चप्पल
आज जरा उशीरच झाला तिला. आधीच शाळेतल्या घटक चाचण्यांचा रिझल्ट लावता लावता उशीर झाला होता. तरीही घरी येऊन फ्रेश होऊन लगोलग निघाली. त्यात नेमकी तिची चप्पल तुटली. तिच्या सोसायटीपासून तिसऱ्याच सोसायटीत तर जायचं होतं. रस्त्यात चप्पल दुरुस्त करणाराही नाही. अखेर, दहा पावलं चप्पल घासत जाताना, गती इतकी कमी झाली की तिनं तिथेच फुटपाथच्या कडेला चप्पल काढून ठेवली. अन अनवाणीच चालू लागली.
अर्णव अन राणी दोघेही वाट पाहून थकले असतील. मावशींनी पोळी भाजी केली असेलच, पण मुलं जेवलीत की नाही कुणास ठाऊक. त्यांचा डॅडी, अरुण, …… मोठा मॅनेजर, …… अजून आलाही नसेल. लवकर पोचलं पाहिजे. आता इतक्या उशिरा, ती काय शिकवणार अन मुलं काय अभ्यास करणार होती….. पण तरी ती घाईत निघाली. मुलांना एकदा गुड नाईट करून आलं तरी, मोठं समाधान मिळतं. खरंतर आज तिला दुपारी डबाही खायला वेळ मिळाला नव्हता. पण मुलांच्या काळजीनं ती चहाही न पिता निघाली.
जरा जास्तच लळा लागला होता मुलांचा. वेळेत लग्न केलं असतं तर अशी पाचवी सहावीतच असती, तिचीही मुलं.
नाकी डोळी नीटसं असूनही, सावळा रंग ….. अन मंगळ आड आला.
तशी ही तरी कुठं परक्याची मुलं होती……
…………………………………………………….
त्या अमावस्येच्या काळरात्री ती अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सेवा करत, सोबतीला राहिली, ….. आशासोबत. अगदी डॉक्टरांनी सर्वांना स्पष्ट सांगितलं. आशा उद्याचा सूर्य नाही पाहू शकणार. ज्यांची भेट झाली त्यांनी घरी जा. तिचा वेदनादायक मृत्यू कुणी पाहू शकणार नाही. पण तरीही विद्या तिथेच थांबली. कधीतरी दुसरी की तिसरीच्या वर्गात पकडलेला आशाचा हात इतक्या सहजासहजी तिच्या हातून सुटणार नव्हता.
“मला मुलांचा फोटो दाखव …… ” आशाची शेवटची इच्छा.
विद्यानं घाईघाईने स्वतःच्या मोबाईलमधला, अर्णव अन राणीचा फोटो दाखवला अन खोल गेलेल्या डोळ्यातून अश्रूंची धार वाहू लागली.
“तुझ्या मोबाईलमध्ये आली आहेत दोघंही , हृदयात जप त्यांना.”
एवढं बोलता बोलता, …… अन अचानक श्वास कोंडले तिचे. दम वाढला, चेहरा भयानक होऊ लागला. विद्याने इमर्जन्सी बेल दाबली, ….. बाहेर डॉक्टरांकडे धाव घेतली. पण ते सर्व येईपर्यंत नजर स्थिर झाली होती तिची……. जणू विद्याच्या उत्तराची वाट पहात …….
……………………………………………………………….
विद्या तिचं उत्तर रोज देत राहिली……. अन तिच्या जगण्याची कारणं तिला सापडत राहिली, …… अर्णव अन राणी. ….. हळुहळू जीवनाचा भागच झाला म्हणा ना.
ती घरात आली की अगदी नाचतच सुटले दोघे. इतक्या उशिरा येऊनही ती आल्यावरच जेवू, म्हणून थांबले होते दोघे.
“इतका का उशीर केला मावशी ?”……
“तु आली नाहीस तरी, मी अभ्यास केला सर्व …..दादाच करत नव्हता.”
“केला ग मावशी …. मी पण केलाय, पण तुझी आठवण येत होती ग …..मधून मधून” म्हणत अर्णव तिला बिलगला, ….. अन राणीही.
दोघांचे आनंदी चेहरे, तृप्त मनाने दुरून पहात, अरुणलाही नकळत भरून आलंच. पण चाळशी, भावना लपवण्यासाठीच लागते बहुतेक. अन भिंगा आडच्या भावना ओळखायला, बऱ्याचदा डोळे मिटून घ्यावे लागतात.
ते दोन गोंडस, बिलगलेले आनंदकंद हलकेच बाजूला सारत, विद्यानं वाढायला घेतलं.
“आज काही अभ्यास करायचा नाही बरं का ….. छान पोटभर जेवून पटकन झोपा.”
“तुम्हीही जेवुनच जा ना ……”
तिचं बोलणं मध्येच तोडत अरुण बोलून गेला.
“आता इतक्या उशिरा कुठे स्वयंपाक करत बसाल …..”
“हो, मावशी …… आज आमच्या सोबतच जेव, …… रोज आमचा अभ्यास घेतेस, जेवू घालतेस अन जातेस तशीच ….. डॅडी पण कधी नसतो जेवायला. आज तो ही आहे, ….. तू पण जेव ना आमच्या सोबत , …….प्लीज……प्लीज ……”
इतका गोड गोंधळातला आग्रह ती तरी कुठे टाळू शकणार होती.
जेवायला बसल्यावरही, दोघांनी तिच्या हातून एकेक घास भरवून घेतला हक्काने….. मगच सुरुवात केली.
“रविवारी, सुटीच्या दिवशी, मी छान काहीतरी बनवून आणते हं, पिलांनो …. तुमच्यासाठी…..”
“त्यापेक्षा इथंच बनवलंत तर छान गरमागरम खायला मिळेल, आम्हाला …. मी जे हवं ते आणून ठेवतो शनिवारीच ……”
“हो, sss , मावशी असंच कर …..” झाला गोंधळ सूरु पुन्हा.
तो कसाबसा शांत करत पुन्हा जेवायला सुरुवात झाली.
प्रचंड वर्कलोड मुळं नेहमी उशिरा येणारा अरुण, बऱ्याच दिवसांनी, मुलांसोबत जेवत होता. रोज किती आनंद भरून वाढते , ही विद्या,….. मुलांना, हे आजच तो पहिल्यांदा पहात होता. जेवता जेवता, मावशीची चप्पल तुटल्याची स्टोरी ऐकून, मुलं अगदी खदाखदा हसत सुटली.
जेवणं झाली, ……
तिनं सगळं आवरून ठेवलं. सगळं जिथल्या तिथं करून, मुलांना झोपवून, ती जायला निघाली.
दरवाजा उघडला, …..
तर समोर दारात , नव्याकोऱ्या फॅशनेबल लेडीज चपला , ……
ती दचकून माघारी वळली, …… मागे अरुण उभा होता.
“आशा साठी घेतल्या होत्या, ……… पण त्या वापरण्याआधीच ती hospitalize झाली. ……. तुम्हाला होतील मापात, ….. घालून तर पहा, …..”
जरा संकोचतच तिनं, आशाच्या चपलांमध्ये पाय सरकवले, अन अरुणच्या चेहऱ्यावर, एक वेगळंच समाधान झळकलं. त्याच्या डोळ्यातलं समाधान अन तिचं हलकेच लाजणं, यांच्यामध्ये मात्र मंगळानं काहीही लुडबूड केली नाही.
©बीआरपवार
Image by Uwe Kern from Pixabay
- Poked you …… - July 31, 2023
- एमएटी - June 10, 2022
- पत्रास कारण की… - April 21, 2022
प्रतिकात्मकतेचा सुरेख उपयोग
ही खरी पारखी नजर
Sundar….. Mastch 👌👌
खूपच सुरेख ….!!
धन्यवाद🙏
वाह!
👌👌👌👌
Dhanyawad