धडाकेबाज- भाग २
आधीच्या भागाची लिंक– धडाकेबाज- भाग १
धडाकेबाज- भाग २
******* गुड जॉब कॅप्टन मीरा !!! मेजर काद्री म्हणाले .
” thank you सर !! प्लॅन मोठा आहे सर यांचा ! काय म्हणतेय शीना ? “
” तूच विचार . तिला न्यायला जे तिचे दोन हस्तक आले होते . सगळ्यांना ताब्यात घेतलंय . वेल डन लेडी !! “
कॅप्टन मीरा ने सपासप तोंडावर
पाणी मारले . तीन दिवस त्या घाणेरड्या जेल मध्ये काढल्याने तिला स्नानाची गरज वाटत होती .
” चला मॅडम , गाडी तयार आहे .” आवाज आल्या बरोबर तिने चमकून पाहिले . कॅप्टन अंगद हसत उभा होता .
” तू ? चंदिगढ वरून केव्हा
आलास ? “
” आज , रादर आत्ताच . लगेच तुमच्या ड्युटीवर हाजीर ! ” तिने त्याच्या डोळ्यात खोल पाहिले .
” असं बघू नको कॅप्टन , प्यार हो
जाएगा “
” चल लवकर ” ती हसून म्हणाली .
” मीरा , एकूण किती जण पकडलेत ? “
” सध्या तीन आणि आधी एक असे चार जण . अरे , तिला सोडवून आणण्यासाठी काल झिया कडे सामान पाठवण्यात आले होते . रात्री मी ते शिताफीने चोरले . त्यात एक दोर , छोटे ड्रिल मशीन आणि खास बूट होते . ज्या सेल मध्ये झिया जाणार होती , तिथे तिच्या ऐवजी मीच गेले . शिनाला एव्हढेच माहीत होते की तिला आज पळून जाण्यास मदत होणार आणि बाहेर दोन जण गाडी तयार ठेवणार . तिला मदत करणारी कोण हे तिला कुठे माहीत होते ? बाहेर जगाच्या दृष्टीने शीना जेल मधुन फरार !! “
” हो , पहाटेपासून च बातम्यांनी गोंधळ घातलाय . जेल प्रशासनाची ची थु थु होतेय . “
” होऊ देत . नंतर खुलासा होईलच .”
******** मिलिटरी इंटेलिजन्स ऑफिस मध्ये मेजर काद्री , लेफ्टनंट जन. प्रसन्ना , अंगद आणि दोन जण बसले होते .
मीरा सांगू लागली ,
” सर , ताहीर दुराणी ची बहीण झिया काही विशिष्ठ हेतू ने जेल मध्ये भरती झाली . शीना झोरावर ही शकील ची हस्तक . हिला जेल मधून पळवण्यासाठी दोघे एकत्र आले . एरवी शकील आणि दुराणी कट्टर शत्रू .
झिया शीना ला पळायला मदत करणार , आणि तिला नेण्यासाठी दोन जण जेल मागे वाट बघणार असा प्लॅन होता . सर , आपली माणसं किती दिवसांपासून शकील च्या मागावर होती . “
” शीना त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही म्हणजे गडबड आहे , हे त्यांच्या लक्षात येईलच ना ! ” मेजर काद्री म्हणाले .
” सर , बाकी जगासाठी शीना जेल मधून फरार आहे . मात्र तिचाआणि साथीदारांचा काहीच पत्ता नाही . आपण त्यांना गुप्त ठिकाणी ठेवणार .
शकील आणि दुराणीला काही तास तरी लागतील सत्य समजायला . आपल्याला तीच वेळ ‘कॅश’ करायची आहे . “
” यांचा खरा बाप कोण ते पहा . शीना ला इथून पळवण्यामागचे कारस्थान समजलेच पाहिजे . इट मस्ट बी अ बिग गेम !! “
******** दुबईतील पंचतारांकित हॉटेल . एका आलिशान सूट मध्ये
झुल्फि फारुख आपल्या साथीदारांवर आग ओकत होता . आपल्या प्लॅन बद्दल भारतीय हेरांना कशी खबर लागली याचे पोस्टमार्टेम चालू होते .
” दिलावर , पहिला प्लॅन पूर्णपणे अबोर्ट करा . बाकी सारे ठरल्यासारखेच . “
” हुजूर , कळवतो लगेच “
” ते शकील आणि दुराणी नुसतेच माझ्या पैशावर ऐश करत आहेत . फोन लाव त्यांना !! . ” झुल्फि चवताळला होता . त्यांनी खूप अभ्यास करून प्लॅन आखला होता . आधी भारतीय बँक लुटून प्रचंड रक्कम उभी करायची आणि मग रशिया कडून गुप्तपणे अत्याधुनिक शस्त्र खरेदी करायचे , आणि भारतात प्रचंड मोठे घातकी हल्ले करायचे असा डाव होता . त्यासाठी शीना झोरावरच हवी होती . दिल्लीच्या जेल मधून कडेकोट पहाऱ्यातून तिला पळवण्याची तयारी केली होती . शीना अतिशय तल्लख , चपळ आणि ताकदवान हस्तक , जेल तोडून पळून तर गेली , पण अजून तीच्याकडून काहीच खबर नाही , हे कसं ? शकील माझ्याशी कुठला डाव तर नाही न खेळत आहे ? ….असे वाटत होते त्याला .
बँकेचा नकाशा , तिथपर्यंत केलेला भूमिगत सुरुंग , पेरलेली माणसे , त्यासाठी तयार ठेवलेल्या गाड्या , पैसा सगळं वाया जाणार ह्याची चीड आली होती त्याला .
*******शीना झोरावर आणि साथीदार यांना अतिशय गुप्तपणे एका निर्जन ठिकाणी बंदिस्त ठेवण्यात आले . त्यांचा पहिला घातक प्लॅन तर पूर्णपणे उघडकीस आला होता .
झुल्फि च्या हाताशी शकील आणि दुराणी सारखी माणसे होती हे भारतीय गुप्तचर विभागास माहीत होते . आणि अशातच एक भयानक खबर आली …..डिपार्टमेंट मध्ये खळबळ झाली …कॅप्टन अंगद आणि मीरा ला ताबडतोब चंदीगड ला बोलावण्यात आले होते .
मेजर काद्री गंभीर चेहरा करून बसले होते . प्रकरण गंभीर होते .
गेल्या दोन वर्षभर नकली नोटांमुळे देश त्रस्त झाला असतांनाच खबर मिळाली होती की नवीन छापलेल्या नोटांच्या स्ट्रेन्सिल्स ( प्लेट्स ) देखील नुकत्याच तयार झाल्या आहेत . सध्या त्या दुबईत कुख्यात स्मगलर झुल्फि फारुख ह्याच्या अड्ड्यावर आहेत . त्या पुढील आठवड्यात चंदिगड ला पोहोचणार असून
इथेच त्यांची छपाई होणार आहे .
मेजर नि ही बातमी सांगताच अंगद आणि मिराने एकमेकांकडे बघितले . एक मोठे आव्हान त्यांची वाट पहात होते .
*********दुबई मधील ऐंशी मजली हॉटेल ‘अल अरमानी ‘ . साठाव्या मजल्यावर ‘ हाऊस किपिंग ‘ चे काम सुरू . स्टाफ मधील दोन ‘ पुरुष ‘
कर्मचारी सफाई मध्ये व्यस्त . …अर्धे लक्ष समोरील इमारत ‘ जन्नते ताहीर ‘ कडे …. त्याच्या साठाव्या मजल्याचे अर्धवट मिळालेले नकाशे त्यांच्या डोक्यात …. इमारती ला कडक सुरक्षा प्रदान केलेली …. त्या बद्दल बाहेर कुणीच बोलायला तयार नाही….हातात अगदी कमी वेळ ….इतक्यात…
” अरे ! हाशिम ! अजून तू इथेच ? 609 ला डस्टिंग करायचंय , गेस्ट येतायत . ” सुपरवायझर म्हणाला , तसा हाशिम ( अंगद ) त्वरेने 609 कडे गेला . मीरा ( अब्दुल) हळूच बाहेर आली . दुर्बीण आणि कॅमेरा कपड्यात लपवला . गेले चार दिवस हाशिम आणि अब्दुल्ला इथे कामाला लागले होते .
अल अरमानीच्या तळ मजल्यावर सगळ्या स्टाफची रहाण्याची व्यवस्था केली होती . मध्यरात्री दोघे हॉटेल बाहेर पडले , रात्रीची दुबई बघण्याचे कारण सांगून . आधी त्यांनी सार्वजनिक स्वच्छता गृह गाठले .
दहा मिनिटातच एक श्रीमंत अरब आणि त्याची बेगम ‘जन्नते ताहीर’
च्या आलिशान लाऊंज मध्ये होते . एक्सष्ठाव्या मजल्यावर त्यांनी एक स्वीट बुक केला होता . गेल्या बरोबर मीरा ने अरबीण बाईचा वेष गादीखाली लपवला . अत्यंत चपळाईने कमरेला हुक लावले , गॅलरीतून सराईतपणे खाली उलटी झेप घेतली ….कानात मायक्रोफोन आणि गळ्याखाली ड्रेस मध्ये कॅमेरा!!! अंगद देखील पूर्ण तयारीत होता . मनगटावरील स्क्रीन वर त्याला सगळे दिसत होते . तशी तो मिराला सूचना देत होता .
अख्खा मजला झुल्फिचा होता . खिडकीतुन प्रवेश घ्यायचा होता .
” मीरा , आत गार्ड असणार , थांब . “
” असे थांबत गेलो तर सकाळ होईल अंगद .” असे म्हणत तिने मायक्रो बिड्स लावले ….छोटासा स्फोट झाला ….पाच इंचाचे छिद्र केले….खिडकी उघडली आणि आत उडी घेतली . ती एक स्टोअरची जागा होती . तिने ‘ फ्लेक्सि स्टिक कॅमेरा ‘
घेतला , पुढे करणार इतक्यात कानात आवाज आला , स्टॉप!!!!
ती एका खोक्यामागे लपली . कमरेचा हुक सोडला . अंगदने सटकन तो वर गुंडाळून घेतला . पलीकडच्या बाजूला एक मोठी खोली होती . तिथे बरेच सामान होते…आणि चार गार्डस होते . एक गार्ड मीरा पासून पाच फुटावरच होता .
मीरा अंधारात आणखी तीन फूट पुढे सरकली ….निमिषार्धात त्याचे तोंड दाबले ….खटका दाबला….सहा फुटाचा देह ….तिने शेजारच्या सोफ्यात त्याला अलगद बसवले . …थोडी पुढे सरकत जातानाच आवाज आला….अरबी भाषेत …..काय झाले रे ? का बसलास ?…मीरा ने लोळण घेतली आणि कपाटामागे लपली . काही सेकंदात गार्ड ने संकेत केला ,आणि दुसऱ्याने कपाटामागून तिला बाहेर ओढायला हात लावला , तसा तो चार फूट मागे उडाला….पाठीमागून अंगद ने लाथ घातली होती….मिराचे रिव्हॉल्वर चालले आणि तीन गोळ्यात , तीन मुडदे !!
” कॅप्टन , वाचवले तुला ” अंगद पुटपुटला .
” समोर बघ !! ” तिने सावध केले.
समोर एक दरवाजा होता . पलीकडे कसला तरी आवाज येत होता …
त्यांनी अंदाज घेण्यासाठी ‘ फ्लेक्सि स्टिक कॅमेरा ‘ काढला . दरवाजा खालून आत सरकवला ….स्क्रीन वर एक मोठी मशीन दिसत होती …..
..” मीरा , हे काय इथेच नोटा छापताएत की काय ? ” अंगद म्हणाला , आणि खटाखट सगळे लाईट लागले .
दरवाजा उघडला गेला होता …..समोर झिया उभी होती !! …डोळ्यात विस्तव !….
” आज बरी सापडलीस !! ..भाई , हीच ती !!! ” तिच्या मागे दुराणी मोठ्या आलिशान सोफ्यात बसला होता .
” उडव झिया !! ” तो क्रुद्ध आवाजात म्हणाला .
” नाही भाई , हिने जेल मध्ये फार माज केला होता . मलाही बघूदे , आज इथे किती दम दाखवते ही !! …ए ! ह्याला घ्या बाजूला !! ” ती दात खात म्हणाली , तसे दोघांनी अंगद च्या कानावर बंदूक ठेवून त्याला बाजूला खेचला .
” गोळी नका चालवू !! शिनाचा पत्ता सांगेल हा ****!! ” ती खेकसली .
मिराने नजर फिरवली . तिथे एक नाही , दोन मशिन्स होत्या , आणि दुराणीच्या मागे एक धिप्पाड माणूस उभा होता . नकाशा प्रमाणे ह्या खोली मागे खाली कुठेतरी व्हॉल्ट असायला हवा …तिने विचार केला ….तोपर्यंत झिया तिच्यावर चाल करून आली . दुराणी मजा बघत होता . …त्याला आपल्या बहिणीची ताकद माहीत होती ..पण मिराची नाही !…
दाणकन मिराने झियाला उलटून आपटले , तशी अंगद ने ही जोरात पलटी मारली आणि दोघांनाही लोळवले .
झिया ने मीरा ला नाकावरच एक ठोसा लगावला . मिराने तिच्या हाताला धरून आपटले , तिचा हात उलट्या दिशेने फिरवला तसा कडकन आवाज आला आणि झियान जोरात किंचाळली . मिराच्या बंदुकीतून सुटलेल्या गोळीने झिया आणि एक पहारेकरी आडवे पडले…..आता मात्र दुराणीने रिव्हॉल्व्हर हातात घेतले . मिराने लांब उडी घेत फरशीवर लोळण घेतली…अंगद ने दुराणी च्या जबड्यावर लाथ घातली…..तो मागे भेलकांडला.. त्याच्या मागे उभ्या माणसाने त्याला ओढत आतल्या बाजूला धाव घेतली……” अंगद , तू आत जा ,दुराणीच्या मागे ,सोडू नकोस , मी ह्याला निपटते ” मीरा म्हणाली आणि त्या पहारेकऱ्याने चक्क हात वर केले .
अंगद आतल्या बाजूला धावला . तिथे मिट्ट काळोख होता ….अंगद ने भिंतीचा आधार घेत पुढे सरकायला सुरुवात केली . तो कॅरिडॉर सारखा भाग असावा …म्हणजे ह्याच्या पलीकडे नक्कीच प्लेट्स ठेवलेले व्हॉल्ट असणार . ..
मागच्या खोलीत मीराच्या समोरचा माणूस हात वर करून उभा होता . त्याने नजरेनेच वरती कॅमेरा कडे निर्देश केला . दोन गोळ्या झाडून तीने दोन्ही कॅमेरे निकामी केले . आपल्या बुटातून एक रिव्हॉल्व्हर काढले आणि त्याच्या जवळ दिले……..तो माणूस म्हणजे मिराचा खास एजंट होता , जेकब !!!! त्याने तिथली एक कळ दाबली आणि तिथली भिंत सरकली . त्याला तिथली बऱ्यापैकी माहिती होती .
आतल्या खोलीत अंगद अंदाज घेत पुढे सरकत होता . त्याने आपल्या घड्याळातील स्क्रीन वर पाहिले , मीरा एका छोट्याश्या खोलीत जेकब सोबत जात होती . अंगद केव्हापासून जेकब सामील होण्याची वाट बघत होता . तिथून दोन वाटा होत्या . एक बाजूने खाली जाणाऱ्या पायऱ्या आणि दुसऱ्या बाजूने एक भिंत .
” मीरा , जेकब ला दे मायक्रो फोन ….जेकब , इथे आत आणखीन किती लोक आहेत ? “
” अंगद , तूझ्या समोर एक लाकडी नक्षीकाम केलेला दरवाजा आहे ? “
” हो , दिसतोय .”
” चार जणांना सांभाळू शकशील ? “
” चिंता नाही !! “
” ऑल द बेस्ट बडी… फक्त कॅमेऱ्यात येऊ नकोस! ” जेकब म्हणाला, आणि मिराला घेऊन पायऱ्या उतरायला सुरुवात केली .
अंगद ने फ्लेक्सि केबल कॅमेरा तिथेच फेकला , हातात रिव्हॉल्वर तयार ठेवले , आणि चार गोळ्यात चार कॅमेरे निकामी केले . समोर लाकडी दरवाजा होता . दुराणी आणि तो धिप्पाड तिथेच असणार होते . अंगद दरवाजा ढकलणार , इतक्यात आतून गोळीबार सुरू झाला . एका उडीत त्याने दाराची चौकट पकडली आणि मोठ्ठी झेप घेऊन गोळ्या झाडल्या .
तीन रक्षकांना वर पाठवून त्याने एका सोफ्यामागे स्वतःला लपवले .
दुराणी भांबावलेल्या अवस्थेत इकडे तिकडे पहात होता . अंगद ने ताकदीने त्याला एक खुर्ची फेकून मारली , त्याचा तोल गेला , तो सावरे पर्यंत त्याच्या कपाळात गोळी घुसली होती .
अंगदने बाहेर येऊन मीरा उतरली त्या पायऱ्या ची वाट पकडली .
पायऱ्या एकोणसाठाव्या मजल्यावर येऊन थांबल्या होत्या . रात्री चे तीन वाजले होते . पहाटेच्या आत इथून निघणे आवश्यक होते…..तो पुढे पाय टाकणार इतक्यात त्याला कुणीतरी ओढले…तो जेकब होता ….
” तुम्हाला नकाशात मुख्य जागा कोणती दिसली होती ? ” त्याने विचारले.
” पाण्याची ! प्लेट्स चे लॉकर बहुतेक पाण्यात आहेत ” मीरा.
” बरोबर ! आता पुढे पाय टाकशील तर मोठा अलार्म वाजेल , आणि झुल्फि चे माणसं इथे येतील . टॅंक इथून दहा फुटावर आहे . “
लगेच मीरा म्हणाली , ” हे आता माझ्यावर सोपवा . जेकब , लॉकर चा कोड दे . तुम्ही दोघे तयार राहा . माहितेय ना , काय होणार आहे ? “
” हो . लॉकर फक्त दहा मिनिटं उघडे ठेवता येते . आपल्या जवळ ते बंद करण्याचा कोड नाहीये . जर दहा मिनिटात ते पुन्हा बंद नाही झाले तर ह्या अख्ख्या मजल्यावर अत्यंत विषारी वायू पसरवल्या जातो . मात्र तो अजिबात बाहेर जात नाही . ” जेकब ने माहिती पुरवली .
मीरा काही पाउले मागे गेली …..तिने पोझ घेतली ….दोघे श्वास रोखुन बघत होते ….ति धावत आली……लांब उडी घेतली…….आणि….मासोळी सारखी पाण्यात उडी घेतली ….वीस फूट खोल लॉकर होते…..कोड टाईप केला….दरवाजा उघडला…..आणि…..
..समोर …..केव्हढ्या प्लेट्स…..अरबो रुपयांच्या नकली नोटा बनवल्या असत्या ह्या ह ****नि …..ती वेगात पाण्याच्या पृष्ठभागावर आली…..लांब श्वास घेतला ….
जेकब ने टायमर ऑन केले होते. दोघे धावत पुन्हा वर गेले…..वरच्या मोठ्या हॉल मध्ये दोन मशिन्स होत्या ……त्यातले तीनचार मुख्य पार्ट्स फक्त निकामी करायचे होते .
” जेकब , तू मशीन निकामी कर , मी खीडकी पाशी पुढचे काम करतो. ” अंगद ने धावत खिडकी गाठली .
अचानक स्पीकर मधून आवाज आला , ” दुराणी ? , ऑल ओके ? कॅमेरा सिस्टीम बंद का झालीये ? …झिया ? ….”
” सब ओके है आका ! सिर्फ कॅमेरा मे थोडा प्रॉब्लेम है , हो जाएगा . मै उस्मान बोलरा आका!!! ” जेकब ने वेळ मारून नेली होती . पण हे खोटे फार काळ टिकणार नव्हते , घाई करणे आवश्यक होते .
जेकब ने टायमर बघितला …..दहा ….नऊ……तो ढांगा टाकत खिडकी पाशी पोहोचला …..अंगद ने समोरच्या बिल्डिंग च्या विसाव्या मजल्या पर्यंत वायर फिक्स केले होते ….
…आठ….सात…जेकब ने हुक वायर ला अडकवले आणि सरररररर कन
उतरला ……पाच……चार….अंगद ने पाहिले ….भिंतीतून….नोझल बाहेर आले होते ….विषारी वायू पसरणार होता…..तीन……..आणि मीरा चित्या प्रमाणे धावत आली….पोटाशी प्लेट्स ची बॅग ….अंगद ने हात पुढे केला….तिने झेप घेतली…त्याने तिला कमरेला पकडून कवेत घेतले….फुसस्स आवाज झाला….आणि खिडकीतून झेप घेतांनाच त्याने धाडकन खिडकी बंद केली…….
एक म्हातारा श्रीमंत अरब , त्याचा नवीन लग्न झालेला खास अरबी वेशातील मुलगा आणि बुरखाधारी सून विमानतळावर वाट बघत होते .
सिक्युरिटी चेक मध्ये कपड्या शिवाय काहीही सापडले नव्हते .
तिघे भारताच्या विमानात बसले. एक जण म्हणाला,
” मला ह्या नव्या नावाने वावरायला गंमत वाटतीये सुनबाई !! “
यावर बाकी दोघे फक्त मोठ्याने हसले !!!
ह्या जिगरबाज ‘ फायटर्स ‘ मुळे फार मोठा अनर्थ टळला होता .
मोडक्या अवस्थेत प्लेट्स पडल्या होत्या ,अरबी समुद्राच्या तळाशी !!!
( समाप्त )
© अपर्णा देशपांडे
Image by Sammy-Williams from Pixabay
Latest posts by Aparna Deshpande (see all)
- आत्तु-भाग ३ (शेवटचा भाग) - June 17, 2022
- आत्तु- भाग २ - June 7, 2022
- आत्तू- भाग १ - June 3, 2022
Pingback: धडाकेबाज- भाग १ – LekhakOnline – Excellent Marathi Articles
kathecha motha pasara sahaj handle kartaay.
मोठी कथा कमी शब्दात कॉम्प्रेस करून बघीतली आहे
खूप लवकर संपवली कथा
मोठी कथा कॉम्प्रेस करून प्रयोग करून बघितलाय
मस्तच कथा
मस्त. पण लवकर संपली.
Short and sweet ….mast….maja aa gaya
धन्यवाद
ह्या प्रकारातील काही कथा आहेत , इथे मिळतील वाचायला .
उडाण वाचली का ?
जबरदस्त… उगाच लांबण नाही लावलं ते बरं झालं.
Baby movie च्या climax ची आठवण झाली
Mastach👍
धन्यवाद. माझी
उडाण ही कथा वाचलीत का
मस्त