आवाज भाग तीन
आधीच्या भागाची लिंक- आवाज- भाग दोन
अगदी लहानपणापासून, तळहातावर जपलेली लेक, अचानक पपांना अगदी डोळ्यासमोरही नकोशी झाली. त्या दिवशी, गोरागांधीच्या त्याच पहिल्या मजल्यावरच्या एसी रेस्टॉरंटमध्येच तिच्या पपांची कुणा लँडलॉर्डशी फर्स्ट मीटिंग होती. कोपऱ्यातल्या टेबलवर, हातात हात घेतलेले ते दोघे, …… लीना अन श्रेणीक ……. डोळ्यातल्या जखमेसारखे सलत होते. मीटिंग संपली अन पपांचा पेशन्स देखील. डोळे मिटून, संसाराची स्वप्नं पाहणाऱ्या लीनाच्या खांद्यावर अचानक पप्पांचा हात पडला…….. अन सुंदर स्वप्नवत चित्र पाहता पाहता, त्या चित्रातल्याच , ….. इतका वेळ सुंदर भासणाऱ्या, खोल दरीत, कोसळल्याचा भास तिला झाला. जवळजवळ फरफटत घरी पोचताना तिची सगळी स्वप्नं एकेक करून पुसली जाताना ती पहात होती. त्या दिवसापासून पप्पा काहीच बोलत नव्हते. त्यांचा अबोला तिला जास्त जाचत होता. श्रेणीकचं घरी येणं बंद झालं होतं. ऑफिसची कामं ऑफिसमध्येच करायची असा कडक आदेश पप्पांनी दिला होता. आपल्या लाडक्या एफिशियंट इंजिनिअरशी बोलणं सोडा, पण त्याचं समोर असणंही त्यांना खटकू लागलं. त्याला फक्त साईट वर्क मिळू लागलं.
पण लिनाही त्याच निग्रही बापाची लेक होती. तिने श्रेणीक सोबत बडोद्याला जायची तयारी सुरू केली. एरव्ही कपडे सिलेक्ट करताना, शंभर वेळा विचार करणारेही, प्रेमात पडल्यावर इतके निग्रही कसे होतात, हे जगातलं न उलगडणारं कोडं आहे. आज विचार करता करता त्या वेळच्या त्या वेड्या अन अचाट निर्णय क्षमतेवर लीना किंचित हसली. गुजरात मेलचं तिकीट, एक महिन्याच्या खर्चाची तयारी, कमीत कमी कपडे घेऊन निघायच्या तयारी पासून, ते श्रेणीकच्या मानसिक तयारीपर्यंत सगळं तिने व्यवस्थित आखलंदेखील.
पण काळाच्या मनात काही वेगळंच होतं. पावसाळी संध्याकाळ, बोरिवलीच्या रस्त्यांवर पाणी भरायला सुरुवात झालेली. सगळीकडे ट्रॅफिक जाम, …….. कर्कश्श हॉर्न, ……. गुजरात मेल अगदी सुटायची वेळ झाली तरी, लीना पोचलीच नव्हती. कन्फर्म सीट वर बॅग टाकून तो कधीच दरवाजात येऊन वाट पहात होता.
अखेर ट्रेनने व्हीसल दिली. लीना पॅसेंजर ब्रिजवर धावताना दिसत होती. हळूहळू ट्रेनने गती घ्यायला सुरुवात केली. तो दारात धडधडत्या छातीने उभा. कधी इतकं मोठं धाडस करेल असं त्याला जन्मात वाटलं नव्हतं. त्यात लीना लेट झाली होती. ती पायऱ्या उतरुन प्लॅटफॉर्मवर आली सुद्धा……. हात उंचावणारा श्रेणीक तिला स्पष्ट दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद मिश्रित तणाव दोन्हीही तिला इतक्या लांबूनही स्पष्ट जाणवत होतं. ‘ थांब …. फक्त मला पोहोचू दे रे सोन्या, तुझं सगळं टेन्शन क्षणात निघून जाईल, आलेच…..’ मनाशी बडबडत ती धावत होती.
ती पोहोचली, ……. अगदी डब्याजवळ, …… डीडीएलजे सिच्युएशन…….. त्याने हात पुढे केलेला……. तिनेही हात पुढे केला……. अजून पोहोचत नव्हता हात. …. तिने अजून जिवाच्या आकांताने गती वाढवली….. हात हातात येणारच होता…….. पण ………….
पण … इतक्यात ….. त्यानं हात मागे घेतला. तिला पाहून मघाशी प्रसन्न झालेला तो,…… अचानक गंभीरपणे पहात होता. त्याच्या चेहऱ्यावरची निराशा तिला स्पष्ट जाणवत होती. इतका वेळ आनंदाने वाट पाहणारा श्रेणीक अचानक का माघार घेतोय, तिला समजत नव्हतं. आणि तरीही ती ट्रेनसोबत धावतच होती.
(क्रमशः)©बीआरपवार
- Poked you …… - July 31, 2023
- एमएटी - June 10, 2022
- पत्रास कारण की… - April 21, 2022
Pingback: आवाज- भाग दोन – LekhakOnline – Excellent Marathi Articles
4त पार्ट येतोय ना…
Pingback: आवाज भाग चार – LekhakOnline – Excellent Marathi Articles
4th part ajun upload nahi zala ka?