गुंतता हृदय हे…कोडं प्रेमाचं- भाग २
” चलो हर्ष बेबी , आपल्याला निघायला हवं .”
” व्हॉट ? मॉम , लगेच ?”
” तु तर यायला तयार नव्हतास .मग आता का ?”
” मॉम तू जा . मी काही दिवस आजीसोबत राहातो .”
रोहिणीला हेच अपेक्षित होते .
हर्ष राहिला ,आणि खूपच रमला .
दुसऱ्या दिवशी रंगपंचमी होती .
आजी नि मागचा हौद मुलांसाठी भरून घेतला . रंग ,फुगे सगळी तयारी झाली .
पोरं बनियन वरच आले होते .
” ए हर्ष ,इतक्या चांगल्या कपड्यात रंग खेळणार ? बदल की ”
हर्ष आत गेला . “आजी , हे सगळे असेच आलेत .'”
” रोज नवीन कपड्यांची चैन त्याना परवडत नाही बाळा , . तुला नाईट ड्रेस आहे न ? तो घाल ”
सगळ्यांनी खूप धमाल केली .
खेळून झाल्यावर आजीने सगळ्यांसाठी जेवण ठेवलं होतं .
पोरांनी मनापासून हादडलं .
हर्ष नि एक नोटीस केलं ..ह्या मुलांना हर्ष बद्दल जराही असूया नव्हती . हे सगळं आपल्याला मिळत नाहीये ,याचा जराही लवलेश नव्हता .
संध्याकाळी दत्तू काकांच्या वाडीत जायचं ठरलं होतं . पोरं निघाली तशीच . त्यांचं बघून हर्ष नि पण स्लीपर्स घातल्या .
” हर्ष , मधल्या रस्त्याने जायचंय , बूट घाल .” टप्प्या म्हणाला .
” तुम्ही ..?”
“आम्हाला काट्याची सवय झालीये ,तुला सहन नाही व्हायचं ” गौरी
हर्ष साठी हे जगच नवीन होतं .तमाम सुखं पायाशी असतांना दुसऱ्या मुला सारखे बूट हवे , नवीन सायकल हवी …..अस हट्ट करतो आपण . मॉल मध्ये जाऊन बेसुमार खर्च करणारे मुलं देखील इतके यांच्या सारखे संमाधानी नव्हते .
मुकुल , चिंगी , सावित्री आणि खास मैत्रीण गौरी . बडबडया गौरी ने हर्ष ला नारळ सोलणे , सुपारी फोडणे , गाईचं दूध काढणे असं काय काय शिकवलं .
हर्ष ने तिला लॅपटॉप वापरणे , प्रिंट काढणे , इंटरनेट , पेन ड्राईव्ह वापरणे हे सगळं दाखवलं .गावातील एकमेव नेट दुकानात (कॅफेत ) जाऊन तिला मोठ्या नविन जगाशी ओळख करून दिली .
हुशार गौरी ने सगळं पटापट शिकून घेतलं .
तिच्या शाळेत कॉम्पुटर होता , पण तो आठवी पासून पुढच्या मुलांनाच बघायला मिळे .
तो अन गौरी सतत सोबत असत .तिच्या आई अन बापू ला कोण कौतुक वाटे पोरीला चुटु चुटु इंग्लिश बोलतांना पाहून .
गावात एक तलाव होता . उन्हाळ्यात पण पाणी असायचं त्यात. गौरी त्याला तिथे घेऊन गेली . एका बाजूला कमळं फुलायची , गावकरी मुद्दाम त्या बाजूचा वापर करत नसत . हर्ष नि कमळ फक्त चित्रातच बघितलं होतं.
तलावात खूप शिंगाडे असत .
” हर्ष , तुला शिंगाडे खायचे ?”
” म्हणजे ?”
गौरी खिदी खिदी हसली ..” कसा रे तू ,तुला काहीच माहीत नाही .”
” तुला जसं सगळं माहितेय .आली मोठी . सांग बरं मुंबईत किती एअरपोर्ट आहेत ?”
” जे मला माहित नाही ते तू सांग न ”
अशी मोठ्या माहितीची मजेत देवाण घेवाण चालली होती .
शेवटी हर्ष च्या बाबांचा इंडोनेशिया वरून फोन आला . त्यांनी हर्षची थायलंड समर कॅम्प ची फीस भरली होती . हर्ष ला मुंबई ला बोलावले होते.
” तू जाणार हर्ष ?”
” हो जावं लागेल .हॅट बाबा !! मला नाही जायचं गौरी ! ,
ए ,तू येतेस मुंबई ला ?”
” नाही , शन्नो आक्कीचं लग्न आहे .”
” शन्नो चं लग्न ? अग तिच्या पेक्षा कितीतरी मोठी माझी पायल दीदी ..मावशीची मुलगी ग …आहे .ती तर आत्ता U .S ला जातीये . शन्नो बारावी तरी झाली का ?”
” दोन वर्षांपूर्वी दहावी झाली , मग शिलाई चा कोर्स केला .”
” she is so young !!”
” यांग बिंग नाही बघत रे , इकडं लग्न लावून टाकतात .”
” मग तुझं पण असंच होणार लग्न ? ”
” काय माहीत !!”
” अरे !! तुला नाही तर कुणाला माहीत ? गौरी , तू हुशार आहेस .अशी पट्कन लग्न करून टाकू नकोस ह ?
आमच्या पायल दीदी सारखी हो ”
कदम काका गाडी पुसत होते . हर्ष ला कसं तरी होत होतं .पोटात ढवळून येत होतं . कालू ,मुकुल , टप्प्या , चिंगी ,सगळे भेटायला आले होते ,कावरे बावरे चेहरे घेऊन . कुणी चिंचा , कुणी खेळायचे गजगे ,कुणी छोट्या कैऱ्या असे आणले होते ..काय मधूर जग होतं ते ..हर्ष नि पण मॉम ला सांगून कदम काकांमार्फत कॅडबरिज आणल्या होत्या .त्याने सगळ्यांना कॅडबरिज दिल्या .
गौरी कुठेच दिसत नव्हती ..
…कालू ,गौरी कुठाय रे ?
त्याने फक्त खांदे उडवले .
कदम काकांनी गाडी सुरू केली ..हर्ष आजीच्या पाय पडला .
पण त्याचा पाय निघेना . ही गौरी ऐन वेळेवर कुठे गेली ?
हेरंब काका , गौरी कुठाय ? त्याची चीड चीड झाली .
“तिच्या घरीच जाऊ काका ,चला ”
गौरी घरी पण नव्हती .
गाडी निघाली ..हर्ष ला रडू येत होते ..
दत्तू काकांची वाडी मागे पडली ,आणि आवाज आला ” ह s s र्ष !! ”
” गौरी s !! ” त्याने दार उघडून बाहेर उडीच घेतली .
मागून गौरी धावत येत होती .
” कुठे निघालास रे , न भेटता ? ”
” मुर्ख कुठली !! मी तुला गाव भर शोधतोय , तू कुठे होतीस ग ?”
…..
” आग बोल की !!”
तिने हळूच मागून काहीतरी काढले .
ते कॉम्पुटर वर तयार केलेले फ्रेंडशिप ग्रीटिंग होते .
” wow !! Osome !! तू केलंस?”
” मग !! तू शिकवलस न !! ”
” गौरी , आता मला 9,10 वी साठी special क्लास लावलाय .माहीत नाही सुटीत मी येऊ शकेल की नाही .”
…….तिचे डोळे डबडबले होते .
त्याने तिला कॅडबरी दिली , अन झटकन गाडीत बसला .
आरशात बघितले ,काही अंतरापर्यंत गौरी मागे धावत होती …
मग दिसेनाशी झाली .
त्याने झरकन वळून बघितले , एक ठिपका अजूनही तिथेच उभा होता माळावरती .
माळावर ची गौरी दिसेनाशी होई पर्यंत हर्ष मागे बघत होता . आजीने डबा दिला होता प्रवासात खा म्हणून . त्याने गाडीतील सुटे सामान बघितले .चिंचा , पेरू , गजगे आणि हे ग्रीटिंग . त्याने अलगद हाताने ते उघडले .
एक मुलगा हातात डिग्री घेऊन उभा आहे ,असं चित्र प्रिंट केलेलं होतं .
खाली लिहिलं होतं ,
‘ तू म्हणालास नं की तुला मोठ्ठा कॉम्प्युटर इंजिनिअर व्हायचंय , मग ह्या चित्रा कडे बघत अभ्यास कर नक्की होशील . पण पुढच्या सुट्टीत नक्की ये बरं का !! मला पण अजून कॉम्प्युटर शिकवायला . ‘
तुझी मैत्रीण,
गौरी
ग्रीटिंगच्या खाली हाताने काढलेलं फुल ओलं झालं होतं ,दोन थेंबाने . हर्ष नि डोळे पुसले .
त्याला मुंबईत खूप मित्र मैत्रिणी होत्या . खूप मस्ती करायचे सगळे . रश्मी ,चिन्मय आणि हर्ष हे त्रिकुट मिळून चाट खाणे , आइसक्रीम पार्लर ला जाणे , घरी विडिओ गेम्स खेळणे अशी खूप मजा करायचे ,पण हे आताचं काहीतरी वेगळंच होतं …अस्सल …आई म्हणाली न , येतांना ,तसं अभिजात ,ओरिजिनल !!!
बाबांना सांगूया की इथे गावात छानशी शाळा आणि कॉलेज काढा , माझ्या ह्या मित्रांसाठी .
क्रमश:
- आत्तु-भाग ३ (शेवटचा भाग) - June 17, 2022
- आत्तु- भाग २ - June 7, 2022
- आत्तू- भाग १ - June 3, 2022
Bhaari