फुलपाखरू
जिन्यातून एकेक पायरी चढून वर जाताना तिचा श्वास भरून आला होता आणि हृदयाची धडधड वाढली होती. आजपर्यंत दुरून निव्वळ तिच्या डोळ्यांशी बोलणारे डोळे तिला जवळून बघायला मिळणार होते. नुसते बघायला?… नाही. त्या डोळ्यांचा मालक तिच्याशी स्वतः बोलणार होता.
ती मनाशीच हसली. अंतर्बाह्य मोहरून आली. दादा महाराजांनी थोड्याचवेळापूर्वी आशीर्वाद दिला होता. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाचं तिने केलेलं संचलन पाहून खुश झालेले दादा महाराज भरभरून आशीर्वाद देते झाले. ‘सदाभाऊ, ज्याच्या घरी ही लक्ष्मी जाईल त्याचं घर आनंदाने भरून टाकेल.’ असं त्यांनी तिच्या बाबांना उद्देशून म्हंटलं तेव्हा अनंताचे दादा महाराजांच्या मुलाचे डोळे तिच्या डोळ्यात बघत असल्याचं तिला जाणवलं.
किती खोलवर बघू शकते अनंताची नजर ! पहिल्यांदा मुंबईच्या केंद्रावर दादा महाराजांच्या अनुयायांनी भरवलेला चार दिवसांचा मेळावा ज्यावेळी तिने अनुभवला त्यावेळी अनंत त्या अनुयायांपैकीच एक असल्याचं तिला वाटलं होतं. दादांची प्रवचने, प्रश्नोत्तरांचे तास, त्यांच्या आरामाच्या वेळा, येणाऱ्या जाणाऱ्यांशी होणाऱ्या भेटीगाठी सगळं सगळं धावपळ करून मॅनेज करणारा उत्साही अनंत तिला फार आवडला होता. त्याचे काळेशार मोठे डोळे, गोऱ्या मनगटावर उठून दिसणाऱ्या ठसठशीत शीरा, कधी पांढऱ्या तर कधी हलक्या पिवळसर झब्ब्यातून जाणवणारी त्याची भरदार रुंद छाती, दाट काळ्या रेशमी केसांचा कपाळावर येणारा झुपका, शांत संयमी धीरगंभीर स्वर- सगळं सगळं मोहात पाडणारं. ती पुन्हा एकदा मनाशीच हसली.
‘उद्या संध्याकाळी भेटू’ असा निरोप आजच्या कार्यक्रमाची पूर्वतयारी सुरू असताना काल अनंताकडून मिळाला तेव्हा तिला ती हवेत असल्यासारखं वाटत होतं. अनंताच्या नजरेतून त्याला आपण आवडलो आहोत हे न कळण्याइतकी काही ती लहान नव्हती आणि नादानही. म्हणूनच तर त्याचा निरोप मिळाल्यापासून ती जणू काही हवेत तरंगत असल्यासारखी वावरत होती. त्या भारावलेल्या तरंगलेल्या अवस्थेतच तिने मघाशी कार्यक्रमाचं सूत्र संचालन केलं. तिच्यातील वक्तृत्व, समयसूचकता, आवाजातील मोहकता सगळं सगळं आजच्या कार्यक्रमात उठून दिसत होतं. हे सगळं अनंताही बघत होताच, अनुभवतही होता.
आणि आज तो पहिल्यांदा तिच्याशी बोलणार होता. काय बरं बोलेल अनंता?… पायऱ्या चढताना तिनं तिच्याच मनाला विचारलं. कदाचित त्याच्या मनातलं तिला जाणवलेलं तिच्याविषयीचं प्रेम तर बोलून दाखवणार नसेल? ह्या विचारासरशी पायऱ्या चढणाऱ्या पावलांची गती लज्जा आणि संकोचाने थोडी कमी झाली असली तरी हृदयाची धडधड मात्र कमालीची वाढली. आणि समजा त्याने त्याच्या प्रेमाची कबुली दिलीच तर… तर आपण काय बोलायचं?… तिला क्षणभर पाय थरथरल्यासारखे वाटले. तिला संकोचाने म्हणा किंवा भीतीने म्हणा-आहोत तिथून परत माघारी फिरावंसंही वाटलं. पण मग अनामिक ओढीने पाय समोरच ओढल्या जाऊ लागले. जणू काही तिच्या पावलांवर तिचं नियंत्रण नव्हतंच. त्यांची दिशा फक्त अनंताच्या ओढीने नियंत्रित केली होती.
पायरी दर पायरी करत एकदाची ती तिसऱ्या मजल्यावरील सभागृहाच्या दारात पोहोचली. एव्हाना कार्यक्रम संपून सगळी पांगापांग झालेली होती. अनंताच्या मार्गदर्शनात काही छूटपुट कामकरी मंडळी सूचनांनुसार आवराआवर करत होती. तिला आलेलं पाहून अनंतानं काही किरकोळ सूचना कामकऱ्यांना दिल्या आणि तिला आपल्यामागून येण्याचा इशारा केला.
सभागृहाच्या एका बाजूला असलेल्या ऑफिसवजा रूममध्ये अनंताच्या मागे मागे जाताना तिच्या मनातला गोंधळ तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू शकत होता. थोड्या वेळाने त्या ऑफिसवजा रूमच्या आत फक्त अनंता आणि ती अशी दोघेच होती.
“तुम्ही बोलवलंत?”… दोघांमध्ये ऐसपैस ठाण मांडून बसलेल्या शांततेला धक्का देत तिने अनंताला विचारलं.
“हं”… ऑफिसच्या भल्यामोठ्या खिडकीच्या काचेतून बाहेर बघत पाठमोऱ्या अनंताने नुसता हुंकार दिला. मनाशीच काहीतरी शब्दांची जुळवाजुळव करत असलेल्या अनंताची पाठमोरी आकृतीही किती मोहक वाटत होती !… त्याच्या रुंद खांद्यावर विश्वासाने डोकं टेकवून सगळं जग विसरून जावं असं तिला वाटलं. पण… पण अनंता काहीच बोलत का नाहीये?… ती शांतता असह्य होऊन तिनं पुन्हा विचारलं-“काही काम होतं?”
“हं”- पुन्हा एक हुंकार !
कठीण आहे ह्या पोराचं. एकेका प्रश्नावर हा निव्वळ हुंकारच देत बसेल तर… अशाने कसं व्हायचं?… ती मनातून खट्टू झाली. तिला वाटलं त्यानं बोलावं… मनाला अडवणारे असतील नसतील ते सगळे बांध तोडून बोलावं. एरवी नजरेनं बोलतो… आता तेच प्रत्यक्ष शब्दातून तिला ऐकवावं.
“मोहिनी…”- अनंतानं मारलेल्या हाकेनं तिची तंद्री भंगली. त्याच्या भरदार आवाजात आपलं नाव ऐकून तर आपल्याला पंख फुटून आपलं सगळं अस्तित्व तरंगत असल्यासारखं तिला वाटू लागलं. “हं…” त्याच्या हाकेला प्रतिसाद देताना तिच्याकडूनही एक साधा हुंकार निघाला.
“तुला मी आवडतो हे मला माहित आहे….”
हे ऐकून तिला लज्जेने प्रचंड अवघडल्यासारखे झाले.
“आणि तू मला आवडतेस… “
अनंताच्या भरदार आवाजात हे शब्द ऐकताना तिला तो क्षण आहे तसा आहे तिथे थांबून जावा असं वाटलं. तरूणपणाचा उंबरठा ओलांडल्यापासून आयुष्यात पहिल्यांदा कुणीतरी थेट, असं समोरासमोर डोळ्यात डोळे घालून ‘तू मला आवडतेस’ हे शब्द तिच्यासाठी उच्चारले होते. यापूर्वी ती कुणाला आवडलीच नव्हती असं नाही. ती सर्वानाच आवडायची. पण तिच्या नजरेत मात्र यापूर्वी कुणीही भरलं नव्हतं. आणि त्यामुळे ती सदैव स्वतःच्याच तंद्रीत असल्यासारखी वागायची. आपण भले नि आपलं काम भलं. मग कोण कशाला काही म्हणतोय.
अनंताच्या बाबतीत मात्र तिला ही अलिप्तता जपता आली नाही. तिचं लक्ष वेधून घेण्यासाठी म्हणून त्यानं काहीही केलं नसलं तरी त्याच्या असण्यानं कोणत्या क्षणाला तिचं लक्ष स्वतःकडे वळवून घेतलं हे तिचं तिलाही कळलं नव्हतं. अनंता आता पुढे काय बोलतोय ह्याकडे तिचं लक्ष लागलं-
“मोहिनी, तू मला खूप खूप आवडतेस…पण…”- तिच्यावरची नजर काढून घेत खिडकीतून बाहेर बघताना अनंता म्हणाला-“आपलं लग्न होणं शक्य नाही.”
तिला क्षणभर काही कळलंच नाही. अनंता जे काही बोलतो आहे त्यात होकार आहे की नकार? मी त्याला आवडते असं म्हणालाय ना तो थोड्या वेळापूर्वी?… ते खरं असेल तर आपलं लग्न शक्य नाही… असं का म्हणतोय?…त्याचं महाराजांशी काही बोलणं झालंय का?… “महाराजांनी नाही म्हंटलंय का?” – त्याचं बोलणं ऐकून गरगर भरून आलेले डोळे थोपवून धरत तिनं अनंताला विचारलं.
“अंहं… मी त्यांच्याशी या विषयावर बोललोच नाहीये काही…”
“मग?…”
“मी इच्छा असूनही तुझ्याशी लग्न करू शकत नाही मोहिनी… तू खूप आवडतेस मला हेही खरंय पण तरीही…”
“काय तरीही?……” – दुखावलेल्या पण किंचित कातर स्वरात तिने विचारले.
“तुझ्याकडे पाहिलं ना की मला झाडाच्या फांदीवर स्वतःभोवती कोष करून बसलेलं सुरवंट आठवतं… त्या कोषातून बाहेर पडल्यावर त्याचं एका सुंदर फुलपाखरात रूपांतर होणार असतं. माझ्याशी लग्न करण्याची इच्छा ठेवून तू सुद्धा एक कोष स्वतःभोवती विणू बघते आहेस…पण.. तुला कल्पना नाही. तू यातून कधीही बाहेर पडू शकणार नाहीस…”
अनंताचं बोलणं कानात साठवून घेत आणि प्रयत्नपूर्वक समजून घेत ती तशीच उभी राहिली. खरंतर तिला अजूनही त्याच्या बोलण्याचा संपूर्ण अर्थ लागला होता असं नाही… आणि मेंदूला एकाच वेळी त्याच्या प्रेमाची कबूली आणि लग्नाला नकार या दोन गोष्टींना कसा प्रतिसाद द्यावा हे अजूनही उलगडलं नव्हतं. ती तशीच द्विधा मनस्थितीत उभी राहिली… कितीतरी वेळ…
ती काहीच बोलत नाहीये हे पाहून खिडकीबाहेर नजर असलेला अनंता म्हणाला- “माझा सगळं आयुष्य दादांनी प्रयत्नपूर्वक वाढवलेल्या ह्या समाजकार्याला वाहिलेला असेल हे मी फार पूर्वीपासून ठरवलेलं होतं. त्यावेळी तूच काय दादांशिवाय इतर कुणाचाही विचार कधीच मनात आला नव्हता. मग एका कार्यक्रमात तू दिसलीस, आवडलीस. हळूहळू तुझ्यातले सारे गुण कळले. तुझं मोकळं हसणं, आत्मविश्वासाने कोणताही कार्यक्रम हाताळण, तुझा मृदू नम्र पण निश्चयी स्वभाव, आयुष्यात काहीतरी आगळंवेगळं करून दाखवण्याची जिद्द हे सगळं जाणवत गेलं आणि तू अजूनच भावत गेलीस. कधी तुझ्यावर प्रेम जडलं हे कळलं सुद्धा नाही. खूप खूप विचार केला तुझ्याबद्दल… आणि लक्षात आलं की मी तुझ्या योग्य नाही. कदाचित… नव्हे खात्रीने… मी, दादा आणि आमची संस्था ह्याने तुझ्याभोवती एक कोष विणल्या जाईल. तुझ्या प्रत्येक हालचालीवर, कृतीवर, हसण्यावर, बोलण्यावर, वागण्यावर ‘दादा महाराजांची सून’ ह्या नात्यानं एक जबाबदारीचं दडपण येईल आणि बंधनही. तू तू राहणार नाहीस… आता आहेस तशी. आणि मला तुला अशीच बघायला आवडेल कायम… मुक्त.. आनंदी.”
एक खोल श्वास घेऊन अनंताने आपलं बोलणं थांबवलं. नंतर कितीतरी वेळ त्यांच्यातील शांतता सुद्धा काहीही बोलायला तयार नव्हती. गालावर ओघळणार्या अश्रूंना अजिबात न अडवता अतिशय दुखावलेल्या पण निश्चयी स्वरात ती म्हणाली-“अनंता… मला तू आवडला होतास.” त्यानं खिडकीबाहेर गुंतलेली नजर सोडवून घेत तिच्याकडे प्रश्नार्थक होत वळवली तेव्हा ती म्हणाली- “नीटच ऐकतो आहेस तू… ‘आवडला होतास’ असंच म्हणाले आहे मी. पण आता थोड्या वेळपूर्वीपासून तू जे काही बोलतो आहेस ते सगळं माझ्या भल्यासाठी आणि काळजीपोटी असलं तरीही तू फार सामान्य माणूस आहेस हे कळलंय… अरे सुरवंट सुद्धा त्याच्या इच्छेने स्वतःभोवती कोष विणतो. कोष विणणारा त्यातून बाहेर पडण्याचीही धमक ठेवतो रे… तेव्हाच त्याचं फुलपाखरू होतं ना?… तुझ्यामते तू मला लग्नाला नकार देऊन फुलपाखरू होण्याची मुभा दिलीयेस पण तू मला कोष विणण्याआधीच थांबवलंस हे लक्षात तरी आलं का रे तुझ्या?… बाई लग्न करते ना तेव्हाच तिने या सगळ्या बंधनांचा स्विकार केलेला असतो. किंबहुना तसेच संस्कार वर्षानुवर्षे आपल्या समाजातून स्त्री मनावर झालेले असतात.”
“मोहिनी…”
“तू थांब आता. काहीच बोलू नकोस. तू आत्ता जे काही सांगितलंस हे मला ठाऊक नाही कळत नाही असं वाटलं का तुला. पण त्यातून सुद्धा मला माझी वेगळी ओळख निर्माण करता येईल हा आत्मविश्वास मला होता. प्रेमात ताकद असते रे… बळ मिळतं त्यातून… तू मात्र हे बळ नाही मिळवू शकलास… असो… आज जे काही आपल्यात बोलणं झालंय त्याने मनावर खूप मोठा घाव झाला असला तरी वेळेनुसार भरल्या जाईलच तो. माझं फुलपाखरू निश्चितच होईल. फक्त त्यावेळी माझ्या मुक्त भिरभिरण्याचे माझ्या स्वातंत्र्याचे कारण तू असशील या गैरसमजात राहू नकोस. कोष विणण्याची आणि त्यातून बाहेर पडण्याची जबाबदारी मी माझी स्वतः घेईल आणि पारही पाडेल.”- इतकं बोलून ती धाडधाड जिना उतरत खाली गेली आणि अनंताची हतबुद्ध नजर कुठेही टिकेना… ना खिडकीबाहेर… ना आत…
Latest posts by Vinaya Pimpale_w (see all)
- जिगसॉ जिंदगी पत्र क्रमांक 8 - May 20, 2021
- फुलपाखरू - April 13, 2021
- पोटॅटो पिनव्हील - March 27, 2021
Gd 1