आवाज भाग चार

 आधीच्या भागाची लिंक- आवाज भाग तीन 

“अरे ,……. दे ना हात……” ती ओरडत होती.

तिचा आवाज त्याला ऐकू येत नसल्यासारखा तो अनोळखी झाला होता. अन प्लॅटफॉर्म संपण्याआधीच तो आता दारातूनही दिसेनासा झाला होता.

“अरे ,……. दे ना हात……”

“अरे ,……. दे ना हात…… प्लिज ……”

“प्लिज …….प्लिज “

लीना जवळजवळ किंचाळत जागी झाली. चेहरा घामाघूम झाला होता. रात्रीचे किती वाजले होते , याचा अंदाज येत नव्हता. समोरच्या रस्त्यावरचं ट्रॅफिक कधीच संपलं होतं. नीरव शांतता पसरली होती. संध्याकाळी विचार करता करता, बाल्कनीतल्या आराम खुर्चीतच तिचा डोळा लागला होता.

प्रश्नांची उत्तरे शोधण्याची तिची सवय कधीच सुटली होती. त्या स्टेशनवर घडलेल्या प्रसंगानंतर, काही दिवसांनी त्याचा अनेकदा कॉल येऊन गेला. पण आता तिला त्याचं कोणतंही उत्तर ऐकायचं नव्हतं. काळ आपली पानं उलटत राहिला. त्याचा कॉल येणं हळूहळू बंद झालं. पण खोल रुतलेल्या प्रश्नांचे व्रण मात्र अजूनही गेले नव्हते. आज तिच्या किंचाळण्याने मात्र ते रात्रीच्या हृद्यावरही नकळत उमटून गेले होते.

…………………….. .. . . . ….. …… ……….

“कधी पासून होतोय त्रास ?”

“काही वर्षे झाली.”

“मी दिलेला रायटिंग एक्सरसाईझ तर छान पूर्ण केला आहे तुम्ही. पण…..”

“पण काय ?…”

“हे तुमच्या चेहऱ्याला भाजलं वगैरे होतं का ?”

“नाही अपघात झाला होता, ……  चेहरा पूर्ण फाटला होता. त्यामुळं प्लॅस्टिक सर्जेरी करावी लागली होती.”

“ओहह, …….. तो अपघातही …….. ?”

“हो …..या हातामुळेच.”

“सर्वात पहिल्यांदा कधी जाणवला होता हा त्रास ?”

“मी ट्रेनच्या दारात उभा होतो, …….”

“बाप रे, …..”

“नशीब त्यावेळी आत कोसळलो. नाहीतर वाचलो नसतो.”

 जरा विचार करून लिना पुन्हा बोलू लागली…..

“फॅमिली मेंबर कुणी आलेत, सोबत ?”

“नाही, आय हॅव नो फॅमिली. पण माझा असिस्टंट आहे सोबत.”

“ओके काही हरकत नाही, पण या सांगितलेल्या काही एक्सरसाईझ घरी करत रहा. आणि पुढच्या व्हिजिटला पुन्हा काही वेगळ्या प्रकारची एक्सरसाईझ सांगीन. पण तोपर्यंत दिलेले सप्लिमेंटरी फूड घेत रहा.

धिस इज पिरीऑडिक पॅरालिसिस. आपल्याला पोटॅशियम आणि थायरॉईडच्या टेस्ट कराव्या लागतील. मी लिहून दिल्यात.

काळजी घ्या, ………….बऱ्याचदा, अशावेळी, चेहऱ्याचे स्नायू लूज पडू शकतात. …… चेहऱ्यावरचे भावही बदलू शकतात. बोलण्यातली स्पष्टता जाते. खरंतर, अशा प्रकारच्या आजारात, फॅमिली सोबत असणं खूप गरजेचं असतं.” ही शेवटची काही वाक्यं बराच पॉज घेत , आणि नजर चुकवत बाहेर पडत होती.

“……”

“मला वाटतं या व्हिजिटमध्ये एवढं पुरेसं आहे.” तिने यावेळीही नजर चुकवली. उगाच टेबलावरच्या कागदांची चाळवाचाळव केली.

तो उठला, थोडा अडखळतच बोलून गेला,

“ओके, ……निघतो,….. बाय, …… “

आणि निघण्यासाठी वळलादेखील.

“मी वाट पाहीन, ……” तसे त्याचे पाय थबकले,

तो मागे वळला.

“यातून बाहेर पडायचं असेल तर पुढच्या व्हिजिटला नक्की ये, …… मनात कसलाही किंतु न ठेवता ये.”

“……” आता त्याचे फक्त डोळे काहीतरी बोलू पहात होते.

पण मनाचा हिय्या करून त्यानं पुन्हा केबिनचा दरवाजा उघडला.

तो बाहेर पडला,…..बाहेरच्या काउंटरवर बसलेल्या सिस्टरकडे prescription सरकवले. तिनेही अगदी तत्परतेने  त्याची सप्लिमेंटरी फूड्स आणि काही मेडीसीन्स त्याच्या समोर मांडली.

“डॉक्टर पासून, ते या सिस्टरपर्यंत , सगळ्यांना किती घाई, माझ्या इथून जाण्याची,….. ” मेडिसिन घेता घेता त्याच्या डोक्यात विचार आला.

त्यानेही रुक्ष चेहऱ्याने विचारलं,

“बिल ?”

इतक्यात, केबिन मधून बाहेर आलेल्या डॉक्टर लिनाचा मागून आवाज आला,

“फक्त एक ‘गोरागांधी’ची कॉफी…………..श्रेणीक….”

 हे शब्द मात्र खूप गहिऱ्या डोहातून चिंब होऊन आल्यासारखे, …. ….जडावलेले, ……प्रेमाच्या श्वासांवर थरथरणारे,……ओलेचिंब ……. गहिवरलेले होते.

त्या आवाजातलं प्रत्येक कंपन ओरडून सांगत होतं,

“तू  फोनवरचा माझ्या आवाजातला साधा बदल ओळखलास, मी तुझा आवाज प्रत्यक्ष भेटीत,  ओळखणार नाही का ?……. 

जो हात, आयुष्यभरासाठी हातात घेतला होता, तो ट्रीटमेंटसाठी हातात आला तर, न ओळखण्याइतकी असंवेदनशील नाही रे झाले अजून. ……….

अरे, अपॉइंटमेंट मध्ये चुकीचं नाव सांगितलंस तरी, प्लास्टिक सर्जेरी तुझ्या चेहऱ्याची झालीय, ……. मनाची नाही, …… ते मला वाचता येणार नाही का ? अजूनही तुझीच वाट पाहतेय…..मी…..”

आणि बराच वेळ , त्या छोट्याशा क्लीनिक मध्ये अश्रूंचा आवाज घुमत राहिला.

(समाप्त)  ©बी आर पवार

Image by Pexels from Pixabay 

B_R Pawar
Latest posts by B_R Pawar (see all)

B_R Pawar

बी आर पवार , भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये नोकरी. शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनिअर आहे. त्याखेरीज कथा, कविता, चित्रकलेत रमतो. जीवनानुभव शब्दात चितारायला आवडतो.

5 thoughts on “ आवाज भाग चार

  • December 31, 2020 at 5:32 pm
    Permalink

    मस्त… खुप सुंदर 😊

    Reply
  • January 7, 2021 at 7:34 pm
    Permalink

    Khup chhan 👍👍

    Reply
  • January 14, 2021 at 11:51 am
    Permalink

    khup chan
    part 5 ala ka

    Reply
  • February 1, 2021 at 10:17 am
    Permalink

    खूप छान… पण खूप लवकर संपली कथा

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!