सासू खट्याळ, जावई  नाठाळ (शेवटचा भाग)

आधीच्या भागाची लिंक- सासू खट्याळ, जावई  नाठाळ (भाग २/३)

” ए सोफिया , तुला कुणी बनवले , कुणी इथे पाठवले मला काही देणं घेणं   नाही . पण तू आता जा . तुमची काय फिस असते ? मी देतो , पण तू जा बाई . ”

” योगासनं शिकायचे राहिलेत ना ! ”

त्याच्या म्हणण्याला बिलकुल भीक न घालता ती त्याचे पाय ओढू लागली

तसा त्याने चंदा च्या नावाचा धावा सुरू केला .

” चंदा s , चंदा s , मला वाचव ग !!”

आणि काय आश्चर्य ! मागून चंदा तर नाही  पण दिवाकर आला होता  .

काय तरतरी आली सदाला ! ,

धप्पकन कपाटावरून खाली उडी मारून तो त्याच्या मागे लपला .

” अरे , असा लपटपटतोय काय ? ती बिचारी योगा शिकवते म्हणतेय ”

”   तूला काय जातंय म्हणायला ! ह्या तुझ्या बिचारीने माझे सगळे पुर्जे ढिल्ले केलेत . मी केव्हाच तिची बॅटरी काढून तिची हवा फुस्स केली असती . पण सासूबाईंनी खास माझ्या सेवेसाठी हिला पाठवलिये . सासर च्या कुत्र्याला देखील  ‘ अहो हाड ! ‘  म्हणावे लागते न . मग ही तर ….”

हे बघा  ताई , तुम्ही तुमचे आजचे कामाचे पैसे घेऊन जाऊ शकता . ”

सोफियाने कपड्यातून स्वाईप मशीन काढले . सदा ने कार्ड वापरून तिचे पैसे दिले . ठुमकत ठुमकत सोफिया गेली . जाताना एक उडते चुंबन फेकून गेली .

” काय येडा आहेस रे सदा ! ही काय खरच रोबोट वाटली का तुला ? म्हणे सासूबाईंनी पाठवलीये ! ”

” अरे , आधी मी खरंच फसलो होतो . कारण  असे रोबोट्स बनले आहेत हे तर खरच न? ..पण जेव्हा ती  सेल्फी चा आग्रह करत होती , तेव्हा शंका आली आणि मग योगासनाबद्दल बोलली तेव्हा मात्र खात्रीच पटली की ही आमच्या खट्याळ सासूबाईंची  चाल आहे . ”

” वहिनी कधी येणार आहेत ? ”

” अजून पाच दिवसांनी . ….दिव्या , ऐक! ” ….सदाच्या कुरापती डोक्यात  काहीतरी शिजत होते .

*********     ” त्या हरिद्वारला नुसता उकडलेला पाला खाऊन जीव वैतागला ग बाई ! ” निर्मला गणपुले , म्हणजे सासूबाई म्हणाल्या .

” आई , मी आज जाते ग घरी . बिचारा माझा नवरा ….तू पण काय भन्नाट डोकं लढवलंस ग ! पद्मिनी राव ने काय जबरदस्त वठवला रोबोट चा रोल ! ती काय हुशार , फिट आणि ताकदवान आहे , खरच ! आमच्या साहेबांची कशी  घाबरगुंडी उडाली असेल ना? ”

” हो ना ग . मला न , ह्या पुरुष जातीवर बिलकुल विश्वास नाही . दिसली सुंदर बाई , की पाघळले लगेच . आणि  हे जावई लोक तर फार स्मार्ट असल्याचा आव आणतात . ही सासू पण काही कमी नाही म्हणावं . ”

” कमी नाहीच मुळी . मला विचारा न ! ” …श्री गणपुले.

दारावर कुणी आले होते . त्याने एक चिठ्ठी दिली ,आणि काही न बोलता लगेच गेला . श्री गणपुल्यांनी  बघितले…… “अग, जावई बापूंची चिठ्ठी आहे . स्वतः न येता चिठ्ठी पाठवली ? आश्चर्य आहे ! ”

” बडबड न करता वाचा की . ”

प .पु . सासूबाईस ,

सा . न

आपण जगातील सर्वोत्कृष्ट सासू आहात . जावयाची किती काळजी!!  आपल्या मुलीच्या अनुपस्थितीत  त्यांना कुठलीच कमतरता जाणवू नये म्हणून एव्हढा परफेक्ट , तीव्र बुद्धिचा  मानवी रोबोट पाठवलात. मी आणि “””सोफिया “” नि कसली धमाल केली पाच सहा दिवस . स्वर्गीय …अनु..अनुभव . ”  गणपुल्यांनी नंदा कडे पाहिले . पाणी काठा पर्यंत आलेच होते . बस बांध फुटायचा बाकी होता .

” अहो वाचा की पुढे !! ” सासूबाई कडाडल्या.

ते वाचू लागले…..

” इतकी सर्वगुणसंपन्न स्त्री ,म्हणजे रोबोट असल्यावर आयुष्यात आणखी काय हवं ? आता मला दुसऱ्या  कुण्णा कुण्णाचीही  गरज नाही. मी आणि माझी सोफु डार्लिंग ..बस! तुमचे कित्ती कित्तीआभार  मानू ?

तुमचा   जावई , ( पूर्वाश्रमीचा )

सदानंद  “”

गणपुल्यांनी चमकून नंदाकडे पाहिलं .  तिचे नाक , कान लाल झाले होते.

सासूबाई सुन्न होऊन स्थिर बसल्या होत्या . आणि अचानाक उठल्या .

” वा रे वा ! असे कसे !!  मी आत्ता पद्मिनी ला फोन लावते . काय खरं काय खोटं ता आत्ता कळेल. तू रडू नकोस ग नंदा! सारखं आपलं मुळूमुळू.”

त्यांनी पद्मिनीला फोन लावला …..हा नंबर अस्तित्वात नाही…असे उत्तर आले , आणि नंदा ने  मोठ्याने गळा काढला .

” काय गरज होती  त्यांची परीक्षा घ्यायची ? किती चांगला गुणी माझा नवरा , उगाच खोडी काढलीस त्याची !!! आता त्या सोफु बरोबर बसला असेल गुलगलू करत !! तीही पाघळली लगेच !!! आ s हा s s ….” तिने भोकाडच पसरले .

******** बेल वाजली आणि सदाने दार उघडले .दारात सासूबाई , सासरे आणि चंदा राणी उभ्या होत्या .  चंदा तिरासारखी आत घुसली . सासूबाई

आपले फुगलेले तोंड घेऊन धप्पकन सोफ्यात बसल्या . सासरेबुवा शांतपणे तिथला पेपर तोंडासमोर घरून बसले .

” कुठाय ती सटवी ? ” घरभर फिरून येऊन चंदाने विचारले .

” सोफु का  ? माझी सोफु जरा बाहेर गेलीये . बॉडी रिचार्ज करायला . दमली ना बिचारी ! ” सदा ने लाडिक आवाजात म्हटले .

” माझी सोफु ?   माझी सोफु ? आणि रिचार्ज व्हायला ती रोबोट फिबोट काही नाहीये . माणूस आहे माणूस !! ”

” ती कशीही असली तरीही मस्तं आहे . किरकिर नाही , आरडाओरडा नाही , आणि आता तर सासू माँ देखील नसतील मध्ये मध्ये करायला ….आहाहा !!! काय सुंदर आयुष्य आहे हे !! धन्यवाद सासू मा!! ”

” मला ही अशीच एखादी  “”सोफु””  द्यायला पाहिजे होती आमच्या सासूबाईंनी . ” गणपूले म्हणाले आणि सदा ने त्यांना जोरात टाळी दिली.

तसे दोघेही हसायला लागले …सदा तर हसता हसता आडवाच पडला .

मायलेकी  गोंधळात पडून एकमेकीकडे बघू लागल्या .

” मानलं तुम्हाला जावाईबापू ! मला वाटलं आमचं खटलंच फक्त खट्याळ आहे . तुम्ही तेव्हढेच नाठाळ निघालात . अगदी पद्मिनीलाही सामील करून घेतला प्लॅन मध्ये !!! सासू खट्याळ तर जावई नाठाळ !!!! ”

© अपर्णा देशपांडे

समाप्त

Image by Pexels from Pixabay 

Aparna Deshpande
Latest posts by Aparna Deshpande (see all)

Aparna Deshpande

अपर्णा देशपांडे - (B.E E&TC , M.A soc ) एक अभियांत्रिकी प्राध्यापिका . समाज माध्यमं आणि वर्तमानपत्रात नियमित लेखन . वाचन आणि चित्रकारितेची विशेष आवड .

6 thoughts on “सासू खट्याळ, जावई  नाठाळ (शेवटचा भाग)

  • December 21, 2020 at 1:59 pm
    Permalink

    एकदम भारी….मजा आ गया ! !

    Reply
  • February 10, 2021 at 5:11 pm
    Permalink

    भन्नाट

    Reply
  • February 23, 2021 at 6:51 am
    Permalink

    भारी 👌

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!