मला भेटलेले सेलिब्रिटी-६

एखाद्या अत्यंत महत्त्वाच्या, मोक्याच्या क्षणी थेट अमिताभ बच्चनने काशी घातलीये का तुमच्या आयुष्यात? माझ्या घातली आहे. इतका मोठा कलाकार, त्यात मी ही त्याची जबरी फॅन, पण हा माणूस माझ्या सोयरिकीच्या मध्ये अश्याप्रकारे येईल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं.
आपण प्रेमात पडलेलो असतो. दोघांचं भरपूर फिरूनबिरून झालेलं असतं. चार ओळखीच्या लोकांनी पाहिलेलं देखील असतं. त्यांनी आपल्याला पाहून देखील आपण त्यांना पाहिलेलंच नाही असं आपण दाखवलेलं असतं. “त्यात काय, पाहिलं तर पाहिलं. मित्र नाही का असू शकत आम्ही!” अशी खोटी भलामणही आपण आपल्याच मनाची केलेली असते. मित्र असाल हो, पण हे काहीतरी “भलताच आसां” हे त्यांनाही कळलेलं असतं आणि तुम्हालाही! मांजर डोळे मिटून दूध पिते तर तिला वाटतं कोणी पाहत नाहीये. प्रेमीजनांना ही म्हण तंतोतंत लागू पडते. कितीही लपूनछपून करा, तुम्ही प्रेमात आहात हे तुमच्याशिवाय इतर दहा जणांना नक्कीच माहीत असतं. माझ्या एका मैत्रिणीने तिच्या “अफेयर” बद्दल घरी सांगितलं तेव्हा घरचे सगळे झाडून तिला म्हणाले होते, बरं झालं सांगितलंस, तू नसतंस सांगितलं तर आम्हीच उद्या तुला सांगणार होतो, तू प्रेमात आहेस म्हणून!
प्रेम ही भावनाच अशी आहे जी आपल्याला स्वतः बाबतीत घडावी असं तर वाटतच असतं पण ती दुसऱ्याच्या बाबतीत ही किती, कशी आणि काय प्रमाणात घडते याची प्रचंड उत्सुकता आपल्याला असते. भावनांचे अँटेना देवाने प्रत्येकालाच दिलेले असतात, मराठी माणसाला त्यात एक एक्सट्राचा दिलेला असतो, “यांचं काहीतरी आहे” हे ताडण्याचा! दोन अधिक दोन चार हे बहुतांश लोक करतील पण आपण मराठी माणसं सहा वजा तीन अधिक एक चे चार करण्यात वाक्बगार असतो. असो.
नुसतं प्रेम करून भागत नाही, त्याची परिणीती व्हायला हवी असेल तर काहीतरी ठोस ऍक्शन घ्यायची वेळ आलेली असते. आयुष्याच्या टीव्हीवर “Love stories ” चा चॅनेल बदलून “Family drama” लावायची वेळ आलेली आते. कसं सांगायचं? कोणी आधी सांगायचं? दोघांनी एकदम आपापल्या घरी सांगायचं, की एकाने आधी? सांगून झाल्यावर एकमेकांना फोन करायचे की थेट भेटून सांगायचं? घरचे बॉम्बस्फोट झाल्यासारखे वागले तर काय करायचं? घराण्याची इज्जत, एखादी थोबाडीत, मारहाण, खोलीत बंद बाहेरून कुलूप वगैरे झालं तर काय? हे हिंदी पिक्चर नसानसात भिनले असतात आपल्या. वाईटातला वाईट विचार करतो माणूस!
किंवा “ठीक आहे तुझं तू ठरवलं आहेस ना, मग योग्यच निर्णय असणार” असं तद्दन पुस्तकी किंवा फिल्मी वाक्य म्हणले तर? किंवा आम्हाला माहीतच होतं, तू कधी सांगतेस याची वाट बघत होतो असं म्हणून आपल्यावरच गुगली टाकली तर?
तर, आपल्या “प्रकरणा”बद्दल घरी सांगायची वेळ आलेली असते. हे तुम्ही घरी कसं सांगता त्यावर पुढचं बरंच काही अवलंबून असतं.
हा जो अमुक अमुक आहे ना, तुम्हाला माहीत आहे बघा तो…..त्याला तुम्हाला भेटायचंय. (उत्तम सुरुवात!)
मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. (अगदी सेफ आईस ब्रेकर !)
तुम्हाला एकाला भेटायचंय. एकाला तुम्हाला भेटायचंय. (ठीकठाक!)
मला एकजण आवडतो. त्याला तुम्हाला भेटायचंय. (निर्णय आधीच सांगितलात, आता परिणामांची तयारी ठेवा!)
आम्हाला लग्न करायचंय. (संपलात!)
माझं अफेयर आहे. (बोंबला!)
आपणहून नाही सांगितलं तर बाहेरच्यांकडून समजेल असंही वाटत असतं. ती वेळ तुम्ही शक्य तितकी पुढे ढकललेली असते. आज नको उद्या केलेलं असतं कारण उद्या काय उत्तर येईल याची शाश्वती नसते. आजचं सुख उद्या दुःखात बदललेलं आपल्याला चालणार नसतं. मनातल्या मनात आपण काय, कधी, कुठे बोलणार याची हजारदा उजळणी केलेली असते.
माझ्याही बाबतीत असंच झालं. सकाळपासून मनातल्या मनात हजारदा उजळणी केली होती. आईला असं सांगू, तसं सांगू करत स्वतःला बजावत होते, पण काही केल्या धाडस होत नव्हतं. हे बरचसं तुमच्या नात्यावरही अवलंबून असतं. मी जरा घाबरूनच असायचे आईला. त्यामुळे आत्ता नको थोड्या वेळाने सांगू करत दिवसभर तोंड उघडलं नाही. रात्रीचे नऊ वाजले. आता जर का बोलले नसते तर रात्रीच्या झोपेचा पार खुर्दा झाला असता. कसंही बोलू पण आता बोलून टाकू म्हणत धीर एकवटून आईकडे गेले. “आई, मला काहीतरी सांगायचंय” म्हणाले. “काय?” आईनी विचारलं. “माझा ना… मी काही म्हणेपर्यंत पुढचे सगळे शब्द “देवियों और सज्जनो, नमष्कार, मै अमिताभ बच्चन आप सब का स्वागत करता हूं….. मधे बुडूsssन गेले. आई इतक्या तन्मयतेने (नव्हे, भक्तीभावाने!) टीव्हीकडे पाहत होती की मी तिची मुलगी आहे हे ही तेवढ्या वेळेपुरतं विसरून गेली असावी. काय करणार? KBC ची लोकप्रियताच तेवढी होती, अजूनही आहे.
माझं सगळं गोळा केलेलं अवसान गळून पडलं. इतक्या कष्टाने तोंडापर्यंत शब्द आणले सगळे या लंबूमुळे परत गिळावे लागले. काय तो सोक्षमोक्ष लागून गेला असता ना! पण नाही! मेल्याने ऐन मोक्याच्या क्षणी काशी घातली. मी गपगुमान पुढचा वेळ Kbc मध्ये मन रमवत राहिले. कार्यक्रम पुढे सरकत राहिला. कोणीतरी छह लाख कमावता कमावता राहिला. इथे माझे सहा लाख श्वास धरून, ओढून, सोडून झाले होते. पण लंब्याला काय त्याच! तेवढ्यात ब्रेक झाला. आईनी काहीतरी आठवल्यासारखं विचारलं, “मगाशी काय म्हणत होतीस?” मी परत सगळे सहा लाख श्वास जमवले. “अग, तो हा आहे ना अमुक अमुक, तू ओळ्खतेस बघ त्याला. त्याला जरा घरी यायचं होतं तुला भेटायला. आम्ही लग्न करू असं  म्ह   ण    त   हो    तो” बोलून टाकलं एकदाचं! हुश्श झालं. दिवसभर वागवत असलेलं मणामणाचं ओझं एकदम कमी झाल्यासारखं वाटलं. आईच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसलं. तिला आनंद झाला होता की दुःख, नक्की काय ते समजलं नाही. पण आता शब्द निघून गेले होते. ती सावकाश म्हणाली
“तो? अच्छा बरं. बोलाव त्याला. बोलू आपण.”
चला, अगदीच आदळआपट, रागवारागवी झाली नव्हती. बोलायला तरी तयार झाली होती. हीच पहिली पायरी असते. माझ्या डोक्यावरचं ओझं उतरलं होतं.
तिकडे बच्चन महाराज टाळ्या पिटत म्हणत होते, “और ये बिलकुल सही जवाब!”
Image by Free-Photos from Pixabay
Gauri Brahme
Latest posts by Gauri Brahme (see all)

Gauri Brahme

गेली वीस वर्षे पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागात जर्मन भाषेची अध्यापिका म्हणून काम करते. अमराठी लोकांना मराठी शिकवते. भरपूर लिहिते, वाचते, कलाकुसरीच्या वस्तू बनवते, खादाडी करते, इतरांना खिलवते. लेखिका म्हणून नावावर २ पुस्तकं जमा आहेत.

One thought on “मला भेटलेले सेलिब्रिटी-६

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!