तुळस
आज ती खुश होती . ‘सरफेस टेन्शन’ वरचं तिचं लेक्चर एकदम झकास झालं होतं . मुलांना देखील विषय नीट समजला होता …तशी ती विद्यार्थ्यांची लाडकी होती . प्रत्येक मुलाला नीट समजे पर्यंत पुढे जात नसे . आपली पर्स , आणि लॉकर मधील बाकी समान घेऊन ती कॉलेज बाहेर पडली . ऊन चटचट पोळत होतं . झाडाखाली पार्किंग असूनही गाडी म्हणजे तापती भट्टी झाली होती . ए . सी सुरू करूनही चांगले दहा मिनिटं लागले वातावरण निवळायला .
दुपारची उन्हाची वेळ ही खरतर तर मरगळ आणणारी . आताही तसंच वाटलं तिला . रस्ताही तसाच …ओसाड..कोरडा. झाडं एखाद्या सुन्न बसलेल्या वृद्धा सारखी ..म्लान , शांत . लेक्चर छान झाल्याचा आनंद चेहऱ्यावरून मावळत मावळत अगदी विरून जावा असा एकांत आणि शुकशुकाट झेलत तिने घराचं दार उघडलं . तिच्या एकटेपणालाआणखी जळमटं लागावीत असं ते जुनाट घर ! जुनाट पद्धतीचे दरवाजे , खिडक्या …वर च्या मजल्यावर जाणाऱ्या फरशी उखडलेल्या पायऱ्या ..
घराच्या मध्यभागी थोडी मोकळी जागा …चौसपी वाड्यासारखी ..त्यात एक कोपऱ्यात तुळशी वृंदावन . ते मात्र तिने नवीन करून घेतलं होतं . त्याचं कारण म्हणजे तिच्या आईचा त्या वृंदावनात असलेला जीव . खूप मन लावून आई तुळशीची पूजा करत असे . तिनेही जपली होती ती तुळस , पण आजकाल ती कायम अर्धमेलीच दिसायची . “वनस्पतींना देखील भावना असतात बरं का नेहू ! त्यांना मायेने गोंजारलं , पाणी घातलं की कसे सतेज होतात बघ!” म्हणायची आई .
बाकी घर काही सुस्थितीत नव्हतं , पण आईवडीलांची एकमेव आठवण म्हणून ती जपत होती ह्या घराला . पेलाभर पाणी पिऊन तिने तिचा आवडता कार्यक्रम लावला . ‘मनाच्या गाभाऱ्यात’ ही विश्वास खरे यांच्या खास कवितांची मैफल . आपल्या मनाला चटकन भिडणाऱ्या ह्या कविता तिला प्रचंड आवडत असत…आतून उमटलेल्या कविता..पुन्हा पुन्हा ऐकूनही कंटाळा न येणाऱ्या . पण आज मात्र त्यातही मन रमलं नाही . मन उदास वाटत होतं . असं वाटलं की ती ताईला फोन करत असे . पण तसा फोन तरी किती वेळ करणार . शेवटी तिला तेव्हा संसार आणि जबाबदाऱ्या आहेतच ..असं वाटून हात मागे घेई ती . खरं तर तिला स्वतःचं आयुष्य हे असं अपेक्षित नव्हतं . एक दिलखुलास , मोकळं , आनंदी आणि रसरसलेलं आयुष्य हवं होतं तिला …पण तिच्याही नकळत तिच्यात आलेल्या कोरडेपणाने त्यातला खुमार गायब झाला होता .
चहा घेऊन जराशी फ्रेश होऊन ती बाहेर पडली . पटांगणाला वळसा घालून तलावाच्या काठावर येऊन बसली . सहजच एक दगड उचलून तिने पाण्यात फेकला , तसे तिथले चार-पाच पक्षी पंख फडफडवत उडाले .
” का उडवलंत त्यांना? किती छान क्लिक्स मिळत होते ! ” मागून आवाज आला , तशी ती दचकली . काळा टी शर्ट , गुढग्या पर्यंत शोर्ट्स , बूट , आणि हातात कॅमेरा सरसावून एक तरुण बोलत होता .
” अहो , हे पक्षी फक्त ह्याच हंगामात इथे येतात. आता पुन्हा इकडे येऊन बसतील का शंकाच आहे.” सरसावलेला कॅमेरा खाली करत तो म्हणाला .
” ओह ! माफ करा , माझं लक्ष नव्हतं.” काहीश्या कोरड्या आवाजात ती बोलली .
” कमाल आहे . इथे लोक मुद्दामून हे पक्षी बघायला येतात , आणि तुमच्या इतक्या जवळ ते बसले असूनही तुमचं लक्ष नव्हतं? ” तो हसत म्हणाला .
” पण मी सॉरी म्हणालेय न तुम्हाला .”
” पण त्या सॉरी ने हे उडालेले हे पक्षी कसे वापस येणार?”
” उद्या पुन्हा येतील..नक्की .”
” म्हंजे मला आज मुक्काम करावा लागणार तर .” तो हसत म्हणाला .
तिला त्याच्या ह्या दिलखुलास पणाची कमाल वाटली . कारण आजची फोटोची संधी जाऊनही तो अजिबात चिडला नव्हता .
” आय एम रिअली सॉरी.” आता मात्र तिचा स्वर नम्र झालेला होता .
” इतकं सिरीयस नका होउ हो ! चलता है . आयुष्य एकदाच मिळतं . खुरं उधळलेल्या घोड्यागत बेभानही होता आलं पाहिजे , आणि कमलदलावरील भ्रमरागत हळुवार टिपताही आलं पाहिजे .”
” क्या बात है !! हे सत्येन गोखलेंचं वाक्य आहे ! तुम्हालाही वाचनाची आवड दिसतेय .”
” भरपूर ! ”
आणि मग अनेक लेखक , त्यांची पुस्तकं , कविता , ह्यावर भरपूर चर्चा झाली .
त्याची बोलण्यात कमालीचं मार्दव होतं .
आपल्या मिश्किल बोलण्यातून त्याने अनेक संदर्भ देतांना तिला खूप हसवलं . सोबत आणलेलं सरबत तिला दिलं …खरेंच्या निवडक कविता त्याच्या भारदस्त आवाजात म्हणून दाखवल्या ..हेच..नेमकं हेच हरवलं होतं तिच्या आयुष्यातून . आज अगदी आसुसल्या सारखी बोलली ती . कितीतरी काळापासून कुणाजवळ तरी बोलावं , अशी साहित्यिक चर्चा व्हावी अशी ओढ मनात दाबून ठेवलेली , ती आज बाहेर आली .
कधी उन्हं कलली आणि सूर्य मावळतीला आला ते कळलंच नाही .
तिथून निघतांना तिच्याही नकळत तिने त्याला सकाळच्या नाश्त्याचं आमंत्रण दिलं . घर सहज सापडण्या सारखं असल्याने ती अडचण नव्हती …आणि दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्याने कॉलेज ची चिंता नव्हती .
आज कितीतरी काळानंतर ती गाणं गुणगुणत घरात आली . मोबाईल हातात घेतला तर प्रिया चे तीन मिस कॉल्स . तिने फोन लावला . तिचा आवाज ऐकूनच प्रिया म्हणाली ,
” काय मॅडम! कुणी स्टुडंट विद्यापीठात पहीला आलाय न? आज आवाज अगदी प्रफुल्लित येतोय!”
” आता भलत्याच वेळी कुठल्या परीक्षा ग ? रिझल्ट कशाचा ?”
” ओहोहो ! म्हणजे कुणीतरी भेटलाय वाटतं ! खरं सांग नेहा !” प्रिया चिडवत म्हणाली , पण ती मात्र चपापली . उद्या त्याला नाश्त्याला बोलावलंय आपण …त्याला म्हणजे कुणाला?…नावही न विचारता चक्क आमंत्रण ? इतके उतावीळ का झालो आहोत आपण मैत्री साठी ..का ..’पुरुष’ मैत्री साठी?
तिचा हा मोठ्ठा पॉज प्रिया ला समजला . समजणारच . कारण ती आणि नेहा बालमैत्रिणी .
” ऑल ओके नेहा ? बरी आहेस न ? उद्या सुट्टी आहे तर ताईकडे जा किंवा इकडे माझ्याकडे ये . एकटी नको राहुस .”
प्रियाच्या ह्या प्रेमळ हक्काने तिला भरून आलं , पण ती काही बोलली नाही . उद्या मला काम आहे म्हणून विषय टाळला .
आपण चक्क खोटं बोललो प्रियाला . का? तिच्यापासून काहीही लपलेलं नाही तरीही …का ?
ह्या का चं उत्तर नव्हतं तिच्याकडे , पण
आत काहीतरी हललं होतं नक्की .
आज तो येणार म्हणून तिने स्वतः घर स्वच्छ केलं . छानसं आंबोळीचं पीठ भिजवलं , आणि नारळाची चटणी केली . तो अगदी वेळेवर आला . सकाळी दूरपर्यंत फिरून आल्याने चेहऱ्यावर छान तेज आलं होतं .
आल्याबरोबर त्याने घरावर एक नजर फिरवली , आणि हॉल चं निरीक्षण करू लागला .
” छान आहे घर . तुम्हाला फारसा वेळ मिळत नसणार देखरेखिला , पण छान ठेवलंय .”
” सत्तर वर्ष जुनं घर आहे हे . छान कांस्य त्यात ? जळमटलय सगळं .
केवळ आईच्या आठवणी म्हणून ठेवलंय मी .”
” सगळ्याच जुन्या गोष्टींना आपली अशी एक कहाणी असते नाही ?
एक वाडा चिरेबंदी
आठव बाजार भरला …”
त्याच्या ओळी पूर्ण करत ती म्हणाली ,
‘कोपऱ्यात कोनाड्यात
दिवा शांत मालवला ”
” तुम्ही इतक्या नकारात्मक का आहात ..मिस….काय नाव …मी तर नावही नाही विचारलं ..कमाल आहे माझी .”
” मी नेहा . इथल्या कॉलेज मध्ये फिजिक्स शिकवते .”
“आणि मी अनिरुद्ध . मुंबईत माझा व्यवसाय आहे , फोटोग्राफी ची आवड असल्याने फिरत असतो कुठे कुठे .”
” खरं तर मी अजिबात नकारात्मक नाहीये . पण कविता सुचतांना तसंच सुचतं काहीसं .”
त्या दिवशी नेहा खूप खूप बोलली . कितीतरी काळानंतर कुणीतरी अशी व्यक्ती भेटली होती , जिला साहित्याची ,कवितांची आवड होती .
कितीतरी चांगल्या पुस्तकांवर चर्चा झाली , नेहा च्या कविता ऐकल्या … आणि नकळत मनात नेहा आणि विशाखा ची तुलना झाली .
विशाखा म्हणजे वैशाखातील वणवा होता . गारव्याची आस असलेल्या मनाला कायम व्याकूळ ठेवेल असा वणवा . साहित्याशी कमालीची फारकत असलेल्या विशाखा सोबत त्याचा तीन वर्षांचा संसार म्हणजे एक जुलमी तडजोड होती . काहीतरी अभिजात वाचलं की तो भारावल्या सारखा तिला सांगायला जाई , पण कोरड्या दगडावर कधी हिरवळ उगवू शकत नाही , ह्याचा वारंवार प्रत्यय येई .
मोठ्या आशेने किनारा शोधणारा तो विशाखा च्या निरसपणाने तसाच राही ..अशांत .
…. आज नेहा शी बोलल्या नंतर त्याच्या गलबताला किनारा लाभल्याचा आनंद होत होता .
जेवणं झाल्यावर दोघं बराच वेळ अंगणात गप्पा मारत बसले . अनिरुद्ध ने तिला आपल्या बायको बद्दल , कुटुंबाबद्दल सांगितलं . तिच्याशी करत असलेल्या तडजोडीवर पण बोलून झालं होतं . त्याचे एकेक किस्से ऐकून तिच्या मनात त्या दोघामधील समानतेचं आश्चर्य वाटलं . आपण तर एकटे रहातोय हा तर साथीदार असूनही एकटा आहे .अनिरुद्ध म्हणजे
आपला साथीदार कसा असावा ह्याची तंतोतंत व्याख्या आहे हे सतत जाणवत होते नेहाला .
त्याला मायेनं जवळ घ्यावं , प्रेमाने गोंजारावं असं वाटत होतं तिला .
” तुम्हाला विश्वास नाही वाटणार नेहाजी , मी बायकोला विचारलं की तु अमृता प्रीतम चं लिखाण आवडतं का ? तर म्हणाली , तो झिपरा प्रीतम लिहितो ?”
” सगळ्यांनाच साहित्याची आवड असावीच हे जरुरी नाही न ?” अंगावरची शाल लपेटून घेत नेहा ने विचारलं .
“एकदम मान्य ! पण कशाची तरी आवड असावी न ? नाही वाचन किंवा संगीताची आवड तर उत्तम स्वयंपाकाची आवड असावी , खेळाची.. फिरण्याची …कशाची तरी ? निदान काटेरी जीभ तरी असू नये !”
नकळत नेहा उठली . तो बसला त्या खुर्ची च्या पायाशी बसून तिने आपलं डोकं त्याच्या मांडीवर ठेवलं . तिच्या डोक्यावर हात ठेवून तो शांत बसला होता . काही क्षणातच त्याने तिच्या खांद्याला धरून उठवले . त्याची नजर बदललेली होती . तिनेही धीटपणे त्याच्या डोळ्यात बघितले .
आज पहिल्यांदा कुण्या परपुरुषाचा असा स्पर्श झाला होता तिला .
ज्या सोबतीची इतकी वर्षे फक्त स्वप्न रंगवली , ती आज अशी साद घालताना पाहून ती पूर्णपणे विरघळली . तिच्या हुंकारात ओतप्रोत समाधान होतं .
ताईच्या फोनने जाग आल्यावर अचानक भानावर येऊन तिने आजूबाजूला बघितलं . सकाळ झाली होती . शेजारी अनिरुद्ध नव्हता . त्या जागी प्रेमाने हात फिरवत काही क्षण ती तिथेच बसली .
फोन वाजून शांत झाला होता . अनिरुद्ध च्या न सांगता जाण्याचं तिला आश्चर्य नाही वाटलं . किंबहुना तो असाच निघून जाणार असा अंदाज होता तिचा ..तिनेच त्याला तसं बोलून दाखवलं होतं .
“तुला उद्या सकाळी पश्चात्ताप तर नाही होणार न ?” तिच्या केसात हात फिरवत त्याने विचारलं होतं .
” सकाळी उठलास की तू तुझ्या जगात जाणार आहेस ..माझ्यासाठी हे स्वप्न असंच राहू दे आयुष्यभर . कधी नियतीने समोरासमोर आणलं तर ओळख दाखवशील .” आणि उत्तरादाखल त्याने तिला वेढून घेतलं होतं आपल्याभोवती .
घाईघाईत आपला डबा पर्समध्ये कोंबत तिने पायात चपला सरकवल्या . कुलूप लावून बाहेर आल्यावर हौदातील पाणी घेऊन एक भांडभर वृंदावनातल्या तुळशीला घातलं . ती सुकलेली चालणार नव्हती . आज वाचनालयातून येतांना मिस्त्री ला घेऊन यायचं होतं…घराची डागडुजी केलीत तर कसली टुमदार बंगली दिसेल ..म्हणाला होता तो . माळ्याला सांगून
थोडीशी बागही फुलवायची होती समोर . बाहेर सूर्याचा दिवस केव्हाच सुरू झाला होता , पण आजचं ऊन कोवळं होतं …
©अपर्णा देशपांडे
Image by shashi javali from Pixabay
Latest posts by Aparna Deshpande (see all)
- आत्तु-भाग ३ (शेवटचा भाग) - June 17, 2022
- आत्तु- भाग २ - June 7, 2022
- आत्तू- भाग १ - June 3, 2022
कथा फारच चांगली आहे . शेवट अनपेक्षित ..
Masta
Thank you
धन्यवाद
धन्यवाद
थँक्स
मस्त… आवडली!!
खूप धन्यवाद
धन्यवाद
खूप छान
धन्यवाद
Its amazing
Wah
खूप आवडली
थँक्स डिअर