सेकंड इनिंग…
कोणाची?
बायकोची…
फक्त बायकोची?
हो फक्त बायकोची…
ओ आजोबा ‘आमची सेकंड इनिंग’ असं म्हणा ना…
हो, ते ही तुझं खरंय म्हणा, बायको हट्टाला पेटली तर आमची खरोखरच सेकंड इनिंग खरंच चालू होईल…
होऊदे की मग, त्यात एवढं वाईट वाटण्यासारखं काय आहे?
अरे तसं नाही रे…
बायको म्हणाली, आपली सेकंड इनिंग आता सुरू झाल्ये, मी ती एन्जॉय करणार…
मग करुदे की, उसमे क्या?
अरे हे बेशिस्तीचं वागणं मला नाही पटत रे…
बेशिस्त, कसली बेशिस्त?
तेवढ्यात आजीची एन्ट्री होते…
मी सांगते, कसली बेशिस्त ते…
आजोबा डोळे वटारून बघत आणि नातू कान टवकारून ऐकत असतो…
हे पहा,
आपण दोघांनीही पासष्टी ओलांडली आहे…
आता वेड्यासारखं वागणं बंद करायचं…
नीट वागायचं आणि ते ही समजूतदारपणे…
म्हणजे मी काय मूर्ख आहे का? आजोबा रागात म्हणाले…
आहो, तसं नाही…
उगीच लहानसहान गोष्टींवरून मला बोलायचं नाही, मी खपवून घेणार नाही…
जसं, भाजीत मीठच कमी झालं, खिचडी फडफडीतच झाली…
असे टुकार विषय आता बंद करायचे…
आणि उगीच दर दोन दिवसाने माझी आई की नाही…..
पुरे झालं आता हे वाक्य, आता ते बंद करायचं, कायमचं…
तुमची आई नको आणि माझा बाप नको…
या दोघांवरून आपले खूप वाद झाले…
आता हे सगळं सोडून द्यायचं…
मुलं मोठी झाली आहेत…
कामधंद्याला लागलीत…
आता कोणाची शाळा नाही, रिक्षा नाही, बस नाही, डबा नाही…
मलाही थोडं झोपू द्या आणि तुम्हीही थोडं झोपत जा…
उगीच जिवाचा त्रागा करून घेऊ नका…
टेन्शन घेऊ नका आणि देऊही नका…
योगासनं, प्राणायाम, मॉर्निंग वॉक, शतपावली या विषयांवरून मला एकसारखं लेक्चर द्यायचं नाही…
तुम्हाला काय उड्या मारायच्यात त्या मारा, माझी अजिबात ना नाही…
आता लक्षात घ्या, आपली सेकंड इनिंग सुरू झाल्ये…
मस्त एन्जॉय करायचं…
खूप काटकसर केली…
नको तितकं मन मारलं…
आता छान छान भरपूर साड्या घ्यायच्या, हिंडायचं, फिरायचं, बाहेरच्या पदार्थांवर ताव मारून यायचं…
अजिबात कुरबूर करायची नाही…
आवश्यक तेवढी बचत करू आणि मस्त मजा करू…
अजून एक…
ज्याला जाग आधी येईल त्याने आधी उठायचं…
उगीच मला सहा वाजले, सात वाजले, आठ वाजले असं सांगून कानाशी भुणभुण करायची नाही…
नवरा अगोदर उठला आणि आपल्या बरोबर बायकोचाही चहा टाकला तर काही जन्मठेपीची शिक्षा नाहीये…
म्हणून म्हणते, आता कसं शांत, निवांत, आरामशीर चालू द्यायचं…
मला सांगा, असं वागणं अवघड आहे का?
अश्याने आपल्यात कधी भांडणं होतील का?
थोडं समजून घ्या हो…
मेनोपॉज, हार्मोनल चेंजेस, खूप कष्ट केल्याने हाडांची झीज होणे यामुळे या वयात बायका थोड्या चिडचिड्या होतात…
एखाद्या गोष्टीवर पटकन रिऍक्ट होतात…
मनात काहीही नसतं पण एखादा शब्द बोलून जातात…
तेव्हा नवरोजी थोडं समजून घेऊया आणि आपली सेकंड इनिंग मजेत खेळूया……………..
Image by pasja1000 from Pixabay
- देवदूत…डॉक्टर आणि ड्रायव्हर - September 18, 2021
- रक्षाबंधन… - August 23, 2021
- एक ओळख..अशीही… - August 20, 2021