काव्यांजली- १
बंगलोर हायवे जवळच्या एका गावात आर के बिल्डर्सचा एक मोठा प्रोजेक्ट आकार घेत होता. हा प्रोजेक्ट म्हणजे मुंबई व पुण्याच्या लोकांसाठी सेकंड होमचा सर्वोकृष्ट पर्याय ठरणार होता. या प्रोजेक्टची संपूर्ण जबाबदारी सागरवर सोपवण्यात आली होती. सागर मनातून प्रचंड खुश झाला. सागरला प्रोजेक्टच्या कामासाठी साईटवर जाऊन रहावं लागणार होतं. अर्थात त्याच्या रहाण्याची व्यवस्था कंपनीकडून करण्यात येणार होती, पण कनिका या गोष्टीसाठी तयार होईल का, ही शंका त्याच्या मनात होती. कनिकाला या प्रोजेक्टबद्दल सांगितल्यावर तिने चटकन तिकडे रहायला जायची तयारी दाखवली आणि सागरचा आनंद द्विगुणित झाला. पण त्यांच्यासमोर पुढे काय वाढून ठेवलं आहे याची मात्र त्याला पुसटशीही कल्पना नव्हती.
सागर आणि कनिका त्यांच्या दीड वर्षाच्या लेकीसह म्हणजेच पिहूसह साईटपासून जवळच असणाऱ्या ‘काव्यांजली’ नावाच्या भव्य दिव्य बंगल्यात रहायला आले. दाराबाहेरच्या मोठ्या व्हरांड्यातला झोपाळा बघून कनिका हरखून गेली. जुन्या पध्दतीचं अस्सल सागवानी लाकडापासून बनवलेले फर्निचर असलेल्या मोठ्या मोठ्या खोल्या बघून सागर आणि कनिकाला आपण एखाद्या रिसॉर्ट मध्ये रहायला आलो आहे असा भास झाला. कंपनीने कमला आणि राघव या जोडप्याला बंगल्याची साफसफाई आणि इतर कामासाठी सागरच्या कुटुंबासोबत रहायला पाठवलं. वरच्या बेडरूममध्ये सागर, कनिका आणि पिहू, तर खालच्या रूममध्ये कमला आणि राघव यांची सोय करण्यात आली होती. कमला आणि राघवच्या येण्यामुळे कनिका अगदी निश्चिन्त झाली होती. पण तिचा हा आनंद फार काळ टिकणार नव्हता.
दोन दिवसात साईटचं काम सुरू झालं. सागर सकाळी 8 वाजता घरातून निघत असे तो संध्याकाळी 6 वाजता परत येत असे. घरातलं सगळं काम कमला आणि राघव करत असल्यामुळे कनिकाकडे वेळच वेळ उरत असे. बंगला प्रचंड मोठा होता. या बंगल्यात जवळपास 10 ते 12 मोठ्या खोल्या होत्या. बंगल्याला दोन्ही बाजूला मोठं अंगण होतं. कंपनीने अंगणात छान लॉन तयार करून घेतलं होतं. कनिका इंटेरिअर डेकोरेटर असल्यामुळे या बंगल्यातली प्रत्येक खोली, फर्निचर अगदी व्यवस्थित निरखून वेगवेगळ्या डिझाइन्सची स्केचेस बनवून ठेवत असे. एक दिवस बंगल्यातल्या अशाच एका खोलीमध्ये ती गेली. त्या खोलीत गेल्यावर तिला अचानक काहीतरी वेगळंच जाणवू लागलं. तिला असं वाटलं या ठिकाणी ती यापूर्वीही येऊन गेली आहे. खोलीच्या पलीकडल्या बाजूलाही एक दरवाजा होता. कनिकाने तो दरवाजा उघडून बघितलं तर तो थेट मागच्या अंगणात बाहेर पडत होता. खोलीमध्ये लाकडाचं काचेच्या दाराचं एक प्रशस्त कपाट होतं. कपाटामध्ये ‘अँटिक’ म्हणावेत अशी एकापेक्षा एक सुंदर शो पीस ठेवलेली होती. त्याच कपाटात वरच्या बाजूला तिला एक मोठी बाहुली दिसली. एवढी सुंदर बाहुली तिने आजवर पहिली नव्हती. तिला त्या बाहुलीचं प्रचंड आकर्षण वाटलं आणि न राहवून तिने ते कपाट उघडून ती बाहुली हातात घेतली. कितीतरी वेळ ती त्या बाहुलीला हातात घेऊन तिला न्याहाळत बसली होती. पिहूच्या रडण्याच्या आवाजाने ती भानावर आली. तिने घड्याळात बघितले तर 4 वाजून गेले होते. तिला धक्का बसला. तिने दोन वेळा घड्याळ बघितलं आपल्या मोबाईलमध्येही बघितलं पण वेळ तीच दाखवत होती. तिला आश्चर्य वाटलं. दुपारी 1 वाजता पिहूला झोपवून ती या खोलीत आली होती आणि आता 4 वाजले म्हणजे 3 तास ती इथे होती. इतका वेळ मी काय करत होते इथे, या विचारासरशी तिचं लक्ष हातातल्या बाहुलीकडे गेलं. ती बाहुली तिला प्रचंड विद्रुप दिसली. ती जोरात किंचाळली आणि त्याचवेळी हातातून बाहुली तिने खाली फेकून दिली. तिच्या आवाजाने राघव धावत तिथे आला.
“काय झालं मॅडम”
राघवच्या आवाजाने कनिका भानावर आली. ती त्याला काही सांगणार इतक्यात तिची नजर पुन्हा त्या खोलीत गेली. त्या खोलीत आता काहीच नव्हतं ना कपाट ना बाहुली होती ती फक्त अडगळ.
“मॅडम, काय झालं? तुम्ही एवढ्या जोरात का ओरडलात?”
“अ.. ते काही नाही. मला मोठी पाल दिसली इथे म्हणून…” कनिकाने काही बाही बोलून वेळ मारून नेली.
“बरं बरं मी ही खोली पण साफ करतो.”
“पिहू… पिहू उठली होती ना?”
“हो पण कमलाने तिला थोपटून झोपवलं पुन्हा”
“ठीक आहे, पण आता नाही झोपणार ती जास्त. लगेचच उठेल. मी दूध गरम करते तिच्यासाठी… आणि हो, ही खोली नका साफ करू. खोलीला कुलूप लावून टाका”, असं म्हणून कनिका किचनमध्ये निघून गेली.
घडल्या प्रकाराने तिला प्रचंड धक्का बसला होता. हे असं कसं होऊ शकतं? काय करू, घडल्या प्रकाराबद्दल कोणाला सांगू की नको. सांगून कोणी विश्वास ठेवला तर ठीक नाहीतर सगळ्यांना असंच वाटेल की मला भास झाला. पण तो भास नव्हता, ते सत्य होतं. संध्याकाळी सागर आल्यावरही कनिका स्वतःच्याच विचारात होती. रात्री धड जेवलीही नाही. सागरला तिची अस्वस्थता कळत होती, पण तो काहीच बोलला नाही. रात्री बेडरूममध्ये गेल्यावर मात्र त्याने कनिकाला विचारलं.
“काय झालं कनू? अशी उदास का आहेस?”
“नाही, काही नाही..”
“जे असेल ते स्पष्ट बोल. कालपर्यंत तर तू उत्साही होतीस आज अचानक असं काय झालं?
“सागर, मी सांगेन त्यावर विश्वास ठेवशील?”
“विश्वास? नक्की काय झालं आहे?”
अखेर न राहवून तिने सागरला सगळी हकीगत सांगितली.
“कनू, मला एक सांग, काल अॅनाबेला बघितला होतास का?”
“सागर, आय अॅम नॉट जोकिंग. म्हणून मी तुला काही सांगत नव्हते.”
“अग, चिडू नकोस बरं ऐक, मी अगदी मनापासून बोलतोय. तू अलीकडे अॅनाबेला किंवा तत्सम हॉरर मुव्ही किंवा वेबसिरीज बघितली होतीस का? कारण याचं एकच कारण असू शकतं ते म्हणजे, कुठलातरी हॉरर मुव्ही किंवा वेबसिरीज बघताना तुझ्या अंतर्मनात काहीतरी गोष्ट जाऊन बसली असेल आणि आत्ता कुठेतरी काहीतरी रिलेट झालं असेल. असं घडू शकतं.
“सागर, ओके ठीक आहे मान्य, पण त्या तीन तासांचं काय? तीन तास… सागर, तीन तास मी अशा बाहुलीला हातात घेऊन तिच्याकडे बघत बसले होते जी बाहुली अस्तित्वातच नव्हती. पिहूच्या रडण्याचा आवाज आला म्हणून नाहीतर कुणास ठाऊक अजून किती वेळ मी तशीच….. नाही सागर, हे काहीतरी विचित्र, वेगळं वाटतंय मला.”
क्रमशः
Image by Pete Linforth from Pixabay
- माझी होशील का? - October 1, 2021
- काव्यांजली- शेवटचा भाग - February 12, 2021
- काव्यांजली- ४ - February 2, 2021