रिले कथा- तुम जो मिल गये हो… भाग २
लॉक डाऊन दिवस २०
“मीठ किती घालू?” किचनमधून आशिषने जोरात विचारल. मी कानाला हेडफोन लावून नेटफ्लीक्स वर माझी आवडती सिरीज बघत होते. मला ऐकूच आलं नाही. आशिष खरकटे हात तसेच घेऊन बाहेर आला आणि माझ्या समोर उभा राहिला.. फक्त शॉर्ट्स घातलेला. दाढी आणि मिश्या वाढलेला. केस अस्ताव्यस्त असलेला आशिष. त्याला बघून मला हसूच आलं.
मी- काय झालं?
आशिष- (इशाऱ्याने) ते हेडफोन काढ.
मी हेडफोन काढले.
मी- काय?
आशिष- मीठ किती घालू?
मी- कशात?
आशिष- आज मी आमटी करतोय ना त्यात.
मी- तीन चिमुट घाल.
आशिष- कोणाच्या? माझ्या कि तुझ्या.
मी- ओके. अडीच चमचे घाल. चमचा मिठाच्या बरणीत आहे.
आशिष- मग अस सांग ना. माझी आमटी उकळते आहे.
हे बोलून आशिष किचनकडे जायला वळला. गेल्या दहा दिवसात रोज भरपूर व्यायाम आणी योग करून त्याचं वजन दोन तीन किलो कमी झालं होत. अंगावर असलेली short जुनी असल्याने आता इंचभर कमी झालेल्या पोटावरून घसरत होती. आशिष मागे फिरून माझ्यासमोर येऊन उभा राहिला.
मी- आता काय?
आशिष- ही short वर सरकव लवकर नाहीतर खाली सरकेल.
मला परत एकदा हसू आल. मी त्याच्या short चं इलास्टिक धरून ती वर सरकवली. आशिष उकळणाऱ्या आमटीला सावरायला किचनमध्ये धावला. मी माझी सिरीज बघू लागले.
संध्याकाळची वेळ. आशिषचा ऑफिस कॉल संपला. तो बाल्कनीत उभा राहून सिगारेट ओढू लागला. मी माझं पुस्तक वाचत होते. गेले दहा दिवस कोणाच्याच आयुष्यात येतील अस कधीच वाटलं नव्हत. आणि पुढे असेच किती दिवस काढायचे आहेत हे माहित नव्हतं. दिवसातून काही तास आणि रात्री एकत्र, एकमेकांसमोर असणारे आशिष आणि मी गेल्या दहा दिवसात एकमेकांसामोरून हललो नव्हतो. कामवाल्या काकू यायच्या बंद झाल्या. मला प्रचंड टेन्शन होत. जेवण, भांडी, कपडे, केरवारा त्यात माझ्या ऑफिसचे वर्क फ्रॉम होम. सगळं कसं जमणार होतं? पण पहिल्याच दिवशी आशिषने भांडी घासणे आणि कपडे मशीनमधून काढून वाळत घालणे, एका दिवसा आड केर आणि फरशी पुसणे ह्या जबाबदाऱ्या स्वतःवर घेतल्या. त्याच्या ऑफिसच्या कामाच्या वेळा सांभाळत तो हे सर्व करत होता. स्वयंपाक ही मुख्य जबाबदारी माझ्यावर होती. पण त्यातही गेल्या रविवारी आशिष किचनमध्ये आला आणि म्हणाला-
आशिष आज कुकर मी लावतो.
मी नको म्हणूनही ऐकलं नाही त्याने. माझ्याकडून कुकर लावायची प्रोसिजर शिकून घेऊन त्याने कुकर लावला. त्या दिवशीपासून रोज लावला. आणि आज तर आमटी करायचा घाट घातला होता त्याने. मी सकाळी म्हणाले देखील-
मी- अरे कशाला? मी करते ना. ते माझं काम आहे.
आशिष- तुझं काम छान दिसण आहे. तू ते कर. तू छान आणि आनंदी असलीस ना की मी खुश होतो. आनंदी होतो. आणि तो आनंद मिळवायला आमटी करणे हे श्रम खूप किरकोळ आहेस अस नाही का वाटत तुला?
मला हे ऐकून हसू आलं होतं. मग मी माझी सिरीज बघायला बसले आणि त्याने आमटी केली. आमटी सुरेख झाली होती. फक्त मीठ थोडं कमी होत इतकंच!
आशिष तसाच उघडा shorts घालून बाल्कनी मध्ये सिगारेट ओढत होता. त्याची पाठमोरी आकृती दिसत असताना माझ्या डोळ्यासमोर राजनचं पिळदार शरीर आलं. त्यासमोर आशिषचं शरीर काहीच नव्हतं. राजन सिगारेट पण एकदम स्टाईलने ओढत असे. आशिष मात्र एक व्यसन किंवा त्याहीपेक्षा formality म्हणून सिगारेट ओढत असल्याचं मला जाणवत असे. स्मोकिंग आणि सेक्स दोन्ही बाबतीत आशिष formal होता आणि राजन passionate. होता. म्हणून तर आशिष बरोबर लग्न होऊन देखील मी राजनला विसरू शकले नव्हते. In fact त्याला भेटायला घरातून पळून जाणार होते आणि नेमका हा लॉकडाऊन उपटला. इथे आशिषची सिगारेट ओढून झाली होती. तो किचनमध्ये गेला. इतक्यात फोन वाजला. मी पटकन फोन उचलला. राजनचाच मेसेज होता.
जग्गी- हाय. काय म्हणतोय लॉकडाऊन?
मी- चाललाय. तुझं काय?
राजन – कामं बंद झाली आहेत. शूटिंग बंद आहेत. गेले दहा दिवस काम केल नाहीये. पैसे पण संपत आलेत. जेवणाचे वांदे आहेत. एक हॉटेल उघड नाहीये. महिन्याचा रेंट ड्यू आहे. पैसे कुठून आणायचे आम्ही स्ट्रगलर लोकांनी? हे सरकार काही कामाचं नाही. जाम टेन्शन आहे.
मी- हम्म…कळतंय मला. पण संपेल हे सर्व लवकर आणि मी येईन तुझ्याकडे.
राजन – त्याचीच तर वाट बघतोय. हा देव पण कोणती परीक्षा घेतो आहे कोण जाणे! पण तोवर काय करू? काय खाऊ? भाडं कुठून देऊ? ए ऐक ना. तू थोडे पैसे ट्रान्स्फर करू शकशील का?
मी- किती?
जग्गी- जास्त नाही. फक्त वीस हजार. एकदा काम सुरु झालं ना कि तुझे पैसे देऊन टाकेन परत. You know me.
मी- हम्म..ठीक आहे. करते.
इतक्यात आशिष येत असल्याची चाहूल लागली आणि मी फोन बाजूला ठेवला. आशिष ने माझ्यासमोर जेवणाची ताटली धरली होती. त्यात मी सकाळी केलेल्या पोळ्या मायक्रोवेव्ह मध्ये गरम करून ठेवल्या होत्या. त्या बरोबर आशिषने स्वतः आंबे पिळून काढलेला आमरस होता आणि त्यानेच आज माझ्या सुपरविजनखाली बनवलेली बटाट्याची भाजी होती. थाळी माझ्या हातात देत आशिष म्हणाला-
आशिष- लॉक डाऊन असो की आणखी काही. तुला पोटभर जेवायला घालायची जबाबदारी माझी. आणि हो. आपल्या कामवाल्या बायांचे पगार आपण पूर्ण महिन्याचे देऊया. उद्याच अडव्हांस मध्ये देऊन टाक पगार. माझ्या खात्यातून ट्रान्स्फर कर. तुला नंबर माहित आहेच.
भरलेली थाळी आणि बँकखाते मला सोपवून उघड्या अंगाचा, पिळदार नसलेला आशिष शिट्टी वाजवत किचनमध्ये गेला. इथे बाजूला ठेवलेल्या फोन मध्ये राजन पैसे कधी पाठवतेस? मला जेवायचं आहे असा मेसेज करत होता.
क्रमश:
Image by mohamed Hassan from Pixabay
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023
एकच कथा दोघांनी लिहीणे हे भारी आहे
कथेचा प्लॉट साधारण लक्षात येतोय ..पण तुम्ही दोघ ती रंगवताय मस्त ..त्यामुळे इंटरेस्ट वाढतोय
मस्त 👌👌
Interesting 😊
How can I log in
You need to register and pay.
मंदार टच आला.
👍👍
Hmm..
Intresting..
Jhakas
My two fvrt writers and me …as chalay ata Maj …sadhi vatat asli tari mandar sir n gouri mam kahitari twist anatil ani story Chan rangavatil hi khatri ahe