सुजाता- ३
आधीच्या भागाची लिंक- सुजाता- २
किती वेळ मध्ये गेला कोणास ठाऊक , सुजाताला शुद्ध आली तेव्हा ती प्रशस्त अशा खोलीत एका दिवाणावर झोपलेली होती , कुठे आहोत आपण , कोणाचे घर हे ? असे अनेक प्रश्न तिच्या मनात येत असतानाच भडक रंगाचा मेक अप , जरीची साडी चापून चोपून नेसलेली आणि भडक सौंदर्य असलेली साधारण पन्नाशीची एक बाई आत आली. तिच्या पेहरावावरून तरी ती चांगल्या घरातील वाटत नव्हती ““अरे बेटा उठलीस का तू , काय झाल तुला? अशी चक्कर येऊन कशी पडलीस , आणि थांब पहिल्यांदा तुला काहीतरी खायला देते , बहुदा तू उपाशी आहेस म्हणूनच तुला चक्कर आली असेल ” , असे म्हणून रेखा ए रेखा !! , जरा एका डिश मध्ये काही खायला घेऊन ये ग!” असे फर्मान सोडून ती सुजाताच्या जवळ येऊन बसली. “”काय ग काही वंगाळ झाल आहे का तुझ्या बाबतीत ? , म्हणजे तुझ्या कंडीशन वरून तरी तेच वाटतंय.” बरीच पडझड झालेली दिसते आहे शरीराची , माझी नजर आता तयार आहे ह्या अश्या गोष्टी ओळखायला !” काय सांगू ह्या बाईला , मुळात ही कोण ?? आपण कुठे आहोत ?? ह्या प्रश्नांनी सुजाताला घेरले होते . आगीतून फोफाट्यात पडलो कि काय असे वारंवार तिला तिथल्या एकंदर परिस्थिती वरून जाणवायला लागले. “ मी कुठे आहे मला सांगाल का ?, आणि आपण कोण ?” “सांगते सगळ सांगते, आधी तू थोड काहीतरी खा , फ्रेश हो , मग बोलू आपण” असे म्हणून ती बाहेर गेली आणि तेवढ्यात हातात डिश घेऊन एक मुलगी आत आली .” “रेखा , हिला खाऊन झाल्यावर एखादी साडी दे नेसायला आणि आवरायला सांग . रेखा आत आली ,“हे घे ग , खाऊन घे , आणि ह्या कपाटातील एखादी साडी नेस आणि ये बाहेर ” आणि ह्यापुढे भोग आपल्या कर्माची फळ” असे म्हणून ती ताडकन बाहेर पडली. “बापरे म्हणजे आपल्याला जी शंका आली ती खरीच की काय ? “हे घर , ही बाई “तश्या” आहेत , देवा , काय रे माझे नशीब , कुठे आणलस मला , काय करावे ? , कसे बाहेर पडावे इथून ?
खायची तर सुजाताला अज्जिबात इच्छा नव्हती , पण आता ह्यापुढे आपल्याला समोर येईल त्या परिस्थितीला तोंड द्यायचे असेल तर जिवंत राहायला हवे असे म्हणून तिने ते समोरील डिश मधील पदार्थ पोटात ढकलले आणि बाथरूम मध्ये जाऊन फ्रेश होऊन बाहेर आली .
सुजाता बाहेर आली तेव्हा ती बाई टी . व्ही बघत होती .“ “ये बैस अशी इथ , आणि काय पण काळजी करू नकोस , मी हाय तुझी काळजी घ्यायला, लाली बाई म्हणतात मला” असे म्हणून तिने सुजाताला हाताला धरून सोफ्यावर आपल्या बाजूला बसवले . “लाली बाई, माझी काळजी घेल्याबद्दल , मला इथे आणल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे , पण प्लीज, मला आता इथून जाऊदे,” ! “अग कुठ जाणार तू , तुझ्या ह्या अवस्थेत तुला कोण पण जवळ करणार न्हाय , हा समाज एकदम बेकार आहे , तुला जगण मुश्कील करून सोडेल , आणि एकदा इथे आत आलेली बाई बाहेर केवळ कामा निमित्त जाते . दिसायला पण सुंदर आहेस , हसत हसत खूप पैसे कमावशील आणि मला पण चांगला पैसा मिळेल” अस म्हणणाऱ्या लाली बाईच्या डोळ्यात सुजाताला एक विचित्र झाक दिसली , “रस्त्यावर पडली होतीस तेव्हा मीच उचलून आणले तुला इथे , अजून कोणी बघितले असते तर आधीच अत्याचार झालेल्या शरीराचे परत लचके तोडले असते” . “तुला काय फुकट पोसायला तू काय माझी कोणी नात्यातली लागतेस काय? . चुपचाप इथे राहायचे आणि मी बोलेन तसे वागायचे”.
सुजाता आता प्रचंड घाबरली होती , शेवटी सगळा धीर एकवटून ती लाली बाईला बोलली “हे बघा माझ्यावर जबरदस्ती झाली , माझी अब्रू गेली , पण मी अजून माझ्या नजरेतून उतरलेली नाहीये , भले मला नवऱ्याने नाकारले असेल , पण इथे ह्या तुमच्या वस्तीत मी राहणे शक्य नाही , मला जाऊ द्या” . असे म्हणून सुजाता दरवाजाच्या दिशेने जायला निघाली तेवढ्यात उंच धिप्पाड अशी दोन माणसे आत आली . “ए गप्पे , बैस खाली , ताई बोलली ना , इथून जायचं न्हाय , कळत नाही का तुला” ? सुजाता त्या दोघांना बघून प्रथम घाबरली पण आता इथून बाहेर पडायचे म्हणजे थोडे नमते घ्यायला हवे म्हणून मागे फिरली आणि लाली बाईच्या पाया पडत रडत तिला विनवण्या करू लागली “मी काय तुमचे वाईट केले आहे ? , मला जाऊ द्या ना !!” “ काकुळतीला आलेल्या सुजाताची लाली बाईला अज्जिबात दया आली नाही “ए पक्या ही अशी नाही सुधारणार, हिला आतल्या खोलीत घेऊन जा आणि डांबून ठेवा” लाली बाईचा आदेश म्हणजे पर्वणीचा शब्द होता त्या दोघांसाठी , एकाने तिच्या हाताला धरले आणि ती नाही नाही म्हणत असताना तिला आतल्या खोलीत नेऊन डांबून ठेवले.
पुढील दोन तीन दिवस सुजाताला धंद्याला तयार करण्यासाठी तिच्यावर नाना प्रकारचे अत्याचार केले गेले . केवळ जेवणखाण देण्यासाठी तिच्या खोलीचे दार उघडले जायचे, आणि परत त्या अंधाऱ्या खोलीचे दार बंद केले जायचे .
रेखा हा सगळा प्रकार बघत होती. रेखाला लहानपणीच तिच्या दारुड्या बापाने पैशासाठी लाली बाईला विकले होते . तेव्हापासून ती इथेच राहत होती . ती वयात आल्यावर तिचा लाली बाईने आपल्या धंद्यासाठी पुरेपूर वापर करून घेतला होता . लहानपणापासून सगळ्या प्रकारचे अत्याचार सहन केल्यामुळे ‘“पुरुष’” ह्या प्राण्याबद्दल रेखाच्या मनात प्रचंड चीड होती . पण तिच्या नशिबात केवळ पुरुषी अत्याचारच लिहिलेला होता .
सुजाताला तिथे आणले तेव्हापासूनच रेखाला तिच्याबद्दल वाईट वाटत होते . हि एक चांगल्या घरातील मुलगी नाहक इथे अडकली आहे असे सारखे तिच्या मनात येत होते . सलग तीन दिवस सुजातावर चाललेला अन्याय बघून तिला भयंकर राग येत होता ,वाईट सुद्धा वाटत होते पण ती काहीच करू शकत नव्हती .
काय झाले कोणास ठाऊक पण तिसऱ्या दिवशी मात्र सुजाताला मनवण्यात लाली बाई यशस्वी झाली . तीन दिवसांनी सुजाताला बाहेर काढून दुसऱ्या एका खोलीत नेऊन रेखाला तिला सजवून बाहेर घेऊन यायला सांगितले . आज लाली बाई भयानक खुश होती . रेखा आता तिच्या दृष्टीने “जुन” झाली होती , तिला कोणीही विचारात नव्हते . आणि एक वर्षांपूर्वी पोलिसांच्या रेड मध्ये तिच्याकडील बाकीच्या मुली सुद्धा पळून गेल्या होत्या . धांद जाम बसला होता तिचा , आणि आता सुजाताच्या रुपात आयते “सावज” तिच्या हाती लागले होते.
पुढील भागाची लिंक- सुजाता- शेवटचा भाग
Image by Efes Kitap from Pixabay
- शर्वरी…(कथा संग्रह) - September 12, 2022
- निसरडी वाट- 1 - September 17, 2021
- फिरुनी नवी जन्मेन मी ….२ - July 27, 2021
Pingback: सुजाता- २ – LekhakOnline – Excellent Marathi Articles