पोटॅटो पिनव्हील
लॉकडाऊननं अनेकांना घरात बसून नवनवीन पदार्थ बनवून खायला भाग पाडलं. पाककला निपुणत्वाच्या कितीतरी परीक्षा अनेकांनी उत्तीर्ण केल्या असतील. त्यावेळी सगळं जग जे करत होतं त्याचाच कित्ता आमच्याही घरात गिरवला जात होता.
दुपारी सगळी कामं आटपून लोळत पडलं की ‘घे मोबाईल आणि बघ रेसिप्या’ हा उपक्रम सुरू असायचा. अशातच एक दिवस ‘पोटॅटो पिनव्हील’ नावाचा एक पदार्थ मनोभावे पाहून झाल्यावर, तो आपण घरी करून बघायचाच असे मी नक्की केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर घरात भरून ठेवलेल्या वाणसामानात मैदा होताच. इतरही जिन्नस होतेच. बटाटे तर कितीतरी भरून ठेवलेले होते. विडिओ पाहून झाल्यावर तडक स्वयंपाकघर गाठले आणि चांगले आठ-दहा ‘पोटॅटो’ कुकरच्या पोटातील पाण्यात टाकून कुकर गॅसवर ठेवला. ओट्यावरच्या एका कोपऱ्यात मोबाईलवर पोटॅटो पिनव्हीलच्या रेसिपीचा विडिओ हळू आवाजात सुरू होताच. त्या बरहुकूम मैद्याचा ‘डो’ (म्हणजे उंडा की हो!’ )भिजवून झाला. उकडलेल्या बटाट्याची सालं काढून त्यात सांगितलेले सगळे जिन्नस घालून झाले. आणि अगदी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे उपलब्ध जिन्नसांवर हाताची नाजुक(?) बोटं नाचवत कृती केली. त्यात दाखवलं होतं म्हणून नव्हे पण आदल्याच दिवशी असंच रिकामपण मिळाल्यामुळे नखं सुद्धा रंगवलेली होती. हो… काहीतरी सुंदर केल्याचा फील यायला नको का? तर नेलपेंट लावलेली असल्याने तेही एक झालं. म्हणजे काय की, पदार्थ छानच होतोय हा आत्मविश्वास आला.
भिजवलेल्या मैद्याची एक किंचित जाडसर लांबलचक पोळी लाटली. विडिओतील पोळीच्या जाडीचा अंदाज न आल्याने मी लाटलेली पोळी अंमळ जरा जास्तच जाड झाली होती. (हे मला नंतर कळले…पण ते असोच)
लाटलेल्या पोळीवर बटाटा… सॉरी पोटॅटोचं सारण उर्फ लगदा चाकूच्या साहाय्याने अगदी नाजूक हाताने फिरवून एकसारखा पसरवून घेतला. मग त्याला गुंडाळून ‘छान’ रोल करून घेतला आणि छोटे छोटे व्हील्स कापून घेतले. आणि कढईत डीssप फ्राय केले. सुंदर सोनेरी रंगावर तळून डिशमध्ये सजवले.
इतकं सगळं केल्यावर मनातल्या मनात ‘हुश्श !’ म्हणत हसऱ्या चेहऱ्याने नवऱ्याला व मुलांना सर्व्ह केले… आणि मोठ्या आशेने त्यांच्या प्रतिक्रिया काय येतात ह्याची वाट पाहू लागले. एक अख्खं मिनिट सरलं तरी कुणी काहीच बोलेना. मग डोळ्यातल्या आशेची जागा रागाने घेतली. कदाचित त्यामुळेच की काय पण नवरा म्हणाला- ‘अग … बटाट्याची बाकरवडी केलीस की काय?… अगदी नरम झाली हो… चितळेंची नाहीतरी फारच कडक असते.’
आता नवऱ्याला चितळेंची क्रिस्पी बाकरवडी किती प्रिय आहे हे मला काय ठाऊक नसेल?… पण तरीही त्याने टोमणा मारलाय की कौतुक केलंय हे न कळून माझ्या प्रतिक्रियेचा गोंधळ मात्र वाढला. इकडे पोरगं म्हणालं – ‘आई, तसे जमलंय हे… पण तो उंडा उरला असेल तर हेच सारण भरून समोसा तळून दे ना एखादा.’ मुलाकडे खाऊ का गिळू असा एक कटाक्ष टाकून मी पुन्हा स्वयंपाकखोलीत मोर्चा वळवला. अजून अर्धा ‘डो’ शिल्लक होता. आणि तो कुणाच्या डोक्यात मारावा (म्हणजे पोटात घालावा) असा विचार करून पुढचं काहीच करावंसं वाटेना.
इतक्यात सासूबाईंनी ऑर्डर सोडली- “एखादी पुरी कर गं माझ्यासाठी. त्याच बटाट्याच्या लगद्यासोबत खाऊन घेईन” मुलगी म्हणाली- आई सकाळची पोळी उरली असेल तर त्यासोबत खाईन मी बटाट्याचा लगदा.
‘देवा!… एकाच रेसिपीची किती ही अनंत रूपे!! खरंच तुझा महिमा अगाध आहे.’ पोटॅटो पिनव्हीलमध्ये लपलेली ‘नरम बाकरवडी, समोसा, पुरी भाजी’ इत्यादी पदार्थ मला का दिसू नयेत? पण असो… ज्याला जे जे हवं ते ते करून देऊन. एक पोटॅटो पिनव्हील उर्फ बटाट्याची नरम बाकरवडी खाऊन ‘घे मोबाईल बघ रेसिप्या’ हा उपक्रम माझ्याकडून ताबडतोब बंद करण्यात आला… तेव्हा घरातील सर्वांनी सुटकेचा निश्वास घेतला… आणि मीही.
Image by mohamed Hassan from Pixabay
Latest posts by Vinaya Pimpale_w (see all)
- जिगसॉ जिंदगी पत्र क्रमांक 8 - May 20, 2021
- फुलपाखरू - April 13, 2021
- पोटॅटो पिनव्हील - March 27, 2021
खूप छान👌😊
Nice
अगदी आमचाच अनुभव