शोध (एक रहस्य कथा )- भाग ३
आधीच्या भागाची लिंक- शोध (एक रहस्य कथा )- भाग २
आभा सावरून बसली .नीता ने तिच्या कडच्या अँप ला ‘त्या ‘ माणसाचे फोटोज फीड केले …..काही सेकंद ब्राऊसिंग चालले …..आभा ला धडधड करत होते …..सापडला….नाव आले … सारंग दीक्षित !!!….डेड इन अ कार ऍकसिडेंट !!! …तारीख …..11 जून 2010 . म्हणजे काही वर्षांपूर्वी मेलेल्या माणसाचे चेहरे आत्ता फोटोशॉप करून स्मिता सोबत टाकले होते ….
” हे काय !! 2010? तेव्हा तर आम्ही कॉलेज मध्ये होतो . हा स्मिताचा फोटो अलीकडचा आहे . कुणी केली असेल बदमाशी ? . थँक्स यार ,तू खूप मोठी मदत केलीस . मला खात्री होती की हे कोणा दुसऱ्या चे काम आहे “
नीता ची फार मोठी मदत झाली होती .
तो पेन ड्राईव्ह सतीश ला स्मिताच्या रोजच्या कपड्यांच्या कपाटात सापडला . कोण हात लावतं तिथे ? तिची कामवाली ? आभा चे वकिली डोके काम करायला लागले .
स्मिताच्या घरी कपडे धुणाऱ्या बाईचा नंबर होता आभा कडे …तिला फोन केल्यावर कळाले की कुणी संगीता नावाची नवीनच लागलेली बाई स्मिताकडे कपड्याच्या घड्या घालणे , पुसपास करणे असे वरवरचे सगळे कामं करते .
स्मिताला जाऊन तीन दिवस पूर्ण होऊन आज हा चौथा दिवस …आणि सतीश ही गायब …वीचार करून डोक्याचा भुगा झाला होता .
ती सतिशच्या घरी गेली . तिथे फक्त त्याची आईच होती . बिचारी ! सुनेच्या जाण्याचं दुःख करेल की मुलाच्या गायब होण्याचं ..
आभा सरळ आत गेली आणि तिने स्मिताच्या कपाटातून तिचे आणखीन काही फोटो ताब्यात घेतले .
नंतर नीताच्या मदतीने ती इन्स्पेक्टर देव शी बोलली . लागेल ते सहकार्य करू , पण लगेच केस राव च्या हातातून काढणे शक्य होणार नाही , आणि ते योग्यही नाही , असे त्यांचे म्हणणे होते . हा सगळा ताण सहन करणे अवघड झाले ,म्हणून ती आई कडे जायला निघाली . अशीही आज सुट्टी होती , आणि स्मिताच्या आईशी पण नीट बोलणे नव्हते झाले . जावई गायब झाला म्हटल्यावर त्यांना त्याचाच संशय येत होता .
ती तिच्या इमारतीच्या खाली उतरली . शांती अपार्टमेंट चा वॉचमन भानुदास केर काढत होता .
” भानुदा , परवा इथे आत्महत्या झाली ,हे तुम्हाला कधी कळलं ? “
” ताई , लै वाईट झालं बघा . मी रात्री इथंच खाट टाकून बसलो होतो . पहाटे पाच ला शर्मा भाभी साठी दुधाचं पाकीट आणाया गेलतो , तर माणसं गोळा झाली हुती . पोलीस आलते , अन तवाच बॉडी हलवली हुती . ताई , मागुण कळालं आपल्या स्मिता ताईच हुत्या म्हणून .”
” म्हणजे पहाटे पाचलाच बॉडी हलवली होती ? “
” त्याच्या बी अगुदर ताई . त्यो पुलाखाली राहातों न , पप्पू , त्यो मनला पोलिसाला लै घाई झालती बॉडी हलवायची “
” भानुदा ,चलता का माझ्या बरोबर पप्पूकडे ? “
” त्यो कामावर गेला असन .रात्री आठला येतूय .”
” बरं आठला जाऊ आपण . लक्ष असू द्या .”
स्मिताच्या आईची अवस्था बघवत नव्हती . आभाचीच आई होती त्याच्या सोबत .
” काकू , तू अशानी तब्बेत खराब करू घेशील बरं . आई हिला झोपेची गोळी दे ,नाहीतर आजारी पडेल ही .
काकू ,तुझ्याकडून ती किती वाजता गेली घरी ? ” स्मिताने चौकशी सुरू केली .
” अग ,ती आली , दुपारी आम्ही जेवलो , मी जरा पाठ टेकली . .तिला म्हटलं ,आरामासाठी सुटी घेतलीस बाई , पड थोडावेळ .. पण तिला कुणाचातरी फोन आला . त्याच्याशी बोलत उठली ..मी पण आडवी झालेली उठून बसले … तिचा आवाज वाढला होता …फोन वरच
“बरं ,येते ” म्हणाली …आणि निघाली की .
त्या फोन मुळेच काहीतरी झालं बघ .”
” कुणाचा ..सतीश चा होता का फोन ?”
” ,विचारलं मी सतीशला , त्याचा नव्हता …”
” मग तू केलास का नंतर तिला फोन ? “
” हो s ,चार ला केला ,तर ती घरी जात होती ..खूप आवाज होता बाजूला ..नीट ऐकू येत नव्हते ….मग मी फोन ठेवला .”
” त्यानंतर ? मग पुन्हा बोललीस तू ? “
” नाही ग , बोलायला पाहिजे होतं …निदान ती कुठे आहे ते कळलं असतं .”
” कुठे कांय घरीच गेली न ती ! सतीश च्या म्हणण्यानुसार ती रात्री घरीच होती ,तर मग रात्रीतून पुन्हा कुठे बाहेर गेली …का गेली असेल ….”
मधल्या काळात तिने नीताला पण फोन लावला . शिवाय सतीश च्या मित्रांचे कॉन्टॅक्टस घेतले ….
सतीश चे गायब होणे ही आणखी वाईट गोष्ट होती . त्याचं ऑफिस त्याच्या घरापासून जवळ होतं . त्याच्या ऑफिस मध्ये जाऊन जरा चौकशी करावी असे तिला वाटले , पण तिला पुलाखाली पप्पू ला भेटायचे होते .
काय काय चालले आहे ,तिने उजळणी केली मनात ..
…घरातून स्मिताचे रात्री बाहेर पडणे …आत्महत्या ….इन्स्पेक्टर चे अक्षम्य दुर्लक्ष ….लॉकर मध्ये प्रेम पत्र …pen drive …ते खोटे फोटोशॉप ….सतीशचे गायब होणे….
आई अन काकू चा निरोप घेऊन ती निघाली . तो एक चिंचोळा रस्ता होता . तिला शंका आली की तिचा पाठलाग होतोय . कुणीतरी मागून येत होते …म्हणून तिने पटकन रिक्षा ला हात केला आणि आपल्या घराकडे घ्यायला सांगितले…..
हे प्रकरण वाटले तेवढे सोपे नाही ..ह्यात बरेच जण गुंतले असण्याची शक्यता आहे ,असे तिला वाटले . दुपारी दोन ते संध्याकाळी सहा ,सात च्या दरम्यान काहीतरी घडले होते नक्क्की !!
ती रिक्षातून शांती अपार्टमेंट पाशी आली ..तिच्या पासून थोडं दूर आणखी एक रिक्षा थांबलेली तिने ऑटो च्या आरश्यात बघितलं …त्या रिक्षातून कुणी बाहेर आले नव्हते . थोडंस घाबरतच तिने भानुदास ला हाक मारली ..
*******
…..पप्पू नुकताच कामावरून आला होता . तो पुलाच्या दुसऱ्या बाजूला राहात होता . म्हणजे शांती बिल्डिंग आणि पप्पूचे खोपटे याच्या मध्ये पूल होता . आभाला तिच्या बाजूनेच पूल नीट दिसायचा ,पलीकडची बाजू स्पष्ट दिसत नव्हती ,जरी पाचवा मजला होता.. तरीही .
तिने पप्पूच्या मुलांसाठी आणलेला भरपूर खाऊ त्याच्याकडे दिला .
” पप्पू , त्या दिवशी रात्री तुला जाग आली होती का जेव्हा वरून बाई खाली पडल्या ? ” हा प्रश्न विचारतांना तिचा आवाज थरथरत होता …आपलं कुणी जिवलग माणूस गमावणे फार भयानक आहे ,याची तिला वारंवार जाणीव होत होती .
” नाही मॅडम , मला झोप लागली होती . पण त्या पडल्या तेव्हा त्यांची पर्स माझ्या अंगावर पडली . मी खाली घोंगडे टाकून झोपलो होतो . “
” ती पर्स कुठे आहे “
” ती .. ती ..माझ्या ..”
” हे बघ मी तुला भरपूर पैसे देईन , प्लिज खरे बोल “
त्याने पर्स आणून दाखवली .
” पोलिसांना सांगू नका मॅडम , मी त्यांना दिलीच नाही , खोटे बोललो .”
तिने झडप घालून पर्स घेतली ..त्यातल्या वस्तू , आय कार्ड , पास बघून तिला कळाले ….ती स्मिता ची पर्स नव्हतीच !!!!!
“ही पर्स त्या मॅडमची नाही पप्पू , मग ह्यावरून पोलिसांनी लगेच त्यांच्या घरी कसा फोन केला ? त्यांना कसे समजले की ही बॉडी त्याच मॅडम ची आहे ? अजून काहीतरी सापडले असेल नक्की “.
” अजून एक पर्स होती मॅडम , ती पोलिसांना सापडली . म्हणूनच ते माझ्या जास्त मागे नाही लागले .” पप्पू ने कबुली दिली .
” म्हणजे स्मिता मॅडम जवळ दोन दोन पर्स होत्या …एक त्यांची …आणि एक ह्या कुण्या रंजनाची .”
तिने पप्पूला पैसे दिले आणि काहीही कळाल्यावर ताबडतोब फोन करायला सांगितले .
क्रमश:
पुढील भागाची लिंक- शोध (एक रहस्य कथा )- भाग ४
Image by Gerd Altmann from Pixabay
- आत्तु-भाग ३ (शेवटचा भाग) - June 17, 2022
- आत्तु- भाग २ - June 7, 2022
- आत्तू- भाग १ - June 3, 2022
Interesting
Thank you
mast
Thanks
bhari katha
धन्यवाद
भारीच सुरूय…
थँक्स
कसली भारी कथा!
धन्यवाद
गुंतत चाललेय कथा मस्तच
धन्यवाद
Pingback: शोध (एक रहस्य कथा )- भाग ४ – LekhakOnline – Excellent Marathi Articles
Pingback: शोध (एक रहस्य कथा )- भाग ४ – LekhakOnline – Excellent Marathi Articles
Pingback: शोध (एक रहस्य कथा )- भाग ४ – LekhakOnline – Excellent Marathi Articles