माझी टाचदुखी-3

आधीच्या भागाची लिंक– माझी टाचदुखी-२
माझी टाचदुखी-3
अखेर सुजलेला पाय आणि ठणकणारी टाच घेऊन 23 ऑगस्टला मी दुसऱ्यांदा वाशीमला पोचले. या खेपेला मात्र  पूर्वीच्याच  सिक्युरा हॉस्पिटलमध्ये डॉ राठोड ह्यांच्याकडे जाण्याऐवजी मी डॉ तोष्णीवाल ह्या नवीन अर्थोपेडिक डॉक्टरकडे गेले. मला वाटलं डॉक्टर बदलल्याने मला बरं वाटेल. पण हाय रे दैवा !!… इथेही माझी चूकच झाली.
बरेचदा असे घडते ना आयुष्यात की आपल्याला जिथे जायचे असते त्या ठिकाणी पोचणाऱ्या मुख्य मार्गाला अनंत फाटे फुटतात. आपल्याला मात्र त्यातून आपला योग्य मार्ग निवडावा लागतो. एका चुकीच्या फाट्यावर ठेवले गेलेले एक पाऊल आपल्याला कुठल्या कुठे भरकटवून आणू शकते. तसेच घडत होते माझ्याबाबतीत. टाच दुखत असताना लवकरात लवकर पुन्हा दवाखाना गाठला असता तर दुखणे ह्या थराला गेलेच नसते. आता दुखणे वाढल्यावर परत दवाखान्यात जाताना ज्या डॉक्टरांकडुन मी टाचेत इंजेक्शन घेतले त्यांच्याकडेच जर मी पुन्हा गेले असते तर माझ्या सुजलेल्या टाचेवर लवकर योग्य उपचार सुरू झाले असते. पण नाही…. तसे व्हायचे नव्हते. अजून तर फार काही घडणे बाकी होते. अजून मला कितीतरी भरकटायचे होते. मी वेगळ्या डॉक्टरांकडे गेले.
डॉ तोष्णीवाल ह्यांनी माझा पाय पाहिला. मला दिल्या गेलेल्या औषधींचं प्रिस्क्रिप्शन पाहिलं. टाचेला हात लावून पाहिला तेव्हा त्यांना टाचेचा भाग गरम असल्याचे जाणवले. “इन्फेक्शन आहे” असे सांगत त्यांनी आधीची औषधी ‘नका घेऊ’ म्हणून सांगितले आणि एक वेदनाशामक इंजेक्शन मला टोचले. तीन दिवसांसाठी नवीन औषधी लिहून दिल्या. ह्या नव्या औषधींनी टाच पिकेल किंवा सुकेल असे त्यांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या इंजेक्शनने पायातली ठणक थोडी कमी झाली. दवाखान्यातून बाहेर पडेपर्यंत चार वाजत आले होते. निलेशच्या शाळेतील बिघडलेला संगणक वाशीमला दुरुस्तीला टाकलेला होता, तो पाच वाजता मिळणार होता.  मग हाताशी असलेल्या एका तासात आम्ही वाशिम येथील ग्रामदेवता असलेल्या  बालाजीच्या पुरातन मंदिरात थोडा वेळ जाऊन बसलो. मंदीराच्या गाभाऱ्यात बालाजीला मनोमन हात जोडले आणि बाहेर आल्यावर प्रदक्षिणा मारण्याचेही त्राण अंगात नसल्याने मी बाकड्यावर बसून राहिले.
तिथे आम्ही एखादा तास बसलो असू. मंदिराबाहेरील बाकड्यावर बसल्या बसल्या गेल्या दोन रात्रींची डोळयांत साठून येणारी झोप माझ्या सगळ्या जाणिवा बोथट करत होती. आजूबाजूला काय चालले आहे काही कळत नव्हते. डोळे जडजड पडत होते. वेदना काही काळ थांबल्याने झोपेचा शीण डोकं वर काढू लागला. कधी एकदा घरी जाऊन ताणून झोपते असे मला झाले होते. झोपेने तारवटलेल्या डोळ्यांना फक्त घर आठवत होते. त्या एका तासात ना मी जागी होते ना झोपलेली. सुषुप्तीच्या एका वेगळ्याच अवकाशात तरंगत असल्यासारखे माझे अस्तित्व भोवताल विसरून त्या मंदिराबाहेरील बाकड्यावर आपली जागा व्यापून होते.
पाच वाजता शाळेचा दुरुस्त झालेला संगणक घेऊन आम्ही घरी परत यायला निघालो. परतीच्या रस्त्यावर असताना हळूहळू वेदनाशामक इंजेक्शनचा अंमल उतरू लागला आणि ठणक पुन्हा वाढू लागली. घरी पोचेपर्यंत ठणक पुन्हा ‘जैसे थे’ झाली.
माझ्या टाचेत रक्त आणि मांस आहे की आतून आगीचा गोळा आहे असे वाटावे इतकी आग आणि ठणक !… ठणक सहन न होऊन मी रडू लागले. अगदी भेसूर !!… घरात कुणाला काही कळेना की आता नेमके करावे तरी काय. माझी दोन्ही मुलं माझं रडणं पाहून ऐकून भेदरली होती. आईला काय झालं हे न कळून त्यांचे चेहरे मलूल पडले होते. दोघेही मला बर्फाचे गोळे आणून देत होते. टाच बर्फाने शेकून देत होते. हवं नको ते हातात देत होते. त्यांच्याकडे आणि एकूणच घरातल्या प्रत्येकाकडे बघून मला कसेसेच होत होते. मी मला सावरले. आईंनी बनवलेल्या जेवणाचे दोन घास खाऊन नवीन औषधी घेतली.
औषधीने मला बरे वाटते आहे असे भासवले. सगळ्यांची निजानीज झाल्यावर माझी टाच आणि मी दोघीही जाग्या होतो. ती ठणकत होती आणि मी रडत होते.
अगदी रात्रभर….
क्रमश:
पुढील भागाची लिंक– माझी टाचदुखी- ४
Image by jacqueline macou from Pixabay 
Vinaya Pimpale_w

Vinaya Pimpale_w

सहायक अध्यापिका (इयत्ता पहिली ते चौथी) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खापरी कान्होबा जिल्हा वाशिम पत्रमालिका, कथा, कविता आणि गझललेखन. मित्रांगण, विवेक आणि रत्नागिरी एक्स्प्रेस इत्यादी दिवाळी अंकात कथालेखन केले आहे. दैनिक दिव्य मराठी, पुण्यनगरी तसेच विवेक साप्ताहिक, युवाविवेक इत्यादींमध्ये लेख प्रसिद्ध. 'भूक' ह्या लघुतमकथेला लोकप्रिय लघुतमकथेचा तसेच, 'जाग' ह्या कथेकरिता सर्वोत्कृष्ट लघुकथा लेखनाचा पुरस्कार प्राप्त.

8 thoughts on “माझी टाचदुखी-3

  • Pingback: माझी टाचदुखी-२ – LekhakOnline – Excellent Marathi Articles

  • September 19, 2020 at 10:33 am
    Permalink

    It’s very informative… छान लिहिले आहे… पुढे काय झाले याची उत्सुकता आहेच.. फारच सहन केले आहे तुम्ही.

    Reply
    • September 19, 2020 at 10:34 am
      Permalink

      मी पहिल्या भागापासून वाचत आहे. टाच दुखी बद्दल खूप वेळा ऐकले आहे. पण नक्की काय होते हे तुमच्या लिखाणातून समजत आहे

      Reply
      • September 19, 2020 at 10:42 am
        Permalink

        तुमच्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद

        Reply
  • September 19, 2020 at 10:50 am
    Permalink

    छान लीहले आहे, पुढे काय होईल याची उत्सुकता… मला स्वतःला टाच दुखी आहे काही महिन्यांपासून..😅

    Reply
    • September 19, 2020 at 11:54 am
      Permalink

      काळजी घ्या. टाचदुखीकडे दुर्लक्ष करू नका. आणि शक्यतो आयुर्वेदिक उपचार घ्या.

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙂

      Reply
      • September 20, 2020 at 7:08 pm
        Permalink

        बाप रे.. एखादं छोटंसं वाटणारं दुखणं सुद्धा किती रडवू शकतं.. त्रास देऊ शकतं.. 🥺

        Reply
  • Pingback: माझी टाचदुखी- ४ – LekhakOnline – Excellent Marathi Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!