मैत्रीण ……
सून आलीय घरात. ..
छान देखणी, गोरी पान, …..
भरपूर शिकलेली, ….. यशस्वी करिअर.
सॉफ्टवेअर की काय असतं, त्यामध्ये मोठमोठे प्रोजेक्ट लीड करणारी, …..
तरीही घरात वेळ देणारी,….
आदर्श सून,….. नाव ठेवायला जागा नाही. जिथं तिला वेळ देता येत नाही तिथं तिची जागा भरून काढायला मोलकरीण ठेवलीय तिनं.
सगळे खुश आहेत. सुख दुथडी भरून वाहतंय. घरात भांड्याला भांड न लागेल अशी सगळी व्यवस्था, सासऱ्यानी करून ठेवलीय.
कुलधर्म कुलाचार, घरातल्यांच्या चवी, आवडी निवडी सग्गळं सांभाळतेय.
बघता बघता, घराचा ताबाच घेतलाय जणू तिनं…… निदान भावनिक तरी. जिंकायची सवय तिची लहानपणीपासूनची. प्रत्येक परीक्षेत, स्पर्धेत ती जिंकली होती. अशीच सून हवी होती अन निवडून आणली होती, शालनकाकूंनी.
नवरा , सासरे, दिर सगळ्यांनी तिला अगदी डोक्यावर घेतलं होतं. वहिनीच्या प्रत्येक आवडीनिवडी दिराला पाठ होत्या. सुनेच्या वाढदिवसाची तयारी सासरे करत होते. सगळे मिळून, आनंदात पार्टी करत होते. निवडक नातेवाईकही बोलावलेत. कल्याण रिसॉर्टचं गार्डन बुक केलंय.
काहीच करावं लागत नाही हल्ली, कोणत्याही कार्यक्रमात. फक्त नटूनथटून हजर राहायचं असतं, अगदी होस्टने सुद्धा.
शालन काकुही नटल्यात. छानशी बोरमाळ गळ्यात, नाकात नथ, सुंदरशी इरकल, असा खानदानी थाट. आणखी चार त्यांच्याच वयाच्या बायकाही त्यांच्याच टेबलाशी बसल्यात. गप्पा, ……. दागिन्यांच्या, श्रीमंतीच्या, ….. मोठेपणाच्या. अगदीच काही नाही तर जावयाच्या श्रीमंतीच्या.
शालन काकू मात्र बोअर झाल्यात. त्या ग्रुपमध्ये मन नाही त्यांचं. एकट्या आहेत त्या….. त्या मानपानाच्या टेबलवरही …. त्या थाटामाटाच्या पार्टीतही.
तशाही त्या पहिल्यापासून एकट्याच, घरातही नवरा त्याच्या करिअरच्या धुंदीत. मुलं तिच्यावर टाकून.
आणि मुलं, …. लहान होती तोपर्यंत आई आई करायची. पण शेवटी मुलंच ती, एकाला दोघे मित्र, भांडण झालं, भूक लागली तरच आई ….. नाहीतर त्यांची सिक्रेट्स , त्यांच्या हेअर स्टाईल्स, त्यांचे स्पोर्ट्स, सगळं विश्वच वेगळं. नंतर नंतर, बाबाही त्यांच्यात सामील……. ऑल बॉईज वर्ल्ड, ……… या सगळ्यात ती कुठेच नाही.
पण हे त्यांचं जग सांभाळत मात्र ती होती. अन ते सांभाळताना, तिचं मैत्री विश्व कधीच मागे राहिलेलं. तिच्या शाळकरी मैत्रिणी तर कुठल्या कुठे हरवून गेलेल्या. लेकही नव्हती तिला, ……. तिचं भावविश्व शेअर करायला.
आता ते जगही, सुनेच्या ताब्यात देऊन, त्या खऱ्या अर्थानं एकट्या झाल्यात.
कार्यक्रम संपला, खूप सारे फोटो सेशन झालं फॅमिलीचं. फ्रेममध्ये अधुन मधून शालन काकुना घेऊन, फॅमिली फ्रेम कम्प्लिट केली मुलांनी.
घरी आल्यावरही कार्यक्रमाची चर्चा मुलांमध्ये सुरूच राहिली. सुनबाई नवरोबासाठी, कॉफी बनवायला निघून गेली. काकू मात्र शांतपणे त्यांच्या रूममध्ये गेल्या. खूप दमल्या होत्या. फ्रेश होऊन …. निवांत झाल्यावर, सहज मोबाइलवर नजर मारली. ‘आईला काय कळतंय त्यातलं, असं म्हणत का होईना, मोठ्यानं, स्मार्ट फोन घेऊन दिला होता. सर्वांचे व्हाट्सअप्प स्टेटस, पाहता पाहता, सुनेचा पहाणं सहाजिक होतं.
त्या थोड्या दचकल्याच स्टेटसचे फोटो पाहून.
हिने इतके छान फोटो कधी काढले ?,….. तेही माझ्या एकटीचे, …… छान मूड कॅच करणारे. शालनकाकूंनी स्वतःचे इतके छान फोटो कधीच पाहिले नव्हते.
एवढ्या मोठ्या कार्यक्रमात, फक्त त्यांचे, छान नथीतले हसरे फोटो तिनं, स्वतःच्या स्टेटस वर ठेवले होते. काकूंसाठी हे आश्चर्य होतं.
तरीही काहीच कंमेंट न करता, त्यांनी मोबाईल ठेवून दिला.
………………………………………………………………….
पहाटे उठायची जुनी सवय…… खोडच खरं तर,
किचन मध्ये जाऊन, कसलीशी दोन तीन प्रकारची पानं अन एखादं इलायची, लवंग, दालचिनीचा तुकडा टाकून काढा बनवायच्या. एकट्याच खुडबुडत राहायच्या किचनमध्ये.
काढा बनत होताच, इतक्यात, कुठून तरी, तानपुऱ्याचे स्वर कानावर आले. शेजारच्या देशमुखांची लेक आली वाटतं माहेरी. रियाझ करायला उठली असेल.
त्याही अश्याच उठायच्या पहाटे, ….. रियाझासाठी. मुलांचं, नवरयाचं करता करता, रियाझ मागे राहिला तो कायमचाच. उगाच मन भूतकाळात गेलं. हिंदुस्थानी क्लासिकलची कित्येक स्पर्धातली बक्षिसं, मुंबई विद्यापीठाची संगीत पदवी, ……. संसाराच्या रेट्यात सगळं गुंडाळून ठेवलं, अन रियाझही.
काढ्याचा कप घेऊन त्या हॉलमध्ये आल्या, अन त्यांना चक्क धक्काच बसला. तो मघाशी ऐकलेला तानपुरा, शेजारी नव्हे तर आपल्याच घरात वाजत होता…… छोट्याशा स्पीकरवर. हॉल मधले, मंद लाईट्स लागले होते. पण कुणीच नव्हतं तिथे.
काढा संपता संपता, छान तल्लीन झाल्या, त्या श्रुती बॉक्समधल्या स्वरांसोबत.
ऐकता ऐकता, … डोळे झाकले गेले, ….. अन शालनकाकूंनी, कित्येक वर्षांनी “सा” लावला. एकदा स्वरांची शिडी चढून, उतरून झाली अन खूपच फ्रेश वाटू लागलं. कालचा निरुत्साह कुठल्या कुठे पळाला. शालन काकू पुन्हा तल्लीन झाल्या, अन भटीयारचा आरोह सहज ओठांवर आला.
सा रे१ सा सा म …………………
…………………………………….. प ग रे१ सा
त्या अवरोहावरून उतरल्या अन डोळे उघडले, तर समोर सुन बसली होती. अगदी प्रसन्नपणे विचारलं तिला,
“तू कधी उठलीस ? आणि हा तानपुरा बॉक्स कुणी लावला ग ?”
” मीच …….. काही दिवसांपूर्वी बाबांच्या लायब्ररीत कपाटाच्या वर सापडली तुमची सर्टिफिकेट्स. तेव्हाच ठरवलं, तुमच्यासाठी श्रुती बॉक्स आणायचा.”
“एवढा उपद्व्याप कधी केलास ?”
सुनबाई फक्त हसली, अन हात हातात घेत म्हणाली,
” कशी वाटली सुरुवात तुमच्या वाढदिवसाची ?”
शालन काकू पहातच राहिल्या. त्यांचा, स्वतःचा वाढदिवस त्यांच्याच लक्षात नसावा. खरंच, यापेक्षा गोड कोणताही वाढदिवस नव्हता त्यांचा.
त्यांच्या मनात लपलेल्या, त्यांच्या मित्रमैत्रिणी म्हणजे हे स्वर होते. त्यांच्या शिवाय त्या एकट्या होत्या.
अन त्यांची पुन्हा भेट घालून दिली होती, एका नव्या मैत्रिणीनं.
पटकन सुनेच्या चेहऱ्यावरून हात फिरवत, त्यांची बोटं आखाजवळ गेली. अन तिला मिठीत घेत, भरल्या डोळ्यांनी बोलल्या,
” काय आशीर्वाद देऊ तुला? ……….
हं, ………. देव करो, अन तुला जवळच्या मैत्रिणीची वाट पहायला , इतकी वर्षे न लागो ……. एक छोटीशी मैत्रीण येऊ दे घरात आता, तुझी अन माझीही.”
Image by Mircea Iancu from Pixabay
- Poked you …… - July 31, 2023
- एमएटी - June 10, 2022
- पत्रास कारण की… - April 21, 2022
अप्रतिम
मस्त!!
👌👌👌👌👌
मस्त 😍😍
mast
aai g kasali Sundar story hoti hi …manala khupch bhavali
dhanyawad
👌👌👌👌
खुप भावुक करणारी कथा. सासु नशिबवान आहे.
मस्त
Mastach
🙏🙏
wow… kamal
Wow mastach
सुंदर कथा !
Dhanywad !
अप्रतिम
खूपच सुंदर… अप्रतिम… लेक आईची मैत्रीण असते म्हणे. पण सुन सासूची मैत्रीण होणे…. अप्रतिम… 🙏🙏
Ek navin nat…ulgadale…
.Sasu ani suneche……Mast…