दिवाळी २०२० स्पेशल- २

ऑनलाईन वॉनलाईन       लेखिका- गौरी ब्रह्मे

२०१२ साली मला पुढे शिकायची अगदी मनापासून तीव्र इच्छा झाली. मुलं लहान होती, बरेच दिवस मी घरात होते, नोकरी करत नव्हते, पण  स्वस्थ बसवत नव्हतं, काहीतरी करावंसं वाटत होतं. मग विचार केला, काहीतरी शिकूया. अगदी नवीन काही नाही तरी आपल्याच क्षेत्रातील पुढचं शिक्षण घेऊ. मंगलाताई गोडबोले फार छान सांगतात, की मुलं लहान असताना आयांना खूप काही गोष्टी कराव्याश्या वाटतात. ती मोठी झाली, हातावेगळी झाली की मग मात्र आराम करावासा वाटतो. मात्र ती आपल्यावर अवलंबून असली की आपल्याला खूप उड्या माराव्याश्या वाटतात, असं काहीतरी उलट होत असतं. मजा म्हणजे, हे  बऱ्याच बायकांच्या बाबतीत खरं होताना दिसतं.

तर मला पुढील शिक्षणाचा किडा जोरात चावला. आधी एम.फिल, मग पीएचडी करायची असं ठरवलं. घरून प्रोत्साहन मिळालं. “घरात एकतरी डॉक्टर तयार होऊ दे, मेडिकलवाला नहीं तरी पीएचडीवाला सही” या आशेवर मला सर्वतोपरी मदत करायला सगळे सज्ज झाले. प्रवेशपरीक्षा धडाक्यात पास केली. कोर्सवर्कही चांगल्या रितीने संपवलं. आमच्या विषयात, म्हणजे परकीय भाषांत संशोधन करायचे असल्यास त्या त्या देशांत जाऊन त्या विषयाची पुस्तकं मिळवावी लागतात, पुढील अभ्यास करावा लागतो. त्यासाठी शिष्यवृत्ती मिळवावी लागते. तीसुद्धा मी एकटीच्या जोरावर, जर्मनीत बराच पत्रव्यवहार करून मिळवली. माझ्या विष्यातला एक तज्ज्ञ जर्मन प्रोफेसर गाईड म्हणून मिळवला. जोरात अभ्यास सुरू केला.

चक्रीवादळाचा जोर आधी वेगात असतो, नंतर घोंगावत घोंगावत वादळ हळूहळू शांत होत जातं तसं  दोन वर्षे झाली रे झाली, माझा अभ्यासाचा सगळा उत्साह हा हा म्हणता मावळला. संशोधनाचे काम हे एकहाती करावं लागतं. घरचं, दारचं सांभाळून सगळं करायचं म्हणलं की तारेवरची कसरत होते. तरीही अनेक बायका हे करतात, माझ्याच कित्येक मैत्रिणींनी हे केलेलं देखील आहे. त्यांचं मला प्रचंड कौतुक आहे. सहा-सात तास सलग लायब्ररीत बसून, घरी येऊन घरचं काम करून, सगळं सांभाळून त्यांनी पीएचडी संपवली आहे. याला चिकाटी लागते. माझ्याच्याने मात्र हे होईना. काही केल्या मला अनेक दगडांवर पाय ठेवणं जमेना, एकाग्रतेना धड अभ्यासही होईना. एक वर्ष टाळंटाळ केली आणि मग एक दिवस स्वतःशीच मान्य केलं की This is not my cup of tea. हा निर्णय घेताना खूप अवघड गेलं, कारण गेल्या दोन वर्षांची मेहनत समोर दिसत होती. पण ज्या क्षणी निर्णय घेतला त्याक्षणी मी सुटकेचा निःश्वास सोडला कारण त्या क्षणापासून मला दुहेरी जीवन जगायचं नव्हतं. अनेक दगडांवर पाय ठेवायचे नव्हते. माझी प्रायॉरिटी मला व्यवस्थित समजली होती. मन शांत झालं होतं. सगळी पुस्तकं, मटेरियल, कात्रणं बासनात गुंडाळली, लॅपटॉपवरचे फोल्डर डेस्कटॉपवरून डी ड्राईव्हवर गेले. माझ्या प्रोफेसरगाईड सकट अनेक लोकांना वाईट वाटलं पण जे झालं त्याला काही इलाज नव्हता.

काही गोष्टी आपल्या आयुष्यातून कधीच कायमच्या जात नाहीत. कुठेतरी बारीकश्या कानाकोपऱ्यात निपचित पडून राहतात. एखादं वादळ येतं आणि हे बारीक कण परत उडत येऊन आपल्यासमोर फेर धरतात. माझ्या बाबतीत असंच झालं. कोरोनाच्या स्वरूपात एक मोठं वादळ आलं आणि माझ्या संशोधनाचे बासनात गुंडाळलेले बारीक कण परत उडत येऊन परत माझ्यासमोर फेर धरून नाचू लागले. जणू ते मला म्हणत होते, “आता कुठे जाशील? आमच्यापासून पळून जात होतीस ना? घे. आम्हीच आलो परत तुझ्यासमोर.You have to face us.” याला कारण म्हणजे माझ्या संशोधनाचा विषय होता “Usage of internet and it’s different possibilities in online learning in foreign language classes especially in German as a foreign language in India.” मजा वाटली ना विषय वाचून? हा विषय मी आठ वर्षांपूर्वी अभ्यासायला घेतला होता, ज्यावेळी मला पुसटशीही कल्पना नव्हती की भविष्यात या मूर्खबावळटनालायक कोरोनामुळे शिक्षणक्षेत्रात ऑनलाईन टिचिंगला आभाळाएवढं महत्त्व येणार आहे. कोरोनाकाळ सुरू झाला तसे माझ्या मनात अनेक विचार येऊ लागले. मी संशोधन पूर्ण केलं असतं तर? माझ्या अभ्यासामुळे ऑनलाईन शिक्षणाच्या क्षेत्रात मी काही भरीव काम करू शकले असते तर? कोरोनामुळे शिक्षकगण ऑनलाईन शिक्षणात कोणत्याही तयारीला वेळ न मिळता अक्षरशः ढकलला गेला, माझ्या संशोधनामुळे मी तर आधीच तयार झाले असते! मला आणि माझ्यासोबत इतर अनेकजणांना त्याचा किती फायदा झाला असता!

हे आणि असे अनेक विचार मला त्रास देऊ लागले. लॉकडाऊन काळात एक दिवस मी हिय्या करून बासनात गुंडाळलेले सगळे कागद बाहेर काढले. त्यांच्यावरची धूळ साफ करताना मी संशोधनासाठी केलेली मेहनत आठवत होती. पण आता वाईट वाटून उपयोग नव्हता. जमेल तसे सगळे कागद वाचून काढले. डी ड्राईव्हवरचे फोल्डर परत एकदा उघडून पाहिले. मी अभ्यास केला होता त्यातलं बरंच काही आता outdate झालं होतं कारण इंटरनेट क्षेत्रात अक्षरशः दिवसागणिक क्रांती होत असते. पण ज्ञान कधीही वाया जात नाही. ऑनलाईन शिक्षण या विष्यातला थोडाफार बेस मला आधीच मिळाला होता. 

यानंतर मी रोज थोडाफार अभ्यास सुरू केला. सध्याच्या ऑनलाईन शिक्षणाबद्दल वाचू लागले. पण कितीही माहिती घेतली तरी पाण्यात पडल्याशिवाय जसं माणूस पोहायला शिकत नाही तसं प्रत्यक्ष शिकवायला लागल्याशिवाय शिक्षक शिकत नाही.

आमचे ऑनलाईन वर्ग सुरू झाले. चुकतमाकत सगळं शिकत होते. एका कलीगने  उत्तम कल्पना मांडली, की आपण चक्क धडे वाटून घेऊ आणि प्रत्येकजण आपली तयारी एका कॉमन ड्राईव्हवर शेयर करू. एकमेकींचं काम पाहून आपल्याला खूप काही नवीन शिकता येईल. आणि तसंच झालं. माझी तयारी आधीपासून थोडीफार सुरू होतीच. आता एकमेकींना साहाय्य करून सुपंथ धरायचे होते. याचा आम्हाला खूप फायदा झाला. आजही रोज नवनवीन काही शिकत आहोत, वेगळ्या पद्धतीने शिकवण्याची तंत्रं आत्मसात करत आहोत. या सगळ्या धबडग्यात ऑनलाईन शिक्षणाबद्दल मला जाणवलेले काही महत्त्वाचे मुद्दे-

◆ तंत्रज्ञानाचा योग्य वापर करायला शिकल्यास ऑनलाईन शिक्षण हे आनंददायी बनू शकते. प्रत्यक्ष वर्गाची मजा जरी यात नसली तरी इतर अनेकदा शक्य नसलेल्या अनेक गोष्टी आपण तांत्रिक पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोचवू शकतो. उदाहरणार्थ, फिटनेस या विषयाबद्दल वर्गात चर्चा सुरू असताना मला विद्यार्थ्यांना बसल्याजागी अनेक व्हीडियो दाखवता आले. प्रत्येक विद्यार्थ्याने त्याला त्या व्हिडियोत काय आवडले, काय नाही आवडले हे सांगितले. स्वतःच्या फिटनेससाठी आपण काय करतो याचा एक छोटासा व्हीडियो बनवून प्रत्येक विद्यार्थ्याने तो वर्गात शेयर केला. यामुळे वर्गात फार धमाल आली. शिक्षण आनंददायी झाले.

◆ अडचणी सगळ्यांना सारख्याच प्रमाणात येत आहेत पण शिक्षकांनी एकमेकांसोबत काम, ब्रेन स्टोर्मिंग, वर्गाची पूर्वतयारी केल्यास त्याचा सर्वांना खूप फायदा होऊ शकतो. यातून वेगवेगळ्या कल्पना आकार घेऊ शकतात. प्रत्येकाच्या कल्पकतेचा वापर होऊन लेक्चर प्लॅनिंग चांगले होऊ शकतो. Annotate या झूममधल्या एका तंत्राचा वापर विद्यार्थ्यांकडून कसा करून घ्यावा याची माहिती मला एका मैत्रिणीने उत्तमरीत्या समजावली. त्याचा वर्गात मला खूप फायदा झाला.

◆ शिक्षकांसाठी परवलीचा शब्द असतो पोर्शन! ऑनलाईन वर्गात प्रत्यक्ष वर्गापेक्षा फक्त ७०% पोर्शन पूर्ण होऊ शकतो, हे सत्य आहे. कनेक्टिव्हिटी, रेंजच्या असंख्य अडचणी दोन्ही बाजूंनी येतात. पण उरलेले ३०% ऑफलाइन शिक्षण पद्धतीने भरून काढू शकतो. उदाहरणार्थ, गुगल क्लासरुममधे वर्कशीट देणे, ती तपासणे, वॉट्सऍपवर विविध दृक्श्राव्य फिती पाठवणे, तिथे विद्यार्थ्यांशी जमेल तसा संवाद साधणे, त्यांचा वर्गातला इंटरेस्ट टिकवून ठेवणे, गुगल फॉर्म वर परीक्षा घेणे वगैरे. हे आपण नक्कीच करू शकतो.

◆ ऑनलाईन शिक्षणाचा जसा प्रसार होऊ लागला तसा शिक्षकांसाठी जगभर अनेक ऍप्समधे विशेष सवलत दिली. Kahoot, Mentimeter, Quizziz ही त्यातली काही ऍप्स. अशी इतर अनेक आहेत. याचा शक्य तितका वापर शिक्षकांनी करायला शिकावा. एखादी quiz बनवली तर आधी आपल्या शिक्षकमित्रांबरोबर ऑनलाईन खेळून पाहावी.  परत लहान होऊन मजा करण्यासारखं आहे हे, पण जमल्यास अवश्य करावं. त्याने शिकवण्यातली मजाही टिकून राहते. कारण शेवटी सगळ्या गोष्टी फक्त ज्ञानापाशी येऊन थांबत नाहीत तर आनंदापाशी येऊन थांबतात. जी गोष्ट आनंदाने आणि प्रेमाने शिकवली आणि शिकली जाते ती कायमस्वरूपी लक्षात राहते.

माझा अर्धवट राहिलेला अभ्यास  मूर्खबावळटनालायक कोरोनामुळे परत माझ्यासमोर उभा राहिला. तो मी परत पूर्ण करायला घेईन की नाही याची शाश्वती नाही पण ऑनलाईन अभ्यासक्रम या विषयात काहीतरी भरीव कामगिरी करायची इच्छा मात्र नक्कीच मला झालेली आहे. फक्त परकीय भाषेसाठी नाही, तर माझ्या मातृभाषेसाठी, मराठीसाठी देखील काहीतरी करायचे आहे. 

एखादी नवीन गोष्ट, नवीन व्यवसाय, शिक्षण, चांगली सवय, छंद, प्रोजेक्ट काहीही करायला घेतले असेल तर ते आपल्या परीने पूर्णत्वाला न्या. नाहीतर कधी, केव्हा, कुठे, कसा या अपूर्ण ठेवलेल्या गोष्टी तुमच्यासमोर कोणत्या स्वरूपात फेर धरून नाचायला लागतील याचा नेम नाही.

हे आत्मकथन सांगण्याचं प्रयोजन इतकंच…

Gauri Brahme
Latest posts by Gauri Brahme (see all)

Gauri Brahme

गेली वीस वर्षे पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागात जर्मन भाषेची अध्यापिका म्हणून काम करते. अमराठी लोकांना मराठी शिकवते. भरपूर लिहिते, वाचते, कलाकुसरीच्या वस्तू बनवते, खादाडी करते, इतरांना खिलवते. लेखिका म्हणून नावावर २ पुस्तकं जमा आहेत.

8 thoughts on “दिवाळी २०२० स्पेशल- २

  • November 12, 2020 at 6:21 am
    Permalink

    खूप छान लेख लिहिला आहे. 🙂

    Reply
    • November 12, 2020 at 6:40 am
      Permalink

      धन्यवाद 😊

      Reply
  • November 13, 2020 at 2:07 am
    Permalink

    तुम्ही PhD का नाही केलंत किंवा करत आहात का हा नेहमी प्रश्न असायचा मला…. तुमच्या क्षेत्रात PhD हे ऑपशनल न राहता कम्पलसरी होत आहे…. तुमची चिकाटी , जर्मन भाषे मधील आणि भाषा शिकवण्यामधील कौशल्य , ह्या क्षेत्रातील लोकांपर्यंतची पोहोच चांगलीच आहे… You deserve PhD in this subject.

    My wife Sonali has gone through this entire phase of twin kids , office , domestic work and she completed her PhD. I have seen very closly how difficult it is.

    I will suggest you to look into the possibilities for re prioritization and firm plan for PhD…

    Baki online learning baddal lihale ahe te khare ahech…

    All the best….

    Reply
    • November 24, 2020 at 2:51 pm
      Permalink

      Phd करून सध्या फायदा काहीच नाही. त्यामुळे लिखाणाकडे जास्त लक्ष देते आहे.

      Reply
  • November 15, 2020 at 4:18 am
    Permalink

    खुप छान

    Reply
  • November 16, 2020 at 1:34 pm
    Permalink

    खूप छान लेख.. I can relate myself to so many things 🙂

    Reply
  • November 29, 2020 at 4:40 am
    Permalink

    ऑन लाईन शिकणे व शिकवणे दोन्ही प्रकार लांबून पाहिल्यास अवघड .70टक्के पटले

    Reply
  • December 7, 2020 at 1:26 pm
    Permalink

    धन्यवाद

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!