पाडस
दुपार टळत आली होती. गळ्यात दुर्बिणी अडकवून आणि हातात जाड जूड कॅमेरे घेऊन दोघेही त्या घनदाट जंगलात फिरत होते. पायाखाली चिरडल्या गेलेल्या पानांचा किर्रर्र आवाज आवाज पावला-पावलांवर येत होता. कपाळावरून घामाच्या धारा वाहत होत्या.
इतक्यात समोर असलेल्या झाडाच्या आडोशाला काहीतरी दिसलं. कसलीतरी हालचाल. दोघेही थबकले. दोन पावलं मागे सरकले.
हरीण. हो, हरीण च होतं ते. हरीण इतकं निवांत बसलेलं बघून त्यांना किंचित आश्चर्य वाटलं. अजूनही फक्त जेमतेम तोंड दिसत होतं. थोडं बाजूने जाऊन ते एका झाडामागे लपले. कदाचित जखमी हरीण होतं.
त्याने दुर्बिणीतून बघितलं. शरीरावर जखम दिसत नव्हती. तिने दुर्बीण हातात घेतली. नीट निरखून बघताना तिला काहीतरी दिसलं ..
“अरे हि दिवस भरलेली हरिणी आहे .. कधीही पिल्लू होईल तिला .. डायलेट झालीये ती .. ” ती म्हणाली आणि दुर्बिणीतून बघू लागली.
त्याने पटकन कॅमेरा हातात घेतला तसा तिने कॅमेऱ्यावर हात ठेवला. “नको .. ” इतकं च म्हणून ती दुर्बिणीतून बघू लागली. काही वेळ शांत बसलेली हरिणी नंतर अस्वस्थ वळवळ करू लागली. डोळे व्याकुळ झाले. काही क्षणांची तडफड आणि हातापायांचं गाठोडं असलेलं कुत्र्याइतकं पिल्लू बाहेर आलं. दोन चार क्षणात ते गाठोडं उभं राहिलं आणि लंगडत , धडपडत हरीणीच्या अंगाशी करू लागलं. तिने त्याचं लालसर ओलं मऊ अंग चाटायला सुरुवात केली. काही वेळाने हरिणी उठली. पिल्लू अजूनही धडपडत होतं. हळूहळू त्याच्या कलाने घेत ती हरिणी पुढे चालू लागली. सोबत पिल्लू. तिच्या आगेमागे.
तिने हळूच दुर्बीण खाली घेतली. हे नवीन नव्हतं तिच्यासाठी. याच्या आधी असंख्य वेळा तिने हे बघितलं होतं. फक्त हेच नव्हे तर शिकार हि अगदी समोर होताना बघितली होती. अनेक प्राण्यांचा समागम बघितला होता. त्याच्या मानाने हे फारच सामान्य दृश्य होतं. तरीही आज ती किंचित अस्वस्थ झालीच.
दोघेही परत कॉटेज वर आले तेव्हा अंधारून आलं होतं. ती शॉवर घेऊन बाहेर आली तेव्हा त्याने स्कॉच चे लार्ज पेग बनवून ठेवले होते. कॅमेरा लॅपटॉप ला जोडून तो डेटा ट्रान्स्फर करत होता.
“आज इतकी मजा नाही आली, नाही का ? काही विशेष असं नाही मिळालं काही .. ” तो लॅपटॉप बघत म्हणाला. “हम्म” म्हणून तिने डोक्याचा गुंडाळलेला टॉवेल काढला तसा तिच्या शॅम्पू चा वास खोलीभर पसरला. वासाने त्याचं लक्ष विचलित झालं तसं त्याने वळून बघितलं. अजूनही ती टॉवेल गुंडाळून बसली होती. त्याने हळूच येऊन तिला मिठी मारली. “समोरचे काही चंदेरी केस सोडले तर अजिबात चाळीशीची वाटत नाहीस तू.” तिच्या केसात डोकं खुपसत तो म्हणाला. ती फक्त हसली. तिने तसाच पेग उचलला आणि अर्धा संपवला देखील. “बरी आहेस ना तू ?” त्याने विस्फारून तिच्याकडे बघितले. “हो रे! आज जरा दमल्यासारखं झालंय.. ” ती म्हणाली आणि अंगावर कपडे चढवू लागली. तुकतुकीत पोट , एकही सुरकुती नसलेलं. नितळ खांदे, मांड्या, अंगावर एकही बेडौलपणाची निशाणी नाही. सगळं अगदी जिथल्या तिथे. तिला आवडत होतं तसं. तिला हवं होतं तसं. स्वतः ला आरशात असंच अनावृत्त बघत बसायची तिची जुनी सवय. आजही स्वतः ला बघत बघत तिने अंगावर कपडे चढवले आणि त्याच्या शेजारी येऊन बसली.
दोघेही गॅलरीत जाऊन बसले. पाय पसरून अगदी झोपून गेले.
शांत गार वारा, आणि स्वच्छ दिसणारं आकाश. गर्दी नाही गोंगाट नाही, कसलेही आवाज नाहीत. फक्त शांतता. त्या दोघांना आवडायची अगदी तशी. “हि शांतता प्यावीशी वाटते मला घटाघटा .. ” ती म्हणायची नेहमी.
तो स्वस्थपणे पडून आकाश बघत होता. गार वाऱ्याने तिला डुलकी लागली. स्वप्नात ती हरिणी त्यांच्या घरात होती. आता कोणत्याही क्षणी तिला बाळ होणार होतं. ती वेळ आली आणि सोबत सगळं घर तिला त्या गर्भजलात बुडून जाताना दिसलं .. पैशांची बंडलं तरंगत होती .. गाड्या तरंगत होत्या, तिची कॉस्मेटिक्स, संपूर्ण जिम, कॅमेरा, रंग, पेन, डायऱ्या .. सगळं च. गोंगाट दूरवर जात जात आवाज कमी होतो तसा कमी होत गेला आणि तिला जाग आली. तिने शेजारी बघितलं. तो अजूनही तसाच स्वस्थ बसला होता. त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं. ती त्यालाच टक लावून बघत होती.
“काय झालं .. ” तिच्याकडे कूस वळवत त्याने विचारले.
“खूप काहीतरी मिस केल्यासारखं वाटतंय .. ” तो म्हणाला. “अगं दिसेल उद्या फ्लेम ! त्याचं घरटं सापडलंय ना आपल्याला ? ” तो म्हणाला. “फ्लेम च नाही म्हणते मी .. ” ती म्हणाली.
“तू खुश आहेस माझ्या सोबत ?” अचानक तिचा प्रश्न ऐकून तो गांगरला. “हे काय मध्येच?” त्याने विचारले. “सांग तर.. ” तिने विचारले.
“का नसेन खुश?” तो म्हणाला.
ती आकाशाकडे बघत राहिली.
“तुला कशाची कमी वाटतीये का ?” त्याने विचारले. बराच वेळ विचार करून तिने उत्तर दिले .. “हो .. “
“कसली ?” त्याने विचारले.
तिने त्याच्या डोळ्यात बघितले. डोळ्यातलं आकाशातल्या चंद्राचे प्रतिबिंब दिसत होते.
तिने त्याचा हात घेतला आणि आपल्या ओटीपोटावर ठेवला….
-पूजा
Image by congerdesign from Pixabay
- दिवाळी २०२० स्पेशल- १९ - November 27, 2020
- दिवाळी २०२० स्पेशल- ३ - November 13, 2020
- पाडस - October 23, 2020
👌🏻👌🏻👌🏻
मस्त