रिले कथा- तुम जो मिल गये हो… भाग १

लॉकडाऊन दिवस १

Stupid! Stupid! काय साला वैताग आहे! सगळा बनाबनाया प्लॅन फिस्कटला माझा. शी!! इतकं घाणेरडं नशीब कसं काय असू शकतं? बॅग भरून ठेवलेली, तिकीट काढून ठेवलेलं. सगळी तयारी झालेली आणि अगदी ऐनवेळी हा लॉकडाऊन डिक्लेयर झाला! भयंकर चीडचीड होते आहे. सगळे दागिनेसुद्धा कोणाच्या नकळत हळूच बागेत ठेवले होते. इथून सुटायचं,बस! एवढंच डोक्यात होतं. किती दिवस प्लॅन बनवत होते, अगदी कोणाच्याही नकळत. पण नशिबानी फासेच असे उलटे टाकले.

मी कुठे म्हणाले, आशिष चांगला नाहीये? आहे तसा बरा. नोकरी चांगली आहे, दिसायला पण चारचौघांसारखा आहे. स्वभावाने अगदी नको वाटेल इतका चांगला आहे. सहाच महिन्यांपूर्वी तर लग्न झालं आमचं. घरात दोघंच. त्याचे आईवडील कोकणात गावाकडे. आम्ही इथे “म्हणायला” राजराणी. पण जे लग्न मनाविरुद्ध झालं असेल त्यात कसले आलेत राजाराणी! का लग्न केलं मी? हा प्रश्न मी रोज स्वतःला विचारते आहे. आईवडिलांसाठी? समाजाला घाबरून? थोडं सुद्धा धाडस कसं नव्हतं माझ्यात?

माझं प्रेम फक्त राजन होता, अर्थात अजूनही आहे. राजन, माझा हरहुन्नरी मित्र. मुंबईत राहतो. स्ट्रगलर आहे. पिक्चरमध्ये काम मिळायची वाट बघतो आहे. सुंदर अभिनय करतो. पण त्याला त्याचा ड्यू मिळत नाहीये. मिळेल लवकरच. सध्या सटरफटर साईड ऍक्टरची मिळेल ती कामं करतो. सगळ्या कला आहेत त्याच्याकडे फक्त नशीब त्याच्या बाजूने नाहीये. एक चांगला रोल मिळू दे त्याला बस, मग तो आणि मी. मुंबईत आमच्या छोट्याश्या घरात राहू आणि एकमेकांवर खूप प्रेम करू. काय दिवस होते ते लग्नाआधीचे! अजूनही त्याचा स्पर्श आठवतो आणि अंगावर रोमांच उठतात. सतत आठवण येते त्याची. प्रेम काय असतं हे त्याने शिकवलं मला.

हम्म. आशिष. आशिष तसा वाईट नाहीये. ऑफिसमध्ये तीनजण हाताखाली आहेत त्याच्या. माझ्याशी चांगला वागतो, काय हवं नको ते पाहतो. त्याची चेहरा कोरा ठेऊन एखादा विनोद करायची पद्धत पण भन्नाट आहे. पण त्याच्यात ना, स्पार्क नाहीये राजनसारखा. रात्री बेडमध्ये सुद्धा ठीकठाक. अर्थात मी ही फारशी उत्सुक नसते म्हणा. मनावर दुसऱ्या पुरुषाचं राज्य असताना, सतत त्याची आठवण येत असताना हा सगळा शृंगार तरी कुठे कसला आनंद देतो? स्त्रीला हवा असतो तिच्या आवडीचा, तिच्या मनात असलेला पुरुष. समाजाने लादलेला नव्हे.

गेल्या सहा महिन्यात तसा बराच प्रयत्न केलाय आशिषने मला खुश ठेवायचा. कधीकधी तर भीती वाटते, तो वाचत नसेल ना माझं मन? ही माझी डायरी? पण मनापसून सांगते त्याने कितीही प्रयत्न केले ना तरी माझं मन इथे नाही रमत. सारखी राजनची आठवण येत राहते. असो. आता उपयोग नाही या गोष्टींचा. माझ्या सगळ्या प्लॅनचा फज्जा उडालाय. काय काय स्वप्नं रंगवली होती. सगळी चक्काचूर झालीत. खूप वाईट वाटतंय. आता काही दिवस आशिष बरोबरच राहायला लागणार. आता गेला दिवस कसातरी काढला पाहिजे. कधीतरी संपेलच हे लॉकडाऊन प्रकरण. मग जाईन इथून निघून. एक बरं झालंय, आशिषला माझ्या प्लॅनबद्दल तशी पुसटशी कल्पनादेखील आलेली दिसत नाही. तो नेहमीसारखाच वागतोय. हे असंच सुरू ठेवायला हवं.

उद्यापासून दोघंही घरात असणार आहोत. मला काळजी घेतली पाहिजे. आशिषला माझ्या प्लॅनचा अजिबात पत्ता लागू दिला नाही पाहिजे. चेहरा अगदी कोरा ठेवला पाहिजे. तसं त्याचं काहीच घेऊन जाणार नव्हते मी. माझे कपडे, दागिने बस्स. पण हव्यात कश्याला नसत्या अडचणी! खरंतर त्याची काहीच चूक नाही या सगळ्यात. पण मी माझं मन मारू नाही शकत आता. हा लॉकडाऊन काळ शांतपणे त्याच्याबरोबर काढते आणि मग हळूच कोणाला काही कळू न देता इथून निघून जाते. माझ्या राजनकडे…

अनिता

क्रमशः

Image by mohamed Hassan from Pixabay

Gauri Brahme
Latest posts by Gauri Brahme (see all)

Gauri Brahme

गेली वीस वर्षे पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागात जर्मन भाषेची अध्यापिका म्हणून काम करते. अमराठी लोकांना मराठी शिकवते. भरपूर लिहिते, वाचते, कलाकुसरीच्या वस्तू बनवते, खादाडी करते, इतरांना खिलवते. लेखिका म्हणून नावावर २ पुस्तकं जमा आहेत.

9 thoughts on “रिले कथा- तुम जो मिल गये हो… भाग १

  • June 11, 2020 at 12:37 pm
    Permalink

    उत्सुकता वर्धक सुरुवात

    Reply
    • June 13, 2020 at 1:29 pm
      Permalink

      खूप छान सुरुवात 👌

      Reply
  • June 11, 2020 at 2:50 pm
    Permalink

    👍🏻 छान सुरवात

    Reply
  • June 11, 2020 at 4:13 pm
    Permalink

    👍
    Simple but exciting !

    Reply
  • June 11, 2020 at 4:20 pm
    Permalink

    Nice start….👍👍

    Reply
  • June 11, 2020 at 4:50 pm
    Permalink

    पुढे काय, ही उत्सुकता तयार झालीच पहा !

    Reply
  • June 13, 2020 at 1:12 pm
    Permalink

    खूप छान सुरुवात 👌

    Reply
  • June 13, 2020 at 1:15 pm
    Permalink

    Mast survat ahe

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!