“प्यासा सावन” गंध – (लेखन- बी.आर. पवार)
सकाळची कोवळी उन्हं अंगणातल्या प्राजक्ताला कुशीत घेऊन पहुडली होती. रात्रभर सुरू असलेली पावसाची रिपरिप आता कुठं थांबली होती. बेडरूमला लागून असलेल्या व्हरांड्यात, कौलांच्या सांदीत, कबुतरांचा चाललेला आळसट प्रणय तिला बेडवरून स्पष्ट दिसत होता. प्रणयात रंगलेली कबुतरं, एकमेकांच्या कुशीत अशी काही माना खुपसून बसली होती की कोणती मान कोणाची हे सांगणं अवघड होतं.
तिची तरी कुठे वेगळी अवस्था होती. रात्रीची धुंद मिठी अन घट्ट पकड ढिली पडली असली तरी, अविनाशच्या प्रेमळ विळख्यातून ती अजून सुटली नव्हती. लग्नाला वर्ष उलटून गेल्यावर काल रात्री, पहिल्यांदा असे शहारे, रात्रीच्या अंगावर उमटले होते.
अविनाशचा हात तिनं अलगद छातीवरून दूर केला, अन पांघरूण बाजूला केलं. विस्कटलेले केस आवरायला तिनं हात डोक्यामागे नेले खरे, पण तितक्यात सकाळच्या खट्याळ वाऱ्याने तिला मिठीत घेतलं, अन पुन्हा रात्रीच्या शहाऱ्यांची गोड आठवण तिच्या गालावर फुलली.
आता ती किचनमध्ये आली. रात्री जगलेली सगळी स्वप्नं पुन्हापुन्हा गालावर लाज फुलवत राहिली. का कुणास ठाऊक पण आज अगदी हलकेच तिनं, दुधाचं पातेलं कट्ट्यावर ठेवलं.
मागच्या कित्येक रात्री तिनं तळमळत काढल्या होत्या. काहीच घडत नव्हतं असं नव्हतं. पण जे घडत होतं, ते तिचं नव्हतं, …… तिच्यासाठी नव्हतं……. हे तिला सतत जाणवत होतं.
तिने या गोष्टीचा छडा लावायचं ठरवलं खरं, …… पण कसं, ….. कुठं सापडणार होतं ……. जे तिच्या हातून निसटून चाललं होतं. कित्येक दिवस फक्त विचार करण्यात गेले. त्याचं फेसबुक, …… व्हाट्सअप्प …… त्याचा कॉलेजग्रुप सगळं सगळं उलटपालट केलं. पण काहीही लिंक, धागेदोरे हाती लागत नव्हतं. त्यावेळची तगमग आठवता आठवता तिनं चाकूनं दुधाच्या बॅगचा कॉर्नर घाईत कट केला. थोडं दूध उडालंच……अगदी चेहऱ्यावरही. ती स्वतःशीच हसली. शांतपणे दूध पातेल्यात ओतून गॅसवर ठेवलं. अन आठवत राहिली गेल्या अमावस्येची रात्र.
त्या रात्री, तो ऑफिसची ऍन्युअल पार्टी करून आला होता. तिची झोप लागली होती. मद्याची नशा त्याच्या रोमारोमात भिनली होती. त्याच नशेत तो मृणालच्या नाजूक शरीराकडे ओढला गेला. अगदी तिला हवेहवेसे वाटणारे स्पर्श तिला जाणवू लागले, अन त्याची नशा तिच्याही डोळ्यात अलगद उतरत गेली. आवेग हळूहळू वाढत होता. त्यावेळचा आवेग आठवून, नकळत आताही, ….. हो आताही तिनं डोळे घट्ट मिटले. कदाचित दोनेक मिनिटं तशीच गेली असतील….. तिनं डोळे उघडले. दूध आता साय धरू लागलं होतं. तिनं ग्लासभर पाणी अगदी घटघट पिऊन टाकलं. समोर खिडकीत, रात्रीत चिंब भिजलेली साळुंखी अंग झटकत बसली होती. तिला काहीतरी खाऊ हवा होता. मृणालनं काल केलेल्या कप केकचा तुकडा तिच्यासाठी खिडकीत ठेवला.
हळूहळू साय वर येऊ पहात होती……. त्या रात्रीच्या त्याच्या आवेगासारखी. मृणाल पुन्हा त्या रात्रीच्या आठवणीच्या कुशीत शिरली. श्वासांची गती वाढत होती. श्वासात श्वास मिसळून तयार होणारा रिदम ती पहिल्यांदा अनुभवत होती.
अन अचानक ……त्या ऑर्केस्ट्राच्या एका हाय पिच नोटवर त्याच्या तोंडातून शब्द ओसंडले,…..
“स्वाती, आय लव यु.”
मृणालचे डोळे खाडकन उघडले……. हो आताच्या, किचनमधल्या मृणालनंही डोळे उघडले. ……… अन पाहिलं…. दूध पूर्ण वर आलं होतं…… त्याच्या सायीचं ते छोटसं शिखर कधीही फुटण्याच्या बेतात होतं. ते ऊतू जाणारं दूध कुठल्याही क्षणी, ओसंडून वाहणार होतं, तिनं शांतपणे गॅस बंद केला. खाली बसणाऱ्या त्या फेसाळ सायीकडे पहात राहिली.
अगदी हेच केलं होतं तिनं त्या रात्रीही. त्याच्या तोंडून ते शब्द ऐकताच, त्याच्या आवेगाला किंमत न देता ती पटकन बाजूला झाली. कसाबसा नाइटरोब गुंडाळून, व्हरांड्यात आराम खुर्चीत जाऊन बसली. अविनाशची नशा पूर्ण उतरली होती. खाली जाणाऱ्या सायीसारखा त्याचा आवेगही ओसरला. तो ही बाहेर व्हरांड्यात आला. समोरच्या कठड्यावर रेलून एक सिगारेट पेटवली. अन सांगू लागला स्वातीची अन त्याची गोष्ट.
“मी लपवून ठेवणार नव्हतो काहीच तुझ्यापासून खरंतर……. पण तुझा हळवेपणा आड आला. तुझं मन दुखावेल म्हणून गप्प राहिलो. पण आज शब्द निसटलेच. ……..” तो मान खाली घालून सांगत राहिला……..
…… कॉलेजमध्ये होती. एक बॅच मागे. तिला पाहिलं अन सरळ फेल होण्याची इच्छा झाली. एटीकेटी मिळूनही तिच्या क्लासमध्ये बसू लागलो. मग तिच्याशी मैत्री जमली. तिच्या मस्क सेंट्च्या धुंदित, इंजिनिअरिंग कधी पुर्ण झालं हे समजलंही नाही. पण तरीही बोलायचं होतं ते जमलंच नव्हतं, कॉलेज संपलं तरी. ….. जॉब आधीच फिक्स झाले होते …… बरोब्बर तीन महिन्यांनी बॅचचं गेटटुगेदर करायचं ठरलं होतं. ……
“आव्या, तेव्हा तरी बोल बरं का , नाहीतर आम्ही तिच्या देखत लाथा घालू तुला…….”
मित्रांचा प्रेमळ आग्रह.
तो दिवस आला, ….. सगळे आले …… तीही आली …… पण तिच्या लग्नाचं निमंत्रण द्यायला. कार्ड वाटत ती माझ्याजवळ आली. मी हात धरून तिला बाजूला नेलं…….
“काहीच जाणवलं नाही का इतक्या वर्षात तुला …… नाही जाणवलं माझं प्रेम ? …..”
“आईवडिलांचं मन मी मोडू शकणार नाही.”
ते ऐकून तिथेच रडू फुटलं होतं. पण आवरलं. त्या रात्री खूप बीअर संपवल्या…… मित्रांसोबत. सगळेच दुःखात….. तेही ….. मीही….. अन लाथा घालायचा प्लॅन केलेलेही.
तिच्या शिवाय श्वास घेणंही जमेनासं झालं होतं, इतकी तिची सवय झाली होती….. त्या चार वर्षात. तिच्याशिवाय काहीच सुचत नव्हतं. दिवसरात्र मनावर, मेंदूवर तिच्या मस्क सेंटनं गारुड केलं होतं. ती नसतानाही तिची आठवण आली तरी तो सेंट नाकात दरवळत राहायचा. म्हणून तर मी तुला तोच सेंट गिफ्ट दिला होता. पण तु सांगितलंस तुला सेंट अजिबात आवडत नाही म्हणून.
तिच्याच आठवणीच्या धुंदीत, ऑफिसमध्ये काहीही न कळवता घरी निघून आलो. कित्येक दिवस घरीच राहिलो. तिचं लग्न लागलं, त्या रात्रीही खूप रडलो. अगदी कोरडा होईपर्यंत.
इतका कोरडा झालो की, पुन्हा ऑफिस कधी जॉईन केलं, तुला कधी पहायला आलो, कसं लग्न झालं यातलं काहीही मनाला जाणवलंच नाही. मी फक्त कोरडेपणाने करत गेलो एकेक गोष्टी………………………………………………….
“अन माझं आयुष्य मात्र बरबाद झालं. …..काहीही चूक नसताना.”
मृणालचा गळा दाटून आला.
भुतकाळाला मानगुटीवर बसवुन, उगाचच हातातला भविष्यकाळ कुस्करल्याची जाणीव त्याला पहिल्यांदा झाली होती. खरंच मृणाल सुंदर होती. पण नाजुक मनाची मुलगी. त्याला गुन्हेगार असल्यासारखं वाटत होतं. पण भुतकाळ त्याच्या हातात नव्हता. चार वर्ष जे नातं ऑक्सिजनसारखं, तो उरात भरुन जगत होता, ते नातं निष्ठुरपणे त्याच्या अवकाशात पोकळी ठेवुन निघुन गेलं होतं. अन त्याच्या घरात, स्वतःचा सुगंध पसरवत राह्णारी वेल असताना तो मात्र मास्क लावुन वावरत होता.
……………………………………………………………………….. ……. …
तो आता मनोमन माफी मागत होता. पुन्हा आयुष्य नव्याने जगण्याची संधी मागत होता. पण आता , ……. ती कोरडी झाली होती.
तो रोज तिला फुलवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत होता. त्याला माहीत असलेले सगळे प्रयत्न तो करत होता. कधी गजरा आणून, कधी साडी, आवडत्या फ्लेवरचं आईस्क्रिम आणून, पण कळी काही खुलत नव्हती.
काल मात्र कळीने कहर केला. तो ऑफिसमधून आला. लॅच उघडून आत येताच, मस्कचा गंध त्याच्या नाकपुड्यात शिरला. तो इतका पसरला होता की मेंदूपर्यंत पोचला. तो मृणालला शोधू लागला. हाका मारत आत गेला. किचनमध्येही मस्क. बेडरूम, बाथरूम , हॉल , गेस्ट रूम, किचन …….. सगळीकडे फक्त मस्क , मस्क, आणि मस्कचा सुगंध.
तो मात्र त्या सुगंधातही मृणाललाच शोधत राहिला. ती कुठेच दिसत नव्हती. शोधता शोधता एका वॉर्डरोब जवळ त्याची पावलं थबकली. डोअरजवळ नाक नेत, त्यानं वॉर्डरोब उघडला. आत नाक मुठीत धरून मृणाल बसली होती.
“काय आहे हे ? अन काय चाललंय घरभर ?”
“तुला ती आणि तिचा मस्क आवडतो ना म्हणून….. ”
“पण सेंट आवडत नाही ना तुला.”
“हो ….. म्हणूनच तर वॉर्डरोब बंद करून बसले होते ना.” नाक फुगवत ती बोलून गेली.
“पण इतक्या सगळ्या मस्कमध्येही, तु सापडलीच…. तेही तुझ्या गंधामुळेच.”
हे बोलत त्यानं तिच्या गळ्यात हात टाकले.
“माझा गंध ?” ती लाजत म्हणाली.
“हो तुझा गंध ……. जो फक्त मला येतो.अन त्याच्यासमोर जगातले सगळे सुगंध फिके आहेत” असं म्हणत त्यानं सगळ्या खिडक्या धडाधड उघडल्या, पडदे सरकवले. पंखे फुल स्पीड लावून सगळा मस्क मुक्त केला…… ती मात्र त्याच्याकडे अचंबित होऊन पहात राहिली.
त्यानंतरची संध्याकाळ, अन रात्र तो तिच्या शरीरातली कस्तुरीची कुपी शोधत राहिला. अन त्याचं असं फक्त आणि फक्त मृणालच्या गंधात तनामनाने बुडून जाणं तिला तृप्त करत राहिलं.
……………………………………….
कालच्या आठवणीत चिंब भिजून ती किचनच्या खिडकीत उभी होती. समोरच्या प्राजक्तावरची उन्हं हलकेच तापू लागली होती. अन तिच्या उघड्या खांद्यावर त्याचे गरम श्वास पुन्हा तिचा गंध पीत होते…… पुन्हा गोड शहाऱ्यांची बरसात करण्यासाठी.
©बीआरपवार
- Poked you …… - July 31, 2023
- एमएटी - June 10, 2022
- पत्रास कारण की… - April 21, 2022
छान
🙏 कमाल लिहिताय!
मस्त 👌👌👌
मस्त
Mast
Masta lihile aahe Sir
छान
Mast
Romantic
मस्त लिहिलीय कथा
Dhanyawad Mitrano !
Surekha Rachana
खुप सुंदर…. कमाल.. हैट्स ऑफ…
Jadu ahe likhanat…….Apratim