मिडीयम स्पायसी…
साला काही आठवणी हृदयावर कोरल्या गेलेल्या असतात. एक आठवण मात्र आहे जी माझ्या पाठीवर कोरली गेली आहे!
मला मी दोन अडीच वर्षांचा होतो तेव्हाच्या काही घटना आणि लोक आठवतात. माझी आजी मी साडेतीन वर्षांचा असताना गेली. पण मला आजी, तिचा चेहरा, ती मला घेऊन चाळीच्या ग्यालारीत खेळवायची ते सर्व ढक्क आठवतं. आणि चार पाच वर्षांचा झाल्यावरच्या सर्व घटना आणि लोक आजही डोळ्यासमोर आहेत!
बालपण चाळीत गेलं. चाळीला एकूण तीन मजले. एका मजल्यावर तेरा अशी तीन मजल्यावर मिळून छत्तीस कुटुंब. हो, तिसऱ्या मजल्यावर तीन खोल्या कमी होत्या. बहुतांश कुटुंब जोग, गोगटे, जोशी, परांजपे, वझे, मराठे, कुलकर्णी, भुरकुटे आणि पाध्ये टाईप. नावाला दोन तीन मारवाडी गुजराती आणि दोन भैय्या कुटुंब होती. मारवाडी लोकांचा व्यवसाय होता आणि दोन्ही भैय्यांची आमच्याच गल्लीत दुकानं होती. त्या प्रत्येक कुटुंबात चार ते पाच मुलं होती. म्हणजे आता त्या प्रत्येक कुटुंबातील सदस्य संख्या पन्नासच्या वर गेलेली असणार!
घरचा व्यवसाय असल्याने भविष्याची फार चिंता त्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना नव्हती. आणि त्या उलट “शिकला नाहीस तर भांडी घासावी लागतील चाळीत” असा मंत्र आमच्या घरात सतत सुरू असायचा. ती मुलं अजिबात अभ्यास करत नसत आणि आमच्यामागे शिक्षक आणि आई वडिलांचा “अभ्यास” नामक घोषा सतत सुरू असे. ती मुलं इतर दिवशी देखील खूप धमाल करत, नाममात्र शाळेत जाऊन आली की दिवसभर चाळीत हुंदडत आणि आम्ही साला दिवाळीच्या सुट्टीत देखील “सुट्टीतला अभ्यास” नामक जोखड खांद्यावर वागवत असू! त्यामुळे त्यावेळी त्या मुलांच्या “लाईफ स्टाईल” चा प्रचंड हेवा वाटत असे! आम्हाला भोवरा, डोंगर पाणी, पकडा पकडी, विष अमृत असे खेळ माहीत होते. ती मुलं गोट्या, बस ची तिकीट वगैरे लावून जुगार खेळत. अर्थात त्यावेळी जुगार, दारू, स्मगलिंग हे शब्द म्हणजे भयंकर काहीतरी आहेत इतकंच माहीत होतं. ती मुलं खेळतात त्यालाच जुगार म्हणतात हेच मुळात माहीत नव्हतं!
अश्या खेळांबरोबरच त्या मुलांची भाषा सॉलिड होती. भाषा म्हणजे हिंदी नाही. ती मुलं व्यवस्थित मराठी बोलत. पण त्यांच्या बोलण्यातील काही शब्द आम्ही चाळीत एखादा दारुड्या भांडताना वापरत असे ते असत. (चाळीतील दारुड्यांबद्दल वेगळा लेख लिहीन!) त्या शब्दांचा अर्थ तेव्हा माहीत नव्हता. पण त्याबद्दल उगाच कुतूहल मिश्रित आकर्षण होतं. असाच त्यांच्याकडून एक दिवस ऐकलेला शब्द म्हणजे “चुत्या”! ते हा शब्द ज्या प्रसंगी वापरात त्यावरून तो मूर्खला समानार्थी शब्द असावा इतकंच मला त्या पाचव्या किंवा सहव्या वर्षी वाटलं होतं! त्याचा वापर आपण देखील बोलताना करावा अशी एक सुरसुरी मनात खदखदत होती! आणि ती संधी आली!
रविवार सकाळ. बाबा कद नेसून पूजेला बसलेले. मी जवळच घुटमळत. बहुतेक माझ्या आत्याशी काहीतरी बोलत होतो. बाबा आमच्या घरातील चंदनाच मोठं खोड सहाणेवर घासून गंध उगाळत होते. नक्की आठवत नाही, पण मला वाटतं शिक्षिका असलेली आत्या तिच्या शाळेतील कोणाच्या तरी मूर्खपणाचा किस्सा बाबांना सांगत होती. ते मी पण ऐकत होतो. अचानक मी म्हणालो “तो माणूस एकदम चुत्या दिसतो”! हे वाक्य माझ्या तोंडातून बाहेर पडल्याच्या सवादोन सेकंदात बाबांच्या हातातील चंदनाच खोड उडत येऊन माझ्या पाठीत बसलं. नशीब त्यांचा नेम चुकला आणि डोक्यात नाही बसलं! मी कळवळलो. पाठीच्या खालच्या भागात जिथे त्याचा आघात झाला तिथे लहानशी जखम झाली. आत्या उठून आली आणि तिने मला जवळ घेतलं. बाबा रागाने थरथरत होते. ते मला म्हणाले “हे कुठे शिकलास तू?” त्या वेळी बाबा कशाबद्दल बोलत आहेत हेच मला समजलं नव्हतं! मी रडत रडत “काय?” अस विचारलं. बाबा म्हणाले “तोच तो शब्द. कुठे शिकलास?” आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला की तो प्रचंड आकर्षण वाटत असूनही वापरावा की नाही असा संभ्रम निर्माण करणारा शब्द वाईट होता. माझा संभ्रम बरोबर होता. म्हणजे मी बाबा आणि आत्या समोर शिवी दिली होती! हे लक्षात येऊन मी आणखी घाबरून आत्याच्या कुशीत शिरून थरथरू लागलो. आत्या माझ्या केसातून हात फिरवत मला शांत करत होती. बाबा इतकंच म्हणाले की “हा शब्द परत तुझ्या तोंडून ऐकला तर फोडून काढेन!”
त्या नंतर बाबांसमोर तो शब्द कधीच उच्चारायची हिंमत झाली नाही. आताच्या सोशल मीडियावर आणि नवीन पिढीच्या नियमित संभाषणात सहजपणे येणारा तो शब्द मी देखील उच्चरतो कधीतरी. पण प्रत्येक वेळी बाबा आठवतात आणि पाठीवर असलेला तो व्रण आजही त्या प्रसंगाची आठवण करून देतो! काही आठवणी मनावर कोरल्या जातात.. ही आठवण पाठीवर कोरलेली आहे माझ्या!©मंदार जोग
Image by OpenClipart-Vectors from Pixabay
Latest posts by mandar jog (see all)
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023
👌👌
👌👌