वारसा
पहाटे पाच लाच गीताक्का बाहेर बागेजवळ आल्या . बागेत घमघमाट करणारा मोगरा फुलला होता . कदंबा अण्णा ने सुगंधी दवणा ची पानं ,अबोली आणि मोगऱ्याची फुलं तोडून परडी देवडी वर ठेवली होती . आपल्या ओल्या केसातील टॉवेल झटकून त्यांनी दोरीवर वाळत घातला , दाट केसांचा घट्ट आंबाडा बांधून परडी हाती घेतली आणि पूजघरात गेल्या . कदंबा ने पूजेची सगळी तयारी केली होती .
पूजा आटोपून धम्म पिवळ्या सोनचाफ्याची फुलं नटराज्याच्या मूर्तीला वाहून गीताक्का
बाजूच्या नृत्यशाळेच्या मोठ्या सभागृहात गेल्या .
तिथेही हॉल च्या एक कोपऱ्यात नटराजाची मोठी , सुबक मूर्ती आणि सगळीकडे धुपाचा दरवळ होता . त्यांची पट्टशिष्या निलांबरी आलेली होती .
नेहमीप्रमाणे तिच्या हातावर प्रसाद ठेवून अक्काने थाळी चौरंगावर ठेवली . निलांबरीने वाकून नमस्कार केला . धुपाच्या सुगंधा प्रमाणे अक्कांच्या शब्दांनाही सुगंध असतो असे म्हणायची निला .
” अरंगेत्रम ची तयारी कुठपर्यंत झाली ? ” अक्कांनि विचारलं .
” होत आली गुरुमा . आता आज बाकी सगळ्या मुली येतील त्यांचा
””शारदाअष्टकं”” चा नृत्याभ्यास सुरू झाला की बोलावणे पाठवते . “
अक्का स्वयपाक घरात गेल्या .
राजंम्मा ने गायीच्या दुधाची गरम गरम कॉफी अम्मा समोर ठेवली .
” चार गुलाब आणून ह्या फुलदाणीत खोच ग . ” कॅलेंडर कडे निरखून बघत अम्मा म्हणाल्या .
” हो अम्मा . रोज काय बघता कॅलेंडर अम्मा ? . त्याने दहा तारीख जवळ येणार आहे का ? ”
” नाही ग , तितकच समाधान . अजून दोन दिवसांनी येईल न श्रवणी ?….पूर्ण एक वर्ष झालं तिला भेटून . ह्यावेळी महोत्सवासाठी श्रीकांत आणि विद्या नाही येणार . नीता आणि जावई नुसतेच कार्यक्रम बघायला आले होते , तेही दोन वर्षानपूर्वी . मुलगा आणि सुने पेक्षा नातीलाच जास्त ओढ आहे ग इथली . ह्या नृत्यशाळेला जिवंतपणा येतो बघ ती आली की . ……….कदंबा , दिवाणावर नव्या चादरी घाल रे बाबा . झोपाळ्याच्या पितळी कड्यांना पॉलिश करून टाक . ”
नंतर दुपारच्या जेवणापर्यंत अक्का मुलींची तालीमच घेत होत्या .
आज दुपारच्या वर्गात ‘वर्णम’ चा रियाज करवून घ्यायचा होता . संध्याकाळी ‘ अलरीपू’ ची तयारी करवून घ्यायची होती .
महोत्सव काही दिवसांवर आला होता .
गेल्या तीस वर्षांपासून अम्मा इथे नृत्य कलामंदिर चालवत होत्या . भारतनाट्यम , कुचिपुडी , कथ्थक आणि इतर शास्त्रीय नृत्यकलेत प्रभुत्व असलेल्या , पदमविभूषण सन्मानित , अनेक देशात कार्यक्रम करून नृत्यप्रसार करणाऱ्या अक्कांच्या मुलांनी हा वारसा जपण्यात स्वारस्यच
दाखवले नव्हते . मुलगा श्रीकांत आणि मुलगी नीता ह्या दोघांनाही कुठल्याच कलाप्रकाराची ओढ नव्हती . हां , श्रीकांतची मुलगी श्रवणी मात्र वयाच्या पाचव्या वर्षा पासून भरतनाट्यम शिकत होती . इथे भारतात असेपर्यंत गीता अक्कांना श्रवणी च्या प्रगतीकडे कडे बारकाईने लक्ष देता येत असे . पण अमेरिकेला गेल्यानंतर सगळं गणितच बदललं होतं , मात्र तिने आपले विशारद पूर्ण केले होते .
आधी जवळपास साठ मुली पूर्णवेळ इथे राहून नृत्य आराधना करीत . हे असे गेले वीस वर्षे त्यांनी जीवापाड सांभाळले . अनेक वेळा स्वतःचे पदरचे पैसे घालून , कधी दागिने विकून त्यांनी नृत्य कलामंदिर साठी आयुष्य वेचले होते .
अनेक मानसन्मान , अनेक पुरस्कार मिळाले , कितीतरी जाहिराती , लघुपट यासाठी मागणी असे तरी त्यांनी कलेशी तडजोड केली नाही . असे केल्यास फार व्यावसायिकता झाली असती , जी त्यांना नको होती .
जिथे पैश्याशी संबंध येतो , तिथे नृत्याच्या मूळ गाभ्याला धक्का लागतो असे त्यांचे मत होते. आपल्या विद्यार्थिनींसोबत फक्त भारतातच नाही तर इतर अनेक देशात जाऊन त्यांनी ह्या प्राचीन भारतीय कलेचा प्रचार केला होता .
यातील काही मुली तर सलग पंधरा सोळा वर्षे त्यांच्या छायेखाली होत्या . पण हा प्रभाव सगळ्याच मुलींवर सारखाच होता असे नाही . बाहेरील चकचकीत जगाची भुरळ अनेकींना सिने सृष्टीकडे घेऊन गेली . त्यात काही वाईट आहे असे अक्कांचे मत नव्हते , पण ते करतानाही शास्त्रीय नृत्याची बैठक असायलाच पाहिजे असा त्यांचा आग्रह होता .
नृत्य मंदिराची गुरुकुल पद्धती , तिथे शिकवायला येणारे देशभरातील ज्ञानी गुरुजन आणि सगळे शास्त्रीय नृत्य प्रकार …..यांचा अभ्यास करायला विदेशातून अनेक अभ्यासक , पत्रकार , टी .व्ही चॅनेल वाले खूप मोठ्या संख्येने तिथे येत . अक्कांना आता हा सगळा व्याप सांभाळणे अवघड झाले होते . पण आता कुणीच जबाबदारी घेण्यास तयार नसल्याने निवासी नृत्यशाळा त्यांनी बंद करून टाकली होती . इतक्या वर्षांची गुरुकुल पद्धत आता संपुष्टात आली याचे त्यांना फार दुःख होते .
” आम्ही जाऊ गुरुमा ?” निलंबरी विचारत होती .
” हो , उद्या सगळ्यांचे घुंगरू आणि दागिने नीट तपासून ठेवा . या आता .”
अक्का पुन्हा विचारात गढल्या . ही निलांबरी , रेवती , गौतमी ,राधिका …..ह्या सगळ्या कोण लागतात आपल्या ?……किती प्रामाणिक आहेत आपल्या कलेशी ?……आणि आपल्याशी सुद्धा !……मग कोणते नाते खरे ?……पोटचे मुलं इतक्या दूर ….अडीअडचणीला कधीच न येऊ शकणारे ……..की हे सतत अवतीभवती राहून आपला स्नेह दाखवणारे ….
…. मग का करतो माणूस इतका आटापिटा? आपले अस्तित्व कुठल्या न कुठल्या रुपात जपून ठेवण्याचा अट्टाहास की आपली कला जिवंत ठेवण्याची धडपड ? ……नेमकं काय साध्य करायचंय ? गेल्या दोन वर्षात तर फारशा कुठे गेलोच नाही आपण .
आताशा पेपरवाले , चॅनेलवाले कोणीच येत नाहीत . म्हणजे आता लोक विसरताएत का आपल्याला ? आताशा आपली दखल नाही घेतल्या जात .. ..असं होतंय म्हणून आपला जीव तुटतोय का ? …की आपला वारसा कुणीतरी पुढे न्यावा ह्या
आंतरिक इच्छेपायी जीव जळतोय ?……
बराच वेळ अक्का बंगई वर बसून होत्या . आताशा त्यांना सतत स्वतःच्या अस्तित्वाची चिंता सतावत असे .
” अव्वा !!! ”
श्रवणी च्या हाकेने त्या भानावर आल्या .
” आली का ग माझी बबडी s s ”
म्हणत त्यांनी प्रेमाने तिला जवळ घेतले . छान साडेपाच फूट उंची , एका नुत्यांगनेला शोभेल असा रेखीव बांधा , आणि दाट कुरळे केस . तिच्या लोभस दर्शनाने हरखून तंद्रीत गेलेल्या अक्कांना श्रावणीने जागे केले .
” अव्वा s ! आय नीड युअर ब्लेसिंग” ” श्रवणी नमस्कार करत म्हणाली .
” यशवंत हो बाळा , ये ये , बस . ….राजंम्मा ,कॉफी आण लवकर .” …..इतक्या वर्षांनी नात आलीये म्हणूनत्यांचा जीव थाऱ्यावर नव्हता . कादंबा ने तिचे सामान आत नेऊन ठेवले . त्यातील एक बॅग तिने उघडली .
श्रीकांत आणि विद्या ने काय काय पाठवले होते . अक्कांसाठी एक स्मार्टफोन , मऊ लोकरीचा कोट , अनेक प्रकारचे दागिने , सुगंधी उदबत्त्या , मेक अप चे सामान , अगदी खरे वाटावेत असे गजरे आणि हार ……तिथे अशा वस्तू मिळतात याचेच आश्चर्य वाटले अक्कांना . शिवाय अनेक प्रकारचे सुंदर कृत्रिम फुले पण पाठवली होती .
आता हे सगळं घेऊन काय करायचंय ही भावना दाबून टाकत त्यांनी सगळ्या वस्तूंची खूप तारीफ केली . हे बघून
त्यांना आपल्या मुलीची निताची आठवण आली …..तिला फार आवडायचं असं आर्टीफिशियल फुलं सजवायला .
सकाळचा नाश्ता आणि कॉफी घेऊन श्रवणी तिच्या साठी खास सोय करून ठेवलेल्या प्रशस्त खोलीत गेली . काहीतरी विचारायचं म्हणून अक्का तिच्या खोली जवळ गेल्या आणि अर्धवट बंद दाराशीच थबकल्या . आतून पाश्चात्य संगीताचा आवाज येत होता . त्यांनी किंचित डोकावून पाहिलं , श्रवणी अतिशय लयबद्ध पद्धतीने ‘हिप हॉप’ नृत्य करत होती .
अक्क्यांना जगातील अनेक नृत्यप्रकार माहीत होते …..त्या एखाद्या
शैली च्या विरोधात होत्या असेही नाही . तरुण पिढीचा आवाज ओळखून होत्या त्या . तरीही आता श्रवणीला बघून कुठल्याशा अमंगळाची चाहूल लागल्या सारखं वाटलं त्यांना .
दुपारच्या जेवणानंतर आजी आणि नात जुने अल्बम बघत बसल्या .
आपल्या आज्जी ला किती मान सन्मान मिळालेत , ती किती देशात फिरून आलीये , किती नाव कमावलं , सगळं पुन्हा एकदा पाहून झालं .
दोघी नृत्यशाळेत गेल्या . निलांबरी आणि काही मुली तिथे सराव करत होत्या . अक्कांनि मुद्दाम श्रवणीला समोर बसवले . मुली मन लावून ताल धरत होत्या …..एक मुलगी थोडी चुकत होती ….ती चुकली की श्रवणी आजी कडे बघे …..तिने सुचकपणे आजीकडे पाहिलं आणि अक्क्यांनी “जा ” असे खुणावले , तशी श्रवणी पुढे आली . तिने तेवढा भाग स्वतः करून दाखवला .
सुंदर मौखिक अभिनय , बोलके डोळे , अप्रतिम
पदलालित्य , शब्दांची जाण हे सगळं घुंगरू पायात नसतांनाही खूपच तालबद्ध आणि नजर खिळवून ठेवणारं ! …..त्या मुलीला तिची चूक कळाली आणि अक्कांना आपल्या नातीची तयारी ! …..त्यांचे मन भरून आलं ….आता थोड्या वेळापूर्वी आलेलं मळभ दूर झालं होतं . श्रवणीचे
यु ट्यूब विडिओ नेहमी बघायच्या त्या . पण तिचे बहुतेक व्हिडीओज हे पाश्चात्य नृत्याचेच होते आणि त्याला प्रचंड प्रेक्षक वर्ग होता. तेव्हा भारतीय नृत्यशैली मधील तिची आवड कमी होतेय का ह्या शंकेने त्यांना अस्वस्थ वाटत असे . ….पण आता पद्धतीने अतिशय सफाईने तिने नृत्य केले की अक्का धन्य झाल्या .
” श्रवू , तू कोणते कोणते नृत्य प्रकार शिकतेस ग ? ” दुपारी निवांत असतांना अक्कनी विषय छेडला .
” बरेच ! …म्हणजे भारतीय शास्त्रीय नृत्यात कथ्थक , भरत नाट्यम आणि मणिपुरी …मग….बॅले … हिप हॉप ….असंच काही . तिथे खूप ‘ह्युज’ अकॅडमी आहे , खूप इंडिअन ‘स्टुडंट्स’
आहेत . …बाय द वे अव्वा , ह्या फेस्टिव्हल मध्ये मी कोणता ‘परफॉर्मन्स’
करू ? ”
” अ ? …… “”जननी जगतकारिणी””” कर … किंवा…..””श्रीरंगा””….नाहीतर..””कर्णवध”””….तुझं जे नीट बसलय ते कर .”
मग इतर मुलींबरोबर श्रवणी देखील सराव करू लागली . त्या तीन चार दिवसात त्या गावात अनेक वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम झाले . दक्षिणेतिलच नाही तर इतर राज्यातील अनेक कलाकार आणि गुरू आले होते . प्रमुख पाहुणे म्हणून एक फिल्मी नृत्य शिकवणारे सर होते . त्यांचा मुंबईत ‘डान्सक्लास’ खूप जोरात चालत होता . अनेक चित्रपटासाठी त्यांनी नृत्य दिग्दर्शन केलं होतं . वर्तमान पत्रात ह्याची पान भरून बातमी होती . आणि मधल्या पानावर कुठेतरी कोपऱ्यात शास्त्रीय नृत्य संमेलनाची बातमी होती .
” अव्वा , तू असतांना तुला न बोलावत इतर कुणाला हे कसे बोलावतात ग? तुला पण बोलवायला हवं होतं न ?”
हे खरं तर अक्कांच्या मनातलं बोलली होती श्रवणी . अलीकडे अक्कांकडे लोकांचे लक्ष्य जाईनासे झाले होते . शाळा , कॉलेज , संस्था , किंव उद्घाटन समारंभ ह्यात कुठेही त्यांना बोलावणे येत नसे .
” आजकाल अभिजात कलेला पहिल्या सारखा मान नाही राहिला ग ! ….आणि सारखं माझं कौतुक किती वर्ष करतील ते .” अक्क्यांनी असं बोलून स्वतःचीच समजूत काढली होती .
नृत्य संमेलन खूपच थाटात पार पडले . दर वर्षी अक्का खास छोटी बस करून मुलींना तिथे घेऊन जात . ह्यावर्षी तर श्रवणी आली होती .
तिच्या नृत्याची खूप तारीफ झाली . अक्का तर भरून पावल्या होत्या . संमेलनात त्यांना नेहमी सारखा बहुमान मिळाला नाही , पण आपल्या नातीच्या प्रगतीने त्या खूष होत्या .
श्रावणी चा अमेरिकेला वापस जाण्याचा दिवस आला . तिने आजीला खूप आग्रह केला सोबत चालण्याचा . तिकडून मुलगा आणि सूनही बोलले . पण अक्का कसल्या बधतात ! कदंबा तिला मुंबईपर्यंत सोबत करायला गेला .
ती गेल्यावर अक्का खूपच एकाकी पडल्या . कशातच इंटेरेस्ट वाटेना . प्रचंड मरगळ आली होती. काही दिवसातच त्यांनी निलांबरी ला बोलावून घेतले . तिला गावात दुसरीकडे जागा उपलब्ध करून दिली आणि आपला नृत्यवर्ग बंदच करून टाकला . निलंबरीनं बराच समजावण्याचा प्रयत्न केला , श्रावणीला फोन लावून दिला , तिनंही समजावलं , पण अक्का ठाम होत्या . एकेकाळी दिमाखात आपले वैभव मीरवणारी इमारत आता पोकळ वाटत होती …..आपल्या डोळ्यासमोर हा असा ह्रास ! खूप व्याकुळ मनानं त्यांचा जीव पोखरून जात होता ….हे सगळं असह्य होऊन त्यांनी अंथरूणच धरलं .
आठ दिवसांनी अमेरिकेहून विडिओ कॉल आला . तिथे श्रीकांत , विद्या , नीता , जावई आणि श्रवणी सगळेच हजर होते .
” अम्मा , श्रवणीला ‘ युथ सेन्सेशन ‘ अवॉर्ड मिळालंय . ही बघ केव्हढी मोठी डान्स अकादमी स्थापन करतेय ती . इथे अनेक प्रकारचे नृत्यप्रकार शिकवल्या जाणार आहेत . जग भारतातील नामवंत नृत्य शिक्षक येतील कार्यशाळा घ्यायला . उदघाटन तुझ्या हातून करू अम्मा !! आणि भरतनाट्यम , कुचिपुडी हे डिपार्टमेंट तूच संभाळायचं ! यरशील न अम्मा ?”
अम्मा चे डोळे पाझरत होते . कदंबा आणि राजम्मा येऊन बसले होते .
” अव्वा , बोल न !” श्रवणी
” ……….”
” अम्मा , मी येतोय तुला न्यायला . त्या आधी तुझ्या वीझा चं काम करून टाकू . …..अम्मा , तुझी तपश्चर्या वाया नाही जाणार अम्मा , बोल न !” श्रीकांत च्या उत्साहाला उधाण आलं होतं .
कदंबा आशेने अम्मा कडे बघत होता …….
” गीताम्मा , बोला न काही ” राजम्मा म्हणाल्या .
” माझी पूजेतील नटराजाची मूर्ती विमानातून आणू देतील न रे ते ?” अम्मा नं विचारलं , आणि सगळ्यांचे चेहरे आनंदी झाले . श्रवणी ने तर उडीच मारली .
गीताक्का रोजच्या सारख्या पहाटे उठून
निशिगंधाच्या छड्या जवळ गेल्या . पाऊस पडून गेल्याने बाग जास्तच टवटवीत दिसत होती . अक्कानाही नवा हुरूप आला होता . आज पासून मोठ्या नटराजाच्या मूर्तीला निशिगंध वहात जा म्हणून सांगितले होते निलंबरीला . ती देखील हरखली होती नृत्यमंदिर पुन्हा सुरू होणार म्हणून . आता इथल्या नृत्यशाळेची जबाबदारी तिच्यावर सोपवून अम्मांना निश्चिंत मनाने इथून जायचे होते .
रोजच्या सारखीच निवात पूजा करतांना अम्मांनी देवाला मनोमन हात जोडले …..त्यांचा समृद्ध वारसा आता परदेशातही जपल्या जाणार होता .
© अपर्णा देशपांडे
Latest posts by Aparna Deshpande (see all)
- आत्तु-भाग ३ (शेवटचा भाग) - June 17, 2022
- आत्तु- भाग २ - June 7, 2022
- आत्तू- भाग १ - June 3, 2022
मस्त
Dhanywad
उत्कृष्ट वातावरण निर्मिती
Thank you
खूप छान
धन्यवाद
खूप सुरेख 👌👌
Atishay sundar
वाह!!!!
सुंदर.
Surekh