डोसा, शाहरुख आणि रजनीकांत
डोसा, पांढरा आणि खुसखुशीत थोडासा लुसलुशीत. हा फार फार आवडतो, कोणाला? तुम्हांला, मला तर आवडतोच. पण तो भयंकर आवडतो माझ्या मैत्रिणीच्या जपानी नवऱ्याला. ओनो सान माझ्या जीवश्च कण्ठश मराठमोळ्या मैत्रिणीचा जपानी नवरा. हा भारतात आलेला तेव्हा पहिल्यांदा त्याने डोसा चाखला. आणि मग तो जो प्रेमात पडलाय डोशाच्या की क्या बात!! डोसा त्याचं पहिलं प्रेम आहे म्हणे. मैत्रिणीने स्वीकार केलाय त्याचा. आणि एकदा स्वीकार केला की कसली तक्रार. असो. तर हा डोसा त्याच्याच नाही तर अनेक जपानी माणसांच्या गळ्यातला ताईत बनलाय. का आणि कशाला? त्याच्या पोटी असणाऱ्या अनेक वैशिष्ट्यांमुळे. हा पचायला हलका. परत तिखट नाही. त्याला मूळची अशी काही स्वतःची खास चव नाही. त्यात हा बनतो सहज आणि कमीत कमी पदार्थांपासून. अजून एक कारण म्हणजे डोश्या सारखेच दिसणारे क्रेप्स खायला जपानी लोकांना भारी आवडतं. तसं तर त्यांना भारतीय जेवणंच आवडतं म्हणा. पण ते त्यांना तिखट लागतं. कितीही करा सपक अगदी आपल्यासाठी असणारं मिळमिळीत जेवण सुद्धा जपान्यांना भयंकर तिखट लागतं. सवय जीभेची. दुसरं काय. पण तरीही जपानी लोकं लिटिल महाराजा, नमस्ते इंडिया, महाराजा ह्या अतिप्रसिद्ध भारतीय रेस्टोरेंटमध्ये भारतीय जेवण जेवायला मनापासून जातात. आणि खिसा कापून घेतात. वर हाय हुई करत, अगदी नाकाचा शेंडा लाल होईस्तवर भारतीय करी नानसोबत ओरपून खातात. पण डोश्याचं तसं नाही. हा त्यांना घाम फोडत नाही. वर हलका, खिशाला पण पचायला पण. ह्या डोश्याचीच एक गंमत सांगते तुम्हाला. जपानातच घडलेली. त्याचं असं झालं, मैत्रीण आलेली घरी. ती पण जपानी. गडबडी आणि बडबडी. तर तिला खास भारतीय जेवण जेवायचे होते. पण माझ्या जपानातल्या घरात ना गॅसची शेगडी होती ना जास्त भांडी कुंडी. त्यात जास्त काही सामान पण नव्हतं. एकटीचा आणि एकवेळचा संसार. त्यामुळे मी ती येणारं म्हणताच कपाट धुंडाळलं. सापडलं काय? तर गिस्टचे इन्स्टंट डोसा मिक्स आणि शिरा मिक्स. मला अगदी नाचावंसं वाटू लागलं. हे म्हणजे असं आंधळा मागतो एक डोळा झालं. तिला हे दोन्हीही पदार्थ आवडतील ह्याची खात्री होती मला. आणि मला सुद्धा माझा इन्स्टंट आणि रेडिमेड सुग्रणपणा दाखवता येणारं होता. आलंच मनात, हेच ती वेळ, हाच तो क्षण आणि हीच ती संधी. मग काय नसलेला पदर खोचून कामाला लागले. अर्थात हॉट प्लेटवर डोसा करणं सोप्प नाहीये बरं का!! आणि सुगरण आहेच मी. तेव्हा झालं, शिरा करून झाला त्यात केळ वगैरे घालून बदाम वगैरे पेरून त्याला छान नटवलं, सजवलं. हॉट प्लेटवर तवा ठेवला तापत. डोश्याचं पीठ भिजवलं. घरात होती ती लसूण चटणी काढून ठेवली बाऊलमध्ये. असा सगळा जामानिमा तयार करून, वाट बघत बसले तिची. ती आली पण ठरल्या वेळी. मग गप्पा झाल्या. चहा, चकली झाली. मग तिला म्हटलं आलेच बरं का. तिथेच जवळ असलेल्या किचन नावाच्या गॅलरी पेक्षाही छोट्या जागेतल्या हॉट प्लेटवरच्या गरम तापलेल्या तव्यावर पाण्याचे शिंतोडे उडवून तवा चांगला तापलाय की नाही ते तपासलं. आणि मग एकसारखं पीठ घालतं डोसा टाकला तव्यावर. चुर्रर्र, चुर्रर्र, चुर्रर्र. असा आवाज सुद्धा आला. आणि डोश्याचा खमंग वास दरवळला. पुढच्या तीन मिनिटांत डोसा तयार.
मग तो तसाच तिला दिला. म्हटलं आवर्जून,” हा गरमागरमच खातात बरं का”. ताटलीतच तिथे चवीला थोडी लसूण चटणी घातली. वर सांगितलं, सांभाळून तिखट लागेल थोडी. शेजारी गोडाचा एक पदार्थ हवाच. ताट कसं साजरं दिसतं. शिकवण आईची. परदेशात पण आठवायची. डावं, उजवं किती आणि काय काय पाळतो ना आपण. मग दुसरा घालायला आत वळले. तो पण झाला लगेच तयार. तो वाढायला आले तर काय. खिळूनच गेले माझे पाय. एकाच जागी. अरे! हे काय केलं हिने. काय केलं असावं तिने? तर तिने आपण मसाला डोश्यात कशी भाजी घालतो तसा तो गोड. साजूक तुपातला शिरा डोश्यावर छान पसरला होता. आणि त्यावर ती ताटातली चटणी पखरली होती. अरे बापरे!! हे काय करून खातेय ही. किती माझा जीव हळहळला. पण तिच्या ते गावीसुद्धा नव्हतं. तिची छान खाद्यसमाधी लागली होती. तिच्या त्या मग्नतेमध्ये एक मुग्धता होती. असे दंग चेहरे खूप सुंदर दिसतात आणि.
शाहरुख खान. हा काही मदनाचा पुतळा वगैरे नाही. पुरुषी सौंदर्याच्या मापदंडावर हा उतरतं देखील नाही. सिक्स पॅक बॉडी वगैरे पण नाही. किंवा सनी देओल सारखा ढाई किलो का हाथ पण नाहीच आहे ह्याच्याकडे. बरं, अभिनय पण तो बरा करतो. अभिनयानं सम्राट वगैरे तो काही नाही. कुणी म्हणतं दिलीप कुमारची आठवण येते त्याला बघून पडद्यावर. तर कोणाला तो आपल्या मराठी आणि फर्मास काम करणाऱ्या मोहन गोखले ह्यांच्यासारख्या वाटतो, म्हणजे तो नाही त्याच काम. वर तो नाचतो वगैरे सुद्धा ठीक ठाकच . तरी त्यात असं काहीतरी खचितच आहे की दूर टोकियोत असणाऱ्या जपान्यांना हिंदी, बॉलिवूड सिनेमा म्हटलं रे म्हटलं की खानांचा शाहरुखचं आठवतो. हेच ते असावं. ज्याला आपण रोजच्या भाषेत ग्लॅमर म्हणतो. ज्याने हिंदी चित्रपटसृष्टीला ग्लॅमर दिलं हाच तो शाहरुख. आणि जपान्यांना प्रचंड म्हणजे महाप्रचंड आवडतो. त्याचे सगळे चित्रपट पाहिलेली एक मुलगी होती माझ्या ओळखीत. अर्थात जन्मानं जपानी. पण ती कर्मानं भारतीयच होती बरं का. काय योगा करायची. सॉलिड. लवलवती चवळीची शेंग जणू. तर ते राहू दे. आपण आपलं आपल्या शाहरुख बद्दलचं बोलू. आहेच तो आपलाही आवडता, नाही का? तर ह्या शाहरुखचे सगळे चित्रपट पाहिलेले अनेक जपानी मला भेटले आहेत. जपानी माणूस विदेशी चित्रपट म्हणजे एकच चित्रपट तीनदा बघतो. एकदा नुसताच बघतो. मग त्याची गोष्ट शोधून काढतो जी बरेचदा निदान इंग्रजी हॉलिवूड मुव्हीजची तरी जपानीत अनुवादित असतेच झालेली, ती तो वाचतो आणि मग दुसऱ्यांदा बघतो. तरी त्याला तो नीट आकळत नसावा म्हणून मग तो सबटायटल वाचत वाचत तिसऱ्यांदा बघतो. असे हे जपानी लोकं. भयंकर प्रोसेस ओरिएंटेड माणसं आहेत ही. आणि अचूकतेचा आणि परिपूर्णतेचा हव्यास आणि ध्यास बाळगणारी. त्यातून मग चित्रपटांची पण सुटका नाही. तर सांगत काय होते, तर शाहरुख. हा त्या मिचमिच्या डोळ्यांच्या जपान्यांना भयंकर गोंडस वाटतो. ह्याच त्यांना सगळंच आवडत. नाच, अभिनय, रूप असं सगळंच. मी जपानमध्ये होते तेव्हा शाहरुखने त्याच्या ‘फिर भी दिल है हिंदुस्थानीचा’ वर्ल्ड प्रीमिअर टोकियो मध्ये केला होता. म्हणजे आता तुम्हीचं ठरवा. किती प्रसिद्ध असावा तो जपानात. तुलनाच झाली करायची तर राज कपूर म्हणजे भारतीय चित्रपट हे जे एकेकाळी समीकरण होतं पूर्वीच्या सोव्हिएट युनियनमध्ये जवळपास तेच समीकरण आहे जपानमध्ये नवीन काळात. हिरो बदलला पण संदर्भ आणि लोकप्रियता तीच. त्याला बघून लोक विशेषतः मुलीबाळी वेड्या होतात. माणसं इथून तिथून तशीच असतात नाही. बेभान आणि उत्फुल्ल. थोडी वेडीखुळी. हसणारी आणि रडणारी. चित्रपटातल्या कलाकारांवर फिदा होणारी आणि त्यांच्या मागे लागणारी, माग घेणारी माणसं. मग ती कधी काळया, केसाळ, भरगच्च मर्दानी मनगटांची असतात. तर कधी नाजूक, सुकोमल, नावालाही केस नसणाऱ्या पिवळसर कांतीची. आपल्या छोट्या छोट्या मिचमिच्या डोळ्यांतून ती स्वप्न बघतात. आणि ती बरेचदा अगम्य भाषेत काम करणाऱ्या धड नाव सुद्धा न उच्चारता येणाऱ्या चित्रपट कलाकारांचीच असतात. मग नगर असो वा वारा स्वप्न तीच राहतात. काळ, वेळ आणि डोळे फक्त बदलत जातात.
रजनीकांत. काय ना म्हणजे मी कधी त्याचा एकसुद्धा चित्रपट पाहिला नव्हता. आणि मला त्याचं काहीही वाटतं सुद्धा नव्हतं. पण एकदम असं वाटूचं लागलं. काय? तर अभिमान आणि आनंद. का? तर मी जपानात होते. आणि माझी ओळख करून दिली जात होती, ह्याच्यामुळे. कोणाला? तर एका ऐंशी पंच्याऐंशी वर्षांच्या जपानी आजोबांना. त्यांना कोण कौतुक आणि औत्सुक्य, ह्याचे आणि माझे पण. का आणि कशाला? तर मी आलेले भारतातून. त्यांच्या प्रचंड लाडक्या हिरोच्या देशातून. संपूर्ण जपानमध्ये असा हा आपला रजनीकांत सुप्रसिद्ध आहे, कोणत्या नावाने तर “ओदोरी महाराजा” म्हणून. म्हणजेच डान्सिंग महाराजा. “किती सुंदर नाचतो हा!!” “अगबाई ह्याला काही हाडं वगैरे आहेत की नाही?”. “माणूस आहे की रोबो?”. ” कसं ना असं नाचू शकतात माणसं?”काय आणि किती. वर्णावी त्याची कथा आणि वर्णावी त्याची महती. काळा सावळा, साधा माणूस हा. नाव शिवाजीराव गायकवाड. पण त्याचा रजनीकांत काय झाला आणि तो असा समुद्रापार लोकप्रियच होऊन गेला. त्याच्या नकला करणारे किती जपानी दिसले आणि भेटले मला. आणि मला निखळ आनंद देऊन गेले. त्याची भक्ती करणारे किती जपानी भेटले मला. आणि मला चकित करून गेले. त्याच्यासारखीच अशीच हवेत सिगरेट थोडीसी उडवून, तिला वरच्यावर झेलणारे आणि स्टाईलमध्ये ती शिलगवणारे किती दिसले महाभाग. आणि मला खळखळून हसवून गेले. आपल्या जवळ असं खूप काही असतं खरंतर पण विसरच पडलेला असतो आपल्याला त्याचा. असं वाटू लागलं मला. म्हणजे किती भारतीय माणसं अशी ग्रेगरी पेक, शीन कॉनरी, जॉर्ज क्लूनी वगैरे हॉलिवूडच्या देखण्या आणि स्टायलिश हिरोंच्या मागे वेडी झालेली पाहिलेली असतात आपण. त्यांचा असतोच मोठा भक्त संप्रदाय. पण अगदी तसाच तितक्याच कौतुकाने आणि आपुलकीने रजनीचा फॅन क्लब मी पहिला. त्याच्यावरची कात्रणं वाचली. ती शिस्तशीर लावून. त्याच्या वेगवेगळ्या पोझेसवरचं कलेक्शन असणारे आणि ते तितक्याच दिमाखाने आणि आनंदाने मला दाखवणारे जपानी लोकं मी पाहिले. आणि खरं सांगते, भारतीय असण्याचा एक वेगळा अभिमान वाटला मला. देश काय फक्त नेत्यांमुळेच चालतात. ते चर्चिल इतकेच चार्ली चॅप्लिनमुळे सुद्धा ओळखले जातात. हो तर, जातातच. खचितच जातात. काय लिहिणार ह्यावर अधिक असे सुद्धा काही विषय असतात आणि माणसं. रजनी, त्यातलाच एक. खरंच आहेच तो एक देवाचा माणूस. देवाने खास घडवलेला. फुरसतीमध्ये.
तर हे असं हे काही ज्यामुळे आपली खरी ओळख पटते परत एकदा नव्यानेच आपली आपल्याला. आणि ती देऊनच जाते बरंच काही. परदेशात स्वतःची ओळख. नव्यानं येणारं आत्मभान आणि आपलं आपल्यासाठी असणारं पण नव्याने गवसत जाणारं भारतीयत्व…..
Image by nurabooo from Pixabay
- सुशीच्या पल्याड….. - August 6, 2021
- स्पर्शाचं देणं - July 14, 2021
- तुकड्या तुकड्याने जगतांना…. - June 8, 2021
Mast Maja aali