदन सरांचा चंद्र, …… याच चेहऱ्याभोवती नाचत असतात कवी नंदन यांचे शब्द.
खरं तर हा चंद्र, त्यालाही आवडला होता. पण या चंद्रानं …. आधीच हृदयावर ते नाव कोरून ठेवलं होतं, ज्याच्या कवितेचा एकेक शब्द कानात झेलायला, तो आतुर होता.
तो मनातल्या मनात, स्वतःला अत्यंत भाग्यवान समजत होता, त्याच्या आवडत्या कवीच्या काव्यऊर्जेचा स्रोत आज त्याच्या समोर …… सोबत होता. त्यामुळं त्याच्या मनात श्यामल मॅडमविषयीच्या भावना, तो आता फक्त जपणार होता आयुष्यभरासाठी……. पण व्यक्त कधीच होणार नव्हता.
वास्तवाच्या वाटेवर होरपळलेल्या, एका प्रेमकथेसोबत, त्यातल्या पात्रासोबत, राहता राहता, प्रेमाच्या वाटेवरून चालणारा आणखी एक पांथस्थ, निरपेक्ष प्रेमाच्या कसोटीत खरा उतरला होता.
” मी काहीच विचारणार नाही, मॅम, ……. मला फक्त एक गोष्ट हवी आहे.”
” काय ?…….” तशीच त्या पुस्तकातच हरवलेल्या अवस्थेत तिनं विचारलं.
” मला नंदन सरांचा नंबर हवाय.”
” आपण निघू या, खूप उशीर होतोय, ……
ती एकदम भानावर येत, जवळजवळ उठलीच.
कसंबसं बिल पे करून, राजीवनं तिला गाठलं.
“मी घरी सोडतो मॅम. “
काही न बोलताच ती राजीवसोबत पार्किंगच्या दिशेने निघाली.
घरी जाताना, नेमकं दोघांच्याही आवडीचं गाणं, त्याच्या म्युझिक प्लेअर वर लागलं होतं.
“तुम यूँही साथ देने का वादा करो ……”
………………………….
कार थांबताच, ती उतरली, …… उतरताना ” थँक्स फॉर कॉफी …… ” इतकंच बोलली.
“मॅम, एक मिनिट”
ती मागे वळली.
“हे पुस्तक, ….. राहिलं.”
ती अवघडली,
“नाही, …… राहू दे.”
तो कार मधून उतरून, बाहेर आला, ….
“हे पुस्तक तुमच्याकडेच राहू दे मॅम, ……. यावर खरा हक्क तुमचाच आहे.”
तिनं थेट त्याच्या डोळ्यात पाहिलं, नंदन वर प्रेम करणाऱ्या व्यक्तीचे डोळे होते ते, आणि म्हणूनच तिच्या हक्काच्या अमर्याद सीमा त्याला समजल्या होत्या. तिनं पुस्तक घेतलं.
“पण राजीव, पुन्हा आपण नको भेटायला.” ती शांतपणे, निर्वाणीच्या स्वरात बोलून गेली, राजीव काहीच बोलला नाही. फक्त डोळ्यांनी बोलत राहिला.
यावेळी मात्र ती नजरेला नजर देऊ शकली नाही. तिच्या प्रेमावर प्रेम करणाऱ्या डोळ्यात, विरघळण्याची भीती तिला वाटत असावी. एकदाही मागे न पाहता, ती चालु लागली. ……. दरवाजाचा लॅच लागेपर्यंत.
………………………………………………………………………………………….
“दिवसातलो कितवो चाय हयो ? ….”
शिऱ्याचं हे नेहमीचं वाक्य….. दामुअण्णांचा मुलगा, ……
दामुअण्णां गेल्यावर, …. घराच्या ओसरीतच आता हॉटेल सुरू केलंय त्यानं. छान चालते खानावळ कम हॉटेल.
“असू दे रे, पावसाळी हवेत चालतो चहा ….. चारपाच वेळा ….”
नंदूची चहासाठी बतावणी ठरलेली.
“इतकी चाय पिऊ नको साखर वाढात…. घरात करमानाय, …. म्हनान माझ्या हाटेलात यौन बसतात आणि चाय म्हगान पित रवत्यात.”
” मी काय म्हातारा झालोय का शिऱ्या, …… गुपचूप स्पेशल ठेव.”
नंदूला त्याचं वय मान्य नसलं तरी, …… आता तो साठीकडे झुकत चालला होता. पंचावन्न पूर्णची पार्टी, एखादं महिन्यापूर्वीच शिऱ्यानं उकळली होती.
आता गोवा बदलत होतं. आरंबोळ सारख्या गावातही टुरिझमने जम बसवला होता. दामुअण्णांच्या भातशेतीत कधीच प्लॉट पडले होते. खाचरात भर घालून बंगले उभे राहात होते. पुण्यामुंबईहून इन्व्हेस्टर येत होते. वार्षिक गोवा वारी करणाऱ्यांना, दर फेरीला नवनवे बंगले दिसत होते. आदल्या ट्रिपच्या खुणा सापडत नव्हत्या. नवनव्या शेजाऱ्यांसाठी, नंदू मात्र, गोवेकरच होता.
…………………………………………………………………………
आजकाल मात्र, नंदूची बेचैनी वाढली होती. अंगणात फेऱ्या मारत राहायचा. इतकी वर्षे, घराच्या आसपास भातशेती होती, ….. नारळाचे बाग होते. कुणी शेजारी नव्हते, तोवर एकांताची सवय झाली होती. हळूहळू एकांतच, सोबती वाटू लागला होता.
आता, प्लॉट पडले, आसपासच्या बंगलेवाल्यानी, कंपाऊंडच्या भिंती उभ्या केल्यात. कोंडल्या सारखं होतं त्याला हल्ली, …… एकटेपण ठळकपणे जाणवत होतं, त्याला, …… कंपाऊंडमुळं.
बेचैनीचं आणखी एक कारण म्हणजे, …… संध्याकाळी, ……. आसपासच्या किचन मधून येणारा छान छान पदार्थांचा दरवळ. आयुष्यभर एकटा राहिलेल्या नंदूला या गोष्टींची सवय नव्हती.
शिऱ्यानं केलेली काळ्या वाटाण्याची उसळ न भात खाऊन, नंदू अंगणात फेऱ्या मारत होता. एकेका झाडाकडे, लाईटच्या उजेडात पहात होता…… श्यामलला आवडायचा प्राजक्त……हो, म्हणूनच तर लावला होता.
पण आजकाल, कंपाऊंडच्या भिंतीबाहेर डोकावणाऱ्या, बागेतल्या प्राजक्ताची फुलं, ….. पहाटे त्यांचा सडा पडण्याआधीच गायब होत होती. हे सगळं पाहताना, त्याची चिडचिड वाढत होती, पण विचारणार कुणाला? जाऊ दे …. म्हणून पुन्हा फेऱ्या मारू लागला.
इतक्यात, ……..
कुणीतरी किंचाळलं, …….
नंदू आधीच थोडा वैतागलेलाच होता, त्याने शिऱ्याला आवाज दिला.
” कोण बोंबलतंय रे शिऱ्या ?”
” माका काय म्हाइत ? तुमच्या बाजूचोच बंगलो इकत घेतल्यान, त्येचो आवाज आसा.”
शिऱ्यानं तितक्याच मोठ्या आवाजात उत्तर दिलं.
नंदूने पाहिलं, शेजारच्या बंगल्यातली लाईट गेली होती ……
फ्यूज गेला असणार, …… टॉर्च अन वायर घेऊन, नंदू अन शिऱ्याने पहिल्यांदाच त्या गेटमध्ये प्रवेश केला …… तोही मनातल्या मनात, चरफडतच.
” फ्यूज बॉक्स कुठल्या दिशेला आहे ?.”
” या, इकडे, ……. या बाजूला या …..”
कुणीतरी म्हातारी होती, बहुतेक, ….. आवाजावरून.
तिच्या आवाजामागे, ……. अंदाजे चालत ……. दोघे निघाले.
पूर्ण घरात, …… प्राजक्ताचा सुगंध , घमघमत होता.
मनातल्या मनात, नंदू विचार करत चालत होता…….
हीच चोरत असणार, माझ्या प्राजक्ताची फुलं.
“लाईट आल्यावर विचारतोच……”
चुकून नंदू पुटपुटला.
” काय ?”
” काही नाही …..”
नंदूने पकडलेल्या टॉर्चच्या उजेडात, शिऱ्याने फ्यूज बॉक्स उघडला….. काम करता करता खट्याळ शिऱ्याची चुरचूर सुरूच होती,
“काका, …. तुमचो प्राजक्त घमघमता हां इथे, ….. ते चारोळी का बारोळी ते म्हनश्यात तुमी ……,”
“शिऱ्या, गप काम कर, ही काय वेळ आहे का कवितेची …..?”
“तिया कविता नाय बोललय , तर मिया काम करूचय नाय.”
भर अंधारात, शिऱ्याने गोड धमकीच दिली.
” ते नाही म्हटले तर मी म्हणीन एखादी कविता , पण तुम्ही वायर बदला प्लिज”
तिच्या गोड आवाजातल्या विनंतीनं शिऱ्या विरघळला.
“बघा किती गुणाची आसा ही काकी…..तुम्हींह लिहित्यात कविता? “
“नाही …… आहे कुणाची तरी.”
पण काकीच्या प्रॉमिसमुळं की काय कुणास ठाऊक,
मेन स्विच बंद करून दोन मिनिटात, शिऱ्याने वायर बदलली सुद्धा……
अन मेन स्विच ऑन, ……..
त्यासरशी, लहान मुलीसारखी आनंदानं टाळी वाजवत, फ्यूज बॉक्स जवळच्या, शिऱ्याकडे पहात, ……. काकीनं कविता सुरूही केली,
“प्राजक्त माझा देखणा,
केशरी हळव्या खुणा,
ओंजळी सांभाळला,
गंध प्रीतीचा जुना, ……….”
कडवं होता होता, ती नंदूकडे वळली अन थबकलीच. थांबली तिची कविता….. नजर, ….. पूर्ण स्तब्ध झाली ती.
शिऱ्याला काहीच समजेना, …..काकी का थांबली. एकटक पहात.
काकाही स्तंभित झालेला …..काकीच्या डोळ्यात पहात, ….
एकाचवेळी, जणू प्राजक्तसडा व्हावा,….. तसा, ……. चेहऱ्यावर आनंद, …….
अन काहीतरी हरवलेलं सापडावं तसं …… डोळ्यात पाणी, ……
एकही शब्द न फुटता, नुसतेच हलणारे काकाचे ओठ……… काहीतरी बोलू पहात होते,
अन अभावितपणे स्वर उमटू लागले…….
“कोण नाजूक ना कळे,
तळवा तिचा की ती फुले,
नाजूक माझी हो प्रिया,
फुलासही का, त्या ना कळे, ……”
क्युटसा बॉब कट, तिच्या चेहऱ्यावर खुलून दिसत होता.
आताशा, …. केसात मात्र, पांढरी झाक होती, ….. त्याच्याही, अन तिच्याही, ……
चेहऱ्यावर, एक दोन सुरकुत्यांनी नुकताच विणायला घेतलेलं, मधाळ जाळं……… त्याच्याही अन तिच्याही.
डोळ्यांवर आधीपासूनच चष्मा होता त्याच्या, …… आता तो, डोळ्यांवर, ….. तिच्याही …..
अन …… कित्येक वर्षांपासून थांबवलेले कढ, पापण्यांच्या कडांवर, येऊन थांबले होते, त्याच्याही अन तिच्याही …….
त्या दोघांना, …… इतकं एकमेकांमध्ये इतकं हरवलेलं पाहून, शिऱ्याचा जीव मात्र कासावीस झाला,
“काका, ……. “
ते दोघे पटकन भानावर आले, …… नंदूकाका, शिऱ्या काय म्हणतोय ते ऐकण्याचा प्रयत्न करत होता, …….. तरी नीटसं लक्षात येत नव्हतंच.
अन श्यामल काकीनं मात्र, तेवढया क्षणार्धात, चष्म्याच्या आतल्या कडा पुसून घेतल्या.
शिऱ्याच्या काहीच लक्षात येत नव्हतं, त्याची बडबड सुरूच राहिली.
” मिया म्हटलंय तुमका, ….. बाजूचो बंगलो इकत घेतल्यानं ती हिच काकी…….”
यावर दोघेही त्याच्याकडे पाहून मनापासून हसले. अन त्याचा आगाऊपणा मात्र सुरूच राहिला.
“तुमका गजाली करूक भिडू भेटलो वाटता…….”
क्रमशः …..
©बीआरपवार
Image by mohamed Hassan from Pixabay
- Poked you …… - July 31, 2023
- एमएटी - June 10, 2022
- पत्रास कारण की… - April 21, 2022
Bharich!
श्यामल कोकणात?
लवकर सांगा ……
श्यामल काकी
धन्यवाद
Gd going..
🙏
nice going, once again twist.
nice going
सिनेमासारखा जवळ आणलंस परत… 🌺🌺🍫🍫💞💞
🙏
Jhakas
🙏