गोधडी
” डैड हे हो काय आता तरी ही जुनी जीर्ण झालेली गोधडी टाका.किती जुनी आहे.तुम्हाला मी किती चांगली उबदार ब्रॅंडेड रजाई आणाल्या पण तुम्ही त्या न वापरता हीच अंगावर ओढता.” रजतने आपल्या वडिलांना म्हटले.
” अरे बाळा असु दे रे मला हीच गोधडी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत …
आणि एकदम त्यांचे डोळे पाणवले.
रजतच्या लक्षात आले कि आपल्या वडिलांना आपण बोललो हे वाईट वाटले.
” आय एम व्हेरी सॉरी डैड..
तुम्हाला मी असे बोलायला नको होते.” म्हणतं रजतने आपल्या वडिलांच्या हातात हात घेतला.
” अरे वेड्या तुझ्या बोलण्याचे वाईट नाही न वाटले मला.मला तुझ्या आजीची आठवण आली म्हणून माझे डोळे पाणावले.अरे या गोधडीला लावलेली साडी तिचीच आहे रे.आपण आज हे जे सुख भोगतोय न हे तिच्यामुळेच “
आणि असे बोलता बोलता ते भुतकाळात गेले.
एक छोटेसे गाव.तिथे सुमन आणि दिलीप हे जोडपे नुकतेच नवीन लग्न झालेलं रहात होते.दिलीपची दोन एकर जमीन होती.तो स्वत: शेतात काम करीत होता.ऊसाची शेती .आणि घराचे अंगण मोठे होते तिथेही भाजीपाला लावायचा.
आता तर दोनाचे चार हात झाले.दोघे मिळून शेतात राबायचे.सुमनने दिलीपला घरात म्हैस आणि बैल घेऊ असे सांगितले.आता ती दुध,लोणी आणि तुप हे सुद्धा विकून पैसे मिळवू लागली.तोच घरात नवा पाहुणा येणार याची चाहूल लागली.
लक्ष्मीच जन्मला आली.आणि तिच्या पायगुणाने त्यावर्षी पिकही चांगले झाले.पैसे पण जास्त मिळाले
दिलीप आता दोन एकर पासून चार एकरचा मालक झाला.
दोघांचा संसार आनंदात सुरू होता.बघता बघता लक्ष्मी नंतर आणखीन एक मुलगी झाली.आणि एक मुलगा झाला.
हे सुखी कुटुंब आपण बरं कि आपलं काम.या दोघांनी मेहनत करून आता शेती खुप वाढवली.आता गावात एक सधन परिवार म्हणून यांना ओळखू लागले.घर देखील मोठे बांधले.गोठ्यात जनावरांची संख्या वाढली.
गावातील वृद्ध महिला सुमनला तुझ्या पायात लक्ष्मी आहे बघ.दिलीपची भरभराट झाली.म्हणायच्या.
” नाही तर हे सगळे यांच्या कष्टाचे फळ आहे” सुमन म्हणायची.
एके दिवशी सकाळी सुमनचा मामेभाऊ आला.
” ताई …
एक काम होते ग तुझ्या जवळ.म्हणजे मदत हवीय ग मला.
” हो बोल न काय ते स्पष्ट.आणि तुझा चेहरा इतका उदास का आहे.गावी सगळे बरे आहे ना.मामी कशी आहे.मला तर कामात यायला जमतच नाही बघ”
” नाही ग काहीच बरे नाही.सगळी एकदम संकटे आली आहेत.” म्हणून तो रडू लागला.
” अरे काय झाले सांगशील तरी.”
” अगं मागच्या वर्षी पावसाच्या पुरामध्ये सगळे होते नव्हते ते वाहुन गेले.आता जरा सावरतो तोच आई आजारी पडली.तिला कॅन्सर झाला आहे.आता तिला मुंबईला नेण्याचा निर्णय घेतला आहे….
….पण त्यासाठी पैसे कोठून आणणार.आता पैशाअभावी आईला तसेच सोडू शकत नाही.शेत तर आधीच गहाण ठेवले आहे.मग काय करु.म्हणून तुझी आठवण आली.मग लगेच तुझ्या कडे आलो बघ”
” ताई तु भाऊजींना सांग.मला खुप गरज आहे गं.तिचा इलाज करायला मला पैसे हवेत.मी फेडेन काळजी करू नकोस तु.आता मुंबईत डॉ.कडे नेले.तिथे पैसे जास्त लागतात गं.राहणे,खाणे पण आलेच.”
” हो रे हे येतील इतक्यात सांगते मी.चल तु जेऊन घे.’
दिलीप म्हणाला ” इतके पैसे कोठून देणार मी.काय करु.आपल्या कडे इतके कसे असतील पैसे.”
” हे बघा भाऊजी तुम्ही तुमचे शेतावर सावकाराकडून कर्ज काढू शकता.मी फेडणार हे नक्की”
दिलीप विचार करु लागला.मी आयुष्यात कधी कर्ज घेतले नाही.आता काय करु.
मग न जाणे त्याला काय सुचले तो ताडकन उठला आणि बाहेर गेला.
एक तास झाला दिलीप आलाच नाही.” कोठे गेले असतील हे.” सुमन मनात म्हणाली.
तोच दिलीप आला.” सुमन सावकाराने कर्ज देतो म्हटले आहे.पण लवकर फेडावे लागणार.नाही तर शेत आपले हातातून जाईल”
” हो भाऊजी तुम्ही काही काळजी करू नका.मी जितक्या लवकर होईल तितक्या लवकर फेडेन.माझे शेत तसेही सावकाराकडे आईसाठी घाणवट ठेवले आहे.जर नाही जमले मला तुमचे पैसे देणे तर शेत विकून देईन मी.”
पैसे घेऊन तो निघून गेला.” सुमन आपणही मामीला बघायला जाऊ गं”
” हो जाऊ कि.मुलांच्या परीक्षा झाल्यावर जाऊन भेटून येऊ आपण.”
हे दोघे बोलत होती तोच सुमनचा सख्खा भाऊ आला.
” सुमन…
सुमन…”
” अरे दादा..असा अचानक.बरे आहेत न रे घरी सगळे”
” हो गं आहेत.अग तुला जरा सावध करायला आलो आहे गं मी”.
” का रे काय झाले”
” अगं मामीने पाठविले आहे मला”
” कशी आहे रे आता ती”
” आहे ग बरी.पण तिचा लेक खुप बिघडला आहे बघं.मामीचे दागिने चोरुन विकला.कोणा एका बाईच्या नादी लागून.दारु पितो.शेत सुध्दा मामीची खोटी सही करून विकला बघं.आणि आता सगळे पैसे संपले म्हणून कोणालाही काही बाही खोटे बोलून पैसे घेतो आणि पळतो.मग परवा मामीकडे तुझी चौकशी करत होता.मग मामीला शंका आली आणि तिने मला लगेच तुला सांगायला पाठवले.तो आलाच तर तु सावध रहा म्हणून.”
” अरे देवा…हे काय रे झाले.कालच तो आला होता.आणि मामीच्या दवाखान्यास लागणार म्हणून पैसे नेले ना.आता काय करायचे.यांना कसे सांगू मी हे”
हे दोघांचे संभाषण दिलीप ने ऐकले.तसा तो एकदम खालीच बसला.
” भाऊजी आता काही खुप वेळ झाला नाही आपण आताच निघायचे म्हणजे तो सापडेल.”
हे सगळे गावी गेले.तर तो घरी आलेलाच नाही असे मामीने सांगितले.
त्याची शोधाशोध केली.कोठेच पत्ता लागेना.मग त्याला दुसऱ्या गावात पाहीले असे एकाने सांगितले.तसेच हे सगळे त्या गावी गेले पण…
…. पुन्हा एकदा निराशा झाली.
जवळ जवळ चार दिवस त्याला शोधत होते पण तो मिळाला नाही.आता पोलीसांना कळवा असे मामी म्हणाली.
पण दिलीप ने नकार दिला.उगीच सगळीकडे बदनामी होईल आपली म्हणून.
मामी तर रडत रडत दिलीपच्या पाया पडायला आली.माफ करा दिलीप माझ्या नालायक मुलामुळे तुमचे नुकसान होत आहे”
” अहो मामी माझ्या पाया कशाला पडतात येईल तो एक न एक दिवस.आता तुम्ही एकट्या इथे राहू नका आमच्या बरोबर चला”
परत हे सगळे गावी आले.आता दिलीपला काढलेल्या कर्जाचे डोंगर दिसु लागले.तो रात्र रात्र झोपत नव्हता.
त्याची प्रकृती पण बिघडत चालली.शेतात कधी पुर तर कधी दुष्काळ अशा गंभीर परिस्थिती मुळे हवे तसे पिके होईना.
हे काय कमी म्हणून घरातील जनावरं रोगामुळे दगावली.आता तर हे कुटुंब अगदीच हावालदिल झाले.
मामी पण आतुन अपराधीपणा जाणवून खचू लागली आणि अशीच झोपलेल्या अवस्थेत आपली प्राणज्योत मालवली.
दिलीपची मुले जरा मोठीच झाली होती.कर्ज तर चक्रीवाढ दराने वाढतच होते.
आता तर सावकार शेत स्वत:च्या नावावर करून घेतो म्हणत होता.हे ऐकून एकदम दिलीपला पक्षाघाताचा झटका आला आणि त्याची एक बाजू कायमस्वरूपी निकामी झाली.
सुमनच्या डोक्यावर जसे आभाळच कोसळले.
यामध्ये सावकाराने डाव साधला आणि शेत सगळे आपल्या नावावर करून घेतले.
घरात पाच जण खाणारी.आणि कमावणारे कोणीच नाही.मुलांना सुमन कसा बसा कोंड्याचा मांडा करुन चारायची.पण दिलीपला औषधं कमी करत नव्हती.
तिला रोज सकाळी उठल्यावर एकच मोठा मुलांच्या पोटाचा प्रश्न पडायचा.
आता तर ऊस तोडणी सुरू होणार होती.गावामध्ये सगळ्यांच्या शेतावर बाहेरून ऊस तोडणी साठी लोक येऊ लागले.हे पाहून सुमनने ही ठरविले आपण ही या कामासाठी जाऊ.
मग ती पण ऊस तोडणी करण्यास जाऊ लागली.तिला असे काम करताना पाहुन दिलीपचा मित्र म्हणाला.” वैनी तुम्हाला एक सांगू का”
” हो भाऊजी सांगा न”
” हे बघा माझा मित्र शहरात आहे.तो तिथे कपडे शिवायच्या फॅक्टरीचा मालक आहे.तिथे कामाला महीलाच आहेत.तुम्हाला मी नेईन तिथे .पगार पण चांगला देईल तो.हे काम कशाला करता.आणि हो दिलीप,मुले सगळेच चला तिथे.एक छोटे घर भाड्याने घेऊन देईल तो”
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच हे सगळे जण शहरी रवाना झाले.
एक खोली पण भाड्याने घेतली.सुमन सकाळी लवकर उठून स्वैपाक करुन कामाला जायची.संध्याकाळी कामावरून घरी येऊन पुन्हा शेजारच्या घरी भांडी घासायला जायची.
आता मुलांना ही शाळेत प्रवेश मिळाला.तिन्ही मुले शाळेत जाऊ लागली.दिलीपला पण जरा जरा बसता येऊ लागले.
सुमनच्या प्रामाणिक आणि नीटपणे करत असलेल्या कामामुळे तिला आता बढती मिळाली.कपडे शिवत असलेल्या महीलावर मॅनेजर म्हणून नेमणूक केली.
पगार पण वाढवून देण्यात आला.आता एका खोलीत रहायचे नाही म्हणून जरा मोठे घर भाड्याने घेतले.
मुले पण मन लावून अभ्यास करत होते.चांगल्या मार्कानी पास होत असलेमुळे स्काॅलरशीप मिळत होती.
बघता बघता मुले मोठी झाली.आता मोठी मुलगी उच्च शिक्षण पूर्ण करून चांगल्या कंपनीत नोकरी करू लागली.
आज तिचा पहीला पगार.
” आई इकडे ये बाहेर….
आल्या आल्याच तिने सुमनला बाहेर बोलावले.
” हो हो आले गं…
म्हणतं सुमन स्वैपाकघरातुन बाहेर आली.पहाते तर काय तिच्या मूलगीने एक मोठी आराम खुर्ची आणली होती.आणि हातामध्ये मोठी बॅग होती.
” आई इकडे ये आधी.या रे सगळेजण”
मग हे तिन्ही भाऊ बहीण एकत्र उभारले.दिलीपपण समोर पलंगावर येऊन बसला.मुलांनी सुमनला हात धरून आराम खुर्चीत बसविले.आणि तिच्या हातात साडीचा बॉक्स दिला.दिलीपला शर्ट पँट दिली.दोघांना पेढे देऊन तोंड गोड केले.आणि सगळेजण एकदम म्हणाले” आई आता तु काही काम करायचे नाही.तु फक्त आराम करायचे.तु आणि बाबा खुप केले ग आतापर्यंत.आता आम्ही करणार.आई तुझ्या कष्टामुळे आम्ही हे दिवस बघतो आहे.आता फक्त तुम्ही आरामात राहायचे.ही साडी माझ्या स्वकमाईची,पहील्या पगाराची .जा नेसुन ये ” आणि लेकीने साडीचा बॉक्स उघडला.मोरपंखी रंगाची साडी.साडी पाहून सुमनचे डोळे भरून आले.
तिला रडताना पाहून दिलीप पण रडू लागला.मुले पण एकदम भावनीक झाली.
सुमनने ती मोरपंखी रंगाची साडी परिधान केली.कपाळी मोठा कुंकवाचा टिळा आणि गळ्यात काळ्या मण्याचे मंगळसूत्र.
ती जेव्हा बाहेर आली तर तिचे रुप अगदी गौरीची प्रतिमा.गौराईच जणु काही.एक स्त्री अबला नारी नाही तर तिच्या इच्छाशक्तीने ती कशी सगळ्या संकटातून बाहेर पडते याची खरी ओळख म्हणजे सुमन.
आईने लेकीने घेतलेली साडी खुप वर्षे आवडीने नेसली.पण वयोमानानुसार तिला ती वजन साडी अंगावर पेलवेना म्हणून तिने आपल्या लेकीच्या पहील्या पगाराची साडीची गोधडी शिवून घेतली.
आता मुलींची लग्ने झाली.मुलाचेही झाले.सगळ्यांचे सुखी संसार पाहून सुमनने आपल्या कष्टाचे चीज झाले.आता मी डोळे मिटण्यास मोकळी झाले म्हणत जगाशी निरोप घेतला.
©® परवीन कौसर…
Latest posts by Parveen Kauser (see all)
- घटस्थापना.. - July 29, 2021
- सुहासिनी - June 15, 2021
- कन्या दान - May 8, 2021
छान