रिले कथा- तुम जो मिल गये हो… भाग ३
भाग ३
लॉक डाऊन – दिवस ४० वा.
ट्रिंsssग! ट्रिंsssग! बेडवर पडलेला फोन कधीचा वाजत होता. मी बाथरूममध्ये होते. आशिष बाहेरून जोरात ओरडला, “अनिता, अग फोन घे. कधीचा वाजतोय. नेमक्या कुठे जात असता ग तुम्ही तो फोन ठणाणा करत असताना! मी बघू का कोणाचा आहे ते…” असं म्हणत तो मांडीवरला लॅपटॉप खाली ठेऊन आमच्या बेडरूमकडे निघाला. मी घाईघाईने “नको, थांब मी बघते म्हणत अर्धवट अंघोळ करून अंगाभोवती नुसताच टॉवेल लपेटून बाहेर आले. आशिष फोनपाशी पोचायच्या आत मी फोनपाशी पोचले. आजकाल फोन वाजला की टेन्शनच येतं. राजनचा फोन असेल तर? आशिष समोर त्याच्याशी कसं बोलणार? फोनकडे पाहिलं. “आई calling. हुश्श. फोन घेतला, आईशी जुजबी बोलले, दोघींनी एकमेकींची हालहवाल विचारली आणि मी पाच मिनिटात फोन ठेऊन दिला. आशिष तिथेच मला न्याहाळत उभा होता. “काय बघतो आहेस?” मी त्याला विचारलं. “काही नाही” म्हणत तो परत त्याच्या लॅपटॉपकडे जायला लागला. हे असंच असतं त्याचं. काही वाटत असेल तरी लगेच बोलून दाखवायचं नाही. राजन असता तर टॉवेल खसकन ओढून घेऊन ही सकाळही साजरी केली असती.
जाता जाता आशिष म्हणाला, “आईचा फोन होता ना? मग इतक्यात ठेऊन पण दिलास? एरवी तर अर्धा अर्धा तास बोलता की! मुली आणि आयांचे फोन म्हणजे ना……”आज नाहीये वेळ मला, एक महत्त्वाचा कॉल यायचा आहे आत्ता म्हणून ठेऊन दिला” त्याचं बोलणं मधेच तोडत मी म्हणाले. त्याला माझ्या बोलण्यातला तुटकपणा जाणवला असावा. “ओह ओके. खूप महत्त्वाचा फोन येणार आहे? क्लायंट कॉल?” मी हो म्हणाले. “बरं मग तू काम कर, आज स्वयंपाक मी करतो. काय करू बोल.” मी जरा तुसडेपणानीच म्हणाले, “काहीही कर”. आशिष त्याची वाढलेली दाढी कुरवाळत खोल विचारात गढल्यासारखं दाखवून म्हणाला, “बापरे. किती अवघड पदार्थ सांगितलास! यूट्यूब वर मिळेल ना काहीही ची रेसिपी? यावर स्वतःच जोरात हसला.” पण या “काहीही” साठी सामान तर हवं ना घरात. मी असं करतो जरा बाहेर जाऊन सामान घेऊन येतो. नाहीतरी सामानाची लिस्ट केलीच आहे आपण.” मी ठीक आहे म्हणाले. त्याला माझ्या बोलण्यातला तुटकपणा जाणवला असेल का? माझा मूड ठीक नाहीये हे बघून तर बाहेर निघाला नसेल ना? म्हणजे मला थोडा एकांत मिळेल? तो करू शकतो हे असले प्रकार. जरा अतिच समजूतदार आहे तो.
ही त्याची कोणत्याही गोष्टीला शांतपणे रिऍक्ट करायची सवय अलीकडेच जरा प्रकर्षाने लक्षात येते आहे माझ्या. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून पहाते आहे, घरातल्या प्रत्येक कामात रस असतो त्याला. करू दे, त्याबद्दल काही नाही, पण सगळं आखीव रेखीव करतो. मुक्त, स्वच्छंदीपणा अंगात नाही. राजनसारखा. हा राजन एक सारखा आठवतो. यानी अजून फोन का नाहीं केला? विचार करकरून डोक्याची कल्हई झाली होती. चिडचिड, राग, हतबलता सगळं एकत्र दाटून आलं होतं.
आशिष मास्क लावून, पिशव्या घेऊन बाहेर पडला. तो गेल्या गेल्या मी आधी फोनकडे धावले आणि राजनला फोन लावला. कितीतरी दिवसांनी असा एकांत मिळाला होता. त्या दिवशी आशिषने कामवाल्या बाईंना बँक ट्रान्सफर करून पैसे द्यायला सांगितल्यावर त्यालाही मी लगेच २०,००० पाठवले होते. Thanks babe ️ ️ ️ म्हणून त्याचा उलट मेसेजही आला. पण त्या क्षणापासून पठ्ठ्याने एकदाही मेसेज केला नाही. कित्ती मेसेज केले असतील त्याला. या लॉकडाऊन मुळे फोन करता येत नाही. सगळा मामला चोरून. गेले वीस पंचवीस दिवस त्याच्या मेसेजची वाट पाहते आहे. लॉकडाऊन संपल्यावर मी इथून कशी निघणार, त्याला कुठे भेटणार, दोघं एक जबरदस्त रोमँटिक हनीमून कुठे आणि कसा साजरा करणार हे सगळसगळं ठरवायचं आहे आणि हा एक साधा मेसेज पण करत नाहीये?!
शीट! फोन not reachable. आशिष यायच्या आत ह्याच्याशी बोलणं व्हायला हवं. Call immediately असा मेसेज राजनला केला. काही उत्तर नाही. पंधरा वेळा तरी कॉल केला असेल पण नाहीच लागला. वेळ कमी होता. मनात नको नको ते विचार यायला लागले. का नसेल राजन फोन उचलत? आपल्याला फसवलं असेल का? नाही. इतका वाईट नाहीये तो. आणि आपली निवड इतकी वाईट असूच शकत नाही. त्याचं काही बरंवाईट झालं असेल का? नाही हे शक्य नाही. एखाद्या कामात अडकला असेल का? हां. हे कारण असूच शकतं. एखादा रोल मिळाला असेल आणि त्याच्या तयारीत गुंतला असेल. आमचं स्वप्न खरं होणार म्हणजे आता! मन आनंदानी फुलून गेलं.
तरीही सुचत नव्हतं काय करावं. फोन सहज स्क्रोल केला तर वर्षाचा फोन नंबर दिसला. वर्षा, मी आणि राजन आम्ही तिघांनी एकेकाळी कॉलेजमध्ये भरपूर मजा केली होती. नाटक, गाण्याच्या मैफली अशी भरपूर धमाल केली होती. कॉलेजनंतर नंतर सगळ्यांचे मार्ग वेगळे झाले. तडकाफडकी माझं लग्न झालं आणि नंतर सगळं विश्वच बदललं. वर्षाला फोन करू का? निदान राजनची हालहवाल कळेल, तो कुठे आहे. हे तरी कळेल. मी फोन लावला. तिने फोन उचलला आणि तिकडून “अनिता!!!! किती दिवसांनी फोन केलास!!?” अक्षरशः किंचाळत वर्षा म्हणाली.
मी थरथरत म्हणाले, “हाय वर्षा. कशी आहेस? वर्षा म्हणाली, “अग मी मस्त आहे..किती दिवसांनी फोन केलास! पण बरं झालं यार. या लॉकडाऊनमध्ये मित्रमैत्रिणींचे फोन आले की फार छान वाटतं. बाकी तुझ्या लग्नात भेटलो ते शेवटचं, हो ना? ये ना यार तू माझ्या घरी…. मी तिचं बोलणं मधेच तोडत म्हणाले, “वर्षा, जरा अर्जंट काम आहे. माझ्याकडे फार वेळ नाहीये. तू राजनला भेटली आहेस का इतक्यात? मी फोन करते आहे त्याला, पण तो उचलतच नाहीये.”
“ओह राजन! ए काय धमाल केली ना आपण कॉलेजमध्ये. काय दिवस होते ते! ए पण राजन तुझ्या लग्नाला का नाही आला ग? मला कधीच तुला विचारायचं होतं, पण तू भेटतच नाहीस यार. लग्न करून पार विसरून गेलीस आम्हाला…
आशिष यायच्या आत माझं बोलणं पूर्ण होणं फार महत्त्वाचं होतं. मी घाईत म्हणाले, ” वर्षा हे सगळं आपण प्लिज नंतर बोलूया. मला सांग तुझा काही कॉन्टॅक्ट झाला आहे का अलीकडे, गेल्या चार दिवसांत राजनशी? वर्षा म्हणाली, ” छे ग. मुंबईत राहतो ना तो कुठेतरी? फिल्मसाठी ट्राय करतो आहे. इतकंच माहीत आहे. कोलेजनंतर एकदोनदा भेटलो आम्ही पण त्यानंतर गायब झाला हा एकदम! वॉट्सऍपवर पण दिसत नाही.
तिचे उरलेले शब्द ऐकायच्या आधीच मी फोन कट केला आणि त्राण गेल्यासारखी मटकन खाली बसले. घोर निराशा दाटून आली होती. डोळ्यातून अश्रू वाहतील असं वाटू लागलं. इतका अचानक गायब कसा होऊ शकतो हा माणूस? मी कश्याच्या भरवश्यावर बसायचं आता? तेवढ्यात डोक्यात कानठळ्या बसणारा आवाज येऊ लागला. दोन मिनिटांनी भानावर आले तेव्हा लक्षात आलं आवाज दाराच्या बेलचा होता. आशिष परत आलेला असणार. इकडे माझा फोनही वाजू लागला. फोनवर नाव फ्लॅश होत होतं “Rajan calling” ….
क्रमशः
Image by mohamed Hassan from Pixabay
- समीर – अनयाच्या वॉट्सऍप गोष्टी - September 26, 2022
- कच्चा लिंबू - June 20, 2022
- आई - January 21, 2022
इंटरेस्टिंग
A twist on t cards…
भारी
दुसरा भाग ????
मस्त… Handover krtana situation mast anun thevli ahe…
छान turnवर एन्ड केला.
गौरी मॅडम, छान होती कथा👍
अजून जास्त पण चालली असती😊
Thanks everyone.