निर्णय भाग ३- शेवटचा भाग

आधीच्या भागाची लिंक- निर्णय भाग २
रागिणी हॉस्टेलमधून बाहेर पडायला आणि संजयची गाडी समोरून यायला एकच गाठ पडली. तिला तरातरा चालत जाताना पाहून तो पटकन जोरात ओरडला, “ओ वेडाबाई, कुठे चाललात?” रागाने, स्वतःच्या हताशपणावर चिडलेली रागिणी त्याला खाऊ की गिळू या नजरेने बघू लागली. “माहीत आहे, कधीपासून वाट बघते आहे मी? रात्रीचे नऊ वाजले आहेत. आणि तुला आत्ता यायला सुचलं? पळवून घेऊन आलास ना मला घरून? मग इतक्या लगेच विसरलास? की आणली एका मुलीला, आता बसू दे तिला हॉस्टेलवर. तिला भीती वाटत असेल, हताश वाटत असेल याची एक कणभर सुद्धा कल्पना नाही ना तुला?” रागिणीच्या डोळ्यांतून आता अश्रू वाहू लागले. “उगाच लागले मी तुझ्या नादी. घरदार सोडून आले. माझे आईवडील कुठल्या चिंतेत असतील काय माहीत. घरी कोणता तमाशा झाला असेल कोण जाणे! तुला समजतं का एका मुलीसाठी तिचं घर सोडून येणं केवढी मोठी गोष्ट आहे? तुला कसं समजणार म्हणा? तू मस्त तुझ्या कुटुंबाबरोबर राहणार! इथून तू जो काल रात्री गेलास ते आत्ता येतो आहेस? कशाला आलास आत्ता तरी? काय गरज होती? राहिले असते मी एकटी! कायमची! जा तू!” रागिणीचा उद्वेग सुरूच होता. एकीकडे डोक्यात राग होता तर दुसरीकडे संजय दिसल्याने मनाला शांतही वाटत होतं.
संजयने गाडी स्टँडवर लावली आणि त्याने तिचा हात धरून तिला समोरच्या बाकावर बसवलं, तिची बॅग स्वतःकडे घेतली. “जरा ऐकून तर घे माझं. मान्य आहे उशीर झाला थोडा, पण कारणच तसं घडलं.” “काय घडलं? तुझ्या घरच्यांनी नकार दिला आपल्या लग्नाला?कालचं सगळं नाटक होतं?” रागिणीने घाबरून विचारलं. “आता आपण काय करायचं? बघ, तरी मी सांगत होते तुला.” “अग थांब की थोडी. एकदम काय एक्सप्रेस ट्रेनसारखी सुसाट सुटतेस ग? आपलं लग्न काल ठरल्याप्रमाणे होणारच आहे. त्यात कोणताही बदल झालेला नाही.” रागिणीला हुश्श झालं. ” पण आज सकाळी एक विचित्र घटना घडली. अगदी माझ्या कल्पनेबाहेरची. आमच्या वाड्यात राहणाऱ्या सुनंदाने फास लावून आत्महत्या केली. “कोण सुनंदा?” रागिणीने विचारलं. “होती माझी वाड्यातली बालमैत्रीण. दुसऱ्या मजल्यावर राहायची. आम्ही दोघे एकत्र खूप खेळलो, भांडलो, एकत्र अभ्यासही करायचो. छान मैत्री होती आमच्यात. पण या मैत्रीला ती प्रेम कधी समजून बसली हेच मला कळलं नाही. आम्हा तिघा भावात एका बहिणीची, एका मुलीची कमतरता सतत जाणवायची, ती सुनंदा भरून काढायची. फार लाघवी मुलगी होती. पण माझ्यासाठी मैत्रिणच होती, त्यापेक्षा जास्त ना कधी मी तिला मानलं ना कधी जाणवू दिलं. काल रात्री आई तिच्या घरी आपल्या लग्नाबद्दल सांगायला गेली आणि आज सकाळी ही बातमी. मला प्रचंड धक्का बसला. मला तिला शेवटचं बघायलाही जाववेना. रागिणी, सुनंदाने असं का करावं? स्वतःचा जीव घेताना एक क्षणही विचार केला नाही का तिने? जाताना एक चिठ्ठी मात्र सोडून गेली. संजय सुखी राहा अशी. ती चिठ्ठी आता आयुष्यभर माझा पाठलाग करत राहणार. एखादी संधी तिने मला द्यायला हवी होती इतका तडकाफडकी निर्णय घेण्याच्या आधी. काय चुकलं ग रागिणी माझं?” संजयचे डोळे भरून आले होते.
रागिणीला फार वाईट वाटलं. म्हणजे दिवसभर हा वेगळ्याच विवंचनेत होता तर! आणि आपण किती बोल लावला ह्याला. छे! देवा माफ कर मला. नको नको ते बोलले मी याला रागाच्या भरात. किती स्वार्थी आहोत आपण! रागिणीने संजयचे हात आपल्या हातात घेतले आणि म्हणाली, “सॉरी, मला माहित नव्हतं इतकं सगळं घडून गेलंय. तुझ्या मनात काय उलथापालथ सुरू आहे ते समजलं आहे मला. पण जे घडून गेलं त्यावर आपण काहीच करू शकत नाही. इतकी कशी वेडी निघाली ही मुलगी? स्वतःचा जीव घेतला प्रेमासाठी? आता तुलाच काय मलाही आयुष्यभर या गोष्टीचा गिल्ट येत राहील.”
“रागिणी, प्रेम म्हणजे फक्त झोकून देणं असतं का ग? प्रेम म्हणजे जबाबदारी पण असते ना? हे का नाही समजत लोकांना? इतके अविचारी का बनतात लोक प्रेमात? की स्वतःच्या जीवाचं बरंवाईट करून घेतात?” रागिणीला तासाभरापूर्वीचा स्वतःचा अविचार आठवत राहिला. “वेडेपिसे होतात लोकं प्रेमात, कुठलाच सारासार विचार करत नाहीत हे खर आहे, कारण तारुण्याची नशा असते, एक झिंग असते पण तू म्हणतोस तसं प्रेम म्हणजे खरी जबाबदारी असते, एकमेकांची मनं सांभाळायची जबाबदारी, एकमेकांचं आयुष्य सुंदर करण्याची जबाबदारी. आणि आता ती आपल्यालाही घेतली पाहिजे. चल, इथे ओंकारेश्वराला जाऊन येऊ, त्या देवाकडे कोणताही निर्णय घेण्याच्या आधी सद्सद्विवेकबुद्धीने वागायचं मागणं मागू,  आपल्या हातून कळतनकळत घडलेल्या चुकांची माफी मागू. तो नक्की ऐकेल आपलं.”
संजय उठला, त्याने रागिणीचा हात हातात घेतला आणि एकच शब्द म्हणाला “थँक्स.”
गाडीवर बसताना संजय रागिणीकडे मागे वळून हळूच म्हणाला, “बाकी आपल्या संसारात तू ड्रायव्हिंग सीटवर बसणार हे नक्की!” रागिणी त्याला बिलगून बसली. गाडी देवळाकडे जात होती. सगळे निर्णय आता पक्के झाले होते.
समाप्त
Image by Tú Anh from Pixabay
Gauri Brahme
Latest posts by Gauri Brahme (see all)

Gauri Brahme

गेली वीस वर्षे पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागात जर्मन भाषेची अध्यापिका म्हणून काम करते. अमराठी लोकांना मराठी शिकवते. भरपूर लिहिते, वाचते, कलाकुसरीच्या वस्तू बनवते, खादाडी करते, इतरांना खिलवते. लेखिका म्हणून नावावर २ पुस्तकं जमा आहेत.

3 thoughts on “निर्णय भाग ३- शेवटचा भाग

  • May 11, 2021 at 10:03 am
    Permalink

    मस्तं….👌

    Reply
  • July 17, 2021 at 11:34 am
    Permalink

    Hmm, थोडी वेगळी पण छान कथा!
    संजयचा आणि त्याच्या आईचा समंजसपणा आवडला .

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!