पायल….

सुनिताताई आणि माधवराव ह्यांना दोन मुलं , पराग मोठा मुलगा , खूप हुशार , खूप गुणी. इंजिनिअर झाल्यावर पराग  पुण्यात एक भाड्याचे घर घेऊन दोन मित्रांसोबत राहत होता आणि दुसरी पायल … ती झाली ना तेव्हा दिसायला खूप गोड , गोजिरी , सगळ्यांची लाडकी होती , पण जसजशी ती मोठी होत गेली , सगळ्यांना जाणवायला लागले कि तिच्या मेंदूचा फार धीम्या गतीने विकास होत आहे . सुनिताताईनी तिला सगळ्या शहरांतील  , सगळ्या प्रकारच्या डॉक्टरकडे अगदी मानसोपचारतज्ञाकडेसुद्धा नेऊन आणले होते . सगळ्या प्रकारचे उपाय करून सुद्धा हाती यश आलेच नाही . आणि जसजशी ती मोठी होत होती , सुनिताताईची काळजी वाढतच  होती . तसे बघयला गेले तर ती वेडी सुद्धा नव्हती पण काहीतरी वेगळेपणा मात्र जाणवायचा तिच्यात .

ते राहत असलेले गाव तसे लहानच होते त्यामुळे अश्या विशेष मुलांसाठी चांगली शाळा नव्हतीच त्यामुळे पायलला नगरपालिकेच्याच एका शाळेत सुनिताताईंनी कसेबसे पाचवीपर्यंत शिकवले आणि पुढे शिकवणे अवघडच आहे हे जाणून घरीच जसे जमेल तसे घरकाम , शिवणकाम वगैरे शिकवायचे असे ठरवले .

शाळेत तिला मुलंमुली चिडवायचे तेव्हा तिला नक्कीच जाणवायचे की आपल्याला आपल्या वेगळेपणामुळे हे नावे ठेवत आहेत .पण ह्यावर ती काहीच करू शकत नव्हती .

सुनिताताईंनी हे सर्व जाणूनच तिला घरी ठेवायचा निर्णय घेतला .

माधवरावांची गावातल्या गावात सरकारी खात्यातच नोकरी असल्यामुळे ते ही पायलसाठी जास्त वेळ देऊ शकायचे .

तिच्याशी संवाद साधत , तिची आवड निवड जपत दोघेही आहे त्या परिस्थितीत तिला आणि स्वतःला समाधानी ठेवण्याचा प्रयत्न करत होते . एकीकडे पराग मात्र प्रत्येक ठिकाणी चमकत होता , अभ्यासात तर तो हुशार होताच , पण शाळा कॉलेज मधील प्रत्येक स्पर्धा , नाटके वगैरे मध्ये भाग घेऊन त्यातही तो त्याची हुशारी दाखवत होता .

आपली बहिण अशी आहे , ह्याचे त्यालाही फार वाईट वाटायचे , पण त्याला मात्र त्याच्या अभ्यास आणि इतर गोष्टींमुळे फार कमी वेळ तिच्याशी बोलायला मिळायचा . पण जेव्हा असायचा तेव्हा तिला आवडेल , जे रुचेल तसे वागायचा तसे बोलायचा .

वीस वर्षांची झाली होती आता पायल . दिसायला सुंदर होती , आणि हेच बहुदा चूक होते …तिला आता डोळ्यात तेल घालून जपावे लागत होते . वयात आलेली , दिसायला सुंदर आणि कमी समज असलेली मुलगी कोणाच्याही जाळ्यात सहज अडकू शकते ह्याची सुनिताताईंना पूर्ण जाणीव होती .

पायलला शिवणकाम खूप आवडत होते हे त्यांना आता कळले होते , कोणाचाही कोणताही कपडा उसवला  की पायल इतक्या सुंदर त-हेने शिवायची , कि कपडा कुठे फाटला किंवा उसवला होता , समजायचेच नाही . त्यांनी पायलला एका शिवणकामाच्या क्लासला घातले .

घरापासून तसा पाचेक मिनिटावर होता क्लास . तशी ती दुध आणायला , भाजी आणायला एकटी जायची , त्यामुळे इथेही ती एकटीनेच जात होती

आज पायल खुश दिसत होती . “आई , त्या निशा ताईचे लग्न ठरले आहे , तर आम्हला क्लासला सुट्टी आहे पाच दिवस, लग्न म्हणजे मज्जा असते ना गं आई”?,

तिच्या चेह-यावरील संमिश्र भाव बघून , तिला नक्की काय उत्तर द्यावे त्यांना काहीच समजत नव्हते . खरंतर पायल सुद्धा आता लग्नाचीच नाही का ?. त्या मनाशी विचार करू लागल्या . चारचौघांसारखी असती आपली पायल तर आत्ता स्थळं बघायला सुरुवात केलीच असती आपण . पण कदाचित असेलही तिच्या नशिबात लग्नाचा योग . अगदीच काही वेडी नाहीये आपली मुलगी  आणि दिसायलाही किती गोड , सुंदर आहे . काय हरकत आहे स्थळं बघायला . थोडे adjust लागेल करायला , पण तिला साथीदार तर मिळेल . तशी काही आपल्याला आत्ता जड नाहीये , पण आपण गेल्यावर तिचे काय ?, पराग तिला थोडीच जन्मभर सांभाळणार आहे ?

आणि जसा हा विचार आला , त्यांनी नात्यातील प्रत्येकाला पायलसाठी मुलगा बघायला सांगितले . त्या दिवशी जाऊबाईना सुद्धा त्यांनी हेच सांगितले , तेव्हा त्या म्हणाल्या की “अगं सुनिता पायलसाठी कोण मुलगा देईल आपला , तशी दिसायला आहे सुंदर पण ….”

“जाऊबाई , माहित आहे मला कठीण आहे हे सगळे , पण मला आशा आहे”

आणि त्या दिवशी त्यांची एक खास , जवळची मैत्रीण त्यांच्या घरी आली ती स्थळ घेऊनच

“ सुनिता , पहिल्यांदा देवापुढे साखर ठेव ,आणि ताबडतोब इकडे येऊन बस”

त्यांनी काहीही न विचारता साखर ठेवली देवापुढे. “ बोल काय एवढी आनंदी दिसत आहेस”

“स्थळ घेऊन आले आहे आपल्या पायलसाठी”

आनंदाने त्यांनी तिला टाळी  दिली “ काय  सांगतेस ?, काय करतो मुलगा ?, कसा आहे दिसायला , आणि काही व्यंग … म्हणजे असणारच , आणि कुठे राहतो ?”

“ अगं हो … हो दमाने घे … सगळं सांगते . मुलगा राहतो टिटवाळ्याला , त्यांचे स्वतःचे घर आहे , एक मोठा भाऊ आहे लग्न झालेला , हा धाकटा तीस वर्षाचा आहे , त्याला डबल भिंगाचा चष्मा आहे , आपल्या पायलसारखाच मंदमती आहे , दहावी शिकला आहे पण , एका डॉक्टरकडे काम करतो कंपाउंडरचे . त्यांना आपली पायल खूप आवडली , लगेच होकार दिला आणि ह्या रविवारी येत आहेत बघायला तिला”

सगळं एका दमात तिने सुनीताताईना सांगितले . “आता पाहिला चहा पाज”

आणि रविवार उजाडला . संध्याकाळी पाच वाजता सगळी मंडळी पायलला बघायला आली . पिवळ्या कलरची सुनिताताईचीच एक साडी ती नेसली होती , आणि सुंदर दिसत होती . पण तिच्यात असलेले न्यून तिच्या चेह-यावर जाणवत होतेच . चहा , पोहे आणि सगळे सोपस्कार झाले . मुलगा दिसायला साधारणच होता . तोही चेह-यावरून मतीमंद जाणवत होता .

इकडे तिकडे बघत हळुच पायलकडे जाणारी त्याची नजर वेडेपणाची झाक दर्शवित होती . मोठा भाऊ खूप शिकलेला होता , त्याची बायको आणि एक मुलगी ,आणि आई असे सगळेजण आले होते .

“आम्हाला पसंत आहे हो पायल तुमची , आमचा शिरीष तर अगदी साधा आहे , तिला कसलाच त्रास नाही होणार . तिला जपेल ,काळजी घेईल , आणि काही अडचण आली तर आहोतच आम्ही सगळे , कधी करायचे लग्न सांगा …. आणि हो साधेच करूया , उगाच कशाला लोकाना काहीबाही बोलायला संधी द्या , नाही का ?, तुम्हाला काय वाटते सुनिताताई ?”

“ अगदी बरोबर बोललात , साधेच करू लग्न , पण विधिवत , असे मला वाटते”

आणि पंधरा दिवसांनी लग्नाचा मुहूर्त ठरला . त्यांनी पायलसाठी सगळे दागिने केले. पाच साड्या घेतल्या . तिला पार्लर मध्ये पण नेऊन आणले . लोकांना कळलेच लग्नाचे . लपून राहणार नव्हतेच . काही काळजीपोटी म्हणाली , मुलाची नीट माहिती काढा , आपली पायल नादान आहे . काही उपहासाने काहीबाही  बोलले . पण त्यांनी दुर्लक्ष केले .

“आई , म्हणजे मी एकटीच जाणार त्यांच्या घरी राहायला ?. त्या मुलाला सांग कि आपल्या घरी यायला राहायला , मी नाही तुझ्या आणि बाबांच्याशिवाय तिथे एकटी राहणार . त्या जाड्या बाई मला कडक वाटतात , त्या मला मारतील , ओरडतील , तुझ्यासारखे प्रेम कोण करणार तिथे मला?” पायलच्या अश्या अनेक  प्रश्नांना उत्तरे देता देता सुनिताताईना खूप कठीण गेले . त्या रोज रात्री ती झोपल्यावर तिच्या डोक्यावरून हात फिरवत , तिच्या काळजीने रडत होत्या . माधवराव रोज समजावत होते त्याना . “सुनिता , फार कठीण जाणार आहे आपल्याला , मुळात जास्त काळजीच राहणार आहे सतत , तिथे पायल कशी राहील ?, तिला समजून घेतील का सगळे , ती घाबरणार तर नाही ना कधी रात्री अपरात्री ? , पण एक समाधान मानूया आपलं की  तिचं लग्न जमलं आणि चांगले आहे हो स्थळ , त्यामुळे तू नको काळजी करूस जास्त”

परागही आला आठ दिवस आधी सुट्टी घेऊन बहिणीच्या लग्नासाठी . त्याने तर आर्थिक भार सुद्धा उचलला .

आणि लग्नाचा दिवस उजाडला . दिवसभरासाठी त्यांनी पायलसोबत प्रत्येक गोष्टीसाठी , मदतीसाठी त्यांच्या बहिणीच्या मुलीला ठेवले होते . खरंतर पायल खूप उठून दिसत होती त्या शिरीषपुढे , पण केवळ adjustment म्हणून त्यांनी हे स्थळ पसंत केले होते, आणि पायल सुद्धा …… .

अगदी मोजकीच सख्खी माणसे होती लग्नाला . त्यामुळे तशी काहीच गडबड वगैरे झाली नाही .तसे सुरळीतच पार पडले लग्न .

पायलची पाठवणी केली गेली तेव्हा त्या , माधवराव हमसाहमशी रडले . आई बाबांना सोडून पायल आता टिटवाळ्याला राहायला जाणार होती एकटीच ..

कौलारू घर , समोर तुळशी वृंदावन , मोठं आंगण असलेलं घर पायलचा गृहप्रवेश झाला तेव्हा  खूप आवडले . त्यांना घरी पोचायला रात्रच झाली होती , त्यामुळे जेवून सगळेच झोपी गेले . पायल आणि तिच्या सासूबाई एकत्र झोपल्या . एक खोली तिच्या दिराची शुभमची  होती . आणि एक लहान खोली शिरीष साठी .

दुस-या दिवशी तिला सासूबाईनी उठवले आणि सगळे आवरून झाल्यावर सर्व घर दाखवले आणि घरातील सर्व गोष्टी कुठे असतात , त्या जागेवरच ठेवायच्या वगैरे सांगितले . त्यांचे यजमान म्हणजेच शिरीषचे वडील काही वर्षांपूर्वीच वारले होते . ह्या एका शाळेवर शिक्षिका होत्या . पण आता निवृत्त झाल्या होत्या , त्यांच्या एकंदर वागण्यावरून त्यांचे ह्या घरात वर्चस्व चालते असे दिसत होते .

शिरीष सगळे आटोपून आईला सांगून दवाखान्यात गेला . तो दुपारी जेवायला घरी येत असे .

“सासूबाई…. मी तुम्हाला काय म्हणू?”

“सासूबाईच म्हण”

“आमच्या शिवणाच्या ताईचे ना लग्न झाले ना , तर लग्नानंतर ती आणि तिचा नवरा फिरायला गेले होते हनिमूनला , आम्ही कधी जाणार?”

“हो का ?, तुला तर सगळेच माहित आहे , बघू हो कुठे जायचे ते , आधी चहा ठेव आपल्यासाठी , शुभमची बायको सुद्धा उठेल आणि तिच्या मुलीसाठी ताज्या दुधाची पिशवी तापवत ठेव फ्रीजमधली  , येतो न चहा ?

आपल्या प्रश्नाला नीट उत्तर न मिळाल्याने पायल जरा नाराजच झाली . “येतो , एवढंच म्हणून तिने चहाचे त्यांनाच किती ते विचारून आधण  ठेवले . तिच्या हाताची मेंदी ओली असतानाच तिला कामे सांगितली जात होती . नक्की तिला ह्या  घरात कश्यासाठी आणले होते त्यांनी त्याच जाणत होत्या .

नंतर त्यांनी पायलला हाताशी घेऊन सर्व स्वयंपाक केला . अनुया , शुभमची बायको , नोकरी करत होती , आणि मुलीला सुमित्राताईच सांभाळत होत्या . आणि आता त्यांना हाताशी एक माणूसही मिळाले होते पायलच्या रुपात मदतीला .

शिरीष दुपारी येऊन जेवून गेला तो रात्री थेट नऊ वाजता आला , तेव्हा पायल दिवसभर सगळी कामे करून बिचारी थकून पेंगायला लागली होती . सुमित्राताई तिला म्हणाल्या “ अगं इतकी झोप येते आहे तर , जेव आणि झोप जा माझ्या खोलीत . बिचारी जेवून खरेच झोपून गेली .

आणि असे जवळजवळ रोजच घडायला लागले .

सुनिताताई रोज फोनवर पायलला  सगळे विचारायच्या तेव्हा त्यांना हे सगळे ऐकून काळजी वाटायला लागली . लग्न तरी कशाला केले ह्या बाईने मग मुलाचे आपल्या? तरी त्या पायलला समजवायच्या “ तुला यावे ना सगळे म्हणून कामे सांगत असतील हो त्या , एकदा आले सगळे तुला कि बघ कसे कौतुक करतील तुझे” .

नवरा बायको मधील नाते , त्यांच्यातील सबंध ह्या विषयी त्यांनी तिला लग्नाआधी सगळे सांगितले होते .

पायल आणि शिरीष जरी कमी समजूत असलेली दोन मनं होती , तरी त्यांना भावना होत्याच . इतके दिवस लग्न होऊन झाले तरीही त्यांना एकमेकांशी धड बोलताही आलं नव्हतं .

जवळजवळ एक महिना झाला हे असेच चालू होतं . एक दिवस दुपारी जेवण झाल्यावर सुमित्राताईना त्यांच्या एका बहिणीकडे त्याच्या मुलाच्या लग्नाच्या तयारीसाठी जायचे होते .

शिरीष दुपारी घरी जेवायला आल्यावर थोडे बरे नाही म्हणून परत दवाखान्यात गेलाच नव्हता .

सुमित्राताई बाहेर गेल्यामुळे ते दोघेच घरात होते . पायल टी व्ही लावून बसली होती . आणि शिरीष त्याच्या रूममध्ये झोपला होता . त्याने पायलला हाक मारली “ पायल अमृतांजन कुठे आहे , जरा देशील का ?, डोकं खूप दुखत आहे .

पायल लगेच त्याला अमृतांजन घेऊन त्याच्या खोलीत आली  “ मी देऊ का लावून , मी आई बाबांना पण लावायचे डोकं दुखल्यावर”

शिरीषला फार बरे वाटले “ हो हो दे कि लावून”

बाम लावत असताना शिरीष तिच्याकडे डोळे भरून बघत होता . “ तू खूप सुंदर आहेस पायल”

“हो , माहित आहे मला”

“ आपण दोघे नवरा बायको आहोत”

“पण मग आपण अजून ते हनिमूनला का नाही गेलो?”

“मी सांगेन आईला  , आता खूप दिवस झाले लग्न होऊन , निदान आम्हाला माथेरानला तरी पाठव”

“हो तुम्ही सांगाच , खूप मज्जा असते हनिमूनला , फोटो काढायचे , खूप फिरायचे आणि अज्जिबात काम करायचे नसते तिथे  , फक्त मज्जा”

“तुझा हात किती मऊ आहे पायल , माझं डोकं थांबलं पण दुखायचं….” असे म्हणत त्याने तिला जवळ ओढले . एक स्त्री सुलभ लज्जा तिच्या चेहऱ्यावर पसरली .” ओ सोडा ना … सासूबाई आल्या तर ओरडतील मला आणि तुम्हाला”

“ती गेली आहे लग्नघरी , नाही यायची इतक्यात” असे म्हणून ती नको नको म्हणत असताना त्याने तिला जवळ ओढले आणि त्या दुपारी पायल खऱ्या अर्थाने शिरीषची झाली .

ग्लानीत असलेली पायाल चार वाजता  अचानक गडबडून जागी झाली , पटापट सगळे आवरून चहाचे आधण ठेवायला गेली रोजच्याप्रमाणे . शिरीष उठला चादर  वगैरे नीट केली आणि चहा प्यायला आला . तेवढ्यात सुनिताताईंचा फोन आला . घडलेला सगळा प्रसंग पायलने आईला सांगितला . आई खूप खुश झाली , कि आज पायलला थोडा तरी नवऱ्याचा सहवास लाभला ,ज्यावर तिचा खरा हक्क होता . त्यांनी पायलला बजावून सांगिलते , कि त्याना ह्यातले काहीही सांगू नकोस अज्जिबात .

सुमित्राताई साधारण पाच वाजता घरी आल्या . त्यांना घडलेल्यापैकी काहीच कळले नाही पण पायल वेगळीच भासत होती नक्कीच , स्वत:च्या धुंदीत असलेली .

त्यांना वाटले असेल अशी होत मध्ये मध्ये . त्यांना हाताशी एक मुलगी मिळाली होती कामाला आणि पुढे शिरीषची काळजी घ्यायला , ह्याच आनंदात त्या होत्या .

दोन महिने झाले तरी पायलची पाळी आली नाही तेव्हा सुमित्राताई थोड्या घाबरल्या . इतकं डोळ्यात तेल घालून आपण काहीही घडून दिले नाही , आणि हिने काही गडबड तर नाही ना  केली, ह्या विचारांनी त्या घाबरल्या . ताबडतोब एका ओळखीच्या लेडी डॉक्टरकडे घेऊन तिची तपासणी केली आणि त्या उडाल्याच , पायल प्रेग्नंट होती .

घरी गेल्यावर तिला खोदून खोदून विचारले तेव्हा पायलने त्या दिवशी घडलेला दुपारचा प्रसंग सांगितला . त्यांनी डोक्यावर हात मारून घेतला . आता काय करावे काही सुचेना त्यांना . संध्याकाळी मोठी सून आल्यावर घडला प्रकार त्यांनी तिच्या कानावर घातला . ती ही फार गडबडली . “ अहो आई आपण लग्न करतानाच ठरवले होते , मुल वगैरे भानगड नसेल  तरच ह्याचे लग्न करायचे . आता काय ह्या दोन वेड्या माणसांच्या वेड्या मुलाची जबाबदारी पण आम्ही घ्यायची का पुढे?”

“अगं नाही असं होणार , मी आहे न तू नको घाबरुस”

“ ते बघा तुम्ही काय ते , पण अजून एक वेडं माणूस नकोय ह्या घरात” असे म्हणून  ती रागाने आत निघून गेली .

सुनिताताईंना काही सुचतच नव्हते कि काय करावे आता ? हे बाळ तर आपल्याला नको आहे . मोठी सून बरोबर बोलत आहे , ह्या वेडीच्या पोटी वेडं मुलंच जन्माला येणार . त्यामुळे काहीही करून हे न यावं म्हणून काहीतरी करायला हवे .

त्या दिवशी सुनिताताई आणि माधवराव ही गोड बातमी कळल्यावर पायलला भेटायला टिटवाळ्याला येऊन गेले . येताना खूप खाऊ आणि पायलसाठी एक साडी पण घेऊन आल्या होत्या त्या .

चारपाच दिवसांनी त्यांची एक मैत्रीण आली होती घरी तेव्हा त्यांनी ही समस्या तिला सांगितली .” तुला सांगू का सुनिता , एक बाई आहे माझ्या ओळखीची , तिकडे त्या आदिवासी पाड्यावर राहते , ती म्हणे देते असली औषधे , तू सांगत असलीस तर आणते”

“पण काही वेगळा त्रास बीस नाही ना होणार तिला”

“ अगं नाही होत काही , खूप लोकं नेतात”

“आण मग उद्या”

“पायल तू बस बाळा , आज खूप दमली आहेस , मी करते चहा , असे म्हणून त्यांनी चहा करून पायल आणि स्वतःसाठी चहा करून घेतला .

“सासूबाई आज चहा वेगळा लागत आहे ना ?, तुम्ही केलात म्हणून असेल” , असे म्हणून चहा तिने पिऊन टाकला . त्या खरेतर घाबरत होत्या , कि काय परिणाम होईल आपण करत असलेल्या उपायाचा , पण त्यांना करणे भाग होते , आपल्या मोठ्या मुलाच्या चांगल्या भविष्यासाठी . निदान तो सुखी असावा असे त्यांना वाटत होते . असे निष्पाप जीवाला मारणे आणि असे फसवणे हे नक्कीच चूक होते.

पण दोन दिवसांनी पायलच्या पोटात प्रचंड दुखायला लागले तेव्हा त्या तिला ताबडतोब डॉक्टरकडे घेऊन गेल्या . त्यांनी सांगिले की तिचा गर्भपात झाला आहे . पायल खूप रडायला  लागली “ “सासूबाई असे कसे झाले ?. मला हवे होते बाळ , काहीतरी करा ना प्लीज”

त्यांनी काही औषधे लिहून दिली ती पायल वेळेवर घेत होती , पण तिच्या तब्येतीवर फार परिणाम झाला त्या दिवसापासून . तिला सारखी चक्कर येत होती . उलट्या होत होत्या आणि सतत पोटात सुद्धा दुखायचे .

सुनिताताई तिला घरी घेऊन  गेल्या विश्रांतीसाठी . त्यांनाही  काहीच कळत नव्हते असे कसे झाले .

त्या दिवशी सुमित्राताई आल्या त्यांच्या घरी आणि म्हणाल्या “ ताई , झाले ते फार वाईट झाले , पण ही अशी आजरी मुलगी आम्ही कशी आणि किती दिवस सांभाळायची सांगा . माझी मोठा मुलगा सून म्हणाले ही घरात असेल तर आम्ही इथे राहणार नाही , आम्हाला घराचा हिस्सा द्या . एक वेडा मुलगा आहेच तुमचा आधीपासून आणि त्यात ही वेडी मुलगी सहनही करत होतो , पण आजारी माणूस नको आहे आम्हाला,  आणि तुम्हीही  बघत आहात पायल किती आजारी असते , तर आम्हाला असे वाटत आहे कि आता हे नाते आपण जास्त नको ताणायला .आम्ही कोर्टात घटस्पोटाची नोटीस दिली आहे”

“ ताई ….. काय बोलत आहात तुम्ही , ती काय आजारी राहणार आहे का जन्मभर , होईल कि बरी , मी तिला खडखडीत बरी करते , तुम्ही मागे घ्या नोटीस”

“नाही , आता हे शक्य नाही”

“मी तुमच्या पाया पडते” , असे म्हणून त्या खाली वाकायला आणि परागने घरात पाउल टाकायला एकच गाठ पडली .

“आई , अगं काय करते आहेस तू हे , मागे हो आधी” असे म्हणून  त्याने आईला मागे केले

“सुमित्राबाई , माझी बहिण जड नाहीये मला झालेली , आणि मला तुमचे सगळे उपद्व्याप कळले आहेत  , माझा  एक मित्र राहतो टिटवाळ्यात त्याने सगळी माहिती काढली आहे तुमची . तुम्ही कसे माझ्या बहिणीला राबवून घेत होतात , आणि कसे औषध देऊन तिचा गर्भ कसा पाडलात , आणि याद राखा ह्या घरात परत पाउल टाकलेत तर , आता  डायरेक्ट कोर्टात भेटू घटस्पोटाच्या दिवशी , निघा आता “असे म्हणून हात जोडून उभा राहिला

“जातच आहे , मी म्हणते मुल कशाला हवे अश्या वेड्या माणसांना , राहिली असती अशीच घरी तरी आम्ही सांभाळली असती , वेडीच्या पोटी काय शहाणे मुल जन्माला येणार होते का ?उगाच आवाज चढवू नका ह्या वेडीसाठी”

“प्लीज तुम्ही  निघता का आता , मला काहीच बोलायचे नाहीये”

त्या निघून गेल्यावर सुनिताताई परागला जवळ घेऊन हमसाहमशी रडायला लागल्या

“अगं आई काय रडतेस , बरेच झाले ना त्यांनी पायलला इथे आणून ठेवले , ती सुखरूप तरी आहे , ह्या विचित्र बाईने पायलला मारायला सुद्धा कमी नसते केले . उलट तुला हायसे वाटायला हवे”

घटस्पोट होऊन दोन महिने झाले . पायल सुद्धा बरी झाली . पराग पुण्यात स्थायिक झाला आणि तो आई बाबा आणि पायललासुद्धा नेणार होता काही दिवसांनी  , पण त्यांनाच जायचे नव्हते . जोपर्यंत आम्ही आहोत ,आम्हाला काही जड नाहीये आमची मुलगी असे म्हणून त्याच गावात ते राहत होते .

येणारी प्रत्येक दुपार पायलला खायला उठायची . ती ही एक माणूस होती , भावना तिलाही होत्या . तिला वाटायचे शिरीषला फोन करावा , कसे आहत  विचारावे , पण केला नाही .

रोज दुपारभर खिडकीत बसून समोरच्या सोसायटीत राहणाऱ्या लहान मुलांना खेळताना बघत बसायची आणि आईला म्हणायची  “आई मला पण एक गोड बाळ झालं असतं आणि ते ही त्या कुरळ्या केसांच्या मुलीसारखे असते ना गं दिसायला?”

त्या फक्त हं करून तिला थोपटत बसायच्या , डोळ्यातील आसवे न दाखवता , तिच्यापासून लपवत . शांत हो… शांत हो … म्हणत …..

……….समाप्त ……….

Image by PublicDomainArchive from Pixabay 

Chapekar Manasi

Chapekar Manasi

कविता ,लेख ,ललित आणि कथा लिखाण,नवीन पदार्थ तयार करणे आणि खिलवणे म्हणजेच एकंदर स्वयंपाकाची आवड , अभिवाचन, आणि गाण्याची आवड आहे ,आणि हे उत्तम जमते . ओंजळीतील शब्दफुले ह्या स्वलिखित आणि स्वरचित कवितांच्या कार्यक्रमाचे 40 कार्यक्रम संपन्न अनेक कवी संमेलनात आमंत्रण आणि कथेला बक्षिसे प्रभात वृत्तपत्रात दर शुक्रवारी अस्मिता ह्या सदरात लेख प्रकाशित .तसेच अनेक वृत्तपत्र आणि मासिकांत लेख ,कथा ,कविता प्रसिद्ध निसर्गाचे फोटो काढण्याची आवड ,कारण फोटो ग्राफरची नजर लाभली आहे.

2 thoughts on “पायल….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!