जिगसॉ जिंदगी- पत्र क्रमांक 6
प्रिय आई,
या वाढदिवसाला मी एकेचाळीसची झाले. तू गेलीस त्यावेळी तू फक्त छत्तीसची होतीस. सहज विचार करता करता मनात आलं की आता मी तुझ्यापेक्षा मोठी झालेय. तू थांबलीस त्या बिंदूच्या किती पुढे आलेय ना मी !
असो… तुझं असणं नसणं याहीपलीकडे काहीतरी तुझ्याशी बोलता यावं म्हणून ही पत्रे मी लिहायला घेतली आहेत हा मूळ उद्देश विसरून चालणार नाही.
गेले काही दिवस माझ्या जेष्ठ सहकारी मॅडम, ज्या माझ्यासाठी मैत्रिणीसारख्याच आहेत त्या खूप आजारी होत्या. खूप दिवसानंतर काल पहिल्यांदा त्या शाळेत आल्या. त्या त्यांच्या आजारपणाबद्दल सांगत होत्या. सुरुवातीला किंचित ताप अंगात असताना नवऱ्याने दवाखान्यात जायला पैसेच दिले नसल्याचं सांगत होत्या. मला नवल वाटलं आई. मॅडम स्वतः कमावत्या आहेत. नवरा काहीही काम करत नाही. निव्वळ दारू पिऊन दिवसभर घरात झोपून असतो. आणि तरीही त्याने मॅडमना दवाखान्यात जाण्यासाठी पैसे दिले नाही. हे म्हणजे अगदी नवलच ! नाही का? जी बाई घरीदारी निव्वळ कष्ट करते, कमावते, घरात येणाऱ्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत म्हणून वावरते तिला सुद्धा नवऱ्याकडून आजारपणासाठी पैसे मिळू नयेत?? मुळात नवऱ्याला पैसे मागण्याची वेळच का यावी? मॅडमना त्यांच्या एटीएम कार्डाचा पिननंबर सुद्धा माहीत नाहीय. ते कार्डच नवऱ्याकडे असतं सदैव… कुणी म्हणेल, ‘छ्या !… हे असलं काही शक्यच नाहीय. तुम्ही बायका निव्वळ पुरुषांना बदनाम करता.’ कुणी कशाला मी स्वतः जर मॅडमच्या संपर्कात नसते तर मला सुद्धा विश्वास बसला नसता गं. पण दुर्दैवाने ही गोष्ट खरी आहे. आणि माझ्या भोवतीच्या ह्या सगळ्या वातावरणात कुणालाही याचे काहीच नवल वाटत नाही याची खंत आहे.
बाईनं घराबाहेर पडून कमावलं म्हणजे ती स्वतंत्र झाली हा आपला समज किती पोकळ असतो ना!… पण अजूनही शंभरातील नव्वद बायकांना आपल्याच कमाईच्या पैशांबाबतीतले निर्णय घेण्याची मुभा नसते. त्या व्यवहारही नीट सांभाळू शकतात हे पुरुषांना मान्य नसतं. मान्य असलं तरीही प्रत्यक्षात त्यांना ते मान्य करायचंच नसतं. लग्न न झालेल्या बाईचे व्यवहार वडील बघतात आणि लग्न झालेल्या बाईचे व्यवहार नवरा बघतो. मालक बदलतात फक्त. बाई ही बाईच राहते. सगळ्या प्रकारच्या कर्तव्याचे ओझे असलेली पण कुठलेही अधिकार नसलेली बाई !
याचा अर्थ सगळे पुरुष सारखेच असतात असं नाही हं. आजकाल नव्या पिढीत बायकोची स्पेस मान्य करणारे काही पुरुष असतात. तसे ते आधीच्या पिढीतही असतीलच. पण एकूणच दबंग प्रवृत्तीच्या पुरुषांच्या तुलनेत त्यांचे प्रमाण नगण्य आहे हे सत्य आहे.
आजकाल ना मी काय करते कमावत्या मुलींशी खूप गप्पा करते.. आणि गप्पांच्या ओघात त्यांना व्यवहार कधीही हातातून जाऊ देऊ नका अशा सूचना देते. पैसे कमावता येतात तसे ते वागवताही आले पाहिजे. निव्वळ शॉपिंग करता येणं, चॉईस चांगला असणं, कपडेलत्ते दागदागिने ह्यातलं कळणं म्हणजे पैसा हँडल करणं नव्हे. तो गुंतवता येणं, बचत करता येणं, त्या दृष्टीने नियोजन करता येणं अशा असंख्य बाबी पैशांशी निगडित असतात. आजपर्यंत मुलींना ह्या बाबतीत सामावून घेतलं जायचं नाही. ती सुरुवात तिच्या माहेरच्या कुटुंबातून व्हायला हवी. आजकाल काही लोक मुलींना ह्या सगळ्याची जाणीव करून देतात. शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर राहिल्याने सुद्धा मुली आर्थिक बाबतीत आत्मनिर्भर होऊ बघतात. ही चांगली गोष्ट आहे. बदल होताहेत हे मान्य, पण बदलांचा वेग कमी आहेच हेही तितकंच खरं. असो….
मॅडमच्या एका गोष्टीवरून किती किती गोष्टी निघाल्या !…
तुझीच छबी
ता. क.
तुझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठी झालेय मी आता. तेव्हा अशा बोधप्रद गोष्टी करणारच. नाही का?
Image by Free-Photos from Pixabay
Latest posts by Vinaya Pimpale_w (see all)
- जिगसॉ जिंदगी पत्र क्रमांक 8 - May 20, 2021
- फुलपाखरू - April 13, 2021
- पोटॅटो पिनव्हील - March 27, 2021