सिनेमा सिनेमा- Capharnaum

एक बारा वर्षाचा मुलगा त्याच्या आईवडिलांच्याच विरोधात कोर्टात दावा ठोकतो. कश्यासाठी? तर मला जन्मच का दिलात? याचा जाब विचारण्यासाठी.. हे इतकं वाईट आयुष्य मला द्यायचं होतं तर आधी हजार वेळा विचार का नाही केलात? प्रत्येक माणसाला जगायचा हक्क आहे, एक चांगलं जीवन जगायला मिळणं त्याचा मूलभूत हक्क आहे, मग तो जर का मला तुम्हाला द्यायचाच नव्हता, तर जन्मालाच का घातलंत? आणि समोर अंधार दिसत असूनही अजूनही तुम्ही मुलं पैदा करायचे थांबत का नाही? मला नाही जगायचं या घाणेरड्या परिस्थितीत. ज्या आईवडिलांना आपल्या मुलांबद्दल जबाबदारी वाटत नाही, प्रेम वाटत नाही ते मुळात जन्मालाच का घालतात मुलं? यापेक्षा भयाण काय असू शकतं? हे सगळे प्रश्न आहेत, झैनचे. झैन बैरुतमध्ये झोपडपट्टीत रहाणारा एक सीरियन निर्वासित आहे आणि त्याच्यावर हल्ला केल्याच्या गुन्हामुळे तो तुरुंगात आहे.
केपरनॉम छोट्याश्या झैनचा जीवनप्रवास उलगडून दाखवतो. झैन अतिशय हुशार, चंट मुलगा आहे. घरी आईवडील गरिबीने गांजले आहेत, तरीही पोरवडा काढायचे थांबत नाहीत, कारण देवाने मुलांना जन्म देण्यातच आयुष्याचे सार्थक सांगितले आहे. झैन कुटुंबासाठी प्रचंड काम करतो, काम करता करता मुलांना शाळेत घेऊन जाणाऱ्या व्हॅनकडे हतबलतेने पाहतो तेव्हा झैनसारखी हजारो मुलं आपल्या डोळ्यासमोर तरळून जातात. त्याचं सेहेरवर, आपल्या एका बहिणीवर प्रचंड प्रेम आहे. तिची पाळी सुरू होते तेव्हा तिला समजावतानाचा प्रसंग आपल्या हृदयाला घरं पडल्याशिवाय राहत नाही. कल्पना करा, एक बारा वर्षाचा मुलगा आपल्या अकरा वर्षाच्या बहिणीला मासिक पाळीबद्दल त्याला जे तोटकं माहीत आहे ते सांगतो आहे, आपल्या टीशर्टचं पॅड करून तिला देतो आहे, तिच्यासाठी सॅनिटरी नॅपकिन चोरतो आहे. हे बघताना डोळ्यात अक्षरशः पाणी येतं. कपाट उघडल्यावर सॅनिटरी पॅड हाताशी असणं हे priviledge असू शकतं, हे हा प्रसंग पहाताना जाणवतं.
झैन गांजला आहे, पण परिस्थितीशी लढतो आहे. आपलं आयुष्य असंच असणार आहे, रात्रंदिवस आपण फक्त आला दिवसाला सामोरं कसं जायचं इतकाच विचार आपल्याला करायचा आहे हे त्याला माहित आहे. पण तरीही तो प्रचंड आशावादी आहे. तो शाळेत जायचा विषय काढतो तेव्हा त्याची आई त्याच्या वडिलांना “पाठवून तर बघूया, खायला प्यायला भरपूर देतात म्हणे ते, आणि घरी पण भरपूर माल पाठवतात. आपला प्रश्न सुटेल” असं म्हणते, तेव्हा आपल्या पोटात तुटतं. बहिणीबरोबर त्याचे काही फार गोड प्रसंग आहेत. हीच बहीण जेव्हा त्याच्यापासून लांब जाते, तेव्हा मात्र झैन जन्मळून पडतो.
चित्रपटात झैन हे तर मुख्य पात्र आहेच.  दुसरं एक प्रमुख पात्र आहे, ते म्हणजे भूक. या लॉकडाऊन काळात आपण ज्या भुकेबद्दल बोलतो आहोत, ती शमणारी आहे हे आपल्याला माहीत आहे. आणि म्हणूनच आपल्याला तिच्याबद्दल सहज बोलता येतं. आज काय बनवलं, कसं खाल्लं, किती मजा आली हे सगळं सांगणे म्हणजे निव्वळ luxury आहे हे आपल्याला चित्रपट पाहताना समजतं. झैनचे सगळे प्रश्न भुकेपासून सुरू होतात आणि भुकेपाशीच संपतात. एक वर्षाच्या एका निर्वासित इथियोपियन बाळाची जबाबदारी त्याच्यावर येऊन पडते तेव्हा तो त्याच्या आणि स्वतःच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी काय काय करतो हे पाहताना अंगावर शहारे येतात. आपण आपल्या हक्काच्या घरात आहोत, सुरक्षित आहोत, अगदी चार नाही तर तीन वेळा आपल्याला व्यवस्थित पोट भरता येणार आहे हे केवढी मोठी गोष्ट आहे हे झैनचा सगळा झगडा पाहून उमजतं. यापुढे मी कोणत्याही पदार्थाचे फोटो सोशल मीडियावर टाकायच्या आधी दहा वेळा विचार करणार हे नक्की. कारण माझ्यासाठी तो आनंदाचा भाग असला, लोकांशी शेयर करण्याचा भाग असला तरी तो दुसऱ्या कोणासाठी तरी  आयुष्यातला न संपणारा झगडा असणार आहे हे विसरून कसं चालेल?
CAA बद्दल नुकतंच आपल्याला भरपूर समजलं आहे. घरादारात, सोशल मीडियावर भरपूर वाद घालत असतो आपण त्यावर. केपरनॉम पाहून निर्वासित असणं म्हणजे केवढा भयंकर गुन्हा आहे हे समजतं. माणूस जगण्यासाठी, भुकेसाठी कुठवर मजल मारू शकतो हे समजतं. आपण ज्या गोष्टी अगदी सहज गृहीत धरतो, अगदी रोजची अंघोळसुद्धा, त्या एखाद्यासाठी केवढा मोठा प्रश्न असू शकतात हे पाहून सुन्न व्हायला होतं.
झैनचं काम (त्याचं खरं नाव देखील झैनच आहे) अतिशय सुंदर झालंय. चित्रपटभर आपल्याला त्याच्याबद्दल “पाप गं बिचारं पोरगं” वाटल्याशिवाय राहत नाही पण त्याच्या प्रेमात पडल्याशिवायही आपण राहत नाही. इतका गोड, हुशार आणि चपळ आहे ना तो! चित्रपट पाहताना त्याच्याबद्दल खूप वाईट वाटत राहतं, पण कुठेतरी एक विश्वास असती की झैन या सगळ्यांशी लढणार, यातून बाहेर पडणार. त्याचे त्या इथोपियन बाळाला सांभाळतानाचे प्रयत्न पहाताना अक्षरशः हृदयाला घरं पडतात. एवढूसा जीव बिचारा काय काय करतो! मानवी जीव किती चिवट आहे, जगण्यासाठी तो काय काय करू शकतो याचा जणू आलेखच मांडतो हा चित्रपट.
मी स्वतः अतिशय आशावादी व्यक्ती आहे, मला सतत दुःख, निराशेवद्दल बोललेलं अजिबात आवडत नाही. प्रत्येक गोष्टीत चांगलं, सकारात्मक काहीतरी पहायची सवय म्हणा किंवा खोड म्हणा, मला ती आहे. आणि म्हणूनच हा चित्रपट मला प्रचंड आवडला तो त्याच्या शेवटामुळें! चित्रपटभर जरी आपल्याला अतिशय वाईट वाटत राहिलं तरी याचा जबरदस्त आणि feel good शेवट पाहून फार फार छान वाटतं. सगळ्यात कहर म्हणजे शेवटी झैनची त्याच्या आयडीसाठी कॅमेरात बंदिस्त झालेली मुद्रा. काही चेहरे आपल्या आयुष्यभर लक्षात राहतात. झैनची फोटोतली ही मुद्रा सुद्धा कायम लक्षात राहणारी आहे. जियो झैन जियो!
ऑस्करला गेलेला हा चित्रपट आहे. केपरनॉम अवश्य पहा. ऍमेझॉन प्राईम वर आहे. आपल्या डोक्यावर हक्काचं छप्पर आहे याबद्दल कधीही इतकं छान वाटलं नसेल जितकं हा चित्रपट पाहून वाटेल.
Image by gagnonm1993 from Pixabay 
Gauri Brahme
Latest posts by Gauri Brahme (see all)

Gauri Brahme

गेली वीस वर्षे पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागात जर्मन भाषेची अध्यापिका म्हणून काम करते. अमराठी लोकांना मराठी शिकवते. भरपूर लिहिते, वाचते, कलाकुसरीच्या वस्तू बनवते, खादाडी करते, इतरांना खिलवते. लेखिका म्हणून नावावर २ पुस्तकं जमा आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!