दिवाळी २०२० स्पेशल- २४

देऊळ बंद                   

लेखिका- अश्विनी आठवले

तिला जाग आली तेव्हा पहाटे चार वाजलेले…

तिचा तिलाच विचार पडला की एवढ्या लवकर मला कशीकाय जाग आली…

एरवी सकाळी आठ वाजतांचा पण गजर लावावा लागतो…

मग तिला आठवलं, आज घटस्थापना आहे…

दरवर्षी नवरात्रात ती आणि आळीतल्या तिच्या मैत्रिणी पहाटे लवकर उठून आंघोळ करून गावातल्या देवीच्या म्हणजेच ग्रामदैवतेच्या दर्शनाला जायच्या…

तिने विचार केला, पण यावर्षी काहीच नाही…

देऊळ तर बंदच आहे…

तिने परत झोपायचं ठरवलं…

पण अंथरुणात तळमळत राहिली…

या कुशीवरून त्या कुशीवर…

कितीही प्रयत्न केला तरी झोप येईना…

शेवटी ती उठली…

अंघोळ करून तिने देवळापर्यंत जायचा निर्णय घेतला…

तिकडे गेल्यावर बघू काय ते, असा विचार केला…

अगदीच काही नाही तर बाहेरून तरी दर्शन घेताच येईल…

तिच्या अंगात उत्साह संचारला…

आंघोळ करून ती घराबाहेर पडली आणि तिने देवळाच्या दिशेने पावलं उचलली…

अपेक्षेप्रमाणे देऊळ बंदच होते…

तिने हात जोडले…

डोळे मिटले…

तेवढ्यात कसलातरी आवाज आला…

तिने डोळे उघडले तर देवळाचा पुजारी देवळाचं कुलूप उघडत होते…

तिने त्या पुजारी आजोबांना विचारलं..देऊळ उघडताय?

ते होम्हणाले पण पुढे असंही म्हणाले की भक्तगणांसाठी दर्शन बंद आहे पण मला साफसफाई करून रोजची पूजा करावीच लागते…

तिने क्षणाचाही विचार न करता आजोबांना विचारले, आजोबा मी तुम्हाला साफसफाईला मदत करू?

दोन सेकंद थांबून आजोबा म्हणाले, हो, कर मदत, देवळाचा गुरव येतो पण यावर्षी तो त्याच्या गावाला गेलाय…

हे ऐकून तिच्या आनंदाला पारावार उरला नाही…

क्षणार्धात ती देवळात पोचली…

झाडू हातात घेतला…

देवीच्या मूर्तीसमोर नतमस्तक झाली…

जगदंबा माते की जय!!!!

Ashwini Athavale

Ashwini Athavale

स्वतः बद्दलची माहिती- अलिबाग, रायगड येथे JSM महाविद्यालयात प्राध्यापिका. वाचन, लेखनाची आवड आहे. हलक्याफुलक्या कथा, आत्मचरित्र लिहायला आवडतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!