जिगसॉ जिंदगी- पत्र क्रमांक 1

प्रिय आई,
बरेच दिवसांनी-नव्हे, वर्षांनी पुन्हा एकदा तुला पत्र लिहायला घेतलंय. पाचेक वर्षे झाली असतील, नाही? त्यावेळी मी म्हणाले होते की तुझ्याशिवाय काढलेली 25 वर्षे (खरंतर आता 30 वर्षे ) अशी काही पत्रांमध्ये मावणार नाहीत. पण खरं सांगू आई मला तुझ्याशी फक्त तुझ्याशिवाय काढलेल्या वर्षांविषयीच बोलायचं आहे असं आता नाही वाटत. तेव्हा तुला पत्र लिहिणारी छबी बालपणात रमलेली होती. तुझ्याशिवायच्या बालपणाच्या आठवणींनी व्याकुळ झालेली होती. पण आता ना तुझ्याशी तेव्हा बोलल्यापासून मला त्यातून बाहेर पडल्यासारखं वाटतंय अगं. आता मला फार वेगळं काहीतरी बोलावंसं वाटतं. तू आहेस जवळपास हे गृहीत धरून सतत बोलावंसं वाटतं. जे बोलायचं आहे ते हक्कानं जिथं बोलू शकेन अशी जागा मला फक्त तुझ्याजवळ सापडते. म्हणून फिरून पुन्हा तुझ्याजवळ आले आहे. तुला कधी कधी माझी बडबड निरर्थक वाटेल, कधी कंटाळा येईल, कधी काळजी वाटेल आणि क्वचित कधीतरी त्याच बडबडीतून काहीतरी मोलाचंही आहे असंही वाटू शकेल. यातलं काहीही झालं ना तरी तू माझ्यासाठी कधी न्यायधीशाच्या खुर्चीत बसून मला चूक बरोबर ठरवण्याच्या फंदात पडणार नाहीस हे मला ठाऊक आहे. मला हेच हवंय अग. कधी कधी चूकबरोबरच्या पलीकडे जाऊन विचारांच्या प्रदेशात उगाचच हिंडून येता आलं पाहिजे ना ! तसं झालं नाही तर मु आतल्या आत कुजत राहीन याची भीती वाटते आई. मला अवेळी कुजायचं नाहीय आई… मला जपायचं आहे स्वतःला. आणि त्यासाठी मी बोलत राहणं ही माझी गरज आहे. तशी ती सर्वांचीच असते. पण कुणाची गरज तीव्र असते कुणाची नाही. माझ्यासाठी माझी ही गरज श्वासांचं काम करते… आणि मला जन्म देणाऱ्या तुझ्याशिवाय मला हे श्वास कोण पुरवू शकेल?
हं तर सांगायचं हे की काही दिवसांपूर्वी ना एका मैत्रीणीच्या सासूबाईंची तब्येत बिघडली. त्यातच त्या गेल्या. शेवटचे तीनचार दिवस तर अजिबात शुद्धीवर नव्हत्या बिचाऱ्या. ग्लानीतच काहीतरी बडबडत होत्या. अगदी लहानपणीच्या फार जुन्या कसल्या कसल्या आठवणी त्यांच्या बोलण्यातून डोकावत होत्या. आणि त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्यांना त्यातलं काहीही माहीत असण्याची शक्यताच नव्हती. त्या कधी फार काही बोलल्याचं कुणालाच स्मरत नव्हतं. सदैव नवऱ्याची सावली बनून राहिल्या होत्या त्या. नवऱ्याच्या आवडीनिवडी बघणे, घरदार चुलमूल नातीगोती सांभाळणे ह्यात अख्ख आयुष्य घातलं त्यांनी. स्वतःचं असं वेगळं अस्तित्वच नव्हतं त्यांना. मैत्रीण सांगत होती की त्यांना स्वतःसाठी स्वतःच्या आवडीने साडी निवडण्याचीही सवय नव्हती. “तूच घे हो तुझ्या आवडीने. नेसेन मी.” असं म्हणायच्या.
शेवटच्या क्षणांमध्ये मात्र ग्लानीत असतानाच्या मोकळ्या अवकाशात कितीतरी मित्रमैत्रिणींची नावे घेतली त्यांनी ! अगदी बालपणी लेखणीसाठीच्या छूटपूट भांडणांची आठवण होऊन किंचितसं हसूही ओठांवर येऊ लागलं. त्यातच सारखं ‘बाळू बाळू’ म्हणून सतत कुणालातरी हाका मारणंही सुरू झालं. हे हाका मारणं हळूहळू वाढतच गेलं. त्यावेळी बाळू कोण हे मात्र कोणालाच माहीत नव्हतं. नात्यात दूरवर ‘बाळू’ नावाचं अगदी कोणीही नाही. मैत्रीण सांगत होती अगदी तेरा चौदा वर्षे वय असताना तिच्या सासूबाईंचं लग्न झालं. सासरे आणि सासूबाई, दोघांमध्ये 14 वर्षांचं अंतर. त्यांना शिकायचं होतं खूप पण वडिलांच्या निर्णयासमोर कुणाचं काहीच चाललं नाही.
हे सगळं ऐकून मला ना परकर पोलक्यातली एक नाजूकशी नुकतीच वयात येत असलेली स्वप्नाळू पोर लगेचच आपल्यापेक्षा दुपटीने मोठा असलेल्या नवऱ्याच्या शेजारी जाऊन बसल्याचं चित्र दिसलं. त्या चित्रातच आजूबाजूला तिचे सवंगडीही होते पण आता तिला त्यांच्याकडे बघण्याची मनाई होती. बालपण गळून एक अवेळी पोक्तपण मंगळसूत्राचं रूप घेऊन तिच्या गळ्यात कायमचं अडकलं.
हे सगळं वाचशील आणि तू म्हणशील “ह्यात काय नवल?” खरंय तुझं.तुझ्या काळातही होतंच ना गं हे असं लहान वयात लग्न वगैरे. तुला या चित्राची नवलाई नसेलच. पण आई ऐक ना, मला बोलायचंय ना तो मुद्दाच वेगळा आहे अग.
तू वाचलंस ना माझ्या मनातलं चित्र? तुलाही दिसतंय ना ते माझ्या शब्दातून? त्यातील बाजूलाच असणाऱ्या त्या पोरीच्या सवंगड्यांकडे बघ, त्यातच कुठेतरी ‘बाळू’ आहे. दिसला ना तुला? तिनं जाणतेपणानं फिरवलेली नजर बघ. आई नजर फिरवून घेता येते गं…पण मन नाही फिरवून घेता येत. बहिणाबाईंनी सांगितलंय तसं ते ओढाय ओढाय होत रहातं. नको त्याच दिशेला घोटाळत राहतं.
आतल्या आत त्या पोरीचं मन बाळूच्या दिशेनं धावत असेलच ना गं? त्याच्या आठवणीत घोटाळतही असेल. पण मोकळेपणाने ह्यातलं कधीही कुठेही बोलता आलं नसेल. मनातलं सगळं बोलता येण्याजोगी जागा आपल्याकडे असणं हाही किती मोठा दिलासा असू शकतो आई ! आपलं ऐकून घेणारा कान निव्वळ ऐकणारा असावा. ऐकलेला ऐवज कानांच्या कुडीत जपून ठेवणारा असावा हेही महत्वाचंच नाही का?… त्याच ऐवजाची मौक्तिकं वाच्यतेतून उधळून लावणाऱ्या कानांचा आधार वाटण्यापेक्षा भीतीच जास्त वाटते. भरवशाचा कान त्या पोरीला कधी सापडलाच नसावा. आणि म्हणून मरणाच्या काठावर कोणत्याही शब्दाच्या वाच्यतेच्या भीतीचं दडपण सुद्धा नकळत दूर झालं आणि मनात साचलेल्या  तुंबलेल्या सगळ्या आठवणी भराभर शब्द होऊन बाहेर पडू लागल्या असतील.
असो. तू म्हणशील कुठून कुठेही पोचते ही पोरगी ! पण पोचावं लागतं आई. दिसतं त्याही पलीकडे एक जग असतं. ते आपण धडपड केल्याखेरीज अनुभवता येत नाही हे आताशा जाणवू लागलं आहे. आणि मी धडपड करायचं ठरवलं आहे. मला जगणं समजून घ्यायचं आहे. त्याच्या गुणदोषांसकट समजून घ्यायचं आहे.
माझी धडपड आताशा बांधून ठेवणं मला अशक्य झालं आहे आई. निव्वळ बांधून ठेवून एखाद्या निरर्थक ग्लानीच्या हातात आपली सगळी गुपितं सोपवण्यात कसलं आलंय शहाणपण असंही हल्ली वाटू लागलं आहे. त्यामुळे माझी बडबड ऐकणारे कुणाचे कान किंवा मी लिहिलेलं वाचणारे कुणाचे डोळे वाच्यता करणारे असले तरी हरकत नाही. माझ्या सगळ्या संवेदना सगळे विचार जाणतेपणानं शब्दांच्या हातात सोपवण्याचा विचार मी करते आहे. तू आहेस सोबत हा विश्वास आहेच.
आणि हो, पत्राच्या पाकिटावर लिहिलेली अक्षरे JJ वाचलीस का?… ‘ती कशाला लिहिलीस?’ असं विचारशील तू आता. हो ना?… अग माझ्या धडपडीचं नाव आहे ते. ‘जिगसॉ जिंदगी‘… हल्ली अनुभवायला मिळालेले आयुष्याचे काही तुकडे जाणिवांच्या आणि विचारांच्या कुठल्याशा खाच्यात फिट्ट बसतात का हे तपासून बघण्याचा नाद मला लागला आहे बघ. ते तसे तंतोतंत फिट्ट बसले ना की मग पझल सोडवल्याचं पोरकट समाधान पदरात पडतं. खरंतर असे अनंत तुकडे आता माझ्यासमोर पसरून आहेत. आणि त्या प्रत्येक तुकड्यासाठी तंतोतंत बसणारी परफेक्ट खाच मला आता शोधायची आहे. मी तो पसारा पिंजून काढते आहे आणि तरीही एकात एक बसणारे काही तुकडे सोडले तर अजून खऱ्याखुऱ्या चित्रातलं फार काही  हाती लागलेलं नाहीय. कदाचित तुकड्यातुकड्यांना जोडून चित्र पूर्ण करण्याचा हा नाद, हा खेळ थकवणारा असू शकतो. पण मला असं थकायला आवडेल हे जाणवू लागलं आहे. थकल्यावर निवांत झोप लागते आई. मग कुठलाच विचार जाणिवेच्या कक्षेत प्रवेश करू शकत नाही. मिटलेल्या डोळ्यांच्या बंद पडद्याआत मनाच्या गाभाऱ्यात फक्त तू असतेस…
मला सतत लिही म्हणतेस.
मी म्हणूनच लिहीत रहाते. आणि हे पझल सोडवत रहाते.
तुझीच-
छबी
ता. क. :-  परवा त्याच मैत्रिणीचा पुन्हा फोन आला होता. मैत्रिणीचे चुलतमामेसासरे जे परदेशात वास्तव्यास असतात ते नुकतेच इंडियात येऊन गेले म्हणे. परत जाण्यापूर्वी हिच्याकडे भेटायला आले होते. त्यांच्यासोबत परदेशातच स्थायिक झालेल्या त्यांच्या एका जिवलग मित्राचं नाव ‘बाळू’ होतं म्हणे….
Image by Free-Photos from Pixabay 
Vinaya Pimpale_w

Vinaya Pimpale_w

सहायक अध्यापिका (इयत्ता पहिली ते चौथी) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खापरी कान्होबा जिल्हा वाशिम पत्रमालिका, कथा, कविता आणि गझललेखन. मित्रांगण, विवेक आणि रत्नागिरी एक्स्प्रेस इत्यादी दिवाळी अंकात कथालेखन केले आहे. दैनिक दिव्य मराठी, पुण्यनगरी तसेच विवेक साप्ताहिक, युवाविवेक इत्यादींमध्ये लेख प्रसिद्ध. 'भूक' ह्या लघुतमकथेला लोकप्रिय लघुतमकथेचा तसेच, 'जाग' ह्या कथेकरिता सर्वोत्कृष्ट लघुकथा लेखनाचा पुरस्कार प्राप्त.

3 thoughts on “जिगसॉ जिंदगी- पत्र क्रमांक 1

  • December 11, 2020 at 6:26 pm
    Permalink

    Jigsaw नाव एकदम समर्पक!! आवडला

    Reply
    • December 13, 2020 at 9:13 am
      Permalink

      अप्रतिम लिखाण !

      Reply
      • December 14, 2020 at 4:16 pm
        Permalink

        धन्यवाद🙂

        Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!