विसावा
” अरे आज आबासाहेब आले नाही.तब्येत तर बरी असेल न त्यांची.सगळ्यांच्या आधी येतात.आणि आज इतका वेळ.हे कधीच झाले नाही असे”अण्णाजीं दत्ताजीरावांना म्हणाले.
” हो न.मी पण तोच विचार करतो आहे.थांबा हा त्यांना फोन करून बघुया” दत्ताजीराव म्हणाले.
आबासाहेब, अण्णाजी आणि दत्ताजीराव हे तिघे मित्र म्हणजे यांची मैत्री तशी आताच झालेली.हे तिघे रोज सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना भेटलेले .तिघे ही सेवानिवृत्त झालेले .वाॅक करत करत हाय हैलो करत मैत्री झाली.तर ही मैत्री अशी कि कोणीही यांना पाहीले तर हे तिघे बालमित्र असावे असेच वाटायचे.
तिघे मनमोकळेपणाने गप्पा मारत आपापल्या कामात आपण कसे व्यस्त होतो.मग त्यात मुलांचे शिक्षण नंतर त्यांची लग्न कार्य मग नातवा बरोबर आपले बालपण आठवत खेळणे.हे त्यांचे रोजचे विषय.
पण कधीही आपल्या प्रकृतीची चिंता किंवा काळजी नाही.अगदी दिलखुलासपणे हसत बोलत हे तिघे कधी एकमेकांच्या मनात घर करून बसले हे त्यांनाच कळले नाही.
हे तिघे कितीही थंडी असो किंवा काहीही असो रोजच्या प्रमाणे सकाळी वाॅकला जायचेच.कधीही चुकवले नाही.
तरुण पीढीला लाजवेल अशी स्फुर्ती असे चैतन्य होते.अधुन मधुन आपापल्या सौभाग्यवती बरोबर गोड झालेले लुटुपुटुचे भांडण पण हसत मजेशीर गमतीने सांगून हसत बसायचे.
तर असे हे तीन मित्र.
आणि आज पहिल्यांदाच असे झाले कि आबासाहेब आले नाही.
” अरे हे काय फोन पण उचलत नाहीत.काय झाले असेल? ” दत्ताजीराव म्हणाले.
” आपण जाऊया का त्यांच्या घरी?” अण्णाजी म्हणाले.
” हो हो चला जाऊ या.”
हे दोघे आबासाहेबांच्या घरी निघाले.
घराजवळ गेले आणि घराची बेल वाजवली.
एका महीलेने दार उघडले.तिच्याकडे पाहताच ती घरात काम करणारी आहे असे वाटले.
” कोण हवंय? “
तिने दार उघडताच त्यांना विचारले.
” आम्ही आबासाहेबांचें मित्र आहोत.आहेत का घरी ते?” अण्णाजी म्हणाले.
” नाही ते आता इथे राहत नाहीत.”
” अरे म्हणजे कुठे राहतात.?”
” ते काय मला माहित नाही.थांबा हो मी ताईंना विचारते”
……
………
………
दोघेही एकदम स्तब्ध झाले.त्यांना काही सुचेनासे झाले.
इतक्यात दत्ताजीरावांचा फोन वाजला आणि एकदम ते दोघे फोनच्या आवाजाने भानावर आले.
हात जरा त्यांचे थरथरत होते तसेच त्यांनी आपल्या शर्टाच्या खिशातून मोबाईल फोन काढला आणि पहातात तर आबासाहेबांचाच फोन.पटकन त्यांनी फोन उचलला आणि,” है…हैलो..
तर तिकडून एकदम हळू आवाजात” हा..हैलो…
आणि जरा वेळ काहीच आवाज नाही मग नंतर एकदमच एक मोठा दिर्घ श्वास घेऊन …बोला दत्तोपंत आज वाॅकिंग विथ टॉकिंग झाली कि”
” आबासाहेब तुम्ही कोठे आहात . आम्हाला तुमचा पत्ता द्या आम्ही येतो भेटायला”
” हो.आम्ही…
…. शहरापासून जरा जवळच असलेल्या एका वृद्धाश्रमामध्ये आहोत.आणि तुम्हाला यायचे म्हणजे जरा लांबच आहे ओ.तुम्ही उद्या या.आता वेळ पण झालेला आहे तुमची ब्रेकफास्ट, औषधांची वेळ आहेत .तर तुम्ही आज नको उद्या आरामात या.मग आपण जरा जास्त वेळ गप्पा मारत बसु.मी तुम्हाला इथला पत्ता मेसेज करतो”
इतके ऐकून नकळतच दत्ताजीरावांच्या डोळ्यात पाणी आले.हे पाहुन अण्णाजी देखील नर्व्हस झाले.
आबासाहेबांनी पत्ता मेसेज करुन पाठविला.या दोघांनी पत्ता वाचला आणि आजच आत्ताच जायचे भेटायला म्हणून ठरवून आपापल्या घरी गडबडीने गेले.
दोघांनी आपला नास्ता औषधे घेतली आणि लगेचच घराबाहेर पडले.
…..
….. टॅक्सी …
टॅक्सी. .,
….देखो इस पते पर जाना है.”
दोघे टॅक्सी मध्ये बसले.एव्हाना हसत , विनोद करत बसणारे हे दोघे आज खुप जड अंतःकरणाने आकाशाकडे बघत टॅक्सी मध्ये बसले होते.नजाणे कितीतरी प्रश्नांनीं काहुर माजविला होता.कि …का?
वृद्धाश्रम मध्ये अचानक एका रात्रीत हे जोडपे गेले.????
मुलगा,सुन आणि नातुचे इतके गोडवे गाणारे आबासाहेब आज त्यांना वृद्धाश्रम मध्ये जाऊन रहायची गरज का भासली? हे स्वतः गेले कि मुलगा सुनेने पाठविले????
एक न हजार प्रश्न . टॅक्सी मध्ये गाणे रेडिओवर सुरू होते.
” ज़िंदगी कैसी है पहेली हाए,,
कभीं ये हंसाए कभी ये रुलाए”
इतक्यात ” आले बघा तुमचे वृद्धाश्रम.” असे म्हणत टॅक्सी ड्रायव्हर ने गाडी थांबवली.
दोघेही लगबगीने गाडीतुन उतरुन बाहेर आले आणि वृद्धाश्रम मध्ये गेले.तिथे बाहेरच एक वाॅचमन होता.” कोणाला भेटायचे आहे तुम्हाला काका?
” आबासाहेबांना”.
” अच्छा ,चला मी नेतो तुम्हाला त्यांच्या जवळ”
हे दोघे त्यांच्या बरोबर चालू लागले.एकदम शांत वातावरण.कोणाचाही आवाज नाही.ना बाहेर गाड्यांचा आवाज.खोल्या खोल्या एकीकडे.तर एकीकडे एक मोठे हाॅल आणि तिथे लहान लहान पलंग.आणि त्यावर कोणी झोपलेले तर कोणी बसलेले.कोणी पेपर वाचत बसलेले तर कोणी फक्त आणि फक्त बाहेर खिडकीतून शुन्य नजरेने पाहत बसलेले वृद्ध होते.
हे दृश्य पाहून या दोघांच्या मनांची घालमेल सुरू झाली.आणि ” हा काका इथे आहेत बघा आबासाहेब काका.”
आणि समोर त्यांना आबासाहेब एका खुर्चीवर डोळ्यांवर चष्मा आणि डोळे मिटलेले समोरच त्यांच्या सौ.अगदी निराश चेहऱ्याने बसलेल्या होत्या.
” आ… आबासाहेब..
आणि एकदम आबासाहेब दचकलेच.
अचानक आपल्या मित्रांना समोर बघून त्यांना काही सुचत नव्हते आणि ते खुर्चीवरून उठले आणि आपल्या मित्रांच्या गळ्यात पडून धाय मोकळून रडू लागले.
त्यांच्या सौ.पण डोळ्याला पदर लावून रडू लागल्या.
” आबासाहेब.तुम्ही इथे आलात.या टोकाचे पाऊल उचलले.हा निर्णय घेतला.तुम्ही आम्हाला काही नाही सांगितले.अहो आम्ही तुमच्या मुलाला आणि सुनेला समजावून सांगितले असते ना.”
” नाही काही फरक पडला नसता.आपल्या नशीबाचे भोग आहेत भोगावेच लागणार”
आणि आबासाहेबांनी हलकासा निःश्वास टाकला.इतक्यात कधीही न बोलणाऱ्या त्यांच्या सौ.नी बोलायला सुरुवात केली” मी यांना आधीच सांगितले होते कि तुम्ही आपली आहे तेवढी इस्टेट आपल्या ठेवी सगळे मुलाच्या सुनेच्या नावे करु नका.जेव्हा आपण हे जग सोडून जाऊ तेव्हा हे सगळे यांचेच होणार आहे.आपण आहोत तोपर्यंत आपल्या नावावर असु दे.पण यांनी ऐकले नाही उलट मलाच ओरडले आपलीच मुले आहेत आणि उद्या आपल्या नंतर त्यांचे होणार त्यापेक्षा आपण आपल्या समोर त्यांना दिले याचे मला समाधान असेल.आणि यांनी सगळी मालमत्ता मुलाच्या नावावर करून टाकली.आणि हे सगळे नावावर झाले तसे सुनबाईची वागणूक बदलली.आम्हाला उठसूट टोमणे देत काही न काही शुल्लक कारणावरून घरात वादविवाद,भांडणे सुरू झाली.आमचे जगणे कठीण झाले.हे काय सकाळी तुमच्या बरोबर बाहेर फिरायला गेले कि तेवढे फ्रेश होऊन यायचे.यांना तेवढा विरंगुळा होता पण मी….
मी तर दिवसभर घरात रहायची.नातवाला काही तरी बोलून आमच्या जवळ पाठवायची नाही.आणि संध्याकाळी मुलगा घरी आला कि त्याचे कान भरुन घरचे वातावरण दुषित करायची.
त्यादिवशी तर चोरीचा आळ माझ्यावर घालून कामवाल्या बाईसमोर मला चोर ठरवले.मग आम्हाला हे काही सहन झाले नाही.मग शेवटी आम्ही इथे येऊन रहायचा निर्णय घेतला.आता आम्हाला इथे कोणी काही बोलणार नाही.आमचा शेवट तरी सुखाचा होईल.रोजची किटकिट रोजचा मनस्ताप नाही होणार आता”
हे ऐकून अण्णाजीं आणि दत्ताजीरावांच्या डोळ्यात पाणी आले.
नंतर हे तिघे गप्पा मारत बसले.जरी ते हसण्याचा प्रयत्न करत होते पण आतुन मात्र हे तिघेही आपल्याला होणारे दुःख आपल्याला झालेले मनाचे घाव लपविण्याचा प्रयत्न करत स्वताची फसवणूक करत होते.
बघता बघता वेळ कसा गेला हे कळलेच नाही.मग जड अंतःकरणाने हे दोघे मित्र परत फिरले.
घरी येईपर्यंत दोघांच्या मनात दुःख दाटलेले होते.पण ते दोघे ही स्वतःपेक्षा दुसऱ्या ला सावरण्याचा प्रयत्न करत होते.
रात्री या दोघांना झोप लागली नाही.सकाळी हे दोघे लवकरच फिरायला आले आणि दोघांनी बसून जवळजवळ एक तास चर्चा करून विचारपूर्वक निर्णय घेतला आणि लगबगीने घरी परतले.
दोघांचे जेव्हा औषधपाणी पुर्ण झाले तेव्हा या दोघांनी आपल्या फोनमध्ये आणि आपल्या डायरीमध्ये जितक्या मित्रांची फोन नंबर होती ती एका पेपरवर लिहून घेतली.कोणा कोणाच्या घराचे किंवा आॅफिस चे पत्ते देखील होते ते ही त्यांनी लिहून घेतले आणि परत हे दोघे आपल्या ठरवलेल्या ठिकाणी जाऊन म्हणजेच एका काॅफिशाॅप मध्ये बसले.
जे जे नंबर फोनमध्ये सेव होते त्या त्या नंबरवर फोन केला आणि जे नंबर सेव नव्हते ते पेपरमध्ये लिहिलेले पाहून फोन केला आणि त्यांना सगळ्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी पार्क मध्ये भेटायला येण्यास सांगितले.
सांगितल्या प्रमाणे त्यांचे मित्र जे येऊ शकले ते आले आणि जे न येऊ शकले ते नंतर भेटू आम्ही असे सांगितले.
जेवढे आले होते त्यामध्ये कोणी सेवानिवृत्त शिक्षक होते तर कोणी सेवानिवृत्त पोलिस,तर कोणी बॅंकेचे अधिकारी तर कोणी प्रायव्हेट कंपनीत नोकरी करणारे.
पण जवळपास सगळेजण पेंशनर होते. आता अण्णाजींनी बोलण्यास सुरुवात केली.
” मी सर्वात प्रथम तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो.आमच्या बोलण्याला मान देऊन तुम्ही वेळात वेळ काढून येथे आलात.
तर आता मी मुख्य मुद्द्यावर येतो.आपण सगळेजण आयुष्य भर आपली नोकरी नंतर आपली मुले घर संसार यामध्ये गुरफटून जातो.मुलांचे संगोपन, शिक्षण,त्यांची लग्न कार्य,मग त्याची होणारी मुले म्हणजे आपली नातवंडे,मग येते आपली सेवानिवृत्ती ची वेळ येते.जेव्हा आपण सेवानिवृत्त होतो तेव्हा नकळतच आपण आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा टप्पा पार करून पुढे आलेलो असतो तर त्यावेळी आपल्याला खरी गरज असते आपल्या मुलांची त्यांच्या कडून फक आणि फक्त दोन बोल गोड ऐकायची,त्यांना डोळे भरून पहायची.त्यांचा फुलणाऱ्या संसाराचा आनंद उपभोगायाची.पण हे सारे सगळ्यांनाच शक्य होत नाही.कारण कोणाची मुले तर कोणाच्या सुना किंवा कधी कधी आपण स्वतः देखील आपल्या स्वभावानुसार मिसळून घेत नाहीत.मग नकळतच घरात वादविवाद,भांडणे, मतभेद वाढतच जातात.आणि घरचे वातावरण दुषित होते.
मग एक टोकाचा निर्णय घेण्यात येतो ते म्हणजे वृद्धाश्रम.
पण यावर वृद्धाश्रम हाच उपाय आहे का? दुसरा कोणता मार्ग नाही का?
नाही मी असे म्हणत कि सगळ्या घरात असेच घडते पण शंभारात चार घरी तरी हीच परिस्थिती आहे यावर मार्ग काढावा लागेल.म्हणून मी तुम्हाला येथे बोलविले आहे.तुम्ही आपापल्या परीने उत्तर किंवा उपाय सांगा.”
सगळेजण आपापल्या परीने उत्तर देऊ लागले.कोणी म्हणाले आता आपण आताच्या पिढीला प्रेरणा देऊन त्यांना पटते तसे वागावे.आपलेच चालावे आपलेच ऐकावे मी मी करु नये.
कोणी म्हणाले आपण त्यांचे जन्म दाते मग आपण त्यांच्या समोर का झुकावे.
सगळ्यांनी आपापली मते मांडली.या महाचर्चेतुन मग अण्णाजींनी एक मार्ग काढला आणि तो म्हणजे आबासाहेब हे बॅंकेत अधिकारी होते आणि त्यांचे गणित खुप चांगले होते.आजही ते क्यलक्युरेटर न घेता पटापट गणिती हिशोब सांगत होते.आणि त्यांच्या सौ.तर स्वैपाकात सुगरण.हाताला इतकी चव कि खाणारा बोटे चाटुन खात असे.
अण्णाजींनी आपल्या मित्रांना सांगितले की उद्या पासून बॅंक परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान बुद्धिमापन कसोट्या अंकगणित यांचे संपूर्ण शिक्षण ज्या ज्या मुलांना हवं आहे त्याचे प्रशिक्षण आबासाहेब करतील आणि शास्त्र शुद्ध पद्धतीने स्वैपाक कला शिक्षणाचे धडे त्यांच्या सौ.करतील.त्यासाठी तुम्ही तुमच्या ओळखीत सांगावे जेणेकरून या दोघांना आपण एकटे आहोत असे वाटू नये.
दुसऱ्या दिवशी हे दोघे मित्र आबासाहेबांकडे वृद्धाश्रम मध्ये गेले आणि त्यांना आपल्या बरोबर परत घेऊन आले.अण्णाजींचे एक दोन खोल्यांचे घर मोकळे होते तिथे त्यांनी त्यांची राहायची सोय केली आणि जे उपयोगी पडेल असे थोड्या वस्तू दत्ताजीरावांनी आणुन दिल्या.
घर सजवले गेले.घर छोटेसे होते पण मनाला समाधान देणारे होते.आबासाहेबांनी आपले हात जोडून दोघांचे आभार मानायला सुरुवात केली तोच दोघांनी त्यांना वेडे आहात का यात आभार मानायचे कारण नाही.आणि हो आजपासून तुमचे क्लासेस सुरू होतील आणि हो वहीनी तुम्हाला देखील दर शनिवारी आणि रविवारी दोन दिवस काही विद्यार्थी स्वैपाक शिकायला येतील.आणि हो रोज सकाळी आम्ही पोहे चहा इथेच घेणार हो” एकदम सगळे जण हसु लागले.
बघता बघता आबासाहेबांच्या क्लासची ख्याती सगळीकडे पसरली.जो तो त्यांच्या हुशारी मुळे त्यांच्या कडे आकर्षित होऊ लागला.इतकेच नव्हे तर त्यांच्या पत्नीच्या स्वैपाक क्लास बरोबर भरतकाम विणकाम हे देखील लोकांना आवडू लागले.त्यांचे देखील दोन दिवस क्लास मध्ये भरभरून प्रतिसाद मिळू लागला.
आबासाहेब रोज आपल्या मित्रांचे आभार मानत होते.
आता रोज सकाळ संध्याकाळ हे
मित्र फिरायला जात होते.फिरुन आले कि आबासाहेबांची पत्नी गरमागरम चहा करून द्यायची.
आता हे जोडपे आपला भुतकाळ विसरून पुढे पुढे प्रगती करत होते.
त्या दिवशी शनिवारी स्वैपाक क्लासमध्ये एका विद्यार्थ्याने टिव्ही वर स्पर्धा आहे आणि तुम्ही सहभागी व्हा.आणि खात्री आहे तुम्हाला पहीला नंबर मिळणार म्हणून सांगितले.
यावर ” छे हो मी या वयात काय स्पर्धा परीक्षा मध्ये भाग घेणार.इथे घरात बसून शिकविते हेच खुप आहे “
” नाही नाही असे म्हणू नका.मी आॅलरेडी तुमचे नाव दिले आहे.”
शेवटी कशाबशा तयार झाल्या.आणि स्पर्धेत सहभागी झाल्या.
आज स्पर्धेचा दिवस.सकाळपासुन यांना भितीने काही सुचत नव्हते.तरी देखील उसने अवसान आणून आबासाहेब बरोबर त्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धेच्या ठिकाणी गेल्या.
तिथे मोठं मोठे कॅमेरे,लोक,लाईट्स पाहून या जरा गोंधळल्याच पण त्यांना आबासाहेबांनी धीर दिला आणि काही घाबरु नकोस जा ” असे सांगितले.
तशा त्या तिथे गेल्यावर ज्या काही वस्तू दिल्या होत्या त्यापासून एक वेगळीच डिश जी पारंपरिक पद्धतीने बनवायची हा टास्क दिला होता.
सगळेजण आपापल्या परीने प्रयत्न करत होते.” वेळ कमी आहे लवकर करा” असे सांगितले जात होते.
चार, तीन,दोन आणि एक….
…चला सगळेजण वेळ संपली आहे.असे सांगून सगळ्या स्पर्धकांना बाजूला उभे राहण्यास सांगितले.
आता परिक्षक आले.
त्यांनी आधी डिश बनवलेली आहे कशी आणि ती सजवलेली कशी आहे नंतर त्यासाठी वस्तू कशा प्रकारे आणि किती प्रमाणात वापरले.नंतर स्वैपाक करुन तिथली स्वच्छता कशी आहे त्यामध्ये न वापरलेल्या वस्तू ज्या त्या ठिकाणी व्यवस्थीत ठेवले आहे कि नाही.हे सगळे परिक्षण करुन नंतर पदार्थांची रंग संगती चव कशी आहे.मीठ मिरचीचे प्रमाण हे सगळे चेक केले.
” आता थोड्या वेळात रिझल्ट लागेल.” असे अनाउन्समेंट केली.
यावर सौ.म्हटल्या” अहो मी काय म्हणते चला आता जाऊया आपण.आता काय माझा इथे निकाल नापासच येणार.मी म्हातारी मला काय या तरुण मुलासारखे जमणार आहे का”
” अगं असु दे.तु भाग घेतला न यातच मला समाधान आहे.पण थांबुया आपण पाहु आपण निकाल.कोण येतो प्रथम त्याचे कौतुक करुन जाऊ आपण”
आता निकाल येतच आहे फक्त दोन मिनिटे सगळ्यांना शुभेच्छा” असे म्हणत टाळ्या वाजवत एक मुलगी स्टेजवर हातात माईक घेऊन बोलत होती.
सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते.
प्रथम तिसऱ्या क्रमांकावर कोण आहे हे सांगितले.
नंतर क्रमांक दोन…
आता प्रथम क्रमांक….
…..खरंच मला अभिमान वाटतो आहे.यांना प्रथम क्रमांक मिळाला.कौतुकास्पद आहे.यांनी आपल्या वयावर मात करून या वयातही तरुणांना लाजवेल असा स्फुर्तीधारक प्रवेश घेतला आणि आपल्या हाताच्या चवीला आपल्या आतील सुगरणीला मान दिला तर अशा आजीबाईंना माझा मानाचा मुजरा.या आजच्या स्पर्धेच्या विजेत्या आहेत .” असे म्हणत टाळ्या वाजवल्या.
हे ऐकून आबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आले.हा प्रोग्राम टिव्ही वर लाईव्ह सुरू होता.
अण्णाजी आणि दत्ताजीरावांच्या घरी जल्लोष सुरू झाला.दोघे मित्र खुप खुश झाले.
आता पारितोषिक वितरण समारंभ.आबासाहेबांनी आपल्या मित्रांना बोलावून घेतले.हे दोघे मित्र लगेच तिथे आले.
पारितोषिक घेण्यासाठी जेव्हा स्टेजवर बोलावून घेतले तेव्हा त्यांनी आबासाहेब आणि त्यांच्या मित्रांना स्टेजवर बोलावले.
मोठी ट्राॅफी आणि पन्नास हजार रुपये आणि एका मोठ्या हाॅटेलमध्ये शेफ म्हणून काम करायची संधी.तिथे राहाण्याची व्यवस्था आणि वर्षातुन एकदा परदेशी जाणेची संधी हे असे एकंदरीत बक्षीस मिळाले.
हे सगळे पाहुन त्यांचे डोळे पाणावले.आता त्यांना दोन शब्द बोला म्हणून माईक हातात दिला.
” मी एक साधारण गृहिणी होते.मला माझ्या सुप्त गुणांना वाव मिळाला ते म्हणजे जेव्हा माझ्या मुलाने आम्हाला वृद्धाश्रम मध्ये ठेवले तेव्हा.मी सर्व प्रथम माझ्या सुनेची आणि मुलांची आभारी आहे.जर त्यांनी आम्हाला घराबाहेर काढले नसते तर मी इथपर्यंत पोचली नसते.नतंर आम्हाला अण्णाजी आणि दत्ताजीरावांच्या रुपात देवमाणूस भेटली.आज आम्ही आयुष्यास कंटाळून अखेरच्या श्वासाचे वाट पाहत बसलेल्यांना नवी दिशा दिली ती या दोघांनीच.आम्ही दोघे ही यांचे ऋणी आहोत.” असे म्हणत त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
इकडे आबासाहेबाच्या घरी त्यांच्या सुनेला आपली चुक समजुन आली.तिला आपल्या वागण्याचा पश्चात्ताप झाला.
लगेचच ती आपल्या मुलाला घेऊन स्पर्धेच्या ठिकाणी गेली आणि आपल्या सासुसासऱ्यांचे पाय धरले” मला माफ करा.मी चुकले.आता मी कधी कधी अशी वाईट वागणार नाही.आपण आपल्या घरी परत जाऊन आनंदाने राहुया.”
यावर आबासाहेब म्हणाले” नाही नको बाळा तुम्ही तुमच्या घरी सुखात रहा.आम्ही दोघे आमच्या घरी रहातो.हो तुला कधीही ये घरचे दरवाजे खुले आहेत.अगदी हक्काने येत जा.
पण आम्ही आता तिथे येणार नाही.हा आमचा विसावा आम्हाला पुरेसा आहे.आम्ही आमचे मित्र अगदी आनंदात आहोत.काळजी करु नये.आणि हो तुम्हाला अर्ध्या रात्री जरी कशाची गरज भासली तरी संकोच करू नकोस.ये तु आम्हाला आनंदच वाटेल तुला आम्ही उपयोगी पडलो म्हणून.”
असे म्हणत आबासाहेब आणि त्यांचे मित्र एकमेकांचे हात हातात घेऊन विसाव्या कडे चालू लागले.
©® परवीन कौसर….
Image by PublicDomainPictures from Pixabay
Latest posts by Parveen Kauser (see all)
- घटस्थापना.. - July 29, 2021
- सुहासिनी - June 15, 2021
- कन्या दान - May 8, 2021