निर्णय भाग २

पहिल्या भागाची लिंक- निर्णय भाग १
दुसरा दिवस उजाडला तोच मुळी रागिणीच्या मनात धाकधूक घेऊन. कोण जाणे कशाची भीती वाटत होती. काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं हे मात्र खरं.  काल दिवसभरात इतक्या घडामोडी घडल्या की विचार करायला वेळ मिळालाच नाही. संजय येईल ना? की गेला आपल्याला कायमचा सोडून? कितीतरी मुली अशा घरातून पळून येतात. सगळ्यांची थोडीच लग्न होतात? कित्येक जणी फसवल्या जातात, परागंदा होतात, विकल्या जातात. पेपरमध्ये कितीतरी बातम्या येत असतात. छे छे! वेड लागलंय की काय आपल्याला? असा कसा विचार करू शकतो आपण? ते ही संजयबाबतीत? प्रेम करतो तो आपल्यावर. डोळे झाकून त्याच्याबरोबर निघून आलो. कमालीचा विश्वास वाटला होता त्याच्याबद्दल. इतका, की आईबाबा, बहीणभाऊ कोणालाही काहीही सांगितलं नाही. धाकट्या उषाला मात्र थोडीशी कल्पना दिली होती. पैसे तर फक्त आपल्या पगाराचे आणले होते. वहिनी ठेऊ कुठे द्यायची थोडेसुद्धा पैसे? सगळे काढून घ्यायची.
पर्समध्ये फक्त ४०० रुपये आणि निघून आलो सहा महिन्यांपूर्वी ओळख झालेल्या मुलाबरोबर पुण्याला. इतके अव्यव्हारी बनलो प्रेमात? आता जे घडेल त्याला सामोरं जावं लागेल. हातात दुसरं काहीही नाही. अंघोळ करून आवरून रागिणी परत विचारचक्रात गुरफटली. संजय म्हणतो आहे सध्या आहे त्याच घरात राहावं लागेल. ठीक आहे, जमवून घेऊ. आई मात्र चांगलीच करारी दिसते त्याची. कपाळातून बाहेर आलेलं धारदार नाक, गोरा रंग, आवाजात जरब आणि वागण्यात थोडासा तोरा. काही माणसं जीव जायला आला तरी वाकणार नाहीत त्यातली वाटते त्याची आई. छे! त्याची आई काय, माझ्या होणाऱ्या सासूबाई. फारच गंमतीदार वाटतंय असं म्हणायला, पण सवय करायला हवी. काही असलं तरी त्या खमकेपणाने लग्न लावून देते म्हणाल्या म्हणून तर सगळे प्रश्न सुटले.
सासरे मात्र प्रेमळ वाटले. फारसे बोलले नाहीत पण डोळे बोलतात ना! बायकोच्या धाकात वाटले पण समंजस वाटले. संसार जर का चारचाकी गाडी असेल तर माझ्या भावी सासूबाई ड्रायव्हिंग सीटवर दिसतील आणि सासरे शेजारी सीट बेल्ट लावलेले. रागिणीला या कल्पनेनेच खुदकन हसू आलं.  माझ्या आणि संजयच्या संसारात कोण असेल ड्रायव्हिंग सीटवर? हम्म, आत्ता नाही सांगता येणार, कळेलच काही दिवसांत. हा विचार मनात येताच रागिणी स्वतःशीच थोडी लाजली. ज्या गोष्टीसाठी इतका अट्टाहास केला, गेला महिनाभर प्लनिंग केलं ती गोष्ट आता घडली होती. आता प्रतीक्षा होती भविष्याची. ते सुरेख रंग भरलेलं असेल की सगळे रंगच विस्कटून टाकणारं असेल ते समजत नव्हतं.
होस्टेलच्या मेसमध्ये थोडंसं जेवून रागिणी परत खोलीत येऊन बसली. खोलीतल्या इतर दोन मुली तिची जुजबी चौकशी करून त्यांचं आवरून कॉलेज नोकरीला निघूनही गेल्या होत्या. डोक्यातलं विचारचक्र काही केल्या थांबत नव्हतं. घर सोडताना जितकी धाकधूक होत नव्हती तितकी आज का होते आहे? नक्की काय चुकतंय? तिला चैन पडेना. संजय येतो म्हणाला होता. कधी येईल? नक्की येईल ना? आला नाही तर? छे! असं होणार नाही. आईने त्याला तयारीला जुंपलं असेल. कामात असेल. वेळ जाता जात नव्हता. डोक्यात चालू असलेलं विचारचक्र थांबता थांबत नव्हतं.
संध्याकाळचे सात वाजले. संजयचा पत्ता नाही. काय झालं असेल? काही बरंवाईट तर घडलं नसेल ना? आता काय करायचं? कुठे जायचं? या नवीन शहरात आपण कोणाला ओळखतही नाही. संजयच्या घरी जायचं? पण पत्ता? तो कसा शोधायचा? कालचे रस्ते तर आठवणार नाहीत. पण असं कसं होईल? संजय येतो म्हणतो तेव्हा नक्की येतो. आता मात्र रागिणीला धीर धरवेना. ती खोलीत येरझाऱ्या घालू लागली. रागाची जागा आता आगतिकतेने घेतली होती. घड्याळात रात्रीचा नऊचा ठोका जसा पडला तसं मात्र रागिणीचं धाबं दणाणलं. मनाचा हिय्या करून तिने तिची बॅग घेतली आणि तरातरा रस्त्याकडे निघाली…
पुढील भागाची लिंक- निर्णय भाग ३- शेवटचा भाग
Image by Tú Anh from Pixabay
Gauri Brahme
Latest posts by Gauri Brahme (see all)

Gauri Brahme

गेली वीस वर्षे पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागात जर्मन भाषेची अध्यापिका म्हणून काम करते. अमराठी लोकांना मराठी शिकवते. भरपूर लिहिते, वाचते, कलाकुसरीच्या वस्तू बनवते, खादाडी करते, इतरांना खिलवते. लेखिका म्हणून नावावर २ पुस्तकं जमा आहेत.

3 thoughts on “निर्णय भाग २

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!