उपास…
राहुल…
गेले कित्येक वर्षे उपास करण्याचा प्रयत्न करतोय…
पण उपासाच्या दिवशी उपास आहे हे त्याच्या लक्षात राहिलं तर शप्पथ…
विसरभोळा…
कमालीचा विसरभोळा…
आईने सांगितलं, आता उपास करायला सुरवात कर राहुल…
मोठा आहेस तू आता…
निदान वर्षातून दोन-तीन तरी…
आषाढी, कार्तिकी, महाशिवरात्र…
ओके डन…
आषाढीचा दिवस उगवला आणि आईचा गजर वाजायला लागला…
आज उपास आहे रे..काही खाऊ नको…
हो आई..कालपासून तू मला हे पस्तीसाव्यांदा सांगत्येस…
आईने डब्यात साबुदाण्याची खिचडी दिली…
राहुल ऑफिसला गेला…
लंच टाईम झाला..
डबा उघडणार तेवढ्यात त्याच्या अगोदर मित्राने डबा उघडला आणि भेंड्याची चुरचुरीत भाजी नजरेस पडली…
राहुल विरघळला…
मित्राने नेहमीप्रमाणे ‘घे’ म्हटलं…
राहुलने पोळी-भाजीचा एक घास तोंडात टाकला…
आणि स्वतःचा डबा उघडला…
साबुदाण्याची खिचडी बघितल्यावर त्याच्या लक्षात आलं की आपला उपास आहे…
मग काय जाउदे आता…
एवी तेवी मोडलाच आहे उपास…
खाऊ अजून थोडी पोळी-भाजी…
मित्राला पण माझ्या आईने केलेली खिचडी आवडतेच…
राहुल घरी गेला…
आई, आता कार्तिकीचा उपास नक्की…
१००%…
श्रावण-भाद्रपद निघून गेले…
कार्तिकीचा दिवस जवळ आला…
आईचा आठ दिवस अगोदरच गजर चालू…
अमक्या दिवशी उपास आहे रे…
मागच्या वेळी काय झालं होतं लक्षात आहे ना…
हो आई…या वेळेला पक्का उपास…
कार्तिकी उगवली…
आईने डब्यात उपासाची बटाट्याची भाजी दिली…
एक सफरचंद दिलं…
उपास आहे रे..लक्षात ठेव…
राहुल ऑफिसला गेला…
नुकतीच दिवाळी झाली होती…
ऑफिसमधल्या सकाळच्या चहाच्या वेळेला राहुलच्या मैत्रिणीने चकल्या आणल्या होत्या घरून…
राहुल..प्लिज हॅव इट…
राहुलला आकाश ठेंगणं झालं…
तिला ‘नाही’ म्हणण्याचा विचारही राहुल करू शकला नाही…
पटकन त्याने चकली घेतली आणि तोंडात टाकली…
कोणीतरी मॅडम तेवढ्यात म्हणाल्या..
अगं..आज कार्तिकी ना…
मला सकाळी आठवलं…
रात्री साबुदाणा भिजत घालायचा लक्षातच नाही…
हे शब्द राहुलच्या कानावर पडले…
नव्हे आपटले…
आणि लक्षात आलं…
अरे हो..आज आपला पण उपास आहे…
‘आहे’ नाही ‘होता’…
चकली गेली पोटात…
कार्तिकी पण गेली…
आता महाशिवरात्र नक्की…
२००%…
कॅलेंडरची काही पानं फडफडली…
महाशिवरात्र आली…
या वेळेला उपास नक्की…
कारण…
कारण सुटी आहे ऑफिसला…
कोणाच्या डब्याचा प्रश्नच नाही…
घरी आईच्या समोर दिवसभर…
ती देईल ते आणि तेच खाणार…
प्रॉमिस…
सकाळी फलाहार…
दुपारी उपासाचं थालीपीठ…
नारळाची चटणी…
उकडलेली रताळी…
घरगुती श्रीखंड…
व्वा..मस्त झाला फराळ…
चला, उपासाचा अर्धा दिवस तरी व्यवस्थित पार पडला…
वामकुक्षी झाल्यावर चहा…
चहाबरोबर थोडे वेफर्स खाल्ले…
संध्याकाळ झाली…
दिवसभर टीव्ही बघून तो ही आता गरम झाला होता…
कुठेतरी बाहेर फिरून येऊ असा विचार केला राहुलने…
आई..जरा फेरफटका मारून येतो गं नाक्यावरून…
उपास आहे..लक्षात ठेव…
काहीतरी खाशील बाहेर…
नाही आई..माझ्या लक्षात राहील..डोन्ट वरी…
राहुल बाहेर पडला…
नाक्यावर गेला…
दोन-तीन मित्र भेटले…
गप्पा रंगात आल्या…
तेवढ्यात…
तेवढ्यात कोपऱ्यावरच्या वडा-पाववाल्याने वड्याच्या भाजीला चरचरीत फोडणी दिली…
हिंग-हळद-लसणाचा सणसणीत सुवास पसरला…
जणू नाकावर आपटत होता…
आहाहाहा…
राहुलच्या गँगची पावलं नकळतपणे वड्यावाल्याकडे वळली…
चार वडा-पाव…
गप्पांच्या नादातच ऑर्डर दिली…
वडा-पाव हातात आला…
कढईतून हातात आणि हातातून तोंडात…
वाफाळता वडा..चटणी..पाव आणि तळलेली मिरची…
एक वडा-पाव कधी संपला समजलंच नाही…
काका अजून चार द्या…
ते ही फस्त…
नंतर कटिंग…
घुटुक घुटुक संपवली…
काय बेत झाला..झक्कास…
तोपर्यंत आठ वाजले रात्रीचे…
आईचा फोन…
काय रे..उपासाचं काय करु आपल्याला…
राहुलची बोलती बंद…
एका डोळ्यासमोर सकाळपासूनचे उपासाचे पदार्थ आणि दुसऱ्या डोळ्यासमोर वाफाळता वडा…
कसाबसा फोन ठेवला आणि आता घरी जाऊन आईला काय सांगायचं हा गहन प्रश्न पडला…
थरथरत्या हातांनी बेल वाजवली…
उपास सुटल्याचं टेन्शन राहुलच्या चेहऱ्यावरच ओघळत होतं…
आईला सांगण्यासाठी शब्दांची गरज पडलीच नाही…………..
- देवदूत…डॉक्टर आणि ड्रायव्हर - September 18, 2021
- रक्षाबंधन… - August 23, 2021
- एक ओळख..अशीही… - August 20, 2021
👌🏻👌🏻