लेखकऑनलाईन दिवाळी अंक २०२०
टीम मनोगत…
साधारण २०१८ चा मध्य होता. सोशल मिडीया नामक व्यासपीठावर अनेक चांगल्या लेखकांची एक फळी निर्माण झाली होती. काही जणांनी त्यांची पुस्तकं देखील प्रकाशित करून भरपूर प्रती विकल्या. मग हळू हळू त्या लेखकांनी सोशल मिडीयावर लिखाण कमी केलं. त्याच वेळी आणखी काही चांगले लेखक उदयाला येत होते. पण त्याचं लिखाण सोशल मिडीया वरच्या इतर पोस्टच्या गर्दीत हरवून जात होत. सोशल मिडियावरील पोस्टच्या पलीकडे जाणारं, मनाला भिडेल असं काहीतरी साहित्यिक मुल्य असलेलं वाचायची इच्छा असलेले काही वाचक देखील होते आणि अजूनही आहेत. त्यांना देखील अश्या प्रकारच लिखाण सोशल मिडीयावर शोधावं लागत होतं.
मग सोशल मिडीयावर लिखाण कमी केलेले लेखक, तिथेच उदयाला आलेले पण हरवून जात असलेले काही चांगले लेखक ह्यांच निवडक लिखाण, चांगल वाचायची इच्छा असलेल्या पण सोशल मिडीयावर शोध घेण्यात वेळ जात असलेल्या चोखंदळ वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या विचारातून www.lekhakonline.com ह्या संकल्पनेचा जन्म झाला. २०१९ सालातील गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर लेखक ऑनलाईन संकेत स्थळ वाचकांसाठी खुलं करण्यात आल. तेव्हापासून शेकडो वाचकांनी गौरवलेल्या ह्या साहित्य पोर्टल वर अत्यंत अल्प दरात वाचकांना रोज नवनवीन लेख, कथा, पुस्तकं ह्यांची मेजवानी मिळत असते. इथे लेखकांना देखील त्यांच्या लिखाणाचा यथायोग्य मोबदला मिळतो. लेखक ऑनलाईन हे फक्त एक पोर्टल न राहता एक लेखक वाचक चळवळ म्हणून नावारूपाला येत आहे. अनेक वाचक म्हणतात की –
“लेखक ऑनलाईन सदस्यत्व म्हणजे पन्नास पुस्तकं खिशात ठेऊन कुठेही फिरण्यासारखं आहे. ते देखील एका पुस्तकाच्या किमतीत!”
दिवाळी २०१९ मध्ये पहिलाच ऑडीओ दिवाळी अंक आम्ही काढला. त्याला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. ह्या वर्षी कोरोना संकट आहे हे लक्षात घेऊन आम्ही यंदाचा लेखक ऑनलाईन दिवाळी अंक वाचकांना अगदी कमीतकमी किंमतीत उपलब्ध करून द्यायचा निर्णय घेतला आहे.
समस्त वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
आपली,
टीम लेखकऑनलाईन.
लेखक ऑनलाईन म्हणजे आवड चांगलं वाचायची!
अनुक्रमणिका
विनूची विकेट लेखिका- अपर्णा देशपांडे. 6
ऑनलाईन वॉनलाईन लेखिका- गौरी ब्रह्मे…. 18
समांतर लेखिका- पूजा खाडे पाठक.. 23
निश्चय लेखिका- मानसी चापेकर. 49
रण संग्राम लेखक- अभिजीत अशोक इनामदार. 57
लिपस्टीक लेखिका – सरिता सावंत भोसले.. 82
आतड्याची माया लेखिका- विनया पिंपळे.. 87
हळदीचं बेट लेखिका- अपर्णा देशपांडे. 100
कल्पिताचे वास्तव लेखक- उमेश पटवर्धन. 111
पहिली दिवाळी लेखिका- सरिता सावंत भोसले.. 117
हार लेखिका- पूजा खाडे पाठक.. 126
सितारा लेखिका- अश्विनी आठवले.. 132
अधुरी एक कहाणी लेखिका- मानसी जोशी… 140
रुम नंबर १०१ लेखक- अभिजीत इनामदार. 146
खरंखुरं प्रेम.. लेखिका- मानसी गांगल.. 152
मृत्यूगोल लेखक– उमेश पटवर्धन. 160
बंदे भी हो गये है खुदा तेरे शहर में लेखिका- प्राजक्ता काणेगावकर. 165
स्वयंपाक करणारे पुरुष लेखिका- गौरी ब्रह्मे…. 173
देऊळ बंद लेखिका- अश्विनी आठवले.. 178
उशीर लेखिका- प्राजक्ता रुद्रवार. 180
नॉर्मल लेखक- कौस्तुभ केळकर. 185
विनूची विकेट
लेखिका- अपर्णा देशपांडे
रात्रीची वेळ . भिंतीपाशी काहीतरी हालचाल होत होती . गेल्या काही दिवसांपासून अप्पांना संशय येत होता की कुणीतरी रात्री भिंतीवरून आपल्या घरात येतंय . तशी अजूनतरी चोरी झाली नव्हती , पण चोराला रंगे हात पकडण्यासाठी त्यांनी गोपू ला बोलावले होते . अप्पांचा गोपू वर फार विश्वास . एखाद्या खास एजंट ला कामगिरी सोपवावी तश्या थाटात अप्पांनी गोपुला इथे नेमले होते .
गोपु देखील लगेच जॅकेट , गॉगल आणि दुर्बीण घेऊन तयारीत आला होता . 007 ला लाजवेल अशी कामगिरी करण्याच्या आवेशात ! जेम्स बॉण्ड ने बघीतला असता तर आपला राजीनामा दिला असता इयन फ्लेमिंग्स कडे . बाबारे , तू ‘बॉण्ड ‘ ला सोड आणि ‘ गोपु ‘ वर लिही म्हणून !
तसा गोपु पण काही कमी बहाद्दर नव्हता . जेव्हा गावातील दामू आण्णा ला शंका होती की आपला जावाई नामदेव याचं त्या चंचल चमेली बरोबर ‘ आहे ‘ , तेव्हा त्यांनी गोपुलाच नेमले होते खास माहिती काढायला . तेव्हा पठ्ठ्या पूर्ण कित्येक तास चमेलीच्या घराच्या छपरावर जाऊन लपला होता . दोन कौलं बाजूला सरकवून खाली वाकून नजर लावून बसला होता .
नामदेव आलाच नाही , बराच वेळ वाट पाहिल्यावर त्याला तिथेच झोप लागली , तोल गेला आणि महाराज दाणकन खाली पडले होते . मग खुद्द चमेलीनेच फटके मारून पळवला होता तिथून . इतका बहाद्दर होता हा देशी जेम्स बॉण्ड !
आता अप्पांच्या सांगण्यावरून गोपु भिंतीपाशी दबा घरून बसला होता . रात्रीच्या अंधारात तोंडाला फडके बांधलेल्या अवस्थेत कुणीतरी भिंतीवरून धप्पकन आत उडी टाकली , तशी गोपूने त्याची मानगूट पकडली , आणि आता मोठ्याने बोंबलणार इतक्यात त्याचे तोंड दाबल्या गेले …
” ओरडू नको बे !! मीच आहे , मी ! “
” मी म्हणजे कोण ? ” बावचळलेला गोपू .
” नालायका , मी ! विनू ! ….आणि तू इथे काय करतोय इतक्या रात्री ? “
” हात लेका , तू ? …” गोपु मोठ्याने बोलणार इतक्यात …
” हळू बोल न रे !! ” विनू ने पुन्हा त्याचे तोंड दाबले .
आतील लाईट लागला होता , म्हणजे अप्पा उठले असणार .
” गोपु , आला कारे चोर ? “
” नाही अप्पा ! मी आहे इथे , काळजी नका करू . विनू झोपलाय आत . तुम्हीपण झोपा .”
आपला मोर्चा विनू कडे वळवून पूर्ण आवेशात म्हणाला ,
” मला माहितेय तू कुठून येतोयस ते . अप्पांना कळाले ना तर तुझ्या आधी माझी चटणी करतील ते .” आपल्याला गावातील सगळ्यांचं सगळं माहीत असतं ह्या भ्रमात असे गोपु .
” तुला माहितेय ? कुठून येतोय … सांग बरं ! “
” विन्या , महिताय मला की तुझी विकेट पडलीये . उस्ताद च्या मालू ला भेटायला गेला होतास न ? ….. सगळं बघतोय मी . काय काय गिफ्ट देत असतोस तिला . तुला म्हणालो होतो , माझ्या सोबत फलटण ला चल , तर नाही !! मालू बसलीय न डोक्यात ! “
“…….”
” इकडे बिचाऱ्या अप्पांना वाटतंय की कुणी चोर येत असतो भिंतीवरून . ..पण काय रे , रोज अशा कोलांट उड्या मारतोएस , भेटली का मालू ? “
” नाही न यार ! त्या सांड उस्तादने तिला आत तिच्या खोलीत बंद केलय म्हणे . बाहेर येऊच देत नाही . किती दिवस झाले मी तरसतोय . काहीतरी कर न यार ! मला भेटायचंय तिला . जय , इस विरु को उसकी बसंती से मिला दो . “
” ए s गप्प बस ! इकडे अप्पा अन तिकडे तो पहेलवान कुटतील मला . तुला काय जातंय डायलॉग मारायला !! “
” गोप्या , तूच ना रे आता ह्या वयात मला सोबतीला . तूच ना माझा खरा मित्र !! ” विनू लोणी लावत होता .
” बास बास ! रूलाएगा क्या ? सांगतो , पण माझे म्हणणे पूर्णपणे ऐकायचे . आपल्याच मनाचे करायचे नाही . ऐक तर !!! “
गोपाल च्या कुरापती डोक्यातून प्लॅन तयार झाला होता .
******** दिगंबर( डेबू ) पहेलवान आपल्या आखाड्यात मोठी खुर्ची टाकून बसले होते . दोन्ही बाजुने दोन शिष्य तेल लावून मालिश करत होते .
धिप्पाड डेबू उस्ताद ला मालिश करणारे देखील तितकेच ताकदीचे लागत . रुंद आडवे शरीर , गच्च झुपकेदार मिश्या आणि मूसळा ला लाजवतील असे दंड . दुसरीतच शाळेला रामराम , सगळी ताकद पहेलवानीतच अशी गत होती .
आपल्या दहावी पास , टरबूजा प्रमाणे फुगलेल्या , गेल्या पाच वर्षांपासून बी . ए . फर्स्ट ईअर ची लक्ष्मण रेषा न ओलांडलेल्या लाडक्या लेकीला म्हणजे मालूला आपल्याही पेक्षा मोठा पहेलवान नवरा मिळावा ही त्यांची इच्छा होती , पण पहेलवाणीन बाईंचा , म्हणजे शालू ताईंचा याला जोरदार विरोध होता . मागच्याच आठवड्यातील गोष्ट …….
शालूताई स्वयंपाक घरात होत्या . तश्या त्या तिथेच जास्त असत कारण उस्तादजींचा आहार !! सकाळी अर्धा लिटर दूध , पावकिलो बदाम , आठ दहा अंडी ,आणि दुपारी जेवणाला …….यादी मोठी होती ….
तर त्या स्वयपाक करत असतांना उस्ताद तिथे आले .
” मालुताई , “
” ईश्श !! तुम्ही का ताई म्हणताय ?”
” अग हो , पण ते ….कधी …असं ….”
” शालू म्हणा नं ! किती गोड वाटतं ! “
” शा sलू ! ….शा sलू ! ‘ …इतक्यात मालू तिथे आली तसा उस्ताद नि सावरून घेत खोकलण्याचा आवाज काढला .
” बरं झालं मालू तू आलीस . आम्ही तुझ्या लग्नाचेच बोलत होतो ….”
… कसली लाजली मालू !!
” अग , लाजतेस काय ? कुणाशी लावून देतायत तुझं लग्न , हे तरी विचार ! ! ” शालू ताई खेकसल्या , तशी मालू स्वप्नातून सत्यात उतरलेल्या अप्सरेसारखी आपले बटनासारखे डोळे घेऊन उस्ताद कडे बघू लागली .
” तुझ्या आईचं काय ऐकतीस माले !!
असा नवरा बघितलाय मी तुझ्या साठी !! विचार कोण ? “
” कोण ? “
” तो आपल्या कळंज गावचा यंदाचा
‘ फोलाद केसरी‘ ढालेचा मानकरी नाही का , तो ! “
” आन लग्न झालं ना , की त्या ढालेचे तुकडे करून वरणात कुस्करून खात जा नवरा बायको !! ” शालू बाई आवेशात म्हणाल्या . “आपलं दोन मजली घर दिसतंय ते तुझ्या आजोबांनी बांधलंय . नाहीतर हे s s……जेवण करायचं आन हात पुसायचे ××××ला . नुसतं खायचं आन कुस्त्या करायच्या . हॅ s s !!! ते तालिमितले पोरं, वर्ष वर्ष फिस देत नाहीत . आन ह्ये! त्यांना हे खायला घाल , ते खायला घाल. किती लाड !! “
आता उस्ताद खवळले . ” सारखं काय माझ्या पोरांवर घसरते तू ? आता आठ दिवस झाले , कुठं काय आणलं खायला ? “
” ओहोहोहो !! ते तर आत्ता आपले फ्रीज खराब झाले म्हणून ! नाहीतर , येरे लखु बदाम दूध घे , येरे नाऱ्या हे ओले खोबरे खा !
खिशात नाही दमड्या आन बदाम खा रे बाबड्या !!! ” शालू बाईंची नेहमीची बडबड .
” मी सांगितलंय फ्रिज बद्दल , आज पोरं घेऊन जातील दुरुस्तीला .”
” ते स्थळाचं मनावर घ्या जरा. ” उस्ताद म्हणाले , पण मालूने काहीच प्रतिक्रिया दिली नाही .बोलून काहीच उपयोग नाही असे बघून उस्ताद तिथून निघून गेले .
एकंदर परिस्थिती चा अंदाज आल्याने मालू ने आई जवळ तोंड उघडले . तिला विनू कसा आवडतो , तो कापड मीलमध्ये सुपरवायझर आहे …वगैरे . आई ने ताबडतोब ही बातमी उस्ताद ला सांगितली . मग काय महाराजा , उस्ताद शांतपणे उठले , मालूला बोलावलं ,
वरून शांत आतून खळबळ आशा अवस्थेत तिला वरच्या खोलीत जायला सांगितलं . आता सांगितल्या शिवाय खाली यायचे नाही अशी ताकीद पण दिली आणि वर आपल्या एका पट्टशिष्याला पहाऱ्याला उभे केले .
मालूच्या लक्षात आले की आपल्या बी. बी .सी . लंडन मातोश्रींनी बातमी पिताश्रीं पर्यंत पोचोवलेली आहे .
********* आपल्या देसी 007 ने ( गोपुने ) मालू च्या घराचा , बाहेरील आखाड्याचा नीट अभ्यास केला . ओसामा बिन लादेन च्या वेळेस आबोटाबाद ची काय माहिती काढली असेल अमेरिकेने , त्याही पेक्षा जास्त माहिती गोपू ने गोळा केली .
शेवटी त्याच्या मित्राच्या प्रेमाचा प्रश्न होता . आखाड्याच्या बाजूला एक मोठे गुलमोहोराचे झाड होते . त्याची एक जाड फांदी मालूच्या खोली जवळून जात होती.
रात्री दोन वाजता आपला जेम्स बॉण्ड आणि अधीर विनू गुलमोराच्या झाडाखाली आले . गोपु ने शिडी आणली होती . शिडी झाडाला टेकवून त्याने विनूला त्या जाड फांदीपर्यंत पोचवले . सगळं प्लॅन प्रमाणे होत होतं . विनू फांदीवर चढला की गोपूने शिडी काढून घेतली . विनूने अंगठा उंचावून खूण केली तसा गोपू वापस निघाला .
विनू ने फांदीवरून अलगद कठड्यावर उडी टाकली . काही मिनिटं तिथेच शांत बसून राहिला . गुढग्यावर चालत तो दरवाजापर्यंत येणार इतक्यात समोर बघतो तर बाबू लोखंडे !!! उस्ताद चा लाडका शिष्य आणि विनूचा 36 आकड्याचा ‘मित्र‘!
हा एक अनपेक्षित धक्का होता .
मालूच्या खोली समोर बाबू खुर्चीत पेंगत होते . गोपु ने विनूला बऱ्याच शक्यता सांगून त्यावर उपाय सांगितले होते .
मालू जागेवर नसेल तर काय करायचं , शालुकाकी अचानक आल्या तर काय वगैरे .…
पण कुणी पहेलवान सामोरा आला तर काय करायचं ह्याची रंगीत तालीम नव्हती झाली .
आता इथपर्यंत येऊन आपल्या मालूची भेट हा होऊ देणार नाही ह्या विचाराने विनू चिडला .
मग त्याने गोपु गुरुजींनी सांगितलेला एक उपाय अमलात आणला . कठड्याच्या बाजूने खिडकी होती . तिथे जाऊन त्याने ” म्या s व , म्या s व ” आवाज करायला सुरुवात केली . असे त्याने ह्या आधी मालूला बोलावण्या करता केले होते.
मालू जागी झाली . तिने हळूच दार उघडले . तिला असे झोपेतून उठून आलेली बघितल्यावर विनूला प्रेमाचे भरते आले , पण शेवटी ती पहेलवानाची मुलगीच .
तिने लुकड्या विनूची कॉलर पकडली … त्याला जवळजवळ उचलूनच आत ओढला ….पण फरफटत आत जातांना विनूच्या पायाचा धक्का खुर्चीतल्या बाबू ला लागला ….बाबू उठला…..पण तेव्हढ्यात मालूने चपळाईने दरवाजा लावला ….
विनू भीतीने थरथर कापत होता…..एव्हढी मालू त्याच्या समोर असून त्याला काहीच सुचले नाही . त्याने तिच्यासाठी चांदीचे पैंजण , आणि झुमके आणले होते . ते पाहून आनंदाने मालूनेच येऊन त्याला मिठी मारली . तत्क्षणी विनूला तिच्या अवाढव्य विस्ताराची आणि स्वतःच्या तोकड्या ‘पहेलवानीची‘ कल्पना आली .
मालूच्या मिठीत गुदमरत असतांनाच दारावर थाप ऐकू आली .
” मालू बाई , तुम्ही ठीक आहात न ? “ त्याने विचारले .
” हो बाबू , तुम्ही बाहेर आहात की नाही हे पाहण्यासाठी दार उघडले होते .” ती हे म्हणतांनाच तिचा वजनदार पाय विनू च्या पायावर पडला आणि विनू जिवाच्या आकांताने ओरडला .
झालं !!!!!
सगळ्या घरात लाईट्स लागले , बाबू ने दारावर बुक्क्या मारत ओरडायला सुरुवात केली .
विनू ला भीतीने भोवळ येत होती , मालू मात्र शांत होती . तिने घराच्या आतल्या बाजूचे दार उघडले ….विनू कोपऱ्यात नुसताच उभा होता .
मालू त्याच्या कानात कुजबुजली .
” इथून पायरीवरून खाली उतर . डाव्या हाताला कोठीघर आहे . तिथे एखाद्या धान्याच्या डब्यात लप . मी तुला बाहेर काढीन , तोपर्यंत तिथेच रहा . जा आता लवकर .”
विनू खाली पळाला .
मालूने शांत पणे कठड्याकडील दार उघडले ” काय रे बाबू ? का दार बडवतोय ? साप चावला का ? “
” नाही , आत कोणी चोर घुसलाय बहुतेक मी आवाज ऐकला . “
तो पर्यंत विनू खाली निघाला होता . पायऱ्या उतरून खाली येतो तर समोर खुद्द उस्ताद !!! घराच्या आतील आखाड्यात उभे राहून वरच्या खोली कडे बघत पाठमोरे उभे !!
” काय रे गणोबा !! काय गडबड चालू आहे ? ” उस्ताद चा पहाडी आवाज .
” काही नाही उस्ताद !! सगळं ठीक!! “
पाणी पाणी अवस्थेत विनू एक एक पाऊल मांजराच्या पावलाने टाकत ओटा ओलांडत होता , इतक्यात उस्ताद वळले . मांजर मागे लागल्यावर उंदराने बीळ गाठावे तशा चपळाईने विनू कोठीघरात गेला . तिथे नुसता राडा होता . हाताला कपाटासारखे काही लागले म्हणून त्याने उघडले तर ते बंद पडलेले मोठे फ्रीज होते . अंग मुडपून विनू त्यात बसला ,आणि दार लावून घेतले .
******** सकाळीच अप्पांचा निरोप आला होता , विनू त्याच्या खोलीत नसल्याचे त्यांना कळाले होते . गोपाल ला दुकान उघडायच्या आधीच तातडीने बोलावले होते .
” अप्पा , विनू घरात नाहीये ? “
” वेड्याचं सोंग घेऊ नकोस . आत्ताच्या आत्ता घेऊन ये त्याला . नाहीतर तुझ्या बा ला सांगतो की तू दुकानातील वस्तू त्या सुताराच्या विद्याला देत असतोस , तेही फुकटात !!! “
“आयला ! ब्लॅकमेल अप्पा ? ” गोपु ओरडला .
“निघा आता “
***** चार हट्टे कट्टे पहेलवान मिळून कोठीघरातील फ्रीज उचलून दुरुस्तीला नेट होते .
” उस्तादजी , जड लागतोय फ्रीज . “
” गाढवांनो ! कसरत करा , कसरत ! चौघात मिळून एक फ्रीज नाही उचलता येत ? म्हणे कुस्तीगीर !! “
आत विनूचा पार खुळखुळा झाला होता . सगळ्या अंगाला रग लागली होती . त्याला पहाटे पहाटे फ्रिजमध्येच झोप लागली होती . आणि अचानक फ्रिज उचलल्या गेले होते .
त्याच्या छोट्याश्या मेंदूला ताण देत तो आपण नेमके कुठे आहोत ह्याचा अंदाज येई पर्यंतच तो पुन्हाअडकला होता .
आतून ओरडावे तर सरळ सरळ सशाला कोल्ह्या पुढे टाकल्या सारखे झाले असते . त्याने खिशाला हात लावून मोबाईल असल्याची खात्री केली . पण आता इथून बोलायची चोरी .
” थांबा . अरे नाथा , त्या दरवाजाला कुलूप लाव रे . नाहीतर टेम्पो मध्ये भरतांना दरवाजा उघडेल . “
…..हा आवाज उस्तादजींचा . ..बाप रे! हे आता फ्रिज लॉक करत आहेत !!
मालू , तुझ्या प्रेमात माझा होतोय उकडलेला आलू……असा विचार करत विनू दुखरे अंग घेऊन तसाच बसून राहिला .
प्रचंड उलथापालथ करत फ्रिज आधी टेम्पो , मग खड्डेमय रस्त्यातून मेकॅनिक कडे पोहोचला . बाहेरचा आवाज शांत होई पर्यंत विनू फ्रिज च्या मागील एकमेव सूक्ष्म छिद्रातून श्वास घेत होता . नंतर त्याने आपण अडगळीच्या जागी आहोत असा अंदाज घेऊन विनू ला फोन लावला .
” अरे कुठाय तू विन्या ? “
” आधी मला इथून बाहेर काढ ! “
” ओहो ! रात्रभर मालू सोबत ? त्याच झाडावरून ये की खाली! “
” कानाखाली आवाज काढतो तुझ्या!! ..मी…मी इथे आहे …कुठे…माहीत नाही..
” चढली कारे तुला ? की मालू उतरली नाहीये अजून! “
” हरामखोरा , मी फ्रिज मध्ये आहे! “
” आईस्क्रीम खातोएस ? “
” विन्या , फोनची बॅटरी मरतेय रे ! मी फ्रिज मध्ये लपलोय. जे आता कुण्या मेकॅनिक कडे आहे . …मला सोडव रे दोस्ता . “
” मालू पण आहे का तुझ्या सोबत ? “
विनू उत्तर देऊ शकला नाही , बॅटरी गुल झाली होती . पण विनूच्या प्रश्नाची त्याला कीव आली . मालू ? ह्या फ्रिज मध्ये ? आणि तो फिसकन हसला . त्याच्या डोळ्यासमोर चित्र आले…हत्तीचं पिल्लू मालू…अशी फ्रिज मध्ये …आणि तो भान विसरून हसला .
” कोण आहे फ्रिज मध्ये? ….पाटील साहेब , ओ साहेब! कुणी आहे फ्रिज मध्ये! ” बाहेरून आवाज आला .
‘ अच्छा ! म्हणजे पाटील च्या दुकानात आहे मी ! ‘ विनूला हायसं वाटलं .
******* विनू आणि गोपाल तळ्याच्या काठावर बसले होते .
” यार , तू सोडवलंस मला . “
” तुझ्या सुटकेसाठी कळकट कपडे घालून गॅरेज मध्ये गेलो . चोरून ड्रॉवर मधल्या किल्ल्या बघितल्या ,आणि गुपचूप तुला बाहेर काढले . “
” अप्पा ना सांगू नकोस रे ! “
” खरं सांगू ? अप्पांनीच मला पहेलवानकडे जा म्हणून सांगितले . तुझा फोन तर उशिरा आला . “
” काय ? पण …..त्यांना कसे समजले ..”
” त्यांना तो आपला राजेंद्र आणि संजू भेटले होते ….”
” त्यांचा इथे काय संबंध ? “
” तू आतापर्यंत मालूला भारी भारी भेटवस्तू दिल्यात न? सोन्याचे कानातले , चांदीचे दागिने , हो न ? “
” हो s , तुला तर माहितेय ना ! त्याचं काय इतकं? माझं प्रेम आहे तिच्यावर ! “
” तिचे आहे तुझ्यावर ?”
” हो s ! ती माझ्यासोबत पळून जायला तयार आहे . “
” तोंड बघ आरशात ! हेच तिने राजेंद्र आणि संजूलाही सांगितले होते . विनू , रात्री बाबू पहेलवान पहाऱ्याला होता ?..बरोबर?….मालूने दार उघडले?…तुझ्याकडून गिफ्ट घेतल्या……मग बाबूने दार बडवून आवाज करून तुला पळवले ? “
” हो! हो!! तुला कसे माहीत? ……लवकर पुढे बोल न बाबा!! “
” राजेंद्र आणि संजू , बावळट ! तेही मालूच्या नादात त्याला म्हणजे बाबूला भारी परफ्यूम , टी शर्ट , अन काय काय देत असत ….रात्री मालूला भेटायला जात तेव्हा बरं का!…. ….मालू आणि तो पहारेकरी बाबू यांचेच सेटिंग आहे !!!!
अप्पांना। राजेंद्र आणि संजू भेटले तेव्हा त्यांनीच सगळे सांगितले .तिने दुसऱ्या कुणाचे प्रेमाने नाव घेतले की उस्ताद बाबूलाच पहाऱ्याला बसवतात. आणि त्यांना दोघांना तेच हवे असते ….हेही सांगितले त्यांनी अप्पांना . अन तू ! येडा समजतोय ..की…..”
” बास गोप्या , बास . आता अजून जखमेवर मीठ चोळू नकोस . “
विनूचा चेहरा प्रेमभंग झालेल्या मजनू पेक्षाही केविलवाणा झाला होता .
दोघे घरी पोहोचले तेव्हा अप्पा शांतपणे वाट बघत होते .
” काय जेम्स बॉण्ड 007 ? सापडला का चोर भिंतीवरून आत उड्या मारणारा ? ” खट्याळपणे अप्पा म्हणाले , तसा विनू तोंड लपवून आत पळाला .
ऑनलाईन वॉनलाईन
लेखिका- गौरी ब्रह्मे
२०१२ साली मला पुढे शिकायची अगदी मनापासून तीव्र इच्छा झाली. मुलं लहान होती, बरेच दिवस मी घरात होते, नोकरी करत नव्हते, पण स्वस्थ बसवत नव्हतं, काहीतरी करावंसं वाटत होतं. मग विचार केला, काहीतरी शिकूया. अगदी नवीन काही नाही तरी आपल्याच क्षेत्रातील पुढचं शिक्षण घेऊ. मंगलाताई गोडबोले फार छान सांगतात, की मुलं लहान असताना आयांना खूप काही गोष्टी कराव्याश्या वाटतात. ती मोठी झाली, हातावेगळी झाली की मग मात्र आराम करावासा वाटतो. मात्र ती आपल्यावर अवलंबून असली की आपल्याला खूप उड्या माराव्याश्या वाटतात, असं काहीतरी उलट होत असतं. मजा म्हणजे, हे बऱ्याच बायकांच्या बाबतीत खरं होताना दिसतं.
तर मला पुढील शिक्षणाचा किडा जोरात चावला. आधी एम.फिल, मग पीएचडी करायची असं ठरवलं. घरून प्रोत्साहन मिळालं. “घरात एकतरी डॉक्टर तयार होऊ दे, मेडिकलवाला नहीं तरी पीएचडीवाला सही” या आशेवर मला सर्वतोपरी मदत करायला सगळे सज्ज झाले. प्रवेशपरीक्षा धडाक्यात पास केली. कोर्सवर्कही चांगल्या रितीने संपवलं. आमच्या विषयात, म्हणजे परकीय भाषांत संशोधन करायचे असल्यास त्या त्या देशांत जाऊन त्या विषयाची पुस्तकं मिळवावी लागतात, पुढील अभ्यास करावा लागतो. त्यासाठी शिष्यवृत्ती मिळवावी लागते. तीसुद्धा मी एकटीच्या जोरावर, जर्मनीत बराच पत्रव्यवहार करून मिळवली. माझ्या विष्यातला एक तज्ज्ञ जर्मन प्रोफेसर गाईड म्हणून मिळवला. जोरात अभ्यास सुरू केला.
चक्रीवादळाचा जोर आधी वेगात असतो, नंतर घोंगावत घोंगावत वादळ हळूहळू शांत होत जातं तसं दोन वर्षे झाली रे झाली, माझा अभ्यासाचा सगळा उत्साह हा हा म्हणता मावळला. संशोधनाचे काम हे एकहाती करावं लागतं. घरचं, दारचं सांभाळून सगळं करायचं म्हणलं की तारेवरची कसरत होते. तरीही अनेक बायका हे करतात, माझ्याच कित्येक मैत्रिणींनी हे केलेलं देखील आहे. त्यांचं मला प्रचंड कौतुक आहे. सहा-सात तास सलग लायब्ररीत बसून, घरी येऊन घरचं काम करून, सगळं सांभाळून त्यांनी पीएचडी संपवली आहे. याला चिकाटी लागते. माझ्याच्याने मात्र हे होईना. काही केल्या मला अनेक दगडांवर पाय ठेवणं जमेना, एकाग्रतेना धड अभ्यासही होईना. एक वर्ष टाळंटाळ केली आणि मग एक दिवस स्वतःशीच मान्य केलं की This is not my cup of tea. हा निर्णय घेताना खूप अवघड गेलं, कारण गेल्या दोन वर्षांची मेहनत समोर दिसत होती. पण ज्या क्षणी निर्णय घेतला त्याक्षणी मी सुटकेचा निःश्वास सोडला कारण त्या क्षणापासून मला दुहेरी जीवन जगायचं नव्हतं. अनेक दगडांवर पाय ठेवायचे नव्हते. माझी प्रायॉरिटी मला व्यवस्थित समजली होती. मन शांत झालं होतं. सगळी पुस्तकं, मटेरियल, कात्रणं बासनात गुंडाळली, लॅपटॉपवरचे फोल्डर डेस्कटॉपवरून डी ड्राईव्हवर गेले. माझ्या प्रोफेसरगाईड सकट अनेक लोकांना वाईट वाटलं पण जे झालं त्याला काही इलाज नव्हता.
काही गोष्टी आपल्या आयुष्यातून कधीच कायमच्या जात नाहीत. कुठेतरी बारीकश्या कानाकोपऱ्यात निपचित पडून राहतात. एखादं वादळ येतं आणि हे बारीक कण परत उडत येऊन आपल्यासमोर फेर धरतात. माझ्या बाबतीत असंच झालं. कोरोनाच्या स्वरूपात एक मोठं वादळ आलं आणि माझ्या संशोधनाचे बासनात गुंडाळलेले बारीक कण परत उडत येऊन परत माझ्यासमोर फेर धरून नाचू लागले. जणू ते मला म्हणत होते, “आता कुठे जाशील? आमच्यापासून पळून जात होतीस ना? घे. आम्हीच आलो परत तुझ्यासमोर.You have to face us.” याला कारण म्हणजे माझ्या संशोधनाचा विषय होता “Usage of internet and it’s different possibilities in online learning in foreign language classes especially in German as a foreign language in India.” मजा वाटली ना विषय वाचून? हा विषय मी आठ वर्षांपूर्वी अभ्यासायला घेतला होता, ज्यावेळी मला पुसटशीही कल्पना नव्हती की भविष्यात या मूर्खबावळटनालायक कोरोनामुळे शिक्षणक्षेत्रात ऑनलाईन टिचिंगला आभाळाएवढं महत्त्व येणार आहे. कोरोनाकाळ सुरू झाला तसे माझ्या मनात अनेक विचार येऊ लागले. मी संशोधन पूर्ण केलं असतं तर? माझ्या अभ्यासामुळे ऑनलाईन शिक्षणाच्या क्षेत्रात मी काही भरीव काम करू शकले असते तर? कोरोनामुळे शिक्षकगण ऑनलाईन शिक्षणात कोणत्याही तयारीला वेळ न मिळता अक्षरशः ढकलला गेला, माझ्या संशोधनामुळे मी तर आधीच तयार झाले असते! मला आणि माझ्यासोबत इतर अनेकजणांना त्याचा किती फायदा झाला असता!
हे आणि असे अनेक विचार मला त्रास देऊ लागले. लॉकडाऊन काळात एक दिवस मी हिय्या करून बासनात गुंडाळलेले सगळे कागद बाहेर काढले. त्यांच्यावरची धूळ साफ करताना मी संशोधनासाठी केलेली मेहनत आठवत होती. पण आता वाईट वाटून उपयोग नव्हता. जमेल तसे सगळे कागद वाचून काढले. डी ड्राईव्हवरचे फोल्डर परत एकदा उघडून पाहिले. मी अभ्यास केला होता त्यातलं बरंच काही आता outdate झालं होतं कारण इंटरनेट क्षेत्रात अक्षरशः दिवसागणिक क्रांती होत असते. पण ज्ञान कधीही वाया जात नाही. ऑनलाईन शिक्षण या विष्यातला थोडाफार बेस मला आधीच मिळाला होता.
यानंतर मी रोज थोडाफार अभ्यास सुरू केला. सध्याच्या ऑनलाईन शिक्षणाबद्दल वाचू लागले. पण कितीही माहिती घेतली तरी पाण्यात पडल्याशिवाय जसं माणूस पोहायला शिकत नाही तसं प्रत्यक्ष शिकवायला लागल्याशिवाय शिक्षक शिकत नाही.
आमचे ऑनलाईन वर्ग सुरू झाले. चुकतमाकत सगळं शिकत होते. एका कलीगने उत्तम कल्पना मांडली, की आपण चक्क धडे वाटून घेऊ आणि प्रत्येकजण आपली तयारी एका कॉमन ड्राईव्हवर शेयर करू. एकमेकींचं काम पाहून आपल्याला खूप काही नवीन शिकता येईल. आणि तसंच झालं. माझी तयारी आधीपासून थोडीफार सुरू होतीच. आता एकमेकींना साहाय्य करून सुपंथ धरायचे होते. याचा आम्हाला खूप फायदा झाला. आजही रोज नवनवीन काही शिकत आहोत, वेगळ्या पद्धतीने शिकवण्याची तंत्रं आत्मसात करत आहोत. या सगळ्या धबडग्यात ऑनलाईन शिक्षणाबद्दल मला जाणवलेले काही महत्त्वाचे मुद्दे-
◆ तंत्रज्ञानाचा योग्य वापर करायला शिकल्यास ऑनलाईन शिक्षण हे आनंददायी बनू शकते. प्रत्यक्ष वर्गाची मजा जरी यात नसली तरी इतर अनेकदा शक्य नसलेल्या अनेक गोष्टी आपण तांत्रिक पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोचवू शकतो. उदाहरणार्थ, फिटनेस या विषयाबद्दल वर्गात चर्चा सुरू असताना मला विद्यार्थ्यांना बसल्याजागी अनेक व्हीडियो दाखवता आले. प्रत्येक विद्यार्थ्याने त्याला त्या व्हिडियोत काय आवडले, काय नाही आवडले हे सांगितले. स्वतःच्या फिटनेससाठी आपण काय करतो याचा एक छोटासा व्हीडियो बनवून प्रत्येक विद्यार्थ्याने तो वर्गात शेयर केला. यामुळे वर्गात फार धमाल आली. शिक्षण आनंददायी झाले.
◆ अडचणी सगळ्यांना सारख्याच प्रमाणात येत आहेत पण शिक्षकांनी एकमेकांसोबत काम, ब्रेन स्टोर्मिंग, वर्गाची पूर्वतयारी केल्यास त्याचा सर्वांना खूप फायदा होऊ शकतो. यातून वेगवेगळ्या कल्पना आकार घेऊ शकतात. प्रत्येकाच्या कल्पकतेचा वापर होऊन लेक्चर प्लॅनिंग चांगले होऊ शकतो. Annotate या झूममधल्या एका तंत्राचा वापर विद्यार्थ्यांकडून कसा करून घ्यावा याची माहिती मला एका मैत्रिणीने उत्तमरीत्या समजावली. त्याचा वर्गात मला खूप फायदा झाला.
◆ शिक्षकांसाठी परवलीचा शब्द असतो पोर्शन! ऑनलाईन वर्गात प्रत्यक्ष वर्गापेक्षा फक्त ७०% पोर्शन पूर्ण होऊ शकतो, हे सत्य आहे. कनेक्टिव्हिटी, रेंजच्या असंख्य अडचणी दोन्ही बाजूंनी येतात. पण उरलेले ३०% ऑफलाइन शिक्षण पद्धतीने भरून काढू शकतो. उदाहरणार्थ, गुगल क्लासरुममधे वर्कशीट देणे, ती तपासणे, वॉट्सऍपवर विविध दृक्श्राव्य फिती पाठवणे, तिथे विद्यार्थ्यांशी जमेल तसा संवाद साधणे, त्यांचा वर्गातला इंटरेस्ट टिकवून ठेवणे, गुगल फॉर्म वर परीक्षा घेणे वगैरे. हे आपण नक्कीच करू शकतो.
◆ ऑनलाईन शिक्षणाचा जसा प्रसार होऊ लागला तसा शिक्षकांसाठी जगभर अनेक ऍप्समधे विशेष सवलत दिली. Kahoot, Mentimeter, Quizziz ही त्यातली काही ऍप्स. अशी इतर अनेक आहेत. याचा शक्य तितका वापर शिक्षकांनी करायला शिकावा. एखादी quiz बनवली तर आधी आपल्या शिक्षकमित्रांबरोबर ऑनलाईन खेळून पाहावी. परत लहान होऊन मजा करण्यासारखं आहे हे, पण जमल्यास अवश्य करावं. त्याने शिकवण्यातली मजाही टिकून राहते. कारण शेवटी सगळ्या गोष्टी फक्त ज्ञानापाशी येऊन थांबत नाहीत तर आनंदापाशी येऊन थांबतात. जी गोष्ट आनंदाने आणि प्रेमाने शिकवली आणि शिकली जाते ती कायमस्वरूपी लक्षात राहते.
माझा अर्धवट राहिलेला अभ्यास मूर्खबावळटनालायक कोरोनामुळे परत माझ्यासमोर उभा राहिला. तो मी परत पूर्ण करायला घेईन की नाही याची शाश्वती नाही पण ऑनलाईन अभ्यासक्रम या विषयात काहीतरी भरीव कामगिरी करायची इच्छा मात्र नक्कीच मला झालेली आहे. फक्त परकीय भाषेसाठी नाही, तर माझ्या मातृभाषेसाठी, मराठीसाठी देखील काहीतरी करायचे आहे.
एखादी नवीन गोष्ट, नवीन व्यवसाय, शिक्षण, चांगली सवय, छंद, प्रोजेक्ट काहीही करायला घेतले असेल तर ते आपल्या परीने पूर्णत्वाला न्या. नाहीतर कधी, केव्हा, कुठे, कसा या अपूर्ण ठेवलेल्या गोष्टी तुमच्यासमोर कोणत्या स्वरूपात फेर धरून नाचायला लागतील याचा नेम नाही.
हे आत्मकथन सांगण्याचं प्रयोजन इतकंच…
समांतर
लेखिका- पूजा खाडे पाठक
खराळवाडीचा बोर्ड दिसला तसा आनंदच्या गाडीचा वेग कमी झाला. त्याने गाडी बाजूला पार्क केली आणि गाडीतून उतरला. डोळ्यांवर काळा गॉगल चढवला. वस्ती तशी बकालच होती. तो निघणार इतक्यात त्याला काहीतरी लक्षात आलं. त्याने गाडीचा दरवाजा उघडला आणि आतली पिशवी घेतली.
खोलीवर पत्रे चढवून वाढवलेले मजले, गुलाबी निळे रंग दिलेल्या खोल्या, खोल्यांच्या बाहेर ठेवलेले निळे ड्रम, बाहेरच भांडी, कपडे धूत बसलेल्या बायका, मधूनच वहाणारं छोटंसं गटार, अधूनमधून फिरणारी आणि लाळघोटेपणाने शेपटी हलवणारी कुत्री. लोक तिथेच गप्पा मारत होते, मधूनच एकमेकांना शिव्या देत होते आणि तिथेच पचापच थुंकत होते. सगळ्यालाच दारिद्रतेचा रंग चढलेला. सगळेच त्या बकाल, किळसवाण्या घाणीत आनंदाने जगणारे. आनंदाने की बधिरतेने हा प्रश्न त्यांना कधीच पडणार नव्हता.
एका काळपट, अंधाऱ्या दुकानात तो डोकावला. एक म्हातारा तिथे दात कोरत बसला होता. दुकानाला जीर्ण निळा रंग होता आणि त्याचे पोपडे निघाले होते. समोरच असलेल्या काचेच्या बरणीत दाण्याचे लाडू, क्रीमरोल, कसलीतरी बिस्कीट ठेवली होती. चारदोन निरमा, पार्ले जी, शाम्पूच्या सुट्या पुड्यांची माळ आणि लटकणारी थोडीफार लाल पिवळ्या बॉबीची पाकिटं सोडून तिथे काहीही नव्हतं. समोरच असलेला जुन्या पद्धतीचा तराजू करकरत होता.
“शिर्पे कुठे राहतात ?” त्याने त्या वातावरणाला अजिबात न शोभणाऱ्या सौम्य शब्दात विचारले. “नाय मैत” म्हातारा दृष्टी न वळवता म्हणाला.
आता काय करावं? इतक्या दूर, इतके द्राविडी प्राणायाम करून आलो ते यासाठी? बरं, दोन चारशे झोपड्यांच्या वस्तीत शोधणार तरी कसं?”
शाम्पूच्या पुड्या द्या दोन” आवाज आला तशी त्याची तंद्री तुटली. म्हाताऱ्याने उठत शेंपूच्या दोन पुड्या त्या गाऊन घातलेल्या बाईच्यासमोर टाकल्या. “बघा ना शिर्पे, कोणाला माहित असतील तर .. ” तो परत एकदा म्हणाला. “कोण पायजे तुमाला?” गाऊनवालीने आश्चर्याने विचारले. “शिर्पे” तो म्हणाला. “आवो शिरपिन बाई असल, बाकी कुनी नई शिर्पे हिकडं. ” बाई म्हणाली. “हो हो बाईच आहेत. कुठे राहतात त्या?” त्याने विचारले.
“अस्स जा, त्या समोर तिकडं लाल साडी दिसतीये ना, तितन लेफ्ट घ्या. समोर एक प्लाष्टिक चा कारखाना हाय एका खोलीत, वास यील लांबनच. तिथंच शेवटची खोली,संडासाच्या बाजूची.” बाई म्हणाली. हे सगळं सोडून आत्ताच्या आत्ता पळून जावंस वाटलं त्याला. पण आता कदाचित खूप उशीर झाला होता. तो एकएक पाऊल पुढे टाकू लागला.
——
“खूप वर्षांनी ही लॉकर्स उघडताय तुम्ही!” बँकेचे मॅनेजर म्हणाले. तो नुसता हसला. लॉकर उघडून आत बघितले तर आत पिवळे पडलेले काही कागद आणि पावत्या होत्या.
“कल्याण बालकाश्रम”
त्याच्या प्रश्नांची बरीच उत्तरे त्या दोन अक्षरात दडली होती.
—
पाच हजार रुपये “चारल्यानंतर” आज शेवटी ती जुनी खोली उघडली. “ए पटापट शोध बाबा ९५ वाली फाईल. एकतर नोंद केलेली नाहीये.” दबक्या कुजबुजीनंतर कपाटाची दारं करकरू लागली. त्या काळसर खोलीत उजेड वरवर तरंगत होता. धुळकट , कुबट, लाकडी वास असणाऱ्या त्या खोलीत अनेक आयुष्याची उलगडलेली आणि न उलगडलेली गुपितं , अनंत कथा व्यथा दडल्या होत्या. प्रत्येक पानामागे एका जीवाची देवाणघेवाणीची नोंद होती. कितीतरी धाग्यांचे जंजाळ त्या खोलीत पसरल्याचा त्याला भास झाला.
“नर्मदा शिर्पे, खराळवाडी. इतकंच कळलंय साहेब.” कारकून म्हणाला.
काही न बोलता जास्तीचे शंभर त्याच्या खिशात कोंबून तो निघाला ते थेट घरी.
—
“येऊ का रे आत?” त्याला आवाज आला तशी त्याची तंद्री भंगली. “ये ना .. ” म्हणत तो उठून बसला. “काही झालंय का? बिझनेसचं टेन्शन आहे का तुला? हल्ली बोलत नाहीस तू फार .. काय झालय?” आईने विचारले. त्याने आईकडे पाहिले.
साठीच्या आत बाहेर असलेली त्याची आई. पोक्त , गोरटेली , रुबाबदार! सगळ्या बिझनेसचा लेखाजोगा एकहाती ठेवलेली. बाबांइतकीच कर्तबगार.
प्रश्न त्याच्याही मनात होते.
आपले आईवडील इतके वयस्कर कसे? आपण त्यांच्यासारखे का दिसत नाही? आपण बाळ असतानाचा एकही फोटो घरात कसा नाही? या सगळ्या गोरटेल्या लोकांमध्ये आपण असे गहूवर्णीय कसे निपजलो?
पण आता या प्रश्नांची उत्तरं तो स्वतः शोधणार होता.
—
ती गाऊनवाली बाई म्हणाली तसं प्लास्टिकचा वास नाकात शिरला. गल्लीच्या शेवटी सार्वजनिक संडासचा बोर्ड होता. त्याच्या अलीकडची शेवटची खोली. उजवीकडच्या खोलीबाहेर उंबऱ्यात म्हातारा बसलाय एक. ते असेल का घर ?
एक एक पाउल पुढे पडू लागले.
तो त्याच्या मुळांजवळ आला होता. झाड कितीही वाढले तरी मुळांबद्दल त्याला कायम माया असतेच. आपण कोण आहोत, कुठून आलोय आणि कशापासून बनलीय, कोणापासून बनलोय .. हे माहित असणे फार महत्वाचे असते. त्यात बरीच उत्तरे दडलेली असतात.
We must know our roots!
आपली पाळमूळ इथं रुजली आहेत? ह्या घाणीत? त्याच्या मनात आलं. तो स्वतःच्याच विचारांवर चपापला. पण शेवटी ते मनात येऊन गेले होते.
म्हणजे आपण दत्तक गेलो नसतो तर आज आपण इथे…
त्या शेवटच्या खोलीत तो डोकावला. अंधारलेल्या खोलीत स्टोव्ह आणि रॉकेलचा वास येत होता. “शिर्पे?” त्याने विचारले. “समोरे बगा, ते टवका उडालेले लाकडी दार” आतून आवाज आला. तो सांगितलेल्या दारापाशी गेला. दार बंद होतं. तो बराच वेळ उभा राहिला. सगळे जग त्याच्याभोवती फिरत होते पण तो स्तब्ध उभा होता. तो पूर्णपणे थांबला होता आणि गोठून गेला होता. असा किती वेळ तो उभा राहिला काय माहिती?अचानक मागून आवाज आला “कोन पायजे ?” तसा तो मागे वळला.
चाळिशीतली, मध्यम बांध्याची, हिरवी चॉकलेटी जॉर्जेटची साडी आणि त्यावर लाल ब्लाउज, तेलकट केसात मधूनच दिसलेली चंदेरी बट, नाकात चमकी आणि कानात असंख्य सुम्पली. दात मिश्रीने काळे झालेले. अशा अवतारात डोळ्यांवरचे ऊन अडवत,तोंड फिस्कारून ती बाई त्याच्याकडे बघत होती.
“शिर्पे?”त्याच्या घसा कोरडा पडला होता.
“हा मीच, काय काम हाय?” उत्तर आले.
तिथेच बसून ढसाढसा रडावे असे वाटले त्याला. का? कशासाठी माहित नाही पण त्याच्या डोळ्यांच्या कडा लालेलाल झाल्या.
“काम म्हणजे .. तुम्हाला भेटायचं होतं .. ” तो अडखळत म्हणाला..
“आत या” तिने दार उघडलं. त्या खोलीत एका बाजूला मोरी, त्यात बादलीभर पाणी आणि तांब्या, त्याला जुनाट पिवळा पडदा , गॅस, फळकुटावर दहा बारा बरण्या, लोखंडी खाट आणि खुंटीला टांगलेले कपडे.
तिने पायांवर पाणी घेऊन त्याला ग्लासात पाणी आणून दिलं.
“बोला साहेब” ती म्हणाली आणि त्याला कससंच झालं.
“मी कल्याण बालकाश्रम मधून आलोय.” तो तिचा अंदाज घेत म्हणाला. “बर मग?” तिने विचारले. “तिथून इथला पत्ता मिळाला म्हणून आलोय” तो पुन्हा म्हणाला. त्याला हवे असलेले हावभाव तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हते. ती प्रश्नार्थक चेहऱ्याने त्याच्याकडे बघत होती.
“मला तुम्ही आश्रमात सोडलं होतं. २५ वर्षांपूर्वी.” तो सरळ स्वच्छ भाषेत म्हणाला. तिला काही क्षण काहीच कळलं नाही आणि अचानक ती सुन्न झाली आणि मटकन खाली बसली.
बराच वेळ कोणीच काही बोललं नाही. तो तिच्याकडे आणि ती त्याच्याकडे अधून मधून फक्त चोरटी नजर टाकत होते.
“तू माझी आई आहेस .. ” कडू औषध गिळावे तसे गपकन सांगून टाकले.
तिचे डोळे गोठून गेले होते. पोटात कालवाकालव सुरु होती. तिने त्याच्याकडे बघितले. तिच्यासारखाच गहू वर्ण, मजबूत शरीरयष्टी असलेला तिचा मुलगा. जो तिने २५ वर्षांपूर्वी स्वतःपासून स्वेच्छेने वेगळा केला होता, तो आज तिच्यासमोर बसला होता.
खोलीत जीवघेणी शांतता नांदत होती.
“क .. कस कळलं .. म्हणजे हितला पत्ता .. ” तिने जड आवाजात विचारले .. “काढला शोधून .. ” तो कडवटपणे म्हणाला ..
त्या तेवढ्या वेळात ते दोघे एक समांतर आयुष्य जगत होते. तो तिथे, तिचा मुलगा म्हणून असता तर आत्ता काय करीत असता? तिच्याशी काय बोलत असता? किती शिकला असता? त्या दोघांच्याही मनात मागची २५ वर्षे झर्रकन निघून गेली. त्याला ती लहानपणी खेळवताना दिसू लागली, शाळेत सोडताना दिसू लागली, झोपवताना दिसू लागली आणि तिला तो..
पण आत्ता दोघे नदीच्या एका समांतर किनाऱ्यावर उभे होते जिथून एकमेकांना फक्त बघता येते. ते रस्ते कधीही एक होत नाहीत.
खूप वेळाने तो उठला. “मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता, पण मला मी कोण आहे, कुठला आहे, कोणाचा आहे, हे सगळं शोधायचं होतं, माझ्यासाठीच .. म्हणून हे सगळं .. ” तो म्हणाला. हातातली पिशवी खाली ठेवली .. “हे तुझ्या .. तुमच्यासाठी .. ” म्हणून तो वळला आणि बाहेर पडला. काही उललेल्या नेणिवेच्या जखमा उघड्या करत. परत कधीही न वळण्यासाठी…
ती अन मी
लेखक- बी आर पवार
ती आली तेव्हा, अवघी वीस एकवीस वर्षांची, पोर होती. पण तिच्यात जादू होती. तिच्या लाघवी स्वभावानं, हळुहळु घरातल्या लोकांना बांधुन ठेवायला सुरुवात केली. घरकामातलीही प्रत्येक गोष्ट ती बारकाव्याने करायची.
तिला लग्न करून आणली , म्हणजे फक्त घरच्यांच्या सेवेशी, दुसऱ्या घरातुन एक व्यक्ती आणली, हा वाड्यातल्या खानदानी लोकांचा समज तिनं काही दिवसात धुळीला मिळवला. घरातलं सर्व पाहून ती नोकरी करायची. त्या काळात स्त्रीनं नोकरी करणं, साता समुद्रा पार जाण्या सारखं होतं. तसे तिचे सासरे अन वडील दोघे मित्रच. मैत्रीतून नातेसंबंध झाले होते. म्हणून नोकरी करायला परवानगी मिळाली. सासऱ्यानी लहानपणीच हेरून ठेवलेली सून. पण लाडाकोडाचे दिवस संपून कर्तव्याचे दिवस सुरू झाले की जीवाचा कोंडमारा होतोच.
कधीतरी एका कोंदट क्षणी, तिनं माझ्या खांद्यावर, चार अश्रू मुक्त केले अन मन मोकळं केलं. तेव्हा कुठे, मी जिवंत असल्याची जाणीव मला झाली. तिला बंधनात बांधून ठेवण्याची इच्छा बाळगणाऱ्यांचा मला खूप राग यायचा पण मी काही करू शकत नव्हतो.
सकाळ झाली की, की ती पदर खोचून कामाला लागे. कुणाचा नाश्ता, कुणाला दूध, कुणाला चहा, सगळ्या आवडीनिवडी जपत, स्वतःच्या टिफिनची पण तयारी करत राही.
सासऱ्यांची अन देवाची अंघोळ झाल्याबरोबर चहा. सासूबाईंना शेळ्या, कोंबड्यांमधून सवड मिळाली की चहा. नणंदेला शाळेत जायच्या आधी पितळीभर दूध अन चपाती, दिराचा नाश्त्याचा पैलवानी थाट ……. असे वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे चहाचे नखरे, नाश्त्याचे नखरे संभाळताना, अधूनमधून माझ्या खांद्यावरच्या फडक्याशी हात पुसण्यासाठी तिची लगट, इतकंच माझ्या नशिबात.
बाकी काय, ….. आला गेला कुणीही, माझ्या खांद्यावर हात टाकून उभा राही. माझ्या वर फार विश्वास किंवा जिव्हाळा नव्हे तर आधारापूरताच माझा खांदा त्यांना हवा असायचा, …… हे फार उशिरा कळलं.
या सगळ्या रामरगाड्यात तिला पाहिलं की, मन प्रसन्न होई. पहाटेच्या प्राजक्त सड्या सारखी भासायची, न्हाऊन धुवून, ओलेते केस पुसत सामोरी आली की……
मला आरसा धरायला लावून , ती छान नटायची. कपाळावरचं सौभाग्यलेणं लावतांना, छान लाजायची. रात्री फुललेले क्षण गालावरच्या खळीत दिसायचे मला. ती माझ्या जवळच्या आरशात, अन मी तिच्या डोळ्यात, ……. पण काही क्षणच. पुन्हा ती तयार होउन, टिफिन , पर्स उचलून झपझप निघून जायची. ती शिक्षिका होती, शेजारच्याच गावात.
मग दिवस खायला उठायचा अक्षरशः……
कधी दुपारच्या उन्हातून कावून आप्पा यायचे, …… त्यांचा फेटा घ्यायला मी उभा. त्यांच्या चावडीवरच्या भानगडी ऐकायला मी, नाहीतर आत काही न काही खुडबुड करणारी म्हातारी, इतकीच काय ती दिवसभराची घरातली वर्दळ.
संध्याकाळी सगळेच यायचे. ………. पण तिचं येणं प्राणवायुच जणु …… दमून भागून यायची. अन मग छान फ्रेश होऊन चहा पीत राहायची अगदी निवांत, ….. माझ्या पाठीला पाठ लावून. अन पुन्हा तिचा वावर, माझ्या तिथल्या अस्तित्वाला अर्थ देत राहायचा.
अन अशाच एका प्रसन्न सकाळी, माझ्या हातातल्या आरशात, नेम धरून टिकली लावता लावता, तिला उचमळून आलं, अन अख्ख्या घरात जल्लोष सुरू झाला.
मला काहीच कळेना. तिला पहायला डॉक्टर आले, अन म्हातारी सासू साखर वाटत सुटली, वाडाभर.
मी आपलं, माझ्या मर्यादेत राहून, शक्य तितकं तिच्या खोलीत डोकावून पाहिलं. पण काहीच समजेना. जो तो पाव्हणा आला …. पाव्हणा आला …. म्हणतोय. पण कुणी पाव्हणाही दिसेना.
दोन दिवसांनी, पुन्हा माझ्याजवळच्या, आरशात पाहता पाहता, तिला पोटावरुन हात फिरवताना पाहिलं अन लक्षात आलं, यंदा मोहोर बहरला होता.
काही महिन्यात, उं उं करून माझ्याकडे कुतूहलाने पाहणारं बाळ आलं. तिच्या पदराआड दूध पिऊन, तोंडात अंगठा घालून, शांत झोपी जायचं, तेव्हा त्याच्या चेहऱ्यात उतरलेलं तिचं सौंदर्य मी न्याहाळत राहायचो तासनतास.
रांगत येऊन, माझ्या पायाला धरून ते उभं राहू लागलं. बोबडे बोल बोलत धावू लागलं. माझ्याजवळ बसून, ग म भ न गिरवू लागलं. नवरा जॉबसाठी सौदीला गेल्यावर, हळुहळू संपूर्ण घरदाराची जबाबदारी तिच्यावरच येऊन पडली. घरदार, शेतीवाडी, मुलाचं शिक्षण, सासूसासरे, नोकरी, खानदानी इभ्रत अशा वाड्याच्या अनेक जबाबदाऱ्या ती खांद्यावर घेऊन समर्थपणे उभी होती……. एखादया एकखांबी तंबूसारखी.
काळ जात होता. मुलगा मोठा होत होता. कॉम्प्युटर इंजिनिअर झाला होता. घरातलं एकेक माणूस काळाच्या झडपेत वजा होत होतं.
एके दिवशी कपाळावरचं कुंकूच गायब झालं. ती हलली. धाय मोकलून रडली. मला मिठी मारून रडली. मीही गहिवरलो. माझ्यासोबत वाड्याची कौलंही हलली.
हळुहळू ती सावरली. वजा झालेल्या माणसांच्या बदल्यात, घरात नवी सून आली. अन सुनेचा पायगुण की काय माहीत नाही ……. काही महिन्यात, मुलगा व्हाया बंगलोर, थेट शिकागोला पोहोचला. आईला आभाळ ठेंगणे झालं. गावभर कौतुकाचा वर्षाव. गावच्या चौकात फ्लेक्स, अन रिटायर झालेल्या आईसोबत , ……. फक्त होत्या आठवणी.
माझ्यासाठी खूप छान दिवस होते. आता ती पूर्णवेळ घरी असायची. मी तिला मनभरून पहात राहायचो.
तसं आमचं नातं, खूप आधीचं, ….. ती इथं येण्या आधीपासूनचं.
इथून जवळच असलेल्या तिच्या माहेरातलं. अजून मला आठवते ती,… नुकतीच परकर पोलक्यात आली होती. तिच्या एका वर्गमैत्रिणीचं शाळेत असतानाच लग्न ठरलं, तेव्हा आल्या होत्या दोघी, माझ्यासोबत खेळायला.
झोका बांधला होता , ……. माझ्याच फांदीला…….
त्या पुन्हा पुन्हा येत राहिल्या. नंतर कधीतरी, वर्गमैत्रीण लग्न करून गेली. ही मात्र येत राहिली. माझ्या कैऱ्या खायला, ….. आंबे पाडायला….. झोका खेळायला.
ती दोनतीन वर्ष माझ्या आयुष्यातली सोन्याची वर्ष होती. तिचा झोका उंच जाताना, माझं मनही अगदी हलकं हलकं होऊन जाई. पाखरू होऊन तिच्यासोबत विहरत जाई. ती माझ्याशी खूप गप्पा मारायची. तिच्या गप्पांमधून मी जग पहायचो. मी बोलू शकत नव्हतो तरी ती भरभरून बोलत राहायची.
माझ्या या सुखाला नजर लागली, अन माझा सौदा झाला. शेजारच्या गावच्या देशमुखांच्या वाडा जुना झाला होता. चांगल्या लाकडातले काही जाडजूड नवे खांब त्यांना हवे होते. मी आतल्या गाठीचा नसल्यामुळं, माझं सिलेक्शन झालं. मी रडणार नव्हतोच. पण नेमकं मला कापताना ती आली अन धाय मोकलून रडू लागली.
खरंतर ती तरी कुठं राहणार होती गावात. तिला पुण्यात मोठ्या कॉलेजात अकरावीसाठी ऍडमिशन मिळालं होतं. ती पुण्याला गेली अन माझी थेट, देशमुख वाड्यात दिवाणखाना अन स्वयंपाक घर यांच्या मधोमध खांब म्हणून नेमणूक झाली.
पण बहुतेक माझ्या हृदयातला आर्त आवाज निसर्गानं ऐकला अन त्याच देशमुखांच्या घरात ती सून म्हणून आली. सासरी आल्यावर तिचं बोलणं , तिची बडबड कमी झाली. खूपदा ओरडून सांगावं वाटायचं, “मीच तो आंबा, ….. ज्याच्यासोबत तु खेळायचीस….. बडबडायचीस.”
नाही बोलू शकलो. बहुधा तीही ओळखू नाही शकली.
…………………………………………………..
हं …… हल्लीच सहा महिने बंद होता वाडा.
चार दिवस झाले, ती माघारी आलीय. लेकाकडे गेली होती अमेरिकेला. नाही जुळलं सुनेसोबत.
आल्यापासून जरा उदास होती. माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं कि, बहुतेक तिला बरं वाटत असावं. काही वेळ माझ्याजवळ थांबली कि पुन्हा उत्साहाने कामाला लागते. माझा सहवास तिला भावतोय. अखेर ती ज्या वाड्याचा मुख्य खांब होती….. त्याच वाड्याचा मीही एक खांब होतो.
पण या सहा महिन्यात, वाड्याचं खूप नुकसान झालंय. वावटळीत नेमकी माझ्या माथ्यावरची कौलं उडालीत. ती परदेशी असल्यामुळं शाकारणी झाली नाही. पावसाळ्यात चिंब भिजलो यावेळी. आमराईत भिजायचो , …. अगदी तसा…… आंतर्बाह्य.
भिजलेल्या आमराईत, पावसानंतर उन्हं निघाल्यावर येतो तसा गंध भरून राहिलाय संपूर्ण वाड्यात…… बहुधा माझाच.
कदाचित, त्यामुळंच तर,… ती पुन्हा पुन्हा माझ्याजवळ येत नसेल ?
माझा गंध तिने ओळखला असेल का ? ……
आणि कदाचित मलाही? , ……
नयना
लेखिका- मानसी जोशी
“नाही… मी खरंच खून नाही केला. मला… मला … यातलं काहीच माहिती नाही. मी आणि रोहित भेटणार होतो, म्हणून मी तिथे गेले होते. मी खरंच खून नाही केला. मी तिथे गेले तेव्हा खून आधीच झाला होता.” नयना रडत रडत बोलत होती.
“हे बघा मॅडम, तुमचं रोहित वर प्रेम होतं पण त्याने तुम्हाला नकार दिला कारण त्याचं अंजलीवर प्रेम होतं, म्हणून तुम्ही त्याला ठार मारलंत. अंजली मॅडमनी उघड उघड तुमच्यावर संशय घेतला आहे. खुनाच्या ठिकाणी तुमच्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. रेड हॅन्ड पकडलं आहे आम्ही तुम्हाला. शिकल्या सवरलेल्या दिसताय, रेड हॅन्डचा अर्थ कळतो ना तुम्हाला? नक्की आम्हाला मूर्ख समजता की स्वतःला अतिहुशार, अगदी साधी भोळी असण्याचं नाटक करताय. सब इन्स्पेक्टर रचना गोंधळेकर आवाज चढवून बोलत होत्या. तेवढ्यात इन्स्पेक्टर समीर तिथे आला.
काय गडबड आहे गोंधळेकर मॅडम कशासाठी आरडाओरडा चालला आहे.
“सर, ‘ओपन अँड शट’ केस आहे. पण मान्य करायला तयार नाहीत मॅडम.”
समीरने लॉक अप मध्ये बसलेल्या नयना कडे नजर टाकली. एक २३/२४ वर्षांची मुलगी भेदरलेल्या अवस्थेत बसून होती. तिच्या डोळ्यात भीती पलीकडे काहीच दिसत नव्हतं. समीरने तिची केस फाईल तपासली. सगळे साक्षी पुरावे खून नयनानेच केला असल्याचं ओरडून ओरडून सांगत होते. पण अनेकदा दिसतं तसं नसतं, याची समीरला कल्पना होती. शिवाय नयनाच्या डोळ्यातली भीती पाहून त्याचं मन तिला गुन्हेगार ठरवायला परवानगी देत नव्हतं.
समीर लॉक अप मध्ये गेला. नयना समोर बसून म्हणाला, “जे काही झालं ते मला सगळं शांतपणे आणि सविस्तर सांगाल? तुम्ही खून केलेला नाही ना? मग घाबरता कशाला? तुम्ही जर मला सगळं व्यवस्थित सांगितलंत, तर मी तुम्हाला काहीतरी मदत करू शकेन. तुम्ही नुसतंच, ‘मी खून नाही केला’ असं म्हणून रडत राहिलात, तर तुम्हाला कोणीच मदत नाही करू शकणार.”
समीरच्या बोलण्यामुळे नयनाला थोडा धीर आला. तिच्या मनातली भीती कमी झाली. ती जरा सावरून बसली. समीरने पाण्याचा ग्लास तिच्यासमोर धरला. त्यावेळी पहिल्यांदा तिने डोळे वर करून समीरकडे बघितले. तिला त्याच्याबद्दल विश्वास वाटू लागला.
गुन्हेगाराला बोलतं करण्यात समीर हुशार होता. डोळ्यांची भाषा त्याला बरोबर समजायची. माणूस खोटं बोलू शकतो पण माणसाचे डोळे नाही खोटं बोलू शकत. मनातले विचार, भावना डोळ्यातून प्रगट होत असतात. त्यामुळे जर समोरचा माणूस तुमच्याकडे विश्वासाच्या नजरेने बघत असेल, तर तो तुमच्याजवळ त्याच्या मनातलं बोलणार हे नक्की, हे त्याचं गृहितक आजवर खरं ठरलं होतं.
पाणी प्यायल्यावर नयनाला जरा हुशारी आली आणि तिने बोलायला सुरुवात केली.
“रोहित, मी आणि अंजली एकाच कंपनीमध्ये काम करतो. मी आणि अंजली अगदी अकरावीपासूनच्या मैत्रिणी. कॅम्पस मधून आमचं एकत्रच सिलेक्शन झालं. खूप खुश होतो आम्ही. ऑफिसमध्येही आम्ही एकाच टीममध्ये होतो. रोहित आम्हाला सिनिअर. रोहितची आणि माझी पटकन मैत्री झाली. त्याला अंजली आवडायची, पण अंजलीच्या मनात काय आहे याचा त्याला थांगपत्ता लागत नव्हता. मी सुद्धा अंजलीला आडून आडून विचारायचा प्रयत्न केला होता, पण मलाही ती काहीच सांगत नव्हती. तरीही मला तिच्या वागण्यावरून तरी असं वाटत होतं की तिलाही रोहित आवडतो. म्हणून आम्ही एक prank करायचा ठरवला. याबद्दल फक्त मला आणि रोहितला माहिती होतं. यामध्ये मी रोहितच्या प्रेमात पडलेय असं अंजलीला भासवायचं आणि तिचं खरं मत जाणून घ्यायचं असं ठरलं होतं. या प्लॅन मध्ये आम्ही यशस्वी झालो. रोहित आणि अंजलीचं जमलं. मग मी सहज गंमत म्हणून हाच prank पुढे कॅन्टीन्यु करायचं ठरवलं. अंजली माझी खूप चांगली मैत्रीण आहे, तिला रोहितसाठी त्रास दिला आता थोडा त्रास रोहितला पण देऊया असं म्हणून मी मुद्दाम गंमत म्हणून त्याला मेसेजेस करायचे. त्या दिवशी मी रोहितला सगळं खरं खरं सांगायला भेटणार होते. कारण त्याचदिवशी मला दुसऱ्या प्रोजेक्टसाठी बंगलोर ऑफिसला जाणार का म्हणून ऑफिसमधून विचारलं होतं. सो बंगलोरला जायचा निर्णय घेण्यापूर्वी मला सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या होत्या. मी तिथे गेले तेव्हा बघितलं एका माणसाने रोहितच्या पोटात सुरा खुपसला, मी घाबरून किंचाळले तो माणूस माझ्याकडे वळणार तेवढ्यात अम्ब्युलन्सचा आवाज आला आणि तो पळून गेला. मी रोहितजवळ जाऊन त्याच्या पोटातला सुरा काढायचा प्रयत्न केला, तेवढ्यात मला कोणीतरी बघितलं आणि त्या माणसाने पोलिसांना फोन केला. मी सुरा काढत होते. मी का मारेन त्याला? आणि माझं त्याच्यावर प्रेम होतं असं जरी म्हटलं, तरी मी अंजलीला मारलं असतं, रोहितला नाही.” एवढं सगळं एका दमात बोलून नयना रडू लागली.
समीरने पुन्हा तिच्यासमोर पाण्याचा ग्लास धरला. त्याच्या हातातला ग्लास घेऊन तिने घटाघटा पाणी पिऊन टाकलं.
दोन दिवसानी रोहितच्या पोस्टमार्टमचा रिपोर्ट आला. रिपोर्ट पाहून समीर गालातल्या गालात हसला. या दोन दिवसात नयनाचे आई, वडील, ऑफिसमधले सहकारी, अंजली, इतर मित्रमैत्रिणींशी बोलून समीरने तिच्याबद्दल बरीच माहिती गोळा केली होती.
“काय झालं सर, हसताय का तुम्ही? त्या पोरीनेच मारलं ना रोहितला?” गोंधळेकर.
“गोंधळेकर मॅडम, किती घाई हो तुम्हाला. न्यायाधीश झाला असता, तर एका हिअरिंग मध्येच केस संपवली असती तुम्ही.” समीर हसत म्हणाला.
“सर भरपूर वर्ष काढली आहेत या नोकरीत. हवालदार गोंधळेकर पासून सब इन्स्पेक्टर पोस्टपर्यंत पोचेपर्यंतचा बराच अनुभव आहे गाठीशी. गुन्हेगार ओळखण्यात चूक नाही होणार माझी.” गोंधळेकर मॅडम.
“पण यावेळी झालेय”
“काय? ती पोरगी खुनी नाही?”
“नाही”
“कशावरून?”
“पोस्टमार्टम रिपोर्टनुसार!”
“म्हणजे..
“पोस्टमार्टम रिपोर्टनुसार खूनी राईट हँडेड आहे आणि नयना लेफ्ट हँडेड. तिला जेव्हा पकडण्यात आलं तेव्हाही ती तिच्या डाव्या हाताने सुरा काढायचा प्रयत्न करत होती. मी चौकशी करत असताना तिला पाणी दिलं तेव्हाच हा मुद्दा माझ्या लक्षात आला होता. तिने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी बरोबर होत्या अर्थात हे सिद्ध करणारे पुरावे तिच्याजवळ नव्हते, पण म्हणून ती गुन्हेगार होत नाही. तिने सांगितलेली एकमेव गोष्ट कन्फर्म करता आली की त्या वेळेला एक अम्ब्युलन्स तिथून गेली. पण ही गोष्ट तिला निर्दोष सिद्ध करायला पुरेशी नव्हती. त्यामुळे मी पोस्टमार्टम रिपोर्टची वाट बघत होतो.”
समीरच्या हुशारीचं गोंधळेकर मॅडमना कौतुक वाटलं आणि किंचितसी असूया पण वाटली. त्यांचं अंतर्मन मात्र नयनाला निर्दोष म्हणायची परवानगी देत नव्हतं. आपल्या अनुभवी नजरेला कोणीतरी चॅलेंज दिलं आहे ही कल्पनाच त्यांना बेचैन करत होती.
कोर्टामधून नयनाची निर्दोष मुक्तता झाली. समीरने या प्रकरणात नयनाला भरपूर मदत केली. नयना आणि समीरमध्ये हळूहळू छान मैत्रीचं नातं निर्माण झालं. सगळं सुरळीत चाललं होतं, अस्वस्थ होत्या त्या रचना गोंधळेकर मॅडम. का कुणास ठाऊक नयना बद्दल त्यांचं मत फारसं चांगलं नव्हतं. नक्की अनुभवी नजरेने धोका खाल्लेला आहे की समीरच्या नजरेने, हा प्रश्न त्यांना अस्वस्थ करत होता. आडून आडून त्यांनी समीरला नयना पासून लांब रहायचा सल्ला देण्याचा प्रयत्नही केला होता पण समीरला एकतर ते कळलं नव्हतं किंवा त्याने कळूनही दुर्लक्ष केलं होतं.
नयनाने आता नवीन ऑफिस जॉईन केलं होतं. सगळं काही विसरून नव्याने आपल्या आयुष्याला सुरुवात केली होती. वस्तुस्थिती कळल्यावर अंजलीनेही तिची माफी मागितली होती पण त्या दोघींच्या मैत्रीत अंतर पडलं, ते कायमचंच!
हळूहळू नयना आपल्या नवीन आयुष्यात स्थिरावत होती. समीरच्या मदतीने आयुष्यातल्या त्या दुर्घटनेला विसरण्याचा प्रयत्न करत होती. या सगळ्या प्रकरणात नकळतपणे अंजली तिच्यापासून दुरावली होती, खरंतर ती अंजलीपासून दुरावली होती, पण आयुष्यातल्या मैत्रीच्या नात्याची कमी समीरने पूर्ण केली होती.
नयना आता पूर्णपणे सावरली होती. झाल्या घटनेला दीड वर्ष होऊन गेलं होतं.
एक दिवस सकाळी अचानक नयनाच्या घरी पोलीस आले. त्यात गोंधळेकर मॅडमही होत्या. नयना ऑफिसला जायच्या तयारीत होती. अचानक आलेले पोलीस पाहून तिला धक्का बसला.
“नयना मॅडम, इन्स्पेक्टर समीर कुठाय?”
“म्हणजे, मला काय माहिती?”
“काल रात्री तुम्ही एकत्रच होतात नयना मॅडम.”
“हो. आम्ही एकत्रच होतो, पण रात्री अकराच्या दरम्यान समीरने मला घरी सोडलं आणि तो त्याच्या घरी गेला.”
“समीर सर त्यांच्या घरी गेलेच नाहीयेत.”
“मला नाही माहिती. मी… मी…फोन करते त्याला…. असं म्हणत नयनाने फोन हातात घेतला.”
“फोन लागत नाहीये त्यांचा. म्हणून तर आलोय आम्ही इथे.”
“अहो फोन लागत नाही यात नयनाचा काय दोष?” नयनाच्या वडिलांनी विचारले.
“नाही दोष काहीच नाही पण शेवटी समीर सर तुमच्या नयना बरोबरच दिसले होते.” पोलीस
“हो. बरोबर आहे, म्हणून मी त्याला गायब केलं असं जर का तुम्हाला वाटत असेल, तर ते पूर्णतः चूक आहे. मुळात मी असं का करेन? उलट हे सगळं ऐकून मलाच मोठा धक्का बसला आहे. काल मला प्रमोशन मिळालं. मी खूप खुश होते कारण या प्रमोशननंतर लवकरच मला अमेरिकेला जायची संधी मिळणार आहे. मी समीरला फोन करून ही गुड न्यूज दिली. तो संध्याकाळी फ्री होता म्हणून त्याला ट्रीट द्यायचं ठरलं. ऑफिस सुटल्यावर संध्याकाळी आम्ही भेटलो मस्त हिंडलो. रात्री एकत्र डिनर केलं आणि मग समीरने मला घरी सोडलं. त्यानंतर तो कुठे गेला मला काहीच माहिती नाही.”
“त्यानंतर तो कुठेच गेला नाही. त्याच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन तुझ्या घराजवळचं आहे. त्यांनंतर त्याचा फोन बंद झाला.”
“हो. त्याने मला सोडलं तेव्हा त्याच्या फोनची बॅटरी डिस्चार्ज झाली होती. त्याचवेळी शेजारच्या काकूंनी आम्हाला बघितलं होतं. तुम्ही त्यांना विचारू शकता. मी खरंच सांगतेय तो मला सोडून इथून निघून गेला होता.”
“ती चौकशी आम्ही करूच पण लक्षात ठेवा जोपर्यंत इन्स्पेक्टर समीरबद्दल माहिती मिळत नाही तोपर्यंत तुम्ही हे शहर सोडून कुठेही जाऊ शकत नाही.” गोंधळेकर मॅडम म्हणाल्या.
“मी कुठे जाणार मॅडम? समीर म्हणजे सर्वस्व होतं माझं. मला माहिती आहे तुमचा विश्वास नाही माझ्यावर पण तुमच्यापेक्षा समीरची जास्त काळजी मला वाटतेय. पण मला खात्री आहे तो अगदी सुखरूप असेल, त्याला काहीही होणार नाही. त्याने लग्नाचं वचन दिलं आहे मला. तो मला सोडून कुठेही जाणार नाही.” नयना.
“लग्न? तुझ्याशी?” गोंधळेकर मॅडमना हा दुसरा धक्का होता.
“का, आश्चर्य वाटायला काय झालं?” नयनाच्या बाबांनी विचारलं.
“अं… नाही काही नाही मला वाटत होतं, यांच्यात फक्त मैत्री आहे. ठीक आहे निघते मी.”
दोन दिवसांनंतर समीरच्या अपघाताची बातमी आली. मुंबई हायवेजवळच्या एका दरीत त्याची गाडी आणि प्रेत मिळालं. तसं नयनावर संशय घ्यायचा काहीच प्रश्न नव्हता. प्रश्न हा होता की एवढ्या रात्री समीर शहराबाहेर कशासाठी गेला होता? नयनाच्या म्हणण्यानुसार त्याच्या फोनची बॅटरी डिस्चार्ज झाली होती. गोंधळेकर मॅडमचं मन मात्र हा अपघात मानायला तयार होत नव्हतं. राहून राहून त्यांना यामध्ये घातपाताचा संशय येत होता.
समीरच्या केसची फाईल अपघाताची केस म्हणून बंद करण्यात आली. पोस्टमार्टम रिपोर्टमध्येही काहीच निष्पन्न न झाल्याने गोंधळेकर मॅडमना काहीच करता आलं नाही. नयनावर संशय घ्यावा तर, तिच्याविरुद्ध एकही पुरावा हातात नव्हता. शिवाय ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी ती घरीच होती. तसंही मागच्या वेळेस सगळे पुरावे हातात असून ती सुटली होती. यावेळेस तर सगळा डाव तिच्या हातात होता. पण नयना नसेल, तर कोण? पोलिसांना काय कमी शत्रू असतात, पण तरीही मनात नयना बद्दलच संशय का येतोय? खरोखरच हा अपघात आहे आणि आपण नयनाला चुकीचं समजतोय की नयनानेच त्याला मारलं, पण ती का मारेल? समीर तर लग्न करणार होता तिच्याशी, अर्थात हे नयना सांगतेय, ती सांगते म्हणून हे खरं कसं मानायचं? विचार करून डोकं फुटायची वेळ आली होती पण निष्पन्न काहीच होत नव्हतं.
“या घटनेला जवळपास सहा महिने होऊन गेले. एक दिवस गोंधळेकर मॅडमना नयनाचा फोन आला, “तुम्हाला जो संशय आहे त्याबद्दल महत्वाचं बोलायचं आहे. आत्ता मला एम.जी.रोड वरच्या गणपती मंदिराजवळ भेटायला जमेल? मी आहे तिथे थोडा वेळ. माहिती नाही नंतर भेटता येईल की नाही. शक्य असेल तर भेटा.” एवढं बोलून नयनाने फोन कट केला.
गोंधळेकर मॅडम विचारात पडल्या. नयना नक्की काय सांगणार आहे आणि एम.जी.रोड वरच्या गणपती मंदिराजवळ तर सामसूम असते. आत्ता तिथे जावं का, ती मला तर काही करणार नाही? स्टेशनमध्ये कोणाला सांगू का, नको.. कदाचित इथलाच कोणी गुन्हेगार असेल तर? जे काही असेल ते असेल, पण आत्ता तिथे जायला हवं हे नक्की. ती नयना विश्वासाच्या लायक नाही वाटत, पण काय सांगावं कदाचित समीरची थिअरी बरोबर असेल. ती निरपराध असेल आणि मी उगाचच पूर्वग्रहदूषित नजरेने तिच्याकडे बघत असेन. काहीही असलं, तरी सावध रहायला हवं.
एम.जी.रोड वरच्या गणपती मंदिराचा परिसर म्हणजे तसा सामसुमच. एकेकाळी प्रचंड रहदारी असणारा हा रस्ता पलीकडच्या नदीवर पूल बांधला गेल्यामुळे अगदीच सामसूम झाला होता. गोंधळेकर मॅडम तिथे पोचल्या तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. त्यांनी नयनाला फोन लावला पण तिचा फोन आउट ऑफ कव्हरेज लागत होता. नयनाला काही झालं तर नसेल? मनात आलेल्या शंकेला दूर करत, त्यांनी आजूबाजूला नयनाला शोधायला सुरुवात केली. अर्धा तास वाट बघितल्यावर त्या तिथून जायला निघाल्या. तेवढ्यात त्यांना नयनाने हाक मारली.
“ही काय पद्धत झाली नयना? तू इथेच आहेस म्हणून सांगितलं होतंस ना मला? अर्धा तास झाला मी इथे वाट बघत्येय तुझी आणि तू….”
“हो, हो, हो किती बोलताय? पण मला माहिती आहे आज तुम्ही इथे बोलायला नाही तर ऐकायला आलाय, बरोबर ना?”
“हो, बोल काय कळलं आहे तुला? आणि हा मुद्द्याचं बोल, तुझी ड्रामेबाजी ऐकायला वेळ नाही मला. आधीच अर्धा तास फुकट गेलाय.”
“बरं, ठीक आहे. मी पण मुद्द्याचंच बोलणार आहे. त्यासाठीच तर बोलावलं तुम्हाला. खरं तर मी इथेच होते तरीही अर्धा तास वाट बघायला लावली तुम्हाला. कारण तुमच्यासोबत इतर कोणी नाही याची खात्री करून घ्यायची होती मला.”
“काय? तू वेडी आहेस का? मला वाटत होतं मी तुझ्याबद्दल चुकीचा विचार करतेय. पण नाही तू खरोखरच विक्षिप्त मुलगी आहेस. मला तर सुरुवातीपासूनच तू कधी पटली नाहीस. समीरला मी आडून आडून तुझ्यापासून लांब राहायला सुचवत होते पण मूर्खासारखा प्रेमात पडला तुझ्या आणि….”
“ओ गोंधळेकर बाई, किती बोलताय? तुमच्या बडबडीला कंटाळूनच तुमच्या नवऱ्याने घटस्फोट दिला असेल तुम्हाला…”
“नयना….”
“ओरडू नका, तुम्ही माझ्याबद्दल वाट्टेल ते बोलताय ते मी सहन करायचं आणि मी तुमच्याबद्दल अवाक्षरही काढायचं नाही?”
“हे बघ नयना… ठीक आहे, चुकलं माझं, बरं सांग काय सांगायचं आहे?”
“समीरला का मारलंत तुम्ही?”
“काय? मी? मी का मारेन समीरला?”
“नाही मारलंत तुम्ही?”
“हे बघ नयना काहीतरी मूर्खासारखं बरळू नकोस, माझंच चुकलं, इथे यायलाच नको होतं मी”, असं म्हणून गोंधळेकर मॅडम जायला निघाल्या.
“थांबा, तुमचं काहीच चुकलेलं नाही. इन फॅक्ट तुम्ही नेहमीच बरोबर होता.”
“म्हणजे?”
“म्हणजे वाघाचे पंजे….”
“नयना, तू सांगणार आहेस की जाऊ मी?”
“सांगते. समीर आणि मी, खूप प्रेम करायचो आम्ही एकमेकांवर अगदी आम्ही लग्न करायचं ठरवलं होतं. खरंतर माझंच चुकलं. त्याच्यापासून लांब रहायला हवं होतं. पण कळलंच नाही मला मी कधी आणि कशी गुंतत गेले त्याच्यात! त्या दिवशी आम्ही एकत्र डिनर करत होतो. जेवल्यानंतर आम्ही अजून एक वाईन मागवली. वेटर वाईन सर्व्ह करत असताना चुकून थोडी वाईन समीरच्या अंगावर सांडली. तो वॉशरूम मध्ये जाऊन आला. त्यानंतर आम्ही मस्त वाईन पीत होतो. समीर नेहमीच वाईन सावकाश आस्वाद घेत पितो, आय मिन प्यायचा. त्या दिवशीही निवांतच होता. मी झटक्यात वाईन संपवली तेवढ्यात मला माझ्या आईचा फोन आला. ती आजीच्या घरी म्हणजे तिच्या माहेरी गेली होती. फोनवर तिने सांगितलं की आजीच्या घरी चोरी झाली आहे. ती खूप घाबरली होती. मी समीरला सगळं सांगितलं आणि म्हटलं, “तू वाईन संपव तोपर्यंत मी बिल देते आपण लगेच निघुया. माझी आजी सारगावला रहाते. हायवेवरून लेफ्ट घेतला की सुनसान घाटरस्ता. तिथे पोचायला फारफार तर पाऊण तास. माझ्या घरापासून हायवे 10 मिनिटांच्या अंतरावर ट्राफिक लागण्याची शक्यता जवळपास शून्य. आम्ही हॉटेलमधून निघालो, बाहेर आल्यावर मी बाबांना फोन लावायचा प्रयत्न केला पण बाबा फोन उचलत नव्हते. मग मी समीरला म्हटलं तू मला घरी सोड आणि पुढे हो. मी आणि बाबा फोर व्हीलर घेऊन येतो. समीरने मला घरी सोडलं आणि तो सारगावला गेला आणि वाटेत त्याचा अपघात झाला.”
“झालं? संपलं? हे सांगायला बोलावलं होतंस तू मला? तुमच्या डेटची स्टोरी ऐकण्यात काडीचा इंटरेस्ट नाही मला”, गोंधळेकर मॅडम चिडून म्हणाल्या.
गोंधळेकर मॅडम! खूप घाई असते हो तुम्हाला. सांगतेय ना मी सगळं. आता मात्र शांतपणे ऐका.
सुरुवातीला तुम्हाला वाटत होतं ना मी रोहितला मारलं?
“हो”
“मग बरोबरच होतं तुमचं! मीच मारलं रोहितला. काय करणार त्याने फक्त माझा वापर करून घेतला होता आणि काम झाल्यावर तांदुळातल्या खड्यासारखं मला दूर केलं त्याने. हो मी अंजलीला जळवण्यासाठी प्रेमाचं नाटक केलं त्याच्यासोबत, पण मी खरोखरच त्याच्या प्रेमात पडले. शरीरानेही आम्ही काही प्रमाणात जवळ आलो होतो. त्या रात्री त्याच्यावर सर्वस्व उधळून द्यायला तयार होते मी. पण तो शुद्धीवर आला आणि दूर झाला माझ्यापासून. हा सगळा अपमान नाही सहन झाला मला म्हणून मारलं त्याला, संपवलं कायमचं! त्यानंतर खूप शांतता मिळाली मला.”
रोहित प्रकरणात गोंधळेकर मॅडमना नयनावर संशय होताच पण तरीही ती हे सर्व ज्या पद्धतीने सांगत होती ते बघून त्यांना प्रचंड धक्का बसला पण त्यांना समीरबद्दल जाणून घ्यायचं असल्यामुळे त्या शांतपणे सगळं ऐकत होत्या.
“तुम्हाला सांगू मॅडम, लहानपणी मला एक भाऊ होता. मुलगा म्हणून खूप लाड झाले त्याचे मला कायमच दुर्लक्षित केलं जायचं. पण माझा भाऊ खूप चांगला होता. माझ्यावर खूप प्रेम करायचा मी पण त्याच्यावर खूप प्रेम करायचे, पण एक दिवस त्याला ताप आला. मेंदूज्वर होता. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि परत आणलंच नाही. तो सोडून गेला आम्हाला. माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा एकमेव माणूस मला सोडून गेला. मी खूप दुःखी झाले. पण त्या घटनेनंतर मात्र आई, बाबा, आजी सगळे माझ्यावर भरभरून प्रेम करायला लागले. मला जीवापाड जपू लागले, तेव्हा मला कळलं आपल्याला दुःख देणारा आपला भाऊ होता. तो गेल्यावर आपल्या आयुष्यात सुखच सुख आलं आहे. याचा अर्थ आपल्याला दुःख देणारी व्यक्तीच नसेल, तर दुःख उरणारच नाही. त्यांनतर मला दुःख देणारा रोहित… त्याला संपवल्यावर तर खूपच समाधान मिळालं. मुख्य म्हणजे माझ्या डोळ्यासमोर त्याचं आणि अंजलीचं फुलणारं नातं बघायचं दुःख माझ्या नशिबी आलं नाही.”
गोंधळेकर मॅडम हे सगळं ऐकून थक्क झाल्या होत्या. आता त्यांना नयनाची भीती वाटायला लागली होती. पण तिने अजूनही समीरबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. जे सांगितलं होतं त्यात विशेष असं काहीच नव्हतं. नयना बोलतच होती. तिला थांबवत त्या म्हणाल्या, “तू मला समीरच्या मृत्यूबद्दल सांगणार होतीस.”
“अरे हो, तुम्हाला माझं पूर्वायुष्य जाणून घेण्यात काहीच इंटरेस्ट नसेल ना? तुम्ही तर समीरसाठी इथे आला आहात. सांगते आता या स्टोरीचा क्लायमॅक्स.. ऐका ज्यासाठी तुम्ही इथे आलात, माझी बडबड ऐकलीत तो क्षण आता आला आहे….
“समीर आणि माझं नातं छान बहरत होतं, पण अचानक समीरला माझा संशय यायला लागला होता. त्याला वाटायला लागलं होतं की मीच रोहितला मारलं आहे. अर्थात उघडउघड कधी बोलला नाही हे, पण मी ambidextrous आहे हे त्याला कळलं होतं. मी उजवा आणि डावा हात अतिशय सफाईने वापरू शकते आणि हे कोणालाच माहिती नाही अगदी माझ्या आई वडिलांनाही! पण समीर पडला हुशार इन्स्पेक्टर, त्याच्या नजरेतून ही गोष्ट सुटणं शक्य नव्हतं. त्या दिवशी आम्ही डिनरला गेलो होतो, तेव्हा अचानक समीरचा टेबलवरचा महागड्या कॅडल स्टँडला धक्का लागला. आता तो अचानक लागला की त्याने मुद्दाम केलं ते मला माहिती नाही. पण, तो कॅडल स्टॅण्ड मी पटकन उजव्या हाताने पकडला. तेव्हा समीर मला म्हणाला, “अरे वा! तू उजव्या हाताने पण व्यवस्थित पकडू शकतेस! तेव्हाच माझ्या लक्षात आलं की आता समीर नक्की रोहित प्रकरणाच्या मुळापर्यंत जाणार! तो आज ना उद्या माझ्याविरुद्ध पुरावे शोधणार! आणि ज्या दिवशी रोहितचा खून मीच केला आहे याबद्दल त्याची खात्री पटेल, त्यादिवशी तो माझ्याशी ब्रेक अप करणार आणि तेवढ्यावरच थांबणार नाही, तर तो मला नक्की अटक करणार! मग काय? मग माझ्या आयुष्यात दुःख येणार. पण मला दुःखी नाही व्हायचं, यासाठी एकच उपाय होता माझ्याकडे, दुःखाचं मूळच संपवायचं म्हणून मी मारलं माझ्या समीरला! पण त्याला मारल्यावर मला खूपच दुःख झालं आहे, त्याच्या आठवणी बेचैन करतात मला!
बोलता बोलता नयना भावुक झाली होती. गोंधळेकर मॅडमचं डोकं सुन्न झालं होतं. पण तरीही हिम्मत करून त्यांनी विचारलं, “तू समीरला कसं मारलंस?”
“सांगते! समीरला आज ना उद्या सत्य कळणार याची मला खात्री पटली होती म्हणून मी त्यावरचा उपाय शोधून आधीच माझ्या पर्समध्ये ठेवला होता. खरंतर त्या दिवशी मला कोणताही फोन आलेला नव्हता मी समीरसमोर सगळं नाटक केलं होतं.
माझ्या पर्समध्ये एका अशा ड्रॅगची बाटली होती, जो ड्रॅग दिल्यावर 1 तासाच्या आत माणसाची शुद्ध हरपते आणि 6 तासांपेक्षा जास्त वेळ जर त्यांचा अँटी डोस दिला नाही तर, माणूस मरण पावतो. मेल्यावरही साधारणतः 6 तासांनी या ड्रॅगचा अंमल शरीरातून पूर्णपणे नष्ट होतो. त्या दिवशी समीरच्या अंगावर वाईन चुकून सांडली नव्हती, तर मी पाय मध्ये घातल्यामुळे वेटर अडखळला आणि समीरच्या अंगावर थोडी वाईन सांडली. समीर वॉश रूममध्ये गेला तेव्हा त्याच्या वाईनमध्ये मी ड्रॅगचे 4 ड्रॉप टाकले. हे किती ड्रॉप टाकायचे याचं पण एक कॅल्क्युलेशन असतं. 4 ड्रॉपच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे साधारणतः 40 मिनिटात ड्रॅगचा प्रभाव शरीरावर पडायला सुरुवात होते. त्यामुळे अर्ध्या तासात समीर त्या निर्जन रस्त्याला पोचणं आवश्यक होतं. हॉटेलपासून माझं घर अवघ्या 10 मिनिटांच्या अंतरावर. ट्राफिक लागलं तर फार फार तर 15 मिनिटं. माझ्या घरापासून हाय वे 10 मिनिटांच्या अंतरावर ट्राफिकची शक्यता अगदीच कमी, जवळपास नाहीच. हायवेपासून 10 मिनिटांवर सारगावचा टर्न आणि पुढे निर्जन, काळोखी दरीचा रस्ता. सगळं गणित परफेक्ट होतं. अडचण होती ती पोस्टमार्टम मध्ये ड्रॅग मिळण्याची. म्हणून मी गाडीवर बसल्यावर माझ्या फोनचं नेटवर्क गेलं असं सांगून बाबांना फोन करायला समीरचा फोन घेतला. घराजवळ आल्यावर त्याचा फोन फ्लाईट मोडवर टाकला जेणेकरून त्याच्या फोनचं शेवटचं लोकेशन माझ्या घराजवळ होतं असं दिसेल. घराच्या गेटबाहेर मी समीरला बाबांना जागं करण्यासाठी हॉर्न वाजायला सांगितला. हॉर्नचा आवाज ऐकून शेजारच्या काकू खिडकीतून बघणार याची खात्री होती मला. पुढे सगळं माझ्या प्लॅन प्रमाणे झालं पण समीरला मारून मी सुखी नाही झाले उलट मी खूप दुःखी असल्यासारखं वाटतंय मला!”
गोंधळेकर मॅडम सुन्न झाल्या होत्या. नयना एक मानसिक रुग्ण होती. तिचं असं बाहेर राहणं अनेकांसाठी धोकादायक ठरू शकतं या विचाराने त्या भानावर आल्या आणि नयनाला म्हणाल्या, “अजूनही तू सरेंडर करू शकतेस. मी तुला मदत करते.”
“नाही…. नयना ओरडून म्हणाली. मी इथे फक्त तुम्हाला फॅक्टस सांगायला बोलावलं. ते पण समीरच्या मृत्यूनंतर माझ्या मनावर जे ओझं आहे, ते मला उतरवायचं होतं. दुःख देणाऱ्यांना मारून सुखी होता येत नाही, हे कळलं आहे मला. यापुढे मी कोणालाही मारणार नाही. मी हा देश सोडून चालले आहे. प्रमोशन नंतर मला ऑफिसकडून अमेरिकेला जायची संधी मिळाली आहे. ती मला गमवायची नाही, खरंतर गमवायची नव्हती म्हणून मी समीरला मारलं. आज रात्रीच माझी फ्लाईट आहे. आणि हो मला एक्सपोज करायचा प्रयत्न अजिबात करू नका, कारण आत्ता ऑन रेकॉर्ड मी सिटी मॉल मध्ये शॉपिंग करतेय. माझी गाडीही त्यांच्या पार्किंगमध्ये आहे. शिवाय माझ्याविरुद्ध तुमच्याकडे कोणताही पुरावा नाही. त्यामुळे मी जे काही बोलले ते विसरून जा. एवढं बोलून नयना तिथून निघून गेली. गोंधळेकर मॅडम हताशपणे कितीतरी वेळ तिथे उभ्या होत्या. आज त्यांच्या नजरेसमोर एक अपराधी गुन्ह्यांची कबुली देऊनही अटक न होता मोकाट फिरणार होता. पुढे किती बळी जातील या कल्पनेने त्या अस्वस्थ झाल्या होत्या.
दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बातमी आली, “इन्स्पेक्टर समीरच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर सब-इन्स्पेक्टर गोंधळेकर यांची त्यांच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या.” प्लेनमध्ये मोबाईलवरची ही न्यूज बघून नयना गालातल्या गालात हसत होती.
निश्चय
लेखिका- मानसी चापेकर
“स्वाती, अजून काकू कश्या आल्या नाहीत नाश्त्याला , दहा वाजले”
“हो गं, एरवी अगदी परफेक्ट असतात , मी बघते थांब” असं म्हणून स्वाती शेजारच्या देशपांडे काकूंकडे गेली आणि तिने त्यांच्या दारावरची बेल वाजवली. चार पाच वेळा बेल वाजवल्यानंतरही दार उघडलं गेलं नाही तेव्हा मात्र स्वाती घाबरली
“आई, अगं काकू आल्या आहेत ना नक्की बाजारातून?”
“हो तर, मगाशीच म्हणाल्या ना मला येते मी सगळं समान घरात ठेऊन आणि अंघोळ करून नाश्त्याला”
लॉक डाऊन नंतर आज आठ दिवसांनी केवळ किराणा आणायला गेलेल्या देशपांडे काकू घरात एकट्याच राहत होत्या, त्यांची एकुलती एक मुलगी मेधा आणि तिचे मिस्टर हे नोकरी निमित्त गेले वर्षभर अमेरिकेला गेले होते. खरंतर स्वाती म्हणालेली मी सामान आणून देते, पण ‘माझे पायही मोकळे होतील’ म्हणून त्या स्वतःच गेल्या होत्या.
दोन वर्षांपूर्वी देशपांडे काकूंची खुप मोठी हार्ट सर्जरी झाली होती, तेव्हापासून त्यांना मेधा खूप जपत होती, पण वर्षापूर्वी तिला नोकरीसाठी अमेरिकेला जायला लागले त्यामुळे शेजारी असलेल्या फडके काकूंना तिने आईची काळजी घ्यायला सांगितले होते. तसे खुपसे नातेवाईक सुद्धा गावातच होते, पण प्रत्येकाला कुठे सांगणार ,आणि त्यांचा शेजार खूप चांगला होता.
“काकू, अहो काकू, दार उघडा, कुठे आहात? पडला बिड्लात का कुठे? काकू…. “ असे म्हणत फडके काका काकू आणि स्वाती जवळ जवळ दहा मिनिटे प्रयत्न करत होत्या, आजूबाजूचे शेजारी पण दरवाजा उघडून बघायला लागले , पण दारातच होते, कारण सोशल distancing.
अडी अडचणीला काही लागलं तर मेधाने तिच्या एका खूप जवळच्या मैत्रिणीचा श्वेताचा फोन नंबर फडके काकूंकडे देऊन ठेवला होता, आणि ती दोन तिन बिल्डिंग सोडून जवळच राहत होती. तिला स्वातीने फोन लावला आणि ती हे सगळे कळल्यावर धावतच पाच मिनिटांत तिथे आली.
“ काय झालं फडके काकू नक्की ?”
“ अगं मगाशी काकू आल्या सगळं समान घेऊन बाहेरून , म्हणाल्या येते नाश्त्याला , आणि दारच उघडत नाहीयेत, बघ ना”
परत एकदा श्वेताने प्रयत्न केला, पण आतून काहीच आवाज येत नव्हता, तिलाही काही कळत नव्हतं, शेजारी नेहमी असणारी दुसरी किल्ली सुद्धा नेमकी त्यांच्याकडे नव्हती, किल्लीवाला आत्ता ह्या वातावरणात मिळणं अशक्य होतं. पण देवाच्या कृपेने त्यांचे घर तळमजल्यावर होतं.
“स्वाती एक काम कर एक मोठी काठी दे आणि मागे ये माझ्यासोबत आपण खिडकीतून दाराची कडी येते काढता का ते बघू”
दोघी मागे गेल्या. खिडकी नशिबाने उघडी होती. त्यातून काठी आत घालून कशी बशी कडी उघडली आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.
सगळे आत आले, तेव्हा काकू नुकत्याच अंघोळ करून बाहेर आलेल्या आणि दरवाज्यापाशी पडलेल्या दिसल्या. सगळ्यांनी मिळून त्यांना बेडवर नेऊन ठेवलं. तोंडावर पाणी शिंपडलं आणि त्या हळू हळू डोळे उघडू लागल्या.
“ काकू ,बरी आहेस का गं ?” श्वेताने काकूंच्या कपाळावरून हात फिरवत मायेने विचारले
“काय गं काय झालं मला? मी कशी इथे ?आणि ते जाऊदे तू कशी इथे आलीस?”
“काकू , काकू … किती ते प्रश्न , धीर धर जरा आणि आधी हे पाणी पी, मी तुझं बिपी आणि शुगर चेक करते, मशीन कुठे?
“पण मला हे झालं काय?”
“काकू अगं तू चक्कर येऊन पडली असशील, मला स्वातीने बोलावलं, मी आले आणि खिडकीतून काठी घालून दार उघडलं, कसली सॉल्लिड आहेस तू, बघ काय काय केलं आम्ही अगदी एखाद्या Detective सारखं”
केवळ वातावरणातला ताण घालवण्यासाठी श्वेता हे अगदी हसत बोलली
“ते जाऊदे आता तू ओके आहेस, पण उठू नकोस, पडूनच रहा” असं म्हणून श्वेताने बिपी आणि शुगर चेक केलं तर दोन्ही खूप वाढलं होतं. तिला कळेनाच आता काय करावं. आणि तिने निर्णय घेतला की काकूला घरी घेऊन जायचं. तिने फोन करून तिचा नवरा अलोक ह्याला गाडी घेऊन बोलावलं.
“श्वेता अगं आम्हीही घेऊ कि गं काळजी काकूंची, तू कशाला त्रास घेतेस?”
“फडके काकू, अगदी बरोबर आहे तुमचं, आणि तुम्हीपण घ्यालच काळजी, पण मलाच चैन पडणार नाही, हजारवेळा तुम्हाला, काकूला खुशालीचा फोन करण्यापेक्षा मी घरीच नेते काकूला, आणि ती बया बसली आहे ना सातासमुद्रापार ती मला सोडणार नाही, मी काकूला इथे असंच सोडलं तर”
अलोकचा फोन आला आणि कपाळाला हात लावत “अरे देवा” असं म्हणत श्वेता खुर्चीवर बसली.
“काय झालं गं श्वेता”
“काकू अहो अनेक दिवस गाडी बंद आहे ना लॉक डाऊन मुळे ,त्यामुळे गाडी चालूच होत नाहीये असं म्हणाला सुबोध, आणि काकूचा पायही मुरगळला आहे सो तिला चालत घेऊन जाणं शक्यच नाही, काय करावं आता?
“एक मिनिट, आमच्या इथे तो अरुण राहतो ना त्याची रिक्षा आहे, त्याला विचारते”
“पण काकू तो येईल का ह्या अश्या वातावरणात?”
“विचरून तर बघते”
फडके काकूंनी अरुणला फोन लावला, आणि तो अगदी पाचव्या मिनिटाला तिथे हजर झाला.
“अहो मला का नाही बोलावलं आधीच, देशपांडे काकू मला आई सारख्या अगदी, कितीवेळा त्यांनी मला अनेक बाबतीत मदत केली आहे, आणि कधीही हे उपकार फेडण्याची वेळ आलीच नाही , पण आता तुम्ही सांगा काय करू? तो कोरोना वगैरे ठीके, पण मी येतो रिक्षा घेऊन, बोला कुठे जायचं आहे?”
“अरुण अरे दोन तीन बिल्डिंग सोडूनच अगदी जवळ माझी बिल्डिंग आहे, तिथेच जायचं आहे काकूंना घेऊन” श्वेता बोलली आणि सगळे काकूंच्या घरात आले.
“अरे अरुण तू ही आलास का?, बघ कशी पडली ही म्हातारी, आणि उगाच तुम्हा सगळ्यांची धावपळ”
“काकू तू गप राहा बरं, आता मस्त सेवा करून घे ह्या श्वेता ताईकडून, आणि आराम कर मस्त”
काकूंचा पाय बराच दुखावला होता, त्यामुळे त्यांना अगदी उचलूनच रिक्षात बेऊन बसवावे लागले.
श्वेताच्या घरी आल्यावर अरुण चहा पिऊन घरी गेला, खरतर तो नकोच म्हणत होता, पण श्वेताने आग्रहच केला.
श्वेताच्या सासूबाई गावाला राहत होत्या, कधीतरीच इकडे शहरात ह्यांच्या घरी यायच्या, त्यामुळे त्यांची बेडरूम तिने काकूंसाठी तयार केली.
हे सगळं आवरेपर्यंत दुपार होऊन गेलेली. श्वेताने पटकन काकूंच्या पथ्याचा अगदी कमी तिखट, तेल असलेला स्वयंपाक केला. तिचा मुलगा यश, नवरा सुबोध जेवायला बसले आणि स्वातीने आत काकूंना ताट वाढून आणलं, तेव्हा तिने काकुंच्या डोळ्यात पाणी बघितले.
“ए काकू, काय झालं ? काही होतंय का ? दुखतंय का काही, सांग हं प्लीज”
“श्वेता ह्या अचानक आलेल्या कोरोनाच्या संकटात, मी अजून एक संकटच आहे ना गं तुम्हाला, किती त्रास होणार आहे तुम्हाला माझ्यामुळे”
“गप गं तू काकू , त्रास कसला ,तू माझी आईच आहेस, आणि आईचा कसला गं त्रास?”
“ मी कशी आई तुझी?”
“तू विसरलीस का काकू?, माझं जेव्हा miscarriage झालं होतं दुसऱ्यावेळी तेव्हा जी काही तू माझी सेवा केली होतीस ती मी कशी गं विसरू? आणि कोरोनाचे हे संकट कधीतरी दूर होईलच ना , त्यासाठी मी जन्मभरासाठी जोडलेली मेधा आणि तुझ्यासारखी लाखमोलाची नाती विसरून जाऊ का?”
आता दोघींच्याही डोळ्यात पाणी होतं.
“किती गं गोड आहेस तू, कॉलेज मध्ये असताना ह्या सोशल मिडीयावरची तुमची मैत्री, पण किती घनिष्ट झाली पुढे, माझा तर केवळ सख्ख्या नात्यांवर विश्वास, पण ही तुमची मैत्री इतकी फुलत गेली कि मलाही हे नातं पटलं आणि सर्वात लाडकं झालं”
“काकू कुठलंही नातं एकतर्फी नसतं गं, जितकं मी प्रेम केलं मेधावर तितकंच किंबहुना जास्तच मला तुमच्याकडून मिळालं, आणि हा व्यवहार आहे का गं, कि मी प्रेम केलं, कि तुम्ही करावं, ही आंतरिक भावना आहे, हो कि नाही ?”
“ए काकू आणि उगाच रडवलंस बघ तू , इतकी मस्त तुझ्या आवडीची ताकातली भेंडी केली आहेत, बघ बिचारी कशी मलूल पडली आहेत, आणि ही तू बनवतेस तशी कडीपत्त्याची चटणी, ए सांग ना मला कशी झाली आहे.”
आणि काकू खुदकन हसली “वेडी आहेस बघ, कसं हसवायचं रडणाऱ्या माणसाला तुला पहिल्यापासून बरोबर जमतं”
“मी इथेच बसते तुझं जेवण होईपर्यंत , नाहीतर बसशील परत मुळूमुळू रडत” असं म्हणत श्वेता तिथेच काकूजवळ बसली
आणि दोघी एकमेकांना घास भरवत कितीतरी आठवणी काढत , हसत खेळत जेवल्या.
“आणि ऐक तू पूर्ण बरी झालीस तरीही, हे कोरोनाचे सावट दूर झाल्याशिवाय इथून कुठेच जायचं नाही आहेस, तुझा पाय बरा झाला की तुझ्या हातचा गोडाचा शिरा आणि मटारच्या करंज्या खायच्या आहेत आम्हाला” असं म्हणून श्वेता त्यांना पायाला मलम लावून आणि पेनकिलर, त्यांच्या bp आणि शुगरच्या गोळ्या देऊन जेवायला गेली. आणि काकूंच्या डोळ्यात परत पाणी तरळलं, पण सुखाचं आणि आनंदाचे.
दुसऱ्या दिवसही काकू सवयीप्रमाणे सकाळीच साडेपाचला उठल्या, पण पाय अजूनही दुखत असल्यामुळे त्यांना उठता येत नव्हते. सकाळचे सर्व उरकायचे होते, चहाही हवा होता, पण आपण स्वतःच्या घरात नाही आहोत हे त्यांना माहित होते, पण सवय होणे कठीण होते. पाणी घ्यायला वाकून टेबलावरील तांब्या भांडं घ्यायला त्या वाकल्या तेव्हा चुकून भांडं त्यांच्या हातून खाली पडलं आणि जोरात आवाज झाला. लगेचच श्वेता धावत तिथे आली. “काकू काय झालं?, काय पडलं , , काही हवं होतं का गं?”
“श्वेता , बाळा sorry, तुला ह्या आवाजाने जाग आली का गं?, पाणी घ्यायला वाकले आणि भांडं पडलं, खरंच , दिवसभर इतकी कामं करून दमून झोपलेली असतेस , माझ्यामुळे तुला झोपेत… “
“काकू , प्लीज नको ना गं असं बोलूस , आणि sorry काय ?, थांब पाणी देते तुला आधी”
काकूला पाणी देऊन तिला हात धरून सकाळचे सगळे आवरून श्वेताने चहा बिस्कीट दिले.
“तू झोप गं परत हवी तर , आता मला नको आहे काही” काकू श्वेताकडे बघत हसत बोलल्या
“छे गं, आता नाही लागणार परत झोप , आता मस्त योगा करते , यश आणि सुबोधला पण उठवते, अगं सगळी कामं आटोपता आटोपता दुपार होतेच, उलट बरं झालं लवकर जाग आली , सगळं वेळेवर आवरेल माझं, तू झोप आणि, आराम कर, मी थोड्यावेळाने मस्त नाश्ता आणते तुझ्यासाठी”
थोड्यावेळाने मेधाचा व्हिडीओ call आला आणि तिने श्वेताचे मनापासून आभार मानले. आईची चौकशी आणि अनेक सूचना दिल्यानंतर काकू हसून म्हणालीच, “ बघ गं श्वेता ही माझी आई का मी हिची, केवढ्या त्या सूचना”
“अगं काकू मुली होतातच आईची आई अश्यावेळी , तिला नको बोलूस काही , बिचारी इतकी दूर आहे तर किती काळजी असेल तुझ्यासाठी”
“ बरं बरं , उंदराला मांजर साक्षी”
आणि सगळेच हसायला लागले.
श्वेताने पटापट सुबोध आणि यशच्या मदतीने सगळी कामं हातावेगळी केली. नाश्ता, जेवण आणि सगळं आटोपून द्पारी दोन वाजता श्वेता जराशी टेकली. अर्धा तासाने उठली, तर तिला जरा कणकण जाणवली, ती मनातून घाबरली. आता देवाने काय वाढून ठेवलं आहे समोर म्हणून थर्मामीटर मध्ये ताप बघितला तर एक ताप होता. सुबोधला उठवलं आणि त्याला सांगितल
“सुबोध ताप आलाय रे मला”
तो दचकून उठला “ काय ? किती ?
“अरे एक आहे , पण आता काय करायचे?
“हे बघ घाबरू नकोस अशी, आणि उगाच डोक्यात काही भलतेसलते आणू नकोस, ताप काय दुसरा कोणताही असू शकतो, तू एक काम कर दिवसभर आज पूर्ण आराम कर , बाकी मी बघतो”
“अरे असं कसं , काकू पण आहे बेडवर ,वर मी अशी झोपून राहिले तर कामं कोण करणार सगळी”
“वेडी आहेस का ?मी करणार नाही का सगळं? मी तुला गरम पाणी आणून देतो ते पी , एखादी पेन किलर बघतो आहे का”
“अरे काकूंना चहा देशील का करून प्लोज, आणि त्यांची औषधं पण “
“हे प्लीज वगैरे आधी मागे घे, प्लीज काय, sorry काय,”
सुबोध काकूंना चहा द्यायला खोलीत गेला तेव्हा त्या बऱ्यापैकी उठून बसल्या होत्या
“काय रे तू कसा आलास चहा घेऊन , श्वेता कुठे ? बरंबीरं नाहीये कि काय?”
“काकू श्वेताला ताप आलाय, बिचारी खूप disturb आहे आणि आम्ही टेन्शन मध्ये आहोत कि आता पुढे काय ? ”
“हं…. तिला म्हणावं अजिबात घाबरू नकोस, ही काकू आहे ना तुझी, ही तुझा ताप घालवते बघ”
“काकू तो नेहमीचा ताप असेल तर ठीके, पण हल्ली जरा भीती वाटते हो …. “
“त्या राक्षसी शब्दाचे नावच नको काढूस , हा ताप तो मुळीच नाही मला खात्री आहे. चल आधी मला घेऊन तुमच्या किचन मध्ये, काढा देते तिला गरमगरम प्यायला , लगेच पळून जातो कि नाही बघ ताप”
“काकू पण तुम्हालाच बरं नाहीये ,आणि तुम्ही कुठे हो !”
“काकू म्हणतोस ना , मग त्याच हक्काने आणि प्रेमाने मी करणार आहे हे”
शेवटी काकूंच्या विनंतीला मान देऊन तो त्यांना हाताला धरून किचन मध्ये घेऊन आला. त्यांना काढ्यासाठी जे जे हवे होते ते ते दिले , आणि नशिबाने ते घरात अव्हेलेबल होते.
काकू आणि सुबोध काढा घेऊन श्वेताजवळ आले, ग्लानिमुळे तिचा जरा डोळा लागलेला होता. पण काढा गरमगरमच प्यायला हवा म्हणून सुबोधने तिला उठवले.
“काकू , अगं तू कशी इथे , का उठलीस आणि बेडवरून?”
“ते सगळं नंतर, हा काढा घे आधी पटकन आणि गपचूप पडून राहा”
सुबोधेने डोळ्यांनी काढा घे नाहीतर काकूंना वाईट वाटेल अश्या प्रकारचे समजावले.
काढा घेतल्यानंतर रात्रीपर्यंत श्वेताचा ताप उतरला आणि तिला खूपच बरे वाटले. ती किचनमध्ये आली तर आत सुबोध ओट्यापाशी भाजी फोडणीला टाकत होता आणि डायनिंग टेबलाशी खुर्चीत बसलेली काकू कढईत केलेला साजूक तुपातला शिरा काचेच्या भांड्यात काढत होत्या
“काकू … असं म्हणत श्वेताने काकूंना जाऊन मिठी मारली आणि रडायलाच लागली”
“अगं अगं…. वेडी मुलगी , वाटलं ना बरं माझ्या काढ्याने ?, आणि हे काय रडूबाई , डोळे पूस आधी आणि आमच्या दोघांच्या हातचे गरमगरम जेवण जेवायला तयार हो, आणि बरं का ….हा तुझा सुबोध फार गुणाचा आहे हो खूप, किचनमध्ये कुठे काय ठेवलं आहे बरोबर माहित आहे, आणि भाजी पण मस्त बारीक चिरतो, नवऱ्याला छान तयार केलं आहेस तुझ्या हाताखाली , आणि हेच उत्तम, सगळ्यांना सगळं यायलाच हवं , आणि ते अश्यावेळी उपयोगी पडतं हो!”
“काकू….श्वेता अजूनही रडत रडतच बोलत होती “तुला मी इथे आणलं ते तू आजरी आहेस आणि पडलीस म्हणून, तुझी मी सेवा करयाला हवी आहे आत्ता, तर मीच तुझ्याकडून सेवा करून घेते आहे, किती वाईट वाटतंय गं मला”
“श्वेता एक सांगू, खरंतर मी इथे आले , तेव्हा मलाच खूप बावरल्यासाखं झालेलं, हे कोरोनाचे संकट, त्यात तुमची ऑफिसची ऑनलाईन कामं, वर घरात करावी लागणारी सगळी कामं आणि त्यात भरीस माझी अडचण, पण तू आणि सुबोधने ज्या प्रकारे मला इथे घरातीलच एक म्हणून सामावून घेतलं ना ते बघून मनावरील भार हलका झाला, कोण कोणासाठी कसं उपयोगी पडेल काही सांगता येत नाही,
आपण एकमेकांना हक्काचे मानतो ना गं बाळा, मग हे असं एकमेकांसाठी काय केलं हे कशाला मोजत बसायचं ?, तू माझी गुणी लेक आहेस , आणि ऐक बरं का ….ताप बरा झाला असला तरीही हाच काढा आज रात्री आणि उद्या पण घ्यायचा, कारण ताप परत आला तर परत हे मोठे मोठे टपोरे मोती येतील ना डोळ्यांतून”
“ काकू , तू पण ना” असं म्हणत श्वेताने काकूला घट्ट मिठी मारली
सुबोध हे सगळं बघत होता आणि मनात एक निश्चय करत होता कि कोरोनाचे संकट जेव्हा जाईल तेव्हा जाईल ह्या माउलीला आपल्या घरीच रहायला आग्रह करायचा , कुठेही जाऊन द्यायचं नाही.
रण संग्राम
लेखक- अभिजीत अशोक इनामदार
(भाग १)
राजा धर्मसेन आपल्या महालातल्या खलबतखान्यात काळजीने येरझार्या घालत होता. त्याच्या समोरच त्याच्या गुप्तचर विभागातील दोन अतिशय विश्वासू सेवक उभे होते. त्यातील एक खुद्द त्याच्या गुप्तचर विभागाचा प्रमुख हिम्मतराव आपल्या राजासमोर अदबीने हात समोर जोडून उभा होता. त्याच्या पाठीमागे त्याच्या बरोबर नेहमी असणारा जिवाजी तोही खाली मन घालून अदबशीर उभा होता. आज ह्या दोघांनी अशी बातमी आणली होती कि राजा धर्मसेनला सुद्धा चिंतीत व्हावे लागले होते. बराच वेळ सर्व शक्यतांचा विचार करुन आजा धर्मसेन म्हणाला
“हिम्मतराव, तुम्ही हे पक्के खात्री करून बोलताय ना?”
“होय महाराज” हिम्मतराव म्हणाले. “आम्ही दोघेही सुरजनगरीत त्यावेळी हजर होतो. त्रिविक्रमाच्या फौजा सुरजनगरीवर चालून आल्या तेव्हा आम्ही बाजारात साध्या नागरिकांच्या वेशात माहिती काढत फिरत होतो. तेव्हाच ती फौज तुटून पडली. सुरजनगरीला प्रतिकार करायला सुद्धा वेळ मिळाला नाही. आम्ही कसेबसे शहराच्या बाहेर आलो अन तसेच इकडे कूच केले.”
हिम्मतराव बोलायचं थांबला तेव्हा राजानी त्यांच्याकडे पाहिले, ते ज्या गावकर्याच्या वेशात सुरजनगरीत होते त्याच वेशात ते अजूनही होते. साधा कुडता धोतर अन डोक्याला मुंडासं. गालावर खुरटी दाढी वाढलेली. सगळा फौज फाटा घेऊन सुरजनगरला जायला साधारण दोन आठवडे लागत ते अंतर ह्या पठ्ठ्यानी एक दिवस अन एक रात्रींमध्ये पार केले होते. अविश्रांत केलेली दौड त्यांना जाणवत होती. थंड हवा, पोटाला लागणारी भुक, पाणी वारा ह्यांचा विचार न करता ते फक्त आणि फक्त आपल्या राजासाठी दौडत राहिले होते अन आल्या आल्या राजाच्या कानावर ही महत्वाची बातमी घातली होती.
थोडावेळ त्यांच्याकडे पाहून राजांनी आवाज दीला “कोण आहे रे तिकडे”
बाहेरच्या पाहर्यावरील एक सेवक पळत आत आला. राजांनी सेवकांना सांगून त्या दोघांसाठी काहीतरी खायला आणि प्यायला घेवून यायला सांगितले.
खाणे झाल्यावर त्या दोघांना थोडा आराम करायला सांगून अजून निवांत बोलू असे त्यांनी सांगितले.
सुरजनगरी हि धर्मपुरच्या खूप जवळचं राज्य. धर्मपुरचा राजा धर्मसेन अन सुरजनगरीचा राजा कापिलसेन हे एकमेकांशी मैत्री ठेऊन होते. दोघांमध्ये कधीही कुठलेही वैर किंवा वितुष्ट नव्हते. दोन्ही राज्यांमधील जनता एकमेकांच्या राज्यांमध्ये जाऊ येऊ शकत होती, व्यापार करू शकत होती. ह्या दोन राज्यांच्या मैत्रीची सुरुवार ही दोन्ही राज्यांच्या आजोबांपासून चालू होती. ती आजपर्यंत तशीच होती.
धर्मसेन राजाच्या आजोबांनी राजा अमरसेननी दिग्विजय केला होता. उत्तरेपर्यन्तची राज्य जिंकली होती. त्यासाठी त्यांना कपिलसेनचे आजोबा विजयसेन ह्यांनी सहाय्य केले होते. तेव्हा पासून हि दोन राज्ये एकमेकांशी सलोखा राखून होती. गेल्या काही वर्षांपासून राजा त्रीविक्रमाचा सगळीकडे बोलबाला सुरु झाला होता. त्याचे राज्य वरती उत्तरेकडे खूप लांब आहे असे माहित होते. हे दोन्ही राजे राजा धर्मसेन अन राजा कापिलसेन हे कधीही एवढ्या लांब उत्तरेला गेले नव्हते. गेल्या काही महिन्यांमध्ये त्रीविक्रमाने बर्याच राजांना त्याचे मंडलिक बनविले होते किंवा जे मंडलिक होण्यास तयार नव्हते त्यांना मारून त्यांची राज्ये खालसा केली होती. त्याची सार्वभौम राजा होण्याची इच्छा होती. अन त्यासाठी तो वाट्टेल ते तंत्र वापरायला तयार होता.
ताकत, बौद्धिक डावपेच, राजकारण ह्या सगळ्याच गोष्टींमध्ये तो पारंगत होता. त्याची सार्वभौम राजा होण्याची इच्छा त्याला अनेक वाईट गोष्टी करायलाही भाग पाडत होती. त्यामुळेच बर्याच युद्धांमध्ये रक्ताचे पाट वाहत होते पण तो थांबायला तयार नव्हता. त्याचं राज्य आता बर्यापैकी विस्तारले होते. पण त्याला त्याचे राज्य धर्मपुर पर्यंत वाढवायचे होते.
अमरसेननी केलेला दिग्विजय पुसून आता त्याला सार्वभौम राजा व्हायचे होते. त्रिविक्रमाची धाड कधी न कधी कोसळणार हे धर्मसेननी ओळखले होते पण तो एवढ्या लवकर सुराजनगरीपर्यंत पोहचेल असे त्याला वाटले नव्हते. धर्मपुरच्या उत्तरेला उंचच उंच पर्वतरांगा, पश्चिमेला अथांग सागर अन दक्षिणेलाही पर्वतरांगा. पूर्वेला कापिलसेनचे सुरजनगर राज्य. म्हटले तर एकदम सुरक्षित पण आता जी एकमेव अशी रहदारीची वाट होती त्या वाटेवरच्या पहिल्या राज्यात शत्रू सैन्य घुसले होते. बरं सुरजनगरीचे हेर काय करत होते की त्यांना त्रिविक्रम त्यांच्या जवळ पोहचला तरी कळले नव्हते? नक्की काय प्रकार झालाय हे कळायला मार्ग नव्हता.
आता हिम्मत अन जिवाजी थोडे खाऊन पिऊन चांगले हुशार झाले होते. राजा धर्मसेननी त्यांना आता बाकीचा तपशील सांगायला सांगितला. त्यांना अनेक प्रश्न विचारले. सुरजनगरीच्या हेरांबद्दल काही माहिती आहे का ते पडताळून पाहिले. त्रिविक्रम लगेच आपल्यावर चाल करून येईल की कसे ह्याचे ठोकताळे चाचपून बघितले. आपण पुढे काय करायला हवे यावर तो विचार करू लागला. हिम्मतरावला पुढची तातडीची कामगिरी सोपवून अतिशय सावधपणे ती कामगिरी पार पाडण्याबाबत पुन्हा पुन्हा बजावले अन रवाना केले होते.
लगेच आपल्या मुख्य सरदारांना त्याने पाचारण केले. मध्यरात्री राजांनी सगळ्यांना का बोलवावे हे प्रश्नचिन्ह सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. राज्याचे सेनापती, राज्य कारभार पाहणारे प्रधान ह्यांना राजांनी सगळी परिस्थिती सांगितली अन आता आपण काय करावे हे, आपण आता काय पाऊल टाकावे, या बाबतीत या प्रमुख व्यक्तींचे मत काय हे विचारले. त्रिविक्रमाच्या बलाढ्य सैन्याशी कसा सामना करावा या बाबत सगळ्यांचे मत विचारात असतानाच एक सेवक सुरजनगरीच्या राजाचा खलिता आल्याची बातमी घेऊन आला.
रण संग्राम (भाग २)
सुरजनगरीच्या राजाचा खलिता घेवून आलेल्या सेवकाला राजांनी ताबडतोब हजर करण्यास सांगितले. राजा कापिलसेनचा सेवक येउन राजा धर्मसेन समोर उभा राहिला. राजांना प्रणाम करून त्याने बसलेल्या मान्यवरांना कमरेत लावून वंदन केले. अन हातातला खलिता प्रधानजिंच्याकडे सुपूर्त केला. राजांनी त्याच्या प्रणामाचा स्वीकार करून प्रधानजींच्याकडे पाहिले. प्रधानजींनी खलिता उघडून वाचायला सुरुवात केली.
“हे राजन धर्मसेन मैत्रीपुर्वक नमस्कार. अंदाजानुसार त्रीविक्रमाने आपल्या राज्यांकडे त्याचा मोहरा वळवला असून त्याच्या पहिल्या दश सहस्त्र घोडदळानी सुरजनगरीवर हल्ला बोल केला. बरीच नासधूस करून बाजारपेठ लुटली. पण ही फक्त सुरुवात होती. आमच्या सैन्यांनी त्यांचा बिमोड करून जास्त नुकसान होऊ न देता त्यांना राज्याबाहेर हुसकून लावले असले तरी हे संकट टळले नाही अशी माझी खात्री आहे. त्रिविक्रमाचा सप्तदश सहस्त्र सैन्याचा सागर शक्य तितक्या वेगाने सुरजनगरीकडे कूच करीत आहे ही आजची खबर आहे. हे केवळ सुरजनगरीवरील संकट नसून, हे वादळ सुरजनगरीनंतर धर्मपुरीच्या दिशेने कूच करेल म्हणूनच ह्या संकटाचा आपण मिळून सामना करावा असे मला वाटते.
हे राजा धर्मसेन दिग्विजय करणाऱ्या महान चक्रवर्ती सम्राट अमरसेनचा तू नातू असून शूरवीर राजा शूरसेनचा तू पुत्र आहेस. तू सुद्धा एक महान योद्धा आहेस याची मला खात्री आहे. आपल्या तीन पिढ्यांच्या मैत्री संबंधाना स्मरण करून ह्या कठीण प्रसंगी तू आम्हाला मदत करावीस असे मी आवाहन करीत आहे. माझा हा संदेश मिळताच क्षणाचाही विलंब न करता आपली सगळी फौज घेऊन तू स्वतः सुरजनगरीकडे प्रस्थान करावे अशी मी तुला विनंती करीत आहे.
त्रीविक्रमासारख्या सैतानापासून आपली राज्ये वाचवण्यासाठी आपल्याला एकत्रितपणेच लढणे गरजेचे आहे. त्वरित उत्तरादाखल खलिता धाडावा. आपल्या मदतीच्या प्रतिक्षेत राजा कापिलसेन” खलिता वाचून पूर्ण झाल्यावर प्रधानजींनी त्या सेवकाला बाहेर जाउन विश्राम करण्यास सांगितले. तुझ्या बरोबरच आम्ही आमचा परतीचा संदेश देऊ असे सांगून त्याला बाहेर पाठवले. राज्यांकडे वळून म्हणाले “महाराज अपेक्षित असा हा संदेश आहे. आपणास लवकरात लवकर सुरजनगरीच्या बचावासाठी निघणे गरजेचे आहे”.
राजा धर्मसेनने सेनापातीकडे बघून विचारले “आत्ता आपली किती फौज तयार आहे सेनापती”?
“त्रीदश सहस्त्र स्वार काही वेळातच कूच करू शकतील अशीच आपली तयारी असते महाराज. दिवस एक प्रहर वरती येईपर्यंत आणखी त्रीदश सहस्त्र फौज गोळा होऊन तयार राहील” सेनापती म्हणाले.
राजा धर्मसेन म्हणाला “ठीक तर मग. पहिली तुकडी अन आम्ही जातीने सुरजनगरीच्या मदतीला येत आहोत असा संदेश ताबडतोब रवाना करा प्रधानजी”.
महाराज उठले अन तयारीसाठी निघून गेले. सेनापती त्यांच्या सरदारांना गोळा करून त्यांची कामे त्यांना समजावू लागले. सगळे सैन्य तयारीला लागले. रात्रीच्या काळोखात सुद्धा येणाऱ्या संकटाचा सामना करण्यासाठी धर्मपुरीत एक प्रकारचे चैतन्य सळसळू लागले.
राजा धर्मसेनने सर्व प्रथम आपल्या राज्याची सुरक्षितता कशी असावी ह्या बद्दल विचार केला. प्रधानजीना पाचारण करून सागराच्या बाजूने असणाऱ्या हद्दीवर तटबंदीचे काम कुठेपर्यंत आले ते पहिले. ते काम समाधानपूर्वक पूर्ण झाल्याचे पाहून आता आपल्या राज्याच्या वेशीबाहेर पडल्यानंतर दोन्ही दिशांना (उत्तर अन दक्षिण) असणाऱ्या पर्वत रांगांवर नजर ठेवण्यासाठी म्हणून काही मोर्चे बंदी करण्यासंदर्भात सूचना दिल्या. आणखी अजून काय योजना कराव्यात ह्या बद्दल प्रधानजींशी चर्चा केली. एव्हाना उजाडून गेले होते. एक सैन्याची तुकडी सुरजगरीच्या दिशेने कधीच गेली होती. सेनापती स्वतः त्याबरोबर जाणार होते पण राजांनी त्यांना मागे थांबवून घेतले होते. आपले मात्तबर असे दोन सरदार त्यांनी पाठवून दिले होते. आम्ही मागून येत आहोत असा संदेश पाठविला होता.
विचारग्रस्थ अवस्थेत राजा धर्मसेन फेर्या मारत होता. आलेले संकट कसे परतवून लावायचे ह्याबद्दल अजूनही व्यूहरचना त्याच्या मनात चालूच होती.
“राजन सगळी तयारी झाली आहे. आपली फौज सुद्धा बरीच पुढे पोहचली असेल. आपण पण आता घाई करावी कारण आपण जेवढे लवकरात लवकर सुरजनगरीकडे प्रयाण करू तेवढे चांगले होईल. न जाणो आपण पोहचण्य पूर्वीच त्रिविक्रमाची फौज सुरजनगरीत पोहचली तर आपल्या मित्र राष्ट्रावर अन आपल्या सैन्याच्या तुकडीवर आसमान कोसळेल” प्रधानजी काळजीच्या स्वरात म्हणाले.
राजा धर्मसेन म्हणाला “प्रधानजी अजून तिथली नक्की परिस्थिती काय आहे याची पूर्णतः कल्पना आली नाही. थोडी माहिती करून घेऊ अन मगच आम्ही बाहेर पडू.”
पुढचा संपूर्ण दिवस राजांनी विचार करण्यात घालवला. सगळी व्यवस्था चोख पार पडून सुद्धा राजा धर्मसेन अजूनही धर्मपुरीच्या बाहेर पडला नव्हता. नेहमी राजांचे मन ओळखणार्या प्रधानजीना, हे जरा नवीन तसेच आश्चर्य चकीत करणारे होते. राजे सुरजनगरीच्या रक्षणाला स्वतः जाणार नाहीत कि काय? किंवा राजे घाबरून स्वतःचे प्राण वाचवू बघतात कि काय? किंवा त्रीविक्रमाशी संधी करावी असे विचार तर त्यांच्या मनात चालू नाहीत ना? अशा अनेकाविध शंकांनी त्यांना घेरले. ज्या शूर घराण्यातील ते होते त्या घराण्याला शोभेल असे त्यांचे वागणे आहे असे त्यांना वाटत होते. पण राजांना या बाबत कसे विचारणार म्हणून ते शांत राहिले.
रण संग्राम (भाग ३)
तिसऱ्या दिवशी भल्या पहाटे राजांनी प्रधानजी आणि सेनापतीना आपल्या महालात बोलावून घेतले. आता ताबडतोब कूच करण्यची तयारी करण्या संदर्भात सूचना केल्या. राजांनी अचानक घेतलेल्या ह्या निर्णयाने दोघेही जरा आश्चर्यचकित झाले. काल परवा जेव्हा जायची आवश्यकता होती तेव्हा राजांनी जाण्याचा निर्णय घेतला नव्हता आणि आज आत्ता अचानक काय झाले असेल. राजांनी प्रधानजींच्या मनातील हे विचार ओळखले. ते म्हणाले मला कळते आहे तुमच्या मनात काय चालू आहे ते. लवकरच तुमच्या मनातील या प्रश्नांची उत्तरे मिळतील. राजांच्या या बोलण्याने प्रधानजी आणि सेनापती आपापल्या कामाला निघून गेले.
काही वेळातच सगळ्या गोष्टींची पूर्तता झाल्याचे राजांना समजले. राजा धर्मसेन लढाईचा वेश धारण करून आपल्या महालातून बाहेर पडला. राणी सत्यवतीने त्याला कुमकुम तिलक लाऊन ओवाळले. यशस्वी होऊन परतण्यासाठी देवीजवळ मागणे घातले. राजाने कुलदेवी काळभैरवीचे दर्शन घेतले अन आपल्या सैन्य सागराकडे आला. ह्यावेळच्या लढाई मध्ये काहीतरी वेगळेपण आहे हे सगळ्यांना जाणवत होते. राजांनी हत्ती दळाला वेशीपाशी आणून थांबवण्याची सूचना केली होती. त्रीदश सहस्त्र सैन्य घेऊन राजा धर्मसेन बाहेर पडला. वेशीजवळ येताच त्याने स्वतः हत्ती दळ कसे अन कोठे उभे करायचे याच्या सूचना दिल्या. त्या दळाच्या प्रमुखांना आपल्या आदेशाशिवाय जागा सोडण्यास मज्जाव केला. चुकून शत्रू सैन्य वेशी जवळ पोहचलेच तर काय करायचे याचा आदेश दिला.
बाकीच्या सैन्याला पुढे कूच करण्याचा आदेश मिळाला. काही वेळातच सैन्य बरेच अंतर पार करून पुढे आले. आता पुढे अवघड खिंडीसारखा रस्ता होता. अन त्याच्या दोन्ही बाजूना उंचच उंच पर्वत रांगा होत्या. खिंडीच्या अलीकडेच राजांनी सैन्याला थांबण्याचा आदेश दिला. असे मधेच थांबण्याचा आदेश ऐकून सगळ्यांना जरा अचंबित व्हायला झाले. राजांनी सैन्याला थोडा विश्राम करण्यास सांगितले. स्वतः एका प्रशस्थ वटवृक्षाखाली थांबला. राजांच्या मनात नक्की काय सुरु आहे हे कळायला मार्ग नव्हता. राजन भीती वाटते आहे? की अजून काही चिंता आहे हे कळत नव्हते. काही क्षण शांततेत गेले अन खिंडीच्या दिशेने घोड्यांच्या टापांचा आवाज आला.
सगळ्यांनी चमकून त्या दिशेला पाहिले. राजा स्वतः उठून रस्त्यावर आला. शत्रू सैन्य आले कि काय असा विचार करून सेनापतींनी लगेच सैनिकांना मोर्चे बांधणी करायला लावली. राजा धर्मसेन भोवती खास सैनिकांचे कडे तयार केले. सगळे कान लाऊन येणाऱ्या आवाजावर लक्ष ठेऊन होते. टापांचा आवाज वाढतच होता आणि त्याबरोबरच धुळीचा लोट सुद्धा आला होता म्हणजेच ते सैन्य जवळ आले होते. काही क्षणांच्या अवधीतच पहिला घोडेस्वार नजरेत आला. अन पाहता पाहता एक एक घोडेस्वार दिसू लागले अन काय आश्चर्य हे सगळे धर्मपुरीचेच सैन्य होते. दौडत दौडत राजांचा एक सरदार जवळ पोहचला. राजा धर्मसेन दिसताच त्याने घोड्यावरून खाली झेपावला अन चालत राजाकडे निघाला.
राजा आता सगळे सैन्य बाजूला करून पुढे आला. त्याची उत्सुकता ताणली गेली होती. त्याचा विश्वासू सरदार विश्वासराव समोर आला. त्याच्या चेहऱ्यावर हसू होते. त्याने राजाला वंदन केले. दोघांची नजरा-नजर झाली. पाठोपाठ आणखी घोडेस्वार आले. हिम्मतराव अन त्यांचे सहकारी आले होते.
विश्वासराव म्हणाले “राजे तुम्हाला जी शंका होती ती खरी ठरली. अन हिम्मतरावांनी ज्या तातडीने गुप्त संदेश पोहचवला त्याबद्दल काय बोलू”?
धर्मसेन म्हणाला “म्हणजे आमचा अंदाज खरा ठरला तर? कुठे आहे तो?”
आता मात्र सगळ्यांचीच उत्सुकता ताणली गेली. राजा अन विश्वासराव कोणाबद्दल बोलताहेत तेच कळेना. राजांनी मानेनेच खुणावले तसे विश्वासराव वळून म्हणाले “आणा रे त्या राजांना”.
तसे बेड्या घातलेल्या राजा कपिलसेनला आणले गेले. राजा कापिलसेनला राजा धर्मसेन कडे बघण्याचीही हिम्मत होत नव्हती. प्रधानजी आणि सेनापती ह्यांना तर कळेचना कि हे काय चालू आहे ते. प्रधानजी चाचरत म्हणाले “राजन हे काय”?
“आम्ही सांगतो” हिम्मतराव म्हणाले. “हे सुरजनगरीचे राजे दिसतात तितके सरळ नाहीत. एक नंबरचे दगलबाज आहेत. आपल्याच शत्रूशी हातमिळवणी करून आपल्या विरुद्ध कारस्थान रचलय ह्यांनी. त्या दिवशी राजांनी आम्हाला परत सुरजनगरी अन ह्या पर्वतरांगांमधील पायवाटा ह्यांवर लक्ष ठेवायला सांगितले होते. मी आणि माझे सहकारी ह्या डोंगरदऱ्या आणि जंगल पार करून पाहून आलो. त्रीविक्रमाशी हातमिळवणी करून आपले राज्य त्याच्या ताब्यात द्यायचा डाव होता ह्या कपिलसेनचा. पण आम्ही आम्ही तो राजे अन विश्वासराव ह्यांना कळवला”.
तिथून पुढे विश्वासराव बोलू लागले “आम्हाला राज्यांनी निघण्यापूर्वीच हि शक्यता बोलून दाखवली होती अन एकदम सावध राहण्यासाठी बजावले होते. आम्ही सुरजनगरीच्या वेशिबहेरच थांबलो होतो. दोन्ही बाजूला उत्तर आणि दक्षिण दिशेला धुळीचे लोट हवेत दिसत होते म्हणजे त्रिविक्रमाच्या फौजा डोंगर चढून आपल्या राज्याकडे कूच करीत असणार हे कळून चुकले. ह्या कपिलसेनची फौज आम्ही पूर्णपणे आत शहरात येण्याची वाट बघत होती. आम्हाला हिम्मतरावांकडून योउग्य तो संदेश मिळाला होता कारण कापिलसेनचा जो सेवक संदेश घेऊन आला होता तो आम्हाला चुकवून डोंगरांच्या दिशेने जात असताना हिम्मतरावांना सापडला अन सगळा उलगडा झाला.
मग काय आमची वाट बघत असलेल्या सुरजनगरीचा आम्ही चांगलाच समाचार घेतला. आमच्या फौजेची कत्तल करण्याच्या इराद्याने आमची वाट बघत थांबलेल्या सुरजनगरीच्या फौजेवर आम्ही मध्य रात्री हल्ला बोल करू हे ध्यानी मनीही नसावे. अर्धवट पेंगुळलेल्या अन गाफील अशा फौजांचा काही वेळातच फडशा पाडून पहिला त्यांच्या ह्या दगाबाज राजाला जेरबंद केला. त्या बरोबर बाकीच्यानी शस्त्र खाली ठेवली. मानाजीरावांना आर्धी फौज देऊन आम्ही इकडे आलो. आता मानाजीरावांनी सुरजनगरीवर आपली पताका लावलीय. तीन पिढ्यांच्या सलोख्याची ग्वाही देणाऱ्यांनी असा दगा केला अन म्हणूनच आम्हाला पण असं वागावं लागलं”.
राजा धर्मसेन म्हणाला “कपिलसेन तुम्ही तर मैत्री अन सलोख्याच्या गोष्टी करत होतात? हीच का तुमची मैत्री? अन हाच का तो सलोखा? हीच का तीन पिढ्यांची विश्वासार्हता? मला लाज वाटते तुम्हाला कधी काळी मी आपला मित्र समाजात होतो ह्याची”
कपिलसेन काहीच बोलू शकला नाही. विश्वासरावांकडे वळून
राजे बोलले “विश्वासराव पण अजून आपली पूर्ण फत्ते नाही झाली आत्ताशी हा दगलबाज हाती आला आहे. अजून त्रिविक्रमाच्या फौजांवर विजय मिळवायचा आहे.”
विश्वासराव म्हणाले “होय राजे आता पुढची कामगिरी सांगा. हा विश्वासराव आपल्या मातृभूमीसाठी हे शिरकमल उतरून द्यायला तयार आहे”.
राजा धर्मसेन बोलले “विश्वासराव तुमच्या सारख्या माणसांमुळेच आपले राज्य अन त्याची सुरक्षितता टिकून आहे. पण तुमच्या सारखे जीव लावणारे अन जीव ओवाळून टाकणारे मातृभक्त योध्ये ह्या धर्मपुरीला हवे आहेत. तुमच्या तोंडून शत्रूच्या शिरांना कलम करण्याची भाषा शोभते ही असली नव्हे.”
विश्वराव म्हणाले “होय राजे पण आपल्या मातृभूमीसाठी आम्ही कोणतेही बलिदान करू शकतो हेच आम्हाला म्हणायचे होते”
राजा धर्मसेन “मातृभूमी प्रति तुमची निष्ठा का आम्हाला ठाऊक नाही? फक्त तुम्ही आम्हाला हवे आहेत विश्वासराव हे देखील लक्षात असू द्या”
राजांनी आपल्या विश्वासू मंडळीना एका बाजूला घेतले. राजा कपिलसेनला एक बाजूला जेरबंद करून बांधून ठेवण्याची आज्ञा दिली गेली. हिम्मतरावांना त्रिविक्रमाचे सैन्य कसे अन कोणत्या बाजूने येत आहे ते विचारून घेतले. अन पुढची आखणी सुरु केली.
रण संग्राम (भाग ४)
राजा धर्मसेन, प्रधानजी, सेनापती, विश्वासराव आणि इतर मान्यवर सरदार सर्वांनी विचार विनिमय करून आखणी केली. विश्वासरावांनी पुन्हा सुरजनगरीच्या मार्गाने खिंडीपुढे जाउन दक्षिणेकडील पर्वत रांगांच्याबाजूने त्रिविक्रमाच्या फौजेवर हल्ला करायचा असे ठरले. त्यासाठी त्यांच्या सोबत आणखी काही सरदार देण्यात आले. अर्थात हे अतिशय कठीण असे काम होते. कारण त्या बाजूला मुळातच रहदारीचा रस्ता नव्हता. अवघड पर्वतरांगा अन जंगल आणि त्यातून जाणारी बिकट वाट असे दुहेरी आव्हान होते. पण आपल्या राज्याच्या रक्षणार्थ आपल्या प्राणांचीही पर्वा न करता ही अवघड कामगिरी घेण्यास विश्वासराव अन त्यांचे सहकारी आगदी सहज तयार झाले.
राजांनी बरोबर आणलेल्या ताज्या दमाच्या फौजेतील आर्धी फौज विश्वास रावांबरोबर दिली. स्वतः राजा धर्मसेन आणि बरोबरची राहिलेली आर्धी फौज इथेच थांबून खिंडीच्या बाजूने किंवा उत्तरेच्या डोंगरांवरून येणाऱ्या फौजेचा सामना करणार होते. सर्वांनी आपली कुलदेवी काळभैरवीची करुणा भाकली. देवीचा जयजयकार करून या रणात यश देण्याची विनवणी केली.
राजा धर्मसेन म्हणाला “माझ्या सहकाऱ्यांनो आपली मातृभूमी आपल्याला मुक्तपणे जीवन जगू देते. आपल्या या मातृभूमीमध्ये आपण मुक्तपणे संचार करतो, मोकळा स्वास घेऊ शकतो. कारण धर्मापुरी राज्याने नेहमीच आपल्या नागरिकांना मुक्तपणे जीवन जगण्याची संधी दिली आहे. हीच आपली कित्येक वर्षांची परंपरा आहे. पण आज आपल्या याच मातृभूमीला गिळंकृत करण्याच्या इराद्याने त्रिविक्रमासारखा राक्षस आपले मलीन पद आपल्या या मातृभूमीच्या दिशेने उचलत आहे. ज्या मातृभूमीच्या आपल्याला मोकळेपणाने जगण्यास शिकवले तिलाच मलीन करण्याच्या उद्देशाने तो आपल्या दिशेने येत आहे. आता आज हीच वेळ आहे जेव्हा आपल्या मातृभूमीच्या रक्षणार्थ आपला पराक्रम दाखवायचा आहे. आपल्या मातृभूमीचे ऋण फेडण्याची यापेक्षा दुसरी संधी मिळणार नाही. तेव्हा काळभैरवीचा जयजयकार करा. आणि शत्रूला अस्मान दाखवा. आपल्या सैन्यातील एकमेकांना जपा आणि शत्रूला कापून काढा. असा पराक्रम गाजावा कि यापुढे कोणालाही धर्मपुरीकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिम्मत होणार नाही. जय काळभैरवी.
त्याबाबरोबर सगळ्या सैन्यांनी जयजयकार केला “जय काळभैरवी”.
राजांनी सर्वाना प्रोत्साहित केले अन विश्वासराव आणि त्यांची फौज रवाना झाले.
विश्वासराव अन त्यांचे साथीदार गेल्याची साक्ष दूर गेलेल्या घोड्यांच्या टापांचा आवाज देत होता. हळू हळू तो आवाज कमी कमी होत गेला. उडालेली धूळ खाली बसू लागली. नकोशी शांतता सगळीकडे पसरली. कुठे घोड्यांच्या फुरफुरण्याचे आवाज येत होते तेच काय ते शांतता भंग करत होते बाकी सगळेच शांत होते. खिंडीच्या तसेच उत्तरेच्या पर्वतरांगांवरील पाय वाटेकडे सगळे लक्ष देऊन बसले होते. शत्रूला अंदाज येऊ नये म्हणून बरेचसे सैन्य अलीकडच्या वळणावर सावध उभे होते. काही जंगलांच्या दिशेने पेरून ठेवले होते. उंच झाडांच्या टोकावर चढून बहादूर सैनिक लांबून येऊ घातलेल्या शत्रूवर नजर ठेऊन होते.
काही वेळातच उत्तरेच्या पर्वतरांगांच्या वरच्या बाजूला हालचाल दिसू लागली होती. हळू हळू त्रिविक्रमाच्या फौजा रात्रीच्या अंधारात पर्वत चढून वरपर्यंत पोहचले होते. इकडे धर्मसेनने शत्रू टप्प्यात आल्याशिवाय हल्ला करायचा नाही अशी सक्त ताकीत सर्वाना दिली होती. सकाळचं कोवळं उन्ह संपून आता कडक उन्हाचा तडाखा सुरु झाला होता. त्रिविक्रम स्वतः ह्या उत्तरेकडून येणाऱ्या फौजेचे नेतृत्व करीत होता. कितीही अडचण आली तरी आपली इच्छा पूर्ण करायचीच अन धर्मपुरच्या राज्यावर विजय संपादन करायचा आणि आपली काळ्या रंगाची पताका धर्मपुरीवर लावायची हे त्याने ठरवले होते. आज सकाळी आलेली खबर तितकीशी चांगली नव्हती. धर्मसेनला कुणकुण लागून त्याने सुरजनगरीवर हल्ला बोल केला होता. कपिलसेनला जेरबंद केले होते. कपिलसेन जेरबंद झाला तरी आपल्याला काही विशेष फरात पडणार नाही. आ[पाल्यासाठी तो एक मोहरा होता. ते दोघे एक होऊन लढण्यापेक्षा हे एक बरेच झाले. असा विचार मनात येऊन त्रिविक्रम खुश झाला.
धर्मपुरीचे सैन्य अजून सुरजनगरीमध्ये असेल अन ते परतण्यापूर्वीच आपण धर्मपुरच्या राज्यावर पोहचलो असू. त्यासाठीच आपण ह्या पर्वतरांगांच्या बाजूने जाण्याची शक्कल लढवली. स्वतःच्याच बुद्धीचातुर्यावर हसत त्रिविक्रम आपल्या फौजेला भर भर पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करीत होता. खरेतर त्याचे राज्य उत्तर बाजूला सपाटीवर होते. त्याच्या फौजेला असल्या जंगलांची अन पर्वत चढण्याची सवय नव्हती. रात्रभर मशालींच्या उजेडामध्ये फौजेला पुढे जाण्यास उद्युक्त करून तो इथपर्यंत घेऊन आला होता. अवघड वाटेमुळे बरेचसे जड असे लढाई साहित्य त्याने बरोबर आणले नव्हते. कित्येक सैनिकांनी घोडे न आणता चालत चढण पूर्ण केली होती त्यामुळे बरेचजण दमले होते. पण त्रीविक्रमाला हि संधी हातातून जाऊ द्यायची नव्हती. आपले मनुष्यबळच विजयी होण्यासाठी उपयोगी पडेल अशी त्याची खात्री होती. त्याच्या सोबत त्रिदश सहस्त्र फौज होती आणि आणखी तेवढीच फौज त्याने सुरजनगरीला वळसा घालून दक्षिण पर्वत रांगांकडून धर्मपुरीवर धाडली होती.
त्रिविक्रमाची फौज खाली उतरत होती एक प्रकारची भयाण शांतता वातावरणात होती. पहिली तुकडी पायथ्याजवळ पोहचली तसा एक उंच झाडावरून मोठा करण्याचा आवाज झाला अन अचानक धर्मपुरीचे झाडात अन आजू बाजूला लपलेले सैन्य त्रिविक्रमाच्या फौजेवर तुटून पडले. बेसावध सैन्यावर हा असा अचानक हल्ला झाला तो त्यांना सहन झाला नाही. फौजेमध्ये हाहाकार उडाला. त्यांना काही कळायच्या आतच त्यांची पहिली एक तुकडी धर्मपुरीच्या सैन्याने गारद केली होती. आता धर्मपुरीच्या सैन्यामध्ये जोश आला होता. ते हळू हळू पुढे सरकत होते. तसेच त्रिविक्रमाच्या फौजही सावध झाल्या होत्या. त्यांनीही आपल्या तलवारी उपसून लढाई सुरु केली होती. आता युद्धाला तोंड फुटलं होतं.
तिकडे विश्वासराव आणि सहकारी दक्षिण पर्वताच्या पायथ्यापासून चढून वरती पोहचले होते. त्रिविक्रमाची फौज आता पर्वत उतरून खिंडीकडे निघाली होती. त्या बेसावध फौजेवर विश्वासरावांनी हल्ला बोल केला होता. त्रिविक्रमाची दमलेली फौज अचानक झालेल्या हल्ल्याने गांगरून गेली होती. शिवाय त्रिविक्रम सोबत नसल्याने त्याचा सरदार फौजेला लढण्यासाठी उद्युक्त करत होता तो पर्यंत विश्वासरावांनी त्यांच्या बऱ्याचशा फौजेला कापून काढले. मग त्रिविक्रमाची फौज चवताळून उठली अन मग घनघोर युद्धाला तोंड फुटले होते.
आता दोन्ही आघाड्यांवर युद्ध सुरु झाले होते. राजा धर्मसेन दोन्ही बाजूला लक्ष ठेवून होता. आवश्यक आदेशांचे संदेश दुतांकरवी पाठवत होता.
कधी सरशी तर कधी माघार असा हा खेळ दोन्ही बाजूला बघायला मिळत होता. दक्षिणेकडे बर्यापैकी यश मिळताना दिसत होते कारण त्यांचा राजा त्यांच्या सोबत नव्हता अन ती फौज दमली होती. उत्तरेकडे त्रिविक्रम स्वतः सैन्याचे मनोबल वाढवीत होता. त्यांच्या बाजूने चांगली गोष्ट अशी होती ते पर्वताच्या वरच्या बाजूस होते आणि धर्मपुरीचे सैन्य खालच्या बाजूला. धर्मपुरीचे सैन्य आपल्याला कणभरही पुढे जाऊ न देता आणखीनच वरती येत आहे अन आपलं मनुष्यबळ जी आपली ताकत होती ते कमी पडू लागतंय कि काय असे त्रीविक्रमाला आता वाटू लागले. अन अचानक त्याला एक खेळी सुचली. त्याने लगेच आपल्या खास सरदाराला जवळ बोलावून काहीतरी सांगितले. त्या सरदाराचा चेहरा खुलला अन त्याने त्याचा घोडा तसाच रणधुमाळीमध्ये पुढे दामटला. पर्वताच्या माथ्यावर थांबलेल्या सैन्याच्या सरदारांना काहीतरी सांगितले अन स्वतः पर्वताच्या मध्यापर्यंत चाललेल्या युद्धाकडे पुढे सरकू लागला.
रण संग्राम (भाग ५)
तीकडे दक्षिणेला विश्वासराव प्राणपणाने झुंजत होते. त्रिविक्रमाची त्या बाजूची अर्ध्याहून अधिक फौज त्यांनी कापून काढली होती पण त्याचबरोबर त्यांची सुद्धा बरीचशी फौज खर्ची पडली होती. पण आता त्याची परवा कुणालाच नव्हती. सगळीकडे मृत सैनिकांच्या प्रेतांचे खच पडले होते, रक्ताचे पाट वाहत होते पण लढाई सुरूच होती.
इकडे उत्तरेला अचानक त्रीविक्रमाने दिलेला संदेश घेऊन त्याचा खास सरदार पर्वताच्या मध्यावर आला जवळच्या सैनिकांना त्याने काहीतरी सांगितले. ते सैनिक थोडे गोंधळले पण त्रीविक्रमाचा हुकुम होता अंमलबजावणी तर व्हायलाच हवी. अन अचानक. त्रिविक्रमाची फौज पर्वताच्या माथ्याकडे धाऊ लागली होती. त्रिविक्रमाच्या फौजा शत्रूला पाठ दाखवून पळत होत्या. सेनापतीना एकदम आनंद झाला
“अरे कुठे जाता असे पळून? एवढ्यात घाबरलात?” असे म्हणून सेनापती आपल्या सैन्याला उद्देशून म्हणाले “हल्ला करा, कोणालाही सोडू नका” सेनापतींचा आदेश ऐकून धर्मपुरीचे सैन्य आणखीनच चवताळले अन अजून त्वेषाने हल्ला चढवण्यासाठी वरती चढू लागले. मध्यावर असलेली त्रिविक्रमाची फौज बर्यापैकी वरती चढून गेली अन त्यांच्या मागे धर्मपुरीचे सैन्य. अन अचानकच वरती धावणारे त्रिविक्रमाचे सैन्य जगाच्या जागी झोपले. हे काय झाले? हा नक्की काय प्रकार झाला हे सेनापती विचार करत होते. पण दुरून बघणाऱ्या राजा धर्मसेनच्या लक्षात हि खेळी आली. त्याचा चेहरा काळवंडला त्याला चिंतीत बघून
प्रधानजी म्हणाले “राजन आपली दोन्ही आघाडींवर सरशी होताना दिसत आहे. तरीही तुम्ही चिंतीत का आहात”?
राजा म्हणाला “प्रधानजी आपल्या सैन्याला पर्वताच्या पायथ्याशी यायचा हुकुम पाठवा”
प्रधानजी आश्चर्याने म्हणाले “राजन….” पण त्यानां पुढे काहीही ना बोलू देता
राजा धर्मसेन म्हणाला “आत्ता, लगेच, ताबडतोब”
राजाचे अंगार पेटलेले डोळे बघून प्राधानजींनी लगेच तसा हुकुम पाठवला पण तो पर्यंत उशीर झाला होता. त्रिविक्रमाची खालून वरती गेलेली फौज खाली झोपल्या बरोबर वरून पाठीमागच्या त्याच्या सैन्याने धर्मपुरीच्या सैन्यावर वरतून भाले, दगड, गोटे यांचा वर्षाव सुरु केला. ह्या अचानक हल्ल्याने धर्मपुरीचे सैन्य भांबावले. त्यांना प्रतिकार करण्याची संधीच मिळाली नाही. आकाशातून पाउस पडावा त्याप्रमाणे अनेकानेक गोष्टी सू सू करीत त्यांच्या डोक्यात, चेहऱ्यावर, पाठीवर, पोटावर पडत प्रहार करीत होत्या.
हीच ती त्रिविक्रमाची खेळी होती. सहज लढून विजयश्री मिळत नाही म्हणून मग त्याने हि खेळी खेळली होती. त्याच्या राक्षसी वृत्तीचा हा पहिला अनुभव आला होता. आणि या असल्या लढायांमध्ये ना कसले नियम ना कसले करार. शत्रूचा कोणत्याही मार्गाने संहार करायचा हे एकच उदिष्ट. त्रीविक्रमाला ह्या आधी कुठल्याही ठिकाणी एवढी कडवी झुंज मिळाली नव्हती. एवढे चिवटपणे लढणारे सैन्य त्याने या आधी पाहिले नव्हते. आपली एवढी सगळी शूर फौज अशा ठिकाणी खर्ची पडताना बघून त्याचा राग उसळत होता. त्याने सोबत आणलेल्या एकूण फौजेच्या २ त्रितीअंश फौज त्याने आत्तापर्यंत त्याने गमावली होती. हाती आसलेल्या फौजेला सोबत घेऊन काहीही करून धर्मपुरी त्याला जिंकायची होती.
धर्मपुरीच्या सैन्याची दाणादाण उडाली होती. प्रधानजीनी पाठवलेला संदेश मिळाला होता. सेनापती आपल्याला माघार घ्यावी लागतीय ह्या विचाराने कासावीस झाले पण “शक्य तेवढे जीव वाचवा” हे संदेशातले वाक्य खूप महत्वपूर्ण होते कारण आता त्यांच्या जवळ फक्त पंच सहस्त्र सैन्य शिल्लक होते. जमेल तेवढे सैन्य खालच्या बाजूला सरकत होते. पण जागोजागी पडलेले शत्रू सैन्य, आपले साथीदार, त्यांची शस्त्रे ह्यातून अन वरून होणारा मार झेलत त्याना खाली उतरणे अवघड होत होते. आता वरचे दगड भले संपले असावेत म्हणून मग वरतून मोठ मोठ्या शिळा गडगडत खाली येऊ लागल्या. त्यांच्या पाठोपाठ लाकडी ओंडके येऊ लागले अन धर्मपुरीचे सैन्य आणखीनच मारले जाऊ लागले. कोणातरी त्रिविक्रमाच्या सैन्याने लाकडी ओंडक्याला मशाल लावली अन पेटते ओंडके खाली येऊ लागले. राक्षसी वृत्तीने उत्तर पर्वतावर मृत्यूचे थैमान सुरु केले.
पेटत्या ओंडक्यांमूळे आजूबाजूची सुकलेली झाडे पेटू लागली. ती आग पसरत पसरत खालच्या बाजूला येऊ लागली. मृत सैनिकांच्या शवांना हा अशा प्रकारे भडाग्नी मिळाला. जे जिवंत होते पण जखमी होते पण उठून जाऊ शकत नव्हते त्यांना देखील ह्या आगीने भस्मसात करून टाकले. त्यामध्ये दोन्ही बाजूचे सैन्य होते. त्या सैन्यांचा आक्रोश पर्वतभर भरून राहिला. राजा धर्मसेन अन त्रिविक्रम हतबल पणाने ह्या संहाराकडे पाहत होते. सगळीकडे धूर भरून राहिला होता.
राजा धर्मसेन ने बंदी बनवलेल्या कपिलसेन कडे पाहिले अन म्हणाला “पाहिलेत राजे शत्रूशी हातमिळवणी केल्याचा परिणाम”? कपिलसेन काही बोलू शकला नाही.
आता पर्वताच्या शिखाराकडील हालचाली धुरामुळे अस्पष्ट झाल्या होत्या. हीच योग्य वेळ आहे हे राजाने ओळखले आपले सगळे शिल्लक सैन्य त्याने गोळा केले. अन पुढील सूचना दिल्या. त्रीविक्रमाला आजची रात्र पुन्हा पर्वतावर काढायची नव्हती त्याने त्याच्या शिल्लक फौजेला पुढे जाउन आग विझवून तसेच पुढे कूच करण्याचे हुकुम दिले. आग विझवण्यासाठी ओल्या झाडाच्या फांद्या, माती अशी सापडतील ती साधने वापरीत त्रिविक्रमाची फौज पुन्हा पायथ्याकडे सरकू लागली. वाटेत कुठे आग असेल तर ती विझवून किंवा दुसरीकडे जिकडे आग नाही अशा ठिकाणाहून ते पुढे सरकू लागले. आता उन्ह कलतीला लागली होती. सूर्यास्ताला तसा थोडा अवधी होता. अजून निर्णायक लढाई संपली नाही हे धर्मसेन जाणून होता अन म्हणूनच त्याने पुढची आखणी केली होती.
आपली सगळी शिल्लक फौज घेऊन त्रिविक्रम स्वतः खाली उतरत आहे हे बघून राजा धर्मसेन सुद्धा तयार झाला. धुरातून, आगीतून, अर्धवट जळलेल्या सैनिकांच्या प्रेतांतून वाट काढीत त्रिविक्रम खाली सरकत होता. त्याच्या भोवती त्याच्या खास सरदारांचे कडे होते. शिरस्त्राण धारी राजा त्रिविक्रम एका उमद्या सफेद घोड्यावरून येत होता. राजा धर्मसेनने त्याची फौज पायथ्यापासून बरीच मागे आणून उभी केली होती. एका छोट्या टेकडीवजा जागेवरून तो पुढील हालचाली टिपत होता.
तिकडे दक्षिणेला विश्वासरावांचे दोन खास सहकारी सरदार धारातीर्थी पडले होते. आता त्रीविक्रमाचा फक्त एकाच मुख्य सरदार समशेर प्राणपणाने लढत होता. सैनिकांचा खच पडला होता. उत्तरेला झालेला संहार दोन्हीकडचे सैन्य पाहत होते. विश्वासराव भाल्याचा एक अन तलवारीचा एक असे दोन घाव झेलून घायाळ झाले होते पण तरीही ते आवेशाने लढत होते. आपल्या साथीदारांना आपल्या कृतीतून प्रोत्साहित करीत होते. अन अशातच समशेर अन त्यांची नजरा नजर झाली. दोघेही एकमेकांवर चालून गेले अन दोघांचे तुंबळ युद्ध पेटले. एकजण आपल्या मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी तर एकजण आपल्या राजाच्या सार्वभौम राजा होण्याच्या स्वप्नासाठी लढत होता.
दोघेही वीर योध्ये होते एकमेकांवर वरचढ होण्याचा प्रयत्न करीत होते पण कोणीच कमी नव्हते. तलवारीच्या प्रत्येक घावाबरोबर दोघेही आपले कसब पणाला लावत होते. आजूबाजूला दोन्ही बाजूला आता खूपच कमी शिल्लक राहिलेले सैनिक आपण लढायचे सोडून आपल्या ह्या सरदारांची लढाई बघण्यासाठी थबकले पण काही क्षणातच पुन्हा आपली लढाई त्यांनी सुरु ठेवली. कारण जो सरदार विजयी होईल त्याला त्याचे सैन्य लढायचे सोडून असे लढाई पाहत थांबलेले खचितच आवडणार नाही हे त्यांना माहिती होते.
तिकडे त्रिविक्रमाची फौज आता पायथा जवळ करीत आली होती. पण समोर असलेली शांतता त्रीविक्रमाला आश्चर्यचकित करत होती. सकाळची आठवण होऊन त्याने सावधपणे आजू बाजूच्या झाडांमागे अन इतर कुठे शत्रू सैन्य लपले आहे काय हे बघण्याचा हुकुम दिला. पण तसे कोणीच दिसले नाही. आता धर्मसेन कोणाची खेळी खेळतोय हे बघायला तोही उत्सुक होता अन अचानक.
रण संग्राम (भाग ६ शेवट)
पायथ्याशी आलेल्या त्रिविक्रमाच्या फौजेवर आजू बाजूला असलेल्या झाडांच्या टोकांवरून भाले अन बाण यांचा वर्षाव सुरु झाला. त्रिविक्रमाची फौज खाली येण्याचा मार्ग साफ करत असतानाच धर्मसेनने त्याचे निष्णात तिरंदाज उंच झाडांच्या टोकांवर चढवून बसवले होते. आगदी टप्प्यात आल्यामुळे ते व्यवस्थित नेम धरून त्रिविक्रमाच्या एका एका सैनिकाला टिपत होते. असं म्हणतात संधी प्रत्येकाला मिळते. काही वेळापूर्वी असलेली परिस्थिती अन आत्ताची परिस्थिती एकदम उलट होती. आता त्रिविक्रमाच्या सैन्याला काय करावे ते सुचेना. झाडाच्या टोकांवरून येणाऱ्या बाणांनी ते घायाळ होऊ लागले. त्रीविक्रमाने आपल्या तोडीच्या राज्याशी सामना होतोय हे पाहून स्मित हास्य केले. अन स्वतःशीच पुट पुटल्यासारखा म्हणाला “हा आहे खरा दिग्विजयी अमरसेनचा नातू” पण काही क्षणच त्याने हि स्तुती केली. लगेचच त्याने त्याच्या सैन्याला एकत्र न राहता पांगण्याचा हुकुम दिला जेणेकरून आपल्या दिशेला सोडलेले सगळेच बाण लागू नयेत.
धर्मपुरीच्या तीरांदाजना नेम धरून मारेपर्यंत आपण पुढे सरकत राहायचे असे त्याने ठरवले. मोठ मोठ्या ढाली स्वसौरक्षणार्थ वरती धरण्याचे फर्मावले. पण तो पर्यंत धर्मपुरीच्या तीरांदाजानी त्यांना अपेक्षित कामगिरी पूर्ण केली होती. त्रिविक्रमाच्या पहिल्या दोन तुकड्या त्यांनी गारद केल्या होत्या. अन अजूनही त्यांचे काम चालूच होते. काही क्षणात त्यांच्या जवळील बाणांचा साठा संपू लागला तशी राजा धर्मसेनला सूचना मिळाली अन मग स्वतः धर्मसेन घोड्यावर स्वार होऊन आपली शेवटची तुकडी घेऊन टेकडीमागून हल्लाबोल करून आला. आता त्रिविक्रम सुद्धा पुढे आला अन निर्णायक लढाईला सुरुवात झाली.
आज सुर्योदयापासून दोन्ही कडचे सैन्य न थकता न थांबता अविरत पणे लढत होते. कधी त्रिविक्रमाची सरशी तर कधी धर्मसेनची असे करता करता दिवसभर विजयश्रीने दोन्ही सैन्यांना दोलायमान स्थितीत ठेवले होते. निर्णायक विजयश्रीने अजून कोणाच्याच गळ्यात माळ घातली नव्हती. तिकडे दक्षिणेला समशेर अन विश्वासराव एकमेकांवर वार करून करून थकले. अन विश्वासरावांचा एक मोक्याचा वार समशेर वर बसला अन समशेर कोसळला होता. समशेरचे आगदी थोडे राहिलेले सैन्य आपला सरदार पडलेला पाहून घाबरले. पळण्यासाठी वाट शोधू लागले. असंख्य जखमा असूनदेखील विश्वासरावांनी पुन्हा घोड्यावर मांड जमवली अन ते अन त्यांचे बोटावर मोजता येतील एवढे साथीदार अभूतपूर्व पराक्रम करून आपल्या दुप्पट सैन्याला गारद करून खाली सुरु झालेल्या रणधुमाळीकडे निघाले.
त्रिविक्रमाची खासियत अशी होती कि त्याच्या बरोबर त्याच्या अवती भोवती नेहमी विश्वासू अन ताज्या दमाची फौज असे. त्यामुळे आता रणांगणात उतरलेली फौज ही आजच्या दिवशी आधी लढलेली नव्हती. त्यामुळे धर्मसेनला चोख प्रत्युत्तर मिळाले. एक एक पडणारा योद्धा बहुमोल होता. धर्मसेनची फौज हि ताज्या दमाची नसली तरी आपल्या मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी पेटून उठलेली अशी होती. क्षणा क्षणाला चित्र पालटत होतं. त्रिविक्रम अन धर्मसेन मधोमध येउन लढत होते. अजून दोघांचे युद्ध सुरु झाले नव्हते. शत्रू पक्षातील योध्ये मारत मारत ते दोघे पुढे सरकत होते. आणि अखेर ते दोघे आमने सामने आलेच. दोघांनी एक मेकांना आव्हान देऊन लढायला सुरुवात केली. दोघांच्या तलवारी, हाताचा वेग, ठरायचं नाव घेत नव्हत्या. त्रीविक्रमाचा निसटता वार धर्मसेनच्या हातावर झाला त्याबरोबर त्याने पुढचाच वार त्रिविक्रमाच्या उजव्या खांद्यावर उतरवून सव्याज परत केला. असे करता करता दोघेही एक मेकांना एक एक घाव देत अन घेत होते.
आजूबाजूच्या सैन्यामध्ये काय चालू आहे ह्याचा त्या दोघांना विसर पडला होता अन अशातच त्रिविक्रमाच्या मागून कोणीतरी भाला टाकला अन तो धर्मसेनच्या छातीत उजव्या बाजूला लागला. त्याबरोबर धर्मसेन कोलमंडला. त्याची तालावारीवाराची पकड जराशी सैल झाली तोच क्षण साधून त्रीविक्रमाने त्याच्या तलवारीवर वर केला अन तालावर धर्मसेनच्या हातून निसटली. हि तर त्रीविक्रमची नेहमीची खेळी होती. ऐन लढाईत त्याचा एक खास माणूस त्याच्या मागे त्याच्या हालचालींवर लक्ष ठेऊन असे अन वेळ साधून समोरच्या योद्ध्याला असा वर्मी घाव देई की बस सगळा नूरच पालटून जात असे. धर्मसेन पडला. धर्मसेन पडला असा आवाज झाला. पण धर्मसेनचे सैनिक लढायचे थांबले नाहीत. त्यांनी त्रिविक्रमाच्या फौजेची कत्तल सुरूच ठेवली. मरणच येणार असेल तर मातृभूमीच्या रक्षणार्थ येऊ दे अशी त्यांची धारणा होती.
त्रीविक्रमाने धर्मसेनला शरण येण्यास सांगितले. आपल्या सैनिकांना थांबवण्याची आज्ञा देण्यस सांगितले. धर्मसेनने मानेनेच नकार दिला. त्याचे ते धारिष्ट्य बघून त्रिविक्रम चवताळला अन त्याने तलवार धर्मसेनच्या मानेवर ठेवली अन
म्हणाला “तर मग मरणाला तयार हो धर्मसेन”
धर्मसेनच्या मनात अनेक विचार तरळले. आजोबा-वडील यांच्या पराक्रमाच्या गोष्टी, त्यांचा दिग्विजय, त्याची मातृभूमी, त्याची प्रजा ज्यांचा त्याने आपल्या संतती सारखा सांभाळ केला होता, त्याची राणी सत्यवती. त्याचे सरदार, प्रधानजी, सेनापती, विश्वासराव, हिम्मतराव सगळेच एकसे एक हिरे. आणखी अजून बरेच चेहरे. राजा धर्मसेन विचार करत होता, आपण मातृभूमीच्या रक्षणार्थ रणभूमीत देह ठेवला हीच एक समाधानाची बाब आहे असा विचार करून त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटले अन तो मरणाला तयार झाला.
त्रीविक्रमाचा तलवार घेतलेला हात उंचावलेला त्याने पाहिला. आता हा क्षण अन पुढच्या क्षणी आपले मस्तक धडा वेगळे. हा एकच विचार त्याच्या मनी आला अन काहीतरी अघटीत घडले. तलवार हातात घेतलेला त्रिविक्रमाच्या धर्मसेनवर विजयी प्रहार करण्यासाठी वर उंचावलेल्या हातावर तो हात खाली धर्मसेनच्या मानेवर येण्या आधीच सपकन एक भाला येऊन घुसला. त्रिविक्रम कळवळला. हातातली तलवार गळून पडली. तो मागे सरकला. धर्मसेन ने चमकून पाहिले भरधाव घोडा फेकीत आलेले विश्वासराव काही क्षणात राजांजवळ पोहचले. राजांच्या छातीतला भाला त्यांनी मोठ्या कष्टाने उपसाला.
काही सैनिक लगेच कडे करून त्यांच्या भोवती उभे राहिले. त्रीविक्रमाच्या सैनिकांनी त्याला सौरक्षण दिले.
धर्मसेन म्हणाला “विश्वासराव काय वेळ साधलीत”
विश्वासराव म्हणाले “राजन आपण बाहेर पडावे इथून. आज ह्यांचा पाडाव केल्याशिवाय हा विश्वासराव रणात पडायचा नाही”.
संपूर्ण शरीर जखमांनी भरलेलं असताना सुद्धा हे उभे कसे होते हेच आश्चर्य होते. राजा धर्मसेनचा उर भरून आला, डोळ्यात पाणी तरळले.
धर्मसेन म्हणाला “विश्वासराव आपण मिळून पाडाव करू. मी कुठेही जाणार नाही. तुमच्यासारखी जिवलग आणि जीवाला जीव लावणारी माझी माणसं असताना मला कशाचीच भीती नाही”.
सुर्य मावळला होता. सूर्यास्तानंतरचा मंद प्रकश सगळीकडे पसरला होता. पशिमेला केशरी लाल झालेलं आकाश आज दिवसभर सांडल्या रक्ताची आठव करून देत होतं. विश्वासराव अन धर्मसेनने पुन्हा तालावर पेलल्या. तोच पूर्वेला खिंडीतून घोड्यांच्या टापांचा आवाज आला. आता ही कोणाची फौज आली ह्या विचाराने दोघांनी वळून पाहिले तोच एक आरोळी ऐकू आली “जय काळभैरवी” त्याला प्रतिसाद म्हणून लढणाऱ्या सैन्यातून कोणीतरी ओरडला “जय काळभैरवी”.
राजांनी चमकून विश्वासरावांकडे पाहिले. विश्वासराव म्हणाले “राजे आपले हिम्मतराव आलेत मानाजी रावांची कुमक घेऊन”. लढाईचा नूर एकदमच पालटला. तापलेल्या उन्हात कडाडून वळीवाचा पाउस फुटावा तशी मानाजीरावांची फौज येउन त्रिविक्रमाच्या उरल्या सुरल्या फौजेवर फुटली. काही क्षणातच सगळ्यांचा धुव्वा उडाला. राजा त्रिविक्रम कैद झाला. अखेर विजयश्रीने धर्मपुरीच्या गळ्यात माळ घातली होती.
प्रधानजी, सेनापती ह्यांच्याशी विचार विनिमय करून राजा धर्मसेनने राजा कपिलसेन अन महत्वाकांक्षी त्रिविक्रम ह्यांना त्याच्या राज्याशी दगलबाजी, आक्रमण, अन आजच्या दिवसाच्या झालेल्या नर संहाराला जबाबदार म्हणून देहदंडाची शिक्षा सुनावली. ताबडतोब शिक्षेची अंमलबजावणी झाली. आपल्या सैन्याची झालेली हानी पाहन राजा धर्मसेन हळहळला. त्रिविक्रमापेक्षा बळाने आर्ध्या असलेल्या त्याच्या फौजेने यश तर संपादन तर केले होते पण खूपशा प्राणांच्या आहुती नंतर. राजांनी सर्व जखमींच्या जखमांवर इलाज करण्यासाठी वैद्यांना सूचना दिल्या, धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या अंतिम कार्याबाद्दलच्या सूचना दिल्या. राणी सत्यवतीला विजयाची बातमी देणारा संदेश दिला गेला. ज्यांच्यामुळे हा विजय मिळाला त्यांच्यासाठी वियोत्सव करणे गरजेचे होते म्हणूनच मग वाद्यांच्या तालात राजा धर्मसेन आपल्या जिवलग सरदारांना सोबत घेऊन धर्मपुरीच्या विजयपथाच्या दिशेने मार्गक्रमण करू लागला.
लिपस्टीक
लेखिका – सरिता सावंत भोसले
आज कितीतरी महिन्यांनी मायाने मनाचा हळवा कोपरा उलगडला. मी पुन्हा कोलमडेन, कसाबसा सावरलेला अश्रूंचा बांध पुन्हा वाहू लागेल, पुन्हा स्वतःला त्या जगात हरवून बसेन या भीतीने कित्येक दिवस तिने तिच्या हृदयाच्या,मनाच्या अगदी जवळ असलेल्या दुर्लक्षित केलेल्या त्या रवीच्या बॅगला तिने आज हात लावला. आवडीच्या, आठवणीत राहाव्या, जपून ठेवाव्या अशा सगळ्या वस्तू रवी त्या बॅगेत ठेवायचा आणि जेव्हा कधी जुन्या आठवणीत हरवून जावंस वाटायचं तेव्हा एकांतात तो ती बॅग उघडून बसायचा. त्यावेळेस माया त्याच्या आजूबाजूला असली तरी त्याला ते जाणवायचं नाही इतका तो त्या संग्रहित आठवणींमध्ये हरवायचा. माया टोमण्यात कधीतरी त्याला म्हणायची देखील माझ्यापेक्षा महत्वाच्या अशा काय वस्तू आहेत त्यात की तू मलाही विसरून जातोस…त्यावर रवी तिला हसत म्हणायचा यात मीच आहे. वयाच्या प्रत्येक टप्प्यावरचा मी तुला इथे सापडेन. माझ्या जीवापाड, हृदयाजवळच्या वस्तू यात आहेत. कधी माझी आठवण आली तर ही बॅग उघड..मी तुला इथेच सापडेन.
रवीचा आवडता शर्ट,बेल्ट,जुने नाणी,लहानपणापासून मिळालेली प्रशस्तीपत्रक, ट्रॉफीज सगल्यावरून हात फिरवताना मायाला रवीच ते वाक्य आठवतं आणि पापण्याआड लपवलेल्या अश्रूंना वाट आपसूकच मोकळी होते. विस्कटलेले आयुष्य जसं सावरण्याचा प्रयत्न ती करत होती तशी ती सगळं सामान बॅगेत नीट ठेऊ लागली. एक नजर एका कोपऱ्यात पडली आणि तिला तिचा मेकअप बॉक्स दिसला. जो तिच्यासाठी जितका खूप खास तितकाच रवीसाठीही होता. भरल्या डोळ्यांनी तिने तो हातात घेऊन उघडला. फाउंडेशन, आयशँडो,मस्कारा,ब्लशर.. विविध रंगाच्या छटा बघून कितीतरी दिवसांनी रंगांशी पुन्हा ओळख होते असं वाटलं तिला. मेकअप बॉक्सचा दुसरा खण उघडला आणि सर्वात आवडते लिपस्टीकचे रंग तिला खुणावू लागले. खरंतर तिला बाकी मेकअप कधी आवडलाच नाही पण ओठांसोबत चेहऱ्याच, व्यक्तिमत्त्वाचे सौंदर्य खुलवणारी लिपस्टिक आणि तिचे रंग हे नेहमीच मायावर जादू करायचे.
लिपस्टीकचा मोह म्हणा किंवा एखादी गोष्ट आपल्याला सहज मिळत नसेल तर त्या गोष्टीच मुळातच आकर्षण आपल्याला जास्त असतं तसंच कदाचित मायाचं झालं असावं. कुटुंब ग्रामीण भागात राहणार..वडिलांची अमाप शेती..घरात संपत्ती तशी चांगलीच नांदत होती म्हणायला हरकत नाही पण वडिलांचा कडक, शिस्तखोर आणि काहीश्या जुन्या विचारांना धरून असलेला विचित्र स्वभाव सगळ्यावर हावी व्हायचा. मुलींचं नटण मुरडन त्यांना अजिबात खपायच नाही. त्यांचा दरारा इतका होता की मायाची आई ते घरात असताना स्वतःला आरश्यात बघायलाही घाबरायची. नववी दहावीत असताना कोणत्यातरी कार्यक्रमानिमित्त मायाने मैत्रिणीची लिपस्टीक लावली होती आणि घरी येताना ती मेकअप उतरायला विसरली. मायाला त्या रुपात पाहून तिच्या वडिलांची तळपायाची आग मस्तकात गेली आणि तिथेच तिच्या कानशिलात लगावली. “लाल चोच रंगवून कुठे नाचायला चाललीस का?? थोबाड रंगवून कुठे गेली होतीस??” या भाषेत तिला बरीच स्तुती सुमने ऐकावी लागली होती. आपल्याच घरचं अस वातावरण का?? बाकी काही नको पण लिपस्टीकही साधी लावू शकत नाही इतकं काय वाईट त्यात..यात काय नक्की चुकीचं?? अशी बरीच प्रश्न आईला ती विचारायची आणि “मुलीने साधं राहावं..हे असली रंगरंगोटी करून फिरू नये…चांगल्या घरच्या मुलींची लक्षण नसतात अशी” असे घरचे काही बाही नियम आई। त्यावर मायाला सांगायची पण त्या कोवळ्या वयात तिच्यापुढे फक्त लिपस्टीकचे रंग नाचायचे आणि सोबत बाबांचे लालभडक डोळे.
पुढे कॉलेजच्या शिक्षणासाठी होस्टेलवर राहायला लागल्यावर एक दिवस मायाचे आई बाबा तिला नेहमीप्रमाणे भेटायला आले. मैत्रिणींसोबत फिरायला जायचं म्हणून मस्त तयार झालेली माया अचानक बाबा समोर दिसल्याने दचकली आणि डोळ्यात काजळ, ओठांवर गुलाबी रंगाची लिपस्टिक लावलेली माया दिसताच बाबा चांगलेच चरफडले. होस्टेलमध्ये तमाशा नको म्हणून त्यांनी स्वतःचा राग आवरला पण त्यांच्या नजरेतला तो जळजळीत राग मायाला ओरबाडत होता. आल्यापासून जाईपर्यंत बाबा मायाशी अवाक्षरही बोलले नाहीत. निरोप घेताना आईने मायाला बाजूला घेऊन समजावलं, “कितीदा सांगितलं मुलीच्या जातीने मेकअप वगैरे केलेलं आपल्या घरात, तुझ्या बाबांना चालत नाही. तुझी शिकायची इच्छा बघून त्यांनी तुला बाहेर शिकायची परवानगी दिली पण अशा वागण्याने तुझं शिक्षणही बंद पडणार नाही याची काळजी घे. नीट राहा””. आईच्या त्या बोलण्याचा मायाच्या मनावर खोल परिणाम झाला आणि तिने पुन्हा कधीच लिपस्टिकचा मोह धरला नाही. ते रंग आपल्या आयुष्यात नाहीत असंच मनावर बिंबवून ती लिपस्टिकला फक्त डोळ्यात साठवत जगली.
लग्न होऊन माया सुखवस्तू,संपन्न अशा घरात आली. सासरे शेतीत गुंतलेले,सासूबाई गृहिणी आणि देशसेवेला स्वतःला अर्पण केलेला नवरा रवी अशा या त्रिकोणी कुटुंबात सुंदर, सालस मायाचं चौथ पान आनंदाने मिसळून गेलं. आर्मीत असलेल्या नवऱ्यासोबत लग्नानंतर तिला बाहेरचं जग मोकळेपणाने अनुभवता आलं. लग्नानंतरच्या पहिल्याच दिवाळीला रवीने तिला पहिली खास भेट म्हणून मेकअप बॉक्स दिला होता ज्यात हर तऱ्हेचे लिपस्टिकचे शेड्स होते. ते पाहून मायाच्या चेहऱ्यावर आनंद तर उमटला आणि झरकन तो नाहीसाही झाला. त्या लिपस्टीक पुढे तिला बाबांचे रागाने भरलेले डोळेच दिऊ लागले. रवीच्या नजरेतून तिची उदासीनता,भीती लपली नाही. प्रेमाने तिचा हात हातात घेऊन म्हणाला, “का पण तुझं लिपस्टीक वरच प्रेम आणि हे तुला मृगजळ वाटणार जग मला तुझ्या डायरीतून कळालं. तुला हेच गिफ्ट करायचं कारणही हेच आहे की मी तुला कोणत्याही बंधनात नाही ठेवणार. तुला जे आवडतं, कस आयुष्य जगावस वाटतं तस जग. तुझं अस्तित्व इतरांच्या नियमांशी, लादलेल्या विचारांशी बांधून न घेता तुला हव्या त्या रंगात जग. तू अशीही खूप सुंदर दिसतेस पण थोडा शृंगार केल्याने आणि या लिपस्टीकच्या रंगांनी या सौंदर्यावर अनोखा साज चढेल ज्यात तुझा मनापासून आनंद एकरूप झालेला असेल. या रंगांची साथ तुझ्या ओठांवर कायम झळकूदे..मी असो व नसो.”
माया ओठांनी न बोलता अश्रूंनी सारं बोलत होती…अकल्पित असं सुख आणि नवरा मिळाला म्हणून मनोमन देवाचे आभार होती. तिथून पुढचा तिचा प्रत्येक दिवस रवीच्या प्रेमात आणि लिपस्टिकच्या नवनवीन रंगात न्हाऊन निघत होता. रोज ओठांवर नवीन रंगाच हास्य खळाळत होतं.. पण नियतीला तीच ते हसणं मान्य नसावं की काय म्हणून एक दिवस रवी बॉर्डर वर असताना शहीद झाल्याची अचानक बातमी येते आणि मायाच्या आयुष्यात सगळे रंग फिके पडतात. रवी गेल्यानंतर घरच्यांचे नियम, पुन्हा बाबांचा दरारा आणि नवरा गेलेल्या बाईला समाजाने घालून दिलेली चौकट यात मायाचं आयुष्य पुन्हा पांढऱ्या रंगाच कोरं पान झालं होतं. रवीच्या आठवणी तिला जगण्याची उभारी द्यायच्या…तू मनापासून तुझी राहा..तू तुझ्यासाठी जग ही त्याची वाक्य सदा तिच्या कानात घुमून पुन्हा जगण्याची उमेद जागवायची पण लिखित अलिखित काही समाजातील प्रथा तिला पुन्हा हरवायच्या.
पण आज हिंमत करून ती उठलीच…रवीची बॅग उघडली…त्याच्या आठवणीत त्याला जगली..त्याला अनुभवलं. मनाशी काहीतरी ठाम निर्णय घेऊन ती लिपस्टीकच्या रंगांना न्याहाळत बसली.
दोन दिवसांनीच दिवाळीची सुरुवात झाली. रवीला जाऊन सहा महिने झाले होते पण त्याच्या आठवणी अजूनही ताज्याच होत्या.प्रत्येक दिवाळीला नवीन गिफ्ट देणारा रवी यावर्षी मायासोबत नव्हता..साहजिकच हे दुःख पचवणं तिला कठीण होतं पण शहीद जवानाची बायको ही वीरपत्नी असते. नरकचतुर्दशीच्या दिवशी मायाने सकाळीच अंगणात सडा टाकून सुंदर रांगोळी काढली. चेहऱ्यावरचं दुःखाच मळभ झटकून टाकून हसतमुख चेहऱ्याने घरात वावरत होती. पहिल्या दिवाळीला रवीने दिलेली हिरव्यागार रंगाची साडी नेसून, कपाळावर साजेशी टिकली लावून,डोळ्यात काजळ भरून आणि ओठांवर रवीनेच दिलेली लाल शेडची लिपस्टीक लावून ती दिव्यातील ज्योत लावत होती. तिला स्वतःची लेकच मानणारे सासू सासरे आणि तिला भेटायला आलेले तिचे आई वडील तिच्या आयुष्यातले हरवलेले रंग परत आलेले बघून खुशच झाले. इतकी महिने दुःखाच्या काळोखात झाकोळून गेलेला चेहरा नव्याने जगायची उमेद त्या ज्योतिच्या प्रकाशात उजळत होता. आज तिच्या नाजूक ओठांवरील लिपस्टिकचे रंग तिच्या बाबांना बोचत नव्हते तर तिच्या जगण्याचं तेच बळ आहे म्हणून समाधानी पावत होते.
लिपस्टीकच्या रंगांनी मायाच्या आयुष्यात नवीन आत्मविश्वास,नवीन प्रबळ इच्छाशक्ती, नवा उत्साह,जगण्याची नवीन प्रेरणा आणली. नरकचतुर्दशीला मायाने स्वतःतील नकारात्मकतेलच, दुर्बलतेच, अविचारांच, आणि कथाकथीत प्रथांच दहन करून प्रकाशमान आयुष्याकडे वाटचाल सुरू केली.
आतड्याची माया
लेखिका- विनया पिंपळे
उमाने घाईघाईने मनूला लागणारं सगळं सामान घरासमोरच्या व्हरांड्यात आठवणीने आणून ठेवलं आणि ग्रीलच्या दरवाज्याला कुलूप लावून आत पुन्हा एकदा नजर फिरवली. मनुसाठी पोळी भाजीचा एक डबा, ताट, पाण्याची बॉटल, शाळेतून आल्यावर शाळेचे कपडे बदलून घालायला एक साधा कॉटनचा गुलाबी फ्रॉक आणि खेळायला थोडीफार खेळणी इत्यादी वस्तू व्हरंडयाच्या एका कोपऱ्यात नीट मांडून ठेवलेल्या दिसल्या. मग मनातून ‘हुश्श !’ करत तिने अंगणातली स्कुटी फाटकाबाहेर नेली. फाटकाची कडी लावून घेतली आणि स्कुटीवर स्वार होऊन भरार वेगाने ऑफिसच्या दिशेने गाडी दामटवली.
स्कुटीच्या वेगात झरझर मागे जाणारी दृश्ये तिला दिसत होतीही आणि नाहीही. डोक्यात विचार वेगळेच. ‘आज शाळेतून घरी आल्यावर मनूला आपण ऑफिसमधून घरी पोचेपर्यंत चारेक तास एकटीला रहावं लागणार.’ हे मनाशीच आठवून तिचे डोळे नकळत ओले झाले. पण दुसरा काहीच पर्याय नव्हता ना ! या नवीन घरात येऊन त्यांना जेमतेम दोनेक महिने झाले असतील. किती हौसेने आणि हट्टाने घर बांधले होते तिने ! म्हणजे मनोजचे आणि तिचे स्वतःचे घर नव्हतेच असे नाही; पण ते होते खेड्यात. तिथून इथे शहरात ऑफिसला येणं म्हणजे तीस अधिक तीस असं साठ किलोमीटरचं जाणंयेणं. मनोजला त्याच्या कामानिमित्त चारपाच दिवसातून एकदा चारपाच दिवसांसाठी बाहेरगावी जावे लागायचे. त्यामुळे घर कुठेही असलं तरी तो सहज मॅनेज करू शकायचा. पण उमाची दगदगच व्हायची. ‘बरं एकवेळ ही होणारी दगदग आपण सहन करू पण पोरीच्या शिक्षणाचं काय?’ तिला मनातच वाटायचं आणि त्यातूनच शहरात घर बांधण्याचा तिचा हट्ट जन्माला आला.
मग तिच्या हट्टापुढे नमतं घेऊन गेल्या वर्षभरात मनोजनं शहरात एक छानशी जागा पाहून छोटंसं पण टुमदार घर बांधलं. केवढा मोठा कार्यक्रम केला दोघांनी वास्तूशांतीचा ! अख्खं गाव जेवायला बोलावलं. घरभर जिकडेतिकडे चकचकीत टाईल्स, रंगीत सुशोभित भिंती, घरातूनच गच्चीवर जायला असणारा जिना, बसाउठायला एक हॉल आणि त्यापुढे बाकदार नक्षीअसलेल्या जाळीच्या खिडक्यांचा व्हरांडा आणि त्या व्हरांड्याला तसल्याच नक्षीदार जाळीचा दरवाजा. वास्तुशांतीच्या कार्यक्रमात आलेली गावाकडची मंडळी सगळं काही भारी कौतुकाने न्याहाळत होती. मनोजचं आणि सूनबाईचं भरभरून कौतुक करत होती.
आता ह्या नवीन घरापासून ऑफिस फक्त नऊ किलोमीटर दूर होतं. म्हणजे फार फार तर दहा पंधरा मिनिटांचा रस्ता. शिवाय मनूला चांगल्या शाळेत टाकलं होतं हाही फायदाच. नाही म्हणायला नवं बांधलेलं घर ज्या एरियात होतं तो अजून फारसा डेव्हलप झालेला नव्हता. तुरळक घरे बांधून झाली होती. काही अर्धवट झालेली होती. काही प्लॉटस अजूनही तसेच रिकामे होते. त्यांच्या घराच्या आजूबाजूला एकही घर सद्ध्या नव्हते. जी घरे होती ती नजरेच्या टप्प्यात पण थोडी लांबच होती. शेजारी म्हणून नव्हते कोणी. त्यामुळे मनोजची ड्युटी बाहेरगावी असताना मनुंचं शेड्युल कसं सांभाळायचं हा एक प्रश्नच होता. मग ह्या नवीन घरात सासूबाईंनीही त्यांच्यासोबत रहावं असं ठरलं. सासूबाई मात्र नाखूष होत्या. खरंतर त्यांचं सगळं आयुष्य त्या खेडेगावात एकत्र कुटुंबात गेलेलं. मनोज लहान असतानाच त्याचे बाबा गेले. मग त्या मोठ्या आणि लहान दिराच्या गोतावळ्यात मनोजला घेऊन राहिल्या. पुढे प्रत्येकाची मुलं मोठी झाली. कुणी शेतात रमलं, कुणी धंद्यात. मनोज मात्र शिकून सवरून नोकरीला लागला. एकत्र कुटुंबातल्या पोरीसोरी एकेक करत सासरी गेल्या, मुलांची लग्ने होऊन नवीन सुना घरात आल्या. मग ह्या नवीन सुनांना असा एकत्र राबता काही झेपेना. भांडणं वगैरे न करता सगळे राजीखुशी वेगवेगळे रहायला लागले. वेगळे झाले म्हणजे काय स्वयंपाक आणि इतर कामं ज्याची त्याची ज्याच्या त्याच्या घरात होऊ लागली. पण नव्हाळीच्या भाज्यांची, नवीन काही खायला केलं त्याची देवाणघेवाण व्हायचीच. वाढदिवस, सणवार तर एकत्र ठरलेलेच. एका घरच्या पाहुण्याला तीन ठिकाणी पाहुणचार होऊ लागला. मनाने वेगळं कुणी झालंच नव्हतं. छान गप्पाटप्पा होत. आवश्यकतेनुसार एकत्र येऊन आणि गरजेनुसार वेगळं राहून सगळं सुरळीत सुरू होतं.
मनु लहान असेपर्यंत हे असं ठीकच चाललं सगळं. पण तिला शाळेत टाकण्याचा प्रश्न आला तेव्हा मात्र शहरात शिफ्ट होणे किती गरजेचे आहे हे उमा वारंवार पटवून देऊ लागली. सासूबाईंच्याने मात्र गाव आणि गावातलं घर सोडवेना. ‘तुम्ही जा शहरात मी आपली गावातच राहीन’ हे त्यांचं म्हणणं मात्र मनोजनं ऐकलं नाही.
शेवटी उमा, मनोज, मनु आणि साधनाताई असं चार माणसांचं छोटंसं कुटुंब त्या नवीन घरात शिफ्ट झालं.
उमा आणि मनोज दोघेही लवकरच नवीन जागेत रुळली. जास्त दुरून अपडाऊन करण्याचा त्रास वाचल्याने उमाची पाठदुखीही जरा कमी झाली. मनुला इकडे घराजवळ कुणी दोस्त मित्र नसल्याने सुरुवातीला कंटाळा आला, पण शाळा सुरू झाली तशी ती सुद्धा नवीन रुटीनमध्ये छान सेट झाली.
प्रश्न उरला फक्त साधनाताईंचा. त्यांना उठसूट शेजारी जाण्याची, गप्पा करण्याची सवय. गावात संध्याकाळी वयस्कर बायामाणसं विठोबाच्या मंदिरात हरिपाठ घ्यायला यायच्या. त्यातही त्यांचा वेळ मस्त जाई. इथे मात्र त्यांची चांगलीच गोची झाली. जवळपास कुणाचेही घर नाही. नजरेला दिसतील अशा घरांशी घरोबाच काय साधी तोंडओळख देखील नाही. गावात कसे ओळखीचा असो नसो दारावरून कुणी चालले तरी साधी हाक मारून पंधरा मिनिटे सहज गप्पांमध्ये काढता येतात. इथे ती सुद्धा सोय नाही. उलट अनोळखी लोकांशी जराही बोलायचं नाही ही दक्षता घ्यावी लागते.
उमा दररोज दहाला जाणार सहाला येणार. मनोज कधी दिवस दिवस बाहेर राहणार तर कधी दिवस दिवस घरात. मनु दुपारी दोनला घरी यायची तेव्हापासून तर संध्याकाळी उमा येईपर्यंत आजीच्या मागे तिची पिरपिर. मला हे हवंय, मला ते हवंय, आज असं शिकवलं, आज तसं शिकवलं, अमुक मॅम खूपच फन्नी आहेत आणि तमुक फारच स्ट्रिक्ट. शाळेतून आल्यावर हातपाय धुवून कपडे बदलून जेवणखावण करताना मनूच्या हजारो गोष्टी आजीला ऐकवून झालेल्या असत. सगळ्यांचं सगळं बस्तान व्यवस्थित बसलं होतं. फक्त साधनाताईंची हल्ली चिडचिड होऊ लागलेली. पोराच्या ह्या नवीन घरातल्या संसारात आपलं काही स्थानच नाहीय असं त्यांना प्रकर्षाने जाणवू लागलं.
का कोण जाणे पण हल्ली त्या थोडं विचित्र वागू लागल्या. मुद्दामच. आणि तेही मनोज घरी नसताना. उमाला आधी पोळ्या करून घेऊ द्यायच्या आणि नंतर आपण आपल्यासाठी भाकरी थापून घ्यायची. मग पोळ्या उरल्या तर त्यासाठी उमाला दोष देत कुरबुर करायची. किंवा उमानं स्वतःहुन त्यांच्यासाठी भाकरी केली तर ‘आज नको होती मला भाकरी.’ असं म्हणत मुद्दाम पोळी खायची. ‘आज तुमच्यासाठी भाकरी करू की पोळी?’ असं उमानं विचारलं त्यादिवशी तर रडून वगैरे फारच तमाशा केलेला त्यांनी. उमा उलटून बोलत नसे. हे असं सगळं वागणं दिवसेंदिवस वाढू लागलं. उमा घरातून ऑफिसला जायला निघणार की ह्यांचं सुरू होई-‘हं ओटा राहिलाय आवरायचा…आणि बाई चालल्या गाडीवर बसून फुर्रर्र. मागे हक्काची घरगडी आहेच सासू सगळा आवा आवरायला.’ उमा ऐकून न ऐकल्यासारखं करी अन दुसऱ्या दिवशी नेटाने पटापट कामं उरकून ओटाही आवरून ठेवत असे. पण मग ‘कपडे भिजवायचे राहिले.’ ‘रांगोळी काढलीच नाही.’ खरकटं पाणी नेऊन टाकलं नाही’ ‘सोडून ठेवलेल्या कपड्यांची घडीच केली नाही’ इत्यादी इत्यादी अनेक कारणांवरून त्यांची बडबड सुरूच रहात असे. मनोज घरात असताना मात्र त्या बऱ्यापैकी शांत असत.
त्यादिवशी रविवार होता. मनोज घरी नव्हताच. असंच कुठल्याशा कारणावरून त्यांचं बिनसलेलं. बोलता बोलता म्हणाल्या-“माझीच अडगळ झालीय तुम्हाला संसारात. एकदा मी डोळे मिटले की मग रहाल सुखात, आनंदात.” हे असं सारखं सारखं मरणाधरणाच्या गोष्टी ऐकून ऐकून उमाचं डोकंच उठलं. “वेळीअवेळी असं भलतंसलतं नका बोलत जाऊ आई.”- समजावणीच्या सुरात असलं तरी ती पहिल्यांदाच त्यांना असं उलटून बोलली. त्या आणखी चिडल्या. म्हणाल्या-“आता तू शिकव मला कसं वागायचं ते. तेवढंच राहिलंय. माझ्या मायबापानं थोडीच वळण लावलंय मला.”
“मायबापापर्यंत जाण्याची काहीच गरज नाहीय आई. थोडं समजून घ्या. तुम्ही असं अभद्र बोलत राहता. मनोज बाहेरगावी असला की मला मग काळजी वाटत राहते.”
“हो हो. तुला काळजी वाटणारच. मला थोडीच वाटते. तुझा नवरा ना तो. माझा कोणीच नाही. रस्त्यावरून उचलूनच आणलंय नं मी त्याला.”
“असं काहीही काय बोलताय आई. अभद्र बोलू नका इतकंच म्हंटलंय मी.”
“इतकंच म्हंटलस पण त्यामागचं सगळं म्हणणं कळलं हो मला. तुला नकोय ना मी घरात !… आजच जाते बघ कशी. आहे माझं घर मला. ह्या तुझ्या घरात एरवीही नाहीच करमत मला.”
“तुझं माझं असं कधी म्हंटलं मी? हे आपलं घर आहे ना?”
“हं… म्हणे आपलं. मी केला होता का हट्ट हे घर बांधायचा?…मला तर तेच माझं घर वाटतंय. तुलाच तिथे परकं वाटत होतं. तुझ्याच मनात नव्हतं त्या घरात रहायचं.”
“परकं वाटायचा प्रश्न नव्हता आई. सात वर्षे कुठलीच तक्रार न करता राहिलेच की मी तिथल्या गोतावळ्यात. पण माझं ऑफिस, मनोजचं वेळीअवेळी घरी येणं आणि मुख्य म्हणजे मनुची शाळा. सगळं तिथून मॅनेज करणं कठीण होऊ लागलं दिवसेंदिवस. तुम्ही घरात असता, तुम्हाला नाही कळत बाहेर काय चाललंय, जग कुठं चाललंय.”
झालं. उमाने इतकं बोलायचा अवकाश की साधनाताईंनी बॅगच भरायला घेतली. उमाने परोपरीने त्यांची समजूत काढायचा प्रयत्न केला, पण नाही बधल्या त्या. बॅग भरून घुश्शातच तिला म्हणाल्या- “मला बस स्टँडवर पोचव आत्ताच्या आत्ता मला माझ्या घरी जायचंय.”
उमा त्यांना सोडून देणार नव्हती खरंतर. पण त्या इतक्या हट्टाला पेटलेल्या होत्या की तिने पोचवलं नसतं तर त्या स्वतःच पायी चालत गेल्या असत्या. मग तिने नाईलाज म्हणून त्यांना स्टँडवर पोचवलं. योग्य त्या बसमध्ये बसवलं. आठवणीने मोठ्या चुलत सासऱ्याना फोन करून कळवलं.
हे सगळं घडलं पण एकही फोन मनोजला करता आला नाही. मनोज कामावर गेलेला असताना त्याला फोन करून डिस्टर्ब केलेलं आवडत नसे. त्याला फोनचं तसंही फारसं कौतुक नव्हतंच. आणि त्यामुळे तिथे तो फारसा बोलतही नसे.
आपल्या आई आणि बायकोमध्ये असलेला सूक्ष्म ताण त्याला कधी जाणवलाच नाही असं नाही. पण ‘दोघींचं दोघींनाच निस्तरू द्यावं. उगाच मध्ये मध्ये करू नये.’ हे तंत्र त्याने पहिल्यापासून अवलंबलेलं होतं. उमाने सासूबाईंविषयीच्या तक्रारी कधी त्याला ऐकवल्या नाही आणि आईनेही सूनबाईला त्याच्यासमोर कधी त्रास दिला नाही. कुणाचीही बाजू वगैरे घेण्याचा त्यामुळे कधी प्रश्नच आला नाही आणि म्हणूनच भांडण कधी विकोपाला गेलं नव्हतं.
आता मात्र मनोजला हे कळवणं फार गरजेचं होतं. पण त्यादिवशी फोन केल्यावर ‘कामात आहे सद्ध्या. नंतर बोलू.’ इतकं सांगून त्याने फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी सोमवार असल्याने सुट्टी घेणं उमाला जमणार नव्हतं. आता मनुची सर्वात जास्त काळजी तिला वाटू लागली. उद्या मनूला ऑफिसमध्ये सोबत नेताही येणार नाही आणि शाळेत पाठवू तर घरी आल्यावर तिच्याजवळ कोणी नाही. जेमतेम सहा वर्षांची पोर कशी राहील? एवढं मोठं घर ह्या छोट्याशा जिवाच्या भरवशावर कसं टाकून द्यायचं? मनोज घरी असतानाचे दिवस सोडले तर हा आता नेहमीसाठीचाच प्रश्न झाला होता. बरं नेहमीसाठीचा प्रश्न म्हंटल्यावर मनुला सांभाळायला एखादी बाई शोधली असती. पण आत्ता यावेळी बाई कुठून आणायची? सगळंच अवघड होऊन बसलं.
उमानं काहीतरी मनाशीच विचार केला आणि मनूला जवळ बोलावून दुसऱ्या दिवशी शाळेतून आल्यावर एकटीने कसं रहायचं वगैरे सूचना समजावून सांगितल्या. सोमवार एकदाचा निभला की झालं. मंगळवारी मनोज घरी असणारच होता. सहा वर्षांची एवढीशी पोर मनु- सगळं समजून घेतलं तिने आणि एकदाही कुरकुर केली नाही. फक्त- “माझी सोनू बाहुली बाहेरच्या व्हरांड्यात आठवणीने ठेवशील माझ्यासाठी. तिच्याशीच गप्पा करेन मी.” असं अगदी समजूतदारपणे म्हणाली आणि आपल्या खेळात गुंग झाली. उमाला नवल वाटलं ! किती पटकन बदलत्या वातावरणाशी जुळवून घेतात मुलं ! खायला आणि खेळायला मिळालं की कसलीच खळखळ नसते. नाहीतर आपल्यासारखी आईंसारखी मोठी माणसं, की ज्यांना सगळं असूनही अजून काहीतरी हवं असतं. मनुच्या समजूतदारपणाने तिचे डोळेच भरून आले एकदम. थोडं अपराधीही वाटलं. आज नोकरी करत नसते तर दिवसरात्र चोवीस तास मनुच्या दिमतीत राहता आलं असतं. तिला एकटीला ठेवण्याची अशी वेळच आली नसती. बरं थोडं लक्ष ठेवा म्हणून सांगायला कुणी शेजारीही नव्हतं.
ऑफिसच्या आवारात स्कुटी उभी करून तोंडाला बांधलेला स्कार्फ सोडवून घेत तिनं हलकेच डोळे पुसले. साहेबांच्या केबिनमध्ये ठेवलेल्या मस्टरवर सही करायला टेबलजवळ गेली. सही करताना मनगटावरच्या घड्याळात एक नजर टाकली, दहा पाच झाले होते. सुट्टीविषयी बोलू की नको, बोलू की नको ह्या विचारांच्या तंद्रीत असताना साहेबांनीच तिला विचारलं-“पाटील मॅडम, काय झालं? काही हवंय का?”
“अं…हो… नाही… म्हणजे मला सुट्टी हवी होती.”- ती अजिजीने म्हणाली.
“मॅडम, गेल्याच महिन्यात तुम्ही सलग पाच दिवस सुट्ट्या घेतल्या होत्या. याही महिन्यात दोन झाल्या आहेत.”
“हो… पण आज जरा अर्जंट काम आहे.”- तिचा आवाज अधिकच हळवा झाला.
“हं… पण तुम्हाला माहीत आहे ना सोमवारी किती काम असतं ते. एकवेळ उद्या सुट्टी घ्या पण आज नको.”
साहेबांच्या नकाराने तिचा चेहरा फिकुटला. उदास होत
ती केबिनमधून निघून आपल्या टेबलकडे जायला वळली तेवढ्यात- “मॅडम…”
साहेबांनी तिला आवाज दिला. तिने मागे वळून पाहिले तर-” ठिकाय तुम्ही अर्धा दिवसाची रजा टाका. शक्य तितकं काम पूर्ण करून तीन वाजता तुम्ही जाऊ शकता.”
तेवढ्यानेही तिला किती बरं वाटलं. तीनला सुट्टी म्हणजे फारतर सव्वातीन होतील घरी पोचायला. मनूला फार एकटं रहावं लागणार नाही. मनोजही हातातलं काम पूर्ण करून आज रात्री परतणार होता.
मग टेबलावरच्या फाईलींमध्ये तिने डोकं खुपसण्याआधी मनोजला एकदा फोन लावला. खरंतर त्यालाही मनातून मनुची काळजी वाटत असणार. पण आवाजात तसे काही न दाखवता तो तिला धीर देता झाला. तिनं आपल्याला अर्ध्या दिवसाची रजा मिळाल्याचं तिला कळवलं तेव्हा तोही थोडा आश्वस्त झाल्याचं तिला जाणवलं.
एकेक फाईल नजरेखालून घालताना तिला कधी एकदा तीन वाजतात असं वाटू लागलं. घड्याळाचे काटे फार हळूहळू फिरताहेत असंही वाटत होतं.
तिला आज पहिल्यांदा तीव्रतेने जाणवलं की बाईने नोकरी करणं खरंच कठीण असतं. घरातून आपल्या माणसांची खरीखुरी साथ लागते. आपण कितीही आव आणला तरी माणसासारखं सगळं वाऱ्यावर सोडून नाही देता येत. का करतो आपण इतका आटापिटा ?… किती चांगली श्रीमंत ठिकाणं चालून आली होती आपल्याला !… पण बऱ्याच जणांना नोकरी करणारी बायको नको होती. किंवा ज्यांना चालणार होती त्यांना तिच्या नोकरीची फारशी गरज नव्हती. म्हणजे कधीही ‘तू नोकरी सोड.’ असं म्हणू शकणारा मुलगा तिलाही नकोच होता.
मग मनोजचं ठिकाण तिला आवडून गेलं. खेड्यात राहूनही जिद्दीने शिकलेला, स्वबळावर नोकरी मिळवलेला आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी नोकरी करणारी बायको हवी असणारा. त्याच्या आयुष्यात आपल्याइतकंच आपल्या कमावतेपणाचंही कौतुक असलं पाहिजे ह्या एकाच इच्छेच्या पुर्ततेखातर तिने मनोजशी लग्न केलं. आणि सातेक वर्षे त्याच्या बरोबर गावातल्या घरात काढलीही. आता गरज आणि आवड म्हणून स्वतःचं घर बांधलं तर हे असं सगळं अवघड होऊन बसलं.
एकेक फाईल हाताखालून जात होती खरं पण त्यातली कामं यांत्रिकतेने, सरावल्यासारखी होत होती. सद्ध्या मन आणि मेंदूची फारकत झाल्यासारखं झालं होतं. मन कधी घड्याळाच्या काट्याबरोबर वर्तमानात तर कधी एकेक प्रसंग आठवत भूतकाळात यथेच्छ फिरत होतं.
दीड वाजता मधली डबा खाण्याची सुट्टी झाली तेव्हा तिला पर्समधला डबा काढून जेवायची इच्छाच झाली नाही. दोन सव्वा दोनला मनू घरी येईल. तिच्या दप्तराच्या पहिल्या खणात ग्रीलच्या दरवाज्याला लावलेल्या कुलुपाची किल्ली काल रात्रीच ठेवली होती तिने. आणि दप्तरात किल्ली ठेवण्याआधी कुलूप उघडण्याचा सरावही करून घेतला होता चारपाच वेळा. आणि कुलूप उघडताना चुकून किल्ली ग्रीलच्या दरवाज्याचा आतल्या बाजूला हातातून पडू देऊ नकोस म्हणून सूचनाही देऊन झाली होती. सहा वर्षाच्या त्या छोट्याशा जीवाने सगळं नीट ऐकून समजून घेतलं होतं. आणि आईला नीट प्रात्यक्षिकही करून दाखवलं होतं.
पुन्हा घड्याळात नजर टाकली तर दोन वाजले होते. ‘घरी जाण्याची सुट्टी व्हायला अजून एक तासाचा अवकाश !’ तिनं मनात म्हंटलं आणि पुन्हा स्वतःला कामात गुंतवलं.
फार फार युगे लोटल्यासारखा तो एक तास कसाबसा संपला. निघण्यापूर्वी आवरून करायची अशी तयारी फारशी नव्हतीच आज. अर्ध्या रजेचा एक अर्ज तिने आधीच खरडून ठेवला होता. तो साहेबांच्या केबिनमध्ये नेऊन दिला. आणि त्यांची परमिशन घेऊन बाहेर आली.
गाडीला नव्हे आपल्यालाच पंख हवे होते असं तिला वाटलं. उद्याचं उद्या बघता येईल. पण आज मनुजवळ तिला लवकरात लवकर पोचायचं होतं. आजूबाजूला शेजार नसताना, जवळ कोणी मोठं माणूस नसताना पोर कशी राहिली असेल, काय करत असेल ह्या काळजीने तिचं मन मलूल झालं होतं. मनुची ओढ तिच्या उजव्या हाताच्या मनगटाला स्कुटीचा स्पीड वाढवायला बाध्य करत होती.
काळजी आणि ओढ मनात घेऊन वाऱ्यावर स्वार झाल्यासारखी स्कुटीचा उजवा कान पिरगाळत उमाने घराचा रस्ता चाकाखालून घातला. दुरून घर दिसू लागलं तसतशी ती अधीर होत होती. शेवटी एकदाची फाटकाजवळ पोचली तर आतून मनु कुणाशीतरी बोलत असल्याचा आवाज तिला आला. काळजात धस्सकन होऊन तिने कान देऊन ऐकलं तर मनु तिच्या आजीशी गप्पा मारत असल्याचं तिला ऐकू आलं. आपण आलोय हे त्या दोघींना कळावं म्हणून गाडीचा हॉर्न तिने जोरजोरात वाजवला. हॉर्न ऐकून मघाशी बाहेर काढून ठेवलेला घरी वापरायचा गुलाबी फ्रॉक घातलेली मनु धावत पळत फाटक उघडायला आली अन खुश होत म्हणाली- “आई, आज तू लवकर कशीकाय आलीस? तू तर सहा वाजता येतेस ना?”
“तुझ्या काळजीने आले बेटा. जेवलीस का तू?”
तिचा प्रश्न ऐकूनही त्याकडे फार लक्ष न देता उत्साहाने मनु तिला म्हणाली-“आज ना गंमतच झाली आई. मी शाळेतून घरी आल्यावर ना आजी दारातच बसलेली होती माझी वाट बघत. तिच्याकडे किल्लीच नव्हती ना घराची.” – बोलताना मनुचे हातवारे सुरू होते-“मग मीच दप्तरातून किल्ली काढली आणि कुलूप सुद्धा मीच उघडलं. आज्जी शाब्बास म्हणाली मला.”
उमाला मनातून खूप भरून आलं. पण स्वतःला सावरत ती म्हणाली-“अजून काय काय मज्जा केली मग तू?”
“मी ना मस्तपैकी पोटभर जेवले अंगणातल्या झाडांखाली बसून. मला पिकनिकला आल्यासारखं वाटलं आज. आजीलाही म्हंटलं मी की तू सुद्धा जेव माझ्यासोबत. तर ती थांबलीय तुझ्यासाठी…”
“माझ्यासाठी?… पण मी तर डबा खाऊन आलेय ऑफिसातून.”
उमाने मनूला असं सांगितलं तेवढ्यात साधनाताई बाहेर आल्या आणि म्हणाल्या-“मनु… आईला म्हणावं डबा घरी विसरल्यावर ऑफिसमध्ये कसाकाय खाल्लास?”
‘अरेच्या !… निघताना पर्समध्ये घेऊ म्हणून ग्रीलच्या दरवाज्याबाहेर पायरीवर ठेवलेला डबा तर आपण तिथेच विसरलो’- उमाला आठवलं. आणि ऑफिसात जेवायची इच्छाच नसल्याने डबा घरी विसरल्याचं आपल्याला कळलं सुद्धा नाही.
उमाने पर्समधून आतल्या घराची किल्ली काढली. दार उघडलं आणि त्या तिघीही घरात आल्या. मग मनुची नेहमीप्रमाणे आजीशी अखंड बडबड सुरू झाली.
उमा हातपाय धुवून किचनमध्ये आली. तोपर्यंत डायनिंग टेबलवर दोन पानं साधनाताईंनी वाढून घेतलेली तिला दिसली. मग त्या दिवशी एकमेकींशी फार काही न बोलता त्या दोघी सोबत बसून जेवल्या.
जेवताना नेहमी बोलतो तितकं आवश्यक आणि जुजबी ‘हा… हं… हे दे… ते घ्या… पोळी वाढू का…’ असे संवाद त्यांच्यात घडले. मनातून मात्र दोघीही एकमेकींशी भरभरून बोलत होत्या. हे फक्त त्यांच्यातील मौनाला कळत होतं.
त्या दिवशी उमाचे डोळे कृतज्ञतेने सारखे भरून येत होते.
अप्रूप
लेखक- महेश काळे
वाड्यात राहत असताना कुणाकडे टिव्ही येणार म्हटलं की जाम अप्रूप वाटायचं. सकाळपासूनच चर्चा, गडबड, लगबग सुरू व्हायची. टीव्ही बसवणारा माणूस आला की, सगळी पोरं त्याच्या मागोमाग पळायची. अँटेना बद्दल तर जाम कुतूहल वाटायचं. अँटेना हलवल्यावर चांगलं चित्र यायचं, मग काहीतरी जादुई प्रकरण असल्यासारखं वाटायचं ते. दूरदर्शनचा एखादा कार्यक्रम चालू व्हायच्या अगोदर “सत्यम् शिवम् सुंदरम्” चा गोल फिरत राहायचा आणि एक ट्यून वाजायची. त्यातही मजा वाटायची. वाड्यात ज्यांच्याकडे पहिल्यांदा टिव्ही आला त्यांचं नाव सुवर्णाक्षरात नोंदलं जायचं. क्रिकेट मॅचेस,शनिवार रविवारच्या सिनेमांसाठी मग त्यांच्याकडेच थिएटरसारखी तोबा गर्दी. मग आमचं आमच्या घरच्यांकडे टुमणं लावणं चालू व्हायचं.
“बाबा,सांगा ना,आपल्याकडे कधी येणार टिव्ही, सांगा ना”
टिव्ही म्हणजे कुटुंबाचा सदस्यच होता. त्याकाळी चॅनेल एकमात्र. पण सगळे कार्यक्रम कुटुंबाला एकत्र बांधून ठेवायचे. आता चॅनेलचा भडीमार आहे पण मन कुठं स्थिर होत नाही. नुसतीच चॅनेलची बदलाबदली. साप्ताहिकी सारखा कार्यक्रमही आपण किती ऊत्सुकतेने बघायचो, का तर, पुढच्या आठवड्यात कुठला सिनेमा असणार आहे? कुठली नवी सीरिअल चालू होणार आहे?
दुसरं मोठं अप्रूप वाटायचं ते म्हणजे वाहन खरेदीचं. अगोदरच काही महिने नंबर लावायला लागायचा गाडीसाठी. “उद्या येणार बरं का आमची गाडी” असं औत्सुक्याने एका खिडकीतून दुसऱ्या खिडकीत सांगितलं जायचं. लुना,एमएटी,बजाज स्कूटर या गाड्यांची मांदियाळी असायची त्याकाळी. गाडी आली की सगळे जण अंगणात गोळा व्हायचे. मग साग्रसंगीत त्या गाडीची पूजा व्हायची. पेढे वाटप व्हायचं. मग सगळे जण त्या गाडीवर आपापल्या स्टाईलने चक्कर मारत,टेस्ट राईड घेत.
“मस्तय हां गाडी, भारीच पळतीये”
मग आनंद आणखीन वाढायचा, कित्येक पटीने.
आता कुणाकडे काय आलंय काही सुगावा देखील लागत नाही. मनंच कोती झालीयेत सगळ्यांची. त्याच्याकडे कार आली, मग माझ्याकडे कधी येणार,अरे, पण खरंच कारची गरज आहे का
स्वतःला ? पण नाही, स्पर्धा करायची सवयच लागली आहे आपल्याला.
हल्ली भाजी खरेदी सारखं आपण टिव्ही, टू व्हीलर आणि इतर वस्तू खरेदी करून येतो. एकमेकांना सांगणं नाही, औत्सुक्य नाही, आनंद वाटून घेणं नाही. फक्त कोरडेपणा.
“अप्रूप” हा शब्दच आपल्या शब्दकोशातून गायब झालाय.
हळदीचं बेट
लेखिका- अपर्णा देशपांडे
मागील वर्षी सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप ‘व्हायरल‘ झाला होता . आईवडील आपल्या छोट्याश्या पाच सहा वर्षाच्या मुलाला खोटं खोटं रागवताएत किंवा मारल्याचा अभिनय करत आहेत …..आणि एक जेमतेम चालायला लागलेली , अजून बोलता न येणारी चिमुरडी आपल्या अनाकलनीय भाषेत (??) बडबड करत आपल्या वडिलांना रागवतेय . अगदी रागारागाने हातवारे करत ओरडतेय .
तिच्या चिमुकल्या हातांनी बाबांना ढकलतेय ……..तिला दादाला वाचवायचय , घरात कुठलाही आक्रस्ताळेपणा , नकोय …..हवंय फक्त निरामय प्रेम !
हे असं घरोघरी घडतं .
कुठून येते ही भावनिक ताकद? ही काळजी? खुद्द आईवडिलांशी जाऊन भिडण्याची उर्मी ?
याचं कारण म्हणजे तिला जन्मजात मिळालेले कोमल ह्रदय , लगेच वितळणारं लोण्यासारखं मन आणि तिथे ठासून भरलेली अपार माया .
ती प्रसंगी आई वडीलांमधील साकव होते , तर कधी ते आणि आपल्या भावातील एक नाजूक पण तरीही खंबीर दुवा . बाबांच्या आवाजावरून ती त्यांची मनस्थिती ओळखते . त्यांच्या डोळ्यात खोलवर लपवलेलं पाणी ही न शोधताच दिसतं तिला .
आईच्या मनातील चलबिचल , तिचे मानसिक , भावनिक आंदोलनं ह्याचा नुसता साक्षीदार न होता आईचा भावनिक आधार बनते ती . आईच्या अनेक दृश्य अदृश्य जखमांवरचं लेपण !! ……तिचं आणि साऱ्या घराचंच हळदीचं बेट !!
असं हळदीचं बेट प्रत्येक घरात असावच . हळदी मध्ये असलेली जखम भरायची ताकद निसर्गाने मुलीमध्ये दिलीये . एका उनाड अवखळ काहीश्या बेफिकिरीत वावरणाऱ्या तरुणाचं एका कोमल हृदयी , आणि हळव्या बापात रूपांतर करणारी ही कन्या आपल्या आईची एक संवेदनशील साथी असते .
आईच्या अंशाचा हा कोवळा कोंबच पुढे एका वेलीत रूपांतरित होऊन तिचा कायमचा मानसिक आधार बनतो .
घरातील मुलगा मग तो कोणत्याही वयातील असुदेत , त्याच्यासाठी घरातील मुलगी ही त्याची बचावाची ढाल असते . त्याच्या खोड्या सावरत त्याला बाबांच्या कोपापासून वाचवत आणि मग निवांत शांतपणे त्याच्या चुका दाखवत त्याला मायेचं पांघरून घालणारं हे बहिणीचं प्रेम मिळायला प्रत्येकाला एक बहीण असावी लागते .
……मात्र मुलामुळे वंश वाढतो , आई वडिलांचं नाव राखला जातं ह्या तद्दन निरर्थक समजावरून कित्येक पिढ्यात मुलीच्या जन्मावर वरवंटा फिरवल्या जातोय .
ऑलिम्पिक मध्ये अपयशाची भळभळणारी जखम भरून दोन मेडल मिळवून देणाऱ्या पी.व्ही सिंधू आणि साक्षी मलिक ह्यांनी देशा बरोबर आपल्या आई वडिलांचं , आपल्या खानदानाचं नाव पार उंचावलंच न? देशाला ऑलिम्पिक मधून रिकाम्या हाताने वापस येण्याच्या नामुष्कीतून ह्या हळदीच्या बेटांनीच तर वाचवलं .
भारताची पहिली गुप्तचर अधिकारी लेफ्टनंट गेनेवी लालजी हिचे आजोबा आणि वडील हे देखील सैन्यातच होते .
आपल्या कुटुंबातील तिसरी पिढी होत घराण्याचं आणि देशाचं नाव करणारी ही कन्या !!
अशा कन्या रत्नांचीच उदाहरणं द्यायची झाली तर अगणित कन्यका आहेत ज्यांनी आपल्या घरण्यासोबत देशाला सन्मान मिळवून दिला .
शैक्षणिक क्षेत्रातही कायम मुली बाजी मारतात ते त्यांच्यातील अंगभूत चिकाटी , मेहनतीची तयारी आणि प्रचंड सकारात्मकता ह्यामुळे .
*अनुवंश शास्त्रीय भाषेत बोलायचं तर निसर्गाने काही हक्क स्वतः कडे राखून ठेवले आहेत* . *चिंपंझी आणि माणसं ह्यांच्या जिनोम मध्ये फक्त १.२% चाच फरक आहे . पण तेव्हढ्याच फरकामुळे निसर्गाने मानवाला कुठल्याकुठे नेवून पोचवलय . मानवाच्या बौद्धिक आणि शारीरिक वाढीत त्यामुळे आमूलाग्र बदल झाले .
अशीच किमया निसर्गाने मुलगा आणि मुलगी ह्यांच्या बाबतीत केली आहे . *ह्या दोन शब्दांमध्ये जरी एका वेलांटीचाच फरक असला तरी मेंदू रचना , त्याचा वापर आणि हार्मोन्स ह्यात तफावत असल्याने मुली मुलांपेक्षा अनेक बाबतीत जन्मतःच वेगळ्या असतात* .
*हे वेगळेपण मेंदूच्या प्रतिक्षिप्त क्रिया , परिस्थिती चे वेगवेगळे आकलन अथवा निर्णय शक्ती अशा अनेक बाबीमध्ये आढळून येते . ह्याचा सखोल अभ्यास झाल्यावर काही ठोकताळे बांधण्यात आले* .
३ ते ४ वयोगटातील काही बालके एका हॉल मध्ये खेळत होते . हॉल बाहेर एका बाजूला त्यांचे पालक आणि दुसरीकडे रंगबिरंगी आकर्षक खेळणी ठेवण्यात आली . सगळ्या मुलांना एकाच वेळी बाहेर सोडण्यात आले . त्यावेळी जवळपास सगळ्या मुली इकडेतिकडे न बघता आपल्या पालकांकडे धावल्या …पण अपवाद वगळता मुलगे मात्र खेळण्याकडे धावले .
आणखी अनेक प्रयोगात असे आढळून आले की सहा महिन्यांच्या बाळांसमोर काही आकर्षक वस्तू ठेवल्यास मुलं चटकन त्याकडे आकर्षित होतात , पण *मुली मात्र आधी वस्तू देणाऱ्याचा चेहरा वाचणं पसंद करतात* . एकूणच मुलींना भावनांची जाणीव लवकर होते .
मुली एका वेळेला अनेक क्रिया करून संतुलन राखून प्रत्येक काम नीट पूर्ण करू शकतात . मुलं खूप एककल्ली असतात . एका कामात लक्ष केंद्रित केलं की आजुबाजुला घडणाऱ्या इतर गोष्टींकडे गरज असूनही त्यांचं लक्ष जात नाही .
(मुलांची बलस्थानं , शक्तीस्थानं वेगळी आहेत . इथे मुलांना कमी लेखण्याचा मुळीच उद्देश नाही , फक्त मुलींना कायम दुय्यम स्थान मिळण्यामागची भूमिका किती चुकीची आहे हे सांगण्याचा प्रयत्न आहे . )
मग जर कन्यारत्न इतकं प्रभावी , मेहनती , कर्तृत्ववान आणि शिवाय मोहक आणि मधाळ प्रेमाची कुपी आहे तर मग ती काही कुटुंबात नकोशी का असते? अजूनही काही ठिकाणी मुली
‘नकुशा‘ का आहेत ? एक निसर्गदत्त शारीरिक ताकद सोडली ( आता तर त्यालाही अनेक जणी अपवाद आहेत) तर पुरुषांपेक्षा कुठेही कमी नसणाऱ्या आणि अनेकदा काकणभर सरसच असणाऱ्या ह्या जातीला का नाकारल्या जातं?
अगदी अलिकडच्या काळापर्यंत मुलींना अत्यंत कमी लेखणारी , मुलींच्या विरुद्ध असणारी समाज रचना आणि अतिशय सोप्याने होऊ शकणारी गर्भलिंग चाचणी ची सोय ……आणि त्याचा पूर्ण गैरवापर करून घेण्याची अपप्रवृत्ती ह्यामुळे स्त्री भ्रूण हत्येत प्रचंड वाढ झाली . पर्यायाने बाल लिंग गुणोत्तर पार कोलमडले . मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या प्रचंड घटली आणि विवाह व्यवस्थेचा आणि समाजस्वास्थ्याचा पाया ढासळला . अशाने समाज विकृती आणखीनच वाढते .
तळागाळातील अशिक्षित समाजातच हे चित्र पाहायला मिळत होतं असं नाही तर अनेक ठिकाणी सधन सुशिक्षित समाज देखील ह्या अपकृत्यात मागे नव्हता .
शेवटी सरकारला ह्या बाबतीत अनेक कायदे करावे लागले . मुलीच्या सुरक्षेसाठी , शिक्षणासाठी अनेक योजना आखाव्या लागल्या .
आता गर्भलिंग चाचणी पूर्णपणे बेकायदेशीर आहे . ह्या बाबतीत जागरूकता आणण्यासाठी अनेक योजना बनवल्या आहेत . राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागा तर्फे www.amchimulgi.gov ही वेबसाईट उपलब्ध आहे . 1800- 3456746 ही एक टोल फ्री हेल्पलाईन बनवली आहे , जिथे आपण अशा डॉक्टर आणि हॉस्पिटल ची तक्रार करू शकतो जिथे अवैध गर्भलिंग निदान केल्या जाते . PCPNDT (प्री कनसेप्शन प्री नेटल डायगनोग्स्टिक टेक्निक ) ह्या कायद्याअंतर्गत त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची तरतूद आहे , आणि अशी खबर देणारांसाठी बक्षीस योजना पण आहे .
आपल्या अवतीभवती कुटुंबात देखील अगदीच स्त्रीभ्रूण हत्या जरी होत नसली तरीही ‘मुलाची आस‘ ही असतेच . मग त्यापायी आधी दोन मुली असतील तरी तिसऱ्यांदा मुलाच्या अपेक्षेपायी आईला बाळंतपण सोसावे लागते . दुर्दैव म्हणजे ती आई स्वतःच मुली ऐवजी फक्त मुलगा होण्यासाठी अत्यंत केविलवाणे उपाय करत असते हे वास्तव आहे .
मुलींच्या जन्मापासून , शिक्षणापासून त्यांना नाकारल्या जाणाऱ्या अनेक मूलभूत हक्कांसाठी लढावं लागणं हे अतिशय किडक्या समाजाचं लक्षण आहे . एका सुदृढ समाजाच्या सर्वांगीण वाढीसाठी आजही ह्या का बाबी जोखड बनून खीळ घालतात ? *का हा लिंगभेद इतका हावी झाला की त्यासाठी सुधारकांच्या पिढ्या न पिढ्या खर्ची पडल्या पण समाजाचा एक हिस्सा अजूनही त्याच बेड्यात अडकून आहे ?*
*मुलगा असावा , ही इच्छा असणं ह्यात काहीच गैर नाही* , *पण मुलगाच असावा ही इच्छा का असते* *ह्यामागील कारणे बघितल्यास काही गोष्टी प्रामुख्याने समोर येतात* .
ह्यातील एक प्रमुख कारण म्हणजे ***मुलगा हाच म्हातारपणाची लाठी असतो हा समज .
हे खरच असं असलं असतं तर वृद्धधश्रम ओसंडून वाहिले नसते . खरच किती टक्के मुलं आईवडिलांना प्रेमाने सांभाळत असतील .
शिवाय मुलं परदेशी आणि म्हातारे आईवडील इथे भारतात एकटे असे असंख्य जोडपे त्यांच्या ह्या लाठीविनाच तर जगत आहेत .
मुलगा असूनही मुलगीच आईवडिलांना आधार देते असे अनेक बोलके उदाहरणं पण आपण पहात नाही का ? *ह्याचा अर्थ प्रेमाने आईवडिलांना सांभाळणारे मुलं नाहीत असं मुळीच नाही* , *पण फक्त मूलगेच ही जबाबदारी पेलतात असं म्हणणं नक्कीच चुकीचं आहे* .
आता तर अपत्य मुलगा असो अथवा मुलगी , आई वडिलांना त्यांनी सांभाळच पाहिजे ह्या बाबतीत कायदा पण झाला आहे .
ह्या बाबतीत एक किस्सा सांगण्यासारखा आहे ….
*एका कुटुंबातील वडिलांचं निधन झालं* . *घरातील मोठा शिकलेला आणि विवाहित मुलगा दुसऱ्याच दिवशी आईकडे संपूर्ण दुर्लक्ष करत आपल्या अशिक्षीत बहिणीसमोर शेती आणि घराचे कागदपत्रं ठेवले* . *बहिणीने सगळा हक्क सोडावा अशी मागणी त्यात केली होती.* . *बहीणने कागदावर सही केली आणि खाडकन भावाच्या मुस्काटात ठेवून दिली* . *आईची पिशवी उचलली , तिचा हात धरून तिला आपल्या सोबत नेताना वळून वडिलांच्या फोटोसमोर उभी राहून म्हणाली* , ” *दुसराही मुलगाच पाहिजे होता न तुम्हाला*?”
दुसरा एक समज म्हणजे
**आईवडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या उत्तरक्रियेचा अधिकार फक्त मुलांना असतो आणि मुलाच्या हातून ते घडल्यासच मोक्ष प्राप्ती होते . ( मृत्यू नंतर चे जग पूर्णपणे अनभिज्ञ असतांना केवळ भीतीपोटी किंवा मुक्तीच्या समजुती पोटी हा विचार बळावला असावा.)
ह्या एक संवेदनशील विषय आहे आणि फार तुरळक ठिकाणी मुली असा विधी पार पडतांना दिसतात . अन्यथा जावई मंडळी कडून हे कार्य करवले जाते .
साधारण चाळीस वर्षांपूर्वी चा एक अनुभव एक ज्येष्ठ मंडळींनी सांगितला . घरात आईचं निधन झालं …..एक मुलगा इंग्लंड ला …त्याने कळवून टाकलं ….उरकून घ्या ! ……इथला दूसरा मुलगा …..घराचा ‘कुलदीपक‘ ……बाहेरून आला …..पूर्णपणे शुद्ध गेलेल्या तर्र अवस्थेत. घरात विधवा बहीण होती , जी आईचं सगळं करायची. सगळे लोक ताटकळले ले….करता पुरुषच अग्नी देणार….ती ताडकन उठून म्हणाली , ” आई चं आणि घराचं जबाबदारीनं , प्रेमानं करणाऱ्या व्यक्तीस ‘कर्ता‘ म्हणतात ! मी करणार सगळे विधी ! “…..आणि तिने ते केले . आज ह्या गोष्टीचं कदाचित इतकं नवल वाटणार नाही , पण त्या काळात हे धाडस दुर्मिळ होतं .
तिसरा आणि महत्वाचा मुद्दा आहे **संपत्ती आणि मालमत्ता वाटणी विषयी . अनेक पिढ्या जीवापाड जपत आलेली वडिलोपार्जित मालमत्ता सगळ्या अपत्यात समान वाटली जाते .
2005 पासून बनलेल्या कायद्यानुसार वडिलोपार्जित मालमत्तेत मुलीला मुलांबरोबरच समान हिस्सा मिळतो . त्यात जर फक्त मुलीच असतील तर ती मालमत्ता मुलिंना मिळून पर्यायाने मुलिंच्या सासरी म्हणजे परक्या घरात जाते . इतक्या पिढीच्या स्वामीत्वच्या भावनेला असा तडा जाऊ नये म्हणून किमान एकतरी मुलगा असावा ही भावना प्रबळ होत असावी .
ह्या कन्या अपत्याच्या बाबत उदासीनता असण्यातला आणखी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे **मुलीच्या संरक्षणाची प्रचंड मोठी जबाबदारी .
बरबटलेल्या विकृत समाजापासून मुलीला वाचवण्याची पालकांची धडपड त्यांना खाल्ला घास अंगी लागू देत नाही . मुलीला आपल्या पायावर स्वतंत्रपणे उभे करायचे , सगळ्या आव्हानांना तोंड देण्या लायक बनवायचे आणि त्यातूनही तिच्या सुरक्षेसाठी सतत एक टांगती तलवार घेऊन वावरायचे . हा ताण मात्र दिवसागणिक वाढतच जातोय . त्याला सामोरे जाण्यापेक्षा अखेरीस काहीवेळेला मुलगाच असलेला बरा ह्या विचारांवर शिक्कामोर्तब होते .
ह्या बाबतीत आई आणि मुलीतील पारदर्शकता अत्यंत महत्वाची आहे .
मुलीने आईजवळ प्रत्येक गोष्ट मोकळेपणाने सांगणं गरजेचं आहे . आईकडूनही तितकाच मोकळा संवाद अपेक्षित आहे . मग अनेक रंगीत प्रलोभनाला चटकन बळी पडणाऱ्या मुलींना वेळेत सावरायला आई आणि कुटुंब त्वरित मदतीला येऊ शकतात . मुली अनेकदा संकोचाने त्यांच्या समस्या बोलूनच दाखवत नाहीत आणि कुटुंबाला कळेपर्यंत बऱ्याच वेळा उशीर झालेला असतो .
** मुलीच्या लग्नासाठी लागणार हुंडा आणि एकूण खर्च हे देखील ‘मुलगी नको‘ म्हणण्या मागील एक कारण . महाराष्ट्रात ह्याबाबतीत प्रचंड जागृती झाली असली तरी अनेक राज्यात हुंड्याचं स्वरूप फार भयानक आहे . मुलीच्या जन्मापासूनच तिच्या लग्नासाठी पै पै जोडून हुंडा जमवला जातो . मग मुलाच्या लग्नात त्याची सगळी भरपाई करत त्याही पेक्षा जास्त मोठी ‘वसूली‘ केल्या जाते . अशाने हे एक कधीही न संपणारं दुष्टचक्र कधी भेदल्याच जात नाही .
** मुलीला शिकवून आणि तिच्यात गुंतवणूक करून काय फायदा …ती शेवटी लग्न करून जाणार …..मग त्याचा परतावा कसा मिळणार ? असा प्रश्न करणारे महाभाग आजही आहेत . अशी माणसं आपल्या मुलाचे संगोपन आणि शिक्षण देखील एक खूप फायदा देणारी “”इन्व्हेस्टमेंट”” म्हणूनच करत असणार . मग त्यांची ही गुंतवणूक कशी चुकीची होती याचा प्रत्यय त्यांना येईपर्यंत खूप उशीर झाला असतो . अशा वेळी त्यांची अशिक्षित मुलगी आपल्या आई वडिलांचा आधार बनते पण तिच्या ह्या त्यागाची खरी किंमत कळण्याची त्यांची कुवतच नसते . असती तर त्यांनी आधीच तिच्या शिक्षणासाठी योग्य पाऊले उचलली असती .
**मुलीचं आर्थिक स्वावलंबन हा देखील अतिशय कळीचा मुद्दा आहे .
लहान गावात आणि कामगार वर्गात हा प्रश्न फार भयानक रूप धारण करतो .
मुलीला सासरी कितीही यातना असल्या तरीही तिचं आर्थिक परावलंबीतत्व म्हणजे जगण्याचा हक्क नाकारण्या सारखच आहे .
मुलीच्या सुरक्षित आयुष्यासाठी लग्नाच्या वेळी काही अनामत सासर कडून तिच्या नावावर होण्यासाठी कायदा करण्याची गरज आहे . ह्याला हुंड्याचं स्वरूप न येता सासर कडून तिला दिल्या जाणारा विश्वास ह्या रुपात त्याकडे बघण्याची गरज आहे .
शहरात पुढारलेल्या समाजात सुदैवाने हे चित्र सुखावह आहे . इथे मुलीला शैक्षणिक आणि आर्थिक स्वावलंबन आहे . इथली मुलगी धीट , महत्वाकांक्षी आणि पालकांची जबाबदारी पेलण्यास सक्षम आहे .
पण मग इथले धोकेही वेगळ्याच स्तरावरचे आहेत . वागण्याचे पूर्ण स्वातंत्र्य , हातात पैसा ,स्वतःची अत्यंत ठाम मतं यामुळे स्वातंत्र्य आणि स्वैराचार ह्यामधील पुसत रेषा ….. हा एक वेगळाच चिंतेचा विषय आहे .
मुलगी ही जन्मजात सहनशीलता घेऊन आलेली असते . तिच्या आयुष्यातील त्रासदायक बोचऱ्या गोष्टींना ती सहजपणे तोंड देते . दर महिन्याला नैसर्गिकरित्या येणारी पाळी ही कितीही वेदनादायी असली तरीही तिच्या कडून कर्तव्य पूर्तीत ती कुचराई करत नाही .
समाजातील टवाळखोर , कपड्यावरून होणारी टिंगल , गर्दीत होणारे किळसवाणे स्पर्श , आणि तिच्या कार्यक्षेत्रात होणारे शोषण !
हे कमी अधिक प्रत्येक मुलीच्या वाट्याला येतेच येते! त्यात आता प्रचंड काळजी करायला लावणारा विषय म्हणजे बालिकांचे लैगिक शोषण आणि त्यापायी होणाऱ्या बालिकांच्या हत्या !
तिच्या आत्मसंमानाला पार चुरगाळून टाकणाऱ्या ह्या समाजाला कसा आवर घालायचा?
पण त्यातूनही मुली उठतात , मनावरील आणि शरीरावरील ओरखडे सांधत पुन्हा चिवटपणे लढा देण्यासाठी उभ्या रहातात कारण त्यांच्यात असलेला चिवट आशावाद !
खरं तर इतरांच्या जखमांना भरून काढण्याची ताकद असणारी ही हळदीची बेटं किती हळुवारपणे जोपासली गेली पाहिजेत . त्यासाठी प्रचंड समाज प्रबोधनाची गरज आहे .
पण हे इतकं सोपं सरळ समीकरण नाही . आता तर विकृत गुन्हेगारी विरुद्ध कायदा , त्याची अंमलबजावणी हे शब्द बुळबुळीत बोथट अर्थहीन वाटतात .
आजच्या तरुण मातांनी आपल्या अपत्यांशी मोकळा संवाद साधत काही बाबी प्रकर्षाने त्यांच्या मनावर बिंबवायला हव्या . मुलगा मुलगी भेद हा फक्त शारीरिक पातळीवरच ठेवून एकमेकांना अत्यंत आदराने वागवण्याची गरज वारंवार विशद करावी .
मुलींना असणाऱ्या अडचणींवर घरात खुला संवाद घडावा .
समाजातील कुठल्याही स्त्रीचा किंवा व्यक्तीचा आपल्या कडून अनादर होता कामा नये हे बाळकडू आपल्या अपत्यास आवर्जून पाजले गेलेच पाहिजे .
समाज बदलण्याची ताकद आई मध्ये आहे . ती आई सक्षम होण्यासाठी ही आपली कोवळी हळदीची बेटं जीवापाड जपल्या गेलीच पाहिजेत . तेव्हाच
आपले अपत्य निरोगी निर्लेप मनाचे व्हावे ही गरज जास्त मोठी होईल मग ते अपत्य मुलगा असो वा मुलगी .
कल्पिताचे वास्तव
लेखक- उमेश पटवर्धन
“शेवटी फिक्शनल साहित्य म्हणजे वास्तव आणि कल्पिताचं मिश्रण. म्हणजे असं बघ आपल्या अबोध मनात अनेक गोष्टीचं मिश्रण जमलेलं असतं. त्यात आधी पाहिलेल्या, अनुभवलेल्या गोष्टीच्या आठवणी, त्यातल्या काही गोष्टींवर आपण केलेलं विचारमंथन तर काही गोष्टींवर लढवलेले तर्क किंवा कल्पना.. असं बरंच काही असू शकतं. कथा लिहिताना यातल्या बऱ्याच गोष्टी या कच्चा माल म्हणून उपयोगाला येतात..”
सरंजामे सर बोलत होते आणि त्यांचा लाडका विद्यार्थी कल्पेश अगदी बारकाईने ते ऐकत अनुभवाचे ते बोल मनात साठवून ठेवत होता. क्वचित हातातल्या वहीत काही मुद्दे टिपून घेत होता. शेवटी तो एक नवोदित लेखक होता आणि सरंजामे यांच्यासारख्या जेष्ठ लेखकाकडून जितकं शक्य होईल तितकं शिकून घेणे हाच ध्यास घेऊन तो गेले कित्येक महिने त्यांच्या घरी ये-जा करत होता. कधी कधी सरंजामे सरांच्या विक्षिप्त आणि लहरी स्वभावाचा फटका बसूनही राग न मानता तो जात होता आणि जमेल तितके ज्ञानकण गोळा करत होता. पूर्वी त्यांचे बोलणे नुसते ऐकून घेऊन मनात साठवणारा तो आता त्यांच्याशी ओळख वाढल्याने धीटपणे आपले मुद्दे ठामपणे मांडू लागला होता. त्यांचा एखादा मुद्दा पटला नाही तर त्याच्या परीने प्रतिवाद करु लागला होता. शिवाय सरंजामे कितीही लहरी आणि विक्षिप्त असले तरी आयुष्याच्या संध्याकाळी तसे एकाकीच होते. मूलबाळ नसल्याने शहराबाहेरच्या त्या आलिशान बंगल्यात ते आणि त्यांची बायको असे दोघेच रहात होते. लेखनाचा बहर आता ओसरला होता आणि राहिल्या होत्या त्या आठवणी आणि गाठीशी असलेला अनुभव. त्यामुळे कल्पेशसारख्या तरुण, ताज्या दमाच्या व्यक्तीचा सहवास त्यांना हवाहवासा वाटे. घरात वावरणारी दुसरी व्यक्ती, त्यांची बायको मोहिनी कितीही सुंदर आणि तरुण असली तरी तिला साहित्यात विशेष रुची नसल्याने तिच्याशी बोलण्याचे त्यांचे विषय वेगळे असत. पण त्यांची साहित्यिक भूक कल्पेशशी बोलून आणि वेगवेगळ्या विषयांवर त्याच्याशी वादविवाद करुनच शमत असे. माणूसघाण्या स्वभावामुळे एकाकी बनलेल्या त्यांच्या आयुष्यात कल्पेश हा एक सुखद अपवाद ठरला होता.
“सरबत आत्ता आणलं तर चालेल का?” आतून सरांच्या बायकोचा – मोहिनीचा मधुर किणकिणता आवाज आला आणि कल्पेशने नकळत खाली वहीत पाहिले. मनातून तो आता सरबताबरोबरच ते घेऊन येणाऱ्या मोहिनीची वाट पाहू लागला. आज कशी दिसत असेल मोहिनी? केस बांधले असतील का न्हाऊन झाल्यावर मोकळे सोडते तसे मोकळे सोडले असतील? अशावेळी तिच्या केसांना येतो तो शिकेकाईचा गंध आज परत आपल्याला धुंद करेल का? आपली आवडती फुलफुलांची हिरवी साडी ती नेसली असेल का? आणि सरबताचा ग्लास हातात देताना आजही तिच्या हातांचा चोरटा स्पर्श होऊन ती नेहमीप्रमाणे काही क्षण आपल्याकडे एकटक पहात राहील का? असे अनेक विचार त्याच्या मनात आले. ते चेहऱ्यावर उमटू नयेत म्हणून त्याने काही क्षण वर पाहिलेच नाही. त्याचा चेहरा विलक्षण बोलका होता. शिवाय सरंजामे सर चेहरा पटकन वाचू शकायचे आणि समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चालू असेल हा अंदाज ते बरोबर बांधू शकायचे. हे माहीत असल्याने कल्पेशला आपल्या भावना मोठ्या प्रयत्नांनी लपवाव्या लागत. तारुण्याने रसरसलेली मोहिनी घरात इकडे तिकडे वावरत असताना त्याचं मन तिचा सतत कानोसा घेत रहायचं पण सरांच्या समोर मात्र चेहरा कोरा ठेवावा लागत असे. पण अनुभवाने ही कसरत आता त्याला जमू लागली होती.
हे सगळे विचार थांबवून त्याने चेहरा शक्य तितका कोरा केला आणि वर पाहिलं तेव्हा मात्र त्याला थोडा धक्का बसला. सर एकटक त्याच्याचकडे पहात होते. त्यांनी आपल्या मनातले सगळे विचार वाचले असतील का? हा विचार मनात आला आणि चोरी पकडली गेल्यासारखा तो ओशाळला आणि त्यांना संशय येऊ नये म्हणून उगाचच स्वच्छ हसण्याचा प्रयत्न त्याने केला. त्यावर अपेक्षित प्रतिक्रिया म्हणून सरही त्याच्याकडे पाहून हसले पण त्याचं हास्य त्याला नेहमीपेक्षा वेगळं, काहीसं गूढ वाटलं.
“हां, तर मी काय म्हणत होतो?..” सरांनी थोडं वर बघत आठवायचा प्रयत्न केला.
“वास्तव आणि कल्पिताचं मिश्रण..सर”
“हो बरोबर, वास्तव आणि कल्पिताचं मिश्रण. आता उदाहरणादाखल हे बघ..” सरांचे डोळे आता चमकू लागले होते. त्यांचा आवडता विषय आणि आवडता विद्यार्थी समोर बसलेला. शिवाय कोणतीही गोष्ट उदाहरण देऊन पटवून द्यायची ही तर त्यांची खासियत.
“तुला कथा लिहायची आहे. समजा आपल्यासारख्या दोन व्यक्तिरेखा घेऊन..”
“आपल्यासारख्या?” कल्पेशने आश्चयाने डोळे किंचित मोठे केले.
“हो मग काय? कथा कोणावरही होऊ शकते. तर कथेत माझ्यासारखा एक जेष्ठ लेखक, तुझ्यासारखा एक हुशार नवोदित लेखक आणि मोहिनीसारखी तारुण्याने बहरलेली त्या लेखकाची बायको.. ती अर्थातच खूप सुंदर आहे..”
“….” कल्पेशला काय बोलावे ते कळेना. त्याने सरांच्या डोळ्यात रोखून पाहिले. पण त्यांचा चेहरा बिलकुल बोलका नव्हता. त्यांनी तो नेहमीप्रमाणे कोराच ठेवला होता. पण त्यांच्या ओठांवर मात्र मघाचे ते गूढ हास्य अजूनही खेळत होते.
“पुढची कथा..”
“पुढची कथा?” कल्पेशने गडबडीत अंगावर काही येऊ पहात होतं ते झटकून टाकण्याचा प्रयत्न केला.
“पुढचं इमॅजिन करायला फारसं अवघड नाही. तो नवोदित लेखक, म्हणजे विद्यार्थी त्या तरुण बायकोच्या प्रेमात पडतो. हे त्या वृद्ध लेखकाला कळू नये यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करतो. पण इतकं सगळं एकाच घरात चालू असताना त्या जेष्ठ लेखकाला काहीच लक्षात येणार नाही असं होईल का?”
“Hmm.. पण सर का आपण अशा गोष्टी यावेळी डिस्कस करतोय? म्हणजे जरा वेगळं काही बोलूयात का?” कल्पेश आता मनातून पूर्ण गडबडून गेला होता. सरांना सगळं कळलं आहे का ते त्यांचा तर्क ताडून पाहण्यासाठी फक्त खडा टाकून बघतायत?
“अरे, don’t be so anxious, young man. आपण सत्य आणि कल्पिताचं मिश्रण यावर बोलत आहोत ना? मग त्यात काही सत्य आणि काही कल्पित असणारच ना? आणि हे सगळं सत्य असल्यासारखा का चेहरा केला आहेस? खरं नाही ना हे सगळं?”
“सर..” सरांनी परत एकदा गूढ हसत थेट प्रश्न केला आणि कल्पेश हादरला. आता त्याची खात्री पटत चालली. सरांच्या चौकस आणि सूक्ष्म नजरेतून काहीच सुटलं नव्हतं तर.. आता?
तो शब्दांची जुळवाजुळव करु लागला पण पटकन काहीच बोलू शकला नाही. त्या खोलीत काही क्षण एक जीवघेणी शांतता पसरली.
“सरबत..” नाजूक आवाज आला आणि दोघांनी एकदम समोर पाहिले. मोहिनी ऐन वेळी (किंवा योग्य वेळी?) खोलीत प्रवेशत होती. तिच्या हातातल्या ट्रेमध्ये लालभडक कोकम सरबत भरलेले दोन ग्लास होते. ते त्या दोघांच्या मध्ये असलेल्या टीपॉय वर ठेवून ती का कोण जाणे तिथेच थबकली. खोलीच्या दाराच्या चौकटीत लावलेल्या पडद्याशी बोटाने चाळा करत उभी राहिली. खरं तर ती अशी कधीच त्या दोघांच्या गप्पा ऐकत थांबत नसे. पण आज काहीतरी वेगळं घडत होतं. तिच्या चेहऱ्यावर एक मंद हसू होतं. पण कल्पेश आणि सरांनाही ते हसू किंचित गूढ वाटलं.
“मग आता सांग, आपण ही आपली कथा इथपर्यंत जुळवत आणली आहे. आता पुढे काय होईल?” सरांनी तिच्या तिथे असण्याकडे विशेष लक्ष न देता कल्पेशच्या डोळ्यात रोखून पहात विचारले.
“पुढे? ..पुढे काय होईल..बरं..?” आपली विकेट पडलेली आहे आणि आपण गडबडून गेल्याने मूर्खासारखे काहीतरी बोलत आहोत हे कल्पेशला जाणवूनही तो फार काही करु शकला नाही. सरांची रोखलेली नजर आता भेदक बनली होती, त्याच्या आरपार जाऊ पहात होती. अवघड प्रश्न विचारणारी त्यांची रोखलेली ती नजर कल्पेश आता सहन करु शकत नव्हता. कोणीतरी या कठीण परिस्थितीतून लवकर आपल्याला सोडवावे असा विचार सतत त्याच्या मनात येत होता.
“पुढे काय होईल मी सांगते.” तो नाजूक आवाज कानांवर आला आता आश्चर्याचा धक्का बसण्याची पाळी त्या दोघांची होती.
“.. एके दिवशी ते दोघे गप्पा मारत बसलेले असताना ती नाजूक, सुंदर बायको सरबताचे दोन ग्लास घेऊन येते..बरोबर ना?” हे म्हणून तिने जोरात हसून दिलं. त्या दोघांना आज धक्क्यांवर धक्के बसत होते. एकतर त्या दोघांच्या गप्पा चालू असताना ती कधीच मध्ये असं काही बोलायची नाही. शिवाय कथालेखन या विषयावर गप्पा चालू असताना तिने स्वतःचं मत मांडावं?..आज खरंच वेगळं काहीतरी घडत होतं. ते दोघे अचंबित होऊन तिच्याकडे एकटक पहातच राहिले.
“आणि तिने सरबतातल्या एका ग्लासमध्ये..” गूढ स्वप्नाळू डोळ्यांनी ती पुढे सांगू लागली आणि ते दोन लेखक आवाक् होऊन गेले.
“असे काय बघताय माझ्याकडे? नाही आवडलं का मी कथेत असं काही सुचवलेलं? सत्य आणि कल्पना यांचं मिश्रण असं काहीसं म्हणत होता ना तुम्ही? बरं असू द्या.. चालू द्या तुमचं पुढे. मी नाही काही बोलत तुमच्यामध्ये. पण आता सरबत तरी घ्या ना..” तिने सरबताच्या ग्लासांकडे निर्देश केला आणि ती एकटक सरंजामे सरांकडे पाहू लागली. तेही एकटक तिच्याकडे रोखून पाहू लागले. तिच्या चेहऱ्यावर पसरलेल्या गूढ आणि स्वप्नाळू हास्याचा अर्थ शोधू लागले पण आज त्यांना तिचा थांग लागेना.
“घ्या ना..” तिने अचानक हात पुढे करुन एक ग्लास उचलला आणि सरांच्या हातात दिला. थरथरत्या हातांनी सरांनी तो हातात घेतला आणि ते मोहित झाल्यासारखे ते तिच्याकडे पहातच राहिले. पण तो ग्लास ओठांना लावायचं धाडस काही त्यांना झालं नाही.
पहिली दिवाळी
लेखिका- सरिता सावंत भोसले
दोन महिन्यांनी लग्नानंतरची पहिली दिवाळी येणार होती आणि आतापासूनच ऋतूच्या मनात फटाके फुटत होते…फुलबाजा सारखी रोषणाई तिच्या मनात थुईथुई नाचत होती. सकाळीच नाश्त्याच्या वेळी सासूबाईंनी जाहीर केलं होतं की ऋतूला पहिल्या दिवाळीला दागिना राहुद्या एखादा पण पैठणी नक्की घेऊ आणि लेकालाही त्याच्या पसंदीचे कपडे घेऊन नटवू. ऋतूचा गोड आणि मनमिळाऊ स्वभाव असल्याकारणाने ती लगेच म्हणाली की आम्हा दोघांनाच नाही फक्त तर आई बाबा तुम्हालाही चांगले कपडे घेऊया तरच मी पहिली दिवाळी साजरी करेन. तिच्या या मताला सगळ्यांनीच हसत होकार दिलेला.
BA च्या शेवटच्या वर्षाला असतानाच ऋतूला मंदारच स्थळ चालून आलं होतं. मुलगा पाहुण्यातलाच त्यात घरची मंडळी वारकरी संप्रदायातील…मागची कितीतरी वर्षे मुंबईत वास्तव्य आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अचूक वेळ पाळणारा, ‘मॅनेजमेंट गुरू’ म्हणून संपूर्ण,
भारतात व भारताबाहेरही ओळखला जाणारा, प्रिन्स
हँरी व मेगन यांच्या लग्नासाठी लंडनला आमंत्रित असलेल्या प्रसिद्ध अशा ‘मुंबईचा डबेवाला’ म्हणून मानाने काम करत असलेल्या नवऱ्याशी ( मंदारशी) तिचं लग्न झालं. भले राहायला बंगला नसेल, लाखात पगार नसेल पण जगात सगळीकडे प्रतिष्ठा असणाऱ्या, माणुसकीचा सेवारूपी वसा पुढे चालवत असणाऱ्या ‘मुंबईच्या डबेवल्याची’
बायको म्हणून रुबाबात सगळीकडे मिरवण्यात तीही खुश होती. रोज सकाळी सातला घर सोडलं की उन्हातान्हात कष्ट करून, घड्याळाच्या ठोक्यावर चालून भुकेल्यांना वेळेत अन्न पोहचवून मग स्वतः चार घास पोटात घालून परत जबाबदारीचे डबे वेळेत योग्य जागेवर पोहचवून संध्याकाळी थकून भागून मंदार घरी यायचा तेव्हा त्याच्यासाठी कडक चहा करून स्वतःच्या गोड हसण्याने ऋतू मंदारला खुश करायची. सासरेही आयुष्यभर डबे पोहचवून आता वय साथ देत नाही आणि पायाच्या दुखण्याने जोर धरल्यामुळे घरीच होते. मंदारच्या पगारात चौघेही समाधानी राहत होते.
पुणे नंतर हळूहळू कोरोनाच सावट आता मुंबईत देखील पसरत होतं. रोज कुठेतरी एक दोन कोरोना पॉझिटिव्ह पेशंट सापडत होते. टिव्हीवरचे रोजचे आकडे पाहून आणि जलद पसरणाऱ्या कोरोनाची माहिती ऐकून ऋतू आणि घरचे सगळेच मंदार साठी चिंतीत होते. पण त्याला घरी बस सांगितलं तरी परत घर कस चालणार…दोन वेळच खाणार तरी काय?? असे अनुत्तरित प्रश्न प्रत्येकाच्या उभे ठाकायचे. कोरोना लवकरच टळेल अशी आशा बाळगून व योग्य ती काळजी घेऊन मंदार त्याचं डबे पोहचवण्याच काम करतच होता व घरचेही त्याला साथ देत होते. अचानकच मुंबईमध्ये कोरोना पेशंट वाढायला लागले आणि खबरदारी म्हणून सरकारने सगळी कार्यालये,शाळा,ट्रेन,बस सगळंच बंदचा आदेश काढला. दुसऱ्याच दिवसापासून संबंध मुंबईत लॉकडाऊन सुरू झालं. ज्याची भीती होती तेच झालं….काम हातात नव्हतं..नव्याने काही सुरू करता येत नव्हतं की दुसरीकडेही कामाला जाता येत नव्हतं. घरात हातावर हात ठेवून कोरोना कधी संपेल आणि आपलं काम कधी सुरू होईल याची वाट बघत बसण्याची वेळ मंदारवर आली. सुरुवातीचे काही दिवस साठवून ठेवलेल्या पैश्यांवर घर चाललं पण पुढे अजून किती महिने असं हा रोज सगळ्यांना सतावत होता. गावी निघून जावं तरी तिथेही काय कमावणार आणि काय खाणार अशी परिस्थिती. चिंतातुर होऊन मंदार रोज बाहेरून घरी यायचा तसाच एक दिवस आला पण जास्तच थकवा त्याला जाणवत होता. काळजीने असं होतं असेल असं वाटून ऋतू आणि आईने त्याला खूप समजावलं. सकाळी मंदारला चांगलाच ताप आला होता..अशक्तपणा वाढला होता. ऋतुच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती…तपासणीनंतर तिच्या शंकेच रूपांतर खात्रीत झालं आणि मंदारला कोरोना झाल्याचं कळलं. काही क्षण पायाखालची जमीन सरकल्याचा भास तिला झाला पण स्वतःला सावरून जड अंतःकरणाने मंदारला कोविड सेंटरमध्ये निरोप देऊन ती घरी आली. सासू सासऱ्यांना वाईट वाटेल म्हणून स्वतःच अश्रू पापणीआडच लपवून दिवस रात्र मंदारच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत राहिली.
तिची प्रार्थना परमेश्वराने ऐकली आणि मंदार लवकरच बरा होऊन घरी परतला. ऋतूच्या प्रेमामुळे, काळजीमुळे, योग्य देखभाली मुळे हळूहळू अशक्तपणावर तो मात करत होता. एक दिवस त्याला बघायला ओळखीतल्या साठे काकू आल्या ज्यांच्या घरी मंदार कधीतरी डबे पोचवायचा.
मंदारला आवडते म्हणून केलेला थोडा चिवडा व नानकटाई ऋतूने त्यांनाही खायचा आग्रह केला. नाश्ता केल्यानंतर त्यांनी ऋतूच खूपच कौतुक केलं. “सुगरण आहेस अगदी..तुझ्या हाताला खूप छान चव आहे. यावर्षी दिवाळीला मलाही अस फराळ बनवून देशील का ग?? माझी नातवंड यावर्षी इथे येऊ शकत नाहीत पण तू बनवून दिलास तर मी पाठवेन तरी त्यांना.” इतक्या प्रेमाने आणि आर्ततेने केलेली विनवणी मंदार आणि ऋतू दोघेही नाकारू शकले नाहीत. साठे काकूंनी सामानाचे पैसे आणि वर ऋतूच्या मेहनतीचेही पैसे तिच्या हातावर ठेवले. तू तुझा स्वतःचा व्यवसाय सुरू करतेस अस समज आणि हे पैसे घे अस म्हणल्यावर ऋतुने ते पैसे स्वीकारले आणि साठे काकूंच्या आवडी प्रमाणे सगळं फराळ त्यांना बनवून दिला. स्वतःच्या कामाची पहिली कमाई आणि या परिस्थितीत घरालाही थोडा आधार आपल्यामुळे मिळाला म्हणून ऋतुही खुश होती. रखरखत्या उन्हातही थंडगार वाऱ्याची झुळूक यावी व मन सुखद होऊन जावं अशीच अवस्था ऋतूची होती. साठे काकूंच्या ओळखीने तिला फराळाच्या अजून चार पाच ऑर्डर मिळाल्या आणि जवळपासच्या परिसरातही ही घरगुती उत्कृष्ट फराळाची बातमी पसरली. ऋतूच्या कामाचा व्याप बघता बघता वाढला. मंदार,सासू,सासरे यांनी तिला मनापासून साथ दिली. ऋतुनेही गरज असणाऱ्या अशा बऱ्याच डबेवाल्यांच्या पत्नींना सोबत घेतलं व त्यांनाही चार पैशाचा रोजगार प्राप्त करून दिला.
दुकानं वगैरे बंद असल्यामुळे ऋतूच्या घरगुती फराळाला खूप मागणी वाढली आणि दिवाळी पर्यँत ऋतूचा हा व्यवसाय प्रचंड वाढला. कोरोना,मंदारच काम ठप्प होणं,मंदारच आजारपण यात सगळ्यातून बाहेर कस पडायचं अस विचार करत असतानाच ऋतुसमोर साठे काकूंनी नवीन संधी,नवीन आशा पल्लवित केली व ऋतुने स्वतःतल्या या कलेला ओळखून कठीण काळात आपल्या संसाराला हातभार लावला.
कोरोनामुळे इतरांना वेळेत अन्न पुरवणाऱ्या ‘मुंबईच्या डबेवाल्यासमोर’ स्वतः उपाशी राहण्याची वेळ आली होती अशा परिस्थितीत ऋतुसारख्या स्त्रियांनी संसार रथाची दोर स्वतःच्या हातात घेऊन समर्थपणे पेलली.
पहिल्या दिवाळीला पैठणीच स्वप्न ऋतूच अपूर्ण राहिलं असल तरी पहिल्याच दिवाळीला तिचा स्वतःचा व्यवसाय अनपेक्षित पणे सूरु झाला होता. फक्त स्वतःचा फायदा न बघता तिने गरजवंतुना आपल्यासोबत पूढे नेलं होतं. स्वतःसोबत कितीतरी लक्ष्मी तिच्यामुळे यावर्षी आनंदाने,समाधानाने लक्ष्मीपूजन करत होत्या. अंधाराच्या दिशेने चाललेलं आयुष्य उजळत होतं.
दृष्टी
लेखक- मंदार जोग
तिची आणि त्याची कॉलेज मधली ओळख, मग प्रेम आणि घरच्यांच्या संमतीने दोघेही थोडे सेटल झाल्यावर जरा उशिरा टाईप्स लग्न! त्यांना सहा वर्षांची मुलगी. योगायोग असा की दोघंही एकाच ऑफिसात नोकरीला. आज लग्नाचा दहावा वाढदिवस. आज त्यांनी सुट्टी घेऊन मुंबईभर फिरून, बाहेरच लंच वगैरे करून सेलिब्रेट करायचा प्लान केला. मुलगी शाळेत गेल्यावर भोईवाड्यातील हाऊसिंग बोर्डाच्या चाळीतील सिंगल रूमच्या त्यांच्या घरातून दोघे निघाले. खाली येऊन समोरच्या बस स्टॉपवरून बस पकडून ठरल्याप्रमाणे जुहू बीचला जायला निघाले. दोघांनाही बीच चे प्रचंड आकर्षण. कॉलेज सुटल्यावर समोरच असलेल्या अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर बसून अनेक सूर्यास्त त्यांनी अनुभवले होते. आजही परत एकदा बीच!
तिने साधासाच पण स्वच्छ पांढरा लखनवी कुर्ता आणि जीन्स घातली होती आणि त्याने एक साधा टीशर्ट आणि जीन्स. बस निघाली आणि ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेऊन, त्याचा हात हातात धरून खेटून बसली.
तो- हे काय? नीट बस की जरा. आपण बस मध्ये आहोत.
ती- बस मध्ये गर्दी आहे का? आपण जेमतेम सात आठ जण असू. आणि मी अस काय केलंय? नवऱ्याच्या खांद्यावरच तर डोकं टेकलय.
तो- अग पण लोक बघतील आणि काय म्हणतील?
ती- दोष बहुतेक वेळा बघणार्याच्या दृष्टीत असतो. आपण त्याची काळजी नाही करायची. आज तू काय मस्त दिसतो आहेस. एक सुटलेलं पोट इग्नोर केलं ना तर अजूनही कॉलेज मध्ये होतास तसाच दिसतोस तू.
तो- ए पोटाबद्दल काही बोलायचं नाही हां नाहीतर मी पण सेम पिंच म्हणेन.
असं म्हणत तो तिच्या पोटाला हळूच चिमटा काढतो.
ती- मी फक्त खांद्यावर डोकं ठेवलं तर लोकांना ते दिसत आणि तुझा हा चावटपणा दिसत नाही का?
तो- दोष बघणार्याच्या दृष्टीत असतो अस तूच म्हणालीस ना?
दोघे हसतात.
ती- पण आपली दृष्टी मात्र अगदी तुझ्यावर गेली आहे. ती म्हणते देखील की “मी बाबा सारखी बिनधास्त होणार.” पोरगी कोणाचंही ऐकत नाही.
तो- ए पण दिसायला मात्र तुझ्यासारखी सुंदर आहे. तिच नाक आणि ओठ म्हणजे अगदी तुझे काढून लावल्यासारखे.
ती- हम्म. पण मोठी होऊन माझ्यासारखी हळवी नको व्हायला. तुझ्यासारखी खंबीर झाली तर बर होईल.
इतक्यात ड्रायव्हर बस बाजूला घेतो. कंडक्टर सांगतो गियर अडकला आहे. ड्रायव्हर खडम खुडूम करत बस सुरू करायचा प्रयत्न सुरू करतो. बस मधले इतर तुरळक प्रवासी एक्स्पर्ट सल्ले देऊ लागतात. हे दोघे आपल्याच आनंदात बाहेर बघत मजेत असतात.
तो- ए ते समोरच झाड गुलमोहोर ना?
ती- हो. दृष्टीने मला ह्याच इंग्रजी नाव पण सांगितलं आहे. Royal poinciana. इतकी लहान आहे पण काय काय माहिती आहे पोरीला.
तो- तूच आणून दिलास ना टॅब? आणि शेजारची मनाली आहेच तिला गुगल वगैरे शिकवायला. मग काय!
ती- हम्म. पण ही घर बघ किती सुबक आणि सुंदर आहेत.
तो- ती आपल्या जन्मापासून तशीच आहेत. आणि ह्या टुमदार घरांच्या मधून जाणारा हा सुंदर रस्ता.
ती- हो रे. आणि ती शाळेत जाणारी इवलीशी मुलं बघ. आपल्या दृष्टीसारखी. आपण लग्नाआधी बघायचो तेव्हाच आपण ठरवलं होतं की आपल्याला तशीच गोंडस मुलगी हवी.
तो- आणि देवाने आपली प्रार्थना ऐकली. देव खरच खुप दयाळू आहे आपल्या बाबतीत.
ती- नक्कीच. नाहीतर आपण भेटलोच नसतो. इतकं सुंदर आयुष्य एकमेकांच्या साथीने बघायला मिळालं नसत.
तो- ए लवकर बघ त्या पलीकडच्या टेकडीवरून उडणारी बागळ्यांची माळ. अगदी त्या बागळ्यांची माळ फुले गाण्यात आहे तशी.
ती- wow ब्युटिफुल. ए तुला आठवतो तो आपला नेहमीचा आवडता रस्ता. आपण कॉलेज वरून स्टेशनवर जाताना लागणारा? तू त्याच्यावर एक लेख पण लिहिला होतास.
तो- हो आठवतो ना. स्टेशन जवळ असूनही मोकळा. पण मला ना दृष्टीबरोबर आपण बघितलेल्या त्या थ्री डी कार्टून सिनेमातल्या जगात जायला आवडेल. काय धमाल दुनिया होती ती. आपली पहिलीच थ्री डी मूव्ही होती ना ती? तो गॉगल लावून बसायच आणि सगळं जग अंगावर येत. दृष्टी खरच खुश होती.
ती- ही बस कधी सुरू होणार? जुहूचा अथांग समुद्र आपली वाट बघत असेल. ए आपल्या कॉलेज जवळचा, नरिमन पॉइंटचा, जुहूचा आणि दापोलीचा समुद्र एकच आहे. पण किती वेगळा वाटतो ना?
तो- जसा दोष बघणार्याच्या दृष्टीत असतो तस सौंदर्यही बघणार्याच्या दृष्टीतच असत.
ती- हम्म. ए तुला आठवत आपण माथेरानला हनिमूनला गेलो होतो तेव्हा तिथल्या पॉईंट्स वरच्या त्या खोल दऱ्या, तो मातीचा रस्ता, ती झाड, तो निसर्ग!
तो- हम्म. मी यंदा काहीही करून तुला आग्र्याला नेणार आहे. ताजमहाल बघायचा आहे ना तुला?
ती- हो. पांढरा शुभ्र, प्रेमाचं प्रतीक असलेला ताजमहाल! तू मला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला त्याची प्रतिकृती भेट दिली होतीस! तसाच दिसत असेल का रे?
तो- प्रतिकृतीपेक्षाही सुंदर असेल. आपण दृष्टीलाही नेऊ. तिलाही खूप आवडेल ताजमहाल. मग तिच्या तोंडून तिच्या भाषेत ताजमहालाच वर्णन ऐकायला जाम धमाल येईल.
इतक्यात कंडक्टर येतो.
कंडक्टर- गाडी फेल झाली आहे. खाली उतरा. मागच्या गाडीत बसवून देतो.
दोघे सावकाश आपल्या हातातील फोल्ड केलेल्या, खालच्या टोकाला लाल रंग असलेल्या पांढऱ्या काठ्या उघडतात. डोळ्यावरचे काळे गॉगल सारखे करतात आणि सराईतपणे धारावी झोपडपट्टीच्या मधोमध बंद पडलेल्या बस मधून खाली उतरतात! उतरल्यावर तो म्हणतो-
तो- चला ह्या निमित्ताने इतक्या सुंदर रस्त्यावर उतरायला मिळालं. आधी कधीच इथे आलो नव्हतो.
ती- वास थोडा विचित्र येतोय. तो तर सर्वांनाच येत असेल. पण आपल्याला जन्मापासून जे सुंदर रस्ते, घर, निसर्ग, माणस आणि सृष्टी रोज आणि सर्वत्र दिसतात ते इतरांना दिसत असतील का?
तो- अग तो ज्याच्या त्याच्या दृष्टीचा प्रश्न आहे कारण सौंदर्य बघणार्याच्या दृष्टीत असत! चल आता. दुसरी बस येईल. आज जुहू बीच. आपल्या वरळीच्या ब्लाईंड स्कूलच्या समोर असलेल्या आपल्या नेहमीच्या समुद्रपेक्षा वेगळा समुद्र.
ती- ए एकच इच्छा आहे रे. आपल्या दृष्टीला इतरांसारखी नजर आहे. पण तिला दृष्टी मात्र आपल्यासारखी मिळू दे! तिलाही आयुष्य सुदंर दिसू दे!
हार
लेखिका- पूजा खाडे पाठक
“बांगड्या हव्यात” ती अडखळत म्हणाली. “पहिल्या मजल्यावरच्या दुसऱ्या काउंटर वर जा” काउंटर वरचा माणूस हात दाखवत म्हणाला. खरंतर ती सगळी अवघडून च गेली होती . आतून ताजमहालासारखे दिसणारे , गारेगार पांढरेशुभ्र दालन. राजवाडा च जणू! सगळीकडे एकसारख्या अंजिरी साड्या नेसलेल्या आणि अंबाडा घातलेल्या बायका दागिने दाखवत होत्या. काय ती मोठमोठाली मंगळसूत्र अन काय ते सेट! एकीकडे चांदीचा पूर्ण डायनिंग सेट काढला होता, ते बघून तिचा उर धपापलाच! “यापेक्षा सांगलीचा पेढीवरचा सोनार बरा” तिच्या मनात आलं. पण करणार काय ? एकुलती एक लाडकी नणंद , तिची हौस! पहिल्या मजल्यावर बांगड्यांच्या काउंटरवर ते आले आणि एक जण बांगड्या दाखवू लागली. किती ते प्रकार! जाळीच्या , डिझाईन वाल्या , रंगीबेरंगी नक्षी असणाऱ्या! ती एक एक बांगडी हातात घेऊन बघू लागली. आता तिला तिच्या हातातल्या बांगड्या एकदम कळकट्ट वाटू लागल्या. काळसर पडलेल्या आणि रोजच्या कामांनी पार चेम्बुन गेलेल्या. काउंटर वरची बाई उत्साहाने एकेक सेट दाखवत होती. “जेवणाची वेळ होत आली. परत जाऊन स्वयंपाक उरकायचा आहे. नशीब कुकर तरी लावून आले. चिंटू ला भूक लागेल तोवर. आई करायला जातील आणि उगाच उद्योग ठेवतील. या दागिने दाखवण्याच्या बाईच्या घरी कोण कोण असेल ? हिच्या घरी कोण करत असेल स्वयंपाक ? बिचारीला किती काम करावं लागत असेल!” ती स्वतः शीच मनातल्या मनात बोलू लागली. ४ तोळ्यांच्या बांगड्यांची खरेदी झाली, आणि सगळे काउंटर ला आले. काउंटर वर येताना अगदी अचानक च तिला अगदी नाजूक, तरीही फार सुंदर सोन्याचा हार दिसला. तिची पावलं आपोआप थांबली तिथे. दोन पदरी नाजूक चैन छान एकमेकात गोवून तो हार तयार झाला होता. गेल्या दहा वर्षात तिने कधीच हट्ट म्हणून केला नव्हता पण आज मात्र हा हार आपल्याकडे हवाच असं तिला वाटलं. पण ते आत्ता शक्य नाही हेही तिला माहित होतं. डोळे बघून तो हार तिने मनात साठवून घेतला , आणि समोर बघितलं तर नवरा तिच्याकडेच बघत होता. तिने पटकन नजर खाली वळवली. “काय वाटलं असेल यांना ? एक ती नणंद , तिचं सोडून हिला स्वतः चिच हौस करायची आहे असं वाटलं असेल का ? काय तरी मी हावरट .. शी .. ” स्वतः च्या विचारात ती काउंटर ला आली. “मी , बिल देऊन येतो,तुम्ही पुढे व्हा. ” नवरा म्हणाला तशा त्या दोघी बाहेर पडल्या. “कित्ती छान आहेत ना ग वहिनी बांगड्या ! मला खूप आवडल्या!” नणंद खिदळत होती. तिला पटकन हसू आलं. किती छान असतात हे दिवस ! कौतुक करून घेण्याचे! आपलं झालं होतं का असं कौतुक ? त्या मानाने झालंच होतं कि! आईने तिचा एक गोठ दिला होता , पेढीवाल्याकडे! शिवाय , आपल्यालाच नको होता हा खर्च. धाकट्याची फी भरायची होती. तरीही ३ तोळ्यांच्या बांगड्या हातात आल्याच! त्यातच किती दडपून गेलो होतो आपण.
ऐंशी हजारांचं बिल देऊन तो बाहेर आला. बाहेर दोघी त्याची वाट बघत होत्या. तिघेही बस ची वाट बघत उभे राहिले. घरी आल्या आल्या देवासमोर बांगड्या ठेवल्या. नवीन बांगड्या सासूबाईंना दाखवून झाल्या. हिने पटकन आत जाऊन पोळीभाजी रांधली आणि सगळ्यांची जेवणे पटापट उरकली.
“झाली सगळी खरेदी. आता ते ब्लाउज वगैरे काय ते बघून घे ग वहिनी बरोबर जाऊन . परत उशीर नका करू. आणि त्या बांगड्या नीट ठेवा जरा. सगळंच नीट ठेवा. महागामोलाचं आहे सगळं. ” तो बडीशेप तोंडात टाकत म्हणाला.
ती सगळी झाकपाक करून आत आली तेव्हा तो पेपर वाचत बसला होता. “छान झाली नाही खरेदी! पण दमायला झालं बाई फार. झालंच म्हणा आता. खरेदी झाली सगळी. आता उद्याच जाऊन ब्लाउज टाकून येते शिवायला. एकीकडे मला रूखवताच पण बघायला हवं. नाण्यांचा बंगला करते माझी एक मैत्रीण! ती करून देईन. नाणी आहेत बरीच. बाकी मी रविवार पेठेतून कापड आणून घरीच त्यावर एम्ब्रॉयडरी करते. ते कधी कामाला येणार शिकलेलं ? त्याचे छान पडदे होतील… ” ती बोलत राहिली. त्याला मात्र झोप लागली होती. ती हि मग पहुडली शेजारी, लाईट बंद करून.
“साहेब , पन्नास हजार लोन वाढवता येईल का pf फंडातून ?” त्याने विचारले. “नाही जमणार देशपांडे. अहो बरीच रक्कम काढली आहे तुम्ही” साहेब म्हणाले तसा तो उठला. “देशपांडे , तुम्हाला हवं असेल तर मी माझ्याकडून काही .. ” साहेब म्हणाले. “नाही साहेब , तसं काही नाही, होईल सगळं मॅनेज!” तो पटकन म्हणाला.
“पासष्ट हजार” त्याच्या कानात आवाज घुमत होता. हाराची किंमत पासष्ट हजार होती. अगदी डोळ्यात जीव ओतून त्या हाराकडे बघणाऱ्या बायकोला बघून त्याला पोटात अगदी कालवले होते. तो आठवू लागला. काय काय बरं दिलं आपण हिला गेल्या दहा वर्षात , भेट म्हणून ? दिवाळीला एक साडी, पाडव्याला एक साडी. ती सुद्धा चार वर्ष. इतर वेळी सण करायचा नव्हता, आणि एक दोनदा बोनस उशिरा झाला तर “पुढच्या वेळी चांगली भारीतली साडी घेऊन, रांगोळी मधून” असं म्हंटली आणि घेतली नाहीच! बिचारी! गरीब म्हणून हिला आईने करून आणली. सासरी पण कुठे काय वेगळं मिळालं तिला. माझा हा असा घुमेपणा. आधी अण्णा असताना बोलायला लाज वाटायची , आता न बोलायची सवय झालीये. बिचारी घेते पण समजून. स्वतः च्या वाटेचं बोलते पण माझ्या वाटेचं हि घेते बोलून! आता तिला या लग्नाच्या वाढदिवसाला हा हार घेतोच!
त्याच्या मनाने उचल खाल्ली. हिला हार घ्यायचाच ! पण पासष्ट हजार ? आत्ताच चार लाख खर्च झाला होता बहिणीच्या लग्नाच्या खरेदीत आणि तयारीत. अजून लाखभर रुपये येत जात लागतील म्हणून त्याने हाताशी ठेवले होत.
दुसऱ्या दिवशी तो बँकेत गेला. “fd मोडायची आहे” तो म्हणाला. “अहो कशाला मोडताय ? चार महिन्यात मॅच्युअर होईल ती !” काउंटर पलीकडून आवाज आला. “नाही, जरा नड आहे. लग्न काढलंय बहिणीचं” तो म्हणाला.
पन्नास हजारांची कॅश घेऊन तो घरी आला. दारातच व्याही दिसले. तो आत आला आणि बसला. “काय म्हणता, कशी चालू आहे तयारी ? आमची तर फार धावपळ सुरु आहे!” तो म्हणाला.
“हो सुरु आहे तर! एक बोलायचं होतं जरा” व्याही म्हणाले. “बोला कि मग!” हा म्हणाला. “मानपान आपला आपला करायचं ठरलं खरं , पण आमच्या बहिणी जरा जुन्या वळणाच्या आहेत. आहेत तिघीच, पण त्यांना तुमच्याकडूनही साडी हवी आहे. तर मग तुम्ही म्हणाल तेव्हा आपण जाऊया खरेदीला. पुन्हा तुम्ही घेतल्या आणि त्यांना पटल्या नाहीत तर काय करता! एवढ्या तेवढ्यासाठी उगाच रुसवे फुगवे!” ते म्हणाले आणि उठले. त्याचा हात नकळत खिशाकडे गेला.
यथावकाश साड्यांची खरेदी झाली. आत्याबाईंनी वीस हजारांचा बट्ट्याबोळ केला. बहिणीच्या “फॅशन डिझायनर” ब्लाउजवल्याचे सहा हजार रुपये झाले. एकेक खर्च वाढत होते. लग्नाची तारीख जवळ येत होती. बायकोचा हार मात्र मागे राहिला होता.
लग्नाचा वाढदिवस अगदी तीन दिवसांवर आला. कुठे पासष्ट हजार आणि कुठे जेमतेम उरलेले वीस बावीस हजार. तशातच आज ऑफिस मध्ये त्याला साहेबांनी बोलावलं. “लक्ष्मी अगदी प्रसन्न झालीये तुमच्यावर!” साहेब म्हणाले. “तुमच्या प्रामाणिक आणि उत्तम कामाबद्दम, कंपनीकडून काही ठराविक जणांना दिला जाणारा बोनस तुम्हाला दिला जाणार आहे. मी मुद्दाम च नाही सांगितलं तुम्हाला, म्हंटल खुश करून टाकू एकदम देशपांड्यांना!” साहेब म्हणाले! त्याचा विश्वास च बसेना!
त्याने पाकीट हातात घेतले. फारसे जाड लागत नव्हते. किती असतील ? पाच-दहा हजार? तेवढे तर तेवढे! तो बाहेर गेला आणि आजूबाजूला बघत हळूच पैसे काढून मोजू लागला.
चाळीस हजार! तब्बल चाळीस हजारांचा बोनस मिळाला होता त्याला!
त्याने ठरवलं , काहीही करून आज हार घ्यायचाच! खरंतर त्याच्याजवळ आता जेमतेम वीस , बावीस हजार उरले होते. तो पटकन बँकेत गेला. तिथून सहा हजार काढले आणि तडक दुकानात गेला. गेल्या गेल्या त्याने आधी हार बघितला. हार होता तसाच त्याच जागी होता!
“तो हार हवाय मला!” चॉकलेट मागावं तसं तो म्हणाला. हार काऊंटर वर आला. तो कानात प्राण आणून वाट बघत होता कि कधी हा माणूस म्हणेल “पासष्ट हजार” आणि कधी मी पैसे देऊन तो हार ताब्यात घेईन!
माणसाने फटाफट आकडे दाबले आणि म्हणाला .. “अट्ठ्याहत्तर हजार साहेब .. “
हा बधिरपणे बघत बसला.
“अहो पण मी मागे आलो तर हाच हार पासष्ट हजारांना होता!” तो उसळून म्हणाला! “लग्नसराई सुरु होतीये साहेब, भाव वाढले सोन्याचे .. ” काउंटर वरचा माणूस म्हणाला. “करायचा का प्याक साहेब ?” त्याने काही वेळ वाट बघून विचारले. “नाही .. ” अस्फुट शब्दात तो म्हणाला. हार पुन्हा जागेवर गेला.
त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. एक साधा हार घेता येऊ नये आपल्याला बायकोसाठी ? दहा हजारांची इतकी जीवघेणी किंमत असते हे आजच कळलं त्याला.
आणि तो डोळ्यात प्राण आणून त्या हाराकडे बघू लागला. अगदी बायको बघत होती, तसंच .. बघण्याशिवाय तो दुसरं काहीच करू शकत नव्हता …
सितारा
लेखिका- अश्विनी आठवले
काही ठिकाणी टमटम…
तर काही ठिकाणी वडाप, विक्रम, सिक्ससिटर…
सुधारित नाव मात्र मिनिडोर…
मी या सितार्याची कायमची प्रवाशी…
सकाळी चौल ते अलिबाग आणि दुपारी अलिबाग ते चौल…
सितार्यासाठी घरुन चौल नाक्यावर यावे लागते…
या उन्हाळ्याच्या दिवसांत नाक्यावर उन्हात उभे राहून सितार्याची वाट बघणे म्हणजे दिव्यच…
एष्टीने जाण्यास हरकत नाही पण बसायला मिळेलच याची ग्यारेंटी नाही…
असो…
काही वेळ वाट बघितल्यावर सितारा नजरेस पडतो आणि हायसं वाटतं…
हात दाखवायचा..सितारा थांबवायचा या एष्टीच्या उक्तीप्रमाणे बसायला जागा असेल तरच तो थांबतो…
आता सितार्यात जागा असणं म्हणजे काय…
सिक्ससिटर म्हणून प्रचलित असणारा हा चक्क दहा सिट्स घेतो…
ड्रायव्हरच्या बाजूला दोन…मागच्या उलट्या आणि सुलट्या अशा दोन बाजूस प्रत्येकी चार चार…
एका सिटवर तिन्ही मजबूत प्रवाशी असतील तर चवथ्याची हालतच…
असो…
आता नाक्यावरून सितारा सुटतो…
आणि वारा लागल्यामुळे झालेला आनंद भाटगल्लीजवळ असलेला स्पीडब्रेकर ड्रायव्हरने खाडकन् उडवल्याने क्षणार्धात मावळतो…
सितारा रस्त्याने धावत असतो आणि मगाशी उन्हात उभं असताना व्हॉटसप बघण्यासाठी मोबाईलचा वाढवलेला ब्राईटनेस मी कमी करत असते…
तेवढयात ड्रायव्हर पंपावर डिझेल भरण्यासाठी थांबतो आणि माझ्यासकट सगळ्यांच्या कपाळाला आठ्या पडतात…
आमी दोन मिनीट आमच्या कामासाठी थांमवला असता तर थामला असता काय…प्रवाशांची कुजबुज…
डिझेल भरून बाहेर पडताच नेमकी अलिबागकडेच जाणारी एष्टी दिसते आणि आमच्या सितार्याच्या ड्रायव्हरची धडपड चालू होते…पुढे उभ्या असलेल्या सिट मिळविण्यासाठी…
सितार्याच्या ड्रायव्हरची एष्टीला ओव्हरटेक करायची हौस संपत नाही आणि एष्टी ड्रायव्हर त्याला ओव्हरटेक करून देत नाही…
या सगळ्या घाईमधे अनेक स्पीडब्रेकर येतात आणि जातात…
येऊन गेल्यावर कळतं की स्पीडब्रेकर होता…(दणका लागल्यावर)
तोपर्यंत नागाव येतं आणि शिवाजी पुतल्याजवळ थामव रं…असा कोणत्यातरी प्रवाशाकडून आवाज येतो..
तो उतरल्यावर आपल्याला व्यवस्थित जागा झालेली असते..छान वाटतं…
तेवढयात नागाव हायस्कूलजवळ कोणीतरी बारीक पोर चढतं आणि आपल्याला सरकल्यासारखं करावं लागतं…
सितारा सूसाट चाललेला असतो आणि आक्षीच्या पूलावर ट्रॕफीक लागतं…
काही वेळाने ट्राफिक सुटतं आणि सितारा वेग घेतो…
बेलीफाटा…बेलकडे
कुरूळचा टर्न तर समस्त सितारेवाल्यांसाठी अंधश्रद्धाच…
सितारा रस्त्यावर वळतो आणि आपण बसल्या जागेवर…
नंतर उजवीकडे कमळाचं तळं दिसतं…
मुंबईकर सितार्यात असले तर ‘वाव, लोटस, सो ब्युटीफूल‘ अशा अगम्य भाषेत आणि सूरात म्हणतात आणि बाकी लोक त्यांना हसतात…
पुढे गेल्यावर हळूहळू अलिबाग येतं आणि उतरण्याची वेळ येते…
उतरलं की मग उचकडलेले केस आणि चेहऱ्यावर बसलेली धूळ यांचा प्रत्यय येतो…
मनोमन सितार्याचा राग येतो…
संध्याकाळी सितारेवाल्यांना खूपच डिमांड असते…
माझी शक्यतो सितार्याने संध्याकाळी घरी जायची वेळ येत नाही…
संध्याकाळी जिथे सितारेवाला प्रवाशी उतरवतो तिथेच जर आपण त्याला ‘रेवदंडा जाणार का‘ असं विचारलं तर तो आधी नाही म्हणतो…नंतर तोच रेवदंड्याला जाणाऱ्या सितार्यांच्या लाईनीमधे जेव्हा दिसतो…तेव्हा अशी सटकते ना….
संध्याकाळी प्रवाशांना आणि सितारेवाल्याला दोघांना घरी जायची घाई असते…
त्यामुळे सगळे खड्डे आणि स्पीडब्रेकर माफ असतात…
असो…
एकंदरीतच सितारा प्रवास हा थोडासा त्रासदायक असला तरी सितार्यांची संख्या खूप जास्त असल्याने आपण वेळेवर आपल्या इच्छितस्थळी पोचू शकतो…
फक्त सितारेवाल्यांना एकच विनंती की स्पीडब्रेकर आल्यावर स्पीड खरंच ब्रेक करत जा आणि सितार्याबरोबरच सितार्यामधल्या प्रवाशांची सुद्धा काळजी घेत जा…
माझ्यासारख्या अनेक सितारा प्रवाशांना भावी प्रवासासाठी शुभेच्छा.
सुरकुत्या
लेखक- बीआर पवार
एकेक अनुभवाच्या घड्या.
एखाद्या थोराड झाडाच्या खोडावर चढत जाणारी पुटं जशी त्याच्या सौंदर्यात भर घालतात, तशा सुरकुत्या या जुन्या खोडांच्या चेहर्यावर सुंदर जाळं विणत राहतात. ही त्यांची वृद्धिवलयं त्यांचा जीवनानुभव किती सांगतात माहीत नाही, पण जीवनाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन मात्र नक्की देउन जातात.
एखाद्या अशा जाळीदार आजीला तुम्ही कधी भेटलात का ? अशा ढाक्याच्या मलमलीसारख्या तलम झालेल्या चेहर्यामधली सुंदर दंतपंक्ती पुढच्या धामाला निघुन गेलेली असते. मागे उरलेली मायाभरली जिवणी त्या सुरकुत्यांच्या पार्श्वभुमीवर अधिकच खुलून दिसत राहते.
अशी एखादी ऐंशी नव्वद वर्ष जगलेली आज्जी……. अर्धी वर्ष इंग्रजकाळात अन अर्धी वर्ष स्वतंत्र भारतात घालवलेली म्हातारी. खरंतर ही आजी, ……. सगळ्यांची असते. पण प्रत्येकाला वाटत राहतं, कि ती फक्त आपलीच आहे. घरातल्या लहानाना, गोठ्यातल्या जनावराना, खुराड्यातल्या कोंबड्यांना ती एखाद्या मोठ्या गोधडी सारखी भासत राहते. सर्वांना सामावून घेणारी.
तिच्या सर्वात जिहाळ्याचा विषय म्हणजे तिची शालेय वयातली नातवंडं, परतवंडं. स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास वाचता वाचता, त्यांच्या डोक्या्त, ब्रिटिश अगदी खलनायक म्हणुन डोक्यात फिट्ट बसलेला असतो.
कधीतरी रात्री झोपताना, आजीच्या गोष्टींचा खजिना निघतो. अन एखादं तिचं नातवंड, हळुच विेचारतं,
“आज्जी, तु कधी इंग्रज पाहिलेस का गं ?”
“नाही रे बाबा, तुझा तो इंग्रज काळा कि गोरा हे ही मी कशाला पाहिलंय.”
“अगं आज्जी, इंग्रज तुझ्यासारखेच गोरे होते.”
“आसंल बाबा, असू दे, पण तू आता झोप. ते इंग्रज कधी आले अन कधी गेले हे मला मेलीला वाड्यात बसुन कसं कळणार रे बाबा.”
“आज्जी त्यांनी आपला देश लुबाडला. मला खूप राग येतो त्या इंग्रजांचा.”
“असू दे बाबा, पण तु डोकं नको तापवू. आता गेले ना ते, ……. मग गेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये.”
अन मग तिचा सुरकुतला हात फिरला कि जादू झाल्यासारखी नातवंडं झोपी जातात. गेलेल्या माणसांविषयी का वाईट बोलायचं नाही, हा पुढचा प्रश्नही तिच्या सुरकुतल्या मायेत विरघळून जातो. अन् मग अनुभवांच्या शाळेत शिकता शिकता कधी तरी, असे अनुत्तरीत प्रश्न उत्तराच्या हातात हात घालून येतात. वरवर पाहता चुकीचं वाटणारं तिचं स्टेटमेंट अन ‘गेलेल्या’ माणसांच्या तिच्या व्याख्येची व्याप्ती, माणूस म्हणुन विकसीत होण्याच्या प्रवासात, त्या नातवंडाला अधुनमधुन भेटत राहते.
वाचनाची सवय कधीही चांगलीच. पण त्यातल्या त्यात, पुस्तकापेक्षा माणूसरुपी पुस्तकं वाचण्याची सवय जास्त आनंददायी. त्यातही एखादं जुनं पुस्तक, काढुन वाचण्यातला आनंद विरळाच.
एखाद्या जुन्या वडाच्या पारावर, एखाद्या मंदिरात खाम्बाशी टेकून बसलेलं, एखाद्या नाना नानी पार्कमध्ये शुन्यात दृष्टी लावून बसलेलं, एखाद्या बॅंकेत हयातीचा पुरावा देउन पेंशन काढायला आलेलं, …… असं एखादं जुनं पुस्तक वाचायला मिळालं तर नक्की वाचा. एकेक पान उलटत जातं, तसं तसं तुमचं कुतूहल वाढत जातं.प्रत्येक वाचल्या जाणार्या पुस्तकासोबत, माणूस म्हणून तुमची वृत्ती अन आवृत्ती दोन्हीही समृध्द होत जातात.
हातावर पडलेले घट्टे पाहताना, जुन्या जखमेची खुण पाहताना, हसताना, बोलताना, प्रत्येक वेळी बदलत जाणारी सुरकुत्यांची नक्षी पाह्ताना, बोळक्यातुन ऐकु येणारी एखादी घोगरी झालेली वेदना ऐकताना, तुमचं मन एखाद्या निरांजनाच्या प्रकाशात उजळुन निघाल्याचा अनुभव नक्की येईल.
गळ्यातली तुळशीची माळ काढुन, वेळ मिळेल तिथे, पुण्याची गणना करणारी मंडळी, कधीकधी माणसांची जुळणी करताना चुकतही असतील. हातावर तंबाखु मळता मळता मोठमोठे सिद्धांतही, चिमुटभरच घेउन बाकी ज्ञान खकाण्यासारखं हवेत झटकलंही जात असेल. लेकाने घेउन दिलेल्या दातांच्या कवळीवरही मिश्री लावताना, वास्तवाकडे सोयीस्कर दुर्लक्षही केलं जात असेल. या सुरकुत्यांच्या वयात, एखादा प्रकांड पंडीत, स्वतःभोवतीची सगळी ज्ञानवलयं गुंडाळुन ठेवून, लहान मुलांसोबत, कॅंडीक्रशची स्पर्धाही लावत असेल. क्वचित एखाद्या नातवात अन आज्जी आजोबात, कोणतं कार्टुन पहायचं यावरुन वादही होत असेल. एखाद्या नाना-नानी पार्क मध्ये, एखाद्या फिटनेस सुंदरीला पाहण्यासाठी, काही साठीतल्या सुरकुत्या वॉकिंग करुन घामाघुम होत असतील ……… पण म्हणुन त्या सुरकुत्यांचं महत्व तसुभरही कमी होत नाही.
आयुष्यभराचा टवटवीतपणा , पुढच्या पिढ्यांसाठी सोडून जाताना, येणार्या या सुरकुत्या जगातलं सर्वात मोहक सौंदर्य स्थळ आहे असं मला वाटतं.
आणि या सुरकुत्या एकट्या येत नाहीत बरं का ! त्यांच्या सोबत, अनुभवाची गणती दाखवणारी पांढर्या केसांची फौज, …… कधी जीवनातल्या अनेक लढायांचं द्योतक असलेला सपाट मैदानी प्रदेश, ……
माणसं आतुन बाहेरुन परिपूर्ण वाचू शकणारा जाड भिंगाचा चष्मा, ……
बाहेरच्यांशी कमी अन् आतल्या आत जास्त बोलणारा घोगरा आवाज, ……
नजर काढण्यासाठी जॉइंट लुब्रिकेशन गेलेली, कडकडा आखावर मोडणारी बोटं, ……
लेवून किंवा कधीही न मिरवताच, कुठल्याही दागिन्याचा सोस उरलेला नसताना, दैवी योजनेनं मिळालेला डोळ्यातला मोती, ……
बसल्या जाग्यावरुन लांब भुतकाळात चक्कर मारुन येताना, होणारी दमछाक अन् अलार्म लावल्यासारखे कुरकुरणारे गुडघे,……
आणि पाहणार्याला संयम शिकवणारी सावकाश हालचाल, …… सगळं कसं एकटेपणात सोबत करायला आल्यासारखं उश्या पायथ्याशी येऊन बसतं.
इतक्या सगळ्यांना सोबत घेवुन जगणारी ही पुस्तकं प्रत्येकाच्या घरात कधी ना कधी असतातच. आणि नसलंच ते भाग्य तर, आजुबाजुला नीट पाहिलंत तर अशा समृद्ध पुस्तकांची अख्खी लायब्ररीच सापडू शकते,….एखाद्या वृद्धाश्रमाच्या रुपात. पण असे ग्रंथ कितीही समृद्ध असले तरी, शेल्फवरुन काढून वाचण्याएवढी हिंमत आणि वेळ सतत कशाच्या ना कशाच्या मागे धावणार्या जगाकडे नसतो. अगदी हाताशी असलेली पुस्तकं वाचण्याइतका संयमही बर्याचदा अभावानंच आढळतो. या जुन्या पानांवरचे आयुष्य समृद्ध करु शकणारे रंगतदार उतारे क्वचितच वाचले जातात. अगदी प्रत्येकाला आयुष्य घडवण्यासाठी “भावार्थदिपीका” वाचण्याचं भाग्य आणि वेळ मिळेलच असं नाही. पण आपल्या जवळचे हे चालते बोलते ग्रंथ जरी वाचले तरी आयुष्य समृद्ध होईल यात शंका नाही.
तसंही इतका संयम यायला, सुरकुत्या ल्यायल्या शिवाय गत्यंतर नाही. अन अशाच सुरकुतल्या हातांनी दिलेल्या,
’म्हातारा हो !’ या आशीर्वादातला मतितार्थ समजल्याशिवाय स्थित्यंतर नाही हेच खरं.
अधुरी एक कहाणी
लेखिका- मानसी जोशी
त्याने विचारलं असतं तर ती ‘हो’ म्हणाली असती. तिने विचारलं असतं तर तो ही नाही म्हणाला नसता. पण हे त्यालाही जमलं नाही आणि तिलाही….. अशीच अधूरी राहिलेली एक प्रेमकहाणी….
तो आणि ती एकाच कॉलेजमधले पण वेगवेगळ्या ग्रूपमधले. तो तिला दोन वर्षांनी सिनिअर. एका कॉलेज प्रोग्रॅमच्या वेळी तिने त्याला बघितलं आणि बघताक्षणी तो तिला आवडला. ती तशी चूझी. असं सहजासहजी तिला काही आवडणं शक्यच नसे. पण तो मात्र तिला एका नजरेतच आवडला. हळूहळू दोघांची एकमेकांशी ओळख झाली. अधूनमधून भेटही होऊ लागली, पण फक्त दोघंच भेटली असं मात्र कधीच झालं नाही. जसजसा तो तिला कळत गेला तसतसं तिला जाणवत गेलं, “त्याच्या आणि तिच्या वाटा वेगळ्या आहेत त्या जुळणं शक्य नाही.”
मग तिने ठरवलं, “काहीही झालं तरी आपल्याला या स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर पडायलाच हवं. जे शक्य नाही त्याचा विचार कशाला करायचा? पुढे जाऊन दोघांनाही त्रास होण्यापेक्षा आपण आत्ताच स्वतःला सावरलेलं बरं. पुढे त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि तो पुढच्या शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात निघून गेला. जाण्यापूर्वी तो सहजच(?) म्हणून कॉलेजला आला, तिलाही भेटला. कितीही नाही म्हटलं तरी तिचं मन त्याच्याकडेच ओढ घेतच होतं. पण तरीही तिने स्वतःला सावरते. त्याच्या डोळ्यातलं मूकं प्रेम तिच्या भरलेल्या डोळ्यांना दिसतच नाही. त्या वेळी दोघांनाही माहिती नसतं; ही भेट त्यांची शेवटची भेट ठरणार आहे.
काळ कोणासाठी थांबत नाही की कोणाची वाट बघत नाही. दोघांनीही शिक्षण पूर्ण करून आपल्या अर्थार्जनाला सुरवात केली. आता दोघांचंही विश्व बदललं होतं. आयुष्यात नव्या व्यक्ती, नवी स्वप्ने, नवी क्षितिजे दिसू लागली होती. तिने तिच्या आयुष्याचा जोडीदार निवडला. सर्व बाजूंनी तिला साजेसा. त्यानेही आपल्या पसंतीच्या मुलीशी लग्न केलं. मात्र दोघांनीही मनाच्या एका कोपऱ्यात मात्र पहिल्या वहिल्या अबोल, अव्यक्त प्रेमाची आठवण अलवार जपलेली होती.
जवळपास पंधरा वर्षांचा काळ मध्ये निघून गेला. आता ‘तो’ आणि ‘ती’ दोघंही आपल्या आयुष्यात व्यग्र झाले होते. आपल्या संसारात रमले होते. आता त्या मूक प्रेमाच्या आठवणीही धूसर झाल्या होत्या.
एक दिवस एका कार्यक्रमामध्ये नेमकी तिच्या खास मैत्रीणीची आणि ‘त्याची’ भेट होते. तिच्या मैत्रीणीचा नवरा आणि तो एकाच ग्रूपमधले. त्या फंक्शनमध्ये कॉलेजच्या ग्रूपमधले अनेक मित्र भेटतात. सहाजिकच जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. कॉलेजच्या धमाल दिवसांपासून सुरु झालेल्या आठवणी ‘ती सध्या काय करते’ पर्यंत येऊन थांबतात. ‘त्याची’ वेळ येते तेव्हा मात्र तो हसून वेळ मारुन नेतो. या ग्रूपची सगळी धमाल दुरुनच बघणारी तिची मैत्रीण मात्र त्याच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव चटकन ओळखते. थोड्या वेळाने त्याला एकटं बघून ती त्याच्याशी बोलायला जाते. सुरुवातीला हाय हॅलो आणि जुजबी बोलणं झाल्यावर त्याला विचारते, “तू खरच प्रेम करत होतास का तिच्यावर? इतक्या वर्षांनंतरही तिच्याशी बोलावसं, तिला भेटावसं वाटतं तुला?”
तो गप्प रहातो. तिची मैत्रीण आपला मोबाईल त्याच्यासमोर धरते आणि म्हणते, “हा बघ तिचा फोटो; तिच्या व्हाट्स अप चा डीपी…” तो नकळत मोबाईल हातात घेतो. ‘तिचा’ फोटो बघून त्याचे डोळे भरुन येतात. कितीतरी वेळ तो त्या फोटोकडे बघत बसतो.
“तिचा व्हाट्स अप नंबर देऊ? बोलणार आहेस तिच्याशी?”
“नाही! नको! मला तिचा नंबर देऊ नकोस आणि तिलाही माझा नंबर देऊ नकोस, फक्त व्हाट्स नंबर नाही कुठलाच नंबर देऊ नकोस.” असं म्हणून तो मोबाईल परत करतो.
दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या मैत्रीणीच्या मोबाईलवर त्याचा मेसेज येतो-
“दाटून आलेल्या मेघांनी
बरसावं असं काही नसतं
प्रत्येकवेळी भावना व्यक्त करायला
शब्दच हवेत असंही काही नसतं
अव्यक्त राहीलं तरीही
प्रेम हे प्रेमच असतं
अधूरी असली तरीही
ती एक प्रेमकहाणीच असते.”
खाली लिहिलेल असतं, “हा मेसेज तिला पाठवशील प्लीज. हा मी तिला पाठवलेला आयुष्यातला पहिला आणि शेवटचा मेसेज! त्यावेळी व्हाट्स अप नव्हतं मोबाईलही नव्हते, पण नजरेची भाषा खूप काही बोलून जायची. असो.
तिची मैत्रीण तिला हा मेसेज पाठवते. मेसेज बघून ‘ती’ मैत्रीणीला फोन करते. मैत्रीण सगळी हकीगत तिला सांगते. ती स्तब्ध होते. काय बोलावं तिला काहीच कळत नाही. आजपर्यंत ती समजत असते आपण त्याच्यावर एकतर्फी प्रेम करत होतो, पण आज तिला कळतं की, ‘तो’ सुद्धा तिच्यावर मनापासून प्रेम करत होता.
“तुला भेटावसं वाटतय त्याला? फक्त एकदा भेटा पहिलं आणि शेवटचं. यात काही चूक नाही. पण भेटला नाहीत, तर मात्र खूप काही निसटेल हातातून, त्यावेळी नाही बहरलं तुमचं नातं पण आता एक निर्मळ मैत्रीचं नातं निर्माण होऊ शकतं अगदी काहीच नाही झालं, तर आयुष्यात किमान एकदा एकमेकांशी मनमोकळं बोलल्याचं समाधान तरी मिळेल.” पलिकडून तिची मैत्रीण बोलत असते.
एक क्षण तिच्या मनात चलबिचल होते. पण लगेच तिला वास्तवाचं भान येतं आणि ती नकार देऊन फोन ठेवते. मन घट्ट करुन ती नकार तर देते पण मनात जाग्या झालेल्या त्याच्या आठवणी थांबवणं मात्र तिला कठिण जातं.
काळ नेहमीप्रमाणे पुढे सरकत असतो. अजून दोन महिने सरतात. ती हळूहळू जुन्या आठवणी पुन्हा विसरायचा प्रयत्न करत असते. अशाच एका निवांत दुपारी तिच्या मैत्रीणीचा फोन येतो आणि पुन्हा त्याच्या आठवणी जाग्या होतात.
“‘तो’ आत्ता आला आहे आमच्याकडे, बोलणार आहेस का त्याच्याशी?”
हे ऐकून क्षणभर ‘ती’ हरकून जाते. मनात एक अनामिक हुरहूर दाटून येते आणि नकळत ती विचारते, “त्याने काही विचारलं का माझ्याबद्दल?
“अगं तुझ्याबद्दल कधी विचारेल? आत्ताच आला तो. मी चहा ठेवायला किचनमध्ये आले आणि इथूनच तुला कॉल केला.”
हे ऐकून ‘ती’ थोडी निराश होते, पण तसं न दाखवता ‘नाही’ म्हणून फोन कट करते.” खरं तर तिला त्याच्याशी बोलावं, त्याला भेटावं असं मनापासून वाटत असतं, पण तरीही ती स्वतःला थांबवण्याचा प्रयत्न करते. कारण तिच्या एका चुकीमुळे दोन संसार उध्वस्त होऊ शकतात, याची तिला जाणीव असते, म्हणूनच ती त्याच्यापासून दूर राहायचं ठरवते.
जवळपास तासाभराने तिच्या मैत्रीणीचा पुन्हा फोन येतो. काहीशा धडधडत्या मनाने ती फोन रिसिव्ह करते. पलिकडून तिची मैत्रीण बोलत असते, “सांगितलं मी त्याला तुला फोन केल्याचं आणि तू जे विचारलंस तेसुद्धा सांगितलं.”
“मग काय म्हणाला तो?” ती.
“तो जे म्हणाला ते मला नीटसं कळलं नाही पण तो म्हणाला, ‘मला जे म्हणायचं आहे ते तिला बरोबर कळेल. तिला सांग, तू विचारी आहेस, प्रॅक्टिकल आहेस, उगाच भावनिक होऊ नकोस. तू होणार नाहीसच कारण तो तुझा स्वभावच नाही. तू जशी आहेस तशीच रहा.”
मैत्रीणीचं हे बोलणं ऐकून मात्र तिच्या चेहऱ्यावरची कळी खुलते. मनातलं सगळं मळभ दूर होवून मन स्वच्छ होतं.
“थँक्स ! तुलाही आणि त्यालाही..” ती अगदी सहज बोलून जाते.
“तुला खरंच कळलं त्याला काय म्हणायचं होतं ते?”
“हो! त्याला जे म्हणायचं होतं ते सगळं त्याने या एका वाक्यात सांगितलं.”
“नक्की काय म्हणायचं होतं त्याला?”
“त्याला म्हणायचं होतं, ‘जेव्हा सगळ्या गोष्टी सहज शक्य होत्या तेव्हा विचारपूर्वक वागलीस. आता भावनांच्या आहारी जाऊ नकोस. कारण असं करुन फक्त त्रास होईल.’
तिचं हे उत्तर ऐकून तिची मैत्रीण आश्चर्याने तिला म्हणते, “अगं किती सहज कळतं तुम्हाला एकमेकांच्या मनातलं! बाकी काही माहिती नाही मला पण तुम्ही दोघांनीही त्यावेळी गप्प राहून चूक केलीत असं वाटतय मला.”
“चूक का बरोबर ते नाही सांगता येणार मला. पण एक मात्र नक्की त्यावेळी माझ्यापेक्षा जास्त विचारपूर्वक तो वागला. मला तर माहितच नव्हतं त्याचं माझ्यावर प्रेम आहे. त्यामुळे त्याच्या विचारांपासून दूर जाणं मला कठीण गेलं नाही. पण त्याला मात्र माझ्या नजरेतलं प्रेम जाणवलं होतं, तरीही त्याने स्वतःला माझ्यापासून लांब ठेवलं. जर त्यावेळी मला एक क्षण जरी जाणवलं असतं त्याचं माझ्यावर प्रेम आहे, तर कदाचित मी स्वतःला थांबवू शकले नसते आणि सगळंच कठीण होवून बसलं असतं. आयुष्यातल्या त्या एका वळणावर आम्ही एकत्र आलोही असतो पण पुढे जाऊन त्याचा आम्हा दोघांनाही त्रास झाला असता. कारण मुळात आमच्या वाटा वेगळ्या होत्या. आमची कौटुंबिक पार्श्वभूमी आमची स्वप्न आमचे विचार, सगळंच परस्परविरोधी होतं. काही नात्यांना नाव देता येत नाही आणि काही नाती जुळतच नाहीत, तरीही त्या नात्यामध्ये एक ओढ असते आणि ही ओढ जन्मभर कायम राहते. काही गोष्टी अपूर्णच छान वाटतात कारण त्या पूर्ण झाल्या, तर त्यातला गोडवा निघून जातो. आमची कहाणीही अशीच आहे अधुरी! आणि म्हणूनच ती खूप गोड आहे.” आयुष्यात पहिल्यांदाच ती त्याच्याबद्दल इतकं मोकळेपणाने बोलत होती. तिचं हे बोलणं ऐकून तिच्या मैत्रीणीचे डोळे पाणावतात.
आयुष्यात काही नाती निर्माणच होत नाहीत पण तरीही ती असतात. त्यां नात्यांना नाव नसतं, भविष्यही नसतं; पण त्यामध्ये असते एक आंतरीक ओढ, राहून गेलेली स्वप्न आणि गोड आठवणी!
रुम नंबर १०१
लेखक- अभिजीत इनामदार
सीटी हॉस्पिटलच्या स्पेशल वॉर्ड मधील रुम नंबर १०१ मधे आज काही वेगळाच नूर होता. ती तब्बल पंधरा दिवसांनी आज सकाळी शुद्धीवर आली. डॉक्टर तपासत असताना तीने हळुच डोळे उघडायचा प्रयत्न केला पण जमेना म्हणून परत परत प्रयत्न करत होती. डॉक्टर तीला शांत हो असे सतत सांगत होते. पण तिचे प्रयत्न चालुच होते. शेवटी डॉक्टरांनी झोपेचे इन्जेक्शन दिले तीला आणि काही मिनीटात ती गाढ झोपली.
दरवाज्याच्या बाहेर अर्णव हे सगळे बघुन खूप अस्वस्थ होत होता. डॉक्टर बाहेर आल्यावर त्यांच्याशी बोलत तो त्यांच्या केबीन मध्ये गेला.
अर्णव – डॉक्टर अजून किती दिवस हे असे चालणार आज जवळ जवळ महिना झाला ती ह्या अवस्थेत आहे. मला आता खूप काळजी वाटत आहे.
डॉक्टर- अर्णव अरे मी पण माझ्या परीने खूप प्रयत्न करत आहे. मला कळत आहे तुझी स्थिती. तीला लागलेला मार आणि बसलेला मानसिक धक्का खूप मोठा आहे. मी शर्थीचे प्रयत्न करत आहे मला ती शुद्धीत येईल ह्याची खात्री आहे पण ती पहिल्या सारखी कधी होईल हे मी आत्ताच नाही सांगू शकत. मी तूला खोट्या आशा नाही दाखवणार. माझे कालच न्युरोसर्जन गोखले यांच्याशी बोलणे झाले आहे. ते म्हणत आहेत एक तर ती सगळा भुतकाळ विसरेल किंवा तीला ह्या घटनेतून बाहेर पडायला खूप जास्त वेळ लागेल. काही मिरॅकल झाले तरच ती पटकन बरी होवू शकते.
अर्णव – म्हणजे डॉक्टर मला माझी हुशार, हसरी, अवखळ, प्रेमळ अनुरा कधीच मिळणार नाही का? डॉक्टर सांगा ना प्लिज.
अर्णव अक्षरशः ढसाढसा रडायला लागला. डॉक्टर देवाकडे प्रार्थना करत होते कि त्यांच्या प्रयत्नाला यश दे देवा.
तो हॉस्पिटल मधुन घरी येउन हातात वाइनचा ग्लास घेऊन गॅलरीतल्या झोपाळ्यवर बसला आणि प्रत्येक सिप बरोबर तो भुतकाळात ओढला जात होता.
हाय अर्णव सर. मी अनुरा कुलकर्णी तुमची नवीन प्रोजेक्ट टीम मेट. आजच जॉईन झाले आहे. ह्या आवाजाने कामात व्यस्त असलेला अर्णव एकदम चेअर वरून उठला आणि तीच्या कडे पाहु लागला. तिच्याकडे पाहताना बोलताना उघडलेले तोंड तसेच उघडे राहिले. अनुराला हसु आवरत नव्हते पण ती तसे न दाखवता परत हॅलो सर म्हणाली. अर्णवला कळले आपण मुर्खपणा केला आहे. त्याने जीभ चाऊन तीला हॅलो म्हणाला.
वेलकम टु अवर टिम मीस अनुरा. अनुरा दिसायला एकदम क्लासिक होती. गोल चेहरा, बॉबकट केस, रेखीव भुवया, पातळ गुलाबी ओठ, सरळ नाक, सडपातळ बांधा. तीने हॅलो करण्यासाठी पुढे केलेल्या हाताची लांबसडक बोटे असलेला, गुलाबी मऊशार तळवा त्याने हातात घेतला आणि तीला ग्रीट केले. ती पाहताच बाला कलीजा खलास झाला अशी काहीशी त्याची अवस्था झाली.
त्याच प्रोजेक्टवर काम करणाऱ्या साहीरला अनुरा आवडत होती. त्याने तीला तशी हिंटही दिली होती पण अनुरा त्याला भाव देत नव्हती. एके दिवशी अनुरा, अर्णव आणि साहीर रात्री उशिरापर्यंत काम करत होते. अर्णव कामात आहे हे पाहून साहीर कॉफी घ्यायला गेलेल्या अनुराजवळ उभा राहिला. तीला तो तिच्यावर त्याचे खुप प्रेम आहे हे सांगू लागला. अनुराने तो तीला आवडत नाही म्हणून सांगितले. हा नकार साहीरला सहन झाला नाही. त्याने तीचा बाहेर जाण्याचा रस्ता आडवला. तीला धक्का देवू लागताच तीने त्याला एक लगावून दिली. तेवढ्यात अर्णव तिथे आला आणि घाबरलेल्या अनुराने त्याला घट्ट मिठी मारली. काही तरी अघटीत घडले आहे हे अर्णवला समजले.
अनुराने सगळे अर्णवला सांगितले असता साहीरने त्या दोघांची माफी मागितली आणि तक्रार न करण्याची गळ घातली. माझे करिअर खराब होईल म्हणून माफ करा ही त्याची गयावया त्या दोघांनी मान्य केली. पण साहीरने मी तुमच्या दोघांच्या मधे यायला नको होते असे म्हणणे आणि त्या दिवशी अनुराने अर्णवला मारलेल्या घट्ट मिठीने त्या दोघांना एकमेकांबाबत असणारे प्रेम जाणवले. आता ते दोघे दिवसेंदिवस एकमेकांच्या जवळ येवू लागले. सगळ्या अॉफिसला हे माहिती होते आणि कोणाची काही हरकतही नव्हती… फक्त एक माणूस सोडून तो म्हणजे साहीर.
अनुरा आणि अर्णव हे आपापल्या कामात माहीर होते त्यामुळे त्यांचा प्रोजेक्ट लवकर कंप्लीट झाला. प्रोजेक्ट सक्सेस पार्टी लोणावळ्याला ठेवली होती. संपूर्ण टीम होती. डान्स, ड्रिंक्स, वेगवेगळ्या प्रकारच्या डीश या मधे रात्र रंगत होती. कोपर्यात बसलेल्या अनुराला साहीलन एक ड्रिंक अॉफर केले. तीने नकार दिला असता तू अजून मला माफ केले नाहीस असे समजू का म्हणताच अनुराने तो ग्लास घेतला.
दोन सीपमधेच तीला चक्कर येवू लागली. ती उठून बाहेर गेली असता साहीर तिच्या पाठी गेला. त्याच्या डोक्यावर आता नशेचा अम्मल होता. त्याला अनुराहा आता आपलेसे करायचे होते. त्यासाठी काहीही करायची त्याची तयारी होती. तो तीला त्याच्या रुमकडे घेऊन गेला. आता तीला काहीही कळत नव्हते. पण साहीर आपल्याला त्याच्या रुमकडे का घेवून जातोय हे तीला कळत नव्हते. त्याच्या डोळ्यात दीसणारी वासना पाहून त्याचा हेतू चांगला नाही हे मात्र तीला या अवस्थेतही नक्कीच जाणवले. ते जाणवताच ती ओरडली. अर्णवला काहीतरी शंका आली म्हणून तो बाहेर गेला.
त्याला अनुराचा आवाज आला. त्याने पाहिले असता तीचा आवाज साहीरच्या रुम मधून आल्याचे जाणवले. तो धावला, साहीरच्या रुमचा दरवाजा बंद होता. आत साहीर अनुराला आपली करण्यासाठी बळजबरी करायचा प्रयत्न करत होता. अर्णवने रुम सर्व्हिस वाल्यांच्या मदतीने मास्टर की ने दार उघडले. आतली परिस्थिती पाहताच अर्णव साहीरवर तुटून पडला. त्यांच्या धक्काबुक्की मधे अनुराला धक्का लागला आणि तीचे डोके बेडच्या कडेवर आपटले आणि ती बेशुद्ध पडली.
महिन्याभरापूर्वी घडलेला प्रसंग अर्णवच्या डोळ्यापुढून जसाच्या तसा सरकला. त्याला काय करावे ते कळत नव्हते. साहीर आता पोलीसांच्या ताब्यात होता. रात्री उशिरा अर्णवचा फोन वाजला. फोन हॉस्पिटल मधून होता. एवढ्या रात्री फोन म्हणजे काय कारण असेल? अनुराचं काही… बरं वाईट…? विचारांनीच त्याचा घसा सुकला. हात पाय थरथरु लागले. फोनवर त्याला ताबडतोब हॉस्पिटल मधे यायला सांगितले होते. कारण विचारले तर काहीच सांगितले नव्हते.
घाई घाईत तो हॉस्पिटल मध्ये पोहचला. स्पेशल रुम वॉर्डकडे धावला. आत पाहिले असता आत मधे शुद्धीवर आलेल्या आणि त्याच्याकडे पाहणार्या अनुराला पाहून त्याला खुप बरे वाटले. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. अर्णव आणि अनुरा दोघांचेही डोळे पाणावले. त्याने सरळ जावून तीला मिठीत घेतले.
काही वेळ गेल्यावर अर्णव म्हणाला कुलकर्णी आता बरे वाटते आहे का?
अनुराने हलकेच हो म्हटले. तसे अर्णव म्हणाला, कुलकर्णी, आपण कधी बोललो नाही आधी. आपल्या भावना आपण नजरेने, आपल्या कृतीने आपण दाखवत होतोच. पण आज बोलण्याची वेळ आली आहे.
अनुराने हलकेच कशा बद्दल म्हणतोयस असे विचारले.
अर्णव म्हणाला, कुलकर्णी पुढच्या महिन्यात आमच्या गावच्या ग्रामदेवतेचा पालखी सोहळा होणार आहे. यावर्षी पालखीचा मान इनामदारांकडे आहे.
त्याचे आता इथे या वेळी काय? असे अनुराने विचारले
अर्णव पुढे म्हणाला अगं ती खुप मोठी गोष्ट आहे. अन तूला माहिती आहे का? की इनामदारांकडे अशी पद्धत आहे की पालखी पुजेचा मान नवीन लग्न झालेल्या जोडप्याला मिळतो.
अनुरा अजूनच कन्फ्युज झाली. तीच्या चेहर्यावरचे प्रश्नचिन्ह पाहून अर्णव हसला आणि म्हणाला
या वर्षीच्या पुजेला बसण्याची माझी खुप इच्छा आहे. तुला आवडेल माझ्यासोबत पुजेला बसायला?
अनुराला जरा हे कळायला थोडा वेळ लागला पण समजल्यावर ती म्हणाली… म्हणजे… म्हणजे तू मला?
अर्णव मधेच म्हणाला येस्स कुलकर्णी आय एम प्रपोजींग यू टू बी इनामदार. वील यू?
हसत हसत मानेनेच होकार देत अनुरा अर्णवच्या कुशीत शिरली.
आता एक कुलकर्णी लवकरच इनामदार होणार होती. अव्यक्त भावना आज व्यक्त झाल्या होत्या आणि साश्रू नयनांनी अर्णव आणि अनुरा आज एकमेकांच्या मिठीत सुखावले होते.
सीटी हॉस्पिटलच्या स्पेशल वॉर्ड मधील रुम नंबर १०१ मधे आज काही वेगळाच नूर होता. बर्याच दिवसांपासूनचे टेन्शन आता कमी झाले होते. अनुरा आणि अर्णव आता मनमोकळेपणाने प्रेमवर्षावात न्हाऊन निघत होते.
खरंखुरं प्रेम..
लेखिका- मानसी गांगल
आज ते प्रथमच भेटणार होते एकमेकांना… त्यांची फोन फ्रेंडशिप होती..
भेटले फेबु वर.. पण मगं कायप्पा कधी video कॉल आणि सतत सुरु असलेले ऑडिओ कॉल्स…
उसंतच नव्हती.. आणि होती ही..
जरा हटके प्रेम.. तिला तिचं आयुष्य.
त्याला त्याचं..
कॉमन काहीच नव्हतं त्यांच्यात तरी ही गट्टी..
घट्ट बंध.. आणि नात्याची उबदार वीण…
तिचं अन त्याचं मन जडलं होतं एकमेकांवर पण कधीच सांगत नव्हते ते..
कारण हे प्रेम तसं प्रॅक्टिकल होतं .
नाही ना आपण जबाबदारी घेऊ शकत एकमेकांची.. मग LBW (लांबून बरं वाटतंय 😉)
पण असं तरी किती दिवस चालणार .?
शेवटी मनाची ओढ तनापर्यंत येऊन थांबली…
भेटावं एकदातरी..असं दोघांनाही वाटून गेलं .
मग दिवस ठरला.. वेळ… ही काय बरं ठरवावी…
दोघांना संगीताची आवड… मग सकाळ नको नी संध्याकाळ ही ..
आयुष्याच्या माध्यान्ही ला भेटलोय तर एकमेकांसमोर ही कलत्या उन्हांमध्ये येऊ .. वेगळीच कल्पना…
त्यात ही हे भन्नाट की ती त्याला पिक अप करेल..
समाज मनाच्या सगळ्या रूढी, परंपरांना छेद देत…
ते दुपारी 2 ला भेटणार होते.. ते ही एका देवळाबाहेरच्या पारावर..
सगळे जीव दोन वितांची खळगी भरण्यात गुंतलेले असतील.. तेव्हा त्या शांततेतं तिथं पारावर कुणीच येतं नाहीं.. म्हणून…
लंच डेट, डिनर डेट इतकंच काय ब्रंच डेट पण नाहीं…
दुपारची अशी वेळ … जेव्हा घरून आणलेली थंड पाण्याची बाटली घेऊन भेटायचं… बास्स इतकंच…
फोनाफोनी झाली… आणि तो वाट पाहात हॉल मधे येऊन बसला..
आता ती आली की निघायचं…
आज त्यानं राजस्थानी कलमकारी प्रिंट चा विटकरी लाल रंगाचा शर्ट घातला होता… आणि बेज रंगाची कॉटन ट्राऊजर..
सुरेख पफ काढत मागे वळवलेले केस..
आणि खुरटी दाढी.. गोर्या गालांवर ती दाढीतल्या केसांची रंगपंचमी त्याला अगदीच उमदा दिसायला मदत करत होती.
किती ही शांत राहण्याचा प्रयत्न केला तरी तिला प्रत्यक्ष समोर भेटणं हा वेगळाच फील होता..
तिनं आल्याची वर्दी मिस कॉल नी दिली…
त्यानं पुन्हा कॉल केला… ये ना घरी…. मी तयार आहे..
तिनं नम्रपणे नकार दिला… चल…लवकर इतकाच मेसेज आला
तो ही घर बंद करून खाली आला.
ती तिच्या कार मधून उतरली…
तिनं टिपिकल लाल रंगाची काळ्या काठाची इरकल नेसली होती…
त्यावर मॅचिंग लाल खडे असणारी चांदीची डिझायनर नथ, गळ्यात साज आणि कानात नथीला मॅचिंग टॉप्स.. तिच्या सावळ्या तनुवर हे खूपच शोभून दिसत होतं..
अगदी सामान्य चेहेऱ्याची तरी गोडवा.. एक ओठांवर मिश्किल हसू
नजरेत एक आकर्षण..
आणि स्लिव्हलेस ब्लाउज घातल्यामुळे अधिकच उठून दिसणारा नेत्रसुख बांधा…
तर अशी ही जोडगोळी निघाली..
तासभर प्रवास करून मग येणार होतं ते ठिकाण..
आता गाडीत बसल्यावर तिची सीटबेल्ट लावायची लकब, गाडी सफाईदार पणे, चार बोटांनी स्टेअरिंग वळवत, डाव्या हातानी प्ले लिस्ट मधून नेमकं त्याच्या आवडतं गाणं लावणं.. नजरेच्या कोनातून तो सुखावलाय हे पाहणं.. आणि मग पुन्हा एकदा बोटांनी ताल धरत, मिश्किल हसत गाणं गुणगुणण.. हे सगळंच गोड होतं..
ट्विस्ट तिथे आला जेव्हा तिनं एका उडत्या चालीच्या गाण्यावर तर्जनी आणि करांगुली ओठांत धरत खणखणीत शिट्टी वाजवली…आणि त्यानं चमकून पाहिलं..
आणि तिनं त्याच्याकडे पाहताच डावा डोळा मारला..
गाडी चालवताना ही अधेमधे येणाऱ्या प्रत्येकाला तिनं काका मामा बनवून टाकलं…
आणि चुकलंच एखादं बेणं तर मान बाहेर काढून… चांगभलं… अशी आरोळी 😜 ही दिली…
एकंदर ती आणि तो प्रत्यक्ष आयुष्यात किती वेगळे आहेत याचा पदोपदी प्रत्यय येतं होता…
मग ते ठरल्या जागी पोचले.. पार उंच होता.. आणि तो सहज चढून बसू शकत होता… तो तिला अलगद कमरेतून उचलून ही बसवू शकत होता पण त्याला आता ती काय करते? याची उत्सुकता लागून राहिली होती..
तिनं त्याच्याकडे पाहिलं .. आणि चक्क त्याला गुडघा टेकवून बस म्हणाली मग निवांत पणे पायातली उंच टाचेची चप्पल काढून टाकली आणि एका हातानं त्याचा खांदा दाबत ती त्याच्या गुडघ्यावर पाय देऊन चढून बसली पारावर… मग मागे सरकत ती साडी सावरत चक्क मांडी घालून बसली.. तो उठून बाजूला बसला.. तसं अलगद त्याच्या मांडीवरून हात फिरवत धूळ पुसली ..
त्याच्या डोळ्यात तिच्याबद्दल चं आकर्षण वाढू लागलं..
तिनं तिच्या खांद्याला लावलेल्या शबनम मधून … एक पाण्याची बाटली काढली.. आणि त्याला देत म्हणाली…
आधी हे थंड घे आणि मग निवांत गप्पा मारू चालेल नं…?
त्यानं ही मागे सरकत झाडाच्या बुंध्याला टेकत… पाणी घेतल आणि बाटली पुन्हा तिला दिली..
बोल… तो त्याच्या करारी आणि सेक्सी आवाजात म्हणाला..
मी काय रेडिओ मिरची आहे? तु बोल म्हणल्यावर लगेच बोलायला… तिनं नकटं नाक उडवलं..
बरं… मी बोलतो…
ह्म्म्म good बॉय म्हणत ती स्वतःच्या उपड्या तळव्यावर हनुवटी टेकत म्हणाली…
ऐक… मी तुला स्टॉक करु लागलो ते तुझ्या एका कथेमुळे, त्यातली ती नायिका किती बिन्धास रंगवली होतीस तु ..
बेस्ट combo..
आजची आधुनिक आणि पारंपरिक या दोन्ही विचारांची सांगड घालणारी..
मग तुझे फोटो पाहीले…
अचानक तुझी फ्रेंड request आली ती ही क्षणांत स्वीकारली आणि मग नं चुकता तुझं लिखाण वाचू लागलो..
कविता माझा प्रांत… कथा तुझा.. मग नंतर जेव्हा पहिल्यांदा आवाज ऐकला .. हसणं ऐकलं तेव्हा त्या आवाजाच्या, हसण्याच्या प्रेमात पडलो…
तुझ्या मोकळेपणानें मारलेल्या गप्पा आणि त्यात ही अय्या, इश्श्य, अगोबाई ह्या शब्दांची पेरणी.. आवडून गेली…
कधी कधी तुझा रुसवा, अबोला ही आंनदाने जगलो…
पण माझ्यापोटी तुझा सात्विक संताप उफाळून येणं ही आवडू लागलं..
कधीतरी तु पझेसिव्ह होण ही… जाम आवडतं होतं…
तर ही अशी तु मला भावलेली.. आणि आज प्रत्यक्षात पाहिलं आणि माझी विकेटच पडलीये… 😜😘
तिनं शांतपणे मगाचच्या शबनम मधून लायटर आणि सिगारेट काढली… ती त्याला ऑफर केली आणि त्याचा नकार येताच… खुणेनं मी ओढू नं? असं विचारत .. शिलगावली…
आश्चर्य नक्कीच वाटलं पण तो काहीच बोलला नाहीं ..
तिनं दूरवर शून्यात नजर लावली… आणि मगं त्याच्याकडे पाहत म्हणाली… मी wine टेस्टर आहे… आणि आवडतो माझा जॉब मला…
जगातल्या उत्तमोत्तम प्रतीची दारू चाखायला आवडते मला..
जितक्या श्रद्धेनं एखाद्या देवळात जाऊन मी हात जोडीन तितक्याच शिद्दत नी पब मधे थिरकायला आवडतं मला..
माणसं वाचायला आवडतात पण त्यांना जज करायला किंवा त्यांना पुरतं जाणून घ्यायला नाहीं आवडतं ..
एकदा माणूस कळला की इंटरेस्ट संपतो माझा ..
स्मोकिंग मी आनंदासाठी करते,
आणि वेगवेगळे रंगीबेरंगी कपडे घालायला आवडतात मला… आता साडी तर पुढच्या क्षणी शॉर्ट्स वर चेंज व्हायला आवडतं मला…
मुळात बंधन आवडतं नाहीं मला माझ्या व्यक्ती स्वातंत्र्यावर
आणि तुझ्या बाबतीत म्हणशील तर..
मी तुझ्या कविता वाचून प्रेमात पडले तुझ्या…
मग तुझ्या आवाजतली जादू माझ्या कानातून मनात मेंदूत उतरली… मग तुझा फोटो पाहीला.. चिकणा आहेस hott आहेस 😜
अशी दिलखुलास दाद ही दिली होती ..
आणि आज तुला पाहिलं.. तुझ्या सोबत… बिन कुछ कहें..इथवर आले ..
प्रेमात पडलीये असलं काहीतरी घिसापीटा डायलॉग नाही मारणार…
कारण आता मी सतत प्रेमात जगतीये तुझ्या..
भास आभास या खेळातला सवंगडी आहेस तु…
एकटेपणा जाणवतो… पण आता नाही… असतोस तु आता बाजूला त्या हर एक एकट्या क्षणातही…
कधी अलगद नीज आली तर टेकलेल्या मानेमागे तुझ्या तळव्याचा स्पर्श जाणवतो… पुन्हा जाग येते आणि मी अनुभवते तुला…
कधी कामामुळे किंवा तिऱ्हाईत व्यक्तिमुळे चिडचिड झाली तर.. पाण्याची बाटली समोर धरणारा तु दिसतोस .
आनंदाच्या प्रत्येका क्षणांत शेजारी बसून टाळी देणारा . दिलखुलास हसणारा तु दिसतोस ..
अगदि आत्ता लेटेस्ट मी एका ठिकाणी मी कुणाची तरी वाट पाहत होते.. रात्रीची वेळ .. आणि अचानक ब्लॅकआऊट….
सगळीकडे तिमिर राज्य…
इतरवेळी मी घाबरून गेले असते कारण मला फोबिया आहे अंधाराचा… पण त्या क्षणी तु घट्ट जवळ घेतल्याचा भास झाला.. आणि क्षणांत लाईट आले….
तुला पुन्हा एकदा अनुभवलं..
तु आजकाल माझ्या कामातही सोबत करतोस
जशी टेस्टबड्स ना स्पर्शून जशी wine अलगद गळ्यातून पोटापर्यंत जात एक उष्ण प्रवास करते… तिचं अस्तित्व राखून असते… तसा तु आहेस… झाकोळला नं जाणारा..
आणि उगाचच नं झळाळणारा… या माध्यान्हीच्या उन्हा सारखा.. ऊबदार पण तप्त नाही…ज्याच्या स्पर्शानं नकळत ग्लानी यावी असा.. आणि तरीही भान असावं असा…
तिचं बोलणं संपलं आणि तो पारावरून खाली उतरला…
तिच्याशी नं बोलताच उठून तरातरा चालत गेला..
आणि आला परत… तिच्यासाठी जाईचा गजरा आणला..तिनं त्याला परत दिला…
नाहीं आवडला? त्याला प्रश्न पडला..
अहो… माळायचा असतो तो… स्वतःच्या हातांनी… असा ओटीत घालायचा नसतो 😜🤣
ती ही डोळे मिचकावत म्हणाली..
तिला गजरा माळला आणि अलगद कानाशी पुटपुटला .
मला असा गजरा रोज माळायचाय आणि रात्री त्या कळ्या माझ्या अंगभर फुलवायच्या आहेत…. माझी बायको होशील?
तिनं मागे वळून पाहिलं आणि त्याच्या कानाशी येऊन म्हणाली… नुसतं गजरा नाहीं माझी सिगरेट आणि wine याचाही सुगंध दरवळेल… तो चालेल का? 😜
हॊ… आवडेल😍…
म्हणत तिच्या हातात हात गुंफले…….
खरंतर किती सोप्प वाटतंय ना…
पण खरंच कधीतरी आपल्या आवडत्या व्यक्तीला असं खरंखुरं भेटा… जसे आहात तसें…
मृत्यूगोल
लेखक- उमेश पटवर्धन
रात्रीचे दोन वाजून गेले होते. अखेर मी आमच्या सर्कसचे नवे ठिकाण शोधून काढले होते. गावाबाहेरच्या त्या मोठ्या मैदानावर आमच्या सर्कसचे तंबू आतल्या सर्व सामानासकट आणि सर्व कलाकार, तंत्रज्ञांसकट गाढ झोपी गेले होते. अमावास्येला दोनच दिवस बाकी असताना त्या मिट्ट अंधारात ते छोटे-मोठे तंबू वाळवंटातल्या रेतीच्या चित्रविचित्र आकाराच्या टेकड्यांप्रमाणे गूढ भासत होते. रात्रीचा शो संपून प्रेक्षक घरी निघून जाईपर्यंत बारा-सव्वाबारा आणि कलाकारांना जेवून पाठ टेकेपर्यंत एक वाजला असणार नेहमीप्रमाणे. आजचा शो खासच रंगला होता. आमची रिगल सर्कस होतीच प्रसिद्ध – वेगवेगळ्या चित्तथरारक खेळांसाठी आणि एकसे एक सरस कलाकारांसाठी. प्राण्यांच्या सर्कशीतल्या वापरावर बंदी आल्यावरही ज्या थोड्या सर्कस टिकून राहिल्या त्यात आमची एक होती. त्यामुळे आजचाही शो रंगला, शिट्ट्या, टाळया यांनी मुख्य तंबू दणाणून गेला यात नवल नव्हते. मी स्टेजच्या बाजूला बसून सर्व पाहिले आणि माझ्या डोळ्यासमोर पूर्वीचे प्रसंग नाचू लागले..
“राजा-पाशाची जोडी म्हणजे एक नंबर, इतके शोज केले पण कधी किंचितही कुठे चूक नाही..‘
“मृत्यूगोलात अशी काही मोटारसायकल फिरवतात की जणू मोकळ्या रस्त्यावर दोन मित्रांची रेस लागली आहे..”
“राजा-पाशा दर खेळात जणू हसत मृत्यूगोलात मृत्यूला सामोरं जातात आणि हसत हसतच मृत्यूला चकवा देऊन बाहेर येतात..”
शब्द कदाचित वेगळे असतील प्रत्येक वेळी, पण असं कौतुक मी आणि पाशाने अभिमानाने झेललं – कित्येक वर्षे…आणि आजही ते कौतुक होतंच की – प्रेक्षकांच्या नजरेत आणि आमच्या टीमच्या नजरेत.. ते मी केवळ बघू शकलो पण ते झेललं आणि मिरवलं ते पाशाने आणि कोण्या एका नव्या कलाकाराने.. माझ्या हृदयात परत एक कळ आली..
नकळतपणे मी चालत चालत मुख्य तंबूत आलो आणि पावलं आपोआप मृत्यूगोलाकडे वळली. कित्येक वर्षे जे माझं कार्यक्षेत्र बनून राहिलं होतं त्या मृत्यूगोलाकडे जाताना कित्येक जुने प्रसंग डोळ्यासमोर तरळले..पण आता.. आता सगळंच नुसतं लांबून पहायचं..
तेवढ्यात काहीतरी खुडखुड आवाज झाला आणि मी मृत्यूगोलाच्या मागच्या बाजूला आलो..आणि तिथे.. तिथे ती होती..चंदा ! माझी चंदा.. ती खाली गुढग्यावर बसून काहीतरी करीत होती..पाठमोरी असली तरी मी तिला त्या एकुलत्या एका मिणमिणत्या दिव्याच्या उजेडातही पटकन ओळखले.. छोट्या चणीची, टपोऱ्या डोळ्यांची आणि कुरळ्या केसांची माझी चंदा.. पण ती इथे, इतक्या रात्री काय करत होती?
“चंदा..” भरभर तिच्या जवळ जाऊन मी तिला हलकेच हाक मारली. तिने केवळ मान वळवून माझ्याकडे एकटक पाहिले आणि ती मंद हसली – अगदी तिच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे. तिला मी तिथे बघून काहीच आश्चर्य वाटले नव्हते? आणि एकदम मला जाणवले की मी तिला दिसत होतो.. माझा आवाज तिला ऐकू येत होता !
“चंदा..मी..तुझा राजा ! तुला मी दिसतो आहे?”
यावर ती फक्त मंद हसली पण यावेळी तिच्या हसण्यात मला ती वेडसर झाक जाणवली.. ज्यामुळे लोक तिला वेडी समजायचे.. अर्थात, मला, माझ्या प्रेमाला लोकांच्या कोणत्याच बोलण्याने फरक पडला नव्हता. तिचे बोलणेही कधीच सरळ नसायचे.. वेगळंच बोलायची ती.. कधी कोड्यात तर कधी गोष्टीरूपात !
“काय करते आहेस?”
“मी ना.. ऐक ना ! एक गम्मत दाखवायची आहे तुला..” मला काहीच समजेना. ती जणू असं भासवत होती की आम्ही ठरवून तिथे भेटतो आहोत. तिचा गूढ, कोडी घालण्याचा स्वभाव बिलकुल बदलला नव्हता.
“हे बघ हां आता गम्मत..” असे म्हणून तिने ती बसली होती तिथली स्टेजची एक फळी उचकटून किंचित वर उचलली. तिथे एक कसलंस हँडल होतं. तिने ते जोर लावून फिरवायला सुरुवात केली आणि मृत्यूगोलाच्या एका कोपऱ्यात कसलातरी आवाज झाला. माझी नजर आपसूकच तिकडे गेली. मृत्यूगोलाच्या त्या भागातली जाळी हळूहळू रुंदावत होती आणि तिथे एक मोठी फट पडली. त्या दिवशी मोटरसायकलवरून कोसळताना डोळ्यासमोर पूर्ण अंधार पसरण्यापूर्वी पाहिली होती ती मी.. माझ्या मोटारसायकलचं चाक त्या फटीत रुतलं आणि..
“आहे की नाही गम्मत?” असे म्हणत चंदा जोरजोरात हसत सुटली. मला काहीच समजेना. तिने हँडल विरुद्ध दिशेला फिरवला आणि सगळं पूर्ववत झालं. जणू तिथे कोणतीच फट कधी नव्हती.
चंदा आता उठून माझ्याजवळ आली. तिला पटकन कवेत घ्यावी असा तीव्र विचार माझ्या मनात आला पण इच्छा असूनही आता ते शक्य होणार नव्हतं..
“नाही समजलं? वेडोबा आहेस वेडोबा ! “
लाडात आली की ती मला म्हणायची..‘वेडोबा‘ तो ओळखीचा शब्द ऐकला आणि तिच्यासोबतचे कित्येक प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून तरळून गेले.. चंदाशी ओळख.. पहिल्या नजरेतच ती मला आवडणं..मृत्यूगोलातल्या खेळाचं तिला वाटणारं आकर्षण..ते लक्षात आल्यावर शो संपल्यावर फक्त तिच्यासाठी काही स्टंट करुन दाखवणं आणि मग तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारं कोतुक बघत बसणं.. आणि मग ओळख वाढल्यावर कोणी पहात नसताना एकदा तिला स्टेजच्या मागे नेऊन..
“नाही कळली ना आमची गम्मत तुला? जाऊ दे बाबा.. असाच आहेस तू! बरं तुला एक गोष्ट सांगते.. राजाराणीची..” चंदा ने माझी विचारशृंखला तोडली.
“एका सर्कशीत एक असतो राजा आणि एक असते राणी, राजा एकदम शूर, धाडसी आणि मर्दानी आणि राणी कुरळ्या केसांची पण त्याच्यापुढे अगदीच छोटीशी..जणू एक परी..” चंदा आता तिच्या गोष्टीत हरवली होती.. तिचे स्वप्नाळू डोळे जणू दूरवरच्या कोणत्यातरी अज्ञात प्रदेशाचा वेध घेत होते.. जणू ती सांगत असलेल्या गोष्टीची नायिका ती होतीही आणि नव्हतीही..
“पुढे काय झालं माहित्यिये? त्या दोघांचं प्रेम त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या राजाच्या साथीदाराला बघवलं नाही.. त्याने राजाशी दगाफटका केला आणि राजाचा काटा काढला.. आता त्याला वाटलं राणी त्याचीच..पण.. पण ती बधली नाही. मग त्याने तिच्यावर बळजबरीने प्रेम करायचा प्रयत्न केला.. एकदा नाही.. खूप वेळा.. राणीला खूप दुखलं..खूप वाईट्ट वागला रे तो राणीशी..” बोलता बोलता चंदाचा गळा भरुन आला.. तिला पुढे काही बोलताच आलं नाही..तिच्या टपोऱ्या डोळ्यांतून अश्रू घळाघळा वाहू लागले.
ते सगळं ऐकून मी स्तंभित झालो. मला ते सगळं सगळं कळलं. माझ्या राणीचं दुःख माझ्याही हृदयातून वाहू लागलं… नकळत माझेही डोळे भरुन आले..तिला जवळ घेण्यासाठी मी पुढे झालो पण ती मागे सरकली.. बहुधा मी तिला स्पर्श करु शकणार नाही हे तिलाही कळून चुकलं होतं.
“पुढं काय झालं माहित्यिये? राणी सुटली.. त्याच्या हातातून.. कायमची सुटली.. आता ती कोणाच्याच बंधनात नाही.. ती आता मुक्त झाली आहे..तुझ्यासारखी.”
चंदाचे गूढ काही सांगणारे डोळे आता माझ्यावर रोखले गेले होते.. मला सगळं समजत होतं.. आणि नव्हतंही..म्हणजे हे सगळं एकदम पचवायला जड जात होतं.
चंदा परत बोलू लागली..यावेळी तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले होते. ते गूढ हास्य आता नाहीसं झालं होतं आणि तिथे आता एक भेसूर हास्य दिसू लागलं. जे मी कधीच तिच्या चेहऱ्यावर पाहिलं नव्हतं.
“ती राणी आता काय करणार आहे माहित्यिये? ज्याने राजाराणीचा छळ केला आणि त्यांना आयुष्यातून उठवलं त्याला जगण्याचा अधिकार नाही. उद्याचा शो त्याच्यासाठी शेवटचा असेल.. तो तशीच मौत मरेल जी त्याने राजाला दिली..आणि मग राजा राणी दोघेही पूर्णपणे मुक्त होतील.. होतील ना?”चंदाची गोष्ट पूर्ण झाली आणि ती एकटक माझ्याकडे पाहू लागली. आता तिच्या डोळ्यात होतं फक्त प्रेम.. फक्त माझ्याच वाट्याला येऊ शकणारं प्रेम ! “होतील..” मी पुटपुटलो आणि नकळत मान हलवली आणि उद्याच्या शो ची वाट पाहू लागलो. उद्या मृत्यूगोलात एक वर्तुळ पूर्ण होणार होतं.
बंदे भी हो गये है खुदा तेरे शहर में
लेखिका- प्राजक्ता काणेगावकर
राजस दुकानाच्या पायऱ्या उतरून खाली आला. खिशातले कामसूत्राचे पाकीट त्याने चाचपून बघितले. आज बऱ्याच दिवसांनी सेटिंग लावून त्याला चान्स मिळाला होता. तसे त्याचे काम त्याला अनेक लोकांच्या घरात घेऊन जाणारे होतेच. पण बेडरूमपर्यंतची एन्ट्रीही त्याला बरीच सहज होती. एका प्रोफेशनल बॉडी ट्रेनरला इकडे तिकडे हात लावू द्यायला कोण कसे नाही म्हणेल? नाही म्हणायला राजस पहिले काही महिने एकदम सांभाळून असे. सुरुवातीला तरी तो काहीच त्याच्याकडून हलचाल करत नसे. क्लाएंट कोण आहे, कशी आहे तिच्या घरचे कसे आहेत याचा पूर्ण अंदाज आल्याशिवाय तो कधीही पाऊल पुढे टाकत नसे. वल्लरीच्या बाबतीतही त्याने हेच धोरण ठेवले होते. वल्लरीला ट्रेनर हवा आहे हे तिच्या मैत्रिणीने जस्मिनने त्याला सांगितले होते.जस्मिनकडे तो ट्रेनर म्हणून अजवळपास वर्ष दोन वर्ष जात होता. जस्मिनवर त्याने ट्राय मारला नव्हता असे नाही. पण जस्मिन हुशार निघाली होती. तिने त्याला बरोबर एक हात लांब ठेवले होते. शेवटी तू मेरी बहन जैसी है म्हणून राजस ने ती केस मिटवली होती. जस्मिनला त्याचा फारसा अंदाज नव्हता. एकदा दोनदा त्याचा इकडे तिकडे हात लागलेला तिला कळला होता नाही असे नाही. पण चुकून झाले असेल म्हणून तिने सोडून दिले होते. राजस जेव्हा तिला बहन वगैरे म्हणाला तेव्हा तिने मनातून शंका काढून टाकल्या सगळ्या. त्याला क्लाएंट मिळवून देणे तिच्यासाठी त्याला मदत करणे होते. राजसला वास्तविक तिच्या मदतीची अजिबात गरज नव्हती. एकंदरीतच त्याचे पर्सनल ट्रेनिंग आणि त्या आडून चालणाऱ्या उद्योगांमुळे छान चालू होते.
अशाच एका ट्रेनिंगच्या वेळी वल्लरी जस्मीनकडे आली होती. राजस शॉर्ट्स आणि स्लिव्हलेस टी शर्ट मध्ये जस्मिनच्या मागे उभा होता. त्याने तिला मागून धरले होते. जस्मिनवरून नजर काढून वल्लरीने राजसकडे बघितले. राजसचे तिच्याकडे लक्षही नव्हते. तिने सावकाश त्याच्यावरून नजर फिरवली आणि मग त्याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून तिने जस्मिनशी बोलायला सुरुवात केली. राजसच्याही ते लक्षात आले. “इतका नखरा!! भेट एकदा मग दाखवतो” त्याच्या मनात आले. त्याने एक नजर वल्लरीकडे टाकली आणि चेंज करायला म्हणून तो आत गेला. जस्मिनने वल्लरीला ओढून सोफ्यावर शेजारी बसवले.
“क्या रे? है किधर तू? कितने दिनो बाद आई मिलने” तिने वल्लरीवर माराच केला.
“हां हां बताती हू. एक कप चाय तो पिला”
जस्मिन उठली. वल्लरीही तिच्यामागून उठलीच. वॉशरूम जाके आती हू असे ओरडून ती स्पेअर बेडरूम मध्ये शिरली. तिच्या अपेक्षेप्रमाणे राजस तिथे चेन्जच करत होता. लोटलेले दार ढकलून वल्लरी आत शिरली. राजस मागे वळला. मागे वल्लरीला उभे पाहून त्याला फारसे आश्चर्य वाटले नाही. वल्लरी मात्र त्याच्याकडे बघतच राहिली. तिच्या धीट नजरेकडे बघत राजस तिच्याकडे सरकला. वल्लरी जागेवरच खिळून उभी होती. तो अलगद तिच्या जवळ जाऊन उभा राहिला. तिचा श्वास चढला. त्याने मात्र तिला लगटून वळसा घातला आणि बॅग उचलली. त्याच्या स्पर्शाच्या अपेक्षेने उभ्या असलेल्या वल्लरीला दोन मिनिट काय झाले ते कळलेच नाही.
“मॅडम तुमची हरकत नसेल तर मी कपडे घालू का?’ त्याने तिच्याकडे रोखून बघत विचारले.
वल्लरीचा चेहरा लाल झाला.
“बाय ऑल मीन्स. मी अडवले नाहीये तुम्हाला” ती सरकलीच.
राजस हसला. त्याने पटकन बॅग मधून टी शर्ट काढून घातला आणि तिच्याकडे हसून बघत तो रूमच्या बाहेर पडला.
त्याला ट्रेनर म्हणून वल्लरीने बोलावणे अपेक्षित होतेच. फक्त त्याच्या अपेक्षेपेक्षा ते जरा उशिरा घडले. जस्मिनकडे झालेल्या त्या भेटीनंतर त्याला फारतर पुढच्या महिन्यात बोलावणे येईल अशी अपेक्षा होती. पण वल्लरीकडून काहीच निरोप आला नाही. दोन महिने गेल्यावर राजसनेही नाद सोडून दिला.
“राजू सुन रे” जस्मिनचा परिचित आवाज कानावर पडला. राजसने फोन कान आणि मानेच्या मध्ये धरला.
“बोल बेहना” त्याने ठेवणीतला आवाज काढला.
“वो मेरी फ्रेंड है ना रे, वल्लरी. उसको तुझसे मिलनेका है”
“क्यू रे?” राजसने कळून न कळल्यासारखे दाखवले
“अरे उसको ट्रेनर हायर करनेका है. उसने मुझसे बोला तुम्हे पूछने को. तू करेगा क्या? मेरी बहोत अच्छी फ्रेंड है. मैने उसको बोला तेरा शेड्यूल मालूम नही मुझे करके. सोचा पहले तेरेसे बात कर लू”
“अरे तेरे लिये करेगा रे अड्जस्ट मै. तू बोल उसको” राजसने फोन सरळ धरत गोड आवाजात सांगितले.
“ठीक है. फिर मै उसको नंबर देती हू तेरा. बात कर लेना. और परसो घर पे आयेगा ना तो तेरे लिये तेरा फेवरीट पास्ता बनाती हू”
“अरे फिर तो मै जल्दी आऊंगा” राजसने हसून फोन ठेवला.
अर्ध्या तासात वल्लरीचा फोन आला. वेळ आणि दिवस ठरवल्याप्रमाणे राजस तिच्या घरी पोचला. वल्लरीचे घर शहराच्या पॉश उपनगरात होते. राजसने त्याच्या कामाच्या निमित्ताने अशी घरे पाह्यलेली असली तरी त्यालाही तिच्या श्रीमंतीचा अंदाज आला नव्हता. बाहेरून बंदिस्त पेटीसारख्या दिसणाऱ्या आणि आतून अतिप्रचंड असणाऱ्या रो हाऊसेसची सोसायटी बघून राजस जरा दडपलाच. गेटवर एंट्री करताना त्याने सहज आत नजर टाकली. सोसायटीच्या मधोमध एक सुसज्ज जिम आणि स्विमिंग पूल दिसत होता. आणि तरीही बाहेरून आत बघणाऱ्या माणसाच्या नजरेला तो आडच होता. इकडेतिकडे बघत राजस वल्लरीच्या बंगल्यापाशी पोचला. त्याने बेल दाबली. वल्लरीने स्वतः दार उघडले. हॉट पँट्स आणि गंजी घातलेली वल्लरी त्याच्याकडे बघून गोड हसली.
“ये ना. आत ये” तिने त्याला आत बोलावले. हॉल मधल्या प्रशस्त गुबगुबीत सोफ्यावर राजस आरामात बसला.
“काय घेणार?” तिने त्याच्याकडे रोखून बघत विचारले.
“एक ग्लास पाणी” राजस काहीच न लक्षात आल्यासारखा चेहरा करून म्हणाला.
वल्लरी हसली.आत जाऊन ती एक पाण्याची बाटली आणि ग्लास घेऊन आली. राजसने पाणी पिऊन ग्लास सेंटर टेबलवर ठेवला.
“मला जस्मिन मॅमचा निरोप मिळाला”
“हो मीच सांगितले होते तिला तुम्हाला विचारायला”
“प्लीज मला अहो जाहो करू नका.”
“ओके. मग तूही मला अगंच म्हण. चालेल?”
“चालेल. तुला व्यायाम का सुरु करायचा आहे?”
“फिटनेस साठी.” वल्लरी पटकन म्हणाली. “तसेही मी फार जाड नाहीये अरे. तुला माझ्याकडे बघून कळलेच असेल म्हणा” तिने त्याच्याकडे थेट बघितले
“नाही पण अजून शेपमध्ये आलीस तर जास्त छान दिसशील” राजसने तिची नजर तोलली.
वल्लरीने नजर झुकवली नाही. काही क्षण गेल्यावर तिने मान हलवली.
“कधी सुरु करूया?”
“नेक्स्ट वीक. मी प्लॅन करतो तुझ्यासाठी आधी” राजस उठला,
“अरे थांब चहा कॉफी घे काहीतरी”
“नको मी चहा कॉफी घेत नाही. आणि तसेही मला क्लाएंट कडे पोचायचे आहे काही वेळात, येतो मी. प्लॅन झाला की व्हॉटसॅप करतो”
वल्लरी उठली. त्याला लगटून पुढे जात तिने दरवाजा उघडला.
“भेटूया”
तिला ओलांडून दाराजवळ जाताना राजसचा हात तिच्या अंगाला घासला.
“आय एम सॉरी” अजिबात सॉरी वाटत नसतानाही त्याने अपराधी चेहरा केला.
“इट्स ओके.” वल्लरी हसून म्हणाली.
बाहेर गाडीपाशी येऊन राजसने स्वतःला पाच दहा मिनिटे दिली शांत व्हायला. असले तापलेपण घेऊन क्लाएंटकडे जायला परवडले नसते त्याला.
वल्लरीचे कोचिंग सुरु होऊन आता सहा महिने झाले होते. एव्हाना ती एव्हढ्या मोठ्या बंगल्यात एकटीच असते, नवरा महेश कामानिमित्ताने सतत बाहेर असतो इत्यादी तपशील राजसला कळले होते. सहा महिन्यात त्याने त्याच्याकडून काही हालचाल केली नव्हती. पहिल्या दिवशी चुकून झालेल्या स्पर्शाव्यतिरिक्त त्याने तिला वावगा स्पर्श केला नव्हता. वल्लरीनेही तिच्याकडून शांतता राखली होती. आज मात्र काम होणार याची त्याला खात्री होती.म्हणूनच काँडोमचे पाकीट ट्रॅकपँटच्या खिशात सरकवताना त्याचा चेहरा फुलला होता.
गाडीला किक मारून तो वल्लरीकडे पोचला. गेला महिनाभर वल्लरीकडून त्याला सिग्नल्स मिळत होते. त्याच्या हातावर मुद्दाम हात ठेवणे, त्याच्याकडे नीट न्याहाळून बघणे हे जोमात सुरु झाले होते. राजसला या प्रकारांची सवय असली तरी वल्लरीने फारच वेळ घेतला होता त्याच्या मते. तिच्या बंगल्याच्या एका कोपऱ्यात तिने जिम रूम तयार केलेली होती. एक भिंत तर पूर्ण आरसाच होती. तिच्या मागे उभे राहून वेट्स साठी सपोर्ट देताना तिची नजर भरकटतेय हे त्याला जाणवले होते. आज आर या पार तुकडा पाडायचाच अशा इराद्याने त्याने तिच्या घराची बेल वाजवली.
वल्लरीने दार उघडले. आज ती जिम शॉर्ट्स आणि खोल गळ्याच्या गंजीमध्ये भलतीच सेक्सी दिसत होती. राजसने तिच्याकडे वरपासून खालपर्यंत एक सावकाश रेंगाळती नजर टाकली. आत शिरून तो थेट जिमरूमकडे चालू लागला. वल्लरी त्याच्या मागोमाग रूम मध्ये आली.
“सुरु करूया?” त्याने हात ताणत विचारले. वल्लरी त्याच्या जवळ आली. तिने त्याच्या बोटात बोटे गुंतवली. त्याच्यापासून श्वासाच्या अंतरावर उभे राहून तिने त्याच्याकडे रोखून बघितले
“कर ना सुरु” ती कमालीच्या मादक आवाजात त्याच्या कानात कुजबुजली.
राजसला त्याला हवा असलेला इशारा समजला. त्याने तिला धसमुसळेपणाने जवळ ओढले आणि तिच्या ओठावर ओठ टेकले. बेभान होत त्याने रूमचा दरवाजा लोटला आणि तिथेच व्हिनाईल फ्लोअरवर त्याने तिला आडवे केले. अर्धा एक तास तिचा मनसोक्त चोळामोळा करून तो उठला. वल्लरी त्याच्याकडे अनिमिष बघत होती. राजस टी शर्ट उचलणार इतक्यात वल्लरीने त्याचा ताबा घेतला. राजस तिच्या हल्ल्याने चमकला. त्याला डिवचत आव्हान देत ती त्याच्यावर तुटून पडली. काही वेळाने थकून शांत झाल्यावर तो कोपरावर उठून बसला.
“वल्लरी माय गॉड तुफानच आहेस तू एक”
“तुला काय वाटले? तूच फक्त ऍग्रेसिव्ह आहेस?” तिने हसून त्याला विचारले
राजस शब्दांनी उत्तर द्यायच्या भानगडीत पडला नाही. बऱ्याच दिवसांनी त्याला कुणीतरी त्याच्या बरोबरीची प्रतिस्पर्धी मिळाली होती.
वल्लरी त्याची वाटच बघत असे. तो येऊन रूममध्ये शिरेपर्यंत तिला दम नसे. राजसला संपूर्ण बंगल्यात प्रवेश होता. फक्त वल्लरीची मास्टर बेडरूम त्याच्या कक्षेबाहेर होती.
एके दिवशी सकाळी राजस वल्लरीजवळ सरकला. तिने त्याला अलगद बाजूला केले.
“महेश घरी आहे” ती पुटपुटली. राजस एकदम सावध झाला. तो तिच्यापासून अंतर ठेवून उभा राहिला. वल्लरीला हसूच आले एकदम.
“कसला डरपोक आहेस रे” तिने कुचकट आवाजात टोमणा मारला. राजसचे रक्तच तापले. तो तिच्या जवळ सरकला. त्याने पंजाने तिचा जबडा पकडला
“वल्लरी मी कुणाच्या बापाला घाबरत नाही काय. तुझ्या जवळ उभा आहे मी. तुला काय वाटले मी तुझ्या नवऱ्याला घाबरतो? तुझी काळजी आहे म्हणून गप्प आहे. जास्त शहाणपणा करू नकोस माझ्याशी” बोलता बोलता त्याचा आवाज खर्जात गेला.
वल्लरीने त्याच्या पंजातून स्वतःला सोडवले. त्याला हाताने मागे सरकवून ती त्याच्या समोर उभी राहिली.
“मला माहित आहे तुला माझी किती काळजी आहे राजस. जास्तीचा शहाणपणा माझ्याशीपण करायचा नाही. तुलाही हे सगळे हवेच असते. तू ट्रेनर असशील पण तू मुळात कसला धंदा करतोस हे मी तुला सांगू नये. तेव्हा तुला माझी काळजी आहे वगैरे नाटके करायची नाहीत. कळले?”
राजस मागे सरकला. त्याने वल्लरीकडे नीटच बघितले आता. तिला एक भडकावून द्यावी असे एक क्षण त्याला वाटून गेले. फार प्रयत्नाने त्याने स्वतःवर ताबा ठेवला.
“वर्क आउट पूर्ण करूया?” त्याने स्वतःवर कंट्रोल ठेवत शांत आवाजात विचारले.
वल्लरी हसली. तिने त्याच्या गालावर थोपटले.
“नाऊ दॅट्स लाईक माय बॉय” ती हळूच त्याच्या कानाशी पुटपुटली.
राजस काही बोलला नाही. दुसऱ्या दिवशीही तो तिच्याशी अंतर ठेऊनच वागत होता. वल्लरीच्या ते लक्षात आले. पण ती त्याची मनधरणी करायच्या भानगडीत पडली नाही. असेच दोन तीन दिवस गेल्यावर मात्र तिला त्याची तहान लागली. त्याच्या येण्याच्या वेळी तिने ठेवणीतला तलम गाऊन काढला. त्याची बटन्स न लावताच तिने त्याच्यासाठी दार उघडले. राजस तिच्याकडे बघतच राह्यला. तिने दार लावून त्याला जवळ ओढलं. राजसचा निग्रह जेमतेम काही मिनिट टिकला. त्याने उचलून तिला मास्टर बेडरूम मध्ये नेले. तासाभराने दोघेही शांत झाले.
“राजा मला माफ कर रे. मी तुला नाही नाही ते बोलले त्या दिवशी. चुकलेच माझे” वल्लरी त्याच्या जवळ सरकत म्हणाली. राजस छताकडे बघत विचार करत होता. त्याने मान वळवून तिच्याकडे बघितले. ती खूप मनापासून बोलत होती. त्याने तिला जवळ ओढले.
“जाऊ दे. जे खरे आहे तेच बोललीस तू”
“नाही रे. प्लीज असे म्हणू नकोस. माझे खरंच चुकले” वल्लरी मनापासून म्हणाली.
राजसने तिच्या डोळ्यातले पाणी ओठांनी टिपले.
“खरंच जाऊ दे विषय तो”
त्याचे ओठ तिच्या खांद्यावरून खाली सरकले तशी वल्लरी उसासली. काही वेळाने तो उठला. ती तशीच थकून डोळे मिटून पडली होती. झोप लागली होती बहुतेक तिला. राजसने ट्रॅकपँटच्या खिशातून मोबाईल काढला. त्याने तिचे फोटो काढले. स्वतःशीच हसत तिच्या अंगावर ब्लॅंकेट सरकवून तो तिथून बाहेर पडला.
दुसऱ्या दिवशी वल्लरी लवकरच उठली. ती राजसची वाटच पाहत होती. आदल्या दिवशीच्या खाणाखुणा तिच्या अंगावर अजून होत्या. त्यांच्याकडे बघून तिला त्याची अजूनच ओढ लागली. मोबाईल वाजला म्हणून तिने नाखुशीनेच फोन उचलला. महेशने तिला तिचे काही फोटो पाठवले होते आणि त्याचबरोबर तो घरी येतोय असा मेसेज. फोटो बघून वल्लरी हादरली. फोटोत ती बेडवर अस्ताव्यस्त पसरली होती. नुकत्याच घडलेल्या संबंधाच्या खुणा तिच्या अंगांगावर स्पष्ट दिसत होत्या.
बेल वाजली. राजस आत आला. वल्लरीने त्याच्याकडे खुनशी नजरेने बघितले. राजस उमजला, त्याने हसून तिला जवळ घेतले. तिने त्याला ढकलायचा प्रयत्न केला.
“वन लास्ट टाइम बेबी” असे म्हणून त्याने तिला उचलले. तिच्याशी मनसोक्त जबरदस्ती खेळून तो तिथून बाहेर पडला.
वल्लरी बेडरूममध्ये सुन्न बसून होती. फोन वाजला. तिने यंत्रवत फोन उचलला
“बेब महेशला फोटो मी पाठवलेत. तुला कळले असेलच एव्हाना. तुझ्यासारख्या शरीराला चटावलेल्या बायांचे असेच होते. मला धंदा करणारा म्हणालीस ना? तू काय केलंस मग? मी धंदा करतो तर तूही गिऱ्हाईकच आहेस. पायरी कुणीच सोडायची नसते. ना तू ना मी. तू सोडलीस म्हणून मला सोडावी लागली. चल बेस्ट ऑफ लक” त्याने फोन खिशात टाकला.
काही दिवसांनी त्याच्या अटकेची बातमी सगळीकडे झळकली. ट्रेनर म्हणून घरात शिरून जबरदस्ती केल्याचे त्याचे फुटेज सापडले होते. राजसचे कॉन्टॅक्ट नंबर्स पॉर्न साईट्सवर सापडले.
वल्लरी त्याच्याकडेच बघत होती कोर्टात. महेश कोर्टरूममध्ये बसून त्याच्याकडे खाऊ का गिळू नजरेने बघत होता. डोळ्यात पाणी आणून, हमसून हमसून वल्लरी कोर्टाला विचारत होती
“माणसावर विश्वास कसा ठेवायचा हो? सांगा ना”
स्वयंपाक करणारे पुरुष
लेखिका- गौरी ब्रह्मे
पुरुषांच्या स्वयंपाकघरातल्या वावराला, स्वयंपाक करण्याला, फोडणी टाकण्याला, परतायला, वाटण करण्याला, भांडी घासण्याला, भारतात ग्लॅमर मिळवून देण्यात शेफ संजीव कपूरचा मोठा वाटा आहे. त्याच्या रेसिपीजबरोबरच त्याचं मधाळ बोलणं सर्वांना आवडून जातं. शेफ तरला दलालचे व्हिडियोजही चांगले असतात, रेसिपी, प्रमाण व्यवस्थित सांगणारे. गेल्या चारपाच वर्षांत इंटरनेट क्षेत्रात प्रचंड क्रांती घडली आणि जिकडेतिकडे कावळ्याच्या छत्रीसारखे कूकिंग चॅनेल्स उगवले. बहुतांशी हे चॅनेल्स एका पुरुषाने किंवा एका स्त्रीने चालवलेले असत. उत्तम हिंदीत बोलणारा शेफ विकास खन्ना, मराठीत मधुराज रेसिपी, इंग्रजी चॅनेल्स मध्ये डॉन समजला जाणारा शेफ गॉर्डन रामसे ही खाद्य पदार्थांचे यू ट्यूब चॅनेल्स चालवणारी काही दिग्गज मंडळी! या सगळ्यांमुळे स्वयंपाक या जराश्या दुर्लक्षित, कमी लेखल्या गेलेल्या कामाला एक उंची लाभली. Masterchefसारख्या कार्यक्रमांमुळे स्वयंपाक ही कृती जगभर लोकांना आवडू लागली. गेल्या वर्षभरात आणि लॉकडाऊनमधे तर प्रचंड प्रमाणात कुकिंगच्या यू ट्यूब चॅनेल्सची निर्मिती झाली.
बहुतांश कूकिंग चॅनेल्सचं वैशिष्ट्य काय असतं तर पदार्थाची कृती व्यवस्थित सांगणे, त्याचबरोबर तो पदार्थ आकर्षक कसा दिसेल याकडे लक्ष देणे. हेब्बर्स किचन या चॅनेलची निर्माती अर्चना हेब्बर हिने या पद्धतीला थोडा फाटा देत, स्वतःच्या फूड चॅनेलमध्ये एक शब्दही न बोलता फक्त व्हीडियोमधून कृती दाखवायला सुरुवात केली. हा चॅनेल अतिशय लोकप्रिय झाला कारण रोजच्या किंवा थोड्याश्या अवघड रेसिपीज, थोड्या वेळात आणि साध्या पण आकर्षक पद्धतीने दाखवायची अर्चना हेब्बरची हातोटी! बायका एक शब्दही न बोलता रेसिपी सांगू शकतात हे अश्या व्हिडियोज मधून समजायला लागलं.
कूकिंग चॅनेल शक्यतो एकच व्यक्ती चालवते. इथलं स्वयंपाकघर चकाचक असतं, पदार्थासाठी लागणारं साहित्य, गॅजेट्स, उपकरणं हाताशी असतात. बनणाऱ्या पदार्थाची उत्क्रांती, त्यातले पौष्टिक घटक, त्या बनवण्यातल्या छोट्या छोट्या टिप्स सांगत काम सुरू असतं. विशेष म्हणजे पदार्थ बनल्यानंतर शेफ किंवा तिथे आलेला पाहुणा, तयार पदार्थामधला एकच घास खाऊन “वा!सुंदर! अप्रतिम! Heavenly! Delicious! म्हणतो. स्वतः शेफ तर स्वतः बनवलेले पदार्थ खाताना कधीच दिसत नाहीत.
या सगळ्या पार्श्वभूमीवर मला अलीकडेच एक भन्नाट अस्सल भारतीय यू ट्यूब चॅनेल पहायला मिळाला. चॅनेलचे नाव The village cooking. हा चॅनेल तमिळनाडूमधले सहा पुरुष मिळून चालवतात, पाच स्वयंपाकी आणि एक कॅमेरामॅन. “बायका शेतावर काम करायला जातात तेव्हा इथले पुरुष स्वयंपाकघर सांभाळतात.” असं ते अगदी सहज सांगतात. हे सगळे लोक एकमेकांचे चुलते लागतात. यात एक सर्वात सिनियर आजोबाही आहेत. ते बॉस वाटतात. यातल्या बऱ्याच लोकांना परदेशी नोकरी करता जायचे होते, पण त्यातल्या एका केटरिंग शिकलेल्या भावाने ही कूकिंग शो ची कल्पना त्यांच्यासमोर ठेवली आणि हा चॅनेल सुरू झाला.
Village cooking ची अनेक वैशिष्ठ्ये आहेत. सर्वात पहिले म्हणजे यात एकही स्त्री स्वयंपाक करताना दिसत नाही, अगदी कापणे, चिरणे सुद्धा नाही. सर्व कामे ही पाच लोकं करतात. सगळा स्वयंपाक शेतात बनतो. मोकळी हवा, आजूबाजूला डोलणारी हिरवाई, भाताची शेतं अधूनमधून डोळ्यांना सुखावह दर्शन देतात. स्वयंपाक करताना एकही उपकरण वापरलं जात नाही, ना मिक्सर, ना गॅस. सगळं वाटण एका मोठ्या पाट्या वरवंट्यावर वाटलं जातं. भाजी शेतातच चिरली जाते, चुलही तिथेच पेटवली जाते. Village cooking म्हणजे mass cooking. या लोकांना थोडाथोडका स्वयंपाक करायचे माहीतच नाहीये. मोठमोठ्या हंड्या, पराती, तवे यामधेच पदार्थ बनवले जातात. यांची सगळी भांडी एक्सेल साईजची असतात आणि शक्यतो मातीची किंवा स्टीलची असतात. विशेष म्हणजे एक शब्दही न बोलता यांचे काम सुरू असते. त्यामुळे चटणी वाटताना पाट्यावर वरवंट्याचा आवाज, फोडणी परततानाचा आवाज, हे सगळे सूक्ष्म आवाजच शब्द बनून जातात. सगळ्यांचे हात इतके सफाईने चालतात की ज्याचं नाव ते. साध्या लुंगी आणि शर्टवर असलेली ही माणसं, पदार्थ बनतो तेव्हा तोंड भरून हास्य मात्र करतात. हे त्यांचं हास्य बरंच काही बोलून जातं.
पदार्थ बनल्यावर ही मंडळी काय करतात? तर मस्तपैकी गोलाकार एकत्र बसून स्वतः बनवलेलं अन्न मनसोक्त खातात, अगदी दक्षिण भारतीय पद्धतीने! मला हे फार आवडलं. आजपर्यंत फार कमी कुकरी शोज मध्ये मला हे दिसलं आहे की शेफ स्वतः बनवलेले पदार्थ आडवा हात मारून खातो आहे. त्याहून ही एक अत्यंत चांगलं कार्य हे लोक करतात, ते म्हणजे बनवलेल्या स्वयंपाकातला मोठा भाग ते एका अनाथाश्रमात देतात. तिथे जाऊन ते स्वतः या लोकांना पंगतीत वाढतात. कोणता Food channel हे करतो? मी पाहिलेला एकही नाही. हे सुग्रास अन्न खाल्ल्यानंतरचा त्या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद वर्णनातीत असतो. असं म्हणतात अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान असतं. या शेफ्सना अगणित आशीर्वाद मिळत असणार हे नक्की!
Village cooking चॅनेल पाहणं हे माझ्यासाठी थेरपीचं काम करतं. मला यातले दोन चार शब्द जे बोलले जातात ते बिलकुल समजत नाहीत. पण त्याने फरक पडत नाही. मी स्वतः मांसाहारी काहीही बनवत नसले तरी ते यांच्या चॅनेलवर नुसतं पाहायला देखील मला फार आवडतं. उच्चप्रतीचे कॅमेरावर्क, ताजे पदार्थ, आणि शांततेत काम ही त्याची प्रमुख कारणं आहेत. आपल्याच देशातल्या मातीत, दक्षिणेतले सुंदर निसर्गसौंदर्य पाहत, आपल्याच काही खास पदार्थांचे व्हीडियो पाहणे हे किती आनंददायी असू शकतं हे या लोकांचं काम पाहून कळतं. यात एक सूक्ष्मसा आनंद असाही आहे की पाच सात पुरुष स्वयंकघरातली सगळी कामं लीलया करतायत आणि मी निवांत बसून ते बघते आहे. वर्षानुवर्षे स्वयंपाकघर हे बायकांचं काम असं ठासून सांगणाऱ्या पुरुषप्रधान संस्कृतीला Village cooking ने दिलेलं उत्तर पाहून माझ्यातल्या स्त्रीला आनंद होतोच होतो.
The village cooking ला सध्या तीन मिलीयनपेक्षा जास्त सबस्क्राइबर्स आहेत. त्यांचे उत्पन्न दरमहा साधारण सातलाख रुपये आहे. दोन ते तीन लाख खर्च वगळून उरलेले पैसे हे लोक आपसांत वाटून घेतात. परदेशी जाण्याची इच्छा यांनी केव्हाच सोडून दिली आहे कारण आपल्याच देशात राहून त्यांनी मिळालेल्या संधीच सोनं केलं आहे.
दिसायला दिसतात हे लोक साधे शेतकरी, लुंगी नेसलेले अण्णा लोक, पण स्वयंपाक अतिशय उच्च दर्जाचा करतात. फक्त बिर्यानी, भाजी, दोसे नाही तर चक्क मश्रुम ऑम्लेट, अरबी बिर्यानी, फ्राईड बेबी पोटॅटोज अश्या international रेसिपीज देखील ते लीलया करतात, अगदी डोळ्यांचं पारणं फिटेल इतकं सुंदर असतं हे सगळं! नुकताच या चॅनेलला Best food programmes मधील Black sheep award ही मिळालं आहे.
माझी एक जर्मन मैत्रीण भारत फिरून आली तेव्हा मला जरा खेदाने म्हणाली होती, “गौरी, तुमच्या इथे बायका प्रचंड कामं करताना दिसतात. बाहेर आणि घरात, दोन्हीकडे. पुरुष फक्त गप्पा मारत, ऊन खात बसलेले दिसतात, विशेषतः गावांकडे.” तिच्या बोलण्यात तथ्य आहेच, ते नाकारून चालणार नाही. पण तिला हा चॅनेल मी अवश्य दाखवणार आहे. तिच्या मताचं थोडंतरी परिवर्तन होईल असं वाटतं.
चॅनेल आवर्जून पाहा. फक्त रेसिपी समजण्याकरता नव्हे तर रेसिपी बघण्याच्या थेरपीकरता.
देऊळ बंद
लेखिका- अश्विनी आठवले
तिला जाग आली तेव्हा पहाटे चार वाजलेले…
तिचा तिलाच विचार पडला की एवढ्या लवकर मला कशीकाय जाग आली…
एरवी सकाळी आठ वाजतांचा पण गजर लावावा लागतो…
मग तिला आठवलं, आज घटस्थापना आहे…
दरवर्षी नवरात्रात ती आणि आळीतल्या तिच्या मैत्रिणी पहाटे लवकर उठून आंघोळ करून गावातल्या देवीच्या म्हणजेच ग्रामदैवतेच्या दर्शनाला जायच्या…
तिने विचार केला, पण यावर्षी काहीच नाही…
देऊळ तर बंदच आहे…
तिने परत झोपायचं ठरवलं…
पण अंथरुणात तळमळत राहिली…
या कुशीवरून त्या कुशीवर…
कितीही प्रयत्न केला तरी झोप येईना…
शेवटी ती उठली…
अंघोळ करून तिने देवळापर्यंत जायचा निर्णय घेतला…
तिकडे गेल्यावर बघू काय ते, असा विचार केला…
अगदीच काही नाही तर बाहेरून तरी दर्शन घेताच येईल…
तिच्या अंगात उत्साह संचारला…
आंघोळ करून ती घराबाहेर पडली आणि तिने देवळाच्या दिशेने पावलं उचलली…
अपेक्षेप्रमाणे देऊळ बंदच होते…
तिने हात जोडले…
डोळे मिटले…
तेवढ्यात कसलातरी आवाज आला…
तिने डोळे उघडले तर देवळाचा पुजारी देवळाचं कुलूप उघडत होते…
तिने त्या पुजारी आजोबांना विचारलं..देऊळ उघडताय?
ते ‘हो‘ म्हणाले पण पुढे असंही म्हणाले की भक्तगणांसाठी दर्शन बंद आहे पण मला साफसफाई करून रोजची पूजा करावीच लागते…
तिने क्षणाचाही विचार न करता आजोबांना विचारले, आजोबा मी तुम्हाला साफसफाईला मदत करू?
दोन सेकंद थांबून आजोबा म्हणाले, हो, कर मदत, देवळाचा गुरव येतो पण यावर्षी तो त्याच्या गावाला गेलाय…
हे ऐकून तिच्या आनंदाला पारावार उरला नाही…
क्षणार्धात ती देवळात पोचली…
झाडू हातात घेतला…
देवीच्या मूर्तीसमोर नतमस्तक झाली…
जगदंबा माते की जय!!!!
उशीर
लेखिका- प्राजक्ता रुद्रवार
हातातली गवताची काडी फिरवत तो सगळ्या झुडपांना मारत चालला होता. पांढरा हाफशर्ट व खाकी चड्डी, पायात चप्पल नाही, चांगले केस विंचरलेले अश्या नेहमीच्याच अवतारात तो नदीच्या कडेनी चालत जात होता.
“रोज उठुन असं बाहेर फिरायचं म्हणजे काही चांगलं नाहीये. पण शाळेत नवीन मास्तर आलेत ना…ते म्हणतात फीस आणत नाहीस आणि वर तोंड उचलुन येतोस रोज शाळेत. बापुस सांगितले तर बापुचे नवीनच, तुझ्या मास्तरला माझ्या समोर आण, बघतोच मी कसा पैका मागतो माझ्या पोरास…”
आता मास्तरना सांगु का,” चला मास्तर…आमचे वडील तुम्हाला ओरडा खायला बोलावत आहेत. असे म्हणले तर मला हाणणार नाहीत काय मास्तर. त्यापेक्षा शाळाच नको…”अश्या विचारात गंपु शाळेत न जाता बांधावरुन चालत होता.
रस्त्यात कुठेतरी पाण्याचा खड्डा दिसला तसा त्याने पाण्यात उडी मारुन पाणी उडवले. पाणी बाजुला पडले तसा तो मनातच हसला. अजुन एकदा त्याने पाण्यात उडी मारली व पाणी उडवले. सकाळी शाळेत जायचं म्हणुन घातलेला त्याचा गणवेष खराब झाला. आता घरी गेल्यावर नक्कीच ओरडा बसणार आहे, हे आठवुन त्याला हसुच आले. आई म्हणती,”शाळा पण साफ करतोस की काय र…” तिला कुठे माहित हाय की शाळेत न जाता आपण असाच फिरत असतो.
ती सगळ्यांना सांगती की आमचा गंप्या कलेक्टर व्हणार हाय. कलेक्टरास्नी सगळे कसे घाबरतात, त्यांचा रुबाब तो कसला हे आठवताना गंप्याच्या चेहरयावर तेज आले होते.
गणितात आपला नंबर पहिला असतोच. आपल्याला कोण नाही मागे पाडणार, कलेक्टर होण्यासाठी परिक्षेत गणितच यावं लागत म्हणत होते मास्तर…पण या नव्या मास्तरांचे करायचे काय…बापु पैका देईना अन ते रोज इचारताय…”असा विचार करत गेले चार दिवस सुरु असलेला दिनक्रम तसाच राबवित गंपु बांधाच्या बाजुने जात होता.
डोक्यावर उन्हं आले म्हणजे दुपारचे बारा वाजले हे ओळखुन तो अजुन तीन तास काय करावे या विचारात चाललेला थांबला. सकाळी निघताना आईने त्याला भाजी भाकर दिली होती याची त्याला आठवण आली. त्याने चांगली जागा शोधुन आईने बांधुन दिलेला डब्बा उघडला. मेथीची सुकी भाजी, भाकरी व ठेचा….त्याला सुमीची आठवण आली, तिला ही भाजी खुप आवडते. सुमी आठवण काढत असेल नक्की. तिला गणित आडलं की ती रडती सरळं, वेडी आहे. गणित किती सोपं असतं हे तिला कळतंच नाही.
त्याने डब्बा ठेवुन वही पुस्तक काढलं. काही गणित सोडवली. घरी जायला अजुन तासभर तरी आहे म्हणुन तिथेच आडवा पडत त्याने इतिहासाचे पुस्तक वाचायला सुरुवात केली. वाचता वाचता त्याला कधी डोळा लागला हे त्यालाही कळले नाही. पुस्तकं पोटावर ठेवुन गंपु स्वप्नांच्या विश्वात रममाण झाला. त्याला जाग आली तर संध्याकाळ झाली होती. जरासा अंधार झाला होता. तो एकदम उठला. चालत घरी जायला उशीर होणार होता. घरात सगळे काळजी करत असतील. आईचा जीव थारयावर नसलं. ती कुठं कुठं शोधत फिरत असलं काय माहीती. रस्त्यात कोणी आपल्याला पळवुन नेलं तर याची पण त्याला भिती वाटतं होती. गावात सगळे म्हणतात की मुलांना पकडुन नेणारा कोण तरी माणुस फिरतोय. गंपुने झपाझप पावलं टाकली व तो घराच्या दिशेने निघाला. तो आला तेव्हा चांगलाच अंधार पडलेला होता.
गंपुने आपल्या झोपडीत पाय ठेवला तशी आई म्हणाली,”कुठं व्हतास रे…उशीरा सुटली का रं शाळा? चल हातपाय धुवुन ये जेवाया…” बापु बाहेर बिडी ओढत बसला होता. गंगी खेळत होती.
“म्हणजे आपण वेळेवर घरी नाही आलो याची कोणालाच काळजी वाटली नाही…”याचं कुठेतरी गंपुला वाईट वाटलं.
“आईला आपल्याशिवाय चैन पडत नाही पण आजकाल तिला पण आपली काळजी वाटत नाही…म्हणजे आपल्याशिवाय कोणाचंच अडत नाही…” तो स्वत:शीच म्हणाला व त्याचे डोळे भरुन आले. तो बाहेर बसुन रडु लागला.
“गंपु…”आईने हाक मारली तरी त्याने दुर्लक्ष केलं. त्याला जेवायला पण नको वाटतं होतं. पण आईने पुन्हा हाक मारली म्हणुन तो डोळे पुसुन आत गेला. कशीबशी चतकोर भाकर खाऊन तो उठला.
“काय रं गंपु…बरं वाटत नाय का…”आईने विचारलेच.
त्याने आईकडे न बघताच “नाय…असचं…” म्हणुन उत्तर देण्याचे टाळले.
“आय ला माझी कशी काळजी वाटतं नाय…”गंपुला झोपेपर्यंत हेच खटकत होतं. त्यामुळे छोटासा चेहरा करुन तो झोपुन पण गेला.
सकाळी उठल्यावर आज त्याने डब्बा न घेताच लवकर बाहेर पडायचे ठरवले. आपण कोणाला नकोय तर जाऊ दे, लवकरच बाहेरच जाऊ म्हणत रागाने तो सकाळीच बाहेर पडला. तो बाहेर पडला अन गल्लीबाहेरच त्याला सुमी गाठ पडली. सुमीला पाहुन त्याला जरा बरं वाटलं. तिला आपलं दु:ख सांगाव का हा विचार करेपर्यंत सुमी बोलु लागली.
“अरे गंपु…बरं झालं तु भेटलास…” ती म्हणाली.
“काय ग सुमे…सकाळीच इकडे कुठे निघाली?” गंपुने विचारले.
“अरे तुलाच शोधत आले होते…”सुमी म्हणाली. सुमीचे हे वाक्य त्याला एकदम भारी वाटलं. तो जाम खुष झाला.
“कालपण तुझ्या घरी आले व्हते, तुझी चौकशी कराया…पण तु घरी नव्हता. तुझ्या आयने सांगितले की तु शाळेत गेला हायसं…”
गंपुने घाबरत विचारले,”मंग तु काय म्हणालीस…मी शाळेत नव्हतो सांगितले नाहीस ना? “
सुमीने नकारार्थी मान हलवतं सांगितले,”मी हुशार हाय…चार दिस तु शाळेत आला नाहीस कळले तर तुला मार पडेल म्हणुन म्हणलं की तु गणिताच्या सरांकडे असशील, तु गणितात हुशार हायसं म्हणुन सर तुझा जास्त अभ्यास घेतात. तुझी आय लई खुष झाली…म्हणाली,”होऊ दे होऊ दे उशीर.. कलेक्टर होण्यासाठी अभ्यास महत्वाचा हाय…”
पण तु का र येत नाहीस शाळेत हे विचाराया लवकर आले मी, काय झालया?”
सुमीचे हे बोलणे ऐकुन तो एकदम रडायला लागला,” आपण आईवर उगाच रागावुन रुसलो. तिला आपली काळजी नाय म्हणालो.”
सुमीने त्याला विचारले,”काय झालं रे गंपु…तु काऊन रडत आहेस? सांग ना मला…”
गंपुने तिला म्हणले,”काय नाय…असंच…आधीच उशीर झालाय, जातो मी घरला…”
सुमीला कळत नव्हते आता तर सकाळ झालीये, उशीर कसा काय झाला. ती गंपु गंपु आवाज देईपर्यंत गंपु झपाझप पावलं टाकत घराच्या दिशेने गेला पण.
गंपु घराच्या दारात आल्याबरोबर आईने त्याला आवाज दिला,”कुठे गेला होतास रे बाळा सकाळी सकाळी? किती आवाज दिला तुला सगळीकडे. चल, तयार हो शाळेची वेळ व्हतीया, मी डब्बा भरते…”
हे ऐकुन गंपुने आईला मिठी मारली व तो रडु लागला. आईला काही कळले नाही. त्यांनी गंपुला जवळ घेतले व पाठीवर हात फिरवत काळजीने विचारले,”काय झालं रे बाळा…काही त्रास होतोय का?”
गंपुने डोळे पुसत म्हंटलं,”चुकलो आय मी…तुला माझी काळजी वाटत नाय म्हणुन रुसुन बसलो होतो. कोणालाच मी नकोय वाटले होते मला…”
हे ऐकुन तो काय बोलतोय हे आईला कळत नव्हते. गंपुनेच घाबरतच गेले चार दिवस शाळा बुडवुन कसा फिरतोय व काल काय झाले ते सांगितले.
आईने त्याला जवळ घेत म्हणले,”खरंच उशीर झाला रे बाळा मला पण हे समजायला…पण बरं झालं कळलं. आईपासुन काहीच लपवायचे नसते रे. मी बापुस सांगुन आजच शाळेची फी देते. तु शाळा बुडवायची नाय हे नक्की. असा वागलास तर कलेक्टर कसा व्हशील?”
गंपुने आईला मिठी मारली व दोघेही रडत होते.
आजही हे सांगताना कलेक्टर साहेबांच्या डोळ्यातुन पाण्याचा धारा वहात होत्या. पहिल्यांदाच शाळेतला माजी विद्यार्थी कलेक्टर झाल्याबद्दल शाळेमधे सत्कार समारंभ ठेवण्यात आला होता. त्याठिकाणी भाषण करताना गंपुने सगळ्या विद्यार्थ्यांना आपली कहानी सांगितली म्हणले,”त्यामुळे आयुष्यात कधीही उशीर होऊ देऊ नका मित्रांनो. आज माझ्या या यशात माझ्या आईचा खुप मोठा जरा आहे. तिचे स्वप्न मी पुर्ण करु शकलो याचा आनंद आहे. त्यामुळे आईने स्टेजवर येऊन माझ्यासोबत हा सत्कार स्विकारावा अशी मी विनंती करतोय.”
इतके बोलुन गंपुने स्टेजवरुन खाली उतरुन येत आईला हात दिला व तो तिला घेऊन स्टेजवर आला. त्या दोघांनी मिळुन तो सत्कार स्विकारला. ठेवणीतली छान साडी नेसुन आलेल्या आईच्या चेहरयावर खुप आनंद व डोळ्यात अश्रु जमा होते.
न्यू नॉर्मल
लेखक- कौस्तुभ केळकर
सोप्पंय.
पीहू तेच तर सांगत होती.
‘मला नाही बाई तुमचं ते Whatsapp बघता येत.
Whatsapp व्हीडीओ कॉल…?
गुगलपे ?
नेट बँकींग ?
झूम ?
अॅमेझोन ?
ईल्ला…
नाय नो नेव्हर.
खूप फसवाफसवी चालते म्हणे.
क्षणात होत्याचं नव्हतं होऊन यायचं.
कशाला ऊगाच आ बैल मुझे मार ?
आपलं आहे तेच बरंय…‘
आजी ऊवाच.
आबा आणि आजी.
मुक्काम पोस्ट रत्नागिरी.
आबा रिटायर्ड पोस्टमास्टर.
रिटायर्ड होऊन सहा वर्ष झालीयेत.
आजी शिक्षिका होती.
तीही रिटायर्ड झालीय नुकतीच.
पीहू दोघांची नात.
पीहूची आई मृणाल.
आबा आजींची एकुलती एक मुलगी.
पीहू मृणालची एकुलती एक.
पीहू आत्ता सेकंड ईयरला आहे.
बीकॉम करत्येय.
सीएची जोरदार तयारी चाललीये.
पीहूचा बाबा मंदार.
तो स्वतः सीए आहे.
स्वतःची फर्म आहे.
धो धो प्रॅक्टीस चालत्येय.
लॉकडाऊन सुरू झाला आणि,
ईकडे मृणालचा जीव वर खाली.
आई बाबा रत्नागिरीत तिकडे एकटे.
मंदार म्हणालाही…
“ईपास काढतो.
दोघांना गाडीत घालून ईकडे घेऊन येतो..”
कसंच काय ?
दोघांचा नन्नाचा पाढा.
पीहू एव्हररेडी…
तिची परीक्षा पुढे गेलेली.
ईथं अभ्यास करायचा तो तिथं जाऊन करीन.
पीहूच्या बाबानं ई पास काढला.
पीहूला रत्नागिरीला सोडून आला.
सागरकिनारे…
आबांचं घर अगदी समुद्राजवळ.
मस्त गाज ऐकू यायची समुद्राची.
घराभोवतीची छोटीशी बाग.
व्हरांड्यातला मोठ्ठा झोपाळा.
झोपाळ्यावर बसून पीहू दिवसभर अभ्यास करायची.
संध्याकाळ झाली की अभ्यास बंद.
कोरोनासे जरूर डरना.
पीहूच्या बाबानं बजावलेलं.
जग ईकडचं तिकडे होवो.
घराबाहेर पडायचं नाही.
एक बरं होतं.
ईथे चांगली रेंज होती.
झूम ले !
पीहूच्या ऑनलाईन लेक्चर्सच्या ऑनलाईन झूम मिटींग्ज.
अपलोडींग डाऊनलोडींग.
सगळं विनासायास सुरू होतं.
पंधरा दिवसांपूर्वी फक्त एकदाच…
एकदाच आजीला घेऊन पीहू बँकेत गेलेली.
नाक्यावरची युनियन बँकेची ब्रँच.
पाच हजार रूपये भरून आजीचं नवीन अकाऊंट.
एटीम कार्ड, नेटबँकींग सकट…
कशाला ?
आजीनं किती नाही म्हणून झालं.
पीहूनं ऐकलंच नाही.
रोज संध्याकाळी.
आजी आणि पीहू.
प्रोढ शिक्षण वर्ग.
तास दोन तास लॅपटोप ,मोबाईल घेऊन बसायच्या दोघी.
आबांची हजारवेळा नाकं मुरडून झाली.
‘आबा गेला ऊडत…‘
दोघींनी मनातल्या मनात जीभ चावली.
झक्कास टाळी दिली एकमेकींना.
आजीकडे स्मार्टफोन होताच.
मागच्या वर्षीच्या वाढदिवसाला आईबाबांनी गिफ्टलेला.
आजी स्मार्ट होने का टाईम आयेला है !
खूप झाली थेअरी.
आता प्रॅक्टीकल.
आजीच्या फोनवर गुगल पे डाऊनलोडलं.
बेस्ट लक आजी.
आजीची आज एक्झॅम.
धकधक धडधड.
कुछ नही होता…
‘काय होईल फारतर..?
अकाऊंटमधे पाचच हजार आहेत.
ऊडाले तरी चालतील…‘
गुरूदक्षिणा.
आजीनं पीहूला थ्रू गुगलपे पाचशे एक रूपये पाठवले.
मिशन मंगल सक्सेसफुल.
आजी खूष.
पीहू खूष.
आजीनं मोबाईल फोनचं, एमएसईबीचं अकाऊंट,
गुगलपेला लिंक केलं.
या महिन्याचं विजेचं बिल पेड.
“तुझ्या आबाला आवर जरा पीहू.
सारखं काही तरी निमित्त काढून ऊंडारायला जायचं.
वीजेचं बिल भरायचं म्हणे..
कुठं जायची गरज नाही आता…”
तेवढ्यात आबा तणतणत आले.
“अहो, जरा नाक्यावर जाऊन येतो.
मोबीलातला बॅलन्स संपलाय..”
टिंगटाँग.
पलक झपकतेही.
आबांच्या मोबीलमधे बॅलन्स आलेला.
आबा हक्काबक्का.
आजीनं पीहूकडे बघून डोळा मिचकावला.
टेलीफोन बिल,वीजबिल,घरपट्टी.
आजीनं सगळं ऑनलाईन पे केलं.
एकदा नाक्यावर जाऊन एटीमसुद्धा वापरून झालं.
“आज्जो…
गुगलपे वाल्या अकाऊंटवर फार पैसे ठेवायचे नाहीत.
फारतर दहा हजार…”
अॅमेझोनही झालं.
आबांसाठी एक छोटीशी टूल बॉक्स मागवली.
टूल बॉक्स बघितली अन् ,
आबा नाचायलाच लागले.
किती शोधली होती त्यांनी ती
टूलबॉक्स ईथल्या मार्केटमधे..
आता आबा त्यांचे कुटीरोद्योग करायला मोकळे.
आबांच्या डोळ्यात आजीचं कौतुक मावेना.
आबांनी आजीला दिलेला एक कातील लूक.
बघितलंय आम्ही सगळं.
आजी दिलखूष.
आजी आहे ती.
जे ईकडे मिळत नाही, आवश्यक आहे,
तेवढंच अॅमेझोन वरनं मागवायचं.
भारीच आवडलं हे सगळं आजीला.
आजीचं झूम अकाऊंट ओपन झालं.
घरबसल्या वसंत व्याख्यानमाला.
नवरात्रात दहा दिवस.
झूम लिंक ओपन केली की बस..
झूम ले झूम ले..
आजी प्रचंड खूष.
Whatsapp व्हिडीओ कॉल, किंडल सगळं सगळं.
आजीचा एकदम मेकओव्हर झालेला.
आजी खरोखर स्मार्ट झालेली.
खरंच सोप्पय सगळं.
आजीला पटलं..
मी ऊगाचच बाऊ करत होते.
आजी शिकली, प्रगती झाली.
आबांना कोम्प्लेस का काय ते आलेला.
झालं..
पीहूला नवीन स्टुडन्ट मिळाला.
आबांनी आठ दिवसात सगळं पटाटा शिकून घेतलं.
आबा आजी एकदम टेक्नोसॅव्ही.
हे भारीये.
आबा आजीनं एक झूम मिटींग अरेंज केली.
ऑनलाईन फॅमिली गेटटुगेदर.
पीहूचे आईबाबा एकदम शॉकड.
खूप कौतुक वाटलं दोघांना लेकीचं.
बघता बघता पीहूची परत जायची वेळ झाली.
“आबा आजी , एक प्रॉमिस हवंय.
तुम्ही दोघांनी अजून एकेकाला असं फूल्ली ट्रेन करायचं.
करोगे ?”
‘दिलं प्रॉमिस…‘
जड पावलांनी पीहू पुण्याला परत गेली.
बगूनाना आणि नानी.
आठ दिवसात रेड्डी…
बघता बघता आळीतली दहा बारा घरं अश्शी तैयार झाली.
आज दिवाळी.
आजीनं झूम मिटींग सेट केलेली.
आईबाबांना ऑनलाईन औक्षण.
अर्धा तास मस्त गप्पा.
फूल टू धम्माल.ह
बहुतेक आळीतल्या दहा बारा घरी हेच पिक्चर…
हेच न्यू नॉर्मल आहे.
एकदम टेक्नोसॅव्ही.
हॅप्पी दिवाली…
——————————————————————————————————————–
- प्राजक्ताचा दरवळ - September 7, 2023
- सोळा नंबरच्या आजी - February 10, 2022
- पुढचं पाऊल- तृतीय पारितोषिक विजेती कथा. लेखन- सुचेता गोखले - July 7, 2021
Why can not I see Diwali ank?
This content is not permitted for your membership level, why this message???
This content is not permitted for your membership level. Why?
Lekhakonline members will get to read the entire diwali anka content under diwali special title which will be published around diwali. The anka in anka format will be available only to the ones who pay specifically for the anka.
दिवाळी अंक का दिसत नाही
Lekhakonline members will get to read the entire diwali anka content under diwali special title which will be published around diwali. The anka in anka format will be available only to the ones who pay specifically for the anka.
Hello Sir,
The Lekhakonline Diwali 2020 is not permitted on for my Membership level. May i know the reason please
Thanks
लेखक ऑनलाईन सदस्यांना दिवाळी अंकातील कंटेंट “दिवाळी स्पेशल” सदरामध्ये दिवाळी पासून वाचायला मिळेल. अंक स्वरूपात ते फक्त अंक विकत घेणाऱ्या लोकांसाठी असेल.
लेखक ऑनलाईन सदस्यांना दिवाळी अंकातील कंटेंट “दिवाळी स्पेशल” सदरामध्ये दिवाळी पासून वाचायला मिळेल. अंक स्वरूपात ते फक्त अंक विकत घेणाऱ्या लोकांसाठी असेल.
लेखक ऑनलाईन सदस्यांना दिवाळी अंकातील कंटेंट “दिवाळी स्पेशल” सदरामध्ये दिवाळी पासून वाचायला मिळेल. अंक स्वरूपात ते फक्त अंक विकत घेणाऱ्या लोकांसाठी असेल.
दिवाळी अंकाची वेगळी फी आहे का ?
हो. रु.५०. पण लेखक ऑनलाईन सदस्यांना दिवाळी अंकातील कंटेंट “दिवाळी स्पेशल” सदरामध्ये दिवाळी पासून वाचायला मिळेल. अंक स्वरूपात ते फक्त अंक विकत घेणाऱ्या लोकांसाठी असेल.
हा असा का msg येतो आहे not permitted म्हणून?
लेखक ऑनलाईन सदस्यांना दिवाळी अंकातील कंटेंट “दिवाळी स्पेशल” सदरामध्ये दिवाळी पासून वाचायला मिळेल. अंक स्वरूपात ते फक्त अंक विकत घेणाऱ्या लोकांसाठी असेल.