व्हॉट द फ* !!- जिभेवरील F चा व्हायरस
के. बी. सी. चा झगमगता सेट …
श्री अमिताभ बच्चन त्या दिवशीच्या ‘सेलिब्रिटी’ चं नाव पुकारून अदबीने स्वागताला
प्रवेशद्वारी उभे …जेमतेम सतरा अठरा वर्षांची आलिया भट प्रवेशते आणि म्हणते , “लुकिंग सेक्सी !!”
काहीतरी निरामय संगीत सुरू असतांना नखांनी ओरखडल्या चा आवाज ऐकल्या सारखं वाटलं . कितीतरी काळ ते खटकत राहिलं . त्या नंतर मग तरुण मुलं मुली एकमेकांना
“मस्तं सेक्सी चप्पल घेतली ग !”
किंवा “आज डिनर चा प्रोग्राम ? …सेक्सी !! “
अशा शब्दात बोलतांना ऐकायला येऊ लागली तेव्हा कानांनी मेंदूला फक्त हाच शब्द नाही तर ‘असे’ अनेक नवे शब्द नव्याने शिकवले . ( नाही म्हणायला सिनेमात गाणे ऐकले होते , पण संवादात इतका सहज वापर नवीन होता .) म्हणजे ‘आकर्षक’ किंवा दिलखेचक अशा अर्थाने सेक्सी हा शब्द आजची ही मुलं अगदी सहज वापरत असत . पुढे ह्याचे मोठे भावंडं येणार आणि हा शब्द मिळमिळीत होणार असं त्यावेळेला वाटलं नव्हतं . नंतर अशी अनेक आक्रमणं झाली .
अक्राळविक्राळ समाज माध्यमातून आयात झालेल्या अनेक परदेशी शब्दांनी तरुणाईची भाषाच बदलवून टाकली . काळानुरुप टी. व्ही चॅनेल्स वर संपूर्ण कुटुंबासोबत कुठलेली दृश्य बघताना कशी नजर मरत गेली , तसं आजच्या तरुणाई चे संवाद ऐकतांना आपले कान ‘वारताएत’ . त्यातून वेब चॅनेल्स नि तर पार हद्दच केलीय .
*नालायक , दळभद्री , वेडी , मूर्ख …अशा सोज्वळ रागीट संबोधनांची जागा* *पाश्चात्यांनी संक्रमित केलेल्या “फ” च्या शब्दांनी कधी घेतली ते कोवळ्या कोवळ्या पोरा पोरींनाही कळलं नाही* . मोठं दुर्दैव म्हणजे पुढील पिढी जिच्या हातात आहे त्या तरुण मुला मुलींना ह्याशिवाय बोलताच येत नाही .
*अनेक साधे साधे शब्द , जसे* …
*जाऊदे मरुदे , खड्ड्यात जा , बापरे , आईग* ! , जोरात ,
शी! ह्या सारख्या अनेक उद्गारवाचक शब्दांसाठी एकच शब्द वापरल्या जातोय , “”फ*”” !!!
सरळ सरळ लैगिक क्रिया दर्शक शब्द !
सोशल मीडियावर , कॉलेज कट्ट्यावर , दैनंदिन संवादात , ऑफिस मध्ये याचा नको तितका आणि दुर्दैवाने सर्वमान्य सुळसुळाट झाला आहे . ननेटफ्लिक्स , ऍमेझॉन , hotstar आणिक बऱ्याच वेब चॅनेल्स वर लैंगिकता , नग्नता , अभद्र शब्द यांचा बीभत्स भडिमार आहे . ह्यावर अंकुश ठेवणारं मंडळ अजून कसं अस्तित्वात नाही ?
*एखाद्या गोष्टीतून स्वर्गसुख वाटतंय किंवा आनंद वाटतोय हे निदर्शनास आणतांना* *ह्या शारीरिक सुखाशी निगडित वापरल्या जाणाऱ्या शब्दाचा वापर इतक्या वेगात झाला की हे चूक आहे , याला आवर घालायला हवा याची जाणीव होण्या आधीच हा तरुण जिभेवर घट्ट रुतून बसला देखील* !
लैंगिक कृती हा आधीपासूनच शिव्यांचा गाभा राहिलाय . *सतराव्या शतकाच्या शेवटी “फ*” हा शब्द एका इंग्रजी कवितेत आल्याने त्याची प्रचंड चर्चा झाली होती* . वाईट गोष्टींचा प्रसार फार पटकन होत असतो ह्या नियमानुसार तो प्रचलित झाला , आणि १९६५ मध्ये ह्या शब्दाला डिक्शनरीत जागा मिळाली .
‘जिच्या हाती पाळण्याची दोरी’ ह्या म्हणीनुसार
‘जिच्या हाती भाषिक वैभव’ असा विचार नको करायला ? ही घसरण का इतक्या सहजपणे स्वकारल्या गेली ? *आपण अनावश्यक लैंगिकता अशी चव्हाट्यावर आणतोय याची जाण ह्या तरुणाईला कोण देणार*?
सवंगता अशी अंगात भिनली की नजर बोथट आणि जाणिवा शिथिल होतात याचा अनुभव घेतोय न सगळा समाज?
याचा अर्थ फक्त स्त्रीयांनी अथवा मुलिंनीच सावध व्हावे आणि पुरुषाला
दैनंदिन संभाषणात किळसवाणी स्वैरता असावी असा मुळीच नाही . जबाबदारी तर लिंगातीत आहे , पण भावी आईची पिढी जास्त जागरूक होणे आवश्यक नाही का ? मग ही धुरा आजच्या तरुण पालकांनी खांद्यावर घ्यायला हवी .
आपल्या कोवळ्या वयातील पाल्याला सतत शाब्दिक सभ्यतेची जाणीव देत रहावी .
आज जी पिढी पन्नाशीच्या मागेपुढे आहे , त्यांनी नुसतं ‘च्यायला’ ,
‘च्यामारी’ म्हटलं तरी आईचा फटका बसत होता , त्यांच्या ‘भ’ , आई , बहिणीवरील आणि ‘च’ बाराखडीतील शिव्या इतक्या सहज निदान रोजच्या संवादात तरी नसत . आता मात्र कसं ..
बाहेर जाताना पाऊस आला ,
“”व्हॉट द फ*!!””
कुणाशी वाद झाला , “”फ* विथ यु!”
स्टॅण्ड अप कॉमेडी मध्ये तर तरुण पोरी सर्रास म्हणतात “”फ* विथ यु ऑल !””
अरे??? हद्द झाली !! बरं ऐकणारे , प्रसारण करणारे सगळे हे नुसतं सहनच नाही , तर एन्जॉय करत आहेत!
विचार करा ह्या वरील वाक्यांचा शब्दशः
अर्थ लावला तर ते किती भयानक आहे !
तसं फार पूर्वीपासून
अर्वाच्य शब्द ही काही फक्त पुरुषांची मक्तेदारी नव्हतीच . पण स्त्रियांच्या तोंडी सर्रास लैंगिकतेशी निगडीत शब्द समूह नसत . पुरुषांनी मात्र आतली मळमळ ओकताना बीभत्स , अर्वाच्य आणि लैंगिकता चव्हाट्यावर आणणाऱ्या भाषेचा मुक्त वापर केला . सौम्य शब्दांची वासलात लावली .
कुठलेच शाब्दिक सोवळेपण न जपता आपल्या संतापाचं यथोचित प्रदर्शन करण्यासाठी समोरच्या व्यक्तीला जास्तीत जास्त अपमानित करण्याहेतूने स्त्री देहाला केंद्रस्थानी ठेवून शिव्यांची रचना करण्यात आली .
क्वचित संतसाहित्यात ही काही प्रेमळ शिव्या सापडतात . स्त्रीयांच्या हक्कांसाठी जग भरात लढा देणाऱ्या असंख्य पुरोगाम्यांना ह्या शाब्दिक उत्पीडनातून तिची अंशतः देखील सुटका करता आली नाही . समाजातील इतर विकृती इतक्या प्रखर होत्या की त्या पासून तिची काही अंशी मुक्तता करताना देखील अनेक पिढ्या खर्ची पडल्या . मग तिला सतत भोग्य समजत स्त्री देह आणि लैंगिक संबंध ह्या भोवती फिरणाऱ्या शिव्यांकडे स्त्रियांना गांभीर्याने बघता आलेच नाही .
त्यातल्या त्यात एक समाधान होतं की निदान स्त्रियांचं तरी इतकं जिव्हास्खलन झालं नव्हतं .
आतली ऊर्जा इतर समाजविघातक कामांकडे वळण्यापेक्षा शिव्या वरून आत लपलेल्या राक्षसाला शांत करण्यात ह्या शिव्यांचा वाटा आहे हे देखील काबुल करावे लागेल .
पु. लं नि म्हटल्या प्रमाणे
*शिवी ही सोड्याच्या बाटली प्रमाणे फुटली पाहिजे ,तरच संतापाचं पूर्ण स्वरूप आकारबद्ध होतं*.
*शिवीत आशयाला नाही तर आवेशाला महत्त्व आहे* .
ह्यातील विनोदाचा भाग सोडला तर लक्षात घेऊ की फक्त संतापाला वाट करून देतांना ह्याचा वापर अधोरेखित होतो ;
उठता बसता , चालता बोलता नाही!
जरा आपल्या भोवती असणाऱ्या तरुण वर्गाच्या संवादांना ऐका . हा *फ*’
चा व्हायरस त्यांच्या शाब्दिक हार्ड डिस्क ला कर करप्ट करून बसलाय . ह्या विषयावर अनेक ‘ बेस्ट बुक सेलर्स’ पण आहेत , जसे
बेंजामिन बर्गन यांचं
*WHAT THE F*.
यात त्यांनी शिवराळ भाषा , समाजाची नैतिकता , जिभेच्या शील अश्लील मर्यादा , त्यांचे पडसाद आणि त्यातून वर उठण्याची आवश्यकता ह्याचा बौद्धिक उहापोह केलाय .
ही जागृती आपल्याकडे येणं किती गरजेचं आहे ह्याची अजून दुर्दैवाने आपल्याला जाणीवच झालेली नाहीये .
कोव्हीड–19 वर आपले शास्त्रज्ञ लवकरच लस शोधून काढतीलच , पण जिभेवर रुतून आत झिरपणाऱ्या ह्या
“”फ*”” च्या व्हायरस वर कोण लस शोधणार?
©*अपर्णा देशपांडे*
Image by Gerd Altmann from Pixabay
Latest posts by Aparna Deshpande (see all)
- आत्तु-भाग ३ (शेवटचा भाग) - June 17, 2022
- आत्तु- भाग २ - June 7, 2022
- आत्तू- भाग १ - June 3, 2022
👍
खरंय
👍👍
इंग्रजी f तरी आता कॉमन झालाय. हिंदी शिव्या भयाण आहेत.
हिंदी आपल्याला जवळची भाषा आहे न , म्हणून
पटलंय
👍👍👍
मस्त
कूठे तरी हे सर्व जानवत राहत
खरच, हे कुठेतरी थांबायलाहवं।