गुंतता हृदय हे…कोडं प्रेमाचं- भाग ४

अगदी सफाईने त्याने हवेली समोर गाडी पार्क केली .

काही तरुण मुले त्याला भेटायला आले होते …अरे s s हे तर …

त्याने धावत जाऊन हात पसरून सगळ्यांना कवेत घेतलं .

” कालू , टप्प्या , तू …मुकुल्या ..अरे किती मोठा दिसतोय ”

” बस क्या !! तू पण तर लगेच कार बिर हा s s !!”

सगळ्या ना खूप गप्पा मारायच्या होत्या . आजी नि सगळ्यांना भरपूर खायला घातलं .

” गौरी नाही आली रे ? ”

” ती ,बडबडी ? तिला तर ठाण्याला जायचं होतं बाबा कुठल्या तरी कॉलेज ची चौकशी करायला .काल म्हणत होती .” …कालू

” पण तिला माहितेय न ,मी येतोय म्हणून !”

सगळ्यांनी माना हलवल्या .

” भेटू रे संध्याकाळी ” म्हणून गेले सगळे .

” आजी , तू का ग येत नाहीस मुंबईला ?”

” मग तुमचं आजोळ सुटेल न रे !” आजी प्रसन्न हसली .

” आजी , ही गौरी आजकाल बोलतच नाही नीट फोन वर .”

” अरे , आधीची गौरी म्हणजे अल्लड ,अवखळ पाणी होतं . आता मोठी झाली ती . झरा अवखळ असतो , डोहाला मात्र खोली असते . आली होती गोकुळाष्टमी ला . काय सुंदर हार करून आणला होता , तुझ्या आवडीच्या मोगऱ्याचा . विचारत होती तुझ्याबद्दल .”

हर्ष लगेच उठला .

” आजी , मी जाऊन येतो .”

पुन्हा आजी प्रसन्न हसली .

गौरी च्या अश्या वागण्याचं त्याला कोडं पडलं होतं . रश्मी , इरा ह्या सुध्धा मोठ्याच आहेत की …मग ..

तो सरळ गौरी च्या घरी गेला .

” अरे , हर्ष बाबा ? गौरी ची आई म्हणाली . तुम्ही मोठ्ठ्या कॉलेजात गेलात म्हणे ! आता खूप मोठे

क्याम्प्युटर विजीनीअर होणार म्हणे !”

” कोण म्हणालं ?”

” आपली गौरा बाय !! ज्याला त्याला तुमचं गुण सांगत असतीय .”

” आहे कुठे ती ?”

” आत्ता तर हितच होती .गेली असल देवळात . चिंगी बरोबर .”

आता मात्र हर्ष रागावला ..

रस्त्यात पुन्हा कालु ,मुकुल भेटले ..गप्पा झाल्या , पण हर्ष चे लक्ष नव्हते ..

तो तरातरा  चालत मंदिरात गेला .

पायरीवरच गौरी आणि चिंगी बसल्या होत्या .

त्याला पाहून दोघी हळूच उतरून उभ्या राहिल्या . गौरी हलकी चिंगीच्या मागे लपली .

” अरे चिंगी , किती उंच झाली ग ! ”

” तू पण तर मोठा झालास की .अभिनंदन !! खूप छान वाटलं आम्हाला .”

” ही काय मागे लपतेय ? ए गौरी ! ”

ती हळूच समोर आली .

” हर्ष , हा प्रसाद . ” चिंगी म्हणाली.

” ए बडबडे , तुला काय झालं न बोलायला ग ? मी किती लांबून आलोय तुमच्या साठी ”

चिंगी म्हणाली , ” अरे बाबा , तो प्रसाद खा आधी . तुझ्या रिझल्ट च्या दिवशी न खाता पिता इथे देवा समोर येऊन बसली होती ही .”

” हिला कशी माहीत तारीख ? ”

” अरे  वा ! तूच शिकवलं होतंस न , इंटरनेट वापरायचं ?  आता तर बापूच्या मोबाईल मध्येच कळतं की त्यात काय मोठं !!” …आत्ता बोलल्या गौराबाई , समोर येऊन .

काय स्मार्ट दिसत होती गौरी !!

आता दोन वेण्या नव्हत्या .

साधा , नीटनेटका पंजाबी ड्रेस ..मोठ्ठे डोळे , एक वेणी …

” अरे गौरी , तू किती वेगळी दिसतेस !! ,

मला तर ती फ्रॉक मधलीच गौरी आठवते नेहमी .”

गौरी नि चिंगी ला ओढलं ,आणि चलायची खूण केली .

” गौरी , ए गौरी आग …तू …”

गौरी पळाली पायऱ्या उतरून खाली .

चिंगी वापस फिरली …

हर्ष तिथेच विचार करत उभा होता .

”  B .C. S करायची इच्छा आहे तिची .

तिच्या आईची पण तयारी आहे , पण एक लग्नाचं स्थळ सांगून आलंय . मुलगा मुंबईला ऑफिसात बाबू आहे .”

तो काही बोलायच्या आत चिंगी निघून गेली .

हर्ष तिथेच स्तब्ध उभा….त्याला कळेना अशी अचानक एक विचित्र पोकळी का वाटतेय ..

सगळ्या रस्त्याने तो सुन्न होता .

तेच गाव , तीच माणसं , तशीच शेतं पण काहीतरी सुटल्या सारखं .

चालत चालत तो तलावाच्या काठावर आला . तिथे मोठा दगड होता , चिंचेच्या झाडाखाली .

त्यावर बसला . ..शांत …

मागून चाहूल लागली .

त्याने शांत पणे वळून पाहिले ..गौरी आली होती ..ओढणीत मोगऱ्याची फुलं घेऊन … शेजारच्या दगडावर बसली .

” गौरी ,”

” हं ”

” इथे ह्याच तलावात किती खेळलो होतो न आपण ”

” हं ”

” माझ्या रिझल्ट च्या दिवशी तू उपाशी देवळात का बसलीस ?”

” असं म्हणतात की उपाशीपोटी

सीध्येश्वरा जवळ  काही मागितलं , तर ते मिळतंच .”

” तू काय मागितलंस ”

” तुला न हर्ष , आधीही काही माहीत नव्हतं अन आताही नाही .”

” मला आय . आय .टी .  मिळावं हेच न?”

” …..”

” गौरी , तुला BCS करायचंय न ?”

” हो . ठाण्यात माझे मामा असतात . ते म्हणाले , पण …”

”   पण काय लग्न करायचंय ? ”

गौरी ने विचित्र नजरेने त्याच्या कडे बघितलं …तिचे डोळे पाण्याने भरले होते …तिने ओढणीतले सगळे फुलं तिथेच टाकले ,आणि शांत पणे  उठली .

” माझ्या साठी फुलं आणले ,मला दिले पण नाहीस ?”

तिने फक्त वळून पाहिले .काही क्षण त्याला निरखून बघितलं ….डोळे भरून पहिल्या सारखं ….आणि चालायला लागली ..

” ए गौरी , थांब !!  ए गौरी !! ” त्याने तिची वाट अडवली .

” मी वेड्या सारखा तुला फोन करत असतो , तू नीट बोलत नाहीस . आता मुद्दाम आलोय तर अशी का वागतेस ? माझ्यासाठी फुलं आणतेस आणि न देताच जातेस .. why you are behaving like this ?”

” because I dont have answaer to your questions !!” सफाईदार इंग्लिश बोलून ती निघून गेली .

काहीश्या निराश अवस्थेत तो घरी जायला निघाला. समोरून एक रिक्षा येत होती . त्याच्या जवळ येऊन थांबली .

आतून नीटनेटकी एक मुलगी उतरली..गळ्यात मंगळसूत्र होतं.. मागून एक रांगडा तरुण उतरला .

काही क्षणात त्याने ओळखलं …..”सावित्री ?”

” हर्ष !!! किती वर्षांनी रे !!”

” हे माझे ..” तिने नवऱ्या कडे बघितलं.

” hallo !” …हर्ष

” तू हर्ष न?  सावू सांगत असते नेहेमी .” तो म्हणाला.

” गौरी भेटली न? तू मागे दोन वर्षांपूर्वी येणार म्हणून कळाले तर तासंतास तुझी वाट बघत बसायची इथे ..ह्या सुपारीच्या झाडा खाली ..तू आलाच नाहीस . बरं झालं , आता तरी आलास ते . मस्त दिसतोयस हॅन्डसम .

येशील घरी ,चल ..”  रिक्षा निघाली.

हर्ष  आजीचे पाय चेपत होता .

” हर्षु , तुला तर खूप मैत्रिणी असतील रे !”

” हो आहेत ना ! रश्मी तर तुला माहीत आहे , अजून खूप आहेत ..इरा , सुझान , शिवानी .. का ग ?”

” त्या जर तुझ्याशी काही दिवस बोलल्या नाहीत तर तू रडकुंडीला येतोस ?”

” काहीही हं आजी ! What नोंसेन्स !”

” हो नं ? मग गौरी तुझ्याशी मोकळं बोलली नाही तर एवढा जीव का हरवला तुझा ?”

“….????.….आजी , मी आलोच! ” काहीतरी अचानक गवसल्या सारखं झालं आणि लांब लांब  उड्या मारतच तो बाहेर पडला … त्याच सुपारीच्या झाडाजवळ …झाडामागे गौरी उभी होती .

” माझे मोगऱ्याचे फुलं तिथेच टाकून आलीस न ?” हे विचारतांना त्याची नजर खोल तिच्या डोळ्यात होती .

” मी आणलेत पुन्हा ” तिने हातातले फुलं दाखवले …नजर खालीच होती…

” तुला Bcs  साठी ठाण्याला जायची काय गरज आहे ?”

तिने चमकून वर बघितले ..तिच्यावर नजर रोखून तो म्हणाला,

” मुंबई ला करू शकतेस ना ! ”

तिने प्रश्नार्थक चेहेरा केला . तो तिच्या जवळ सरकला..

” तुला न काहीच समजत नाही गौरी .”

” मग तू समजावून सांग ना !” तिचे डोळे भरून वहात होते.

त्याने तिचे दोन्ही हात फुलांसकट  हातात घेतले , आणि आवेगाने ती त्याला बिलगली ..…..त्याने आपल्या बळकट बाहुत  तिला सामावून घेतले ….

त्याला  छळणारे कोडे सुटले होते….( समाप्त )

© अपर्णा देशपांडे

Image by efes from Pixabay 

Aparna Deshpande
Latest posts by Aparna Deshpande (see all)

Aparna Deshpande

अपर्णा देशपांडे - (B.E E&TC , M.A soc ) एक अभियांत्रिकी प्राध्यापिका . समाज माध्यमं आणि वर्तमानपत्रात नियमित लेखन . वाचन आणि चित्रकारितेची विशेष आवड .

5 thoughts on “गुंतता हृदय हे…कोडं प्रेमाचं- भाग ४

  • March 1, 2021 at 7:23 am
    Permalink

    मस्तं मस्तं

    Reply
    • March 12, 2021 at 10:13 am
      Permalink

      धन्यवाद

      Reply
  • March 1, 2021 at 7:30 am
    Permalink

    किती सुरेख , निर्मळ

    Reply
  • March 16, 2021 at 2:22 pm
    Permalink

    खूप छान

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!