जिगसॉ जिंदगी- पत्र क्रमांक २

प्रिय आई,
परवा ना मावशी माझ्याशी बोलली. काही विशेष नाही अगदी सहजच. पण बोलता बोलता मला म्हणाली- “4 मार्चला तू व्हाट्सएप स्टेटसला शशीचा फोटो नाही ठेवलास?” मला खूप गंमत वाटली अगं. तीस वर्षांपूर्वी तू 4 मार्चला माझ्यापासून कायमची दूर गेलीस म्हणून मी त्या दिवशी तुझा फोटो स्टेटसला ठेवेन अशी तिची समजूत.
आई, हल्ली ना आपण कोणत्या मूडमध्ये आत्ताचा क्षण घालवतो आहोत हे स्टेटसला दाखवण्याची फॅशनच आली आहे बघ. आनंद झालाय ? ठेव स्टेटस. दुःख वाटतंय? टाक रडके फोटो, ठेव स्टेटस. प्रेमात पडला आहात?, लग्न ठरलंय?, ब्रेकअप झालाय?, मेरिट मिळवलंय?, जवळच्या कुणाचातरी वाढदिवस आहे?  एक ना दोन हजार कारणांसाठी स्टेटस ठेवतात लोक. हातात आलेल्या ताटातील दोन घास खावेत निवांत बसून तर आधी फोटो काढून स्टेटसला टाकतात आणि मगच जेवतात लोक. त्यामुळे मावशीच्या प्रश्नात काही चूक आहे असं नाही मला वाटत. आणि तुझा फोटो न ठेवून माझं काही चुकलं आहे असंही मला नाहीच वाटत.
काय आहे की ज्याला जे पटतं ना त्याने ते करावं. पण असं होत नाही ही खरी खेदाची बाब आहे. जो तो आपापल्या मनाने वागतो, जसं वागायचंय तसं वागतो आणि दुसऱ्या विषयी मत बनवताना आपले नियम लावतो. मला वाटतंय ना की स्टेटस ठेवल्याने प्रेम दाखवता येतं मग तोच नियम मी इतरांना लावणार. हे काही फक्त मावशी म्हणाली म्हणून मनात येतंय असं नाहीये. तिने तिला काय वाटतं हे बोलून दाखवलं पण स्टेटस बघणारे आणि बोलून न दाखवणारेही कित्येक लोक असतातच ना ! समोर न बोलता माघारी बोलणाऱ्यांचीही एक जमात असतेच. त्यापेक्षा डायरेक समोरासमोर बोलून विचारून मोकळे होणारे लोक परवडले. निदान सभोवताली जे चाललंय त्याच्या कसोटीवर आपण नेमके कुठे अनफिट आहोत हे कळतं. त्यात फिट बसायचं तर आपल्या वाट्याला आलेला जगण्याच्या तुकड्याचे खाचे घासून गुळगुळीत करून घ्यावे लागतात.
असो… ह्या एकच एक विषयावर फार बोलतेय का मी? तर तो बंद करूया.
आणखी एक नवीनच गोष्ट तुला सांगायची आहे. आता ना अण्णांना दादूने स्मार्ट फोन घेऊन दिलाय. मग काय त्यांचंही व्हाट्सएप झालं सुरू ! आत्ता परवा मला माझाच जुना फोटो पाठवला आणि त्याखाली लिहिलं “मिनी तुजा फोटो.” मला फार भरून आलं अग. त्यांच्या ‘मिनी तुजा फोटो’ ह्या तीन शब्दात सुद्धा केवढा आनंद भरलेला होता !  नेमका कशाचा आनंद असेल हा? आपल्याला व्हाट्सएप वापरता येतंय याचा? की फोटोत छोटी मिनी दिसतेय याचा? अशा छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मिळवायला हल्ली विसरलेय मी असं माझं मलाच जाणवत राहिलं. पण अण्णांचा तो मेसेज आणि त्यांनी पाठवलेला फोटो पाहून ना फार छान वाटत राहिलं दिवसभर. तू नव्हतीस त्या दिवसात अण्णाच तर होते ना सोबत !… आज रोजी पाहिलं तर तुझी सोबत फक्त 10 वर्षे लाभलेली आणि अण्णा मात्र गेले चाळीस वर्षे आमच्या सोबत आहेत. त्यामुळे त्यांचा मेसेज वाचून मागच्या सगळ्या आठवणी डोळ्यांसमोरून सरकत राहिल्या चलचित्रपटासारख्या.
माझे केस विंचरून दोन घट्ट वेण्या घालून देणारे अण्णा, सायकलवर डबलसीट बसवून मला शाळेत पोचवणारे अण्णा, अभ्यासावरून रागावणारे अण्णा, परीक्षेच्या दिवसात स्वतः स्वयंपाक करून गरम गरम जेवू घालणारे अण्णा. त्यांनी नाही कधी जाणवू दिलं की तू नाहीयेस आमच्याजवळ. ते आमची आईही झाले आमच्यासाठी.  आजारपणात पाठीशी उभे राहिले… इतकंच काय माझ्या बाळंतपणात नातवाचं लंगोट सुद्धा धुतलं त्यांनी. मग मी का म्हणू की तू नाहीयेस माझ्याजवळ? सगळ्यांना सगळं माहीत असलेल्या गोष्टी निव्वळ दाखवण्यासाठी उगाळण्यात काय अर्थ?
तर हे असं आहे. अण्णा आहेत हे खूप आहे आमच्यासाठी. जाणाऱ्याला नाही थांबवता येत आणि जिथे तू गेली आहेस तिथून कुणालाही परत नाही येता येत  हे शहाणपण वाढत्या वयानं शिकवलं आहे. म्हणजे याचा अर्थ तुझी आठवण येतच नाही असा नाही गं. पण सारखं सारखं तुला आठवून रडत बसावंसं नाही वाटत आजकाल. जे हातात आहे त्याला घट्ट पकडून ठेवावं वाटतं. खरंतर असं पकडून ठेवल्याने हातात काही राहील हा समज बालिश आहे. एकेक क्षण रेतीसारखा असतो. जितका घट्ट पकडू तितका लवकर सटकतो. हं… पण आपण कशाचाही विचार करायचा नाही. आनंद कसा देता घेता येईल ते बघायचं. नाही का?
मला हळूहळू हे जमू लागलं आहे असं वाटतंय आता. कुणालाही दिसतं तितक्यावरून जज करणं तर कधीचंच सोडून दिलं आहे मी. आणि म्हणूनच मला कुणाच्या स्टेटसवरून त्याच्या वागण्याचे अंदाज नाही बांधता येत… किंवा बांधावेसे नाही वाटत. आणि गंमत म्हणजे मुद्दाम दररोज सर्वांचे स्टेटस बघत बसण्याचा चाळा सुद्धा नाही लागलेला.
बघ फिरून पुन्हा तिथेच आले मी. स्टेटस यंव आणि स्टेटस त्यंव ! बाकी तू आत्ता असतीस तर अण्णांचं स्टेटस जरूर पाहिलं असतं मी… तेव्हा मला ते पूर्ण वाटलं असतं. मला तू त्यांच्या स्टेटसमध्ये हवी आहेस….
तू माझ्या जगण्याचा हा अपूर्ण तुकडा पूर्ण करायला येऊ शकतेस का गं आई?
तुझीच
छबी
ता. क. :- 1)मदर्स डे ला अण्णांचा फोटो जरूर ठेवला होता मी स्टेटसला. आणि कॅप्शन होतं- “आमच्यासाठी सदैव आमची आई असलेले अण्णा…”
2) तू गेलीस ना त्याच तारखेला एका जिवाभावाच्या मैत्रिणीचा वाढदिवस असतो. दे दणक्यात साजरा करतो आम्ही. आत्ता तू नाहीस माझ्याजवळ या बोचऱ्या जाणिवेचा परिणाम तिच्या असण्याच्या जाणिवेवर नाही होऊ देऊ शकत मी.
(मिनी खुप शहाणी मुलगी आहे असं नेहमी म्हणायचीस तू. तुला खोटं कसं ठरवू?)
Image by Free-Photos from Pixabay 
Vinaya Pimpale_w

Vinaya Pimpale_w

सहायक अध्यापिका (इयत्ता पहिली ते चौथी) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खापरी कान्होबा जिल्हा वाशिम पत्रमालिका, कथा, कविता आणि गझललेखन. मित्रांगण, विवेक आणि रत्नागिरी एक्स्प्रेस इत्यादी दिवाळी अंकात कथालेखन केले आहे. दैनिक दिव्य मराठी, पुण्यनगरी तसेच विवेक साप्ताहिक, युवाविवेक इत्यादींमध्ये लेख प्रसिद्ध. 'भूक' ह्या लघुतमकथेला लोकप्रिय लघुतमकथेचा तसेच, 'जाग' ह्या कथेकरिता सर्वोत्कृष्ट लघुकथा लेखनाचा पुरस्कार प्राप्त.

2 thoughts on “जिगसॉ जिंदगी- पत्र क्रमांक २

  • December 11, 2020 at 6:23 pm
    Permalink

    खूप छान!! Very touchy…

    Reply
    • December 14, 2020 at 6:02 am
      Permalink

      धन्यवाद 🙂

      Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!