प्रवास कथा- आठवणीत अडकलेले रस्ते, भाग दुसरा
आठवणीत_अडकलेले_रस्ते, भाग दुसरा
कल्पा, ……. समुद्रसपाटीपासून जवळजवळ 10000 फूटा वर आलो होतो. सूर्यास्त होता होता, हवेतला गारठा वाढत गेला अन मनातल्या चिंताही.
आम्ही ज्या ट्रेकसाठी आलो होतो, त्या किंनौर कैलासची वाट प्रशासनाने बंद केली होती. वर पार्वती कुंडाजवळच्या बर्फाचा मोठा भाग अचानक वितळून, पायथ्याच्या सतलजच्या दिशेने धावला होता. बरेच जण वर अडकले होते. पुण्याची एक ट्रेकर वाहून गेली होती. तिच्या बॉडी चा शोध पोलीस घेत होते. त्यामुळं अर्थातच, ट्रेकचा रस्ता बंद करण्यात आला होता. ठरल्या प्रमाणे, किंनौर कैलाशच्या अगदी समोर असलेल्या कल्पागावात आम्ही मुक्कामी येऊन थांबलो होतो. चार दिवस जास्तीचे धरून, परतीच्या फ्लाईटचा दिवस पक्का केलेला होता. दुसऱ्या दिवशीही पोलिसांचा मेसेज आला, No clear.
कल्पा अन आणखी एक बॉर्डरवरच छोटसं खेडं रोघी पहायला गेलो. छोट्याश्या गावातला छोटा रस्ता, तुडवत चाललो होतो, सुंदर लाकडी मंदिरं, बौद्ध प्रार्थनास्थळ पहात, त्या रस्त्याने जात होतो, ज्या रस्त्याने चिनी सैन्य, आत घुसले होते. दोन्ही बाजूला, सफरचंद लगडली होती. अगदी सहज हाताशी येत होती. जाता जाता प्रत्येकाने, एकेक तोडून खायलाही सुरुवात केली. इथेही सफरचंद पॅक करून मार्केटला पाठवणारी, सहकारी सोसायटीही होती.
आमच्यापैकी एकानं सफरचंदाच्या झाडासोबत फोटो काढायला, पोज द्यायला सुरुवात केली, त्यासरशी वरून एक धोंडा आला. आम्ही वर पाहिलं. तर एक किनौरी पोशाखातली म्हातारी तिच्या लोकल भाषेत शिव्या घालत होती. भाषा कळत नव्हती. पण आपल्याकडे अंजिराच्या बागेवर लक्ष ठेवणारी, धुरपा काकी, नाहीतर पारू आज्जी असते ना, तीच बॉडी लँग्वेज. त्यामुळं, शिव्या घालतेय हे समजणं सोपं होतं. सगळे पटापट तिकडून सटकलो.
ट्रेकिंगच्या दृष्टीने , एक दिवस वाया गेला असला तरी, चीन सीमेवरचं निसर्गानं समृद्ध गाव पहातानाचा अनुभव खास होता. चिन्यांना पाहिलेले म्हातारे डोळे, अजूनही गावात जिवंत होते. अन चिनी कसे आले, कसे गेले, कुठं लपून त्यांच्यावर लहानपणी दगड फेकले हे सांगताना, त्या सुरकुत्यांनी वेढलेल्या डोळ्यात एक वेगळीच चमक दाटली होती. आता, भारतीय पोस्ट गावातून न दिसेल इतक्या पुढं आहे. गाव सुरक्षित आहे. तरीही भारतीय फौज, अधूनमधून गावकऱ्यांचं मनोधैर्य कायम ठेवण्यासाठी , गावातून मार्चिंग करत जाते. सगळे अनुभव मनात अन कॅनन च्या कॅमेऱ्यात साठवत पुन्हा खाली कैलाशच्या पायथ्याला आलो.
सतलज अजूनच गढूळ झाली होती. तशी तिबेटमधल्या, राक्षसताल मधून उगम पावणारी, ही राक्षसी वेगाने वहात येणारी नदी, गढूळ असणं सहाजिक होतं. तिच्या अजस्त्र ऊर्जेचा वापर करत, हिमाचल मध्ये ठिकठिकाणी पॉवरप्रोजेक्ट्स जिंदाल कंपनीच्या साहाय्याने सुरू आहेत.
आता किंनौर कैलास वर पाऊस सुरू झाला होता. Rescue operation सुरूच होतं. पोलिसांचा नो क्लिअर चा सिग्नल घेत आमची मॅटेडोर आता, सांगला व्हॅलीच्या दिशेने निघाली. सतत चढणीच्या रस्त्याने, सतलज भोवतीच वेढे घालत, जवळजवळ ताशीव कड्यांच्या रस्त्यांवरून आम्ही निघालो होतो. जवळजवळ पाचशे मीटरच्या 20 ते 30 अंशातल्या उतरणीवर, किनौरी सफरचंदाची लागवड होती. बराचसा रस्ता, जेमतेम एक व्हॅन बसेल इतकाच रुंद, चुकून कुठेतरी, दोन वाहनांची रुंदी……. दोन वाहनांना एकमेकांना पास करण्यासाठी तीच जागा वापरायची. अशा तीव्र उतारावरून सफरचंद तोडत, सहज पाठीवर ओझी घेऊन येणाऱ्या बायका अन पुरुष पाहिले की वाटायचं, यांच्या हृदयाच्या जागी, नक्की कोणता पंप देवानं फिट केला असेल. अगदी न थकता, सहज चढून येऊन , हे लोक बससाठी रस्त्यावर येऊन थांबायचे.
संध्याकाळचा चहा, सतलजच्या अरुंद पण शांत प्रवाहाच्या किनाऱ्यावर घेताना, तिथंच सेटल होण्याची इच्छा झाली नसती तर नवल. मुलाला फोन लावला, फोटो टाकले, …… थोड्या वेळाने, बेटयानं आपल्या जहागीरदार बापाला, व्हाट्सअप्प वर मेसेज टाकला,
” तिथे एक बंगला बांधू या आपण नदीकिनारी, जागा बघूनच या.”
सोबतचे मित्र न मी खूप हसलो त्याच्या बालबुध्दीवर.
पण खरंच, खूपदा भेटतात हिमाचलची माणसं, आपल्या मुंबईत. नोकरी धंद्याच्या निमित्ताने. पण सुख, ……. सुख म्हणजे काय असतं, ते हिमालय वासीयांना तरी, मी आयुष्यात कधी सांगायच्या भानगडीत पडणार नाही.
हॉटेलवर पोचलो, ते नेहमीचं पिली दाल नाहीतर राजम्याच्या ऑप्शनने आम्ही मेनू कार्ड बघणं सोडुन दिलं होतं. जेवणं उरकून सांगल्यात एक फेरी मारून आलो. तालुक्याचं गाव, त्यामुळं छान चहलपहल. खाण्याचे लोकल ऑप्शन मित्रांनी शोधून काढलेच. सकाळच्या नाश्त्यासाठीच्या ठिकाणांना टिक मार्क करत पुन्हा हॉटेलवर परतलो. जेमतेम बूट काढून अंगावरच्या जाड जॅकेटसह आडवा झालो तो थेट उठलो सकाळच्या चहाच्या आरोळीनेच.
तोवर मनिषने चिटकूल गावाची माहिती काढलीच होती. समोर शाळेची प्रार्थना सुरू होती. अर्धी मुलं पेंगत, अर्धी सुरात सगळा आनंद सुरू होता. सगळे आम्हाला सांगत होते, मिलिटरी वालों के अलावा कोई नहीं मिलेगा वहां चितकुलमें ।
तरीही आम्ही फटाफट नाश्ता उरकून, मॅटेडोर काढली. चिटकूल चा रस्ता, बराचसा जंगलातून होता. बऱ्याच ठिकाणी तो नव्हताच खरंतर. ठिकठिकाणी, इंडोतिबेटियन बॉर्डर पोलीस चे चेक पोस्ट पार करत चिटकूल गावाशी येऊन पोहोचलो. पण तिथे न थांबता, आम्ही गाडी जिथपर्यंत नेऊ शकतो तिथपर्यंत पुढे नेली अन इंडोतिबेटीयन बॉर्डर पोलिसचा कॅम्प अन फायनल पोस्ट नजरेच्या टप्प्यात आली. तिथं बीएसएफ किंवा मिलिटरी नव्हती. तिथपर्यंत चालत जात, त्यांची भेट बातचीत झाली. फोटोसाठी त्यांनी मनाई केली तरी आमच्या बहाद्दरांनी दोस्ती जमवून, सेल्फी घेतलेच. खूप वेळ काढला तिथं. कुणालाच निघावंस वाटत नव्हतं. तिथं हॉटेल, खाण्याची सोय, काहीच नव्हतं. जनवस्ती खूप मागे राहिली होती.
समुद्र सपाटी पासून १४९३० फुटांवर फुललेल्या, सुंदर रानफुलांनी अन मोहरीच्या फुलांनी वातावरण प्रसन्न करून टाकलं होतं. महाराष्ट्राच्या खडकाळ भागातले आम्ही, पण वातावरणातली प्रसन्नता, आमच्या त्वचेवर , चेहऱ्यावर झळाळी आणत होती. लहानपणी, आईनं हौसेनं काढुन घेतलेल्या कृष्णधवल फोटोंनंतर , थेट तिथं काढलेले फोटोच पुन्हा सुंदर आले होते. भर दुपारी, थंडी वाजत होती. जास्त वेळ थांबणं शक्य नव्हतं. बहुधा आज रात्रीच सांगल्यातून खाली जाण्याचं घाटत होतं.
काहीजण तिथल्या कॅम्पिंग च्या प्रेमात पडले होते. सांगल्यात जाऊन खाली निघून जायचं की, चिटकुलात कॅम्पिंग करायचं अशी चर्चा सुरू होती. त्यात जितका जास्तीत जास्त वेळ निघून जात होता, तितका वेळ तिथं थांबायला मिळत होतं म्हणून मनात आनंद होता. मी डिस्कशन एन्जॉय करत होतो. पण भूक वाढत चालली तसे परतीच्या रस्त्यावर सगळे एकमत झाले.
वाटेतल्या जंगलातल्या एकांडी धाब्यावर, जे मिळेल ते सर्वांनी हादडून घेतलं. मॅगी किती, ऑम्लेट किती, पराठे किती अन चहा किती त्या माणसाचा हिशोब काही लागेना. तेव्हा अंदाजपंचे पोपटरावांनी थोडे जास्तच पैसे द्यायला लावून घोळ मिटवला.
सांगल्यात यायला संध्याकाळ झाली होती. सुर्यास्ता आधी, खाली निघून जाणं गरजेचं होतं. सर्वांनी बॅगा मॅटेडोर वर लोड केल्या. दोन्ही मॅटेडोर सामान बांधून लोड झाल्यावर, पोलिसांनी बातमी दिली, सांगला घाट बंद झाला होता. वाटेत पूर्ण रस्ता अडवू शकणारी शिळा येऊन पडली होती. सकाळी गेलेली, हिमाचल ट्रान्सपोर्टची बसदेखील माघारी येऊन थांबली होती. हायड्रोलीक हॅमरने ती फोडण्याचं काम सुरू होतं. दोन दिवस मुक्काम पक्का झाला. पुन्हा बॅगा खाली घेतल्या. बॅगामधून कॅट बाहेर आले. गाण्याच्या भेंड्या रंगल्या. कोपऱ्यात जिथं नेटवर्क येईल तिथून, घरी कॉल सुरू झाले. घाटाच्या कहाण्या रंगवून सांगायला सुरुवात झाली. अन ओले टॉवेल अन न सुकलेल्या कपड्यांनी हॉटेलची रूम पताकांनी सजवलेल्या मंदिरासारखी भासू लागली. रात्री पुन्हा गावात एक फेरी झालीच. बरोबर असलेल्या बॅचलर पक्ष्यांनी पुन्हा कालच्याच आंटीच्या हॉटेलवर धाड मारली. त्यांचा तरी काय दोष, तिची मुलगी खरंच खूपच सुंदर होती.
दुसरा दिवस उजाडता उजाडता काही स्फोट ऐकू येऊ लागले. थोड्या वेळानं समजलं ती मोठी शिळा हॅमरिंगला दाद देत नव्हती. म्हणून ऍम्युनेशन ने फोडण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. बहुतेक दुसरा मुक्कामही पक्का दिसत होता. आता शिमल्याकडे निघण्या साठी तीनच दिवस उरले होते. किनौर कैलाश ट्रेक साठी साधारणपणे चार दिवसांचा अवधी आवश्यक होता. पहिला मुक्काम गणेश बाग, जिथून पूर्वी पूजा करून लोक खाली निघून जायचे. दुसरा मुक्काम पार्वती कुंडाच्या अलीकडे गुहेजवळ. तिसऱ्या दिवशी सकाळी शेवटची चढाई व खाली गणेश बागेत मुक्काम. अन चौथ्या दिवशी, उतरून खाली सतलजच्या पात्राजवळ मिलिटरी कॅम्पमध्ये वापसी. जवळजवळ ट्रेक होणार नसल्याचं स्पष्ट होत होतं. उद्या रस्ता मोकळा झालाच तर खाली जाऊन स्पिती व्हॅली किंवा इतर स्पॉट वर फिरण्याचा मानस बहुतेकांचा होऊ लागला. कारण दिवस निघून जात होते, तसतसे मनोधैर्यही खचत चालले होते. ट्रेक साठी आवश्यक मानसिकता जवळजवळ संपुष्टात आली होती. अन दुपार टळता टळता निरोप आला, चार नंतर खाली जाऊ शकतो.
हातात फक्त तीन दिवस होते. किंनौर वरून निरोप यायचा बाकी होता. तीन दिवसात ट्रेक कसा होणार, याची चाचपणी सुरू झाली. अन पुन्हा निरोप येऊन धडकला, उद्यापासून किंनौर कैलाश साठी ट्रेकर्स आणि भाविकांना रस्ता खुला करणार. आता द्विधा मनस्थिती अजून टोकाला गेली. तरीही आवरून खाली निघणं गरजेचं होतं.
कधीही रस्ते बंद होऊ शकणाऱ्या, पाठीवर चीन अन तिबेटला घेऊन उभ्या असलेल्या, अन अत्यंत धोकादायक घाटानी जगाशी जोडलेल्या त्या सांगला व्हॅलीत मी अगदी परवाच तर सेटल होण्याचा विचार करत होतो. बॅग मॅटेडोरच्या छतावर टाकताना, स्वतःच्या कमकुवत स्वप्नविश्वाचं माझं मलाच हसू येत होतं. अन परवापासून लळा लागलेल्या, माझ्यासारख्या कोणत्याही फालतू समस्यांमध्ये न अडकलेल्या खंड्याला थोपटताना, उगाच त्या श्वानरत्नाचीही असूया वाटून गेली. नाहीतरी, खरं सुख भरून घ्यायला झोळीही तितकी मजबूत असावी लागतेच की.
तिथं भेटलेला गुंगा मात्र पक्का लक्षात राहिला. डोक्यावर हिमाचलातली किन्नौरी टोपी, त्यावर फुलांचा साज, डोळ्यात आनंदाची चमक, प्रसन्न हास्य असलेली हि व्यक्ती कुणी मॉडेल नाही. ना जगाला आत्मज्ञान शिकवणारा कुणी गुरू.
हि व्यक्ती म्हणजे हिमाचल pwd च्या कामांवर कोणतेही काम करणारा साधासुधा मजूर गुंगा …..
हसण्यासाठी त्याच्याकडे वेळ होता, पण बोलण्यासाठी जीभ नव्हती, पण तरीही तो बिचारा नव्हता….
त्याला शनिवार, रविवार, सुट्टी या भानगडी माहित नाहीत. रविवारी काम सुरु नसेल तेव्हाही इंजिनिअरच्या दारात हा जाऊन बसेल… शेजाऱ्यासमोर, कामावरच्या इतर कामगारांसमोर किंवा गेला बाजार फेसबुक वर मिरवावे असे काहीहि त्याच्याकडे नव्हते. असलाच तर होता फक्त निखळ हास्याचा त्याचा दागिना, …… संध्याकाळचे जेवण मिळणार की नाही, या गोष्टीची देखील शाश्वती नसताना, आनंदी राहणारा जीव पाहिला, की मजल्यांवर मजले चढवणाऱ्या, सुरक्षित जीवन जगणाऱ्या अन तरीही, आनंद शोधत फिरणाऱ्या लोकांची कीव वाटली.
……………………………………….
असो, हाती उरलेले तीन दिवस, अन खचलेले मनोधैर्य यातून ट्रेक कसा रोमांचक होत गेला हे पुन्हा केव्हातरी, तूर्तास निघू या मिलिटरी बेस कॅम्पकडे, पुन्हा सतलजच्या किनाऱ्यावर…… ©बीआरपवार
Image by Michael Gaida from Pixabay
- Poked you …… - July 31, 2023
- एमएटी - June 10, 2022
- पत्रास कारण की… - April 21, 2022