माझी टाचदुखी-२
भाग १ ची लिंक– माझी टाचदुखी-1
माझी टाचदुखी-२
काही घटना आपल्याला तारीखवार लक्षात राहतात. माझ्या टाचदुखीच्या काळातील बरेच छोटे मोठे प्रसंग असेच तारखांसहित माझ्या लक्षात राहीले आहेत. कधीही न विसरता येण्याजोगा एक मोठा अनुभव मला मिळाल्याने कदाचित असे घडले असावे. असो.
11 ऑगस्टला टाचेत इंजेक्शन घेतल्यानंतरची गोष्ट- मी यापूर्वी कधीही घरात चप्पल वापरली नव्हती. त्याची कधी विशेष गरजही वाटली नव्हती. पण आता डॉक्टरांनी सुचवल्याप्रमाणे घरातही मऊ चप्पल वापरणे मी सुरू केले. नियमित औषधी घेणेही सुरूच होते. औषध घेतले की काही काळ बरे वाटायचे. मात्र हे बरे वाटणे वरवरचेच ठरायचे आणि दुखणे पुन्हा सुरू व्हायचे. हळूहळू एक लक्षात आले की आपली डावी टाच दुखणे पूर्णपणे थांबले आहे पण ज्यात इंजेक्शन घेतले ती उजवी टाच मात्र जरा जास्तच दुखते आहे. शिवाय हे दुखणे नेहमीच्या टाचदुखीपेक्षा थोडे वेगळे आहे हेही जाणवत होते. पण आधीच्या आणि नंतरच्या दुखण्यात काय फरक होता हे मला नेमकेपणाने सांगता येत नव्हते. त्याचे वर्णन करता येत नव्हते.
काही वेळा आपल्याला आपले दुखणे नेमकेपणाने कळत नाही आणि त्यावेळी आपण आपलीच अक्कल चालवतो. दुखण्याचे कुठलेतरी कारण शोधतो आणि सगळा दोष त्यावर लोटून देऊन मनाची समजूत घालतो. हे असे वागण्यामागे अनेकांची अनेक वेगवेगळी कारणे असू शकतात. माझ्याही अशा वागण्याचे कारण आताच्या निवांत वेळात मी शोधण्याचा प्रयत्न केला आणि मलाच मी विचारलं की स्वतःच्या दुखण्यावर इतका खर्च केला गेला आहे हा सर्वसामान्य बाईसारखा अपराधबोध मी मनातल्या मनात बाळगला होता का? माझ्या दुखण्याचा मी बाऊ करते आहे असे घरातल्यांना वाटू नये असा माझा धडपडा चालला होता का? माझे दुखणे किरकोळ असून मी ते सहन करू शकते हा फाजील आत्मविश्वास मला होता का? आणि तसे असेल तर मी मूर्ख आहे का?
आत्ता विचार करताना वरील सर्व प्रश्नांची उत्तरे होकारार्थी मिळत असली तरी त्या दुखण्याच्या काळात मी स्वतःला यातलं काहीही विचारलं नव्हतं. मी माझ्या उजव्या टाचेच्या दुखण्याचा दोष ‘इंजेक्शन’ वर ढकलून वेदना सहन करत माझा दिनक्रम विनाअडथळा सुरू राहील याचा आटापिटा करत होते.
डॉक्टरांनी मला पंधरा दिवसानंतर पुन्हा तपासणी करण्यासाठी यायला सांगितले आहे इतकेच मी लक्षात ठेवले होते. काही दुखले तर त्याआधी येऊच नको असे काही त्यांनी म्हंटले नव्हते हे मी लक्षातही घेतले नाही. दुखणे वाढत होते आणि मी पंधरा दिवस कधी संपतात याची वाट बघत होते.
हे सगळे घडत असताना शाळेत पंधरा ऑगस्टनिमित्त झेंडावंदनाचा कार्यक्रम झाला. शाळेच्या बारा वर्षांच्या माझ्या वास्तव्यात मी प्रभातफेरीत गेले नाही असे यावेळी पहिल्यांदा घडले होते. 16 तारखेला शाळेतील मदतनीसने तिच्या घरी नेऊन चुलीतल्या निखाऱ्यांवर मला टाचा शेकून घ्यायला लावल्या. मला थोडे बरे वाटले. कुणी काही सांगावे, मी ते करावे, जरा वेळ बरे वाटावे आणि पुन्हा दुखू लागावे हा आता नित्याचाच क्रम झाला होता. दिवस पालटत होते आणि उजव्या टाचेच्या दुखण्यात कमतरता नव्हती. ते दिवसेंदिवस वाढतच होते.
अशातच एका कार्यक्रमानिमित्त 18 ते 21 ऑगस्ट दरम्यान आधी अमरावती आणि नंतर माहेरी मोर्शी असा बाहेरगावी दौरा झाला. त्यादरम्यानच्या तीन रात्रीत सकाळी सकाळी कधीतरी डोळा लागायचा. जाग आली की आधी टाचेच्या दुखण्याची जाणीव व्हायची आणि नंतर भोवताल जाणवू लागायचा. माहेरच्या दोन दिवसांच्या वास्तव्यात अण्णांनी (माझ्या बाबांनी) स्वतः माझी टाच मीठाने शेकून दिली, रुईची पाने तोडून आणून पायाला बांधून दिली. पण उजवी टाच कोणत्याही उपायाला दाद देईल तर शपथ ! सर्वांशी बोलताना माझ्या चेहऱ्यावर हसू होते पण आतून माझे काय होत होते ते फक्त मलाच माहीत होते. वेदनांच्या सर्वोच्च टोकावर असताना बोलता बोलता मी -“मला नं ही टाच चिरून फोडून त्यातले दुखणे बाहेर काढून फेकावेसे वाटते आहे.” असे म्हंटल्याचे मला आठवते.
21 तारखेला घरी परतल्यावर रात्र जवळपास जागून काढली. पण माझे जागरण झाले आहे हे घरात कुणाला कळू सुद्धा दिले नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजे 22 ऑगस्टला शाळेत न जाता एका मिटींगला जावे लागले. मिटिंगमध्ये मी हजर असूनही मला काहीही कळले नव्हते. माझे सारे लक्ष टाचेत. अंगात दुखणे आणि बाहेर मुसळधार पाऊस !… मिटिंग संपून घरी आल्यावर थोड्या वेळाने पायावर किंचित सूज आल्याचे लक्षात आले. टाच जास्तच ठणकू लागली. आता दुखण्याच्या पोतात झालेला बदल मला पहिल्यांदा वर्णन करता येऊ लागला. माझी टाच ठणकते आहे हे मला तीव्रतेने जाणवू लागले आणि पंधरा दिवस पूर्ण होण्याआधीच पुन्हा एकदा वाशीमला आर्थोपेडिककडे मला जावे लागणार आहे हे मला लक्षात आले. पण 22 तारखेला पावसामुळे ते शक्य नव्हते त्यामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजेच 23 तारखेच्या सकाळी शाळेत रजेचा अर्ज टाकून दवाखान्यात जाऊया असे आम्ही ठरवले.
22 तारखेची ती रात्र सकाळ होण्याची वाट बघण्यात टक्क जागी राहून मी कशीबशी काढली. जागरणाची ही माझी दुसरी रात्र होती. आधीच्या जागरणाने आणि दुखण्याने मी फार थकून गेले होते. डोळे जडजड होत होते आणि तरीही झोपता येत नव्हते. दरम्यान रात्रीतून कितीवेळा मला रडू कोसळले. आपल्या टाचेतून जोरजोरात कुणीतरी तडाखे देत असल्याचा अनुभव फार वाईट्ट होता. मला झोपायचे होते पण झोप येत नव्हती. पलंगाखाली पाय सोडून बसलं की थोडं बरं वाटायचं. जडशीळ झालेल्या डोळ्यांवर झोपेची झापड यायची. किंचित डुलकी लागायची पण त्याच डुलकीचा झटका मानेला बसून पुन्हा अंगभर टाचेच्या दुखण्याची जाणीव पसरायची. माझ्या सगळ्या जाणीवा फक्त टाचेत गोळा झाल्या होत्या; किंवा संपूर्ण शरीरात फक्त आणि फक्त टाचच अस्तित्वात आहे असं विचित्र फिलिंग मला येत होतं. आता उद्या सकाळी उठल्यानंतर डॉक्टरांना गाठू आणि ह्यातून सुटू असा विचार करत मी भिंतीला टेकून रात्रभर बसून राहिले.
23 तारखेच्या सकाळी मला उभे राहणेसुद्धा दुरापास्त झाले. “आजच्या दिवस तुम्ही स्वयंपाक करा.” असे रडत रडतच सासूबाईना सांगून मी माझ्या खोलीत बसून राहिले. ना मुलांच्या शाळेच्या तयारीत लक्ष घातले, ना स्वयंपाकात आणि ना त्यांनतर जेवणात.
त्यावेळी मी माझ्यात तरी कुठे होते??
माझ्या भोवती फक्त माझी टाच होती… माझी भयानक दुखरी उजवी टाच…
क्रमश:
पुढील भागाची लिंक– माझी टाचदुखी-3
Image by jacqueline macou from Pixabay
Latest posts by Vinaya Pimpale_w (see all)
- जिगसॉ जिंदगी पत्र क्रमांक 8 - May 20, 2021
- फुलपाखरू - April 13, 2021
- पोटॅटो पिनव्हील - March 27, 2021
Pingback: माझी टाचदुखी-1 – LekhakOnline – Excellent Marathi Articles
Pingback: माझी टाचदुखी-3 – LekhakOnline – Excellent Marathi Articles