प्रवास कथा- आठवणीत अडकलेले रस्ते-  भाग शेवटचा

पहाटेच्या तीन – साडेतीनला उठुन, पाचच्या जवळपास सगळे तयार झाले होते….. फक्त चार जण सोडुन. कालच्या थकव्याच्या हॅन्ग ओव्हरमधुन ते अजुन बाहेर यायचे होते. त्यामुळं ते ब्लॅन्केट मधुनच बाहेर यायला तयार नव्हते. चार-पाच अंश सेल्सिअसमध्ये, फक्त तट्ट्याने कव्हर केलेल्या टॉयलेटमध्ये प्रातर्विधी उरकणे, हा पहाटे तयार होण्यामधला खरा आव्हानात्मक भाग होता. बाकी थंडीने अंगातला आळस केव्हाच काढुन टाकला होता. गणेश पार्क मध्ये, उद्यान तयार करण्याच्या उद्देशाने लावलेल्या झुडुपांव्यतिरिक्त, काहीही नव्हते. इथुन पुढच्या प्रवासात, मोठे वृक्ष आम्हाला क्वचितच दिसणार होते. या गोष्टीचं मुख्य कारण म्हणजे, विरळ होत जाणारी हवा अन परिणामी कमी होत जाणारा ऑक्सिजन. हे आमच्या साठी सुद्धा अलार्मिंग होतं. आणि त्या साठीच आम्ही सोबतच्या फर्स्ट एड बॉक्समध्ये, डायमॉक्स टॅब्लेट्स ठेवल्या होत्या.
तासभर अंधारात, टॉर्चच्या उजेडात चालुनही, अजुन किती मजल मारायची आहे,या गोष्टीचा अंदाज येत नव्हता. सुर्यप्रकाश नसल्याने, आसपासच्या निसर्ग सौंदर्याचाही आनंद घेता येत नव्हता. जरासं फट्फटायला लागलं, तेव्हा सभोवार पाहिलं. आम्ही वाटेतल्या एका अरुंद शिखरावर होतो. जिथं जेमतेम ८ ते १० लोक उभे राहु शकत होते. हिमालयाच्या शिखरांवर प्रकाश पसरत जाताना पाहणं एक दुर्मिळ अनुभव होता. सगळे जण जिथे होते तिथेच स्तब्ध झाले, फोटोग्राफी सुरु झाली. त्या प्रकाश पखरणीसाठी माझ्याकडे तरी शब्द नव्हते. बालकवींना कुणीतरी हिमालयात आणायला हवं होतं, असं उगाचंच वाटुन गेलं. हिमालयाला जन्म सार्थकी लागल्यासारखं वाटलं असतं.
“हिमनगरांतिल बर्फ-धुळीचे उत्सव भरले नवे …..
धुक्यात तुटल्या शिखरांवरती पक्ष्यांचेही थवे …….” अशा काहीतरी ग्रेस यांच्या ग्रेसफुल ओळी आठवत राहील्या.

इतक्यात  पुन्हा “हर हर महादेव” अशी आरोळी भाईने दिली…… अन हा वाटसरुला वाटेच्या प्रेमात न पडता पुढे निघण्याचा आदेश आहे, असं समजुन आम्ही पुढे निघालो.

वाट सरत होती. मोठ्मोठाल्या शिळा रस्त्यात गडगडत येउन आधीच थांबलेल्या दिसत होत्या. पुन्हा एकदा खाली भेट्लेला जलप्रवाह वाटेत आडवा आला. इथे पाण्यात शुज ओले होणं अगदी अटळ होतं. पाचेक तास झाले होते. एखादं तासात पुढचा मुक्काम येणार होता. पण दिवस कमी असल्याने, मुक्काम शक्य नव्हता. आणखी सात तासाची सलग चढाई उरकणं क्रमप्राप्त होतं. तरीही, मुक्कामाच्या गुहेजवळ क्षणभर विश्रांती घेतलीच. काहींनी बांधुन आणलेले पराठे सोडले. मला एवढं हेवी खाणं शक्य नव्हतं. मी ड्राय फ्रुट्स वर भागवलं. त्या मुक्कामी गुहेत एक डिफेंस मेडिकल ऑफिसर फर्स्ट एड किट सह तैनात होता.

पण तिथेच काही पंजाबी तरुण काहीशा नशील्या अवस्थेत, “भोले” च्या एका गाण्यावर बेधुंद नाचत होते. प्रचंड थंडी अन उंचच उंच चढाईचा थकवा यावर मात करताना, अशा काही नशेच्या आधाराची गरज त्यांना होती. सर्व भारतानं प्रदुषित अन घाणेरडी म्हणुन दुषणं दिलेल्या मुंबईतुन आलेल्या आम्हा मराठी लोकांना मात्र, आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत, एवढी एकच नशा पुरेशी होती. नकळत आमच्या पैकी कुणाच्या तरी तोंडातून आवाज बाहेर पडला, “छत्रपती शिवाजी महाराज कि”……… अन थकला भागलेला प्रत्येक जण जोशात गरजला, “जय ssss”.

अन पुन्हा चढाई सुरु झाली. त्या गर्जनेमुळं, गुहेतला डिजे स्टाईल गोंधळ थोडा काळ शांत झाला होता.

अजुन ध्येय बरंच दुर होतं. कुठल्याही क्षणी ध्येयाची दोर हातातुन सुटण्याची शक्यता होती. आता चाल पुन्हा एकदा झपाटल्यासारखी होत होती. आमच्या पैकी आणखी काही मित्रांनी गुहेपासुन माघार घेतली. आता निम्मेच लोक पुढची वाटचाल करत होते. पुढची वाटचाल खरोखर अवघड होती. नजरेच्या टप्प्यात आलेलं पार्वती कुंड देखील गाठणं जिकीरीचं होऊन बसलं होतं. मोठमोठ्या शिळा वाट अडवुन बसल्या होत्या. शिळा या कुठंतरी रामायणात ऐकलेल्या शब्दाचा अर्थ आज प्रत्यक्ष अनुभवत होतो. चाळीस ते पन्नास फुटांच्या शिळा, आम्हा यःकश्चित मानवांकडे, खाउ कि गिळु अशा रोखुन पहात, एकमेकांवर रेलुन बसल्या होत्या. एकमेकांना हात देत आम्ही ते boulders पार करत अखेर पार्वती कुंडाजवळ पोहोचलो होतो. Boulders मुळे हात पाय अगदीच गळाले होते. पार्वती कुंडाच्या पाण्यात पवित्र होत आम्ही आजुबाजुच्या परिसरावर नजर फिरवत होतो. जवळच्या एका पुर्ण बर्फ़ाच्छादीत शिखरावर, बर्फात, बर्फ घसरुन उमटलेले, ओमकाराचे चिन्ह लक्ष वेधत होते. झूम लेन्सचा वापर करत त्या ओंकाराचे अनेक फोटो निघाले. अन पुन्हा “हर हर महादेव” च्या जयघोषासह आम्ही वाटचाल सुरु केली. यापुढेही boulders आमचा पिच्छा सोडणार नव्हतेच. पण आता त्यांच्या आकारात वाढ झालीच होती,…… पण चक्रव्युह रचावं, अशा पद्धतीनं त्यांची रचना क्लिष्ट होती.
मन , हात , पाय ….. सगळंच गळपटत चाललं होतं. सोबत असलेला पिट्ठु हा एकमेव जीवनाधार वाटत होता. “चलो शाब्जी,….. अभी थोडा बाकी है …… बस मिल जायेंगे …. महादेव….” असं काहीतरी बडबडत तो आमच्या मध्ये हवा भरत होता.
“अरे इतना उप्पर आये है,….. थोडा चार कदम नीचे बुलाओ ना आपके महादेवजी को…….”
असली निरर्थक आर्जवं त्या भाबड्या पोराकडे करत आम्ही त्याच्या मागे मागे चढत होतो. एका शिळांच्या गुहेतुन पलिकडे गेलो अन ते चाळीस फ़ुटी शिवलिंग समोर दिसु लागलं. तरीही अर्ध्या तासाची चढाई बाकी होतीच. दुरुन दर्शन तर झालं होतं.
समोर एक महाकाय शिळा उभी होती. दोन ऑप्शन होते. एकतर शिळा चढुन पलिकडे जायचे होते, किंवा बाजुने दोन फुट रुंदीच्या रस्त्याने पलिकडे जायचे होते. त्या अरुंद वाटेच्या एका बाजुला महाकाय शिळा अन दुसऱ्या बाजुला जवळजवळ बारा हजार फुट खोल दरी. हा दुसरा पर्याय केवळ जीवनाचा जुगार वाटत होता. पण तोवर माझा पिट्ठु शिळेवर चढला. अन मला हात देउन बोलावु लागला. का कुणास ठाउक? पण, त्या महादेवाच्या दरबारात जाण्यासाठी हात देऊन बोलावणारा तो भाबडा पोऱ्या क्षणभर मला हिमालयावर बागडणारा बाल गणेशच वाटला.

मीही त्याचं निमंत्रण स्वीकारत, सरपटत का होईना त्या महाप्रचंड शिळेवर चढलो. अन काही मिनिटात मी त्या मुख्य शिवलिंगासमोर उभा होतो. त्या महादेवापर्यंत पोहोचण्यात, फक्त शारीरिक कष्ट नव्हते तर मानसिक संघर्षही प्रचंड होता. कुठल्याही क्षणी, माघार घेईन असं वाटत असताना, मी आमच्या ग्रुपमध्ये सर्वात पहिल्यांदा पोहोचलो होतो. समोरच्या चाळीस फूट उभ्या शिवलिंगाकडे पाहून संपूर्ण जगाचा तोल त्या एका बिंदूवर सांभाळला जातोय, असा भास जात होत होता. नकळत, माझे हात जोडले गेले. आणि ऍडव्हेंचर ट्रेक एका भक्ती यात्रेत बदलून गेला.

या शिखराच्या आसपास आणखीही काही शिखरे आहेत. जोरकंदन , आणि फावरारांग दोन बाजूला आहेत. तिबेटीयन बॉर्डर वर आपलं रक्षण करण्यासाठीच जणू ही गिरीशिखरे उभी आहेत. तिथं जास्त वेळ न थांबताही आम्ही,  जवळपास १९००० फुटाहुन अधिक उंची असलेल्या शिखरावर, सर केल्याच्या आनंदात फोटो काढून घेत होतो.

त्यानंतर उतरणं खरंतर गुडघ्यांना त्रासदायक ठरणार होतं. पण काहीतरी जिंकल्याचा आनंद त्यावर मलम लावणार होता. असं म्हणतात, बहुतेक जखमा यशाच्या धुंदीत भरून निघतात. माणसाच्या आयुष्यात यशाची धुंदी असतेच, पण इथं मात्र कष्टाची धुंदी अधिक होती.

पुन्हा कधी न कधी या हिमालयाच्या वाटांवर पावलं नक्की टाकायची असं ठरवतच आम्ही ही स्वप्नांची चढण उतरायला सुरुवात केली.(समाप्त)©बीआरपवार

Image by Michael Gaida from Pixabay 

B_R Pawar
Latest posts by B_R Pawar (see all)

B_R Pawar

बी आर पवार , भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये नोकरी. शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनिअर आहे. त्याखेरीज कथा, कविता, चित्रकलेत रमतो. जीवनानुभव शब्दात चितारायला आवडतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!