चला बसू या
मित्रमैत्रिणींबरोबर शनिवार रात्रीचा तो प्रसिद्ध कार्यक्रम ठरलेला असतो. जायचं नाही हा विचार आपल्या मनात येतच नाही, कारण भेटणारे सगळे लोक आपल्याला प्रिय असतात, आपले यारदोस्त असतात. एरवी ते एखाद्या लग्नात, सहलीत, हॉटेलात पार्टीसाठी भेटत असतात, आज फक्त ते एका वेगळ्या मैफिलीत भेटणार असतात, इतकंच! आपण त्याममनाने वेळेतच जातो कारण जिथे तिथे आपल्याला वेळेतच जायची सवय असते. अश्या मैफिलींना जरा उशिराच जावं, म्हणजे “अरे क्या यार किधर थें तुम लोग? मस्त माहोल बना है!” म्हणत रंग भरत असलेल्या कार्यक्रमात आपल्याला आपसूक सामावून घेतात हे लक्षातच येत नाही. मैत्रीण आपलं स्वागत करते. आज ती वेगळी दिसत असते. जराशी बिनधास्त, कोणतीही काळजी पाठीशी नसलेली. यामागचं खरं कारण आज कितीही पसारा झालेला चालणार असतो आणि सकाळी नवरा बरोबरीने तो साफ करणार असतो, रिकाम्या बाटल्यांची विल्हेवाट लावणार असतो, हे असावं. मैत्रिणीचा नवरा आल्याआल्या “आज ही वाइन ट्राय करायची आहेस बरं का!” म्हणत प्रेमळ आग्रह करतो. बियर, व्होडका, व्हिस्की, शॉट्स, वाइन या गोष्टी वेगवेगळ्या ग्लासात ओतल्या जातात इतपतच जुजबी माहिती असलेली मी कसंनुसं तोंड करून हो हो म्हणत नेहमीप्रमाणे एक स्प्राइटची बाटली हातात घेऊन बसते. लहान मुलं शक्यतो या कार्यक्रमातून बाद असतात, अगदी आलीच तरी त्या ना वेगळ्या खोलीत खेळायला देऊन तिथेच जेवायला खायला घालून झोपवलं जातं. ग्लासातल रंगीत पेय पाहून एखाद्या चिंट्याने “हे काय आहे?” असं विचारलंच तर “सरबत आहे बेटा” असं सांगून त्याला कटवलं जातं. चिंट्या “सरबत नाहीये ते, मला माहित आहे, किती वेडं बनवाल !” असे कटाक्ष टाकत परत खेळायच्या खोलीत जातो.
मंडळी हळूहळू जमत असतात. ज्यांच्या घरी कार्यक्रम असतो त्यांनी आज प्रसंगानुरूप दिवे(!) लावलेले असतात. एरवी वाढदिवसांना, इतर कार्यक्रमांना मी या घरात आलेले असते पण तेव्हा लख्ख प्रकाश असलेले हे घर आज वेगळंच भासतं. मंद प्रकाश, एका कोपऱ्यात भरपूर बाटल्या, ग्लास, पार्श्वभूमीला मंद आवाजातील संगीत (ही शक्यतो एखादी गझलच असते) खालीच घातलेली, भरपूर रंगीबेरंगी कुशन्स ठेवलेली भारतीय बैठक असा सगळा जामानिमा असतो. या घरात आजीआजोबा नसतात, असले तरी ते “आम्हा म्हाताऱ्याना काय करायचीये लुडबुड तुमच्यात!” अस म्हणून सगळं समजून उमजून बाहेर गेलेले असतात. लोक येतात तसे ग्लासांची किणकिण सुरू होते. सुरेख रंगाची सोनेरी पेयं ओतली जातात, त्यात टूपुक आवाज करत बर्फ़ाचे खडे पडतात, जोरदार चियर्स वगैरे म्हणलं जातं आणि मैफल सुरू होते.
या बसू या च्या कार्यक्रमांना कोणताही विषय धार्जिण असतो. घर, पैसे, राजकारण, कुटुंब, नोटबंदी, चित्रपट, संगीत, स्वयंपाक, नोकरी, जुन्या आठवणी, काश्मीर प्रश्न अगदी काहीही आणि कोणतेही विषय चालतात. मैफल थोडी रंगात आली की सगळ्यांचा प्रिय विषय मोदी यावर घमासान चर्चा होणारच असते. आठ साडेआठ होत आलेले असतात. रोजच्या सवयीनुसार आपल्या पोटात कावळे कोकलायला लागले असतात. या मैफिलींचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट म्हणजे वेगवेगळे स्टार्टर्स आणि सगळ्यात बेकार गोष्ट म्हणजे उशिरा जेवण! खरंतर जेवण आज महत्त्वाचं नसतंच, असं इतरांचं म्हणणं. पण मला जेवण हे आयुष्यभर महत्त्वाचं वाटत आलंय त्याला कोण काय करणार! तर, मुठीया, बाकरवडी, कॉर्न भेळ,चिप्स, वेगवेगळी सॅलड, चिकन नगेट्स, फिश फ्राय, छोटे आलूवडे आपल्याला खुणावत असतात. आपण बनवून आणलेलं पास्ता सॅलड सुद्धा या मला खा ची वाट बघत असतं. पण मैफल नुकतीच सुरू झाली असलेल्यांना खाण्याच फार पडलेलं नसतं. म्हणजे ते खातात पण उगाच आपलं एवढं तोंडी लावण्यापुरतं, पोटभर नाही. व्हेजवाले व्हेज खातात, नॉनव्हेजवाले डबलढोलकी करत दोन्ही स्टार्टर चापतात. माझ्यासारख्यांची पंचाईत होते. धड खाताही येत नाही, धड पिताही येत नाही. आपल्याला चांगलं ओळखत असलेली मैत्रीण तेवढ्यात म्हणते, “तू बिनधास्त खा, आम्ही आहोत!” आपल्याला थोडंसं हुश्श होतं आणि मग तो चविष्ट चखणा एकेक करून पोटात जाऊ लागतो.
एखादं पेय आणि भरपूर चखणा हे माझी भूक भागवून टाकतं. यानंतर हे लोक एक दीड ला जेवणार या कल्पनेनेच मला कसंतरी होतं. पण आजच्या रात्रीला नियम नसतात. कार्यक्रमात रंग भरायला सुरुवात झालेली असते. गोड गळ्याची एक मैत्रीण गाणी म्हणायला सुरुवात करते, दोन गिटार येणारे मित्र तिला साथ करत असतात. एकटा आलेला आमचा शांत, लांब दाढीवाला, संगीतातला रसिक मित्र एका कोपऱ्यात बसून त्यांना हळूच पुढच्या गाण्याचे क्यू देत असतो. या गाण्यांचा सिक्वेन्सही मला आता सवयीने माहीत झालाय. सुरुवात “चुरा लिया है तुमने जो दिल को, ये लडका हाये अल्ला ने होते, मध्ये कही दूर जब दिन ढल जाये, रातकली एक ख्वाब मे आयी”, हजेरी लावून जातात. रात्री जशी चढत जाते तशी गझला पेश केल्या जातात, यात “तुमको देखा, फिर छिडी रात, आज जाने की जिद ना करो” नंबर लावून जातात. मग ग्लास रिकामे होतात, दर्द वाढत जातं, तशी गाडी “इंतेहा हो गयी..वर गाडी येते. मी पाहून ठेवलंय, हे गाणं पुरुष लोकांकडून विशेष प्रेमाने, सॉरी दर्दने म्हणलं जातं. प्रत्येकाला कोणी ना कोणी आठवत असतं. शराबीने अनेकांना अनेक आठवणी दिल्या आहेत. असो. पण कडवी तोंडपाठ असतात हे खरं.
रात्र रंगत गेलेली असते, अनेक विमानं वर उडालेली असतात. मधेच एखादी डान्सची टूम निघते. न नाचणारे आवर्जून नाचत असतात. अनेक विमानांना त्यांच्या बायका “हा शेवटचा बरं का” म्हणून दटावत असतात. मधेच कोणीतरी “अरे हळू बोला रे, शेजारी रागावतील” म्हणत असतं. त्यात यजमान मित्रमैत्रीण “आमचे शेजारी खूप भारी आहेत. ते कधीच असल्या तक्रारी करत नाहीत.” असं म्हणलं रे म्हणलं की परत हसण्याखिदळण्याला ऊत येतो. या चला बसू या पार्ट्यांचं मी समर्थन करते आहे असं नाही, पण कित्येक मित्रमैत्रिणींची एक वेगळी, खेळकर, हसरी, खोडकर, मिश्किल बाजू केवळ मला या पार्ट्यांमुळे दिसली आहे, समजली आहे.
आता चर्चेस येतो एक नेहमीचा सर्वांचा लाडका विषय. तो म्हणजे आपण सगळ्यांनी मिळून एखादी ट्रिप कशी केली पाहिजे हा. तुंबळ चर्चा होते. आपण असे एका रात्रीकरता भेटता कामा नये यावर सगळ्यांचं एकमत होतं, आणि मग खूप ट्रीपा आखल्या जातात. अगदी कोल्हापूर पासून युरोपपर्यंत. कुठून, कुठे, कसं जायचं, काय पाहायचं हे सगळं ठरतं. “तुम्ही फक्त तारखा सांगा, मी सगळं प्लॅन करतो” असं एक ऑलरेडी रनवे सोडलेला मित्र छाती ठोकून म्हणत असतो. ती छाती त्याला बराच वेळ मिळत नसते, मग दुसरा मित्र ती त्याला शोधून देतो. सकाळी उठल्यावर यातल्या एकालाही ही चर्चा जाम आठवत नाही हे या रात्रीचं वैशिष्ट्य असतं. एक शॉर्ट टर्म मेमरी लॉस असतो, हा शॉर्ट नाईट मेमरी लॉस असावा.
घड्याळ एक दीड वाजलेला दाखवत असतं. आता सर्वांना जेवणाची आठवण येते. गरम दाल राईस किंवा बिर्याणी खाल्ली जाते. आता हळूहळू निघायची वेळ येते. बऱ्याचश्या विमानांनी यजमानांकडेच पथारी टाकायचं योजलेलं असतं. ते एक बरं असतं. मी ही माझ्या स्पराइटच्या बाटल्या कोपऱ्यात ठेवत चंबूगबाळं आवरते. यजमानांचा निरोप घेऊन निघते, आणि जाता जाता मनाशी ठरवते, पुढच्या वेळी ना..
घरून जेवूनच निघूया. हे साले मित्रमैत्रिणी जेवणाचं पार पाणी करतात!!!!
Latest posts by Gauri Brahme (see all)
- समीर – अनयाच्या वॉट्सऍप गोष्टी - September 26, 2022
- कच्चा लिंबू - June 20, 2022
- आई - January 21, 2022
Zakkas jamlay चला बसू या..ani ho..abhivachan zalak pan ekdam khas! 👍👍✌
धन्यवाद
एकदम सार्थ वर्णन
या पार्टीत ठरलेल्या पिकनिक कधीच प्रत्यक्षात उतरत नाहीत😃😃😃
एकदम साग्रसंगीत……… रसभरीत वर्णन…
Thanks😊
परफेक्ट वर्णन
रसरशीत
मस्त केलं आहे वर्णन… गेल्या वर्षात हे सगळं मिस केलंय… पण परफेक्ट वर्णनं …
hahaha , masta , khumasdar varnan kelay, ashya kityek partya ani tyat khup sara uralela jewan athavun agdi hach vichar manat yeto… “jewanachi vat lavtat sagle”….
आहा…झक्कास
चला बसू या….संकल्पना द बेस्ट 👍👍🥂