आणि valantine गोड झाला- ३

आधीच्या भागाची लिंक- आणि valantine गोड झाला- २

“sorry, ……..पण मला ऐकवत नव्हतं पिहुचं रडणं म्हणून आलो , प्लीज काही हेल्प हवी आहे का ? डॉक्टर कडे वगैरे जायचं असल्यास मी काढतो माझी बाईक , आमच्या family डॉक्टरच्या घरी जाऊ आपण, ते attend करतील आपल्याला आत्ताही ”

“अभिजित मलाही नेमकं कळत नाहीये की नक्की काय होतंय हिला , पण अचानक झोपेतून दचकून उठली आणि मला बिलगून रडायलाच लागली. आणि थांबतच नाहीये, कदाचित तिचे आई बाबा स्वप्नात आले असतील तिच्या”

“तसं लहान मुलांचे मला काही अनुभव नाही, आणि हिचं रडणं कसं थांबवू कळत नाहीये , बरं माझ्या आईला फोन करते आहे , तर तिचा स्वीच ऑफ येतोय”

क्षिती रडकुंडीला येऊनच सगळं बोलत होती . अभिजितने हळूच तिच्या कडेवरून पिहुला त्याच्या कडेवर घेतलं . त्यालाही माहित नव्हतं की तो  काय करणार होता तिचं  रडणं थांबवण्यासाठी , पण प्रयत्न तर करायलाच हवे होते. तितक्यात शेजारच्या भावे काकुनी दार  उघडले

“काय गं, काय झालं पिहुला , का रडते आहे इतकी?, आणि अभी तू कसा इकडे?”

“काकू अहो मी हि तिचं रडणं ऐकूनच आलो , म्हंटल काही मदत हवी असेल तर करावी”

“हो हो शेजारधर्म आहे आपला तो , मला सांग हो काही लागलं तर” असं नुसतच   म्हणून त्यांनी दरवाजा मात्र लावून घेतला

का कोण जाणे पण पिहू अभिजीतच्या कडेवर आल्यावर शांत झाली होती, मुसमुसणं चालू होतं पण आता ती रडत नव्हती , आणि क्षिती सुद्धा तिच्या पाठीवर थोपटत कौतुकाने अभिजीतकडे  बघत होती

“कदाचित भरभक्कम पुरुषाच्या कडेवर गेली ना, प्रेम आणि माया ह्यासोबत कधीकधी एक सुरक्षितता सुद्धा हवी असते लहान मुलांना , ती तुमच्या कडेवर तुमच्या खांद्यावर डोकं टेकल्यावर कदाचित मिळाली असेल”

“कदाचित …. “अभीला सुद्धा बरं वाटलं की आपण काहीतरी मदत करू शकलो ह्यांना.

“द्या मला इकडे तिला , आता शांत झाली आहे , झोपेल कदाचित परत थोडावेळ”

अभिजितने पिहुला क्षितीच्या कडेवर दिले आणि तिने त्याला खुणेनेच त्याला आत यायला सांगून  दार लावायला सांगितले.

पिहुला बेडरूम मध्ये झोपवून ती दोघांसाठी मोठ्या मग्स मध्ये गरमगरम कॉफी घेऊन आली.

“झोपली का शांत आता?”

“yes , खरंच thanks अभिजित , मला इतकं टेन्शन आलेलं, एकतर नवीन घर , शेजार नवीन , आई बाबा जवळ नाहीत”

“thanks तर मी म्हणायला हवंय, इतक्या सुदर कॉफी साठी आणि ती हि माझी फेवरेट ब्रू”

“अय्या मलाही कॉफीच आवडते आणि ब्रूच”

अभिजित मनात विचार करू लागला , चला एक आवड तर जुळत आहे.

“पण इतक्या सकाळी तुम्हाला यावं लागलं , sorry…”

“अरे क्षिती काय लावलं आहेस sorry, thank you…. please हे शब्द मला खूप जड वाटतात”

“बरं बरं ह्यापुढे नाही म्हणणार …. आज सुट्टी ना तुला ?…. ओह sorry तुम्हाला?

“ ’तुला’ हे जास्त बेटर आहे , आणि मी हि क्षितीच म्हणेन , चालेल ना ?

“हो हो नक्कीच”

विचारू की नको अश्या द्विधा मनस्थितीत असताना क्षितीनेच विषय काढला

“आज तुला सुट्टी असेल ना ? रविवार आहे आज?

“हो हो आज आरामात,….का गं , काही मदत हवी आहे का?

“नाही रे मदत नकोय, तुझ्या  मनात आलेच असेल ना की आम्ही दोघीच का राहतो ?माझे आई वडील कसे नाहीत जवळ ?”

“क्षिती मला जाणून घ्यायला आवडेलच हे सगळं, पण take your own time, नसेल सांगायचे तर नको सांगूस, आणि मी हे मनापासून सांगत आहे”

“पण का कोण जाणे तुझ्याशी ओळख झाल्या दिवसापासून जाणवत आहे तुझा  खरेपणा , तुझा आमच्या दोघींकडे बघायचा दृष्टीकोन, आणि ते हि अगदी कोणताही मोबदला नको असलेल्या भावनेने…..मला माणसं कळतात रे अभिजित !”

“क्षिती ….” तो इतकंच बोलला

“अभिजित ……”

“बोल ना तुला काहीतरी बोलायचं होतं ना ?”

“ पिहुचे आई वडील अपघातात गेले हे तर तुला माहीतच असेल. माझी बहिण काही तास शुद्धीत होती, पण जिजाजी मात्र लगेचच खूप ब्लीडींग झाल्यामुळे गेले. त्यावेळी ताईच्या डोळ्यातील ते आर्जव , की ‘माझ्या पिहुकडे लक्ष दे, तिला कधीही अंतर देऊ नकोस’ मला आजही लक्ख आठवत आहे. मी तिला तेव्हा वचन दिलं की काहीही झालं तरी पिहुला मी कधीही अंतर देणार नाही .ती गेल्यावर तिचे ते डोळे माझा अजूनही पिच्छा सोडत नाहीयेत . आई आणि बाबा तर अजूनही ह्या धक्क्यातून स्वतःला सावरू शकले नाहीयेत. आई रात्री अपरात्री मधेच जागी होते , आणि नंतर तिला झोपच नसते. अखंड बडबड करणारे माझे बाबा आता इतके शांत झाले आहेत , की कधी कधी वाटतं ते आहेत की नाही. अभिजित हे इतकं सगळं मी एकटीने सहन केले आहे गेले सहा महिने तुला नाही कल्पना”

हे सांगत असताना क्षितीचे डोळे सतत भरून येत होते , आणि अभी सुद्धा ऐकून सुन्न झालेला होता.

“पिहुला बघून आईला ताईची सतत आठवण येत होती , खरंतर ताईच्या सासरचे पिहुला सांभाळायला तयार होते , पण माझा  तिला जास्त लळा म्हणून मी तिला आमच्या घरी आणलं. आईला पिहुला बघून होणारा त्रास टाळण्यासाठी मी एक डिसिजन घेतला की तसंहि माझं आर्किटेक्चर चे ऑफिस माझी असिस्टंट नीट सांभाळत आहे , तर काही महिने मी पिहुकडे नीट लक्ष देऊच शकते. माझ्या काकूने सांगितले की तू इथेच डोंबिवलीत  राहा , पण इस्ट ला जागा घे भाड्याने आणि रहा , बघ आईमध्ये काही फरक पडतो का’. आई बाबा आता डोंबिवलीचे घर सोडून तळेगावला राहतात , तिथली हवाही चांगली आहे , आईलाही बरं वाटतंय हळूहळू”

“क्षिती खूपच वाईट घडलं आहे गं पिहूच्या बाबतीत . इतक्या लहान वयात अनाथ होणं हे फार त्रासदायक आहे. पण म्हणतात माय मारो आणो मावशी उरो . तसं तू तिचं खूप मायेनं करत आहेस , मी बघतच आहे रोज. hats off to you”

“चल रे काहीही , माझ पण प्रेम आहे पिहू वर , आणि ती मी उत्तम पार पडणार आहे ताई साठी”

“तू मगाशी म्हणालीस रविवार…. सुट्टी… काही काम होतं का ?”

“काम नाहीच , अरे आज पिहुला घेऊन नवीन mall मध्ये जायचं होतं, तर म्हंटल येशील का सोबत , म्हणजे माझ्या मैत्रिणी पण आहेत येण्यासारख्या , पण तुला आणि पिहुला एकमेकांची सवय आहे , तर रमेल ती म्हणून म्हंटल , सहज शक्य असेल तर येशील का?

“नक्कीच येईन , कधी जायचं आहे , आत्ता सकाळी ?की संध्याकाळी?”

“आत्ता नको , मी जरा ऑफिसला जाऊन येते . आपण पाच वाजता जाऊ , चालेल?

“हो तू मला मेसेज कर निघालीस की , माझ्या बाईकवरूनच जाऊ”

“बाईकवरून?”

“का ? मी पाडणार वगैरे नाही तुम्हाला …. आणि अगदीच ऑकवर्ड वाटत असेल तर रिक्षेने जाऊ”

क्रमश:

Image by StockSnap from Pixabay 

Chapekar Manasi

Chapekar Manasi

कविता ,लेख ,ललित आणि कथा लिखाण,नवीन पदार्थ तयार करणे आणि खिलवणे म्हणजेच एकंदर स्वयंपाकाची आवड , अभिवाचन, आणि गाण्याची आवड आहे ,आणि हे उत्तम जमते . ओंजळीतील शब्दफुले ह्या स्वलिखित आणि स्वरचित कवितांच्या कार्यक्रमाचे 40 कार्यक्रम संपन्न अनेक कवी संमेलनात आमंत्रण आणि कथेला बक्षिसे प्रभात वृत्तपत्रात दर शुक्रवारी अस्मिता ह्या सदरात लेख प्रकाशित .तसेच अनेक वृत्तपत्र आणि मासिकांत लेख ,कथा ,कविता प्रसिद्ध निसर्गाचे फोटो काढण्याची आवड ,कारण फोटो ग्राफरची नजर लाभली आहे.

2 thoughts on “आणि valantine गोड झाला- ३

  • April 2, 2021 at 3:51 pm
    Permalink

    छान. पुढे काय घडणार..?

    Reply
  • April 10, 2021 at 4:43 pm
    Permalink

    खूप छान मांडणी…. पुढचा भाग

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!