सासू खट्याळ, जावई नाठाळ (भाग १/३)
” अहो , चलताय न , उशीर होईल आपल्याला . ” चंदा ने सदानंद ला गदागदा हलवत म्हटलं . सदा ला काहीच फरक पडला नाही . पोटभर तुडुंब जेवून सुस्त पडलेल्या अजगरा सारखा सदा सोफ्यात लोळत क्रिकेट मॅच बघत होता .
चंदा त्याला पाघळलेला बेसनाचा लाडू म्हणायची . ..गरम असतांना वळला तर कसा पसरतो , तसा आपला नवरा सोफ्यात पसरतो असे वाटे तिला .
” अहो , ती बघा , झिया आपल्या ‘डॉगी’ ला चक्क कडेवर घेऊन फिरायला जातीये . ”
” कुठे , कुठे ?” म्हणत सदा ताटकन उठला आणि बाल्कनीत जाणार इतक्यात चंदा गुरकावली ” तिकडे कोणीही नाहीये , मुकाट चपला घाला पायात .” आता मात्र सदा चिडला . चिडला म्हणजे कसा , त्या कार्टून शो मध्ये कसं , टॉम पुढे पिटुकला जेरी कमरेवर हात ठेवून त्याला “”टशन””” देतो , तसा सदा तिच्याकडे बघू लागला .
” अहो आई वाट बघतेय , “””ऑस का s य हो कोरटॉ “””” असे ओठाचा चंबू करत ती म्हणाली , मग त्याला जाणे भाग पडले . ….तीच्या ह्या लाडिक बोलण्याला भुलून नाही , तर पुन्हा तिने असले भयानक अस्त्र आपल्यावर फेकू नये म्हणून त्याने पटकन चपला पायात घातल्या .
” अहो s , ल्याच च्या किल्ल्या कोण घेणार ? ”
यांत्रिकपणे त्याने किल्ल्या घेतल्या .
….कसं मेलं माझ्याच नशिबी हे ध्यान आलं…..असा कटाक्ष टाकून ती बाहेर पडली .
सुटीच्या दिवशी आराम सोडून सासूबाईंकडे जायचं म्हटलं की सदा असाच कंटाळा करी आणि फरफटत नेल्या सारखे बायको त्याला घेऊनच जाई . सासरेबुवा तसे मिश्किल आणि स्वभावाने गरीब होते . पण सासूबाईची गडद छाया सासरेबुवांवर पडल्याने त्यांची
“” पर्सन्यालिटी”” झाकोळलेलीच होती .
अर्धग्लानी अवस्थेत सदा खुर्चीत बसून होता . सासरेबुवा कुठलातरी दरिद्री सिनेमा बघत होते . कुटुंबातील एकमेव सुसह्य सदस्य , मेव्हणा चंदू गावी गेला होता , सुपारीचा हिशोब करायला .
” अहो , आता टीव्ही त तोंड घालायचे तेवढे बाकी राहिले तुमचे . किती चिटकून बसलाय . ” इति सासूबाई .
” अग तुझ्या पहाडी आवाजापुढे मला काहीच ऐकू येत नाहीये ना ! ”
” जावई माणूस आलंय घरी , चार शब्द बोला त्यांच्या सोबत …”
नशीब जावई “”” माणूस “” आहे हे मान्य आहे तर ! सदा ला वाटले .
जेवण वाढतांना सासूबाई सारख्या सदा कडे बघत होत्या . जावईबापू ‘ लावून ” आलेत की काय अशी त्यांना शंका येत असावी .
” सदाराव , तुम्ही किनई हरिद्वार ला जाऊन जरा शरीर स्वास्थ्यासाठी ‘ध्यान , आहार आणि विहार ‘ असा आठ दहा दिवसांचा वर्ग करून या बरं . फार सुस्ती बरी नाही . …..ह्या सासरेबुवांना ही घेऊन जा सोबत . ” आणि खी ! खी! करून हसल्या त्या चक्क .
” काहीतरीच काय !!! विचित्र बाई !! मला ऑफिस मधून सुटी मिळणे शक्य नाही . आज रविवार आहे , छान आराम करु की इथे येऊन दिवस खराब करुन घेऊ ?…….. असे त्याने मनातल्या मनातच म्हटले . बाहेर फक्त
” हम्मम ” इतकाच आवाज आला .
” आमच्या चंदाला पण घेऊन जा सोबत . ती देखील चार योगासने शिकेल बिचारी . ”
“”” बिचारी???””” आपली लेक बिचारी आणि जावई काय मग खाटीक ? असे त्याचे मन ओरडत होते . आणि तुमच्या चंदा ला सोबत न्यायचं तर मग ‘ध्यान’ लावायला तिथे कशाला जायचं ? ध्यान तर इथे ही सोबत आहेच की …( हे सगळं मनात बरं !!)
” आई , भारी आयडिया आहे !! मला करायचाय असा कोर्स हरिद्वारला जाऊन . यांना राहुदेत इथेच . बाबा आपण तिघेच जाऊया .” चंदा म्हणाली आणि सासूबाईंनी ते फारच मनावर घेतलं .
” चंदे , आपण तर जाऊ ग , पण तुझ्या नवऱ्याला इथे एकटे का रहायचे आहे ? लक्ष ठेव बाई . ”
” नाही ग आई . यांचं खूप प्रेम आहे माझ्यावर . आणि काही लफडं करायला न , हिम्मत लागते . ” यावर दोघी मायलेकी जोरात हसल्या .
****** सदा ची अवस्था ‘स्वर्ग दोन बोटे’ अशी होती . पूर्ण 700 स्क्वे . फु . वर आपलेच राज्य !! आहाहा !! त्याने लगेच आपला बालमित्र दिवाकर ( दिव्या) ला फोन केला .
” कुठाएस दिव्या !! हा , हा , आज मै उपर , आसमा नीचे ..”
” चंदा वहिनी माहेरी गेल्यात वाटतं . पण लेका , मी तुझ्याइतका भाग्यवान नाहीये रे …. सासूबाईंना घेऊन त्यांच्या कुलदेवतेच्या दर्शनाला आलोय ”
दिवाकर नाही म्हटल्यावर कुणाला बोलवावे असा विचार करत असतानाच बेल वाजली . सदा ने दार उघडले . …त्याचा त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसेना . दारात एक अतिशय देखणी , उंच , मॉडर्न आणि आकर्षक तरुणी उभी होती .
” आपण कोण ?” आतून आनंदाच्या उकळ्या झेलत त्याने विचारले .
डोळे फडफडवत ती उत्तरली ,
” मी सोफिया . आत येऊ का ? ” त्याला थोडेसे विचित्र वाटले , पण खास सुटी घेऊन घरी राहावे आणि असे सुख अलगद दारी यावे ह्या सुंदर योगायोगात तो अजून गटांगळ्याच खात होता .
ती आत आली . आल्याबरोबर तिने कोपऱ्यातील झाडू घेऊन काही मिनिटातच घर झाडून टाकले , फडक्याने पुसून टाकले . आपल्या कामवाल्या मावशीला इतकी देखणी मुलगी किंवा भाची असल्याचे आपल्याला कसे माहीत नाही याचे त्याला तीव्र दुःख झाले .
सोफियाने गचाळ झालेला ओटा , गॅस शेगडी आणि मोरीतील भांडी चुटकीसारशी साफ करून टाकली . जाळे काढले , बाल्कनीत कुंड्यांना पाणी घातले , आणि ती आत बेडरूम मध्ये गेली .
तिच्या सगळ्या यंत्रवत वाटणाऱ्या हालचाली अतिशय
“” बारकाईने”” बघत असलेला सदा आता एक्साईट झाला होता .
तिने बेडवरील चादर झटकली , उश्यांच्या खोळी काढल्या , आणि वॉशिंग मशीन मध्ये टाकायला गेली , की सदा ने गादीवर अंग टाकले .
© अपर्णा देशपांडे
क्रमश:
पुढील भागाची लिंक- सासू खट्याळ, जावई नाठाळ (भाग १/३)
- आत्तु-भाग ३ (शेवटचा भाग) - June 17, 2022
- आत्तु- भाग २ - June 7, 2022
- आत्तू- भाग १ - June 3, 2022
भारीच!👌😂
Ohh
Thank you
👍👌