दिवाळी २०२० स्पेशल- १३
सितारा लेखिका- अश्विनी आठवले
काही ठिकाणी टमटम…
तर काही ठिकाणी वडाप, विक्रम, सिक्ससिटर…
सुधारित नाव मात्र मिनिडोर…
मी या सितार्याची कायमची प्रवाशी…
सकाळी चौल ते अलिबाग आणि दुपारी अलिबाग ते चौल…
सितार्यासाठी घरुन चौल नाक्यावर यावे लागते…
या उन्हाळ्याच्या दिवसांत नाक्यावर उन्हात उभे राहून सितार्याची वाट बघणे म्हणजे दिव्यच…
एष्टीने जाण्यास हरकत नाही पण बसायला मिळेलच याची ग्यारेंटी नाही…
असो…
काही वेळ वाट बघितल्यावर सितारा नजरेस पडतो आणि हायसं वाटतं…
हात दाखवायचा..सितारा थांबवायचा या एष्टीच्या उक्तीप्रमाणे बसायला जागा असेल तरच तो थांबतो…
आता सितार्यात जागा असणं म्हणजे काय…
सिक्ससिटर म्हणून प्रचलित असणारा हा चक्क दहा सिट्स घेतो…
ड्रायव्हरच्या बाजूला दोन…मागच्या उलट्या आणि सुलट्या अशा दोन बाजूस प्रत्येकी चार चार…
एका सिटवर तिन्ही मजबूत प्रवाशी असतील तर चवथ्याची हालतच…
असो…
आता नाक्यावरून सितारा सुटतो…
आणि वारा लागल्यामुळे झालेला आनंद भाटगल्लीजवळ असलेला स्पीडब्रेकर ड्रायव्हरने खाडकन् उडवल्याने क्षणार्धात मावळतो…
सितारा रस्त्याने धावत असतो आणि मगाशी उन्हात उभं असताना व्हॉटसप बघण्यासाठी मोबाईलचा वाढवलेला ब्राईटनेस मी कमी करत असते…
तेवढयात ड्रायव्हर पंपावर डिझेल भरण्यासाठी थांबतो आणि माझ्यासकट सगळ्यांच्या कपाळाला आठ्या पडतात…
आमी दोन मिनीट आमच्या कामासाठी थांमवला असता तर थामला असता काय…प्रवाशांची कुजबुज…
डिझेल भरून बाहेर पडताच नेमकी अलिबागकडेच जाणारी एष्टी दिसते आणि आमच्या सितार्याच्या ड्रायव्हरची धडपड चालू होते…पुढे उभ्या असलेल्या सिट मिळविण्यासाठी…
सितार्याच्या ड्रायव्हरची एष्टीला ओव्हरटेक करायची हौस संपत नाही आणि एष्टी ड्रायव्हर त्याला ओव्हरटेक करून देत नाही…
या सगळ्या घाईमधे अनेक स्पीडब्रेकर येतात आणि जातात…
येऊन गेल्यावर कळतं की स्पीडब्रेकर होता…(दणका लागल्यावर)
तोपर्यंत नागाव येतं आणि शिवाजी पुतल्याजवळ थामव रं…असा कोणत्यातरी प्रवाशाकडून आवाज येतो..
तो उतरल्यावर आपल्याला व्यवस्थित जागा झालेली असते..छान वाटतं…
तेवढयात नागाव हायस्कूलजवळ कोणीतरी बारीक पोर चढतं आणि आपल्याला सरकल्यासारखं करावं लागतं…
सितारा सूसाट चाललेला असतो आणि आक्षीच्या पूलावर ट्रॕफीक लागतं…
काही वेळाने ट्राफिक सुटतं आणि सितारा वेग घेतो…
बेलीफाटा…बेलकडे
कुरूळचा टर्न तर समस्त सितारेवाल्यांसाठी अंधश्रद्धाच…
सितारा रस्त्यावर वळतो आणि आपण बसल्या जागेवर…
नंतर उजवीकडे कमळाचं तळं दिसतं…
मुंबईकर सितार्यात असले तर ‘वाव, लोटस, सो ब्युटीफूल’ अशा अगम्य भाषेत आणि सूरात म्हणतात आणि बाकी लोक त्यांना हसतात…
पुढे गेल्यावर हळूहळू अलिबाग येतं आणि उतरण्याची वेळ येते…
उतरलं की मग उचकडलेले केस आणि चेहऱ्यावर बसलेली धूळ यांचा प्रत्यय येतो…
मनोमन सितार्याचा राग येतो…
संध्याकाळी सितारेवाल्यांना खूपच डिमांड असते…
माझी शक्यतो सितार्याने संध्याकाळी घरी जायची वेळ येत नाही…
संध्याकाळी जिथे सितारेवाला प्रवाशी उतरवतो तिथेच जर आपण त्याला ‘रेवदंडा जाणार का’ असं विचारलं तर तो आधी नाही म्हणतो…नंतर तोच रेवदंड्याला जाणाऱ्या सितार्यांच्या लाईनीमधे जेव्हा दिसतो…तेव्हा अशी सटकते ना….
संध्याकाळी प्रवाशांना आणि सितारेवाल्याला दोघांना घरी जायची घाई असते…
त्यामुळे सगळे खड्डे आणि स्पीडब्रेकर माफ असतात…
असो…
एकंदरीतच सितारा प्रवास हा थोडासा त्रासदायक असला तरी सितार्यांची संख्या खूप जास्त असल्याने आपण वेळेवर आपल्या इच्छितस्थळी पोचू शकतो…
फक्त सितारेवाल्यांना एकच विनंती की स्पीडब्रेकर आल्यावर स्पीड खरंच ब्रेक करत जा आणि सितार्याबरोबरच सितार्यामधल्या प्रवाशांची सुद्धा काळजी घेत जा…
माझ्यासारख्या अनेक सितारा प्रवाशांना भावी प्रवासासाठी शुभेच्छा.
- देवदूत…डॉक्टर आणि ड्रायव्हर - September 18, 2021
- रक्षाबंधन… - August 23, 2021
- एक ओळख..अशीही… - August 20, 2021
❤️❤️ खरं आहे, सितारा कितीही नको नको म्हटलं तरी टाळता येत नाही. रायगडची खासकरून आपल्या अलीबागचीच फक्त खासियत आहे हा सितारा / टमटम / डगडग
हो😊 Thank you👍