गुंतता हृदय हे…जाई

आज चैत्या पिसाटला होता. डोकं नुसतं भण भण करत होत.. . . भवाडी गावच्या फाट्याकडं लक्ष न देत, सरळ काश्याच्या दिशेनं चालायला लागला. . . . . .
श्रावणातल्या वेलींनी गंभीरगडाचा परिसर हिरवागार करून टाकला होता. त्या हिरवाईकडं बघायला त्याच डोकच जाग्यावर नव्हतं. हातात एक लपापती काठी घेऊन उगाच गवताला मारत बांधानं झपाझप चालत होता. . . . . . .

इतका भान हरपला होता कि समोर फुरशा येऊन उभा राहिला तरी भान नाही. शेतात उभा जान्या ओरडला, ” फुरशा …… फुरशा ” तसा चैत्या थबकला. पण क्षणभरच.

डोक्यातली राख काही कमी झाली नव्हतीच, त्या विजेच्या जिवंत रुपाला , म्हणजे फुरशाला पुढच्याच क्षणी, चैत्यानं काठीने लांब उडवून लावलं होतं.
“आरं, डूख धरन, …… आसं नको करू , . …… कच्चीकडं चाल्ला असा फणफणत? ”
जान्या पुन्हा ओरडला.
पण चैत्या लक्ष न देता चालत राहिला.

भवाडी गावची घुट्याची “जाई” काही डोक्यातनं जाईना.
काशाच्या आश्रम शाळेत शिकला सवरलेला पोरगा. शिकून भवाडीच्या शाळेत टेम्परवारी मास्तर पण झाला.
नदीच्या पल्याड भवाडी. तिथली घुट्याची जाई त्याची आश्रम शाळेतली मैत्रीण. शाळेत जास्त बोलता यायचं नाही. पण बाजाराच्या दिवशी भेटायची. हातातली गोडी शेव चा पुडा अलगद तिच्या हातात द्यायचा. ती का गोड हसती तेच चैत्याला उमगायचं नाही.

आता नोकरी लागल्यावर परत भेट झाली. ती पण नववी शिकलेली. तिच्या मोठ्या टपोऱ्या डोळ्यात आश्चर्य मावत नव्हतं, चैत्या मास्तर हुन, तिच्याच गावात आल्यावर.

चैत्या मल्हारी आदिवासी. जाई कोकण्या आदिवाश्याची.
देव वेगळं, पद्धत वेगळी. मल्हारीचे देव कडक, जाग्यावर सजा देणारं. पण ह्या सगळ्याचा इचार करतो कोण.

चैत्या चा बाप बुधल्या रात्रभर बडबडत राहिला.

पण सकाळ उठून बघतो, जितु घुटया झोपडीच्या दारात हजर. जाईचा बाबा.
“बस”

जित्यासाठी चटई टाकली. जित्या वट्यावर बसला. पहाटला काढलेली ताडी अर्धा अर्धा ग्लास घिऊन दोघ बसलं.
” का कराचं ” ताडीचा घोट घिऊन ढेकर देत जित्यानी तोंड उघाडल.

” काई नीही कराच. माझ्या मनाला बरं न्हाई लागत.” बुधल्याचा स्पष्ट नकार ऐकून जित्या चपापला.

” जाई म्हणं, चैत्यालाच वराचं. नाई त जीव देल पोरं”

” नी हि तं दे पाच हजार डावरी” बुधल्या व्यवहारात घुसला.

जित्याला पाच हजार जास्त होते. त्याची एकुलती एक जाईच त्याची लाडोबा होती. त्याची झोपडी, जमिनीचा तुकडा तिचाच तर होता. पण आता पाच हजार जास्त होते. काश्यात कुनीबी उधारी दिलंच कि. त्यानं मनाची तयारी केली.
“मंग लगीन आमच्या परीनं हुईल.” आता जित्या आखडला.
“म्हंजी?”
” आमचं हिरवं देव आधी पूजाया लागल. नवरी निळं लुगडं नेसण”

झालं … संपलं ….. बुधल्या कडाडला,
” नी ही , आमी मल्हारी, लाल लुगडं नेसान लागतं लगनात”

आता दोघांना ताडी चढली होती. दोघ काय बोलत होते दोघांना भान राहिलं नाही. हमरीतुमरीवर आलेली भांडणं , चैत्याच्या आईनं सोडवली. एवढी महत्वाची गोष्ट नव्हती खरं.

जित्या शिव्या बरळत निघून गेला. आता लग्नाचं बारा वाजलेले जाईनं ओळखलं होत. लुगड्याच्या रंगावरून इतका गोंधळ हुईल अस स्वप्नात नव्हतं वाटलं तिला.

” तो पोरं आन त्याचा बा चांगला नाय मिलं, त्याला नको करू” प्यायलेला जित्या घरी येउन दरडावला पोरीवर.

“त्यालाच म्या कराच”

असं पुटपुटत, पाय आपटत जाई झोपडीत जाऊन मुसमुसत राहिली.

सगळं चैत्याच्या डोळ्यासमोरुन पिच्चर सारख पुन्हा पून्हा फिरत राहीलं.. . . . . आन त्याच्या आईनं जव्हार रस्त्यावर विकायला बनवलेला गजरा चोरून, जाईला निऊन दिला तेव्हाचा जाईचा फुललेला चेहरा डोळ्यासमोरून हटत नव्हता.. . . . . त्या गजऱ्याचा दरवळ पुन्हा येत राहिला, . . ….. चैत्याची पावलं मंदावली. तरी पण चालतच राहिला.

कधी ताडीला हात न लावणारा चैत्या आज ताडीपट्टयाच्या बाहेर येऊन झाडाखाली टेकला होता.. . . . . ताडीवाल्यानं मास्तर ओळखला. तो आत यायचा नाही. त्यानंच अर्धा लिटर ताडी मग भरून जवळ निऊन ठेवली. सोबत भज्या होत्या.
ताडीचा ग्लास तोंडाला लावला अन घळाघळा डोळे गळू लागले. लहान मुलासारखं रडू फुटलं. जाईचं नाव घिऊन दुसरा ग्लास भरला. सगळं सूनं सूनं वाटत होतं. बीए ला असताना वाचलेली “कातरवेळ ” माझ्या जाई वर पण येणार, अस त्याला कधी वाटलं नव्हतं. तिच्या टपोऱ्या भरल्या डोळ्यात संध्याकाळचा सूर्य विझताना त्याला दिसत होता. ताडीची गर्मी रक्तात भरत चालली होती. माळावरन येणारी गार हवा उगाच आव्हान देत होती. मी काहीच करू शकत नाही, हि भावना चैत्याचं डोकं भडकवत राहिली. शिकलो नसतो तर कोयता घेऊन तरी उभा राहिलो असतो. वीज पडून जंगलातलं झाड उभं चिरावं तशी डोक्याची भकलं पडायची वेळ आली होती.

“नेसली असती लाल लुगडं एक दिवस तर काय झालं असतं. पाहिजे तर आयुष्यभर निळया साड्या घेतल्या.”
असलं काहितरी बडबडत राहिला चैत्या.

” म नेशिन कि लाल लुगडं, मी कई नी बोल्ली ”

चैत्या दचकला.
कोण हि बाई, माझी टर उडवती. चैत्यानं  झटक्यात वळून बघीतलं.

” जाई ?,…. जाई !!”

लाल बुंद लुगड्यात जाई समोर उभी होती. त्याच्या मोठ्या झालेल्या डोळ्यांवर हात ठेवत ती शेजारी बसली.

” नजर लागती तु आसं बगू नको, अन चांगलं पाचशाचं लुगडं घे लगनात.”
चैत्या आता डोळ्यातले डोह तिथेच थांबवत, वेड्यासारखा खदाखदा हसायला लागला होता, ताडीपट्टयातली सगळी बेवडी , मास्तर कडं बघायला लागली. आन लाल लुगड्यातली ही नवीन मल्हारीन पदरानं तोंड लपवून हसू लागली होती.

©बीआरपवार

Image by efes from Pixabay 

B_R Pawar
Latest posts by B_R Pawar (see all)

B_R Pawar

बी आर पवार , भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये नोकरी. शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनिअर आहे. त्याखेरीज कथा, कविता, चित्रकलेत रमतो. जीवनानुभव शब्दात चितारायला आवडतो.

2 thoughts on “गुंतता हृदय हे…जाई

  • February 26, 2021 at 2:50 pm
    Permalink

    ग्रामीण बाज मस्तं पकडता तुम्ही👌👌👌

    Reply
  • February 27, 2021 at 6:50 am
    Permalink

    वाह… खुप सुंदर लिखान… भार्री 👌👌

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!